श्री गुरुदेवदत्त मंदिर कमला नेहरू पार्क, पुणे

कमलानेहरु पार्क दत्त मंदिर
श्री गुरुदेवदत्त मंदिर कमला नेहरू पार्क

पुण्यनगरीतील  मध्य वस्तीत कर्वे रोड वरील एरंडवणा परिसरात  डॉ . केतकर रस्त्यावर मध्यवर्ती कमला नेहरू पार्क आहे. त्यालागूनच हे दत्तमंदिर आहे. पुण्यनगरीत अनेक सुंदर प्रेक्षणीय मंदिरे आहेत तशीच ती अध्यात्मिक शक्तीची केंद्रे  म्हणून प्रसिद्धीस आलेली आहेत. अश्याच  एका पवित्र मंदिरात या कमला नेहरू पार्क दत्तमंदिराची गणना होते. आपण या मंदिर परिसरात प्रवेश करताच तेथील पवित्र वातावरण व प्रासादिक महत्व जाणवते.

पूर्व इतिहास

हे मंदिर भांडारकर रस्त्याजवळ असून पूर्वी याजागी एक छोटीशी बाग होती. त्या बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठी एक व्यक्ती माळी म्हणून नियुक्त केलेली होती. इ. स. १९६८ मध्ये एके समयी तो माळी बागेत काम करीत असताना त्यास एक धातूंचा पादुका जोड मिळाला. त्यांनी मालकास दिला त्या दत्त पादुका होत्या. इ. स. १९७५ साली या पादुकांची प्रतिष्ठापना करून एक छोटेखानी मंदिर पादुकांसाठी बांधण्यात आले. १९८१ श्रीगुरुदेवदत्त मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. उद्देश होता मंदिराची देखभाल व विकास. याच ट्रस्टने  मंदिराचे नवीन बांधकाम व दत्तमूर्तीची  प्रतिष्ठापना ही उद्दीष्टे समोर ठेऊन कार्यास प्रारंभ केला. इ. स. २००८ मध्ये सद्यस्थितीत असलेले  सुंदर मंदिर अस्तित्वात आले.

आपण या कमानीतून प्रवेश केल्यावर अत्यंत प्रसन्न वातावरण अनुभवण्यास मिळते. संपूर्ण मंदिरातील सुंदर संगमरवरी काम, सुंदर संगमरवरी दत्त मूर्ती पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते. मूर्तीसमोर उभे राहून प्रसन्न पूजा व विहंगम दत्त मूर्ती पाहून देहभान विसरून जाण्यास होते. दत्तभक्त सर्व धावपळीचे जीवन विसरून मंदिरात स्थिरावतात. येथील सभामंडपात ग्रंथराज श्री गुरुचरित्रातील प्रसंग अत्यंत उत्तम रित्या चित्रित केलेले आढळतात. यात ५२ चित्रांचा समावेश आहे. प्रवेश करताच एक गणेश पट्टी तुम्हास आकर्षित करते तेथेच नावनाथांच्या प्रतिमा ही दिसतात. याच परिसरातील औदुंबरास सुंदर पार केलेला आहे. येथील अत्यंत सुंदर दत्त मूर्तीस विष्णूचे शिरावर सोनेरी मुकुटात मोरपीस कायम असते. या दत्त मूर्तीचे डाव्या बाजूस दुर्गा मातेची एक प्रतिमा आढळते. येथेच भक्तांना श्री गणेश व श्री हनुमंताच्या प्रतिमा आढळतात. येथेच श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्रीपादश्रीवल्लभ व शेगावीचे गजानन महाराज यांचे मोठे फोटो आहेत त्याने आधीच सुंदर असलेल्या मंदिराची शोभा अधिकच वृद्धिंगत झालेली आहे. येथे सर्व प्रतिमा व मूर्तीची प्रातःकाळी पूजा होते व वातावरण एकदम पवित्र होते.

श्री गुरुदेवदत्त मंदिर कमला नेहरू पार्क, पुणे
प्रवेशद्वार श्री गुरुदेवदत्त मंदिर कमला नेहरू पार्क, पुणे 

या मंदिरात दर्शन होऊनही भक्तांचा पायच निघत नाही. रोज येथे येणाऱ्या भक्तांची  संख्या खूप मोठी आहे. गुरुवारीतर ही संख्या ५००० केव्हा ओलांडते हे कळतच नाही. अनेकांना येथे येऊन मानसिक समाधान मिळते तर अनेकांच्या भौतिक कामना दर्शनाने पूर्ण होतात. जेथे भगवान दत्तात्रय सर्व आयुधांसहित उपस्थित आहेत तेथे भक्तांची मनोरथे पूर्ण होणारच.

या मंदिरात दत्तजयंती मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेस फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यावेळी येथे दत्तयाग, सत्यदत्तपूजा  व  अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिर ट्रस्ट मार्फत धर्मादाय औषधालय चालविले जाते. डॉक्टर्स वैद्यकीय मार्गदर्शनही करतात. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ असतो व तो सातत्याने तसा ठेवला जातो. मंदिर परिसरात हि एक छोटीशी बाग हि आहे. ज्यांना ध्यानधारणा करायची आहे त्यांचा साठी सुनियोजितजागा आहे. उत्तम पेय जलाची  व्यवस्था आहे. येथील  विश्वस्त हे अतिशय समर्पित आहेत व वारंवार सुविधा सोयी करण्यास उत्सुक आहेत. पुण्यनगरीतील प्रत्येक दत्तभक्ताने अवश्य दर्शन करावे असे हे मंदिर दर्शन घेऊन आपणही आशीर्वाद घेऊया !

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।