चार वाणी

चार वाणी: संदर्भ श्री दत्तावधुत वाङग्मय

हिंदू पुराण ग्रंथात मानवी आत्म्याला चार वाणी असल्याचे म्हटले गेले आहे. मनुष्याचे चंचल मन, त्या चंचल मनामध्ये चालणारी विचारांची वादळे, यामुळे मनाला ऐकू येणारे विविध ध्वनी, या चार वाणींचा या कशाशीही संबंध नसून, या वाणी सर्वथा भिन्न आहेत.

परा

या वाणीला परा असे म्हणतात. परावाणीचे स्थान नाभीकमलामध्ये असून, हे कमल जागृत झाल्यानंतर या वाणीचा अनुभव येऊ लागतो. अर्थात, फक्त योग्यांनाच किंवा महान ईश्वरभक्तांना, संतांना या परावाणीचा अनुभव येतो. ही वाणी जागृत झाली की, अखंड ॐ ध्वनी साधकांना ऐकू येऊ लागतो. साधनेचा महत्वाचा प्रांत येथे संपतो.

पश्यंती

या वाणीचे स्थान अनाहत चक्रामध्ये असून, जेव्हा अनाहत चक्र जागृत होते, तेव्हा ही वाणीही जागृत होते. ही वाणी जागृत झाल्यावर साधकाला विविध प्रकारचे ध्वनी ऐकू येऊ लागतात.

मध्यमा

या वाणीचे स्थान कंठाजवळ असून, ही सदैव जागृत असते. थोडासा अभ्यास केला की, या वाणीचा अनुभव कुणालाही येऊ शकेल. मानसिक जप किंवा स्तोत्रपठन या वाणीद्वारे होत असते. या वाणीने जप केला असता म्हणजे ओठ व जीभ न हलवता जप केला असता किंवा स्तोत्रपठन केले असता जर थोडे लक्षपूर्वक पाहिले, तर कंठाजवळ स्पंदने जाणवतात व कालांतराने मध्यमा वाणीचा स्पष्ट अनुभव येतो.

वैखरी

या वाणीविषयी काहीही लिहिण्याची अथवा सांगायची गरज नाही. वैखरी वाणी म्हणजे जिभेने बोलणे किंवा जीभ. प्रथम वैखरी वाणीने म्हणजे जिभेने जप करण्याचा अभ्यास करावा. बराच काळ असा अभ्यास केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो की, जप आपोआप चालू आहे. ओठ व जीभ न हालवता आपण जप करु शकलो, म्हणजे स्तोत्रपठन होऊ लागते. नंतर आणखी अभ्यास झाल्यावर तो पश्यंती वाणीत जातो व परमेश्वराची कृपा झाल्यानंतरच तो जप परावाणीत उतरतो. मानवी प्रयत्नाने पश्यंती पर्यंत पोहोचणे शक्य आहे पण सर्वसाधारण मनुष्य मध्यमावाणीपर्यंत जाऊन पोहोचतो. पश्यंती वाणीत जप, नामस्मरण, स्तोत्रपठन उतरविण्यासाठी अत्यंत जागरुकता हा गुण अंगी यावा लागतो. जो सदैव जागरूक असतो असा मनुष्य पश्यंती वाणीपर्यंत पोहोचू शकतो. सर्व दैनंदिन कामकाज करतांनाही त्याचे लक्ष अंतरंगात चाललेल्या जपाकडे असते. पश्यंती वाणीमध्ये जप २४ तास चालू राहतो. यात साधकाला काहीही करावे लागत नाही फक्त लक्ष ठेवायचे असते. चंचल मन साधकाला सदैव फसविण्याचा प्रयन्त करते, याकरीता जागरुकता हवी. अनेक वर्षे जागरूकतेने पश्यंती वाणीचा अभ्यास केल्यानंतर 'हुंकार' केल्याप्रमाणे नाभितून आवाज येऊ लागतात. साधकाला हा आवाज सुरवातीला थोडा अस्वस्थ करतो परंतु ज्या साधकाला या विषयाचे ज्ञान आहे, असा साधक अस्वस्थ न होता त्या आवाजाकडे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयन्त करतो तेव्हा त्याच्या त्याला स्पष्टपणे ॐ ॐ असा ध्वनी ऐकू लागतो. यावर लक्ष केंद्रित करून साधक जेव्हा साधना करीत राहतो तेव्हा त्याला ध्यानामध्ये ॐ स्पष्टपणे दिसू लागतो. ध्यानावस्थेत दिसणाऱ्या या ॐ वर साधक आपले लक्ष केंद्रित करून त्या ॐ ला आपल्या हृदयात स्थापन करतो. यानंतर दररोज फक्त अंतर्दृष्टीने ॐ ला पाहात राहायाचे, एवढीच साधना बाकी राहते. जेव्हा ॐ ध्वनी २४ तास आपोआप ऐकू येतो तेव्हा साधकाचा परावाणीत प्रवेश झालेला असतो, परावाणी जागृत झालेली असते. साधक ईश्वरस्वरूप, सिद्ध, परमहंस झालेला असतो. यानंतर त्या निर्गुण - निराकार ईश्वराशी एकरूप होण्याकरीता ॐ चे ध्यानही विसर्जित करून शून्यात प्रवेश करावा लागतो. साधक अशा प्रकारे शून्य, महाशून्याशी एकरूप होऊन ईश्वराशी तादात्म्यता पावतो, तेथे कोणतेही रूप पाहायचे नसते, काही ऐकायचे नसते. सर्वत्र एकच महाशून्य, चैतन्य, महाशक्ती, परब्रम्ह भरुन राहिलेले अनुभवास येते व या परब्रम्हाशी तादात्म्य पावलेला महात्मा विश्वाशी विश्व होऊन खेळत राहतो.