प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज, श्री दत्तवाडी, तेल्हारा (जि. अकोला)  

जन्म: माघ व. द्वादशी दि. १६ फेब्रुवारी  १९०१ शनिवार                                                                                          
समाधी: जेष्ठ व. प्रति. दि. ८ जून १९९० शुक्रवार                                                                                                                               
गुरू: श्री दत्तात्रय  भगवान                                                                                                                                                         
शिष्य: श्री दादासाहेब आवदे                                          
ध्यान: शुभ्र जटाभार शिरी । तेजस्वी गौरवर्ण कांती ॥ शुभ्र त्रिवस्त्र अंगी । ग।                                                     

श्री विष्णुदास महाराज चरित्र चिंतन

आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया' ॥१॥

तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे कार्य करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक संत सत्पुरुष होऊन गेले. या भूमीला संत, सद्गुरुंची फार मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, तसेच संत गजानन, संत साईबाबा, समर्थ रामदास, संत गोंदवलेकर महाराज अशा थोर संतानी निरनिराळया पध्दतीने उपासना सांगुन भक्तांची, साधकांची, शिष्यांची प्रगती करवून घेतली. त्यात कोणी भागवत धर्मी, कोणी रामदासी कोणी दत्तमार्गी असे संत, सद्गुरु होतं.
उपासना हा मुख्य उपदेश, उपासना हे मुख्य साधन प्रत्येकाने आपल्या आचरणातून जगासमोर ठेवले. कारण; 

उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेवीण निराश्रयो ॥ उदंड केले तरी तो जयो । प्राप्त नाही ॥
समर्थ रामदास.

उपासनेशिवाय सर्व कांही व्यर्थ आहे हा ठाम विश्वास त्यांना असल्यामुळे प्रत्येक साधकाला, शिष्याला, भक्ताला उपासनेला लावणे, त्याचेकडून उपासना करवून घेणे, त्याकरिता आदर्श उपासकाचे प्रत्यक्ष जीवन जगून दाखविण्याचा अखंड खटाटोप संत, सद्गुरुंनी केला. अशाच प्रकारच्या संत सद्गुरुंच्या मालीकेत 'सद्गुरु श्री विष्णुदास महाराज' ही विभूती महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात तेल्हारा हया गांवी होऊन गेली. त्यांचा जन्म सावंतवाडीजवळ साखळी हया गावी १६ फेबु्रवारी १९०१ मध्ये झाला. बालपणापासून वयाच्या ५२ वर्षापर्यंत भारतभर भ्रमण व उपासना (श्री गुरूचरित्र) करुन व त्यासोबत तीर्थक्षेत्र व सामाजिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. आदर्श उपासक कसा असावा हयाचे चित्र हृदयात ठसवून घेतले व उपासनेची अखंड कास धरली. श्रीदत्तगुरूंनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. १९५२ साली वऱ्हाडामध्ये भांबेरी या गांवी (अकोला जिल्हा) सर्व प्रथम आले. भांबेरी, गाडेगांव व दत्तवाडी- तेल्हारा हे त्यांचे कार्यक्षेत्र असून ३८ वर्षे अविरत ईश्वरी कार्य त्यांनी केले. हया कालावधीत हजारो लोकांना परमार्थाच्या; उपासनेच्या मार्गावर लावले. ईश्वरी शक्तीने अनेक चमत्कार त्यांचे जीवनात घडून आले. अनेक शिष्यांना, भक्तांना त्यांच्यामधील ईश्वरी शक्तीचे प्रत्यय आले. सद्गुरु श्री विष्णुदास महाराज हे दत्तोपासक असून श्री गुरूचरित्र हा त्यांचा मुख्य उपासना ग्रंथ होय. त्यानुसार शुध्द आचार विचारांना त्यांनी विशेष महत्व दिले. 'शुध्द आचार विचार व उपासना हयाशिवाय सर्वांगीण विकास व परमार्थ अशक्य आहे', असे ते ठामपणे सांगत असत. परमार्थ व व्यवहार हयांची अप्रतिम सांगड त्यांचे जीवनात दिसून येते.  त्यांनी उपासकासाठी उत्सव व उपासना हयांचा उपक्रम श्रीदत्तवाडी येथे सुरू केला. श्री दत्तजयंती, श्री नरसिंह सरस्वती जयंती, श्री राम नवमी, श्री गणेश उत्सव, श्री गुरूचरित्र, श्री गजानन विजयग्रंथ अखंड पारायण, अखंड प्रदक्षिणा कार्यक्रम, पालखी असे उत्सव व उपासनाक्रम सुरू केले. उत्सवांमध्ये कीर्तने, प्रवचने नियमित सुरू केले. श्री दत्तजयंतीचे दिवशी प. पू. महाराजांचे कीर्तन म्हणजे भक्तांकरिता एक पर्वणीच असे; त्यांना गाण्याचे उत्तम अंग होते. त्यांचा आवाज गोड व पहाडी असे.

१)  'आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया ॥'
२)  बार बार नहि आवे अवसर ।
ही दोन पदे प्रत्येक कीर्तनात हमखास असत. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ हे त्याचे आवडते नित्य भजन होय. अशी ही महान विभूती ८ जून १९९० शुक्रवार रोजी समाधिस्थ झाली. समाधीनंतरही त्यांची शक्ती श्री दत्तवाडी येथे व भक्तांकरिता सर्वत्र कार्यरत आहे. हयाचा प्रत्यय अनेक भक्तांना आला.

श्री मनोहरराव देव हयांचेकडे श्री दत्तवाडी येथील कार्याची जबाबदारी सोपविली व अल्पावधीतच त्या समाधीस्थळी भव्य मंदीर व मूर्तिस्थापना करवून घेतली (१९९३-माघ वद्य १२ ला) यथाविधी मूर्ती स्थापना कार्य दि. १४ ते १८ फेब्रुवारी १९९३ रोजी संपन्न झाले.

प्रस्तुत 'सद्गुरू श्री विष्णुदास महाराज माहात्म्य' हयाची रचना पूर्णपणे प्रेरणेतून झाली असून त्यांत त्यांच्या जीवनातील चमत्कार व भक्तांना आलेले अनुभव वर्णन केलेले आहेत, त्याच सोबत त्यांनी उपदेशिलेले तत्त्वज्ञान प्रेरणेने आलेले आहे.  ते साधकास प्रेरणा देणारे ठरतील असे वाटते. कोणत्या अध्यायात कोणती कथा असावी, कोणते तत्त्वज्ञान असावे, हयाची वेळोवेळी प्रेरणा मिळाली, त्यानुसार लिखाण (अनुभूतीजन्य) श्री आवदे यांचे कडून  करवून घेतलेअसे लेखकाचे मत ते आवर्जून मांडतात . त्यामुळे हे माहात्म्य (चरित्र) विष्णुदास महाराज यांचे प्रेरणेनेच तयार झालेले आहे.  त्यात माझे स्वत:चे काहीही नाही; चुका मात्र माझ्या आहेत, त्यास क्षमा करावी.  या ग्रंथाचे चित्रांसाठी पुण्याचे श्री मुकुंद वामन आवदे हयांना प्रेरणा देऊन चित्र काढले गेले.

''श्री विष्णूदास महाराज महात्म्य'' हा ग्रंथ त्यांच्याच प्रेरणेने व दृष्टांत देऊन श्री. बाळकृष्ण गोविंद आवदे ह्या, कृपांकित अनुग्रहीत भक्त, शिष्याकडून लिहून पूर्ण करुन घेतला त्याचा उपयोग त्यांच्या अनुग्रहीतांना ज्या प्रमाणे प्रेरणादायी ठरला तसाच आध्यात्मामध्ये श्रध्दा बाळगणाऱ्या साधकांनाही मार्गदर्शक ठरत आहे. महाराजांचा अवतार १९०१ साली प्रगट झाला. यथावकाश सर्व भारतभर तिर्थ यात्रा व साधना करित ५२ वर्ष भ्रमण करुन व सत् शिष्यांना मार्गदर्शन करीत महाराज विदर्भात तेल्हारा गावी ''दत्तवाडी'' ह्या स्थळी शिष्योध्दारासाठी थांबले व त्यांच्या संपर्कात आलेल्या अज्ञानी जिवांना मार्गदर्शन करीत ८ जून १९९० शुक्रवारी अवतार कार्य पूर्ण करुन देह ठेवला. ह्या अवतार कार्यकाळात ज्या ज्या भक्तांना शिष्यांना महाराजांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या जीवनाची सार्थकता झाली, त्यांची माहीती ह्या ग्रंथात दिलेली आहे. व त्याच्या वाचनाने मानवाचे कल्याण होणार आहे. ह्या ग्रंथरुपाने महाराजांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अशा ह्या पवित्र व उद्बोधक ग्रंथाची अल्पावधित दुसरी आवृत्ती काढण्याची वेळ आली यावरुन त्या ग्रंथाची महती लक्षात येते. अशा ह्या प्रासादिक ग्रंथाचे वाचनाचे वेळी श्री महाराजांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहाणार नाही.    

दत्त भक्त श्री विष्णुदास महाराज, संतअभ्यासकांचे लेखणीतून !

१६ फेब्रुवारी १९०१ रोजी सावंतवाडी नजीकच्या साखळी गावातील मौजीबंधनाच्या कार्यक्रमास साक्षात परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती तथा श्रीटेंबेस्वामी उपस्थित होते. प्रखर दत्तोपासक श्रीटेंबेस्वामींचा वरदहस्त मस्तकावर स्थिरावण्याचे भाग्य ज्या बटूच्या ललाटरेषेवर लिहिले होते तो पुढे ‘आध्यात्मिक सत्पुरुष’ म्हणून प्रसिद्ध व्हावा हा नियतीचा शुभ संकेत होता आणि प्रत्यक्षातही तसेच घडले. साखळी गावच्या बळवंतराव पटवर्धनांचे सुपुत्र दत्तात्रय आणि स्नुषा लक्ष्मीबाई यांच्या पोटी पुढे नागेश, गुरुनाथ आणि रघुनाथ या नावाने ओळखली जाणारी संतती जन्म घेती झाली. या अपत्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचे गुरुनाथ हेच पुढे श्रीविष्णुदास महाराज म्हणून ख्यातकीर्त झाले त्याची हकीकतही अतिशय रंजक आहे.

सातव्या वर्षी मुंज होऊन श्रीटेंबेस्वामींचा आशीर्वाद प्राप्त करणारा गुरुनाथ गावच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे इचलकरंजी येथील वेदपाठशाळेत उपनिषदे आणि वेदविद्येचा अभ्यास पूर्ण करता झाला. दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची चळवळ पूर्ण बहरात होती, तत्कालीन सरकारविरुद्ध असंतोषाचे वारे वाहात होते. अशातच गरीब हिंदूंना प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याविषयीच्या बातम्या कानी येत होत्या. तेव्हा परिस्थितीच्या रेटय़ामुळे धर्मांतर करणाऱया भाबडय़ा अज्ञानी जिवांना योग्य मार्गदर्शन करून पुन्हा स्वधर्माकडे आणण्याची चळवळही जोम धरती झाली आणि त्यात गुरुनाथ सामील झाला. प्रखर देशाभिमानी व धर्माभिमानी गुरुनाथ प्रसंगी श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचा रोष पत्करून चळवळीस नेटाने पुढे नेता झाला. या कृत्याबद्दल त्याला धर्मबहिष्कृत करण्यापर्यंतची वेळ आली, मात्र न डगमगता तो धर्मकार्य करीतच राहिला. पुढे लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य लढय़ात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या गुरुनाथकडे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. गुरुनाथचा संचार वर्धा, पवनार, अमरावतीपासून थेट लाहोरपर्यंत झाला. आचार्य विनोबा भावे तसेच बाळ कानिटकर यांसारख्या महान विभूतींचा सहवास त्याला लाभला.

या दरम्यान, देव-देश अन् धर्मकार्याचा वसा घेतलेल्या गुरुनाथाची पावले देवकार्याकडे वळली. सतत भ्रमंती करणारा गुरुनाथ काशी येथे मुक्कामी असताना त्याचा परिचय श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे अनुग्रहित साधक श्रीप्रज्ञानंद सरस्वती अर्थात मोघेस्वामी यांच्याशी झाला. गुरुनाथांचे तेजस्वी देखणे व्यक्तिमत्त्व, मराठी-इंग्रजी-संस्कृत तसेच कानडी आदी भाषांवर असलेले उत्तम प्रभुत्व, देव-देश-धर्माविषयीची कळकळ, वेद-उपनिषदांचा गाढा अभ्यास आणि आध्यात्मिक वृत्ती आदी सद्गुणांनी श्रीप्रज्ञानंद सरस्वती आकर्षित झाले. त्यांनी गुरुनाथास कृपाशीर्वाद देत त्यांचे नामकरण ‘विष्णुदास’ असे केले. पुढे विष्णुदासांना संन्यस्त धर्म स्वीकारण्याचे वेध लागले, मात्र श्रीप्रज्ञानंद सरस्वती यांस भविष्यातील सामाजिक अराजकतेचे अचूक भान असल्याने त्यांनी विष्णुदासांना ‘लोकांमध्ये राहून उपासना वाढव’ असा आदेश दिला आणि त्यांचा आदेश शिरोधार्य मानून ‘विष्णुदास’ जगत्कल्याणार्थ भ्रमंतीस निघाले.

प्रथम दक्षिणप्रांत व पुढे हिमालयातील पर्वतरांगा, केदारनाथ, बद्रिनाथ असा प्रवास करीत विष्णुदास श्रीक्षेत्र गाणगापूर येथे स्थिरावले. सुमारे एक तप त्यांनी या दत्तक्षेत्रामध्ये व्यतित केले. श्रीदत्तात्रेयांची निरलस व निरपेक्ष साधना हा त्यांच्या दैनंदिन कार्याचा महत्त्वाचा भाग होता. देहावर एक वस्त्र आणि उपवस्त्र, काखेत झोळी व त्यामध्ये श्रीगुरुचरित्राची पोथी, एका हाती सोटा व दुसऱया हाती पाण्याचा गडू या सामग्रीच्या बळावर सातत्याने भ्रमंती करीत, श्रीदत्तकृपेने जे मिळेल त्यावर गुजराण करीत, कठोर उपासनेचा मार्ग स्वीकारणारे विष्णुदास मथुरेला पोहोचले तेव्हा तेथील एका धर्मशाळेत केलेले वास्तव्य त्यांच्या पुढील अवतारकार्याला वळण देणारे ठरले.

धर्मशाळेत मुक्कामास असलेल्या एका अंध मराठी माणसाचा कुणा दक्षिणात्य माणसाशी पैशाचा वाद चालला होता. त्या मुजोर व्यक्तीने अंध माणसाचे पैसे लुबाडून तेथून पळ काढला तेव्हा ती असहाय्य अंध व्यक्ती मदतीची याचना करू लागली. विष्णुदासांनी त्या व्यक्तीस मदत करण्याचे ठरविले. संपत पातोडे नावाची ती अंध व्यक्ती अकोला जिह्याच्या तेल्हारा प्रांतातील खापरखेडे गावची होती. विष्णुदासांकडे फारसे पैसे नसल्यामुळे असलेल्या पैशात शक्य होईल तितका वाहनाने आणि पुढील प्रवास पायी करण्याचे ठरवून ते दोघेजण निघाले.

ठरल्यानुसार बैतुलपर्यंतचा प्रवास रेल्वेने झाला. उर्वरित प्रवास पायी करण्याचे ठरले. सातपुडा पहाडातून खापरखेडपर्यंतचा प्रवास करेपर्यंत विष्णुदासांच्या पायाला भेगा पडून कातडी लोंबू लागली. संपतबुवा पातोडेंना त्यांच्या घरी पोहोचवून परतू पाहणाऱया विष्णुदासांना अतिश्रम व पायपिटीमुळे ग्लानी आली, अंगात ताप चढला म्हणून त्यांनी भांबेरी गावातील मारुतीच्या देवळात मुक्काम केला. हा मुक्काम त्यांच्या पुढील कार्यासाठी निर्णायक ठरला. विष्णुदासांचे तेजस्वी व्यक्तित्व, विचारांमधील सुस्पष्टता अन् कठोर आचरण यामुळे त्यांच्या भवताली दर्शनाथांचा मेळा जमू लागला. विष्णुदासांची तब्येत पूर्ववत झाली असली तरीही त्यांचे नैमिक्तिक आचरण, भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्याविषयीचा लोभ वाढू लागला. याच कालावधीत विष्णुदासांनी भांबेरी गावामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले. परस्परातील सामंजस्य व सलोखा पूर्ववत केला, मात्र कालांतराने गावातील विघातक वृत्ती पुन्हा मूळ धरू लागल्याचे पाहताच विष्णुदासांनी भांबेरी गाव सोडले व ते गाडेगावास आले. ग्रामस्थांचे दुर्दैव असे की, येथेही कालांतराने भांबेरी गावाचीच पुनरावृत्ती झाली.

या कटू अनुभवानंतर मात्र शेगाव-तेल्हारा मार्गावर किसनराव वडतकार यांच्या शेतात मुक्कामी आलेले विष्णुदास तेथेच कायमस्वरूपी विसावले. येथे त्यांनी श्रीदत्तात्रेयांची मूर्ती स्थापित केली आणि सर्वोपयोगी उपासना पद्धतीचा मार्ग अनुसरून सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले. आध्यात्मिक तसेच सामाजिक उपक्रमांना चालना दिली. सर्व संप्रदाय, सर्व जाती आणि सर्व थरातील मंडळींमध्ये एकोपा निर्माण केला.

‘व्यक्तींपेक्षा विचार श्रेष्ठ’ या धारणेतून निर्माण केलेला अन् आज सर्वत्र ‘दत्तवाडी’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर केवळ ‘देऊळ नाही तर जगण्याची पद्धत आहे’, ‘येथे चमत्काराला स्थान नाही हाच खरा चमत्कार आहे’ अशा प्रगत विचारांची ग्वाही देत आहे. समाज प्रबोधनाचा दिंडी वाहणारे अध्यात्ममार्गी समाज-सत्पुरुष श्रीविष्णुदास महाराज दि. ८ जून १९९० रोजी श्रीदत्तरूपाने विलिन झाले. त्यांचे कार्य आणि अवतारमाहात्म्य जयंत मनोहर देव यांनी ग्रंथबद्ध केले असून बाळ महाजन लिखित संक्षिप्त चरित्रातूनही उपलब्ध आहे.

आरती

जयदेव जयदेव जय विष्णुदासा ॥
दत्तात्रेय अवतारा जयदेव जयदेव ॥धृ.॥
दृश्य अदृश्य सृष्टीचा दुवा ॥
परब्रह्म दत्तवाडी प्रत्यक्ष जाणा ॥१॥ 
गणेश विष्णू महेश ब्रह्मा ॥
सर्व वृत्ती असती श्रीगुरु अंगा ॥२॥ 
उपासना उपासना उपदेश शिष्या ॥ 
मागती न कांही देती ऽ सर्वा ॥३॥
स्वप्नी प्रत्यय कित्येक शिष्या ॥
सर्वव्यापी शक्ती श्रीगुरु सदा ॥४॥
आनंदी आनंद दास बाळकृष्णा ॥
गाता सद्गुरु अगाध लीला ॥५॥

॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
॥ सद्गुरू श्री विष्णुदास महाराज की जय ॥

संपर्क: 

बा. गो. आवदे,
''गोविंदधाम'', चैतन्य कॉलनी, गोरक्षण रोड, अकोला.
फोन नं. (0७२४) २४५८४११, ९८२२५६६५३०
Email: drgbawade@gmail.com