श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)

श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर
श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर

धामोरी येथे नऊ नाथांपैकी एक असलेल्या गोरक्षनाथांचे मंदिर आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात गोदावरीच्या तीरावर वसलेले सुमारे तीन हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. ह्या गावाचे जुने नाव भामानगर असे होते. ह्या क्षेत्राचा इतिहास असा आहे. पुर्वी गोरक्षनाथ गोदावरीच्या काठाने पदयात्रा करत असताना भामानगरीतील एका शेतातून चालले होते. ऊन्हामुळे त्यांना खूप तहान लागली तसेच भूकही लागली होती. त्यावेळी त्यांनी त्या शेतात एक शेतकऱ्याचा मुलगा नांगर चालवताना बघितला व त्याच्याकडे त्यांनी पाणी व अन्नाची याचना केली. त्या मुलाचे नाव माणिक असे होते. त्याने नाथांना अन्न व पाणी दिले. पोट भरल्यानंतर नाथ तृप्त झाले व त्यांनी माणिकला काहीतरी वर माग असे म्हटले. मात्र तो मुलगा अडाणी असल्याने त्याने नाथांना न ओळखता त्यांना उलटून म्हटले की, तुझ्याकडे खायला अन्न नसताना तू मला काय देऊ इच्छितो ? त्यापेक्षा तूच माझ्याकडे काहीतरी माग. हा कृषक अडबंग दिसतो हे जाणून नाथांनी त्याच्याच युक्तीने त्याचे कल्याण करण्याचे ठरवले. त्यांनी म्हटले की, ठीक आहे तू मला देऊ इच्छितो तर एवढेच वरदान दे की, तुला जे करावे वाटेल ते तू करु नये. माणिक म्हणाला तसेच होईल. यानंतर गोरक्षनाथ तेथून निघून गेले. 

सायंकाळी घरी जाण्यास माणिक निघाल्यावर त्याला वरदानाची आठवण झाली. घरी जावेसे वाटले म्हणून त्याविरुद्ध आचरण करण्यासाठी तो तेथेच थांबून राहिला. खावेसे वाटले म्हणून काहीही खाईना. अशा रितीने १२ वर्षे त्याने उभे राहून शरीर सुकवले. १२ वर्षांनतर मत्स्येन्द्रनाथ, गोरक्षनाथ व चौरंगीनाथ तेथे आले आणि त्यांनी माणिकला ज्ञान देऊन नाथपंथाची दिक्षा दिली. धसमुसळेपणाने वागल्याने त्याचे नाव अडभंगनाथ असे ठेवले. 

श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी) येथे असलेले श्रीगोरक्षनाथ मंदिर हे माणिकच्याच शेतात आहे आणि गोरक्षचिंचही तेथेच आहे.