श्री क्षेत्र कारंजा

स्थान: विदर्भातील वाशीम (पूर्वीचा अकोला) जिल्ह्यातील लाडाचे कारंजे. करंज मुनींच्या वास्तव्या ने कारंजा शेषांकीत क्षेत्र. श्री नृसिंह सरस्वतीचे जन्मापासून मुंजी पर्यंत  वास्तव्य
सत्पुरूष: श्री नृसिंहसरस्वती, श्री दीक्षित स्वामी, श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री ब्रह्मनंद सरस्वती
विशेष: श्री नृसिंहसरस्वती मूर्ती, श्रीगुरूंचे जन्मस्थान काळे वाडा
पादुका: निर्गुण पादुका

श्री क्षेत्र कारंजा मंदिर
श्रीक्षेत्र कारंजा गुरु मंदिर प्रवेशद्वार

स्थान माहात्म्य 

थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे. श्री वासुदेवानंदसरस्वती व श्री ब्रह्मानंदसरस्वतीस्वामी यांच्या प्रयत्नाने श्रीगुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्व दत्तभक्तांना पटलेली दिसते. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-यवतमाळ या रेल्वेरस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे. साठ सत्तर हजार लोकसंख्येच्या या गावी चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय झाले आहे. प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. करंजमुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केल्याची कथा आहे. या क्षेत्रात गंगा व यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून येथून पुढे बेंबळा नदी वाहते. याच क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवीचेही वास्तव्य असल्याचे सांगतात. करंजमुनींच्या प्रभावाने गरुडापासून शेषनागास संरक्षण येथेच मिळाल्यामुळे या क्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव आहे. येथील नागेश्वराच्या पूजनामुळे कधीही विषबाधा होत नाही असे सांगतात.

याच करंजनगरीत श्री नृसिंहसरस्वती शके १३००च्या सुमारास जन्मास आले. श्रीगुरुंच्या जन्मस्थानाचा शोध अलीकडेच लागला. सन १९०५ मध्ये श्री वासुदेवानंदसरस्वतींनी या नगरीत वास्तव्य श्री राम मंदिरात केले होते. सध्याच्या गुरुमंदिराशेजारी घुडे यांचा वाडा आहे. बाळकृष्ण श्रीधर घुडे यांनी नगरनाईक काळे यांच्याकडून हा वाडा सन १८८० च्या सुमारास विकत घेतला. काळे यांचे वंशज सध्या काशीस असतात. यांपैकी कोणालाच श्रीगुरूंच्या जन्मस्थानाची कल्पना नव्हती. हा वाडा चार मजली, भव्य व प्रेक्षणीय आहे. जमिनीखाली तीन मजली भुयार आहे. भिंतीची रुंदी चार फुटांपासून सहा फुटांपर्यंत आहे. दुसऱ्या मजल्यावर श्रीगुरुंच्या जन्मस्थानाची जागा आहे. या वाड्याच्या शेजारच्या जुन्या माडीवर एक रात्र राहण्याचा योग आला असता श्री वासुदेवानंदांना श्रीगुरुंच्या वास्तव्याचा अंदाज आला. बापूसाहेब घुडे यांच्या वाड्यातील भिंतीत एक नृसिंहस्थान असून तेथे संन्यासी वेषातल्या व्यक्तीचा अदृश्य निवास असल्याचे त्यांच्या कानी आले. काहीजणांना या यतीचे दर्शन झाले होते. ‘माझे वास्तव्य येथेच आहे’ असा दृष्टांतही त्यांना झाला. अण्णासाहेब पटवर्धन यांनीही या कामी लक्ष घातले.

कारंजा दत्त मंदिर
श्रीक्षेत्र कारंजा गुरुमंदिर 

सन १९२०-२१मध्ये श्रीलीलादत्त उर्फ ब्रह्मीभूत ब्रह्मानंदसरस्वती यांनाही या स्थानाची ओढ लागून येथे गुरुमंदिर उभारावे अशी प्रेरणा झाली. त्यांना तेथे स्थापन करण्यासाठी, निर्गुण पादुकाही मिळाल्या. श्रीगुरुंचे मंदिर, त्यांची मूर्ती, त्यांच्या पादुका यांची सिद्धता होऊन सन १९३४च्या सुमारास आणखी एका या जुन्या दत्तक्षेत्राची नव्याने निर्मिती झाली. श्री दीक्षितस्वामींनीही या कामी बरेच लक्ष घातले. दत्तात्रेय, चिंतामणी गणपती, काशीविश्र्वेश्वर, गुरुपादुका इत्यादींच्या दर्शनाची सोय झाली. गुरुमंदिरातील मूर्ती अतिशय रम्य व बालसंन्यासी रुपातली आहे. येथेही श्री नृसिंहसरस्वतींचा वा दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेकदा साधकांना झालेला आहे.

श्रीगुरुंच्या मंदिरापासून जवळच कामाक्षी व एकवीरा यांची मंदिरे आहेत. गावाच्या दक्षिणेस एक मैलाच्या परिसरात ऋषितलाव असून कमळांनी व ऑस्ट्रेलियन पानकोंबड्यांनी हा शोभिवंत दिसतो. कामाक्षी देवीच्या कृपाप्रसादामुळे करंज ऋषींनी या तलावाची निर्मिती केल्याची कथा ‘करंज-माहात्म्य’ या नावाच्या प्राकृत ग्रंथात आहे. याच ठिकाणी बेंबळा नदीचा उगम दत्तमंदिराजवळ आहे. गरुड एकदा गंगा व यमुना यांना स्वर्गातून घेऊन येत असताना त्यातला एक बिंदू जेथे पडला, त्या जागेस बिंदुतीर्थ असे नाव असून तेथूनच बिंदुमती अथवा बेंबळा नदी प्रवाहित होते. या तीर्थापासून जवळच बालसमुद्र अथवा चंद्रतलाव आहे. चंद्राने गुरुपत्नीशी व्यभिचार केल्याने त्याच्या अंगाचा दाह होत राहिला. त्याने तपाचरण करून कामाक्षीची व महादेवाची प्रार्थना केली. ज्या डबक्यात त्याने स्नान करून आपल्या अंगाचा दाह शमविला, त्यास चंद्रतलाव असे नाव मिळाले. याच्या काठावरील महादेवास चंद्रेश्वर म्हणतात.

 

श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी
प. पु. श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामी

प. पु. श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे श्री क्षेत्र कारंजा येथील अभूतपूर्व कार्य

करंज ऋषींच्या पवित्र कार्याने पुनित झालेली ही कारंज नगरी भगवान दत्तात्रेयाचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असून हे स्थान परमपूज्य थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती येथे येईपर्यंत कारंजावासीयांना अज्ञातच होते. स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रेयाचा व्दितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान आहे असे तत्कालीन प. पू. ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले. प. पू. ब्रम्हानंद स्वामी पूर्वाश्रमीचे लीलावत होते. त्यांना श्री नृसिंह स्वामी महाराजांची मूर्ती तयार करुन मंदिर बांधण्याची उत्कट इच्छा होती, हे कार्य त्यांना गाणगापुरातच करायचे होते. परंतु असे सांगतात की, प्रत्यक्ष महाराजांनी प. पू. ब्रम्हानंद स्वामींना दृष्टांत देऊन गाणगापूरची जी व्यवस्था आहे ती तशीच राहू द्या, त्यामध्ये काहीही पालट करु नये, आपणास काही कार्य करायचे असेल तर आमचे जन्मस्थान व-हाडात कारंजा येथे आहे. त्या ठिकाणी आपणास जे करायचे असेल ते करा. त्यानंतर प. पू. ब्रम्हानंद सरस्वती महाराज आणि प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची भेट झाली.  श्रीं चे जन्मस्थान कारंजालाच आहे ही गोष्ट प. पू. ब्रम्हानंद श्री वासुदेवानंद स्वामींनी प. पू. ब्रम्हानंद स्वामींना स्पष्ट केली, त्याप्रमाणे प. पू. ब्रम्हानंद स्वामी कारंजास आहे.

प. पू. ब्रम्हानंदांनी ‘श्रीं’ ची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली. ती मूर्ती एप्रिल मध्ये कारंजास आणण्यात आली. मंदिर तयार झालेलेच होते. त्यामुळे चैत्र वद्य व्दितीयेला २१ एप्रिल १९३४ रोजी मुर्तीची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्व आहे. त्या पादुका काशी क्षेत्रातून प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी कारंजास आणल्या व विधीवत त्यांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात केली. या पादुका सकाळी गंधलेपनाकरीता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यावर देव्हा-यात ठेवल्या जातात. या पादुकांना अत्तर, केशर यांचे गंधलेपन नियमीतपणे होत असते. तसेच या संस्थेचा कार्यक्रम कशा प्रकारचा असावा हे प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी ठरवून दिले आहे. सकाळी साडेपाचला काकड आरती, त्यानंतर महाराजांना लघुरुद्र व पंचोपचार पूजा, त्यानंतर सत्यदत्त पूजा, सायं पुजा, पंचपदी, रात्री साडे आठला आरती अन् त्यानंतर अष्टके व शंखोवक होऊन इतर काही कार्यक्रम नसल्यास शेजारती होते आणि नंतर कपाट बंद होते. कुठल्याही परिस्थीतीत कपाटे दुस-या दिवशीच्या काकड आरती पर्यंत उघडले जात नाही. या ठिकाणच्या पुजा-याला त्रिकाल स्नान करुन गाभा-यात जावे लागते. तेही त्यांनी घरुन स्नान करुन आलेले चालत नाही. आचारी व पुजारी यांच्याकरिता स्वतंत्र स्नानगृह आहे. तेथेच स्नान करुन नंतर ते आपआपल्या कामी लागतात. पुजा-याशिवाय कोणालाही ‘श्रीं’ च्या गर्भगृहात प्रवेश नाही. हे ठिकाण अतिशय जागृत आहे. याचा प्रत्यय विविध भक्तांस वारंवार येत असतो. या क्षेत्री श्रींचे मंदिरच नव्हे तर उपासना पद्धती व दिनक्रमही श्री ब्रह्मनंद स्वामींनी ठरवून दिला. हे महान कार्य दत्तभकांसाठी त्यांनी केले आपण त्यांचे ऋण विसरून चालणार नाही.

कारंजा गुरु मंदिर
मोठे राम मंदिर, श्रीक्षेत्र कारंजा

श्रीचे जन्मस्थान व श्रींचे मुर्तीचा इतिहास

शके १८२७ भाद्रपद व वद्य ७ या दिवशी श्रेष्ठ दत्तभक्त श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंदसरस्वतीस्वामी संचार करीत करीत कारंजा क्षेत्री आले. तेथील हनुमान मंदिरात  त्यांचा मुक्काम दोन दिवस होता. कारंजा येथील वास्तव्यात त्यांनी श्री. घुडे यांच्या वाड्यातील उजव्या बाजूच्या माडीवर एक रात्र व्यतीत केली असता श्री नृसिंहसरस्वतींनी त्यांना साक्षात् दर्शन दिले व "माझे वास्तव्य येथे आहे" असे सांगितले. माडीतील एका भिंतीवर महाराजांच्या छायेसारखे काही दिसत असे. त्यांचे छायाचित्र संस्थानच्या छायाचित्रांत समाविष्ट केले आहे. कै. बापूसाहेब घुडे यांनी शके १८६३ फाल्गून वद्य ३ला त्या भिंतीत श्रींच्या पादुका स्थापन केल्या. श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म कारंजा येथे कोणत्या स्थानी झाला याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक तपास करून प. प. वासुदेवानंदसरस्वतींस्वामींनी एक विशिष्ट ठिकाणच महाराजांचे जन्मस्थान आहे असे निश्चित केले. त्याप्रमाणे ती जागा विकत घेऊन तेथे श्रींचे मंदिर बांधावे असे ठरले. ह्या कार्याकरिता कारंजा येथील काही लोकांची एक समिती नेमण्यात आली होती; परंतु समितीच्या कार्याला त्वरित यश देण्याची चिन्हे न दिसल्यामुळे त्यांनी ग्रामस्थ लोकांना या जागेत एक महान सत्पुरूष जन्मास येऊन गेल्याकारणाने तुम्ही या जागेवर एखादे तुळशीवृंदावन बांधून त्याची पूजाअर्चा करावी म्हणजे सद्गुरूंची कृपा होईल असे सांगितले.

पुढे १९२४ साली श्री नृसिंहसरस्वती तथा श्री दीक्षितस्वामी यांचा चातुर्मासानिमित्त, श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य बालक राम यानी कारंजा येथे स्थापना केलेल्या रामदासी मठात मुक्काम झाला. त्या वेळी त्यांनी कै. केशवराव गाडगे यांच्या मातोश्रींचे मन श्रींच्या पादुका स्थापन करण्याबद्दल वळविले. चातुर्मास समाप्तीनंतर श्री दीक्षितस्वामी निघून गेले व पुढे ब्रह्मीभूत झाले. 

कारंजा येथील श्रीचे जन्मस्थान
कारंजा येथील वाड्यातले माडीवरील श्रींचे जन्मस्थान

दिनांक ६ नोव्हेंबर १९३३ रोजी ब्रह्मीभूत ब्रह्मानंदसरस्वती तथा लीलादत्त हे माहूरला जाण्याच्या उद्देशाने आपल्या शिष्यपरिवारासह कारंजा येथे आले. बिंदूतीर्थाजवळील दत्त-मंदिरात त्यांनी वास्तव्य केले. श्रींचे जन्मस्थळासंबंधीची सर्व हकिगत ग्रामवासीय लोकांकडून कळताच श्री ब्रह्मानंदसरस्वती ताबडतोब श्री. कै. बाळाभाऊ महाजन यांच्या समवेत श्री. घुडे यांच्या वाड्यात आले व माडीवर जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिर बांधण्याकरता म्हणून वाड्याची मागणी केली. त्या ठिकाणी श्री नृसिंहसरस्वतींची मूर्ती असलेले मंदिर बांधावे अशी मला श्रींची आज्ञा आहे, असे त्यांनी सांगितले. वाड्याचे तत्कालीन मालक कै. बापूसाहेब घुडे यांनी, ज्या ठिकाणी पुरातन वटवृक्ष असून श्रींचा जन्म झाला आहे ती जागा मंदिर बांधण्यासाठी देण्याचे पंचांमार्फत कबूल केले. श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी स्वत: ते स्थळ पाहिले व प. प. वासुदेवानंदसरस्वतींनी तेच स्थळ निश्चित केले होते, असे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. श्री ब्रह्मानंदसरस्वती स्वामींनी लोकांना त्या स्थानाचे महत्त्व पटवून दिले व लोकांची सहानुभूती मिळताच ती जागा विकत घेण्याच्या उद्योगाला प्रारंभ केला. त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा आपला मनोदय व निश्चय जाहीर केला.

मुंबई मुक्कामी श्री ब्रह्मानंदसरस्वतीस्वामी यांनी मंदिराकरिता निधी जमविण्याचे प्रयत्न केले. मंदिर बांधण्याकरिता आवश्यक असणारी सर्व रक्कम देणारे कोणीही न मिळल्यामुळे त्यांनी एक विनंतीपत्रक छापून ते संस्थानिक व श्रीमंत लोक यांच्याकडे पाठविले. परंतु त्याचाही व्हावा तसा उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनी आपले शिष्य श्री. नाडकर्णी, त्या वेळचे कार्यवाह कै. रघुनाथ विठ्ठल श्रोत्री व इतर मंडळी बरोबर घेऊन काही संस्थानिकांकडे द्रव्यसाहाय्यार्थ दौरा केला; परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. प्रभुस्मरण करताच हे मंदिर सामान्य जनतेच्या मदतीनेच बांधले जावे अशी श्रीगुरूंची इच्छा दिसते असा विचार त्यांच्या मनात आला. लगेच त्या धोरणानुसार त्यांनी निधी जमविण्याचे निश्चित केले. स्वइच्छेनुसार प्रत्येकाने देणगी द्यावी असे स्वामींनी सांगताच मध्यम स्थितीतील बऱ्याच लोकांनी मदत दिली. अशा प्रकारे मंदिर उभारण्याला आवश्यक असलेल्या निधीपेक्षा थोडा अधिक निधी जमला, तथापि अर्चेला आवश्यक असणारी रक्कम जमली नाही. सुमारे दीड हजार रुपये कमी पडत होते. श्री ब्रह्मानंदसरस्वती स्वामींनी आपल्याजवळ असणाऱ्या वस्तू विकून ती तूट भरून काढली.

गुरुमंदिर बांधकाम व श्री नृसिंहसरस्वती मूर्ती 

मंदिर बांधण्यास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम पायाशुद्धी करण्यात आली. त्याकरिता नाशिकचे रहिवासी श्री. अण्णाशास्त्री वारे व श्रीधरशास्त्री आणि काशीचे दोन विद्वान ब्राह्मण यांना पाचारण करून शास्त्रोक्त विधिपूर्वक काही ताम्रपट मंदिराच्या पायामध्ये ठेवण्यात आले. शके १८५५ मार्गशीर्ष महिन्यात मंदिराची कोनशिला बसविण्यात आली. दिनांक ३ डिसेंबर १९३३ ह्या दिवशी श्री दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. मुंबईवरून स्थापत्यशास्त्रनिपुण श्री. आचरेकर यांना बोलाविण्यात आले होते. केवळ चार महिन्यात (चैत्र १८५६ या महिन्यात) मंदिराचे काम पूर्ण झाले. मंदिराकरता लागणारे दरवाजे, खिडक्या, संगमरवरी दगड इत्यादी सामान मुंबईहून आणण्यात आले होते.

कारंजा येथील श्री नृसिहसरस्वती महाराज
श्री क्षेत्र कारंजा येथील श्री नृसिहसरस्वती महाराज 

मंदिर बांधण्याचे काम पूर्णावस्थेला आले. त्यात श्री नृसिंहसरस्वतींची मूर्ती स्थापन करण्याची वेळ समीप आली. परंतु श्रीगुरूंची प्रतिमा कशी तयार करावयाची हा प्रश्न होता. श्रीगुरूंची प्रतिमा तयार करण्याकरिता अस्सल व एकमेव उपलब्ध साधन म्हणजे श्री गुरुचरित्रात त्यांचे वर्णिलेले शब्दचित्र हेच होय. याच आधारे व सध्या आद्य श्री शंकराचार्यांचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्राच्या नमुन्याप्रमाणे श्री नृसिंहसरस्वतीस्वामींचे छायाचित्र काढावे असे श्री ब्रह्मानंदसरस्वती यांनी ठरविले. ते काम त्यांचे शिष्य व भक्त श्री. रा. बा. धुरंधर (मुंबई स्कूल ऑफ आर्टसचे मुख्याध्यापक) यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन प्राचार्य श्री. सालोमनसाहेब यांचा व श्री ब्रह्मानंदस्वामी यांचा परिचय असल्यामुळे त्यांनीही स्वयंस्फूर्तीने मीही एक चित्र काढतो असे स्वामींना सांगितले. अशा प्रकारे श्री ब्रह्मानंदस्वामींच्या अनुज्ञेने उपरिनिर्दिष्ट दोघांनीही श्रींचे चित्र काढण्याचे ठरविले. एके दिवशी त्या दोघांनाही श्री गुरुमूर्तीचा स्वप्न साक्षात्कार होऊन ‘मला नीट न्याहाळून घ्या व आपले चित्र काढा’ अशी आज्ञा झाली. साक्षात्काराच्या अनुभवानुसार दोघांनीही स्वतंत्रपणे काढलेली आपआपली चित्रे स्वामींच्या जवळ आणून दिली. आश्चर्याची गोष्ट अशी की, ती दोन्ही चित्रे अगदी तंतोतंत एकाच नमुन्याची होती. श्रींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झालेले ते दोन्ही चित्रकार धन्य होत! ज्यांच्या चित्रकलाचातुर्याने व नैपुण्याने सर्वसाधारण जनतेलासुद्धा श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे, ते धन्य होत !

श्रींची मूर्ती घडविण्यास लागणारा खर्च देण्याची इच्छा श्री. धुरंधर यांनी व्यक्त केली व श्री ब्रह्मानंदस्वामींनी त्या गोष्टीस संमती दिली. तसेच श्री. एम. ए. जोशी यांनी श्रींच्या चित्राचे छायाचित्र काढून दिले व श्री दत्तात्रेयाची तसबीर करून दिली.

जयपूर येथे श्रींची संगमरवरी पाषाणाची नयनमनोहर मूर्ती तयार करवून ती श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी स्वत: आपल्याबरोबर मोटारीतून कारंजा येथे आणली. शके १८५६ चैत्र शुद्ध १३पासून पंचान्हिक दीक्षेने प्रारंभ करून चैत्र वद्य २लाच (दिनांक १/४/१९३४) चित्रा नक्षत्रयुक्त वृषभ लग्नाच्या सुमुहुर्तावर श्री गुरुनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या ह्या मूर्तीची मंदिरात त्यांनी प्रतिष्ठापना केली. त्याचबरोबर श्रीदत्तात्रेय, श्रीचिंतामणी गणपती, श्रीकाशीविश्वेश्वर व श्रीगुरुकृपा यांचीही स्थापना करण्यात आली.

प्रतिष्ठापना करण्यापूर्वी श्रींची बालसंन्यासी स्वरूपाची सदर मूर्ती मंदिराजवळील घरात आणून ठेवण्यात आली होती. प्रतिष्ठापनेच्या महोत्सवाकरिता काशी व नाशिक येथून विद्वान ब्रह्मवृंदांना बोलविण्यात आले होते. त्यांच्या करवी मंत्रानुष्ठान, जप इत्यादी कार्ये श्री ब्रह्मानंदसरस्वतींच्या देखरेखीखाली चार दिवस सुरू होती. प्रतिष्ठापनेच्या दिवशी पूजाअर्चा करण्यापूर्वी मंदिराचा कळस व मूर्तीचे आसन यांवर ब्राह्मणांनी वेदमंत्रांनी अभिषेक केला. नंतर मंदिराजवळील घरातून श्रींची मूर्ती पालखीतून वाजतगाजत मंदिरात आणण्यात आली व नंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन जवळून दर्शन घेण्याचा पुन्हा कधीही न मिळणारा लाभ सर्वांनी घेतल्यावर महाप्रसाद झाला. महाप्रसादाचा पुण्यलाभ सुमारे एक हजार लोकांनी घेतला. तो दिवस म्हणजे कारंजा नगरीतील एक चिरस्मरणीय व पावन दिन होता. ज्या लोकांनी तो सोहळा प्रत्यक्ष अवलोकिला ते धन्य होत! या दिवसापासूनच भाविकांना श्री नृसिंहसरस्वतींच्या साक्षात अस्तित्त्वाचा अनुभव येऊ लागला.

सुमारे १९२०-२१ साली श्री ब्रहमानंदसरस्वती स्वामी हे गाणगापुरात दर्शनाकरिता गेले होते. त्या वेळी श्री नृसिंहसरस्वतींच्या कारंजा येथील जन्मस्थानाचा तपास करून ते स्थान निश्चित करावे किंवा तेथे श्रीगुरूंचे मंदिर बांधून त्यात त्यांची मूर्ती स्थापन करावी याबद्दल त्यांच्या मनात अस्पष्ट अशी कल्पनाही आली नव्हती. गाणगापूरात ते दर्शन घेत असता "तू माझ्या निर्गुण पादुकाचे काम सुरू कर" असा जोराचा आदेश श्रीगुरूंनी दिला. परंतु त्या पादुका कशाकरिता व कोठे स्थापन करावयाच्या वगैरे बाबतीत त्या वेळी काहीच दिग्दर्शन करण्यात आले नाही. श्रीगुरुंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री ब्रह्मानंदसरस्वती स्वामी काशीस परत आले व तेथे त्यांनी आदेशानुसार अनुष्ठान सुरू केले. पाच दिवस सतत अनुष्ठान चालू ठेवल्यानंतर त्यांना श्रीगुरूंच्या निर्गुण पादुका मिळाल्या. त्या निर्गुण पादुकांवरील हे अनुष्ठान श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी सतत बारा वर्षे चालू ठेविले. पुढे कारंजा येथे मंदिर बांधून तयार झाले. तरीही त्यांना निर्गुण पादुकासंबंधीचे गूढ उकलले नाही. परंतु मंदिरात श्रीगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होताच निर्गुण पादुका सुरू करण्याचा गाणगापूर मुक्कामी झालेला आदेश व तदनुसार चालू ठेविलेले अनुष्ठान यांचा उलगडा झाला. ह्या निर्गुण पादुका कारंजा येथे श्रीगुरूंच्या सन्निध स्थापन करण्याकरिता म्हणूनच त्या सुरू करण्याचा आदेश त्यांना झाला होता हे त्यांच्या ध्यानात आले. श्री दत्त सांप्रदायात निर्गुण पादुका हे त्या देवतेच्या दिव्य व साक्षात् अस्तित्त्वाचे प्रतीक असते, असा अनुभव आहे. श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी त्या निर्गुण पादुका काशीहून अत्यंत शूचिर्भूतपणे स्वतंत्र मोटारीतून स्वत: कारंजास आणल्या व शके १८५८मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांची स्थापना केली. या निर्गुण पादुकांची स्थापना श्री गुरुमूर्तीच्या स्थापनेनंतर एक वर्षाने झाली.

श्रींची प्रतिष्ठापना झाल्या दिवसापासून श्रींची नित्य पूजाअर्चा, नैवेद्य वगैरेसंबंधीची व्यवस्था भक्तमंडळींनी स्वखुषीने दिलेल्या द्रव्यसाहाय्यावर चालू होती. परंतु ही प्रथा तशीच चालू ठेविल्यास कालांतराने त्यात शिथिलता व नियोजनरहितता हे दोष येण्याचा संभव असल्यामुळे श्री ब्रह्मानंदसरस्वती स्वामींनी भविष्याचा विचार करून श्रींच्या नित्यपूजेच्या खर्चाच्या व्यवस्थेकरिता शाश्वत निधीची एक अभिनव योजना आखली. भक्ताने श्री गुरू-संस्थानला एकदा १५१ रुपये द्यावे व पूजेचा एक दिवस त्यास देण्यात यावा. सदर रक्कम सरकारी रोख्यांत गुंतविली जाईल व त्यापासून येणाऱ्या व्याजातून संस्थानचा एक दिवसाचा खर्च भागविण्यात येईल. असे ३६५ दाते मिळवून संस्थानच्या वार्षिक खर्चाची तरतूद करण्यात यावी. या योजनेनुसार दात्याने एकदा १५१ रुपये देऊन संस्थानच्या संमतीने वर्षातील एक दिवस घेतला म्हणजे त्या रकमेच्या मोबदल्यात, दाता सांगेल त्याच्या नावाने त्या दिवशी श्रींची पूजा होऊन त्यांचे श्रेय व पुण्य त्याला मिळेल व प्रसादही पाठविण्यात येईल. ही अभिनव योजना सर्वांना पसंत पडली व योजनेच्या प्रचारास्तव जाण्याची श्री ब्रह्मानंदसरस्वती स्वामींनी तयारी केली. काशीहून प्रचारास्तव निघण्यापूर्वी श्री ब्रह्मानंदस्वामी श्रीअन्नपूर्णादेवीच्या मंदिरात गेले व देवीची पूजा केली. माताजींच्या मंदिराचे महंत श्री. शिवनाथपुरी गोस्वामीमहाराज हे त्याच वेळी तेथे आले. त्यांना स्वामींनी आपले मनोदय व्यक्त करून सांगितले. ते ऐकताच त्यांनी रु. १५१ देऊन पौष शु.॥ द्वितीया हा महाराजांचा जन्मदिवस पूजेकरिता म्हणून घेतला. श्रीजगन्मातेची ही पहिली भिक्षा हा शुभशकूनच होय व जगदंबेचा आपण आरंभिलेल्या कार्याला पूर्ण आशीर्वादच आहे या कल्पनेने त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. अशा परमानंद स्थितीत ते प्रचाराकरिता काशीहून निघाले. उन्हाळ्याचे दिवस असताही स्वत:च्या शरीरप्रकृतीची तमा न बाळगता त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गगनबावडा, मलकापूर, वाई, सातारा, इंदूर, बेळगाव वगैरे ठिकाणी दौरा काढला व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना यश प्राप्त झाले. हा दौरा संपवून ते चातुर्मासाकरिता काशीस परत गेले. चातुर्माससमाप्तीनंतर ते दक्षिणेस मद्रास इलाख्यात प्रचाराकरिता गेले. श्री दत्तात्रेयाची उपासना या विभागात स्वामीजींनी सुरू केली असल्यामुळे बऱ्याच भक्तमंडळीनी श्रींच्या पूजेचे दिवस घेतले. वरील योजना यशस्वी करण्याकरिता स्वामीजींनीच अविरत प्रयत्न केले. त्यांचे हयातीत सुमारे पावणेदोनशे भक्त या योजनेनुसार देणगी देणारे मिळाले होते. त्यांच्या पश्चातही ते कार्य चालूच आहे. आश्चर्याची आणि अभिमानाची गोष्ट ही की, वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांची प्रथम द्वितीय आणि तृतीय फेरी पूर्ण झाली आहे. आता १५१ रुपयांच्या पूजेचा एकही दिवस रिकामा नाही व पुढे चौथी फेरी सुरू करण्याचा विचार नाही. कारण दररोज इतके अभिषेक होणे शक्य नाही. श्रीअन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने आरंभिलेली ही योजना श्री ब्रह्मानंदसरस्वतींच्या अविरत व अनलस प्रयत्नाने यशस्वी झाली. ह्या सफलतेचे सर्व श्रेय प्रिय भक्त श्री ब्रह्मानंदसरस्वती यांचेवर असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या कृपादृष्टीलाच देणे उचित आहे.

येथील संस्थानच्या नियमाप्रमाणे व श्री ब्रह्मानंदसरस्वतींच्या आज्ञेवरून मंदिराच्या पुजाऱ्याशिवाय दुसऱ्या कोणासही मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास प्रतिबंध असल्यामुळे पूजेची व्यवस्था संस्थानच्या पुजाऱ्यामार्फत करण्यात येते. पूजेकरिता दिलेल्या पैशांची व भक्तांकडून येणाऱ्या दानाबद्दल (कपडा, सोने, चांदी वगैरे) रीतसर पावती व्यवस्थापकाकडून देण्यात येते. भक्तांनी केलेल्या पूजेचा प्रसाद त्यांना मिळतो. पूजेच्या दिवशी हजर नसलेल्या भक्तांना पोस्टाने परगावी त्यांच्या पत्त्यावर प्रसाद पाठविण्यात येतो. शाश्वत पूजेचा प्रसाद व अंगारा नित्यनियमाने त्या त्या भक्तांना पाठविण्यात येतो.

ज्या ब्राह्मण स्त्रीला शनिप्रदोषव्रताचे आचरण करण्यास सांगितले होते ती स्त्री पुत्रप्राप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर वऱ्हाडात करंज नगरातील (हल्ली लाडाचे कारंजे) वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मास आली. जातकावरून तिचे नाव अंबाभवानी ठेवण्यात आले. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्यवेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणाऱ्या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. पूर्वसंस्कारामुळे ती त्या वेळीही शनिप्रदोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी तुला एक पुत्ररत्न झाले. त्या पुत्राचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच आपले "श्री नृसिंहसरस्वती स्वामी" होय.

जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ‘ॐ’काराचा उच्चार बाहेर पडू लागला. या बालकाला बालसुलभ रुदन माहीत नव्हते, केवळ ॐकाराचा उच्चारच तो करीत असे. बालकाच्या ह्या अलौकिकत्वाची वार्ता सर्वत्र पसरली व त्या बालकास पाहण्याकरिता अलोट गर्दी होऊ लागली. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे मुलगा हळूहळू वृद्धिंगत होऊ लागला. तरी ॐकाराशिवाय तो मुखातून दुसरे एकसुद्धा अक्षर काढीत नाही हे पाहून मुलगा मुका आहे की काय अशी शंका येऊ लागली. स्वाभाविकच पुत्रप्राप्तीच्या आनंदाला ओहोटी लागून मातापित्यांचे अंत:करण चिंतेने ग्रासले गेले व त्यांची स्थिती अनुकंपनीय झाली. मातापित्यांच्या शंकाकुल व चिंताग्रस्त अंत:करणाची जाणीव झाल्यामुळेच की काय, हा बालक सुहास्य वदनाने माझ्या गळ्यात यज्ञोपवीत व कमरेला मौंजीमेखला धारण करावयास द्या, असे खुणेने दर्शवू लागला व त्याने सूचित केले की, ‘माझे मौंजीबंधन झाल्यानंतर मी बोलू लागेन मी मुका नाही, आपण चिंता करू नये.’ त्वरित आईवडिलांनी त्याची मौंज करण्याचे निश्चित केले. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच असल्याची जाणीव या बालकाला झाल्यामुळेच मौंजीबंधन-कार्याला लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याकरिता त्याने घरातील लोखंडी पळीला स्पर्श करून त्याचे सुवर्ण केले व अशा रीतीने आईवडिलांची आर्थिक काळजीतून मुक्तता  केली. कारंजा गावातील तत्कालीन शास्त्रीपंडितांच्या सांगण्यावरून तिथिनिश्चय करण्यात आला व यथायोग्य शास्त्रोक्त पद्धतीने मौंजविधी मोठ्या आनंदाने व उत्साहाने करण्यात आला. ब्रह्मवृंदांना यथाशक्ति द्रव्य वगैरे देण्यात आले. जन्मत:च ॐकाराचा उच्चार करणाऱ्या अलौकिक बटूला शास्त्राप्रमाणे गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला व तो त्याने उच्चार करून ग्रहण केला. शेवटी शास्त्रकर्मानुसार आई भिक्षा घालण्यास आली असता पहिल्या भिक्षेच्या वेळीच त्या बटूने वेदांचा उच्चार केला. अशा प्रकारे तीन वेळा भिक्षा देण्यात आली व प्रत्येक वेळी वेदांतील ऋचेचा उच्चार करीत त्याने ती भिक्षा ग्रहण केली. त्या क्षणापर्यंत ॐकाराव्यतिरिक्त अन्य कशाचाही उच्चार न करणारा मुलगा एकदम वेद म्हणू लागला हे पाहून विद्वान ब्रह्मवृंदा सहित सर्व लोक दिङमूढ झाले व सर्वांनी त्या दिव्य बटूला नमस्कार केला. जाणत्यांनी ओळखलं की, हे आगळे स्वरूप म्हणजे देवाचा साक्षात् अवतारच होय!

श्रीगुरूंच्या काही वर्षाच्या वास्तव्याने औदुंबर, नृसिहवाडी, गाणगापुरादी गावे पुण्यक्षेत्रे बनून तीर्थस्थाने झाली आहेत. परंतु श्रींचे जन्मस्थान हे काही कारणामुळे बऱ्याच कालपर्यंत अज्ञात राहिल्यामुळे ज्या ठिकाणी श्रींनी जन्म घेतला व आपल्या दैवी बालक्रीडा केल्या ते कारंजा गाव इतके दिवस अप्रसिद्ध राहिले. परंतु प्रभुकृपेने श्रींच्या जन्मस्थानाचा, म्हणजेच कारंजा गावाचा पूर्ण पत्ता लागल्यामुळे आज त्या ठिकाणी श्रींचे मंदिर बांधण्यात येऊन त्यात श्रींच्या मूर्तीची व निर्गुण पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. श्री नृसिंहसरस्वती संस्थान कारंजा या नावाने आज ते प्रसिद्ध आहे.

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा संस्थानचे दैनिक व वार्षिक कार्यक्रम 

सकाळी 

५:०० ते ५:३० काकड आरती 

८:०० ते ८:३० गंध लेपन (निर्गुण पादुकांस)

८:३० ते ११:०० पूजा नंतर नैवेद्य. आरती.

१२:३० पर्यंत   प्रसाद  भोजन  

सायंकाळी 

७:०० ते ९:०० पूजा 

७:३० ते ८:३० संगीत गायन 

नंतर महाआरती, शंखोदकसिंचन व शेजारती होऊन ९:३० चे सुमारास मंदिर बंद करण्यात येते.

येथे यात्रेकरुंकरिता धर्मशाळा आहे. शिवाय गुरुचरित्र सप्ताह करण्याच्या इच्छेने येणारास मंदिरात १ वेळ भोजन मिळते.

येथे दार गुरुवारी पालखी काढतात. तसेच श्री दत्तात्रेयाचे १६ अवतार (जयंती) अश्या एकूण १६ जयंत्याच्या प्रत्येक तिथीला पालखी काढतात.त्या शिवाय खालील तिथींना पालखी काढण्यात येते,

  • श्री प. पु. वासुदेवानंदसरस्वती जयंती - श्रावण वाद्य पंचमी ५
  • श्री प. पु. वासुदेवानंदसरस्वती पुण्यतिथी - आषाढ शुद्ध प्रतिपदा १
  • श्री प. पु. ब्रह्मानंदसरस्वती जयंती - भाद्रपद शुद्ध पौर्णिमा १५
  • श्री प. पु. ब्रह्मानंदसरस्वती पुण्यतिथी - मार्गशीर्ष शुद्ध दशमी १०
  • श्री प. पु. अक्कलकोटस्वामीमहाराज पुण्यतिथी - चैत्र वाद्य त्रयोदशी १३
  • श्री नृसिहासरस्वतीस्वामीमहाराज - निर्याणदिन - माघ वाद्य १ प्रतिपदा 

ह्या तिथीला पालखी सर्व गावातून ठराविक मार्गाने मिरवतात. ठिकठिकाणी भक्त व ग्रामस्थ घरोघरी पालखी मार्गात औक्षण व पूजा  करतात.

श्रीक्षेत्र कारंजा येथील पवित्र स्थळे

१) श्रीसिद्धेश्वर- हाटोटीपुऱ्यात  

२) श्रीचंद्रेश्वर- चंद्र तलावाचे काठावर 

३) श्रीनीलकंठेश्वर- श्री किडे यांच्या वाड्यात, बिना छताचे उघडे मंदिर 

४) श्रीनागेश्वर- वाणींपुऱ्यात बारालिंगाच्या देवळाजवळ 

५) प्राणलिंगेश्वर- गुप्त 

६) एकविरादेवी- माळीपुऱ्यात 

७) यक्षणीदेवी-  हाटोटीपुऱ्यात पेंटे यांचे दुकानाजवळ

८) कामाक्षीदेवी- नगरपालिकेच्या कार्यालयाजवळ 

९) चंद्रावती तथा गौरीदेवी- चंद्रालय तथा लेंडी तलाव यांच्या काठी चंद्रेश्वरा जवळ 

१०) श्री गुरुमंदिराजवळच श्री रोकडारामाचा रामदासी मठ 

११) श्री रामदासीमठ रामराममंदिराजवळ 

१२) श्री गुरुमंदिराजवळ श्री केशवराज मंदिर 

येथे जैन लोकांची पुरातन मंदिरे आहेत. शिवाय राममंदिर, श्री दत्तमंदिर, श्री बाबूजीमहाराजांचा मठ, श्री शिवायन महाराजांचा मठ, श्री सदाराम महाराजांचा मठ, यांची समाधी कौडिण्यपूर येथे आहे. खोलेश्वर, संतोषीमाता आदी मंदिरे आहेत.

निर्गुण पादुका गुरु मंदिर कारंजा
निर्गुण पादुका, श्री गुरु मंदिर कारंजा 

श्रीक्षेत्र कारंजा विशेष

श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे. याचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. विदर्भामध्ये वाशीम जिल्ह्य़ामध्ये लाडाचे कारंजा या नावाचे हे स्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून २५ कि.मी. वर आहे. या ठिकाणी १९३४ साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्रीगुरुमंदिर बांधले. श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तेथे श्रीदत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. वऱ्हाडात कारंजा नगरातील (हल्ली लाडाचे कारंजे) अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्याच्या पोटी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच ‘श्रीनृसिंह सरस्वतीस्वामी’ होत. जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ‘ॐ’काराचा उच्चार बाहेर पडू लागला अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे श्रीदत्तात्रेयांच्या द्वितीय अवताराने जन्म घेतला, असे मानले जाते.

कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. आदिमन्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मीळता होती. ऋषिमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंज क्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले. वसिष्ठ-शक्ति-संवादातून यमुना-महात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना बिंदूमती कुंडात आहेत. (बेंबळपार नावाने सध्या हे कुंड प्रसिद्ध आहे.) गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती (बेंबळानदी) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना-महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्यांने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी श्रद्धा आहे. करंजमुनींच्या कृपा प्रसादाने शेषराज आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून करंज क्षेत्राला ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव पडले आहे, असे सांगितले जाते.

कारंजा येथील गुरूमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर आठ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात, तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघडय़ा डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करे तोपर्यंत त्या उघडय़ा ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. 

या क्षेत्री असे जावे

कारंजा (दत्त) (वाशिम) महाराष्ट्र (GURUMANDIR KARANJA)-

हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे. आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झालातो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यातश्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता. त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते. हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्रीनृसिंहसरस्वती स्वामींची मूर्ती आहे. इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वतीस्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली. 

वाशीम, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० कि. मी. अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे. मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर उतरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते. इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे. 

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कारंजा येथील श्री ची पालखी

कारंजा येथिल श्री गुरूमंदीरात दर गुरूवारी श्री ची पालखी काढतात ,या व्यतिरिक्त श्री दत्तात्रयाच्या सोळा अवतार जयंति एकूण सोळा जयंत्या वर्षातुन असतात त्यावेळी प्रत्येक तिथींना पालखी काढतात .त्याशिवाय खालिल तिथींना पालखी काढण्यात येते .

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती भाद्रपद शुध्द चतुर्थी ४ 
श्रीपाद श्रीवल्लभ पुण्यतिथी .आश्विन वद्य द्वादशी १२ 
श्री प.पु.वासुदेवानंद सरस्वती  जयंती श्रावण वद्य पंचमी ५
श्री प.पु.वासुदेवानंद सरस्वती पुण्यतिथी आषाढ शु.प्रतिपदा १
श्री ब्रम्हानंद सरस्वती जयंती भाद्रपद शु.पोर्णिमा १५ 
पुण्यतिथी मार्गशिष शु.दशमी १० 
श्री प.पु.अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी चैत्र वद्य त्रयोदशी १३
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती पौष शुध्द द्वितीया २

शैल्य गमन यात्रा माघ वद्य प्रतिपदा यातिथीला पालखी निघते.
शैलगमन यात्रेच्या दिवशी पालखी सर्व गावातून मिरवण्यात येते. यावेळी सर्वभक्तगण ठिकठिकाणी लोकांकडून पूजा करण्यात येते. संध्याकाळी सात वाजता पालखी मंदीरातून निघते ती दूसरेदिवशी सकाळी पाच वाजता मंदीरात येते त्यानंतर आरती व प्रसाद वितरण होते अशा रितीने हा पालखी सोहळा पार पडतो. अवर्णनीय असाच हा असतो. अशा रितीने गुरूवार सोडून एकुण २५ तिथींना पालखी सोहळा असतो.

दत्ताची पालखी आली  

पायघडी घाली। दत्ताची पालखी आली ।।धृ।।
ब्रम्हानंद स्वामीने मंत्रची दिघले । श्रोते भजनासी लाविले ।
पंचभुताचे सार काढिले । कायावस्त्र धून काढीले ।
जडिताची केली । दत्ताची पालखी आली ।।१।।

नवरंगाचे पातळ लेवूनि । स्वकरे पायघडी घालोनि ।
त्रयमुर्ती चाले ज्याने वरोनि ।
मौज पाहिली । दत्ताची पालखी आली ।।२।।

मनकायेचा पितांबर । पायघडी दिसे बहु सुंदर ।
वर दत्त चालति दिगंबर ।
अनसुया माऊली । दत्ताची पालखी आली ।।३।।

पाहते नृसिंह सरस्वती । पुढे उभी दत्ताची मुर्ती ।
मनुका वरते चरणावरति ।
लोटांगण घाली । दत्ताची पालखी आली ।।४।।

पायघडी घाली दत्ताची पालखी आली ।।धृ।।

प. पु. श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराज
प. पु. श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराज

प. पु. श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराज  व श्रीक्षेत्र कारंजा

करंज ऋषींच्या पवित्र कार्याने पुनित झालेली ही कारंज नगरी भगवान दत्तात्रेयाचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असून हे स्थान परमपूज्य थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती येथे येईपर्यंत कारंजावासीयांना अज्ञातच होते. स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रेयाचा व्दितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान आहे असे तत्कालीन प. पू. ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले. प. पू. ब्रम्हानंद स्वामी पूर्वाश्रमीचे लीलावत होते. त्यांना श्री नृसिंह स्वामी महाराजांची मूर्ती तयार करुन मंदिर बांधण्याची उत्कट इच्छा होती, हे कार्य त्यांना गाणगापुरातच करायचे होते. परंतु असे सांगतात की, प्रत्यक्ष महाराजांनी प. पू. ब्रम्हानंद स्वामींना दृष्टांत देऊन गाणगापूरची जी व्यवस्था आहे ती तशीच राहू द्या, त्यामध्ये काहीही पालट करु नये, आपणास काही कार्य करायचे असेल तर आमचे जन्मस्थान व-हाडात कारंजा येथे आहे. त्या ठिकाणी आपणास जे करायचे असेल ते करा. त्यानंतर प. पू. ब्रम्हानंद सरस्वती महाराज आणि प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची भेट झाली. 

श्रीं चे जन्मस्थान कारंजालाच आहे ही गोष्ट प. पू. ब्रम्हानंद श्री वासुदेवानंद स्वामींनी प. पू. ब्रम्हानंद स्वामींना स्पष्ट केली, त्याप्रमाणे प. पू. ब्रम्हानंद स्वामी कारंजास आहे.

प. पू. ब्रम्हानंदांनी ‘श्रीं’ ची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली. ती मूर्ती एप्रिल मध्ये कारंजास आणण्यात आली. मंदिर तयार झालेलेच होते. त्यामुळे चैत्र वद्य व्दितीयेला २१ एप्रिल १९३४ रोजी मुर्तीची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्व आहे. त्या पादुका काशी क्षेत्रातून प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी कारंजास आणल्या व विधीवत त्यांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात केली. या पादुका सकाळी गंधलेपनाकरीता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यावर देव्हा-यात ठेवल्या जातात. या पादुकांना अत्तर, केशर यांचे गंधलेपन नियमीतपणे होत असते. तसेच या संस्थेचा कार्यक्रम कशा प्रकारचा असावा हे प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी ठरवून दिले आहे. सकाळी साडेपाचला काकड आरती, त्यानंतर महाराजांना लघुरुद्र व पंचोपचार पूजा, त्यानंतर सत्यदत्त पूजा. सायं. पुजा. पंचपदी, रात्री साडे आठला आरती अन् त्यानंतर अष्टके व शंखोवक होऊन इतर काही कार्यक्रम नसल्यास शेजारती होते आणि नंतर कपाट बंद होते. कुठल्याही परिस्थीतीत कपाटे दुस-या दिवशीच्या काकड आरती पर्यंत उघडले जात नाही. या ठिकाणच्या पुजा-याला त्रिकाल स्नान करुन गाभा-यात जावे लागते. तेही त्यांनी घरुन स्नान करुन आलेले चालत नाही. आचारी व पुजारी यांच्याकरिता स्वतंत्र स्नानगृह आहे. तेथेच स्नान करुन नंतर ते आपआपल्या कामी लागतात. पुजा-याशिवाय कोणालाही ‘श्रीं’ च्या गर्भगृहात प्रवेश नाही. हे ठिकाण अतिशय जागृत आहे. याचा प्रत्यय विविध भक्तांस वारंवार येत असतो.

संपर्क:

श्री  नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा, जिल्हा वाशीम - ४४४१०५.

गुरुमंदिर कारंजा फोन-(०७२५६) २२४७५५, मोबाईल 7499932731

www shri gurumauli. com 
ई-मेल: karanjagurumandir@gmail. com

Fund transfer:
स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्रँच लाड कारंजा,
अकाउंट नो.: 11402626178
ISFC: SBIN0000404