श्री दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा

datta jayanti
दत्तजयंती

दत्तजयंती माहिती अणि दत्त जन्म कथा

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीचे महत्त्व

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

जन्मोत्सव साजरा करणे

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. 

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले ....
मन हे न्हाले भक्ती डोही । अनुसया उदरी धन्य अवतार ।।
केलासे उद्धार विश्वाचा या । माहुरगडावरी सदा कदा वास ।।
दर्शन भक्तास देई सदा । चैतन्य झोळी विराजे काखेत ।।
गाईच्या सेवेत मन रमे । चोविस गुरूचा लावियला शोध ।।
घेतलासे बोध विविधगुणी ।

श्रीदत्तजन्माख्यान
श्रीदत्तजन्माख्यान

श्री दत्तात्रय दैवत आगळे, दत्तजन्म कथा

दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.

श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे.

महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ  हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते. 

अध्याय चौथा

datta jayanti
त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय)

त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय) अवतार कथा संदर्भ, श्री गुरुचरित्र  अध्याय ४ था.

त्रैमुर्ति श्रीदत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम, मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो."

सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते.त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रम्हा.त्यालाच ब्रम्हांड म्हणतात. मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले. ब्रम्हाने तेथे चौदा भुवने निर्माण केली. दहा दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसूया. हे श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्यरूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल कि काय अशी सर्व देवांना भिती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री-अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, "महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे.ती काया-वाचा-मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंदमंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड, शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंदमंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते.ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाचाकरी करत राहावे लागेल." देवांचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रम्हा-विष्णू-महेश भयंकर रागावले आणि म्हणाले,"चला, आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू. नाहीतर यमलोकाला पाठवू." असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रम्हा-विष्णू-महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला. मग ते तिघेजण अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूया आश्रमात एकटीच होती. ते अनुसुयेला हाक मारून म्हणाले, "माई, आम्ही ब्राम्हण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते. अतिथी-अभ्यांगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो."

तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसुयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले. बसावयास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षतपुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली,"आपण स्नान करून या. तोपर्यंत पाने वाढते." तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे." "ठीक आहे." असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छाभोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे . तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ. नाहीतर आम्ही परत जातो.

त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती.तिनी ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील? आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होइल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारुण नेइल." असा विचार करून अनुसूया त्या भिक्षुंना 'तथास्तु' असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले. पतीची मनात पूजा केली.मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा बिक्शुन्काच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य ! त्याचक्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली.मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकूळ होउन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसुयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसूयेने त्यानं सगळी हकीकत सांगितली. हि तीन बाळे म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिमुर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रम्हा-विष्णू-महेश अत्रॆन्पुधे प्रकट झाले 'वर माग' असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसुयेला म्हणाले, "त्रिमुर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे." तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली, "नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या." अत्री म्हणाले, "हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, तर पुत्ररूपाने येथेच राहा." तेव्हा 'तथास्तु' म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले.

मग ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील.तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरम्परेचे मुळं पीठ आहे. अशाप्रकारे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला दत्त्जान्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला, "श्रीगुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा" सिद्ध्योग्यांनी तथास्तु म्हटले.

दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते.

दत्तजयंती आणि श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांचाही जयंती महोत्सव

समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली ।
जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।
जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा ।
मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।।

 
स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे इ. स. १९०८ साली आजच्या दिवशी झाला, स्वामींनी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता, "आम्ही मूळ गाणगापूर येथीचे असे". स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रेय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रेय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म. म्हणून दत्त जयंती च्या दिवशी, गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्री स्वामींचा जन्म झाला.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले, तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासून च होती तीच ओढ स्वामींना सज्जनगडला घेऊन आली. अध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इ. स. १९२७ साली स्वामींचे गडावर आगमन झाले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली. साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे. योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली. ज्या प्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले त्याच प्रमाणे अवघ्या 3 वर्षाच्या सेवेत स्वामींना समर्थांनी १९३० च्या दासनवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञे प्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला. शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला.

मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड, त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला.आणि वरील सर्व तीर्थ क्षेत्राचा विकास केला. अनेक ग्रंथ, स्तोत्र रचना स्वामींनी केली. आणि १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.

समर्थांना सुद्धा दत्तात्रेय यांनी दिलेला सोटा समर्थांच्या शेजघरात आहे आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधी च्या मागे सिंहासनावर विराजमान  आहेत. जेव्हा-केव्हा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तू मध्ये दर्शन घेऊन अध्यात्मिक अनुभूती चा अनुभव नक्की घ्या.

दत्तजयंती निमित्त भगवान दत्तात्रय आणि श्रीमंत परमहंस परमव्रजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत !

स्वामींना एकच मागणे मागू,

व्हावी पूर्ण कृपा गुरू मजवरी प्रारथीत भावे तुला ।
वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया संमोह जो वाढला ।
अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी शांती पदी बैसवी ।
विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी ।।

श्री दत्तजन्माख्यान

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीदत्तत्रेयाय नमः ॥ जयजयावो गजवदना ॥ मंगलारंभीम तुझीच प्रार्थना ॥
वंदितां हो तुझिया चरणा ॥ ग्रंथ पावो सिद्धीसी ॥१॥
जयजयावो सरस्वती ॥ आदिमाया तूंचि शक्ति ॥
बैसनि माझे जिव्हेवरुती ॥ ग्रंथ सिद्धी नेइंजे ॥२॥
जयजयावो गुरुनाथा ॥ कृपाकर ठेवूनि माझिया माथां ॥
सिद्धीस न्यावें या ग्रंथा ॥ हाचि वर मज द्यावा ॥३॥
तुमचें होतां कृपाबळ ॥ ग्रंथ सिद्धीसि जाय सकळ ॥
हें वेदवाक्य जाश्वनीळ ॥ पुराणांतरीं बोलतसे ॥४॥
ॐ नमोजी श्रीदत्त ॥ गुणातीता अपरिमिता ॥
मूळमायाविरहिता ॥ जगतारका जगद्गुरु ॥५॥
पूर्णब्रह्म सनातना ॥ निष्कलंका निरंजना ॥
हे शून्यातीतनिर्गुणा ॥ गुणनिर्गुणातीत तूं ॥६॥
जयजयावो अत्रिनंदना ॥ जयजयावो परात्परगहना ॥
जयजयावो मधुसूदना ॥ कृपागहना जगद्गुरू ॥७॥
जयजयावो दिगंबरा ॥ जयजयावो करुणाकरा ॥
जयजयावो दयासागरा ॥ करुणार्णवा दीनबंधु ॥८॥
जयजयावो भक्तपालका ॥ जयजयावो जगव्यापका ॥
जयजयावो जगन्नायका ॥ कृपा करीं दीनावरी ॥९॥
जयजयावो अवधूता ॥ जयजयावो विश्वकर्ता ॥
जयजयावो कृपावंता ॥ अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ति ॥१०॥
ऐसा महाराज गुरुदत्त ॥ त्यांचे माहात्म्य ऐसें वर्णीत ॥
चित्त देवोनि सावचित्त ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥११॥
पूर्वीं नारदें तप अपार केलें ॥ तयासी श्रीविष्णु प्रसन्न जाहले ॥
वर द्यावयासी आले ॥ मग तेणें केला प्रणिपात ॥१२॥
करोनि साष्टांग नमस्कार ॥ उभा राहिला जोडोनि कर ॥
जयजय विष्णु करुणाकर ॥ अपेक्षित वर देइंजे ॥१३॥
अवघे रजोगुण तमोगुण ॥ हे द्वयविरहित करून ॥
मुख्य सत्त्वरूप जाण ॥ तें दाखवीं मजलागीं ॥१४॥
ऐसें बोलतां नारदमुनी ॥ सांगता जाहला कैवल्यदानी ॥
ऐक सखया चित्त देऊनी ॥ सत्त्वरूपाचा विचार ॥१५॥
त्रिभुवनींचें सत्त्वरूप जें ॥ तें मीच आहें बा जाणिजे ॥
परी तम मजसी पाहिजे ॥ म्हणोनि सत्त्व कमी हो ॥१६॥
ऐसें बोलतां मोक्षदानी ॥ नारदमुनि जोडोनि पाणी ॥
विचारिता जाहला तये क्षणीं ॥ तम कासया सांग पां ॥१७॥
मग श्रीविष्णु बोलत ॥ जरी मी सत्त्वरूपीं राहात ॥
तरी माझेनि हस्तें दैत्य ॥ मरणार नाहीं सहसाही ॥१८॥
हें जाणोनियां मानसीं ॥ किंचित् सत्त्व विधिहरांसी ॥
देऊनियां तमोगुणासी ॥ रजोगुणासी जवळ केलें ॥१९॥
ऐसा विचार आहे नारदा ॥ जरी तुज पाहिजे सत्त्वगुणसंपदा ॥
तरी एक आहे ब्रह्मवृंदा ॥ सांगतों सकळ परियेसीं ॥२०॥
जरी ब्रह्माविष्णुत्रिनेत्र ॥ तिघे होतील एकत्र ॥
तरीच सत्त्वरूप स्वतंत्र ॥ दृष्टीं पडेल जाण पां ॥२१॥
ऐसें ऐकूनि उत्तर ॥ बोलतां जाहला मुनिवर ॥
त्रिपुरांतक विधि चक्रधर ॥ करितों एकत्र जाण पां ॥२२॥
ऐसें बोलोनि ते वेळीं ॥ नारद आले भूमंडळीं ॥
तटस्थ जाहली सुरमंडळी ॥ हा संवाद ऐकोनियां ॥२३॥
भुमंडळीं नारदमुनी ॥ विचार करी अंतःकरणीं ॥
ब्रह्मा विष्णु शूळपाणी ॥ एकत्र कैसे होती ते ॥२४॥
ऐसा विचार करीत ॥ त्रिभूवनीं नित्य हिंडत ॥
तंव एके दिवशीं अवचित ॥ अत्रिसदना पातला ॥२५॥
ऋषि नव्हता आश्रमांत ॥ उभा राहिला ब्रह्मसुत ॥
अनुसूयेनें देखोनि त्वरित ॥ आसन दिधले बैसावया ॥२६॥
आसनीं बैसवूनि नारदमुनी ॥ आपण कांडणा बैसे अंगणीं ॥
इतुकियांत अत्रिमुनी ॥ अकस्मात पातला ॥२७॥
स्त्रियेप्रती बोले उत्तर ॥ उदक देई वो सत्वर ॥
ऐसें ऐकतांचि ते सुंदर ॥ उठती झाली ते काळीं ॥२८॥
मुसळ गेलें हातें वरुतें ॥ तें तसेंच सोडिलें तेथें ॥
आणोनि दिधली पतीतें ॥ उदकझारी तेधवां ॥२९॥
ऐसें देखोनि ब्रह्मसुत ॥ मनांत तेव्हां आश्चर्य करीत ॥
धन्य धन्य माउली सत्य ॥ अनुसूया सती हो ॥३०॥
मनीं विचारीं नारदमुनी ॥ अनुसूया पतिव्रतेमाजीं शिरोमणी ॥
हिचे दर्शनेंकरूनी ॥ दोष जातील निर्धारें ॥३१॥
मग तेथोनि नारद निघाला ॥ मनांत विचार एक योजिला ॥
आतां जाऊनि वैकुंठाला ॥ लक्ष्मीपाशीं सागावें ॥३२॥
तेणें होईल कार्यसिद्धी ॥ हें जाणोनियां आत्मशुद्धी ॥
तेथूनि निघाला त्रिशुद्वी ॥ पवनवेगें करुनियां ॥३३॥
वैकुंठासी जाऊनि सत्वर ॥ लक्ष्मीपाशी समाचार ॥
सांगता झाला मुनीश्वर ॥ अनुसूयेचा तेधवां ॥३४॥
नारद सांगे लक्ष्मीलागोनी ॥ अनुसुया सती अत्रिपत्नी ॥
त्रिभुवनांत पाहतां शोधोनी ॥ तिची सरी न येचि पां ॥३५॥
पतिव्रतांमाजीं शिरोमणी ॥ स्वरूपें जैसी लावण्यखाणी ॥
तिचें चातुर्य पाहतां नयनीं ॥ परमानंद वाटतसे ॥३६॥
हा सकळ वृत्तांत ऐकतां ॥ लक्ष्मी जाहली विस्मितचित्ता ॥
म्हणे मृत्युलोकीं पतिव्रता ॥ ऐसी सत्त्वरक्षक आहे कीं ॥३७॥
तरी आतां श्रीविष्णूसी पाठवूनी ॥ तिचें सत्त्व घेईन हिरोनी ॥
ऐसे ऐकतां नारदमुनी ॥ परम संतोष पावला ॥३८॥
मग तेथूनि नारद निघाला ॥ मनोवेगें कैलासासी गेला ॥
पार्वतीसी वृत्तांत सांगितला ॥ लक्ष्मीसारिखा तेधवां ॥३९॥
वृत्तांत ऐकूनि पार्वती ॥ विस्मित जाहली परम चित्तीं ॥
म्हणे नारद सांगती कीर्ती ॥ काय आश्चर्य मानवाचें ॥४०॥
नारद म्हणे वो मृडानी ॥ अनुसूयेचे तुलनेलागुनी ॥
तुंही न पुरसी गजास्यजननी ॥ ऐसें मज वाटतसे ॥४१॥
उमा ऐकूनि ते अवसरीं ॥ परम क्रोधावली अंतरी ॥
आदिमाया निर्धारीं ॥ काय बोले ब्रह्मसुतासी ॥४२॥
आतां धाडून कैलासपती ॥ सत्त्वहरण करीन निश्चितीं ॥
ऐसें बोलतां पार्वती ॥ नारदासी आनंद ॥४३॥
मग नारद निघाला तेथुनी ॥ गेला सत्यलोकलागुनी ॥
सर्व वृत्तांत पूर्ववत सांगोनी ॥ सावित्री तेव्हां क्षोभविली ॥४४॥
सावित्री क्षोभली हें देखतां ॥ आनंद वाटे ब्रह्मसुता ॥
म्हणे आपुलें कार्य आतां ॥ सत्वरचि होईल ॥४५॥
ऐसें विचारुनि चित्तीं ॥ नारद निघाला पवनगती ॥
तंव ते समयीं त्रैमूर्ती ॥ आपुलाले स्थाना पातले ॥४६॥
तंव स्त्रिया वृत्तांत सांगती ॥ मृत्युलोकीं मानव वस्ती ॥
त्यांत एक अनुसूया सती ॥ आहे पहा ऋषिपत्नी ॥४७॥
पतिव्रतांमाजी शिरोमणी । स्वरूपें असे लावण्यखाणी ॥
नारदमुनि सांगोनी ॥ गेला आतां निर्धारें ॥४८॥
तरी जाऊनि अत्रिआश्रमासी ॥ तिचें सत्त्व हरावें निश्चयेंसी ॥
ऐसें ऐकोनि हृषीकेशी ॥ ब्रह्मा त्रिनयन अवश्य म्हणे ॥४९॥
विधि रुद्र शार्ङ्ग गणी ॥ त्रैमूर्ति एकत्र मिळोनी ॥
अत्रिमुनीच्या सदनीं ॥ येऊनि उभे राहिले ॥५०॥
द्विजरूप धरूनि जाण ॥ उभे राहिल अंगणीं येऊन ॥
हें अनुसूयेनें देखोन ॥ आसन दिधलें बैसावया ॥५१॥
आसनीं बैसतां सत्वर ॥ म्हणती क्षुधा लागली फार ॥
नग्न होऊनि निर्धार ॥ इच्छाभोजन देईजे ॥५२॥
ऐसें ऐकोनि ते सती ॥ विस्मय करी बहुत चित्तीं ॥
काय बोले तयांप्रती ॥ ऐका सादर श्रोते हो ॥५३॥
अवश्य म्हणोनी ते अवसरीं ॥ गृहांत गेली हो सुंदरी ॥
पतीलागीं निवेदन करी ॥ नमस्कारूनि तेधवां ॥५४॥
ऋषि अंतरीं विलोकोनी ॥ पाहे जंव आत्मज्ञानी ॥
तंव चतुर्मुख रुद्र पन्नगशयनीं ॥ छळणालागीं पातले ॥५५॥
हें जाणोनिया मानसीं ॥ तीर्थगंडी देई कांतेसी ॥
गंगा प्रोक्षूनि तिघांसी ॥ भोजन देई जाण पां ॥५६॥
तीर्थगंडी घेऊनि सत्वरी ॥ बाहेर आली ते सुंदरी ॥
गंगोदक प्रोक्षण करी ॥ त्रैमूर्तीवरी तेधवां ॥५७॥
गंगोदकाचा स्पर्श होतां ॥ बाळें जाहलीं हो तत्वतां ॥
हें देखोनि पतिव्रता ॥ काय करी ते वेळ ॥५८॥
कंचुकीसहित परिधान ॥ फेडूनि ठेवी न लगतां क्षण ॥
नग्न होवोनियां जाण ॥ बाळांजवळी बैसतसे ॥५९॥
बाळें घेऊनि मांडीवरी ॥ स्तनीं लावी तेव्हां सुंदरी ॥
पान्हा फुटला ते अवसरीं ॥ देखोनि सती आनंदे ॥६०॥
तिन्ही बाळें शांत करुन ॥ पाळण्यांत निजवी नेऊन ॥
जन्मकथा सांगोन ॥ हालवीतसे निजछंदें ॥६१॥
ऐसे कित्येक संवत्सर लोटले ॥ तंव नारद अकस्मात पातले ॥
अत्रिमुनीनें आसन दिधलें ॥ बैसावया नारदासी ॥६२॥
तंव नारद विलोकोनि पहात ॥ ब्रह्मा चतुर्भुज कैलासनाथ ॥
हे तिन्ही बाळ खेळत ॥ मठामाजी कौतुकें ॥६३॥
ऐसें दखोनि ब्रह्मसुत ॥ मुनीं जाहला हर्षभरित ॥
आतां जाऊनि वैकुंठांत ॥ लक्ष्मी पाशीं सांगावें ॥६४॥
ऐसें विचारोनि चित्तीं ॥ नारद निघाला पवनगती ॥
जाऊनियां वैकुंठाप्रती ॥ लक्ष्मीसी पुसतसे ॥६५॥
म्हणं वो आदिमाये वाहिले ॥ श्रीविष्णु कोठें गेले ॥
ऐसे ऐकून लक्ष्मी बोले ॥ सुतसुतासी तेधवां ॥६६॥
ऐक सखया विरिंचिसुता ॥ मी नेणें विष्णूची वार्ता ॥
ऐसें सिंधुजा सांगतां ॥ सृष्टिकरसुत बोलतसे ॥६७॥
कर्ममुपीसी अतिपावन ॥ अत्रिवाश्राम आह जाण ॥
तो ठायीं जनार्दन ॥ विधिहरांसह वसतसे ॥६८॥
ऐसें सांगोन कमळजेप्रती ॥ नारद गेला कैलासपथीं ॥
गिरिजेस सांगोन निश्चितीं ॥ सत्यलोकासी ॥ जातसे ॥६९॥
नारद आला हें पाहोन ॥ सावित्री पुसे वर्तमान ॥
म्हणे नारदा ऐक वचन ॥ चित्त दऊनि निर्धारें ॥७०॥
नारद म्हणे सावित्रीसी ॥ काय हो मजलागीं पुससी ॥
येरी म्हणे चतुर्वक्त्र पंचवक्त्र हृषीकेशी ॥ कोठें गेले सांग पां ॥७१॥
विधिसुत म्हणे ते अवसरीं ॥ सावित्री सांगतों तें अवधारीं ॥
चतुर्भुज चतुर्वक्त्र द्विपंचकरी ॥ मृत्युलोकीं वसताती ॥७२॥
ऐसें बोलतां ब्रह्मपुत्र ॥ तिघी मिळाल्या एकत्र ॥
जोडोनियां पाणिपात्र ॥ नारदासी विचारिती ॥७३॥
पुर्वीपासोनि वृत्तांत ॥ नारद कैसा सांग त्वरित ।
येरू म्हणे ऐका त्वरित ॥ चित्त देऊनि पूर्वींचा ॥७४॥
अत्रिमुनीचे आश्रमासी ॥ तुम्हीं पाठविलें छळणासी ॥
ऐसें सांगती नारदासी ॥ काय बोलिल्या तेधवां ॥७५॥
अत्रिआश्रम कर्मभूमीसी ॥ कोठें आहे सांग आम्हांसी ॥
आम्ही जाऊं तया ठायासी ॥ घेऊनि येऊ भ्रतार ॥७६॥
ऐसें ऐकतां ब्रह्मसुत ॥ तिघींपती काय बोलता ॥
माझिया मागें यावें त्वरित ॥ दाखवीन तुम्हांसी ॥७७॥
दुरूनि दाखवीन आश्रमासी ॥ मी न यें हो तया ठायासी ॥
ऐसें बोलोन तिघींसी । विधिसुन घेऊनि निघाला ॥७८॥
पुढें जातसे नारदमुनी । मागें येताती तिघीजणी ॥
आश्रमासमीप येऊनि ॥ उभा राहिला ब्रह्मसुत ॥७९॥
उमा सावित्रींसह लक्ष्मीसी ॥ पहा म्हणे आश्रमासे ॥
येरी म्हणती नारदासी ॥ चाल आतां मठांत ॥८०॥
नारद म्हणे मी न यें आश्रमांत ॥ तुम्हींच जावें यथार्थ ॥
ऐसें ऐकोनियां त्वरित ॥ आश्रमांत प्रवेशल्या ॥८१॥
तंव ते पतिव्रता महासती । जिची त्रिभुवनांत जाहली कीर्ती ॥
ती मांडीवरी घेऊनि त्रैमूर्ती ॥ खेळवीतसे आनंदें ॥८२॥
हें देख नि उमा रमा सावित्री ॥ नमस्कार घालिती धरित्री ॥
धन्य धन्य ऋषी अत्री ॥ धन्य अनुसूया सती हो ॥८३॥
मग उठोनिया सत्वर ॥ उभ्या राहिल्या जोडोनि कर ॥
अनुसूयेनें देखोनि साचार ॥ पुसती जाहली तयांतें ॥८४॥
कोण तुम्ही सांगा त्वरित ॥ काय अपेक्षित असेल चित्त ॥
तें सांगावें निश्चित ॥ देईन जाण तुम्हांतें ॥८५॥
हें ऐकोनियां निश्चितीं ॥ सावित्री लक्ष्मी पार्वती ॥
बोलत्या झाल्या अनुसूयेप्रती ॥ पति आम्हांतें देईजे ॥८६॥
येरी म्हणे तुमचे पती ॥ कोठें आहेत सांगा निश्चितीं ॥
ऐसें ऐकोनि पार्वती ॥ सावित्री लक्ष्मी काय बोले ॥८७॥
शिव ब्रह्मा वैकुंठपती ॥ माते हे जाणिजे आमुचे पती ॥
तुझे घरीं बाळें निश्चितीं ॥ होऊनि क्रीडाती स्वच्छंदें ॥८८॥
ऐसें अनुसूयेनें ऐकुनी ॥ गृहांत गेली उठोनी ॥
पतीलागीं नमस्कारूनी ॥ सर्व वृत्तांत सांगितला ॥८९॥
ऐकोनि तेव्हां ऋषि बोलत ॥ तीर्थगंडी नेई त्वरित ॥
गंगा प्रोक्षून पूर्ववत ॥ करूनि देई जाण पां ॥९०॥
ऐसें ऐकूनि ते अवसरी ॥ तीर्थगंडी घेतली सत्वरीं ॥
बाहेर येऊनि झडकरी ॥ काय बोलली तिघींतें ॥९१॥
तुमचे पति निश्चित ॥ खेळताती आंगणात ॥
ते घेऊनियां त्वरित ॥ जावे आपुले स्वस्थाना ॥९२॥
हें ऐकोनि मृडानी ॥ सावित्री लक्ष्मी तिघीजणी ॥
बोलत्या जाहल्या सतीलागोनी ॥ वोळख आम्हासी पुरेना ॥९३॥
तरी माते तूंचि जाण ॥ पूर्ववत देई वो करून ॥
ऐसें तीस नमस्कारून ॥ प्रार्थित्या झाल्या तेधवां ॥९४॥
निरभिमानी जाहल्या चित्तीं ॥ हें देखोनि अनुसूयासती ॥
काय बोले तिघींप्रती ॥ देतें निश्चितीं पति तुम्हां ॥९५॥
मग तिनें गंगोदक प्रोक्षून ॥ विधि नीलकंठ नीलवर्ण ॥
त्रैमूर्ति पूर्ववत करून ॥ दाखविल्या सर्वांतें ॥९६॥
तंव ऋषी जाहला बोलता ॥ आम्हांलागीं टाकूनि जातां ॥
देवाधिदेवा हो काया आतां ॥ त्रैमूर्तींसी बोलतसे ॥९७॥
अत्रि अनुसूया ऐसें बोलती ॥ हें ऐकोनि त्रैमूर्ती ॥
बोलते झाले ऋषीप्रती ॥ आम्हांसि येथूनि न जाववे ॥९८॥
तंव अकस्मात नारद पातला ॥ श्रीविष्णूसी नमस्कार केला ॥
म्हणे आतां त्रैमूर्तीं एक जाहलां ॥ दाखवा कोठें सत्त्वरूप ॥९९॥
माझें पूर्वपुण्य फळा आलें ॥ त्रिगुणात्मक ऐक्य जाहलें ॥
हें ऐकोनि देव बोलिले ॥ नारदासी तेधवां ॥१००॥
तुम्हीं पूर्वीं प्रयत्न केला अमूप ॥ युगयुगादि तप ॥
तरी पाहें बां आजि सत्त्वस्वरूप ॥ डोळेभरी नारदा ॥१०१॥
तो दिवस परमपावन ॥ ऐका त्याचें नामाभिधान ॥
सांगतसें सविस्तर पूर्ण ॥ चित्त देवोनि ऐकावें ॥१०२॥
मासांमाजीं मार्गेश्वर ॥ उत्तम महिना प्रियकर ॥
तिर्थीमाजीं तिथी थोर ॥ चतुर्दशी शुद्ध पैं ॥१०३॥
वार बुधवार कृतिका नक्षत्र ॥ ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ॥
तिघे मिळोनि एकत्र ॥ शुद्ध सत्त्व निवडिलें ॥१०४॥
त्रैमूर्तीचें सत्त्व मिळोन ॥ मुर्तिं केली असे निर्माण ॥
ठेविते झाले नामभिधान ॥ दत्तात्रेय अवधूत ॥१०५॥
हा सोहळा देखोनि अनुसूया सती ॥ हर्षभरित जाहली चित्तीं ॥
म्हणे परब्रह्म सत्त्वमूर्ती ॥ दृष्टीं पडला आज हो ॥१०६॥
धन्य धन्य भाग्य आजिचें ॥ निधान देखिलें त्रिभुवनींचें ॥
फळ पावलें पूर्वपुण्याचें ॥ जन्मोजन्मींचें येधवां ॥१०७॥
तंव इंद्रादिक सुरवर ॥ येते जाहले सत्वर ॥
करुणि साष्टांग नमस्कार ॥ उभे राहिले बद्धांजली ॥१०८॥
पूजा करूनि षोडशोपचार ॥ उभे राहिले जोडोनि कर ॥
नारद तुंबर गंधर्व किन्नर ॥ गायन करिती एकसरें ॥१०९॥
यथाविधि पुजा करून ॥ स्तुति करी ब्रह्मनंदन ॥
तैसाचि तो सहस्त्रनयन ॥ स्तवन करी प्रीतीनें ॥११०॥
जयजयावो अत्रिनंदना ॥ जयजयावो कृपाघना ॥
जयजयावो मधुसूदना ॥ पूर्ण ब्रह्मा सनातन तूं ॥१११॥
जयजयावो करुणाकरा ॥ जयजयावो दयासागरा ॥
जयजयावो कृपाकरा ॥ त्रिगुणात्मका दयाब्धी ॥११२॥
जयजयावो निर्विकारा ॥ जयजयावो अत्रिकुमरा ॥
तूं परात्पराचा सोयरा ॥ भवतारक भवाब्धी ॥११३॥
जंव तुमची कृपा होत ॥ तंव मुक तो होय पंडित ॥
तयासी काय न्युन पदार्थ ॥ त्रिभुवनींही असेना ॥११४॥
गुरुकृपा होतां पूर्ण ॥ तयासी होय ब्रह्मज्ञान ।
हें पुराणांतरीं वचन ॥ ब्रह्मादिक बोलती ॥११५॥
ऐसी स्तुति जंव करीत ॥ तवं प्रसन्न झाला कृपाघन दत्त ॥
देता जाहला अपेक्षित ॥ वरदान वेधवां ॥११६॥
कोणी करील आराधन ॥ उपासना विधियुक्त पूर्ण ॥
तये ठायीं रात्रंदिन ॥ मी राहीन जाण नारदा ॥११७॥
दत्तात्रेय नामेंकरून ॥ कोणी करितां माझें स्मरण ॥
तत्काळ उभा राहीन ॥ सहस्त्रनयना जाण पां ॥११८॥
जो प्रातःकाळीं नित्यनेम ॥ दत्त दत्त उच्चारी नाम ॥
तयालागीं मी सकाम ॥ भेट देईन निर्धारें ॥११९॥
कोणतेही रूपेंकरून ॥ द्वादशमास भरतां पूर्ण ॥
तयालागीं मी भेटेन ॥ हें वचन सत्य सत्य ॥१२०॥
उपासना विधियुक्त करोनी ॥ गुरुवचनीं विश्वास ठेवोनी ॥
जो रात्रंदिन माझे ध्यानीं ॥ लक्ष लावील नारदा ॥१२१॥
तयालागीं मी एकक्षण ॥ नारद न जाय कोठें टाकोन ॥
प्रातःकाळीं तयालागून ॥ भेट देईन प्रत्यक्ष ॥१२२॥
ऐसें देतां वरदान ॥ आनंदला ब्रह्मनंदन ॥
सुरादिक सहस्त्रनयन ॥ हर्षभरित जाहले ॥१२३॥
करूनियां जयजयकार ॥ सुमनें वर्षती सुरवर ॥
विमानारूढ शचीवर ॥ जाता झाला स्वस्थाना ॥१२४॥
ऐसा दत्तात्रेयजन्म पूर्ण ॥ ऐकती पढती रात्रंदिन ॥
तयांसी मी निजांगेकरून ॥ रक्षीन रक्षीन त्रिवाचा ॥१२५॥
हा ग्रंथ गृहामाजी असावा ॥ नित्यनेमें संप्रेमें पूजावा ॥
देवपूजेमाजीं ठेवावा ॥ आदरेंकरूनि समस्तीं ॥१२६॥
त्याची फळश्रुती हेचि पूर्ण ॥ ऐश्वर्य चढे रात्रंदिन ॥
यश कीर्ति सदा कल्याण ॥ प्राप्त हे य तयांसी ॥१२७॥
स्वामीकृपेचा हा ग्रंथ ॥ वरी दाशरथीचा आशीर्वाद ॥
त्याचे चरणीं मस्तक ठेवीत ॥ मनोमधव निजप्रेमें ॥१२८॥

इति श्रीदत्तजन्माख्यानं संपूर्णम् ॥ शुभं भवतु ॥