श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे

स्थान: श्री गुरुनाथ मुंगळे ध्यान मंदिर (श्रीपाद श्रीवल्लभ / श्री नृसिह सरस्वती / श्री दत्तमंदिर)                                                                  
कोठे आहे: पुणे शहर, पाषाण सुस रस्ता                                                                                       
सत्पुरूष: प. पू. श्री गुरुनाथ मुंगळे  महाराज                                                                                     
विशेष: तेज:पुंज श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ व श्री दत्तात्रय मूर्ती

श्री गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर
श्री  गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर

पुण्यनगरी पुणे हे अनेक सत्पुरूष यांचे कार्यक्षेत्र, अनेक ऐतिहासिक वास्तू, प्रासादिक व पुण्यपुरुषांच्या वास्तव्याबाबत प्रसिद्ध आहे. शिवरायापासून लोकमान्य टिळक, गुळवणी महाराज, दत्तमहाराज कविश्वर, शंकर महाराज, चिले महाराज, श्री वासुदेव बळवंत फडके, मामा दांडेकर, मामा साहेब देशपांडे इ. यांच्या वास्तव्याने हि पुण्यभूमी परम पवित्र झालेली आहे. याच प्रासादिक पुण्यनगरीतील नवविकसीत पाषाण-सूस रस्त्यावर एक अत्यंत पवित्र व प्रसादिक दत्त मंदिराची वास्तू पुण्यवान दत्तभक्त दाम्पत्य श्री व सौ मानकर याच्या प्रयत्नातून व् प. पू श्री गुरुनाथ मुंगळे यांच्या आशीर्वादाने  इ. स. २००६ मध्ये उभी राहिली. पाषाण कडून सुसकडे जाताना या उपनगरी रस्त्यावर श्री मंदिराची कमान आपले स्वागत करते. या कमानीतून प्रवेश करताना मंदिर परिसर व आतील भव्य व दिव्य मंदिराची कल्पनाच येत नाही. परंतु साधारणतः ५०० मीटर्स आत आल्यानंतर प्रशस्त वाहनतळ आहे. येथे दुचाकी व चारचाकी वहाने ठेवण्याची उत्तम व्यवस्था आहे. 

तेथून मंदिर परिसरात आपण प्रवेश करतो. येथे पादत्राणे स्टॅन्ड व पाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था आहे. येथे पादप्रक्षालन केल्यानंतरच मंदिरात प्रवेश करता येतो. समोरच भव्य मंदिर आपणास द्रीष्टीस पडते. मंदिरास असलेल्या ५-६ पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. समोरच असलेल्या ३ संगमरवरी नयनमनोहर मूर्ती पाहून भक्त देहभानच विसरून जातो. भक्त नतमस्तक होतो व श्री चरणी आपले मस्तक ठेवतो. या मूर्तीत डाव्याबाजूस श्रीपादश्रीवल्लभ, मध्ये श्री गुरुंची तिन शिरे सहा हात त्रिमूर्ती व उजव्या बाजूस श्री नृसिह सरस्वतीची मूर्ती आहे. श्री दत्तमहाराजांची मूर्ती सोडून बाकी दोनीही मूर्ती अ।सनाधिष्ट आहे. या तिनीही मूर्ती साधारणतः २४-३० इंच उंचीच्या आहेत. या मूर्ती श्री क्षेत्र पिठापूर प्रमाणे प्रतिष्ठापित आहेत. सदर मूर्ती अत्युच्य दर्जाच्या संगमरवरी दगडात बनविलेल्या आहेत. मूर्ती अत्यंत देखण्या आहेत, येथील गुरुजीनी केलेली पूजा व देखणे रूप पाहिलेकी भक्त आपले देहभान पूर्ण विसरून जातो. कारण त्या मूर्तीतून परिवर्तित होणारे तेज! या तीन मूर्ती समोरच श्रींच्या प्रासादिक संगमरवरी पादुका आहेत. प्रत्येक भक्ताला या पादुकांवर डोके ठेवता येते. आपण आणलेली पूजा सामुग्री अ।र्पण करता येते. भक्त कृतकृत्य होतो! मंदिरातच समोर डाव्याबाजूस मुरलीधारी श्री गोपाळकृष्णाची संगमरवरी सुंदर मूर्ती आहे व उजव्या बाजूस श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई व श्री हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. सर्वच मूर्ती अत्यंत प्रसन्न ध्यानात आहेत. या मंदिरात दर्शन घेताना मन अतिशय प्रसन्न होते. या  मंदिर परिसरात अत्यंत प्रसन्न व प्रासादिक स्पंदने जाणवल्याशिवाय रहात नाही. तेजपुंज मूर्ती, प्रसन्न पूजा, भक्तिभावाने व आर्ततेने गाइलेली आरती, सर्वच प्रसन्न व प्रासादिक!

श्री  गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर
श्री गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर

या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता, शांतता व पावित्र्य! सर्व भक्त पवित्र स्पंदनाने भारलेल्या मंदिरातील दर्शन घेऊन प्रदक्षणे साठी निघतात. एक रस्ता तळ घरातील ध्यानमंदिराकडे जातो व एक प्रदक्षिणा मार्गाकडे. श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून आपण ध्यान मंदिराकडे जाऊ लागतो. साधारणतः १०-१५ पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपण ध्यान मंदिरात प्रवेश करतो. ध्यानमंदिरात समोरच २ मोठे फोटो आपणास दिसतात. एक श्री स्वामी समर्थांचा व दुसरा प. पू. सद्गुरू गुरुनाथ मुंगळे महाराज यांचा आहे. याच ध्यानमंदिरात उजव्या बाजूस श्रीगुरुनाथ मुंगळे यांचे दीक्षा गुरु श्री गुरुकृष्ण सरस्वती यांची एक तसबीर आहे, तर डाव्या बाजूस श्री दत्तगुरूंचे प्रातःस्मरणीय पंचमवतार श्री वासुदेवानंद सरस्वती यांचीही मोठी तसबीर आहे. समोरच श्री स्वामी समर्थांची एक सर्वांग सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. भक्तगण येथे आसनावर स्थानापन्न होऊन ध्यान धारणा करू शकतात. भक्त व भगवंत यात अभिन्नता प्रस्थापित होते. कारण प्रसन्न व प्रसादिक वास्तू संपूर्ण शांतता, कारण रस्ता व गोंगाटापासून दूर, निसर्गरम्य परिसर. येथील अधिष्ठात्री देवता येथे पवित्रतेने परिपूर्ण वास करून आहे हे क्षणाक्षणाला जाणवल्याशिवाय रहात नाही. या पवित्र व प्रासादिक ध्यान मंदिरात अनेक साधक सकाळ संध्य।काळ साधना करताना दिसतात. अनेक दत्तभक्त व साधक शांतपणे डोळे मिटून घेताच त्यांना प्रासादिक अनुभूती येत असल्याचे आवर्जून सांगतात. लहान मुलांना  ध्यानमंदिरात प्रवेशास मनाई आहे. अनेक दीक्षा घेतलेले साधक येथे दत्तमहाराजांच्या सहवासात स्वर्गीय अनुभूती घेऊन कृतकृत्य झाले आहेत.

श्री  गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर
श्री  गुरुनाथ मुंगळे

मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ व निसर्गरम्य आहे. येथे फुलझाडे, फळझाडे व अनेक वेली आहेत. परिसरात बसण्यासाठी बाक आहेत. याच मंदिर परिसरात पुजारी निवासस्थान व काही राहण्याची व्यवस्था आहे. येथे येणाऱ्यास राहण्याची काही व्यवस्था नाही. मंदिर परिसरात येथे एक मोठी यज्ञशाला आहे. येथे काही अनुष्ठाने व यज्ञ होत असतात. या मंदिरात सकाळ संध्याकाळ बरोबर ठराविक वेळेस पूजा अर्चा वआरती वेद मंत्राच्या घोषात संपन्न होते. येथील आरतीच्या वेळी परिसरातील भक्त व इतर भागातून येणारे सेवक आवर्जून हजेरी लावतात. अत्यंत लयबद्ध व शिस्तबद्ध आरतीने मन भारावून गेल्याशिवाय रहात नाही. 
           
या मंदिराचे निर्माण परमपूज्य सद्गुरू गुरुनाथ मुंगळे यांच्या मार्गदर्शना खाली झालेले आहे. प. पू. श्री मुंगळेजी दत्तसंप्रदायातील एक अधिकारी सत्पुरूष असून कोल्हापूर निवासी आहेत. ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात विपुल लेखन केले असून महान दत्तावतारी श्री गुरुकृष्ण सरस्वती यांचे शिष्य होत. ते दीक्षाधिकारी असून महान साधक आहेत. महाराष्ट्र तसेच इतर प्रांतात त्यांचा शिष्यवर्ग आढळतो. या महान व पवित्र दत्तमंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा यांचेच मार्गदर्शनाखाली मे २००६ मध्ये झाली आहे.           

श्री दत्त संप्रदायातील अनेक उत्सव (श्री गुरुपौर्णिमा, श्री दत्तजयंती व मंदिर वर्धापन दिन) येथे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरे होतात. येथे येणारा भक्त मुख्यत्त्वे करून स्वच्छ व सुंदर परिसर निसर्गरम्य वनराई, फुले, फळे व शांतता यामुळे सुखावतो. या प्रसन्न वातावरणातून भक्तांचे मन निघतच नाही. कसेबसे मनाला समजावतो व महाराजांना पुनः येण्याचे अभिवचन देऊन निघतो पण परत. परत येतच राहतो. पुण्यनगरीतील हे तितकेशे प्रसिद्धीस न आलेले पण अत्यंत जागृत स्थान आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना येथे केवळ दर्शनाने पूर्ण झाल्याचे भक्त आवर्जून सांगतात. तसे अनुभव अनेक भक्तांनी येथे लिहून ठेवलेले आहेत. पुण्यनगरीत श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वतीच्या मूर्ती कोठेही असल्याचे ऐकिवात नाही. दत्तभक्तांनी येथे जाऊन अवश्य दर्शन घ्यावे व श्री गुरुमहाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. ज्यांना आर्थिक परिस्थिती किंवा प्रकृती कारणास्तव श्री क्षेत्र पिठापूर येथे जाता येत नाही त्यांनी येथे दर्शन केल्यावर पिठापूर दर्शनाचे समाधान प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही.

श्री गुरुनाथ मुंगळे ध्यानमदीर
श्री गुरुनाथ मुंगळे ध्यानमदीर, पुणे 
श्री गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर- श्री कृष्ण सरस्वती महाराज
श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराज
स्वामी समर्थ
स्वामी समर्थ मूर्ती, श्री गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर