श्री दत्तावतार दत्तस्वामी (शके १६०० – १६८०)

जन्म: १६७८
आई/वडिल: जिऊबाई / गोपाळपंत
कार्यकाळ: १६७८ - १७५८
लग्न: इ. १७०५ मध्ये, पत्नी गहुबाई
समाधी-निर्वाण: समाधी राक्षसभूवन येथे, जि. बिड, इ. स.१७५८

मराठवाड्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन (शनीचे) बीड जिल्ह्यात आहे. येथे अत्री ऋषींचा आश्रम आहे. यांचे मूळ पुरुष माणकोजीपंत कुलकर्णी असून हे दामाजी, भानुदास यांच्या काळातले समजले जातात. हे प्रथम गरुडगंगेच्या काठी खरडा येथे रहात होते. माणकोपंत पंढरीची वारी नेमाने करीत. यांच्या कुळात पांडुरंगाचा अवतार दत्तस्वामी या नावाने प्रगट झाला. दत्तस्वामींची माता जिऊबाई नावाची होती. नामसंकीर्तन चालू असताना हिने नरसिंहसरस्वतींचा अनुग्रह प्राप्त करून घेतला. खरे म्हणजे स्वामींच्या कृपेमुळे जिऊबाईच्या उदरी दत्तस्वामी यांनी जन्म घेतला. दत्तलीला ग्रंथ याचे कर्ते वरदसुत आहेत.

गोपाळपंतांनी दत्तस्वामीचे शके १६२७ मध्ये लग्न केले. यांच्या अंगी प्रखर वैराग्य होते. आईवडिलांनी यांना बीड येथे उद्योगधंद्यासाठी पाठविले. यांच्याबरोबर काही शिष्यही होते. एका व्यापाऱ्याच्या घरी यांनी हिशेबाचे काम पत्करले. काम झाल्यावर हे नामस्मरण, भजन, कीर्तन यांत रंगू लागले. एके दिवशी कामात काही उणीव असल्यामुळे यांच्यावर ही नोकरी सोडण्याचा प्रसंग आला. यांना ज्ञानेश्वरी वाचण्याचा छंद होता. बीड येथे यांनी बारा वर्षे तप, व्रत, आराधना, अनुष्ठान यांत घालविली. यानंतर यांनी तीर्थयात्रा केल्या. यांची प्रथम पत्नी निवर्तल्यावर दुसरा विवाह केला. सप्तशृंगी देवीच्या कृपेने यांना केशव उर्फ बाबास्वामी यांचा पुत्र म्हणून लाभ झाला. शके १६५२ मध्ये ही दुसरी पत्नी गहूबाई निधन पावली. मल्लिकार्जुनाचे यांनी दर्शन घेतले होते.

शके १६६४ मध्ये हे राक्षसभुवनला आले. दत्तस्वामींची समाधी येथे आहे. यांनी शके १६८० मध्ये अवतारकार्य संपविले.