श्रीमद् रामचंद्र योगी

जन्म: ज्ञात नाही (इ. स. १०३४ चे दरम्यान वाडीत)
मार्गदर्शक: श्री नृसिंहसरस्वती 
संप्रदाय: दत्त संप्रदाय 
समाधी: ज्येष्ठ वाद्य चतुर्दशी 
विशेष: १०३४ पासून श्री नृसिंहसरस्वती १३४४ मध्ये येइपर्यंत वाडीतच तपाचरणी   

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या सुवर्णाक्षरमंडित वैभवशाली पारमार्थिक इतिहासाचे आद्य जनक म्हणून श्रीमद् रामचंद्र योगी हे चिरपरिचित आहेत. योगाभ्यासात अत्यंत निष्णात व आपण स्वतः पावन होऊ, अशा भावनेने कित्येक वर्षे सतत ध्यानस्थ बसून स्वतःचे जीवन 'स्वामींचे सहवासाने' सार्थक मानणारे श्री रामचंद्र योगी यावचंद्रदिवाकरो श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे वास्तव्य करून रहातात. त्यांची जिवंत समाधी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आहे. त्याची पूजा अर्चा पुजारी मंडळी नित्य करतात. परिवार देवतेमध्ये किंवा सनकादिक म्हणून पूजेत त्यांना अग्रस्थान आहे. त्यांची पूजा प्रथम होते. शंकराची पिंडी व शाळुंका स्वरूपात या ठिकाणी त्यांचे स्मारक आहे.

इ.स.१०३४ मध्ये या सतपुरुषांचे कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वास्तव्य सुरु झाले. दैवी गुणाने संपन्न असणाऱ्या योगी महाराजांना तपश्चर्येच्या योगाने त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. हे स्थान भगवान दत्तात्रेयांचे निरंतर वास्तव्याने पुनित होणार अशी त्यांची खात्री होती. त्यानंतर शके १३४४ च्या सुमारास श्रीमन् नृसिंहसरस्वतींनी घनदाट अशा अरण्यात थंडी, ऊन व पाऊस इत्यादि सहन करीत पंचाग्निपूर्वक कठोर तपश्चर्या करणाऱ्या श्री रामचंद्र योगी ह्या आपल्या लाडक्या शिष्योत्तमाच्या विशुध्द मनातील हेतू पूर्ण करण्यासाठी या क्षेत्री आगमन केले. त्यानंतर योगी महाराजांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोन्ही सत्पुरुषांची भेट झाली. त्यांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवून प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. त्यांच्या स्पर्शाने समाधी अवस्थेपर्यंत पोहचलेले रामचंद्र योगी ब्रह्मानंदातून बाहेर आल्यानंतर प्राणप्रिय सद्गुरुंना आपल्या तप:स्थानाजवळ अतिशय आदराने नेल्यानंतर, "तुमच्या आशीर्वादाने मला ‘ध्रृवपद’ प्राप्त झाले आहे. आता मला भय नाही’ असे म्हणून रामचंद्रयोगींनी नमस्कार केला. त्यांचा नमस्कार स्वीकारून नृसिंहप्रभू औदुंबराच्या तळी जाऊन राहिले.

श्रीरामचंद्र योगी यांची समाधी
श्रीरामचंद्र योगी यांची समाधी

श्री नृसिंहवाडीतील सत्पुरूष श्रीरामचंद्र योगी 

श्रीनृसिंहवाडी ही श्रीनृसिंह सरस्वती स्वामींची तपोभुमी असल्याने ईथे अनेक सत्पुरूष व महान साधक होऊन गेले .त्यापैकीच एक श्री श्रीरामचंद्र योगी हे मोठे तपस्वी होते. त्यांना दृष्टांत झाला की श्रीनृसिंह सरस्वती महाराज संगम क्षेत्री येणार म्हणून ते याक्षेत्री येऊन त्यांची वाट पाहात होते. श्री गुरू तिथे आल्यावर त्यांनी श्रीरामचंद्र योगी यांच्यावर अनुग्रह केले. ते श्रीगुरूंची सेवा करीत राहीले. काहीकालानंतर त्यांनी श्रीगुरुच्या हस्ते जिवंत समाधी घेतली. त्यावेळी श्रीगुरू म्हणाले की कोणी तुमची सेवा केल्यास ती सेवा मला पोहचेल. म्हणून समस्त भक्त यांच्या समाधीला प्रत्यक्ष श्रीगुरूदेव दत्त समजून प्रदक्षिणा घालतात. श्रीरामचंद्र योगी यांची समाधी दत्तमहाराजांचे दर्शन घेतल्यावर पायऱ्या चढून वर आल्यावर श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या स्मृति देवालयामागे पिपंळाच्या कट्यावरील मारुतीच्या मंदीरामागे आहे. श्रीरामचंद्र योगी महाराजांच्या पूजेला अग्रस्थान दिले जाते.

काही कालानंतर पावनतम अमृत हस्ते त्रिभुवनी दुर्लभ अशा संजीवन समाधी योग रामचंद्र योगींच्या सारख्या परमभाग्यशाली तपोनिधीच्या नशिबी ब्रह्मदेवानेच लिहिला होता. जेष्ठ वद्य चतुर्दशीच्या भाग्यदिनी महाराजांना ‘संजीवन समाधी’ दिली. याच दिवशी नृसिंहप्रभूंनी रामचंद्र योगींना वर दिला की, "तुमची कोणी भक्त सेवा करतील ती मला प्राप्त होईल.” 

श्रीमद् रामचंद्र योगींच्या अत्युत्कट प्रेमाचे प्रतिक असलेल्या ह्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्याविषयीच्या अधिकारामुळेच आजतागायत अनेक आर्त, जिज्ञासू भक्तांचे मनोरथ पूर्ण झाले आहे. ही संजीवन समाधी श्री दत्तगुरुंच्या मंदिराच्या पश्चिमेला एका तत्कालीन अश्वत्थाच्या झाडाखाली आहे. त्या स्थानावर शिवलिंगाच्या स्वरूपात त्यांची समाधी दिसते. त्यांच्या समाधीची पूजा-अर्चा नित्य नियमाने येथील पुजारी करतात. 

उन्हाळ्यामध्ये समाधीला ‘दहीभाताची पूजा’ बांधून भक्तजन शांती, समृद्धी व कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना करतात व भक्तांना त्यांच्या सहृदय अंत:करणाचा प्रत्यय आजही येतो.

भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याविषयीच्या व्यवस्था अन्य कोणत्याही क्षेत्री अस्तित्वात नाही. म्हणूनच दत्ताच्या राजधानीचे व योगी महाराजांचे दिव्य तपोबल हे ह्या क्षेत्राच्या सर्व श्रेष्ठतेचे व अद्वियतेचे मर्म आहे म्हणून तपोनिधींच्या मालिकेत ‘श्रीमद् रामचंद्र योगींचे स्थान’ अग्रमानांकीत आहे.

नृसिंहवाडीचे रामचंद्र योगी

कलियुगातील भगवंताचे  दत्तस्वरूपी दोन अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज आणि श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज. आता या दोन अवतारांमध्ये अंतर होत अर्थात ते एका कालखंडानंतर झाले होते. या दोन्ही अवतारांना पाहिलेला त्यांची कृपादृष्टी प्राप्त झालेला असा कोणी महात्मा आहे का ? आहे- श्रीरामचंद्र योगी महाराज ! 

श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराज गोकर्ण क्षेत्री राहिले हा उल्लेख प्रचलित गुरुचरित्रात आहेच, गोकर्ण महाबळेश्वराहून पुढे श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांचा जीवनक्रम गुरुचरित्र परमकथामृतात दिला आहे. 

तेथोनि गिरिनार पर्वता येती | लोकानुग्रहा कारणी  || ४ || (अध्याय ८)
वर्षे नऊ वाहूनि तत्र | कोयना संगमी शिष्यासह दिव्यसत्र | तेथोनि सिद्धमठि व्दादशवर्षे भुवनेश्वरि प्रीतिपात्र || पंचगंगा संगमी चातुर्मास्या वाहिले ||७|| 
श्रीपाददेवे सिद्धमठि रिघता | एकतपाच्या सेवेत निरंतर रमले निश्चिता | पश्चिमतिरीं अवदुंबरि एकांता | रामचंद्रे योगाभ्यासासी समरसले || ९||

श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांबरोबर रामचंद्र योगी स्वामी महाराज औदूंबर क्षेत्री आले आणि त्यांनी बारा वर्षे महाराजांच्या कृपाछत्राखाली योगाभ्यास केला. नंतर बारा वर्षांनी श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांनी चार महिने अमरेश्वरापाशी अर्थात कृष्णा-पंचगंगा संगमावर वास केला. रामचंद्रयोगी महाराज अर्थातच त्यांच्याबरोबर होते. पुढे श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांनी कृष्णा-पंचगंगा संगम स्थळाहून आपला मुक्काम हलविला आणि ते कृष्णामाईच्या नाभिस्थानी अर्थात कुरवपूर येथे आले . या वेळी मात्र निघताना रामचंद्र योगी महाराज त्यांच्याबरोबर नव्हते . कृष्णा - पंचगंगा संगमावर त्यांना वर दिला आणि पुढील अवतारात भेट होईल असे श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराज म्हणाले. अत्यंत उत्कटतेने रामचंद्र योगीमहाराज पुढील अवतारात होणाऱ्या भेटीची वाट पाहत होते. परमकथामृतात गुरुचरित्रकार म्हणतात-

श्रीपाद अवतारी रामचंद्र शिष्ये पुनर्दर्शनि मागीतले जाण | यास्तव नरहरि देवे भक्तइच्छे अपर अवतारि पूर्ण |

गुरुमहाराज अमरेश्वरापाशी कृष्णा-पंचगंगा संगमावर आले आणि रामचंद्र योगी महाराजांना त्यांनी विचारले, 

आले श्रीगुरुदेव नरहरी या स्थानि | विचारिती योगेश्वरा कोठे राहू म्हणोनि ||

गुरुमहाराज म्हणताहेत कुठे राहू ते तुम्ही सांगा ! आपल्या भक्ताच्या इच्छेखातर श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज औदूंबर वृक्षातळी बारा वर्षे राहिले. रामचंद्र योगी महाराजांनी नंतर कृष्णा-पंचगंगा संगमस्थळी (नृसिंहवाडी) येथे समाधी घेतली. हा दिवस होता ज्येष्ठ वद्य चतुर्दशी. आजही नृसिंहवाडीला दत्त महाराजांना नमस्कार करणे न जमल्यास श्रीरामचंद्र योगी महाराजांना नमस्कार केला तरी दत्त महाराज तो मान्य करून घेतात इतकी त्यांची योग्यता आहे, हि सनकादिक मंडळी म्हणजे दत्त महाराजांचा शिष्य परिवार आणि त्यांच्या सेवेतील गुह्य सांगताना दत्त महाराज म्हणतात, माझ्या या शिष्य परिवाराची सेवा म्हणजे माझीच केलेली सेवा असे मानायला हरकत नाही. तेव्हा नृसिंहवाडीला खाली दत्त महाराजांच्या पादुकांना नमस्कार करणे, ऋतूमान, प्रकृती या कारणास्तव न जमल्यास रामचंद्र योगीराजांना नमस्कार करा.