श्री जनार्दनस्वामी (शके १४२६ - १४९७)

श्री जनार्दनस्वामी
श्री जनार्दनस्वामी 

जन्म: फाल्गुन व. ६, इ.स.१५०४, चाळीसगांव येथील देशपांडे घराण्यात, यजुर्वेदीय ब्राह्मण शाखा
आईवडिल: ज्ञात नाही 
कार्यकाळ: १५०४ ते १५७५
संप्रदाय: दत्तसंप्रदाय
गुरु: गुरु दत्तात्रय
समाधी: फाल्गुन व. ६, १५७५
लग्न: १५२५ (१) सावित्री (२) रमा
शिष्य: 
१) एका जनार्दन (संत एकनाथ)
२) जनी जनार्दन
३) रामा जनार्दन

जन्म व अनुग्रह 

इस्लामी सत्तेत देवगिरी अथवा दौलताबाद येथे अधिकारावर राहून दत्तोपासनेचा प्रसार करणारे व एकनाथांवर अनुग्रह करणारे म्हणून थोर दत्तोपासक श्रीजनार्दनस्वामी यांचे नाव प्रसिद्ध आहे. फाल्गुन व. ६ शके १४२६ रोजी यांचा जन्म चाळीसगावाच्या देशपांडे घराण्यात झाला. हे शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेयी माध्यंदिन ब्राह्मण असून नित्य धर्मकृत्ये व पूजाउपासना यांत यांना प्रथमपासूनच गोडी वाटत होती. शके १४४७ मध्ये त्यांनी एकाच कुलगोत्रातील दोन मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. भगवच्चिंतन, स्नानसंध्यादि कर्मे, अतिथिसेवा, राजकार्य आणि सावित्री-रमा या दोन स्त्रियांशी संसार; असा त्यांचा जीवनक्रम होता. राजकारणात नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, हीन लोकांशी संबंध यांतून त्यांना मार्ग काढायचा होता. स्वधर्मनिष्ठा राखायची होती. घरातील दत्तोपासना वाढवायची होती. कृष्णातीरी अंकलखोप, कुरवपूर, वाडी, औदुंबर इत्यादी दत्तस्थानांना ते भेटी देत असत. अंकलखोप येथे त्यांना दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला. 

कर्मयोगी श्री जनार्दन स्वामी 

देवगिरीवर येऊन त्यांनी यवनसेवा पत्करली. या एका प्रसिद्ध स्थानाभोवती जनार्दनस्वामी व एकनाथ यांच्या अनेक रम्य व भावगर्भ स्मृती एकवटलेल्या आहेत. दुर्गातीर्थ व श्रीगोरक्षगुहा ही दोन स्थाने भाविकांना सुखविणारी होती. जनार्दनपंतांनी यवनसेवा पत्करूनही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही. नित्याचे आन्हिक, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांची पारायणे, नामस्मरण व राजकारण यांत त्यांचे चित्त रंगून गेले होते. गोरक्षगुहा व गडाखाली सहस्रस्तंभ देवीजवळचे स्थान या ठिकाणी एकान्तात त्यांची ध्यानधारणा चाले. नाथचरित्रकार केशव अध्यापक याने जनार्दनासंबंधाने लिहिताना म्हटले आहे,

‘जनार्दनांचा नित्य नेम । स्नान संध्या अति उत्तम । तयावरी आवड परम । निज धर्म आचार ॥
सिद्धराज श्रीज्ञानदेव । ज्ञानेश्वरी अमृतानुभव । स्वानुभवें वदला अपूर्व । जनार्दना भाव त्या ग्रंथीं ॥
तया पठनी अति गोडी । नित्य व्याख्यानाची आवडी । मध्यान्हापर्यंत प्रतिदिनीं । नित्यनेमें असावें  ॥ 
तयावरी भोजनपंक्ति । सहब्राह्मण ब्रह्ममूर्ती । सारूनियां यथा पद्धती । राजदर्शना मग जावें ॥
न्याय नीती तया रीतीं । शिष्टांशी मान्य पडे रीतीं । या परी प्रपंच परमार्थी । दक्षता लोकसंग्रहार्थी ॥’

जनार्दनस्वामींचे नैष्ठिक आचरण व दत्तभक्ती यांचा प्रभाव यवनसत्तेवरही असावा. असे सांगतात की, यांना व यांच्या परिवारास सोयीचे व्हावे म्हणून देवगिरीच्या आसपास शुक्रवारऐवजी गुरुवारी सुट्टी असे. 

देवगिरीच्या जवळच पाचसहा मैलांच्या परिसरात शुलभंजन शिखराच्या सपाटीवर शिवमंदिरे आहेत. तेथेच सूर्यकुंड नावाचे एक तळे आहे. याच भागात सहस्रलिंग म्हणूनही एक स्थान आहे. दाट झाडी व एकान्त यांमुळे जनार्दनपंत दत्तध्यानासाठी येथे येत असत. ‘जनार्दनपंत ते अवसरीं, गुरुवारीं अखंड जात पर्वतशिखरीं । सहस्रलिंग सरोवर परिसरी, सुलभोंजन गिरी नेम सत्य’ असे एकनाथ-चरित्रकार केशवाने सांगितले आहे. अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असत. याच ठिकाणी जनार्दनस्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला. दत्तावधूताने कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हटले आहे. या दत्तसाक्षात्काराचे वर्णन एकनाथ आपल्या भागवतात करताना लिहितात, 

गुरुप्राप्तीलागीं सर्वथा । थोर जनार्दनवासी चिंता ।
विसरला तिन्ही अवस्था । सद्गुरू चिंतिता चिंतनीं ॥
देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था ।
येणें जालें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥
हातु ठेवितांच तत्काळ । बोधु आकळिला सकळ ।
मिथ्या प्रपंचाचें मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥
कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोधु जाला देता ।
देहीं असोनि विदेहता । तेंही तत्त्वता आकळिली ॥
गृहश्रमु न सांडितां । कर्मरेखा नोलांडतां ।
निजव्यापारीं वर्ततां । बोध सर्वथा न मैळे ॥
तो बोधु आकळितां मना । मन मुकलें मनपणा ।
अवस्था नावरेची जनार्दना । मूर्छापन्न पडियेला ॥
त्यासी सावध करूनि तत्त्वता । म्हणे प्रेमा राहे सत्त्वावस्था ।
तोही गिळोनि सर्वथा । होईं वर्ततां निजबोधे ॥
पूजाविधी करोनियां । तंव जनार्दनु लागला पायां ।
तंव अदृश्य जाला दत्तात्रेया । योगमायेचेनि योगें ॥

(नाथभागवत : ९.४३१-३८)

जनार्दन स्वामी हे एक विद्वान दत्तभक्त. यांचा जन्म देशस्थ ब्राह्मण देशपांडे कुळात झाला. त्यांना मुस्लीम शासकाने देवगिरी (नंतरचे नाव दौलताबाद) किल्यावर किल्लाधिकारी म्हणून नेमले. त्या किल्ल्याच्या एका गुहेत त्यांची व दत्त महाराजांची स्थुलात भेट झाल्याचे सांगतात. त्यांच्या शिष्य वर्गात हिंदूंबरोबर मुस्लीम व अरबही भक्त होते. अंकलकोपा येथील दत्तमंदीराच्या परिसरात प्रवास काळात दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहसरस्वतीरूपात दर्शन दिले.

याप्रमाणे जनार्दनस्वामींवर प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा अनुग्रह असल्यानेच वर सांगितल्याप्रमाणे नाथांनी म्हटले आहे,

‘दत्तात्रयशिष्यपरंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा । तेणें जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कलीयुगी ॥’

पुढे नाथांनाही जनार्दनस्वामींनी याच ठिकाणी दत्तदर्शन करविल्याचे दिसते. नाथांच्याबरोबर जनार्दनस्वामी नाशिक-त्र्यंबकेश्र्वरच्या तीर्थयात्रेसही गेले होते. नासिकच्या चंद्रबोध नावाच्या ब्राह्मणाशी भेट झाली. श्रीगोंदे येथील सिद्धान्तबोधकर्ते शेख महंमद हे याच चंद्रबोधाचे शिष्य होत. जनार्दनस्वामींना साक्षात् दत्ताचा अनुग्रह असल्याचे आपण पाहिलेच आहे. परंतु कोणी त्यांना उपदेश श्रीनृसिंहसरस्वतींनी दिल्याचे सांगतात. पण हा उपदेश प्रत्यक्ष असण्याचा संभव नाही. श्रीनृसिंहसरस्वतींचे निर्याण शके १३८० मधील, व जनार्दनस्वामींचा जन्म शके १४२६ मधील. नाथांच्या अभंगगाथेत जनार्दनस्वामींच्या नावे असलेल्या अभंगांतील पहिले चौदा अभंग नृसिंहसरस्वतींना उद्देशून आहेत. परंतु हे अभंग नाथगुरू जनार्दनस्वामींचे नसावेत असा अभ्यासकांचा तर्क आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस नृसिंहक्षेत्रात होऊन गेलेल्या जनार्दनाचे असावेत असा वा. सी. बेंद्रे यांचा कयास आहे.

अलीकडे जनार्दनपंतांचे गुरू नेमके कोण या विषयाही मतभेद होत आहेत.

‘ॐ नमोजी श्रीसद्गुरू चांद बोधले । त्यांनी जानोपंता अंगिकारलें । जानोबानें एका उपदेशिलें। दास्यत्वगुणें’

असे शेखमहंमद आपल्या ‘योगसंग्राम’ नावाच्या ग्रंथात म्हणतात. म्हणून चांदबोधले – जनार्दन व शेखमहंमद – एकनाथ अशी नवीनच परंपरा सांगितली जाते. नाथांची गुरुपरंपरा याप्रमाणे सूफी पंथीय चांदबोधल्यांकडे जाते. वर सांगितलेले चंद्रभट ब्राह्मण कालांतराने सूफी झाले व त्यांचाच उपदेश जनार्दनपंतांना होता. परंतु या नव्या संशोधनास एकनाथांच्या वाङ्मयात फारसा आधार नाही. नारायण – अत्री – दत्तात्रेय – जनार्दन अशीच गुरुपरंपरा सांप्रदायिक मानतात, ते योग्यच आहे. एकनाथांप्रमाणेच जनार्दनस्वामींच्या दत्तोपासनेत कृष्णभक्तीलाही स्थान होते. दत्त-कृष्ण-विठ्ठल या त्रयीचे अभेदरूप नाथांच्या वाङ्मयात यथार्थपणे मिळते. जनार्दनस्वामींनी राजकारण, परमार्थ व प्रपंच योग्य रीतीने सांभाळून शके १४९७ च्या फाल्गुन व. ६ रोजी आपला अवतार संपविला. त्यांचा जन्म, त्यांना दत्तदर्शन, नाथांना बोधदान आणि समाधियोग यांचा दिवस फाल्गुन व. ६ हाच आहे, आणि आणखी नवल असे की, नाथांच्या समाधीचा दिवसही फाल्गुन व. ६ असाच आहे!

जनार्धन स्वामी
श्री जनार्दनस्वामी

जनार्दनस्वामींची काही स्फुट रचना असावी. ‘आत्मनात्मविवेकसार’ नावाचा एक ओवीवृत्तात्मक ग्रंथ त्यांनी पंचीकरणावर लिहिलेला आहे. उपनिषदवेदान्त भावगीता त्यांनी रचिली असल्याचे कन्नडकर वि. बा. जोशी आपल्या ‘श्रीसंत जनार्दनस्वामी’ या चरित्रग्रंथात सांगतात. जनीजनार्दन, रामाजनार्दन, एकाजनार्दन अशा काही शिष्यांचा परिवारही त्यांच्याबरोबर असे. पैठण, देवगिरी, काशी इत्यादी ठिकाणी जनार्दनस्वामींचे संबंध आहेत. नाथांना काशीस ब्रह्मघाटापाशी जनार्दन मठाची स्थापना केली. देवगिरी, दौलताबाद, मानपुरी मठात, बीडपटांगण मठात, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मठात, नाशिकच्या तपोवनातील मठात, जनार्दनस्वामींच्या मठाची परंपरा चालू आहे. उमरखेड, औरंगाबाद, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण (निंबराजांचे), कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दनस्वामींच्या दत्तोपासनेच्या परंपरा चालू आहेत. जनार्दनस्वामींची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीला नसून देवगिरीलाच असल्याचे संशोधक सांगतात.

‘श्रीजनार्दन गुप्त दत्त आज्ञा विचारीन ॥ पाहुनियां घौम्यस्थळ सभोंवतीं ऋषीमंडळ ॥ येथे घेतली समाधी एका जनार्दन वन्दीं ॥’

यातले वर्णन खरवंडीपेक्षा देवगिरीनजीकच्या परिसराला लागू पडते. नाथांनी स्वत:च्या निर्याणसमयी श्रीजनार्दनस्वामींची आरती केली. ती नाथचरित्रकार केशवाने दिलेली आहे. 

जयदेव जयदेव जय जनार्दना । परमार्थी आरती अभिन्न भावना ॥ धृ.॥
अवलोकितां जन दिसे जनार्दन, भिन्नाभिन्न कैचे दाखवि अभिन्न ।
अनेक एकत्त्वें दिसे परिपूर्ण, ठकली मन-बुद्धि कैचे अवगूण ॥ १॥
ज्योति चारी दीप्ती उजळुनिया दीप्ती, तेणें तेजस केली तेज आरती ।
पाहातां पहाणेपण पहावया स्थिती नुरेचि पैं वेगळी देह आणि दीप्ती ॥ २॥ 
उजळी ते उजळणे उजळाया लागी । वेगळेपण कैचे नुरेचि भवभागीं । 
आंगीं अभिप्रायले आंगींच्या आंगीं, जिव शिवपण गेलें हरपुनि वेगीं ॥ ३॥ 
पाठी ना पोटी अवघा निघोटी, सर्वांगे देख गा सर्वी वरिष्ठी ।
इष्ट ना निष्ट गुप्त ना प्रगट, अहं सोहं सगट भरियेला घोट ॥ ४॥ 
सर्वदा दिसे परि न कळे ना मना, जे जे दिसे ते ते दर्शन जाणा ।
अभाव भावेंसी हरपलि भावना अभिनव आरती एका जनार्दना ॥ ५॥

अशा रीतीने जनार्दनस्वामींपासून महाराष्ट्रात दत्तोपासनेची एक शाखा समृद्ध झालेली दिसेल. एकनाथांनी दत्तभक्ती विठ्ठलभक्तीत मुरवून टाकली असली तरी जनार्दनस्वामींच्या कृपेने जागृत झालेला दत्तभक्तीचा धागा अतूट होता. ‘धन्य गुरू जनार्दन । स्वानंदाचें जें निधान’ नाथांनी यासाठी म्हटले आहे. आपणांस ज्ञानबोध दत्तात्रेय-जनार्दन यांच्याकडूनच मिळाल्याची ग्वाही देताना एकनाथांनी म्हटले आहे,

‘जनार्दनाचा गुरू । स्वामी दत्तात्रय दातारू ॥
त्यांनी उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥
सच्चित्सुखाचा अनुभव । दाखवला स्वयमेव ॥
एकाजनार्दनी दत्त । वसे माझ्या ह्रदयांत ॥’

गुरु परंपरा 

आदिनारायण 
  ।
अत्री 
  ।
दत्तात्रेय 
  । 
जनार्दन 

।। श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तु ।।