प. प. श्री स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज

जन्म: २४/०८/१९२४ 
श्रीविद्येची दीक्षा: प. पू. आळवणी शास्त्री. 
शक्ती-पात दीक्षा: प. पू. योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज. 
रामदासी दीक्षा: प. पू.  प्रल्हाद महाराज साखरखेर्डा. 
अध्ययन:
ऋग्वेद, अथर्ववेद प. पू. राजेश्वर शास्त्री द्रविड, सांगवेद पाठशाळा काशी,
यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, सावरगाव वेद शाळा. 
दंड दीक्षा: प. प. माधवानंद सरस्वती, दत्तात्रेया मठ नारदघाट काशी.  
ब्रह्मलीन: ३ एप्रिल २०१८

प. प. स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज
श्रीगुरुस्वामी प. प. स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज

श्रीगुरूंच्या स्मृतिशलाका

श्रीगुरुस्वामी प. प. स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज यांच्या विषयी लिहायचं, म्हणजे महाकवी कालिदास म्हणतो त्याप्रमाणे, ‘तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम्|’ (रघुवंश १.२), अर्थात् ‘एखाद्या छोट्याशा लाकडी ओंडक्याच्या तराफ्यावर बसून महासागर ओलांडण्याची इच्छा करण्यासारखे आहे’. श्रीगुरूकृपेच्या तेजाने झळाळून, शाणोल्लीढ मण्याप्रमाणे संस्कारित अशा त्यांच्या कृपापात्र अधिकारी शिष्योत्तमांनी या पुस्तिकेत त्यांच्याविषयी लिहिलं आहे, आणखी पुढेही पुष्कळ लिहिलं जाणार आहे. अशावेळी माझ्यासारख्यानं काही लिहिण्याचं साहस करणं हे केवळ औद्धत्य ठरेल याची मला नम्र जाणीव आहे. पण लहान मुलाला अनेक दिवस चाखायला न मिळालेला लोण्याचा गोळा समोर दिसल्यावर, जगाची काही पर्वा नसलेलं ते अजाण नागडं पोर रांगत, धडपडत त्या गोळ्यावर हात मारत, माखवून घेत आपल्या कुवतीइतकं लोणी फस्त करतं, तसं मी हिमालयाहून उत्तुंग, क्षीरसागरासम गभीर अशा श्रीस्वामीमहाराजांच्या स्मृतींच्या माझ्या वाट्याला आलेल्या नवनीताच्या गोळ्यात हात माखवून घेतो आहे.   

स्वामीमहाराज लौकिकार्थाने ३ एप्रिल २०१८ रोजी ब्रह्मलीन झाले, त्यांनी सगुणदेहाचा त्याग केला. मात्र आपल्या सर्व साधकांच्या रोकड्या अनुभूतिविश्वात स्वामीमहाराजांचे जागते-गाजते अस्तित्व तितकंच सचेतन असल्याचं आपण नित्य अनुभवतो आहोत. ब्रह्मांडनायक श्रीअक्कलकोट स्वामीमहाराजांचे शिष्योत्तम श्रीआनंदनाथ महाराज वालावलकर म्हणतात तसं,  
विश्वव्यापक विश्वंभरू त्याची कैंची समाधी |
जगी जगप्रकार दाखविणे साचारु लीला थोरु समर्थांची ||

अशारीतीने स्वामीमहाराजांचे वर्षभरापूर्वीचं ब्रह्मलीन होणं केवळ सृष्टिलीलांच्या चौकटींची मर्यादा दाखवून देणारी औपचारिक सहजलीला होती हे साधकांच्या प्रचितीस आले आहे.

स्वामीमहाराजांनी माझ्या आयुष्यात म्हटलं तर अंमळ उशीरा पण कळते वय सुरु होताना प्रवेश केला. त्याला निमित्त-कारणीभूत ठरला माझा ज्येष्ठ बंधू, प्रिय मित्र असलेला श्रीगुरुकृपांकित राहुल गायधनी. वयाच्या १९व्या वर्षी, बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात एका मित्राच्याकडे नित्य चकाट्या पिटायला गेलेला असताना तिथे एक दिवस राहुल भेटला. पहिल्या भेटीतच सांप्रदायिक खुण मनोमन पटल्यावर राहुल आणि मी दत्तप्रभूंच्या लीलावर्णनात ती संध्याकाळ घालवली. तेव्हा राहुलने त्याच्या गुरुंविषयी, आपल्या श्रीस्वामीमहाराजांविषयी मला सांगितलं. लहानपणापासून सद्गुरुसंग लाभलेल्या राहुलविषयी मला किंचित हेवा वाटला खरं, पण त्यातून स्वामी महाराजांच्या दर्शनाची ओढ अनिवार लागून राहिली. कर्मठ नसलेल्या मात्र साधारण मध्यमवर्गीय ब्राह्मणी सश्रद्ध संस्कार असलेल्या आमच्या घरात अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराज यांची उपासना ४-५ पिढ्यांची आहे. अक्कलकोटच्या राजोपाध्येवाड्यात ब्रह्मांडनायक स्वामी महाराज नित्य येत. या वाड्यात त्यांनी मृत्युशय्येवर असलेल्या आमच्या एका पूर्वजांना मांडीवर घेऊन मोक्ष प्रदान करण्याची लीला केली आहे. लहानपणी खोपोलीमध्ये घराजवळ असलेल्या सद्गुरु प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या मठात नित्य आरती-सेवेला नियमित जाणं असे. पूर्वजांच्या व आईबाबांच्या पुण्याईमुळे आणि या लहानपणी घडलेल्या किंचितशा सेवेमुळे श्रीसद्गुरुदर्शनाची-कृपेची लागलेली ओढ राहुलच्या माध्यमातून पूर्त होणार अशी मनोमन धारणा पक्की होत होती. आणि ‘श्रीवासुदेव निवास योगाश्रम, पुणे’ येथे एक दिवस श्रीस्वामीमहाराजांच्या चरणांचे दर्शन मला झाले. पहिल्या भेटीत त्यांच्या मंद, प्रसन्न, तेजाळ अशा स्मितहास्यातून मला त्यांनी आश्वस्त केल्याची स्मृती आजही शहारा आणते आहे. त्याचदिवशी संध्याकाळी राहुलने मला श्रीगुरु त्याच्या घरी निवासास असल्याचे कळवले, आणि मी राहुलच्या घरी स्वामीजींचे मनसोक्त डोळे भरून दर्शन घेतलं, भरपूर वेळ चरणसेवा करायची संधीही मला तिथे मिळाली. 

राहुलकडून माझ्याविषयी स्वामीजींना माहिती मिळाली असेल त्याहून अधिक अशा अनेक अंतरंग खुणा त्यांनी त्या भेटीत मला पटवून दिल्या आणि माझ्या बेजबाबदार, बेशिस्त दिनमानाविषयी (Routineविषयी) माझी तिरकस भाषेत टिंगल उडवली. यथावकाश नगरकर काकांच्या घरातील कुटीमध्ये अनुग्रहाविषयी पृच्छा केल्यावर त्यांनी तत्काळ पंचांग काढून एकनाथ षष्ठीच्या दिवशी येण्याची सूचना केली. त्यानुसार श्री. निसाळ यांच्या पुण्यात सिंहगड रस्त्यावरील घरी ‘एकनाथ षष्ठी'च्या दिवशी त्यांनी मला मंत्रदीक्षा दिली. स्वामीजींच्या कृपेचा निरतिशय वर्षाव हा असा होतच राहिला. 

प. प. स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज पादुका
स्वामीजींच्या पदचिंन्हांनी अंकित पादुका 

त्यादरम्यान स्वामीजींच्या अलौकिकत्वाच्या खुणांची रोकडी ढळढळीत प्रचिती सहजरीतीने देणारे अनेको प्रसंग त्यांच्या  कृपेने अनुभवता आले. स्वामीजींची दुसरी बायपास सर्जरी दीनानाथ इस्पितळात झाल्यावर श्री. सचिनदादा ठोसर यांच्या बालेवाडी (पुणे) येथील घरी स्वामीजी मुक्कामी होते. त्यांच्या स्पंजिंगसाठी मी रोज दुचाकीवर तिथे जात असे.  गीतेचा अध्याय म्हणत मी दुचाकीवर बालेवाडीच्या दिशेने जात असताना ‘शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयो:|’ या श्लोकावर मी थांबलो. आणि मनात विचार आला, “च्यायला शीतोष्णादिसुखदुःखसहिष्णुता हे प्रकरण काय असेल नेमकं? पू. भगवत्पादआचार्यांनी भाष्यांत आणि प्रकरणग्रंथातदेखील वारंवार ही भानगड उद्धृत केली आहे. मरू दे तिच्यायला, आपण कुठं असलं काही बघणार हे प्रकार! खरंखोटं देव जाणे असतं की नाही असलं हे.” अशा विचारात मी सचिनदादाकडे पोहोचलो. स्वामीजी अग्निहोत्र मालिका पाहाण्यात रमले होते. “चल, लवकर पाणी ठेव तापायला!” अशी आज्ञा आल्यावर मी तत्काळ वहिनींना विचारून पातेल्यात पाणी तापत ठेवलं. काहीवेळाने पाण्याकडे लक्ष न देता टंगळमंगळ करणाऱ्या मला स्वामीजींच्या रुद्रावताराचे दर्शन झाले, आणि मला हाताला धरून त्यांनी शेगडीकडे नेले. समोर खळखळा उकलणारे पातेलं होतं, माझ्या हातात स्पंजिंगसाठीचा टॉवेल होता. काही कळायच्या आतच, स्वामीजींनी तो टॉवेल हातातून ओढला, त्या उकळत्या पाण्यात आपले फुलासारखे गुलाबी हात बुडवले, आणि मला म्हणाले, “ब्रह्मसिद्धीत आहोत आम्ही. हे बघ, शीतोष्णादिसुखदुःखद्वंद्वसहिष्णुता पाहायची होती नं? ती अशी असते. आमच्याकडे ती आहे, हे बघ!” क्षणभरापूर्वी उग्रमुद्रा असलेल्या स्वामीजींच्या मुखकमलावर पौर्णिमेच्या चंद्रासारखं उमटलेलं हसू पाहून मी तत्काळ त्यांच्या चरणी डोकं ठेवलं आणि भरलेल्या डोळ्यांनी मनात आलेल्या संदेहासाठी क्षमायाचना केली. त्यांनी खांद्याला हात धरून, “चल उठ, लवकर आवर" असं म्हणत जणू काही घडलं नाहीच अशा थाटात पुढची स्पंजिंगची सेवा माझ्याकडून करवून घेतली. अलौकिकत्व आणि ब्रह्मसिद्धीची रोकडी प्रचिती याहून काही वेगळी असेल ?

एम. ए. संस्कृत झाल्यावर पीएचडीसाठी अमेरिकेत जावं असा विचार मी स्वामीजींकडे प्रकट केल्यावर  त्यांनी “सध्या अमेरिकेत शिकायला जायची काहीही गरज नाही, पीएचडीसाठी विद्वान अभ्यासकांच्या देशात, जर्मनीत जायचं आहे दोन-अडीच वर्षांनी, तोवर एमफील कर”, असं सांगत मला आश्वस्त केलं. त्यांची योजना त्यांनी अहैतुकीकृपेद्वारे पूर्ण करवून मला जर्मनीत पाठवलं हे वेगळं सांगायला नकोच. 

मी जर्मनीतून परतल्यावर त्यांच्या कृपेने घेतलेल्या नवीन वास्तूचा वास्तुशांतविधी सुरु असतानाच, १३ मार्च २०१८रोजी,  स्वामीजींनी मला तत्काळ नाशिकला यायची आज्ञा केली, आणि मी नाशिकला पोहोचलो. स्वामीजींच्या भौतिक देहलीलेचे समापन घडताना नाशिकमध्ये त्यांनी बोलावून घेतल्यावर जाणवणारी अस्वस्थता ते गप्पांद्वारे आणि भजनांद्वारे दूर करत. त्यादरम्यान त्यांच्याशी बोलताना त्यांनी नवीन घरात राहायला येण्याचे अभिवचन दिल्याची आठवण मी सचिंत मनाने त्यांना करवून दिल्यावर  उजवा हात हवेत फिरवत नेहमीच्या पद्धतीत डोळे मिचकावत मान फिरवत “येईन रे !” अशी सूचक खूण मला केली. तिसऱ्यादिवशी आपले सारे ग्रंथ, सामान, रुद्राक्षांच्या माळा आणि अन्य साहित्य त्यांच्या काटेकोर व्यवस्थापनानुसार योग्य व्यक्तींना त्यांनी पोहोचत्या केल्या. बंधूवर वे.मू. अभिजित ठोसर याला आणि मला बोलावून हातातल्या चांदीच्या अंगठ्या बोटात घालत “आता मी मोकळा, कफल्लक झालो. माझ्याकडे काहीही बाकी ठेवलं नाही.’’ असे उद्गार काढले आणि “माझे गुरु गेले, गुरु गेले…” असं म्हणत एखाद्या लहान मुलासारखं परमसद्गुरू प.प. माधवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या आठवणीने ते रडू लागले. आदर्श शिष्य-गुरुभक्त आपल्या गुरुमहाराजांविषयी किती भावुक असतो यांची प्रचितीच होती ती. सद्गुरू महाराजांनी दिलेली (काशी मठाच्या व्यवस्थेची) जबाबदारी पूर्त करण्याची उत्कट आसदेखील स्वामीजींच्या त्या वागण्यातून दिसून आली. 

त्यासकाळी साडेदहा-पावणेअकराच्या दरम्यान वे. मू. आदरणीय लखोटेगुरुजी, थोडगे काका आणि मला त्यांनी मंगलस्नान घालण्याची आज्ञा केली. स्नान करताना आजारपणाने खंगलेल्या त्यांच्या देहबोलीमध्ये मात्र काहीही फरक जाणवत नव्हता. स्नानानंतर त्यांना पंचा नेसवताना “निऱ्या नाही घालता येत तुला, थांब, मीच घालतो" असं माझ्याकडे पाहात पुटपुटलेले स्वामीजी दुसऱ्या मिनिटाला “मला मांडी घालायला मदत कर” असं सांगतात आणि काही सेकंदभरात धास लागण्याचे निमित्त करून दृष्टी स्थिर करतात आणि पंचत्व पावतात. सारंच अनाकलनीय! अतिशय काटेकोर, ठरवल्याप्रमाणे वेळापत्रक आखून प्रत्येक गोष्ट करणारे, ठरलेल्या वेळेत आपल्या वेगवेगळ्या डब्यातून ठरलेली औषधं घेणारे, काटेकोर शिस्तबद्ध आचरण अंतिम श्वासापर्यंत कायम ठेवणारे माझे सद्गुरु लौकिक आणि अलौकिक आयुष्यात ध्रुवताऱ्यासारखे अढळपदी विराजमान झाले.

मात्र त्यांनी घरी यायचं वचन मात्र अपूर्ण राहिल्याची खंत मनात होती. महिन्या-दीडमहिन्याने एका सोमवारी घरातून मुंबईकडे जॉबसाठी निघताना देवासमोर बसून स्वामीजींना स्मरून त्यांच्या या वचनाची आठवण मी त्यांना मनोमन करून दिली, आणि कळवळून “राघोबा उदारा, ये माझ्या मंदिराऽऽ” अशी समर्थांनी रामरायाला मारलेली हाक, जमेल तितक्या कळकळीने, स्वामीजींना मारली. आणि घरातून निघालो. मुंबईकडे जाणारी लोकल ट्रेन सुटतेय न सुटते तोच अभिजित ठोसरचा मला फोन आला, “ हेमंता, मुंबईमध्ये येतोय, येताना स्वामीजींनी चातुर्मासात परिधान केलेल्या खडावा तुझ्यासाठी घेऊन येतो आहे.” या प्रसंगासमयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द-भावना नाहीत. “हम गया नहीं, जिंदा है |” या अक्कलकोट स्वामींच्या वचनाची रोकडी प्रचिती स्वामीजींनी मिळवून दिली होती. संध्याकाळी स्वामीजींच्या पादुका घेऊन अभिजित आला. त्याच्या हस्ते दोन दिवस पादुकांची यथाशक्य पूजा करवून घेतली. स्वामीजींच्या बोटांचे आणि पावलाचे सुस्पष्ट ठसे उमटलेल्या या पादुका त्यांच्या चैतन्यमय-चिरंतन सोबतीची खात्री देत माझ्या घरी विराजमान आहेत. एका चातुर्मासात त्यांनी सुरु करवून दिलेला जन्माष्टमीचा उत्सव आमच्या घरी यथाशक्ती संपन्न होतो आहे. श्रीगुरुंच्या कृपेची रोकडी प्रचिती नित्यनेमाने अनुदिनी येत आहे आणि राहील. 

स्वामीजींच्या शेकडो आठवणी, आणि लक्षणीय असे कित्येक प्रसंग जागेच्या मर्यादेमुळे इथे सविस्तर मांडता येणार नाहीत ही जाणीव मला आहे. त्यामुळेच हा संक्षेपातला लेख तूर्त आवरता घेण्याआधी स्वामीजींच्याविषयी माझ्या हीन-अल्पबुद्धीच्या कक्षेत जाणवलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लिहिणं मला गरजेचं वाटतं. कुणाचाही, कुठल्याही प्रकारचा दंभ स्वामीजींच्या समोर मुळीच टिकत नसे, त्यांना तो मुळीच खपत नसे. एखादे आध्यात्मिक क्षेत्रात नाव कमावलेले उपासक किंवा अगदी संन्यासी असो किंवा सामान्य गृहस्थ असो, संबंधित व्यक्ती समोर आल्यावर त्या व्यक्तीने स्वामीजींच्या परोक्ष-अपरोक्ष केलेली चूक ते कडक शब्दात ऐकवत, आणि त्या माणसाला पश्चात्तापदग्ध करवून त्याला चूक पटवून देत. दुसऱ्या क्षणी त्याला उदारमनाने माफ करून त्याच्याच सोबत हास्यविनोदात रममाण होत. त्यांचा क्षणात धारण होणारा रुद्रावतार आणि क्षणार्धात चंद्रासम शीतल होणारी मुद्रा ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि |’ अशा लोकोत्तरपुरुषांच्या वृत्तीची प्रतीती करवून देई. महानुभावांच्या पंचकृष्णांपैकी एक असलेले भगवान श्रीगोविंदप्रभू/गुंडम राऊळ, किंवा श्रीअक्कलकोट स्वामींच्या बालवत्-सहजलीलावृत्तीचे वाचलेले दर्शन त्यांच्या रूपात जिवंत होऊन समोर प्रतीतीला येत असे. 
 
माझे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक विषयांबाबतीतले विचार परखड व  काहीसे बंडखोर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे माझ्या मनात निर्माण होणारा संभ्रम  स्वामीजींसमोर मी नेहमी प्रतिपादित करत असे. “ईश्वर-दत्तप्रभूंवर श्रद्धा आणि परंपरेतील सत्त्व याविषयी खात्री आणि निष्ठा बाळगून तुला प्रामाणिकपणे जे वाटतं ते न घाबरता व्यक्त कर" असं त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र त्याचवेळी राजकीय विषय, रिकामटेकड्या गप्पा, इतरांविषयीच्या शिळोप्याच्या चर्चा यांपासून परावृत्त करत अभ्यासवर लक्ष केंद्रित करण्याचे सूचन ते वारंवार (प्रसंगी रागावून तर कधी सौम्य शब्दात) करत. मी किंवा माझ्यासारखे सारे शिष्य कितीही दूर असले तरी ते काय करत आहेत, त्यांच्या मनात काय आहे हे त्यांना नेमके समजत असे यांची प्रचिती आपण साऱ्यांनी वारंवार घेतली आहेच. त्यांच्यासोबतच्या वेगवेगळ्या प्रवासांत त्यांनी मला, राहुल गायधनी, यश रामलिंगे आणि प्रशांत कुलकर्णीसारख्या गुरुबंधूंना धर्म-राजकारण आणि संस्कृतिकारणामध्ये शिरलेल्या दुष्प्रवृत्ती, व्यथित करणारे काही प्रसंग आणि अनेक विसंगत गोष्टी सांगून परंपरा आणि आधुनिकता याच्यामुळे होणारे संभ्रम आणि चकवे यांविषयी प्रबोधन केले आहे. 

बदलता काळ, सामाजिक व्यवस्थांमधली स्थित्यंतरे यांविषयी स्वामीजींचे भान अद्भुत होते. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात समन्वय राखत जगण्याची कला त्यांनी आपल्या दैनंदिन वर्तनातून घालून दिली होती. यतिधर्माला अनुस्यूत असा काटेकोर आचारधर्म-सोवळेओवळे याविषयीची जागरूकता पाळतानाही समाजातील कुठल्याही घटकाला परकेपणाची किंवा इतरेपणाची जाणीव स्पर्शणार नाही, असे उदात्त वर्तन त्यांचे असे. त्या त्या माणसाच्या धर्मानुसार -सामाजिक सांस्कृतिक अवकाशानुसार प्रामाणिकपणे अर्थार्जन करून ईश्वरस्मरण करण्याची शिकवण ते कळत-नकळत देत असत. स्वतःचे चातुर्मासतपाने तेजांकित झालेले, ब्रह्मसिद्धिरत असे तपस्वी यतिजीवन समाजात प्रामाणिक सत्त्वगुणांची वृद्धी व्हावी यासाठी व्यतीत करण्याकडे व त्याद्वारे लोकोद्धार करण्यावर त्यांचा कटाक्ष कायम असे.

जागेची मर्यादा आणि वेळ याचे भान ठेवत स्वामीमहाराजांविषयीचे हे टिपण इथे थांबवतो. ‘यतो वाचः निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह|" (भावार्थ: ज्या वर्णिता वर्णिता वेद वाणी | म्हणे नेति नेति ती लाजे दुरोनि||) असे भगवती श्रुती ज्यांच्याविषयी म्हणते त्या परब्रह्मस्वरूप सद्गुरुरूपाविषयी लिहिण्याचे अल्पबळ, बुद्धीदेखील त्यांनीच दिलेली आहे. साक्षात समर्थांनादेखील “म्हणौनी सद्गुरू वर्णवेना| हे घे हेचि माझेची वर्णना|” असं ज्याच्याविषयी म्हणावं लागलं त्यासद्गुरुतत्त्वाविषयीच्या ‘अंतर्यामीचिया खुणा' आपल्याला अविरत दिग्दर्शन करत  राहोत आणि परमपूज्य सद्गुरूंच्या परमपावन कृपेची अमृतवृष्टी आपल्यासर्वांवर जन्मजन्मांतरी राहो, हीच श्रीचरणी प्रार्थना ! 

ब्रह्मलीन श्री प. प.  अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे विषयी थोडक्यात :
जन्म : २४/०८/१९२४  श्रावण कृष्ण दशमी रोजीतरुणपणी संघ कार्यात वाहून घेतले.
श्री विद्देची दीक्षा : प. पू. आळवणी शास्त्री यांचे कडून घेतली.
शक्ती-पात दीक्षा : प. पू. योगीराज वामनराव गुळवणी महाराज यांचे कडून घेतली.
रामदासी दीक्षा : प. पू. प्रल्हाद महाराज साखरखेर्डा यांचे कडून घेतली.
अध्ययन : ऋग्वेद, अथर्ववेद प. पू. राजेश्वर शास्त्री द्राविड यांच्या सांगवेद पाठशाळेत काशी, तथा यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे सावरगाव येथील वेद शाळेत झाले.
दंड दीक्षा : श्री प. प. माधवनंद सरस्वती दत्तात्रेयामठ नारदघाट काशी यांचे कडून घेतल्या नंतर स्वामीजींचे झालेले चातुर्मास खालील प्रमाणे.
२०१५ च्या गुरुप्रतिपदेला निर्गुण पादुकांची प्राप्ती गांडगापूर येथे झाली.

स्वामीजींचे झालेले चातुर्मास

कितवा चातुर्मास : कधी झाला, कुठे झाला
पहिला: १९८०, अज्ञातवास
दुसरा: १९८१, पुर्ना जंक्शन (दत्तात्रय सुधाकर पाठक)
तिसरा: १९८२, काशी दत्तात्रय मठ (दंड ग्रहण )
चौथा: १९८३, श्री क्षेत्र कारंजा    
पाचवा: १९८४, अमरावती
सहावा: १९८५, गोंदी(केशवराज मंदिर) ता . अंबड जि. जालना
सातवा: १९८६, अनसिंग श्री राम मंदिर  
आठवा: १९८७, नारेश्वर (रंगावधूत महाराज मंदिर)
नववा: १९८८, कारंजा (खं)
दहावा: १९८९, कर्नाली (गुजराथ) (खं)
अकरावा: १९९०, श्री क्षेत्र माणगाव   
बारावा: १९९१, श्री क्षेत्र केदारेश्वर महादेव प्रकाशा (शहादा)  
तेरावा: १९९२, श्री क्षेत्र कोल्हापूर करवीर पीठ (बारावा, तेरावा चातुर्मासश्री प. प. विद्याशंकर भारती शंकराचार्या समवेत)  
चौदावा: १९९३, श्री क्षेत्र कारंजा
पंधरावा: १९९४, श्री क्षेत्र कारंजा
सोळावा: १९९५, श्री क्षेत्र गरुडेश्वर
सतरावा: १९९६, श्री क्षेत्र कारंजा श्री प. प. नरसिंह  आश्रम स्वामी समवेत
अठरावा: १९९७, श्री क्षेत्र कारंजा श्री प. प. नरसिंह  आश्रम स्वामी समवेत
एकोणवीसवा: १९९८, श्री क्षेत्र कारंजा श्री प. प. नरसिंह  आश्रम स्वामी समवेत
विसावा: १९९९, नाशिक नागपुरे यांचे कडे 
एकविसावं: २०००, नाशिक नागपुरे यांचे कडे
बाविसावा: २००१, नाशिक नागपुरे यांचे कडे
तेवीसावा: २००२, श्री क्षेत्र गरुडेश्वर (खं)
चोविसावा: २००३, जळगाव श्री लक्ष्मी नारायण सदन (श्री नितीन ठोसर यांचे कडे)
पंचेविसावा: २००४, नाशिक प.प. श्री गणेशबाबा समाधी स्थाना समोर
सहविसावा: २००५, नाशिक प.प. श्री गणेशबाबा समाधी स्थाना समोर
सत्ताविसावा: २००६, नाशिक प.प. श्री गणेशबाबा समाधी स्थाना समोर
अठ्ठाविसावा: २००७, नाशिक प.प. श्री गणेशबाबा समाधी स्थाना समोर
एकोणतिसावा: २००८, अहमदनगर  
तीसावा: २००९, अहमदनगर  
एकतीसावा: २०१०, अहमदनगर  
बत्तीसावा: २०११, अहमदनगर  
तेहतीसावा: २०१२, जळगाव श्री लक्ष्मी नारायण सदन (श्री नितीन ठोसर यांचे कडे)
चौतीसावा: २०१३, जळगाव श्री लक्ष्मी नारायण सदन (श्री नितीन ठोसर यांचे कडे)
पस्तीसावा: २०१४, पाली    
छात्तीसावा: २०१५, गायधनी (नाशिक) (खं)
सदोतिसावा: २०१६, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (खं)
अडोतीसावा: २०१७, अहमदनगर (मुकुंदराव नगरकर यांचे कडे)

|| श्री गुरुस्तुती ||

ॐ नमः श्री गुरो तुभ्यं सच्चीदानंदरुपिणे |
अद्वितीयाय दिव्याय श्रीनृसिंह स्वरुपिणे |
नमः श्रीदत्तदेवाय वासुदेवाय ते नमः |
नमः श्रीरंगरूपाय  आत्मरंगीरताय च || २ ||
नमः प्रल्हादरूपाय पांडूरंगाय ते नमः |
 नमः ब्रह्मरूपाय आत्मरूपाय ते नमः || ३  ||
नमः एकरूपाय  बहुरूपाय ते नमः |
नमः शक्ती स्वरुपाय दक्षिणामूर्ती रुपिणे || ४ ||
मंत्रराजो  महाराजा योगिराजो जगत्पते |
सुवर्ण वर्ण सर्वात्मको sसि जगद्गुरू  || ५  ||
योगारिष्टहरं देवं भोगमोक्ष फल प्रदम |
मंगल परमंधामं  श्रीगुरूप्रणाभ्यांम्यहं || ६ ||
भद्रन त्वमेव सर्वत्रं सच्चीदानंद भव्ययम |
प्रसीद देवदेवेश दत्तात्रेय नमो sस्तुते || ७ ||
नमस्ते दिव्यरुपाय नमस्ते बोधमूर्तये |
मंत्रमयाय देवाय अद्वितीयाय ते नमः || ८ ||
इत्येषां मष्टक स्तोत्रेंण संस्तुता श्रीसद्गुरो |
संतुष्टोभव आद्यत्वम  प्रसादम कुरु सर्वदा

|| ॐ शुभम भवतु ||

योगेश्वर वसंतराव कवी, पंचवटी नाशिक