श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज केडगावकर

श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज केडगावकर
श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज केडगावकर

जन्म: २० मे १८८५, शिंदगी, कर्नाटक येथे बागलकोट
आई/वडिल: लक्ष्मी/भिमराव, १४ महिन्याचे असताना वडिल, व ४ वर्षाचे असताना आई वारली
कार्यकाळ: १८८५ ते १९४५
समाधी/निर्वाण: ३ सप्टें. १९४५ मध्ये बेंगलोर येथे, तेथेच लाखो लोक अंत्यदर्शनास, अस्थि केडगावात आणून समाधी मंदीर
विशेष: जुन्या बेटात दत्तपादूका सापडल्या. दत्तमंदीर स्थापना वै. शु. ५ इ. स. १९१३, दत्तमूर्ती शिव प्रधान, १९३६ साली ११०८ सत्यनारायण पूजा

अलौकिक सिध्दपुरुष 

१९व्या शतकातील एक अद्भूत संत म्हणजे केडगांवचे श्री नारायण महाराज!

भीमराव आणि त्यांची सुशील पत्नी लक्ष्मी हे दोघेही श्री शंकराचे नि:स्सीम उपासक होते. त्यांच्या पोटी श. १८०७ ज्येष्ठ महिना षष्ठी-सप्तमी या शुभ तिथीला दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी श्री नारायण महाराज यांचा जन्म कर्नाटकातील नरगुंद गावी झाला. श्री महाराजांच्या जन्माचे वर्णन ‘श्री नारायणलीलामृत’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिले आहे. 

“पूर्ण झालिया नवमास । ते होता अधिक जेष्ठ मास ॥
शुद्ध पक्ष शुभ दिवस । तिथी षष्ठीसह सप्तमी ॥
आश्लेषा नक्षत्र सौम्यवासर । धृवयोग करणगर ॥
पंचांगशुद्धिस्पष्टतर । समय शुभ पातला ॥
शके अठराशेसातास । पार्थिवनाम संवत्सर प्राप्त ॥
एकोणिसघटी सूर्योदयात । तदा श्रीनारायण अवतरे ॥”

(श्री. ना.ली.अ.३रा)

श्री महाराज दत्तावतारी सिद्ध पुरुष होते. ते योगी, महान-राजयोगी, ज्ञानयोगी, कर्मयोगी होते. त्यांचा जन्म अधिक ज्येष्ठ षष्ठीसह सप्तमी, बुधवार दि. २० मे १८८५ रोजी त्यांच्या आजोळी नरगुंद मुक्कामी झाला. वयाचे दुसरे वर्षी वडील श्री. भीमराव व ५व्या वर्षी त्यांचे मातृछत्र ही काळाने हिरावून घेतले. वयाचे ९व्या वर्षी व्रतबंधाचा संस्कार झाला. 

श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज केडगावकर
श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज केडगावकर 

गृहत्याग केल्यानंतर भ्रमंती करीत ते सन १९०० ते १९०१ या काळात गाणगापूर येथे आगमन व वर्षभर तपसाधना केली. प्रत्यक्ष उपास्य दैवत श्री गुरूदत्तात्रेयांनी दर्शन देऊन त्यांना मंत्र दीक्षा दिली. नंतर सन १९०२ ते १९०४ आर्वी व सुपे येथे मुक्काम व त्या काळात तेथील लोकांनी अनेक चमत्कार अनुभवले. 

सन १९०५ मध्ये जुन्या बेटात आगमन. श्री दत्तप्रभुंच्या दृष्टांताने औदुंबराखाली धरतीच्या पोटातील पुष्पपूजांकित सुवासिक पादुकांचे दर्शन झाले. त्यानंतर थोड्याच काळात नवीन बेटाच्या जागेच्या शोधात राहून जागा खरेदी केली. निवडुंगाच्या रानात नंदनवन फुलवून पावित्र्य व मांगल्याचा संचार करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल केली व गुरूमंदिर बांधले. 

जन्म व बालपण 

या बालकाच्या जन्मामुळे मातापित्यासह सर्वांना अतिशय आनंद झाला. निष्णात ज्योतिष्याना बोलावून नवजात बालकाची कुंडली करण्यात आली. आणि केवळ भूतलावरील आपले नियोजित कार्य करण्यासाठीच, जगाच्या कल्याणासाठीच त्या बालकाचा जन्म होतो हे सिद्ध झाले. तेव्हा अवतारी पुरुष नियतीने नेमून दिलेले कार्य करण्यासाठी मानव जातीत जन्म घेतात, तेव्हा त्यांना इतर सामान्य जीवाप्रमाणे देह धारण करावा लागतो. साहजिकच जीवनातील चढउतार, सुखदु:खे, अपेक्षा, उपेक्षा, अकस्मित संकटे या सर्वांना तोंड द्यावे लागते. जीवनातील अपरिहार्य असलेल्या आधिव्याधींचे निवारण करावे लागते. बाह्यात्कारी सामान्य देहधारी व्यक्ती आणि ईश्वरी कार्य करण्यासाठी जन्माला आलेला दैवी पुरुष यांच्यात वर वर फरक जाणवत नसला तरी तो फरक आंतरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, वैचारिक स्तरावर मात्र निश्चित असतो. त्यांच्या जीवनात घडत जाणाऱ्या घटनांमधून, चमत्कारांमधून त्याचे दर्शनही घडते. नारायण महाराजांना पितृवियोग झाला त्यावेळी ते फक्त चौदा महिन्यांचे होते. तर वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना मातृवियोगही सहन करावा लागला. नंतर या चार वर्षाच्या लहान मुलाचा सांभाळ त्याची आजी (आईची आई) हिनेच केला. आजीच्या प्रेमळ छत्राखाली नारायणाचा जीवनक्रम चालू होता. समवयस्क सवंगड्यांसह तो लपंडाव, विटी-दांडू, हुतूतू, खोखो, चोर-शिपाई इ. खेळ खेळत असे. पण या सर्व खेळांपेक्षा नारायणाचे मन बालवयातही ध्यानात अधिक रमत असे. घराजवळ असलेल्या व्यंकटेशाच्या देवळात एकांतात बसून तो ध्यान लावून बसत असे. त्यांच्या शेजारीच श्रीधरपंत घाटे यांच्यासारख्या वैदिक ब्राह्मणाच्या मांडीवर श्री महाराजांची मुंज लागली. त्यांना गायत्रीमंत्राचा उपदेश मिळाला. द्विजत्व प्राप्त झाले. गायत्री साधना करण्याचा अधिकार मिळाला.

व्रतबंध झाल्यानंतर श्री महाराजांची गायत्री साधना अतिशय नियमितपणे सुरू झाली. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे, संध्यावंदन, गायत्री जप, सूर्योदयापूर्वी आणि सूर्योदयानंतर अर्ध्यप्रदान, सूर्यनमस्कार, श्री गुरुचरित्राचे वाचन, गायत्रीमंत्राचे अनुष्ठान असा नित्य उपासनाक्रम सुरु झाला. अर्ध्यप्रदान करण्याच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर आणि तितकेच कठोरही होते. कारण या बाबतीत जर काही चुकले तर ते त्या दिवशी उपवास करीत. अन्नग्रहण करीत नसत. त्यांचे भोजन अतिशय साधे असे, थोडेच असे. पण जेवणात साजुक तुपाशिवाय त्यांचे चालत नसे. साजूक तुपाची त्यांना अतिशय आवड होती. या वयापासूनच त्यांनी श्री सत्यनारायणची पूजा करण्याचे व्रतही सुरू केले. पुढे काही क्षुल्लक कारणावरून आजीशी वाद होऊन त्यांनी गृहत्याग केला. पुढील प्रवासात त्यांच्या सोबतीला होते त्यांचे आराध्य दैवत श्री दत्तगुरु, त्यांचे अव्याहतपणे चालणारे नामस्मरण. श्री दत्तगुरुंच्या नामस्मरणात तल्लीन होऊन ते आपला प्रवास करीत होते. प्रवास करता करता यल्लामाच्या डोंगरावर त्यांना रेणुकेचे दर्शन झाले. एका तपस्विनीची भेट झाली. त्यांचे लहान वय पाहून तिने त्यांची चौकशी केली. पण श्री महाराज दत्तभक्तीने ओथंबलेले होते. 

“माझा माता पिता श्री दत्त । तोचि मजप्रती पाळीन ॥
तयाचा आद्रीत मी असे । मज दिला एक आधार । दत्तनाथ जगदिश्वर ॥
जनी मनी निरंतर । तोचि माझा रक्षिमा ॥

(श्री. ना.ली. अध्याय ५वा) 

त्या तपस्विनीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन, तसेच यल्लम्मा डोंगरावरील रेणुकामातेचे दर्शन घेऊन महाराज पुढील प्रवासास निघाले. पुढे विठ्ठलमंदीर, शिवमंदीर असा त्यांचा प्रवास सुरु होता. ज्या शिवमंदिरात त्यांचे वास्तव्य होते ते मंदिर शिवाचे अतिशय जागृत स्थान होते. त्यामुळे तेथे शिवदर्शनासाठी प्रत्यक्ष देव, गंधर्व, किन्नर, अप्सरा अशा मानवेतर योनीमधील विविध व भारलेल्या अशा वातावरणाची निर्मिती त्या शिवमंदिरात होत असे. नित्य प्रवासातही त्यांची स्नानसंध्या अर्घ्यप्रदान हा उपासनेचा कार्यक्रम खंड न पाडता चालू असे. अशा एका प्रवासातच त्यांना एका घोडेस्वाराच्या रुपाने श्री दत्तमहाराजांनी दर्शन दिले. त्यांच्यावर कृपावर्षाव केला. त्यांचा प्रवास अखंड चालू असे. एके ठिकाणी फारसे वास्तव्य नसे.

१९१५ मध्ये श्री महाराजांनी काशी-नेपाळ यात्रा केली. सन १९२२ मध्ये भजन कीर्तनासाठी प्रासादिक वास्तुचे बांधकाम झाले. (सध्या या ठिकाणी महाराजांची समाधी आहे.) सन १९२७-२८ साली श्री वसनजी शेट यांनी अर्पण केलेली सोन्याची दत्तमूर्ती दत्त मंदिरात स्थापित केली. त्यावेळी पहिले अतिरूद्र अनुष्ठान झाले. सन १९३०मध्ये श्री महाराजांनी श्री सत्यनारायणाच्या १०८ पूजांचा प्रथम सोहळा केला. सन १९३३ मध्ये श्री महाराजांनी न भूतो न भविष्यती असा ११०८ श्री सत्यनारायणाच्या महापूजांचा विलोभनीय सोहळा संपन्न केला. सन १९३६ साली मार्च महिन्यात दर तासाला १०८ श्री सत्यनारायणाच्या पूजा अहोरात्र एक सप्ताहभर झाल्या. त्यानंतर श्रींनी भारत भ्रमण करून सर्व तीर्थयात्रा सन १९३७ ते ४३ मध्ये केल्या. सन १९४४ साली बेटात महामृत्युजंय अनुष्ठान झाले. १९४५ साली महाराजांनी बंगलोरला प्रयाण केले. तेथे श्रावण वद्य द्वादशी सोमवारी अतिरूद्र स्वाहाकार अनुष्ठान झाले व सायंकाळी ५ वाजता श्री सद्गुरू नारायण महाराज श्री दत्त चरणी विलीन झाले. लौकिक जगतातील अलौकिकत्व अंतर्धान पावले. महिमामय सगुण साकार निर्गुणांत एकरूप झाले.

या प्रवासातच ‘गुलर्हसूर’ येथे चिदंबरस्वामींनी बांधलेल्या शिवमंदिरात त्यांची एका यतीशी भेट झाली. ते यतीमहाराज अधिकारी पुरुष होते. त्यांची अंतदृष्टी विकसित झालेली होती. महाराजांच्या हातावरील, ललाटावरील अनेक शुभचिन्हे पाहिल्यावर त्या यतीमहाराजांनी महाराजांना त्यांचे भविष्य सांगितले. ते म्हणाले, “बाळ! तू सर्वांना पूज्य होशील. तुझे जीवन वैभवसंपन्न, छत्रचामरयुक्त असे राहील. पालखी, घोडागाडी, शेत, जमीनजुमला असे सर्वप्रकारचे वैभव तुझ्या पायाशी अक्षरश: लोळण घेईल. राजे, महाराजे यांना जे भोग, ऐश्वर्य मिळत नाहीत ते तू उपभोगशील. श्री दत्तकृपेने राजवैभव असलेले श्रीमंत सावकार तसेच ज्ञानसंपन्न विद्वान अधिकारी हे तुझी सेवा करण्यासाठी हात जोडून उभे राहतील. या भूमीवर तुझ्या नावाची एक नगरी वसेल. तेथे तू मोठमोठे यज्ञयाग, अन्नसंतर्पणे करशील. श्री दत्ताच्या कृपा प्रसादाने जेथे तुझा निवास राहील तेथे श्रीलक्ष्मीचाही निवास राहील. तुझ्या हातून अन्नदानाचे महत्पुण्य सतत होत राहील. गोरगरीबांची सेवा करून तू धर्मजागरणाचे आणि धर्मरक्षणाचे कार्य करशील. तेच तुझे नियत असे ईश्वरी कार्य आहे.” यानंतर पुणे, बोपवाग येथे काही दिवस मुक्काम करून ते आर्वीला मृदगलेखराच्या सान्निध्यात तपाचरण चालू असताना एके दिवशी श्री महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला. ईश्वरानेच विप्रवेशात त्यांना आदेश दिला की, ‘तू गाणगापूरला जाऊन श्री दत्तात्रेयाच्या सेवेत नित्य रहा.” 

श्री दत्तसंप्रदायात श्रीक्षेत्र गाणगापूरचे एक आगळेवेगळे असे माहात्म्य आहे. श्री दत्तावतार नृसिंहसरस्वती यांची ही विशेष लीलाभूमी आहे. अशा या गाणगापूर या सिद्ध क्षेत्रात श्री महाराजांच्या तप:पूर्ण जीवनास प्रारंभ झाला. 

केडगांव बेट दत्तमंदिर
केडगांव बेट दत्तमंदिर

केडगांव बेट दत्तमंदिर

श्रीदत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन खोल्या. तेथे पहारेकरी आणि पूजा साहित्य ठेवण्यासाठी वापर केला जातो. देवळाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या खांबावर अत्री ऋषी व उजव्या खांबावर सती अनसूया यांच्या सुंदर मूर्ती आहेत. त्यानंतर भव्य सभामंडप ज्याची लांबी २५ फूट, रुंदी १६ फूट व उंची १५ फूट अशी आहे. यात भव्य असे आठ खांब आहेत. उजव्या बाजूच्या चार खांबांवर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह या अवताराच्या मूर्ती तर डाव्या बाजूच्या चार खांबांवर वामन, परशुराम, प्रभु रामचंद्र आणि आठवा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण यांच्या सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. दर्शनी दारावर शेषशायी श्री नारायण पहुडले असून त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव उदित झालेले आहेत. माता लक्ष्मी श्री नारायणांची सेवा करते आहे. आणि नारद-तुंबरु यशोगान करीत आहेत अशा देखाव्याचे कोरीव काम आहे. पुढे उजव्या बाजूने प्रदक्षिणेच्या मार्गावर रामपंचायतन-दक्षिणाभिमुख हनुमंत, उत्तराभिमुख कुबेर आहे. डावीकडील खांबांवर धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या पाच पांडवांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या उर्ध्वभागी तपस्वी, ऋषी, बैरागी, सिद्ध, साधक यांच्या प्रतिमा आहेत. शिखरावर देवी सायुध सज्ज आहे. सभामंडपानंतर सुंदर व उत्कृष्ट गाभाऱ्याच्या प्रवेश द्वारावर रमामाधवाच्या मूर्ती उत्तर-दक्षिण अशा असून तसेच त्या क्रमाने जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. द्वारावर श्री वरदलक्ष्मी गजांसह उभी असून हातात अमृत कलश आहे. उत्तरेला हनुमान, दक्षिणेस महागणपती परस्परांच्या सन्मुख सुबक आहेत. गर्भगृहाच्या बाहेर प्रदक्षिणेच्या मार्गावर यम, वरूण, कुबेर या अनुक्रम दक्षिण, पश्चिम, उत्तर या दिशांना स्थापित देवता आहेत. 

या दत्त मंदिराचे शिखर भव्य असून ८० फूट उंच आहे. शिखराच्या चारीही दिशांकडे चार दिव्य देवतांची श्री गुरूदत्तात्रेयांच्या उपदेवतांची शास्त्रशुद्ध प्रतिष्ठापना केली आहे. त्या त्या संकल्पनेप्रमाणे त्या त्या देवतांची प्रतिष्ठापना करून त्यांची शिखरे यम, वरूण, कुबेर यांच्या डोक्यावर येतील अशी छोटी तीन शिखरे अशा सुंदर कलात्मक पद्धतीने अंतराळात झेपावणारे ते शिखर दृष्य दुरून येणारांचे लक्ष त्वरित आकर्षित करून घेते. शिखरावरील ध्वजस्तंभाच्या पूर्व-पश्चिम दिशांना सूर्य, चंद्राच्या प्रतिमा आहेत.

सर्वप्रथम शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण मंदिराचे वास्तुपूजन, वास्तुपुरुष स्थापना आणि आवश्यक विधी पूर्ण झाल्यानंतर वैशाख शुद्ध पंचमी शके १८३५ रविवार दि. १ मे १९१३ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे निश्चित झाल्यानंतर वैशाख शु. प्रतिपदा, बुधवार ते वैशाख शु. चतुर्थी शनिवारपर्यंत सर्व शास्त्रोक्त विधी, अनुष्ठाने आदि शंकराचार्यांच्या जयंतीच्या दिवशी रविवारी पूर्ण करण्यात आली. श्री सद्गुरू नारायण महाराजांच्या हस्ते श्रीदत्त मूर्तीची नियोजित शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. असा हा सोहळा वैशाख शु. षष्ठी सोमवारच्या अवभृथ स्नानाने संपन्न झाला. केडगांव बेटात श्री दत्त मंदिर बांधण्याचे महाराजांचे स्वप्न पूर्ण झाले. 

श्री दत्त मंदिरातील नित्य कार्यक्रम 

श्री सद्गुरू महाराजांनी सर्व दत्त संप्रदायी परंपरांचा समावेशक अशा पद्धतीने नित्य दैनिक पूजा विधीची पद्धत बसवून दिली आहे. रोज सकाळी ५.०० वाजता सुमधूर घंटानादानंतर पंचामृत पूजेनंतर श्रींच्या पादुकांवर रुद्राभिषेक सुरू होतो. त्रिकाळ पूजा असते. प्रत्येक पूजेच्यावेळी एकादशणी असते. पादुका व उत्सवमूर्ती यांची षोडशोपचार पूजा, एकादशणी व नैवेद्य असतो. दुपारी माध्यान्ह पूजा सुमारे १० वाजता असते. अन्नपूर्णेत महानैवेद्य आणण्यासाठी पुजारी जातात तेथे वैश्वदेव करुन वास्तुपुरुष व अन्नपूर्णेस नैवेद्य समर्पण करून देवळात नैवेद्य आणून तो समर्पण करून आरती होते. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दर्शनासाठी गाभारा बंद असतो. तिसरी सायंपूजा ६.३० वाजता सुरू होते. धूपारती, नैवेद्य, आरत्या, मंत्रपुष्प, चार वेदांचे मंत्रोच्चारण, नारायण उपनिषद वगैरे २०-२५ मिनीटे चालतात. नंतर देवांची दृष्ट काढली जाते व शेजारती होते. शेवटी गाभारा व सभामंडप धुण्यात येतो व मंदिर बंद करतात. दर गुरुवारी संध्याकाळी ८च्या सुमारास श्रींची पालखीतून मिरवणूक काढली जाते, गाणगापूर येथील काही पद्यांचा समावेश आहे.

वार्षिक नैमित्तीक कार्यक्रम 

1.     श्रींचे जुने बेटात पादुका अविष्कार दिन पूजा:     आषाढ शु. १०
२.    चातुर्मासारंभ शयनी एकादशी:     आषाढ शु. ११
३.    श्रीनारायण महाराज पुण्यतिथी:     श्रावण व. १२
४.    गुरूपौर्णिमा गुरूपूजन:     भाद्रपद शु. १५
५.    विजया दशमी दसरा पालखी सीमोल्लंघन :    अश्विन शु. १०
६.    प्रबोधिनी एकादशी:     कार्तिक शु. ११
७.    तुलसी विवाह:     कार्तिक शु. १२
८.    चातुर्मास समाप्ती दहीहंडी काला व कीर्तन:     कार्तिक शु. १३
९.    श्री समाधी वर्धापन दिन:     मार्गशीर्ष शु. १० 
१०.    श्रीदत्त जन्मोत्सव व कीर्तन प्रारंभ:     मार्गशीर्ष शु. ११
११.    श्री दत्त जयंती कीर्तन समाप्ती:     मार्गशीर्ष शु. १५
१२.    श्री दत्त जयंती पारणे भंडारा:     मार्गशीर्ष व. १ 
१३.    श्री दत्तमहाराज पाऊलघडी पूजन कीर्तन:     मार्गशीर्ष व. १
१४.    मकर संक्रात चातुर्मास जपसंख्या अर्पण:     पौष व. १०
१५.    महाशिवरात्र चारीयाम पूजा व भजन इ:.     माघ व. १४
१६.    श्री दत्तमूर्तीस्थापना उत्सव कीर्तन प्रारंभ:     वैशाख शु. १ ते ४
१७.    श्री दत्तमूर्तीस्थापना उत्सव दिन:     वैशाख शु. ५ 
१८.    श्री नारायण महाराज जयंती:     ज्येष्ठ शु. ७

चातुर्मासातील श्रींच्या श्रीसत्यनारायण महापूजा (सायंकाळच्या)

१.    आषाढ पौर्णिमा पूजा:     आषाढ शु. १४
२.    श्रावण पौर्णिमा पूजा:     श्रावण शु. १४ 
३.    भाद्रपद पौर्णिमा पूजा प्रथेप्रमाणे अनंद चतुर्दशीस:     भाद्रपद शु. १४
४.    अश्विन पौर्णिमा पूजा व कोजागिरीपूजा:     अश्विन शु. १४ 
५.    कार्तिक पौर्णिमा पूजा:     कार्तिक शु. १५ 

श्रीदत्तस्मरणं

वाटे मज माझे भस्म व्हावे....श्री दत्त अंगी चर्चिले जावे...
वाटे मज मी कृष्णेचे जल व्हावे..श्री दत्त अंगी स्नपन व्हावे..
वाटे मज मी चंदन ते व्हावे....श्री दत्त पादुकांवरी लेपले जावे..
वाटे मज मी जपमाळ व्हावे...श्री दत्त नाम मजवरी जपले जावे.
वाटे मज मी षडशास्त्र व्हावे...श्री दत्त हस्ते मी सतत रहावे....
वाटे मज मी वेद ते व्हावे....श्री दत्त पदांशी श्वान होऊन रहावे...
वाटे मज मी कामधेनु व्हावे..श्री दत्त संकल्पे सेवेत रहावे...
वाटे मज मी औदुंबर व्हावे...श्री दत्त छायास्वरूप व्हावे.....
प्रभू निरंतर मी तव दास असावे..श्री दत्तकृपा हेचि वरदान द्यावे.

golden datta murti- Kedgaon
पूर्ण भरीव सोन्याची दत्त मूर्ती

सोन्याची दत्त मूर्ती

सादर दत्त मूर्ती पूर्ण भरीव सोन्याची साडेतीन किलो हिरे माणिक मोती जडलेली  आहे.

१९१२ साली वसंत शेठ दासानी (कलकत्ता ) यांनी नारायण महाराज (नारायण बेट केडगाव) यांना भेट दिली.

ती सुरक्षेच्या कारणास्तव बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे लॉकर मध्ये असते. मार्गशीर्ष महिन्यात  दत्तजयंतीपूर्वीच्या सप्ताहात येणाऱ्या गुरुवारी ही मूर्ती बाहेर काढतात. बँकेतच पूजा अर्चा होते सर्व विश्वस्थ असतात. सकाळपासून दुपारपर्यंत ही मूर्ती  भक्तांच्या दर्शनास उपलब्ध असते. शेकडो भक्त दर्शनाची ही दुर्मिळ संधी सोडत नाहीत.

श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्ट बेट

केडगाव, तालुका दौड, जिल्हा पुणे 412203. 
मोबाईल 7588955040 /41 .
पुणे मोबाईल  9822595139 .  

बँक डिटेल्स:  

बँक ऑफ महाराष्ट्र केडगाव
अकाउंट : 20144659324
IFSC कोड: MAHB 0000171