सत्पुरुष: श्री कृष्णनाथ महाराज
जन्म- १८८२
देहावसान- १९८९
जन्म गाव- वडगाव-आनंद, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र
स्थापना-
१. श्री आदिनाथ दत्त मंदिर, ता. तासगाव, जि. सांगली, महाराष्ट्र
श्री चरित्र
श्री कृष्ण महाराज यांच्या बाबत काही ठराविक घटना लोकांना माहीत आहेत, त्यांच्या लहान पण तसेच त्यांचा जीवनक्रम फारसा असा लोकांना माहीत नाही. ते एक थोर गुरू भक्त होते तसेच भगवान दत्तात्रेय त्यांचे आराध्य दैवत, श्री आदिनाथ सांप्रदायाच्या गुरू परंपरेतील होते,
श्री सद्गुरु कृष्णनाथ महाराज त्यांच्या तारुण्य अवस्थेत असताना मुंबईत वरळी येथील टिकमदास गिरणीत काम करत होते इथेच त्यांना सद्गुरु लाभ झाला. टिकमदास गिरणीच्या गाडी खात्यातच महाराजांना सद्गुरु म्हणून श्री मनु महाराज गिते-ओतूर मिळाले त्यातच दुग्ध-शर्करा योग म्हणजे मनु महाराजांचे सद्गुरु व कृष्ण महारांचे परमगुरु श्री लक्ष्मण महाराज फाळके हे एकाच ठिकाणी कामास होते, १९१० चा काळ असावा. खुपच भाग्यवान असा शिष्य ज्याला सदगुरु आणि परमगुरु यांच्या एकत्रित सानिध्यात अध्यात्म शिकण्यास मिळते.
दिक्षेवेळी ज्या गोष्टी मनु महाराजांनी सांगितल्या होत्या त्या न खंड पडता नियमित करत, जसे ब्रम्ह मुहूर्तावर नासाग्रदृष्टी ध्यान, श्री दत्त नामस्मरण, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन ई.
एके दिवशी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टी काढून गावी जाण्याचे ठरविले. सुट्टी मंजूर ही झाली. मात्र अडचण एकच होती ती म्हणजे सद्गुरुंची परवानगी. गेले मनु महाराजांकडे पण बोलण्याचे धाडस होईना ! तेव्हा अतर्ज्ञानाने मनु महाराजांना कळाले व त्यांनीहि बरोबर येत आहे असे सांगितले. हे ऐकून कृष्ण महाराजांना ही आनंद झाला तेव्हा दोघेही गुरु-शिष्य गावी आले, घरी आले. आजुबाजुचे लोक घरी भेटायला आले. तसेच त्यांचे गावातील मित्र मंडळीही आली. चर्चेत रात्री तमाशाला जायचा बेत ठरला. याची घरात बिलकुल वाच्यता केली नाही. पण कृष्ण महाराजांचे सद्गुरु हे खरे अंतर्ज्ञानी. त्यांनी ओळखले की पाऊल वाकडे पडू शकते, म्हणून शिष्याला वळणावर आणण्यासाठी त्यांनी ही तमाशाला येत आहे असे सांगितलं. गुरुंच्या हट्टापुढे काही एक चालले नाही. गेले तमाशाला ! आणि तिथे पोहोचल्यावर अचानक मनु महाराजांनी नकार दिला व बाहेरच थांबतो असे म्हणाले. कृष्ण महाराज आपल्या मित्रांबरोबर आत तमाशा पाहायला गेले. ४-५ तास झाले ईकडे मनु महाराजांना भुक लागली होती. थोड्या वेळाने कृष्ण महाराज आले व बैलगाडीत बसलेल्या मनु महाराजांना न विचारपूस करता त्यांना घेऊन घरी आले. घरी आल्यावर मनु महाराज भडकले व कृष्ण महाराजांच्या भार्या माई यांस म्हणाले की "मुली याला ७ दिवस जेवण देऊ नकोस हा आदेश आहे आमचा, बघू कसा तमाशा बघतोय ते". अपराध लक्षात आला, व गुरु आज्ञा शिरसावंद्य मानली. प्रायश्चित म्हणून ७ दिवसाचे एक प्रकार चे चांद्रायण व्रतच शिष्याकडून करवून त्यास शुध्द केले. कारण एखादा शिष्य परमार्थ करत असताना जर का तो विपरित वळणावर जात असेल तर तिथे गुरुंची जबाबदारी असते त्याला पुन्हा पूर्व मार्गावर आणण्याची, जी जबाबदारी मनु महाराजांनी घेतली. ७ दिवस उपवास घडला कृष्णमहाराजांना ! आणि ८ वे दिवशी मनु महाराजांनी माईंना (कृष्ण महाराजांच्या पत्नी) आदेश दिला की "मुली आता पंचपक्वान्न बनवून माझ्या पोराला खायला घाल!" हा आवाज कानी पडताच माईंच्या डोळ्यांत पाणी आले. कोणत्या स्त्रीला बरं वाटेल आपला नवरा ७ दिवस उपाशी असतो तेव्हा? गुरू-शिष्य दोघेही जेवले आणि मग कृष्ण महाराज मनु महाराजांचे दर्शन घेताना मनु महाराज म्हणाले की "तु आता पुर्ण झालास, आता माझ्या सारखा होशील आणि लोकांना शिष्य करुन मार्गदर्शन करशील. आता जास्त काळ मुंबईत राहू नको बाहेर पडावे!"
त्यांची कर्मभूमी हातनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे आहे.
श्री कृष्ण महाराज मुंबई सोडून आपल्या पत्नी श्री माई यांच्या सह सोलापूर ला राहू लागले .तेथील एका गिरणीत काम करू लागले. कामासह रोजच्या दिनचर्येत परमार्थ तर सुरुच होता ध्यान धारणा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन,नामस्मरण,गुरू ध्यान होत असे. श्री दत्त नामस्मरणासह अधूनमधून श्री गुरूचरित्र या ग्रंथाची पारायणे ही होत. असेच मार्गक्रमण करित असता आनंदाची चाहूल लागली,
श्री कृष्ण महाराज मुंबई सोडून आपल्या पत्नी श्री माई यांच्या सह सोलापूर ला राहू लागले .तेथील एका गिरणीत काम करू लागले. कामासह रोजच्या दिनचर्येत परमार्थ तर सुरुच होता ध्यान धारणा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन,नामस्मरण,गुरू ध्यान होत असे. श्री दत्त नामस्मरणासह अधूनमधून श्री गुरूचरित्र या ग्रंथाची पारायणे ही होत.वर्षातून एकदा गाणगापूरची वारी होत असे. असेच मार्गक्रमण करित असता आनंदाची चाहूल लागली.
महाराज्यांच्या पत्नी माई यांना दिवस गेले होते पण हा आनंद फार काळ टिकला नाही मुलगा झाला पण मृत! माई आणि बाबांवर दुःखाचे आभाळच कोसळले. या दुःखातही महाराज धीर गंभीर राहून माईंचं सांत्वान करत होते. एके दिवशी दोघां ही उभयतांनी उर्वरित आयुष्य संन्यस्त राहून जगायचा निर्णय घेतला व गावाकडील आपल्या हिस्स्याची जमीन पुतण्याच्या नावे करून श्री क्षेत्र गाणगापूर गाठले. तेथे काही दिवसांनी महाराजांचे अनुग्रहीत शिष्य शिरोमणी हैबती बुवा आले व महाराज दिसताच त्यांच्या चरणावर पडले आणि म्हणाले "बाबा कुठे गेला होता आम्हाला सोडून? खुप शोधले तुम्हाला पण नाही सापडलात. तुम्ही या जगात नाही आसे समजून आम्ही आपले श्राध्द घालत होतो" यावर महाराज म्हणाले "मग त्यात वाईट काय?" बुवा म्हणाले "असे बोलू नका आपणांस न्यायला आलोय कृपया आमच्या गावी चलावे" महाराज म्हणाले" आता हे गाणगापूरच आमचं घर आता ईथं दत्ताच्या श्री चरणी राहू" हैबती बुवांनी व ईतर शिष्यांनीही हट्ट सोडला नाही शेवटी नाही होय करता हैबती बुवांच्या गावी खानापूर, जि. सांगली येथे येण्यासाठी महाराजांना राजी केले.
हैबती बुवा व शिष्यांच्या हट्टापायी महाराज खानापूर, सांगली येथे आले. मठासाठी जागा शोधण्यास सुरवात व मौजे मोही-शेंडगेवाडी येथे माळरानावर एका भक्ताने जागा दिली. काही दिवसातच दत्तमंदीर व सत्यनारायण मंदीर बांधून झाले पण सभामंडप राहिला बांधायचा. महाराज व त्यांच्या पत्नी मंदीराजवळच छोट्याशा घरात राहू लागले. एक दिवस पट्टशिष्य हैबती बुवां व इतर शिष्यांसह महाराज एका शिष्याच्या घरी जात असता वाटेत एक नाग आला महाराजांनी नुसतं त्याच्याकडे पाहिले तर जागीच स्तब्ध झाला तेव्हा हैबती बुवांनी त्याला परत येई पर्यंत तिथेच राहायला सांगितलं. काही वेळाने महाराज व शिष्यगण त्याच वाटेने आले तर तो नाग आहे तसाच स्तब्ध होता हे पाहून महाराज हैबती बुवांना रागावून म्हणाले अरे कशाला उगाच त्याला त्रास देतोस जाऊ दे त्याला मग हैबती बुवा जा म्हणाल्यावर तो नाग गेला. ईथे एक गोष्ट सांगाविसी वाटते की महाराजांनी हैबती बुवांसारखे असे बरेच सामर्थ्यवान शिष्य घडवले होते. कधी कधी महाराजांचे बोलणे गुढ असे व ते भविष्यत गोष्टीशी निगडीत असे. नेहमीच धीर गंभीर स्वभाव असे. एखादी गोष्ट नाही पटली की पुन्हा फिरकून पाहत नसत. मोहीतील मठात वास्तव्यास असताना जागेच्या मालकाच्या काही गोष्टी खटकल्याने जे आहे ते तिथेच ठेऊन श्री क्षेत्र गाणगापूर गाठले आणि तेथे तब्बल ४० दिवस अनुष्ठान केले. मग दत्तगुरूंनी दृष्टांत दिला आणि सांगितले "तू जा परत काही लोक तुला मोही येथे न्यायला येतील त्यांच्या गावी जा, मी जिथे उभा राहीन तिथे तुझ्या ईच्छे प्रमाणे मठ निर्माण होईल व नावारूपाला येईल. मी तुला साह्य होईन".
श्री दत्त आज्ञेने महाराज गाणगापूरहून खानापूर येथील मठात आले. पाहतात तर हातनोली (तासगाव तालुक्यातील एक गाव) गावातील महाराजांचे काही शिष्य महाराज व माईंना न्यायला आले होते. मठातील श्री दत्त व श्री सत्यनारायण यांचा अखेरचा निरोप घेऊन हातनोलीचा प्रवास सुरू झाला. मनात बरेच प्रश्न होते की कसे पुन्हा नव्याने सुरवात होणार? श्री दत्त महाराजांच्या मठाचे निर्माण कसे होणार ? पण चिंता कसलीच नव्हती कारण श्री दत्तगुरुंवर पुर्ण श्रध्दा होते. श्री दत्तांनी पाठविले आहे म्हणजे मठ उभारणीचा संकल्प श्री दत्तच सिध्दीस नेतील अशी खात्री सुद्धा होती. गावातील एका सदभक्ताने मठास जागा दिली. जागोजागी शिष्यांच्या भेटीसाठी दौरे सुरु झाले. महाराष्ट्रात जिथे जिथे महाराजांचे शिष्य होते तिथे स्वतः महाराज याआधीही जात होते. प्रत्येक शिष्याच्या घरी भेट देत त्यांचे क्षेम कुशल विचारीत, अध्यात्मिक मार्गदर्शन करित, प्रत्येकाच्या योग्यतेनुसार समस्येवर उपाय सांगत. पण यावेळी दौऱ्याचे विशेष प्रयोजन होते ते म्हणजे श्री दत्त मठाची उभारणी. १९६१ ते ६२ च्या दरम्यान मठ बांधून झाला. १९६१ पासून दरवर्षी माघ वद्य प्रतिपदेस अखंड हरिनाम सप्ताह उत्सव सुरू केला. सप्ताह संपल्यावर श्री माई व शिष्यांसह गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर यात्रा करत.
आजही दरवर्षी ही यात्रा केली जाते. दत्त महाराजांच्या कृपेने महाराज जे बोलत ते खरे होत असे. बहुदा त्यांचे बोलणे गुढ व भविष्यत गोष्टींशी संबंधित असे. महाराजांचे शिष्य भेटींचे दौरे सुरु असताना किती एक भक्तगण दीक्षेसाठी याचना करत पण प्रत्येकाची अध्यात्मिक तयारी व उचित काळ पाहूनच दीक्षा देत. पुर्ण महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य होते व आहेत. महाराज दौऱ्यावर सतत असल्याने इथे मठात श्री माई (महाराजांच्या पत्नी ) एकट्याच असायच्या महाराराजांच्या हे लक्षात आले, श्री दत्तांना मनोमन सांगितलं लगेच श्री दत्तांनी श्री माईंच्या रक्षणार्थ दोन केशमय नागांची नियुक्ती केली. आजही या नागांची प्रतिकात्मक प्रतिमा महाराजांच्या पवित्र समाधी शेजारीच आहे. असे म्हणतत की हे नाग एखाद्या पुण्यवंतालाच दिसतात. सर्व काही व्यवस्थित सुरु होते पण अचानक प्रकृती बिघडली आणि निमित्त झाले, १९८९ साली म्हणजे वयाच्या १०७व्या वर्षी महाराजांनी देह ठेवला.
महाराजांच्या पश्चात श्री माईंनी १९८९ ते २०१८ पर्यंत श्री आदिनाथ सांप्रदायाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सर्व शिष्यांना मायेने सांभाळून सांप्रदाय वाढीस लावला. श्री माईंबद्दल सांगायचे झाले तर त्या जितक्या प्रेमळ होत्या तितक्याच कठोर व शिस्तबद्ध होत्या. एखादी गोष्ट नाही पटली की तिथेच स्पष्ट नाही म्हणायच्या. मंदीरात एखादा भक्तगण श्री दत्तांना साकडे घालताना दिसला की कडाडून बोलायच्या. नवस, साकडे या गोष्टींची चीड होती त्यांना. आजही याठिकाणी काहीही न मागता ईथे येणाऱ्यांच्या ईच्छा पुर्ण होत आहेत. अशा आमच्या माई २०१८ साली सांप्रदायाची जबाबदारी श्री सावंता माळी महाराज व काही शिष्यांवर सोपवून सर्वांना पोरकं करुन सोडून गेल्या.
संपर्क
श्री सावंता माळी महाराज
श्री आदिनाथ दत्त मंदीर,
मु. पो. हातनोली,ता. तासगाव, जि. सांगली, महाराष्ट्र, भारत.
साधकांच्या सोयीसाठी माहिती -
१. राहण्याची व जेवणाची व्यवस्था नाही.
२. दीक्षाविधी नियोजनानुसार होतात
गुरू परंपरा -
श्री आदिनाथ
मत्सेन्द्रनाथ
गोरक्षनाथ
गहिनीनाथ
निवृत्तीनाथ
ज्ञाननाथ (संत ज्ञानेश्वर महाराज)
सत्यामलनाथ
गैबीनाथ
गुप्तनाथ
उदबोधनाथ
केसरीनाथ
शिवदीनकेसरी
सोहिशेबानाथ अंबिये
रामनाथ बाबा
गोपाळनाथ
लक्ष्मण महाराज फाळके
मनु महाराज गिते - ओतूर, पुणे
श्री कृष्णनाथ महाराज दुमणे