बडोद्याचे स्वामी समर्थ संस्थान

स्थान: बडोद्यातील सुखसागर घाटावर स्थान.
सत्पुरूष: ब्राम्हनिष्ठ वामनराव वामोरीकर.
विशेष: श्री स्वामी समर्थांचे प्रागट्याचे प्रतीक, श्री स्वामींच्या पादुका.

बडोद्यातील सुरसागर, पश्र्चिम घाटावर एका लहानशा घुमटीत श्री स्वामीसमर्थ यांच्या पादुका आज कित्येक वर्षांपासून स्थापन केलेल्या आहेत. अक्कलकोट स्वामीमहाराजांचे एक निस्सिम भक्त ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वामोरेकर (बडोदेकर) हे बडोद्यास सुरसागराचे काठी सुदाम्याचे घरात राहत होते. एकाच वेळी अनेक व्याधींनी त्यांची प्रकृती फार बिघडली. वाचण्याची आशा नसल्यामुळे श्री स्वामीचरणी विनंतीपत्रे उत्तर येण्याचे पूर्ण आशेने पाठविली होती. परंतू पत्राचे उत्तर १०-१२ दिवसांत न आल्यामुळे प्राणायाम करून जलसमाधी घ्यावी, असा विचार करून रात्रौ १२ वाजता सगळे निजलेले पाहून सुरसागरातील एरंड्याचे काठी जाऊन एरंड्यात उतरू लागले.

वामनराव एरंड्यात उतरतात, इतक्यात चमत्कार असा झाला की, दीनदयाळ अक्कलकोट स्वामीमहाराज त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांनी वामनबुवांचा हात धरून त्यांना वर ओढले. अतिशय रागाने त्यांना दोन थापड्या मारून महाराज म्हणाले, "शहाण्या गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्याशिवाय तुला गती नाही. आम्हांवर त्रागा करतोस काय? सहजसमाधी सोडून प्राणत्यागरूप जलसमाधी कसली घेतोस?" असे म्हणून त्यांना घरी आणून सोडले व महाराज वामनबुवांचे अंगावर हात फिरवून म्हणाले, "बरे होईल. उगाच बैस" असे बोलून स्वामी महाराज अदृष्य झाले. दत्तात्रेय समर्थस्वामीमहाराजांचा अभय वरदहस्त अंगावर फिरल्यावर मग काय विचारता? त्यांना रात्रौ चांगली गाढ निद्रा लागली. प्रात:काळी जागृत झाल्यावर पहातात तो शरीर शांत व मन प्रफुल्लित झाले. बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या व त्यांना आरोग्य प्राप्त झाले. प्रस्तुत हकीकत शके १७९८ (इस १८७६) च्या वैशाख शुद्धातली आहे.

श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रागट्याच्या स्मरणार्थ प्रतीक म्हणून वामनबुवा यांनी सुरसागराच्या पश्चिम घाटावरील एका लहानशा घुमटीत श्री स्वामीसमर्थांच्या पादुका स्थापन केल्या. या गोष्टीला बरीच वर्षे लोटल्यानंतर स्वामीभक्त हल्लीचे संस्थानचे संचालक श्री. वासुदेव रावजी कडुस्कर यांस श्रीसमर्थाची प्रेरणा होऊन त्यांनी सन १९५८ सालच्या श्री दत्तजयंतीचे दिवशी या पादुकांच्या जोडीला श्री समर्थांची मनोहर संगमरवरी मूर्ती स्थापन करावी अशी चालना जोराने सुरू केली. एक गृहस्थ अचानक येऊन त्यांनी श्रींची संगमरवरी मूर्ती देण्याचे आश्र्वासन दिले.

श्री स्वामी समर्थ मंदिर, सुरत
श्री स्वामी समर्थ मंदिर, सुरत

बाळकृष्ण महाराज स्थापित अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर, सुरत. 

संदर्भ- प्रमुख विश्वस्थ श्री राणा यांनी या मठाची संपूर्ण माहिती, महात्म्य कथन केले. स्वामी समर्थांच्या आदेशाप्रमाणे १९११ ला सुरतच्या या मठाची स्थापना झाली. त्याआधी बाळकृष्ण महाराजांनी १९१० ला दादरच्या मठाची स्थापना केली. या ठिकाणी स्वतः महाराजांचा बिछाना व पादुका जिथे ठेवल्या आहेत. येथे खाटेला स्पर्श करुन दर्शन घेण्यास परवानगी आहे. महाराजांनी स्वतः वापरलेल्या खाटेला हात लावण्यास मिळाला तर भक्तहे मोठेच भाग्यच मानतात. या खाटेला लाकडी फळ्यांऐवजी लोखंडी पत्रा लावलेला आहे व त्यावर व्याघ्रचर्म अंथरलेले असायचे. ते व्याघ्रचर्म आता घडी करुन पेटीत ठेवलेले असते. दर्शन सोहोळ्यानंतर रवी राणाजींनी या मठाच्या तळघरात असलेल्या बावडीकडे नेले. कमलामाता या बावडीत पडल्या असता त्यांनी महाराजांचा धावा केला. महाराज तस्बिरीतून बाहेर आले व त्यांनी कमलामाता यांना वाचविले. महाराजांची  चंदनमिश्रित पाऊले जमिनीवर उठली होती. 

या मंदिर परीसरातील सर्वचजण  स्वामींचे भक्त आहेत. महाराज ज्यांना बोलावतात केवळ तेच लोक इथे येऊ शकतात असे विश्वस्त आवर्जून सांगतात . या मठात. महाराष्ट्र  व मुंबईतून येणार्‍या स्वामीभक्तांचे येथे विशेष कौतुक, आदरातिथ्य केले जाते. मठापासून ३ कि.मी. अंतरावर बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे. तिथेही दर्शनास नेण्याची व्यवस्था होऊ शकतो.. तापी नदीच्या काठी असलेल्या या समाधी स्थानाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. बाळकृष्णमहाराजांचा समाधि सोहोळा वैशाख वद्य एकादशीला असतो त्यासाठी दादर मठातून भक्तमंडळी येत असतात. 

सुरत मठात थांबून नामस्मरण करण्याचे विशेष महत्व आहे व तशी विनंती मुख्य विश्वस्थ श्री राणाजींनी आवर्जून करतात. मठात भक्तमंडळींची रहाण्याची तसेच नामस्मरणासाठी संपूर्ण व्यवस्था होऊ शकते. ।। धागा स्वामी नामाचा ।। महाराजांच्या या प्रासादिक ठिकाण चा वारसा भक्त घेऊन येतो