स्थान: पणजी पासून३०-३५ किमी, भतग्राम, डिचोली तालुका, सन १८८१-८२ दत्त मंदिराची स्थापना.
सत्पुरूष: जगन्नाथ बुआ बोरकर, शांताराम नारायण दाभोलकर, साधू सुबांना तोडर.
विशेष: गोमांकातील गाणगापूर, कल्यापाषाणाची व शाडभूज काश्मिरी पाषाणाची मूर्ती.
गोमंतकातील अतिशय प्रसिद्ध असे हे दत्तस्थान तेथील निसर्गवैभवानेही दत्तभक्तांना आकर्षित करून घेते. माशैल, सांवई व सांखळी ही गोमंतकातील दत्तभक्तांची त्रिस्थळी आहे. गोमंतकाच्या सांस्कृतिक इतिहासात दत्ताचाही उल्लेख सापडतो. "केळोशी" या साष्टीतील गावात ‘आंबसेत’ नामक एक शेत आहे. ते म्हाळू शेणवी याने दत्तात्रेयाच्या देवालयास दिले होते" अशी १ सप्टेंबर १५८३ची नोंद पोर्तुगीजांच्या पणजी येथील ऐतिहासिक दप्तरात सापडते. ‘योगराज टिळक’ हा ग्रंथ दत्तात्रेयांचा असून तो गोमंतकातीलच होय. सन १८८१-८२ या काळात सांखळी येथील दत्तमंदिर तयार होऊन चैत्र व. २ शके. १८०४, ५ एप्रिल १८८२ या दिवशी मोठ्या थाटाने मंदिरात दत्तमूर्तीची स्थापनाही झाली.
पणजीपासून सुमारे २०-२५ मैलांवर भतग्राम (डिचोली) तालुक्यात हे सांखळी नावाचे टुमदार गाव वसलेले आहे. सन १८७८च्या सुमारास सांखळीत म्हाळू कामत नावाचा एक अत्यंत भाविक असा विठ्ठलभक्त राहात होता. त्याचा मुलगा लक्ष्मण हाही विठ्ठल व दत्त यांचा भक्त होता. नरसोबाच्या वाडीस जाऊन तो मनोभावाने गुरुचरित्राची पारायणे करीत असे. परंतु ते गौड सारस्वत असल्यामुळे वाडीचे पुजारी त्यांना त्रास देत. अशाच एका प्रसंगी वडील कामत वाडीस गुरुचरित्र वाचीत असताना त्यांना त्रास झाला. त्यांचे मन खिन्न झाले. डोळ्यांतून अश्रू ओसरू लागले. त्याच रात्री भगवान दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांत दिला. ‘भक्ता, तू काळजी करू नकोस. आम्हीच तुझ्या गावी येऊ.’
कामतांच्या मनास कमालीचा हर्ष झाला. सांखळीच्या येसू शेणवी बोडके याच्या पत्नीस, मथुराबाईस सत्कृत्य करण्याची प्रेरणा झाली. नदीच्या अलिकडे, गावठाणात अतिशय निर्जन व निरुपयोगी अशा जागेत एक औदुंबराचे झाड लावण्यात आले. झाड टवटवीत होत आल्यावर पार बांधण्याचे काम कामतांनी सुरू केले. ही जागा मुसलमानांची दफनभूमी होती. खोदकामात एक सोन्याचा छोटा नाग, रुप्याच्या पादुकांचा जोड, मारुतीची व गणपतीची पाषाणमूर्ती इत्यादी वस्तू सापडल्या. सन १८७९ मध्ये पाराचे बांधकाम पूर्ण होऊन सांखळीच्या दत्तस्थानाचा प्रारंभ झाला.
श्रीगोकर्ण पर्तगाळी मठाधीश श्रीमत् पूर्णप्रज्ञतीर्थस्वामी महाराज यांचा दौरा यावेळी गोमंतकात होता. त्यांची प्रेरणा मिळून दत्तमंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. लक्ष्मण म्हाळू कामत, वासू म्हाळू कामत, गोविंद पै कुचलेकर, यशवंत प्रभू आजगावकर, विष्णू शेणवी शेट्ये, मुकुंद शेणवी बोडके इत्यादी मंडळींनी पाराशेजारीच गर्भागार बांधले, बोरी येथील शिल्पकाराकडून काळ्या पाषाणाची एकमुखी दत्ताची मूर्तीही आणण्यात आली. मोठ्या मंदिराचे उभारणीचे कार्य सुरू झाले. याच सुमारास वासू म्हाळू कामत यास दृष्टांत झाला की, ‘मी सह्यपर्वत ओलांडून आलो असल्यामुळे फार थकलो आहे. विश्रांतीसाठी जागा हवी.’ एका संन्याशाने हे उद्गार काढून औदुंबराच्या पाराकडे बोट दाखविले. साक्षात् दत्तप्रभू सांखळीच्या दत्तस्थानात येत असल्याची खात्री सर्वांना पटली. सांखळीकरांच्या दुर्दम्य उत्साहामुळे दत्तमंदिर मोठ्या प्रमाणात तयार झाले. विशेष म्हणजे गावातील एका जुन्या किल्ल्याचेच सामान या मंदिरास उपयोगी पडले.
बोरी येथील शिल्पकाराकडून आलेली काळ्या पाषाणाची मूर्ती देवळामागील औदुंबरापाशी ठेवण्यात आली. नवी मूर्ती काश्मिरी पाषाणाची आणावी असे ठरले. पित्रेशास्त्री व कामत या कामासाठी मुंबईस आले. एका शिल्पकाराने नेपाळनरेशांच्या सांगण्यावरून एक दत्तमूर्ती सुरेखशी तयार केली होती, ती सांखळीकरांना योगायोगाने मिळाली. पादुकांचा सुंदर जोडही प्राप्त झाला. नवी मूर्ती वाजतगाजत सांखळीस येऊन पोचली. शास्त्रीमंडळींच्या सल्ल्याने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विचार ठरला. शके १८०४च्या चैत्री पौर्णिमेपासून वद्य द्वितीयेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चालू होता. गणपती, मारुती, अन्नपूर्णादेवी, बाण, शाळिग्राम, नर्मदा, पाषाणनंदी असे काही इतर देवही दत्तांच्या सहवासात येऊन स्थिरावले. सर्व गोमंतकातून सात-आठ हजार दत्तभक्तांचा समुदाय जमला होता.
म्हापसा-डिचौली रस्त्यावरील सांखळी गावालगत असलेल्या या दत्तस्थानाची महती दिवसेंदिवस वाढत गेली. सृष्टिसौंदर्याची तर अवीट गोडी या स्थानाभोवती आहे. एकांत व स्वच्छता, टापटीप व भावसधनता यांचा अनुभव येथे आजही दत्तभक्तांना येतो. देवालयाच्या पार्श्वभागी नारळी-पोफळीची झाडे असून तेथे सिद्धपुरुषाचे स्थान आहे. अनेक शिवलिंगेही या भागात दिसतात. जवळच प्रसिद्ध असे विठ्ठलमंदिर आहे. सांखळीची दत्तवाडी म्हणजे गोमंतकातील गाणगापूर समजतात. दत्तमंदिराच्या पाठीमागची जमिनही दत्तवाडी संस्थानास योगायोगाने मिळाली. शांताराम दाभोळकर या नावाच्या एका दत्तभक्ताने मंदिराच्या बाजूस दगडी तट, विहीर, मंदिरात काश्मिरी पाषाणाची फरशी अशी कामे केली.
मंदिराचा मंडप हंड्या - झुंबरे यांनी शोभिवंत दिसतो. स्वच्छता व टापटीप गोमांतकी परंपरेस शोभणारी आहे. गर्भागारात ‘तीन शिरें सहा हात’ अशी दत्तमूर्ती भक्तांची वाट पहात उभी असते. मूर्तीच्या मागे रुप्याची प्रभावळ आहे. वर रुप्याचा मंडपही आहे. औदुंबराचा पार, अग्रशाळा, विहिरी, स्वयंपाकगृह, पोफळीची बाग इत्यादींमुळे दत्तवाडीच्या सौंदर्यास सीमा उरलेली नाही. नेहमी उत्सव - समारंभ चालू असतात. भक्तांच्या देणग्यांतून पूजाअर्चा सुरू असते. शिबिकोत्सव, गुरुचरित्रपारायण, दत्तजयंती अशा काही प्रसंगी उत्साहाला भरते येते. दर गुरुवारी मोठी पूजा, दीपाराधना, पुराण, कीर्तन, भजन असे कार्यक्रम असतात. पहाटे रोज काकड-आरती होते. देवळाच्या परिसरात पाळावयाचे नियम शुचित्वाला पोषक असेच आहेत. अश्र्वत्थपार, तुलसीवृंदावन, औदुंबरपार, अग्रशाळा, फुलांची बाग, शमीचा पार, वीजबत्तीची व्यवस्था, दगडी तटबंदी, महादरवाजा, नगारखाना, दीपस्तंभ, हंड्या, सोन्याचे दागिने, रुप्याची भांडीकुंडी इत्यादी नाना वस्तूंची भर भक्तांनी घातलेली दिसते.
दत्तवाडी या सांखळीच्या देवस्थानाशी संबंधित असलेल्या काही थोर सत्पुरुषांचा उल्लेखही येथे करावयास हवा. साधू सुबाण्णा तोडर या कारवार जिल्ह्यातील चित्रापूरच्या साधकाने येथे सेवा केली आहे. जगन्नाथबुवा बोरीकरांनी मंदिरात गुरुचरित्राचे अनेक सप्ताह केले असून शांताराम नारायण दाभोळकर यांनी या दत्तस्थानात खूपच सुधारणा केल्या. ‘दत्तपदगुच्छ’ व ‘दत्तभजनमाला’ अशी त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रथम पत्नीच्या नावाने एक ‘शांतापार’ येथेच आहे. विष्णू गिरीधर शेणवी, ढेंपे, भागीरथीबाई कायकीणी अशा आणखी काही दत्तभक्तांचा संबंध सांखळीच्या दत्तवाडीशी होता.
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।
श्री क्षेत्र दत्तवाडी – सांखळी गोवा
पणजीपासून साधारण ३५ कि. मी. अंतरावर डिचोली तालुक्यात सांखळी हे एक टुमदार शहर वसले आहे. म्हापसा-मडगाव रस्त्यावर डिचोलीपासून ७ कि. मी.वर सांखळी आहे. पर्ये, म्हाविळगे, कारापूर या ठिकाणांचे मिळून सांखळी हे गाव बनले आहे. गावातील बस स्थानकापासून केरी-मोर्लेममार्गे चोर्लेघाटाला जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जवळच सांखळीचे सुप्रसिद्ध दत्तमंदिर आहे. स्थानिक मंडळी या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात.
अनेक अद्भुत घटना आणि कथा या ठिकाणाशी निगडित आहेत हे इथले विशेष म्हणावे लागेल.
अंदाजे सव्वाशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. म्हाळू कामत या विठ्ठल भक्ताचे सुपुत्र लक्ष्मण कामत हे निस्सीम दत्तभक्त होते. प्रतिवर्षी नरसोबाच्या वाडीला जाऊन ते गुरुचरित्राचे पारायण करीत असत. अनेक वर्षे हा नेम त्यांनी अत्यंत निष्ठेने चालविला होता, पण हा नेम चालवीत असताना त्यांना स्थानिक सेवेकरी अनेकदा त्रास देत असत, अवहेलना करीत असत. एकदा असाच अपमान सहन न झाल्याने कामत तिथून परत निघाले. आता मीच तुझ्या गावी राहायला येतो असे स्वप्नात त्यांना सांगितले. आणि मग विविध चमत्कारांची मालिकाच सुरू झाली, असे सांगितले जाते. मंदिरासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध असलेल्या पैशांमध्ये मिळणे, मंदिरासाठी योग्य जागा, मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी योग्य मूर्ती, तीसुद्धा जेवढे जमले होते तेवढय़ाच पैशांमध्ये मिळणे, ती ज्यांच्या घरी आणून नुसती ठेवली त्यांच्या घरातील सर्व त्रास दूर होणे अशा एकामागून एक शुभ घटना घडत गेल्या आणि अंतत: ५ एप्रिल १८८२ रोजी या मूर्तीची दुपारी दोनच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सदर मूर्ती ही काश्मिरी पाषाणातील असून तिला तीन मुखे आणि सहा हात आहेत. अत्यंत जटिल मानसिक त्रास या ठिकाणी दर्शनाला आल्याने बरे होतात अशी दत्तभक्तांमध्ये ठाम श्रद्धा आहे. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्तजयंती असे उत्सव-समारंभ साजरे होतात. प्रतिष्ठापना दिन हा दत्तमूर्तीचा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. सांखळीचे हे देवस्थान अत्यंत कडक आणि जागृत म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध पावलेले आहे.
या ठिकाणी सत्पुरुष सुबाण्णा तोडरबुवा आणि साधू जगन्नाथबुवा बोरीकर यांचे दीर्घकाळ वास्तव्य राहिलेले आहे.