श्रीक्षेत्र अमरकंटक

स्थान: अमरकंटक, अनुपूर  जिल्हा, मध्यप्रदेश 
विशेष: नर्मदा नदीचा उगम 

श्रीक्षेत्र अमरकंटक
श्रीक्षेत्र अमरकंटक

चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने कडक तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले, अशी तिच्या उप्तत्तीविषयी कथा सांगितली जाते, तर नर्मदा या कुमारी स्वरूपातील नदीविषयी एक वेगळीच कथा प्रचलित आहे.

मध्यप्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात अमरकंटक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात प्राचीन नदी समजली जाते. तिचा उगम पाच लाख वर्षापूर्वीचा आहे असे सशोधकांचे मत आहे. नर्मदा नदी मेकल पर्वतात उगम पावून पुढे दोन मैलावर असलेल्या कडयावरून खाली पडते. या ठिकाणाला ‘कपिलधारा’ म्हणतात. इथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली आणि सांख्यशास्त्राची रचना केली.

कपिलधारापासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या प्रदेशातून आठशे मैल प्रवास करून गुजरातमधला (भृगुकच्छ) भडोच शहराजवळ ती पश्चिम समुद्राला मिळते. ‘नर्म’ म्हणजे आनंद आणि ‘दा’ म्हणजे देणारी अशी नर्मदा शब्दाची व्युत्पत्ती आहे. मैकल पर्वतावर उगम पावली म्हणून तिला मैकलकन्या, रेवा, अमरजा, रुद्रकन्या अशीही इतर नावे आहेत. दोन्ही तीरावर अनेक क्षेत्रं असलेली नर्मदा ही भारतातील अशी एकमेव नदी आहे की फक्त तिचीच श्रद्धेने प्रदक्षिणा केली जाते. तिला नर्मदा परिक्रमा म्हणतात.

उगमावर नर्मदा मातेचे मंदिर
नर्मदेचा जिथे उगम झाला ते नर्मदा मातेचे मंदिर 

नर्मदेचा जिथे उगम झाला तिथे दगडी मंदिर बांधले असून भोवती दगडी भिंतीचा तट आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. मधोमध दोन मंदिरे असून पुढच्या बाजूस सरोवर आहे. एक मंदिर राम-सीतेचे असून दुसरे पश्चिमाभिमुखी मंदिर पार्वतीचे आहे. संगमरवरी पार्वतीची मूर्ती अडीच फूट उंचीची असून देवीला चांदीचा मुकुट आहे. वर अमरकंटकेश्वर महादेवाचे लिंग आहे. समोर पूर्वाभिमुख काळया पाषाणाची तीन फूट उंचीची नर्मदा मातेची मूर्ती आहे. नर्मदा माता हे देवीचे ३९वे शक्तीपीठ असून त्याला ‘चंद्रिकापीठ’ म्हणतात.

मंदिराबाहेर कार्तिकेय, रोहिणीमाता, सूर्यमंदिर, गोरखनाथ मंदिर, सियाराम मंदिर असून पुढे यज्ञमंडप आहे. या मंडपात होमहवन केले जाते. यज्ञमंडपाच्या दगडी चार-पाच पाय-या उतरल्यानंतर त्या पाण्यात नर्मदेचे उगमस्थळ असून संध्याकाळी सात वाजता नर्मदेची आरती केली जाते. पाण्यात दिवे सोडले जातात. ते दृश्य फारच मनोहारी दिसते. हा मंदिर परिसर दीड एकराचा असून देवीचा प्रदक्षिण मार्ग दक्षिणोत्तर असा आहे.

परिसरात पाताळेश्वर महादेव रंगमहाल, शंकराचार्य मंदिर, राजराजेश्वरी मंदिर, गायत्री मंदिर, आदिनाथ मंदिर, मरतडेय आश्रम, माई का बगिचा अशी अनेक दर्शनीय ठिकाणे आहेत. माई का बगिचा या ठिकाणाहून नर्मदा परिक्रमेला सुरुवात होते.

रामायण काळात हे ठिकाण ऋषभ या नावाने प्रसिद्ध होते. एकदा रावण पुष्पक विमानात बसून मैकल प्रदेशातून जात असताना या ठिकाणचे निसर्गसौंदर्य पाहून तो अतिशय प्रभावित झाला. आणि काही दिवस तिथे राहून त्याने शंकराची आराधना केली. पूर्वी या प्रदेशावर रामाचे पूर्वज रघुवंशी राजाचे राज्य होते.

दहाव्या शतकात हा प्रदेश चेदी शासकाच्या ताब्यात होता. आजही त्या काळातील मंदिरे आणि इतर भग्नावशेष दृष्टीस पडतात. कलचुरी राजाने अनेक मंदिरांची निर्मिती केली होती. चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने कडक तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले. अशी तिच्या उप्तत्तीविषयी कथा सांगितली जाते तर नर्मदा या कुमारी स्वरूपातील नदीविषयी एक वेगळीच कथा प्रचलित आहे.

अमरकंटक मंदिर परिसर
अमरकंटक मंदिर परिसर 

अमरकंटक नावाचा एक राजा होता. त्याला नर्मदा नावाची अतिशय सुस्वरूप अशी मुलगी होती. वयात आल्यावर राजाने तिचा विवाह शोण राजाशी ठरवला. पण त्या दोघांनी एकमेकांना कधीच पाहिले नव्हते. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती.

पण विधीघटना काही वेगळीच होती. आपला मृत्यू जवळ आला आहे याची जाणीव झाल्यावर त्याने घाईघाईने नर्मदेला राज्याभिषेक करून राज्यकारभार तिच्या हाती सोपवला. नर्मदा त्या प्रदेशाची राणी झाली. पण तिचा विवाह होण्यापूर्वीच अमरकंटक राजा निधन पावला. वडिलांच्या निधनाचे दु:ख काही दिवसांनी कमी झाले.

तेव्हा आपण आता विवाह करावा, असा तिने विचार केला. नवरदेव ठरलेलाच होता. तिने विवाहाची सर्व तयारी करून प्रेमाचे प्रतीक म्हणून आपली अंगठी झोला नावाच्या दासीबरोबर शोण राजाकडे पाठवली.

झोला शोण राजाकडे गेली आणि नर्मदेची अंगठी त्याच्यापुढे धरली. शोण राजाने नर्मदेला कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे झोला दासीच नर्मदा आहे असे समजून त्याने तिचे मोठया प्रेमाने स्वागत केले. झोला अतिशय धूर्त होती. आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा तिने ठरवले आणि तिने हुबेहूब नर्मदेचे सोंग वठवले.

राजा फसला आणि झोला दासीलाच नर्मदा समजून तिच्याशी विवाह करून तिला राणीपदावर बसवले. नर्मदेने बरेच दिवस वाट पाहिली. पण शोण राजा आला नाही. तेव्हा तिने स्वत:च शोण राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्याकडे गेली. तिने पाहिले की झोला पट्टराणी बनून राजाशेजारी बसली आहे. झोलाने विश्वासघात केला हे तिच्या लक्षात आले. आपल्यासमोर एक सौंदर्यवती अनोळखी तरुणी उभी आहे हे पाहून राजाने विचारले,

माईका मंडप श्रीक्षेत्र अमरकंटक
माईका मंडप श्रीक्षेत्र अमरकंटक

‘हे सुंदर सुकुमार स्त्रिये, तू कोण आहेस?’

‘मी कोण हे तुमच्या राणीलाच विचारावे महाराज.’ राजाने तिच्याकडे पाहिले. झोला दचकली. पण लगेच सावरून म्हणाली,

‘मला माहीत नाही. मी हिला ओळखत नाही महाराज.’

‘ठीक आहे मी सांगते. तुम्ही जिच्याशी सोयरीक जमवलीत ती नर्मदा मी. ही झोला माझी दासी. मी प्रीतीची खूण म्हणून अंगठी हिच्याबरोबर पाठवून माझ्या राज्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. पण हिने विश्वासघात केला आणि स्वत:च पट्टराणी झाली.’

‘खरे आहे हे?’ राजाने झोलाला विचारले.

‘मुळीच नाही. हीच माझी दासी होती आणि आता नर्मदा बनून माझ्या सुखात विष कालवायला निघाली आहे. हिच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. ताबडतोब घालवून द्या हिला.’
‘मला घालवून देण्याची मुळीच गरज नाही. मी आपण होऊनच निघून जाते आहे.’ असे म्हणून नर्मदा ताबडतोब निघाली. तिला खूप दु:ख झाले होते. पण मनाशी एक निर्धार करून राजवाडयात न जाता मैकल पर्वतावर ध्यान समाधी लावली आणि शिवशंकराला प्रार्थना केली.

‘प्रभो, माझ्या देहाचे पाणी पाणी होऊ दे आणि इथून त्या जलधारा खाली वाहू देत.’ आणि तसेच झाले. त्या समाधीत नर्मदा देहरूपाने विरघळली आणि पाण्याच्या रूपाने खाली वाहू लागली. तिची नदी बनली आणि नर्मदा या तिच्याच नावाने प्रसिद्ध झाली. बरेच यात्रेकरू जगन्नाथपुरीला जाताना किंवा यात्रेहून परत येताना अमरकंटकाची यात्रा करतात.