श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७

दत्तमंदिर उज्जयनी
स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी पहिला चातुर्मास उज्जैन येथील दत्त मंदिरात केला ते हरसिद्धी दत्त मंदिर उज्जैन

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे एकूण २३ चातुर्मास झालेत त्याची माहिती.

चातुर्मास १- श्रीक्षेत्र उज्जयिनी मध्यप्रदेश, नदी- क्षिप्रा, इ.स. १८९१,  शके १८१३

उज्जनी येथे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने श्रीनारायणानंदसरस्वतीस्वामींचे कडून महाराजांनी दंड ग्रहण केला. सर्वत्र वर्णाश्रम लोप झालेला आहे. तरी सर्व भरतखंडांत पायीच संचार करून सर्व लोकांना उपदेश करावा व धर्ममार्गाची स्थापना करावी अशी श्रीदत्तप्रभूंची आज्ञा महाराजांना झाली. त्याप्रमाणे महाराजांचे वागणे सुरू झाले. दंडग्रहण झाल्याबरोबर पहिला चातुर्मास महाराजांचा उज्जनी येथेच झाला. गुरुस्वामींच्या आग्रहाने ते अन्यत्र कोठे न जाता तेथेच राहिले. 

महाराजांचा कार्यक्रम नित्याचा पुढीलप्रमाणे होता. पहाटे उठून शौचमुखमार्जन केल्यावर स्नान व्हावयाचे. स्नान नेहमी त्रिकाल होत असे. नंतर दंडतर्पण, प्रणवजप झाल्यावर दत्तमूर्तीस स्नान घालून भस्म लावावे. संन्याशांना फुले, तुळशी तोडता येत नसल्याने कोणी आणून दिल्यास दत्तमूर्तीस फुले वगैरे उपचार मिळत. नाहीतर नुसते भस्मावरच भागवावे लागे. कोणी विद्यार्थी असल्यास त्याला वेद, शास्त्र आवश्यक तो पाठ द्यावयाचा. दुपारी पुन: स्नानादि नित्यकर्म झाल्यावर दक्षिणी ब्राह्मणाचे घरून भिक्षा आणून ते सर्व अन्न एकत्र करून खावे. तीनच घरी भिक्षा घ्यावयाची असा नियम होता.

संग्रही वृत्ती महाराजांची पूर्वीपासूनच नव्हती. लंगोट्या ४, छाट्या २, दंड व लाकडी किंवा वेळवाचा कमंडलू, एखादे वेळी धाबळी, उपनिषदांची पोथी, पंचायतानाचा संतुष्ट, दोन दत्तमूर्ति व पाणी काढण्याची दोरी इतकेच जिन्नस बरोबर असावयाचे. याशिवाय कसलाच संग्रह नाही. सेवा कोणाकडूनही घ्यावयाची नाही. वस्त्रे धुणे वगैरे स्वत:ची कामे स्वत:च करावयाची. कोणालाही स्पर्श करावयाचा नाही. स्पर्श झाल्यास किंवा शौचास जाऊन आल्यास स्नान करावयाचे. पायात काही न घालता पायांनीच सर्व प्रवास करावयाचा. सर्व सिद्धी प्रसन्न असताही त्यांचा उपयोग कधीच करावयाचा नाही. याप्रमाणे अत्यंत कडकपणाने शास्त्रीय नियमांचे पालन महाराज करीत असत. त्यामुळे त्यांच्या सदुपदेशाचा जनतेवर तत्काल परिणाम होत असे.

1st chaturmas
स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी पहिला चातुर्मास उज्जैन येथील दत्त मंदिरात केला ते हरसिद्धी दत्त मंदिर उज्जैन

‘आधी केले मग सांगितले’ असे महाराजांचे वागणे असे. भाद्रपद पौर्णिमेस चातुर्मास संपल्यावर महाराज उज्जनीहून निघून महत्पुरास आले. तेथे काही मुक्काम झाला. दक्षिणी ब्राह्मणांवाचून इतर कोणाकडेही भिक्षा घ्यावयाची नाही असा महाराजांचा नियम असल्यामुळे फार त्रास पडत असे. तशी वस्ती नसल्यास उपवासाचा प्रसंग येई. पण दहा दहा कोसाचा प्रवास उपोषण पडले तरी व्हावयाचाच, तो कधी चुकला नाही.

ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे एकाएकी असा चमत्कार घडला की, एका ब्राम्हणाच्या अंगावर फोड झाले होते व तो फार गांजला होता. त्याला कोणीतरी सांगीतले की तू महाराजांच्या पायांचे तीर्थ घेतले तर तुझा रोग बरा होईल. तो ब्राम्हण संधीची वाट पाहूं लागला. एके दिवशीं महाराज लिहिण्यास मांडी उपडी करून बसले होते. त्या वेळी त्यांचे पाय मागें होते. ब्राम्हणानें ती संधी साधून पाठीमागे जाऊन महाराजांच्या पायांवर पाणी घातलें व त्यांना शिवून ते सर्व तीर्थजल गोळा करून पिऊन टाकले व अंगाला लावले. महाराजांनी एकदम मागे वळून असे करण्याचे कारण त्या ब्राम्हणाला विचारले, तेव्हा त्याने व्याधींच्या परिहार्थ एकाच्या सांगण्यावरून आपण असे केले आहे, असे सांगून अपराधाची क्षमा मागितली.

महाराज लगेच उठून गंगेवर जाऊन स्नान करून आले पण त्यांच्या चित्तास समाधान वाटेना. रात्री स्वप्नांत एक चांडाळीण महाराजांना शिवली. त्यांनी लगेच उठून देवाचे ध्यान केले. सकाळी उठून पहातात तों सर्व अंगभर फोड उठले आहेत.

त्या रात्री द्रृष्टांत झाला कीं 'अनअधिकारी माणसाला पायाचें तीर्थ दिल्यामुळे हा त्रास भोगावा लागला. तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेलें नाहीं. करितां तीन दिवस नर्मदेचे स्नान केल्यावर शरीर पूर्ववत् चांगले होईल"

त्याप्रमाणे गंगेची अनुज्ञा घेऊन महाराज किनारी येण्याकरितां ब्रम्हावर्ताहून निघाले. महाराज नर्मदातीरीं नेमावर येथें येऊन पोंचले व नर्मदामातेची नमस्कारपूर्वक प्रार्थना केली कीं 'माझ्या थोड्या अपराधाबद्दल केवढी  ही कडक शिक्षा केली? माझ्याशिवाय तुझें महत्व वाढविणारा दुसरा कोणी नाही काय?' अशी प्रार्थना करून तिथे मुक्काम केला. तीन दिवसांत नर्मदामातेच्या स्नानानें तो विस्फोटक रोग बरा झाला. त्यावेळी नर्मदालहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली.
नेमावर हे नर्मदेचे नाभी नाभिस्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे.

श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, चातुर्मास उज्जयिनी

संन्याशांने तिर्थक्षेत्राचा अपवाद वगळता कोणत्याही एका ठिकाणी तीन दिवसापेक्षा अधिक काळ राहू नये, अग्नीला स्पर्श करू नये, फक्त तीन किंवा पाच घरी भिक्षान्नच घ्यावे, धातुला किंवा पैशाला स्पर्श करू नये, पोहून नदी तरुन जाऊ नये इत्यादी संन्यासधर्माचे सर्व नियम श्रीस्वामीमहाराज काटेकोरपणे पाळू लागले. दंडग्रहण केल्यानंतर श्रीदेवांनी त्यांना अशी आज्ञा केली होती की, "लोक वर्णाश्रमधर्मापासून ढळत आहेत. तरी त्यांना उपदेश करून वर्णाश्रमावरील त्यांची निष्ठा बळकट करावी. लोकांमध्ये धर्माचा लोप होऊ पहात आहे. तेव्हा भरतखंडात सर्वत्र पायीच संचार करून सर्व लोकांना उपदेश करून जनमानसात धर्माची प्रतिष्ठापना करावी." श्रीदेवांच्या या आज्ञेप्रमाणे वागण्यास श्रीस्वामीमहाराजांनी तात्काळ सुरुवात केली.

संन्याशांचा चातुर्मास आषाढ शुध्द १५ ते भाद्रपद शुध्द १५ असा दोन महिन्यांचा असतो. या दोन महिन्यात त्यांनी नदीकिनारी तीर्थक्षेत्रात एकाच ठिकाणी वास्तव्य करावे असा संकेत आहे. संन्यास दिक्षा घेतलेल्या वर्षापासून संन्याशांच्या चातुर्मासांना सुरुवात होते. संन्याशाचे वय त्याचे किती चातुर्मास झाले यावर मोजतात.

श्रीस्वामीमहाराजांनी आपल्या श्रीसद्गुरूंच्या संगतीमध्ये काही दिवस उज्जयिनीमध्ये मुक्काम केला.आषाढ पौर्णिमा जवळ येत होती. श्रीस्वामीमहाराजांनी आपला पहिला चातुर्मास उज्जयिनीलाच करावा असा श्रीस्वामीनारायणानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव आपला पहिला चातुर्मास उज्जयिनीलाच करावयाचा असे श्रीस्वामीमहाराजांनी ठरविले.त्यामुळे शके १८१३ अर्थात ई.स.१८९१ चा त्यांचा पहिला चातुर्मास श्रीक्षेत्र उज्जयिनी येथेच झाला.

श्रीस्वामीमहाराजांचे वक्तृत्व अमोघ होते. त्यांच्यापाशी प्रकांड विद्वत्ता होती आणि विषय प्रतिपादनाची शैली अशी होती की, ऐकणारा त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रवाहात वाहुन जात असे.प्रतिपादन केलेल्या विषयावर मागाहून कोणी शंका काढून त्याचे समाधान करावे लागले असा प्रसंग येत नसे. विषयाची हाताळणी अगदी सांगोपांग होत असे. का होणार नाही? श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने श्रीस्वामीमहाराजांच्या जिभेवर सरस्वती वास करीत होती. हळुहळु त्यांच्या कीर्तीचा सौरभ सगळीकडे पसरु लागला. प्रत्येक दिवशी पुराणाला गर्दी वाढतच होती. शास्त्र शिकणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली. श्रीस्वामीमहाराज ज्याप्रमाणे पुराण सांगत त्याप्रमाणे प्रवचनही करीत असत. उज्जयिनीमध्येही श्रीस्वामीमहाराज मराठी मधूनच निरूपण करीत, कारण त्यावेळी तेथे मराठी जाणणारी मंडळी पुष्कळ होती. वेळप्रसंगी ते विद्वान श्रोत्यांसमोर अस्खलीत संस्कृतमध्येही बोलत असत. श्रीस्वामीमहाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून विद्वान शास्त्रीमंडळी आश्चर्यचकीत होत.

श्रीस्वामीमहाराजांचा पुराणांचा, प्रवचनाचा आणि त्यांच्या संगतीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यांच्या या असामान्य लोकप्रियतेचा त्यांच्या श्रीगुरुस्वामींनाही अचंबा वाटला आणि त्यांच्या मनात आपल्या या शिष्याविषयी असूया जागृत झाली. परमेश्वराची माया किती अतर्क्य आहे पहा! एका संन्यासीगुरूच्या मनात आपल्या शिष्याच्या लोकप्रियतेबद्दल असूया जागृत व्हावी, याच्या इतकी दुसरी विलक्षण व अदभूत गोष्ट कोणती असू शकेल?

श्री क्षेत्र उज्जैन शके १८१३ इ. सन. १८९१ :

मध्यप्रदेशात. क्षिप्रा नदी काठी. सेन्ट्रल रेल्वे स्टेशन. पाळीचे दत्त मंदिर. बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री महांकालेश्वर शिव मंदिर स्थान. जवळच हरिसिद्धीचे मंदिरात श्रीस्वामीमहाराजांचा दंडग्रहण विधी झाला.

श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्र, एक दृष्टीक्षेप.

उज्जयिनीहून फिरता फिरता श्रीस्वामीमहाराज पुन्हा नर्मदातटाकी आले. श्रीनर्मदेशी आणि श्रीकृष्णानदीशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण व्हावयाचे होते. त्यामुळे ते वारंवार या पवित्र नद्यांच्या तिरावरून संचार करीत असत. ओंकारेश्वर हे भगवान श्रीशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रीनर्मदाकाठच्या या लिंगाला अमलेश्वराचे ज्योतिर्लिंग असे म्हणतात. येथे धावरी कुंड आहे. धावरी कुंडाला श्रीनर्मदेचे योनिस्थान मानतात. येथील सृष्टीशोभा अपूर्व आहे. श्रीस्वामीमहाराज येथील सौंदर्याने प्रसन्न झाले. या धावरी कुंडात बाणलिंगे सापडतात. एखादे बाणलिंग आपणास मिळावे म्हणून येथे येणारा प्रत्येक यात्रेकरू धावरी कुंडात वारंवार उड्या मारीत असतो. काही यात्रेकरू धावरी कुंडात बुड्या मारणाऱ्या लोकांना पैसे देऊन कुंडातून बाणलिंग काढावयाला सांगतात. येथे मिळालेले बाणलिंग आपल्या घरी पूजेमध्ये असावे असे लोकांना वाटते. फार थोड्या भाग्यवंतांना या लिंगाची येथे प्राप्ती होते.

एके दिवशी श्रीस्वामीमहाराजांनी स्नान करण्यासाठी धावरी कुंडात बुडी मारली.पाण्यातून वर येताना त्यांनी इतरांना अलभ्य असे ओंजळभर बाण वर आणले.त्या बाणांच्या विविध रंगछटा पाहून श्रीस्वामीमहाराजांना आनंद झाला. त्या बाणांकडे श्रीस्वामीमहाराज कौतुकाने पहात असताना भिल्ल वेषाने शंकर तेथे आले व ते श्रीस्वामीमहाराजांना असे म्हणाले की," संन्यासी महाराज! आपण भाग्यवान दिसता. इतरांना क्वचितच सापडणारे बाण तर आपण ओंजळ भरून आणले आहेत. या सर्व बाणांची आपणच पूजा करणार आहात ना?" हा प्रश्न ऐकताच श्रीस्वामीमहाराज त्यांना असे म्हणाले की," नाही. संन्याशाला बेल, तुळशी, फुले तोडता येत नाहीत. मग या बाणांची कोणत्या साहित्याने पूजा करणार? हे बाण चांगले आहेत असे पाहून सहज कुतूहल म्हणून हे वर आणले." श्रीस्वामीमहाराजांचे हे उत्तर ऐकताच भिल्लरूपी शंकर त्यांना असे म्हणाले की," तसे असेल तर आपण हे सर्व बाण पुन्हा कुंडात सोडून देणेच योग्य होईल."

श्रीस्वामीमहाराजांनी त्या भिल्लाच्या सांगण्याप्रमाणे ते ओंजळभर बाण पुन्हा कुंडात सोडले. पण तेवढ्यात तो भिल्लही अदृश्य झाला. भगवान श्रीशंकरच आपणास दर्शन देऊन गेले याची श्रीस्वामीमहाराजांना खात्री पटली. श्रीस्वामीमहाराज थोर भक्त होते, वेदांती होते, शास्त्रवेत्ते होते, त्यांच्या ठिकाणी प्रगाढ विद्वत्ता होती, पण परमेश्वराच्या मायेने त्यांना याही वेळी संमोहित केले. भगवान श्रीशंकर त्यांच्या समोर उभे असताना श्रीस्वामीमहाराजांनी त्यांना ओळखले नाही. ओंकारेश्वरला श्रीस्वामीमहाराजांचा तेहतीस दिवस मुक्काम होता. येथे रोज जिज्ञासूंना वेदवेदांत सांगणे, शास्त्रे शिकविणे, अभ्यासू लोकांचे प्रापंचिक अडचणीवर उपाय सांगून त्यांना ईश्वर भजनी लावणे व संध्याकाळी पुराण सांगणे हे त्यांचे कार्यक्रम चालूच होते. येथील राजाचे कारभारी श्री बळवंतराव यांना श्रीस्वामीमहाराजांनी स्वतः ब्रम्हकर्म व पंचमहायज्ञ शिकवून त्यांनी त्यांना खऱ्या ब्राम्हण धर्माची दीक्षा दिली.

वासुदेवानंद सरस्वती चातुर्मास ब्रह्मवर्त
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी ब्रह्मवर्त येथे २रा १२वा १३ वा आणि १४वा चातुर्मास केले  

चातुर्मास २- श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९२, शके १८१४

महाराज जालवणहून निघून फिरत फिरत ब्रह्मावर्तास येऊन पोचले. येथे येण्याची ही त्यांची पहिली खेप. यावेळी येथे आठ महिने मुक्काम झाला. अंताजिपंतांचे घाटावर राम मंदिरानजिक एका झोपडीत महाराजांचे वास्तव्य होते. तेथे रोज सकाळी शौचमुखमार्जन व स्नान झाल्यावर झोपडीचे दार लावून भिक्षेची वेळ होईपर्यंत बसत असत. नंतर पुन: गंगेवर मध्यान्ह स्नान करून येऊन व आवश्यक ती कर्म करून तीन घरची भिक्षा आणावयाची व ती घ्यावयाची. हे होईपर्यंत झोपडीचे दार उघडे असे. नंतर पुन: संध्याकाळ होईपर्यंत दरवाजा बंद.

केवळ श्रीदत्तप्रभूंची आज्ञा म्हणूनच महाराजांचे हे काम चालले होते. त्यात लोकेषणेचा काही संबंध नव्हता. त्यामुळे नित्य अनेक मंडळी पुराणश्रवणास येऊ लागली. काही विद्यार्थीही अध्ययनास येऊ लागले. आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मास सुरू झाला. ज्योतिष, याज्ञिक, वेदांत, योग इत्यादी विविध विषयांच्या अभ्यासाकरिता महाराजांचेकडे अनेक लोक येऊ लागले. महाराजांचा मुक्कामही त्यावेळी ब्रह्मावर्तास चांगला दीड वर्ष झाला. बऱ्याच मंडळींना सन्मार्गाचा उपदेश होऊन त्यांचे कल्याण झाले. वर्णाश्रमाधर्माकडे लोकांची प्रवृत्ती विशेष वाढली. पुढे पुढे महाराजांची किर्ती बरीच दूरवर पसरली.

ब्रह्मावर्तास असताना महाराजांनी दत्तपुराण नावाचा एक ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला. एकंदर श्र्लोकसंख्या साडेतीन हजार असून टीकाही विस्तृत केलेली आहे. एकंदर अध्याय ६४ असून आठ अष्टके आहेत. ऋक्संहितेप्रमाणेच याची रचना झालेली आहे. ऋक्संहितेतील प्रत्येक अध्यायातील आरंभ व दत्त पुराणातील अध्यायाचा आरंभ एकसारखा आहे. पहिल्या अध्यायातील प्रत्येक श्लोकांत एक, दोन असे ऋक्पाद घालून स्तुति केली आहे. यालाच वेदपादस्तुति असे म्हणतात. असा हा अप्रतिम ग्रंथ ब्रह्मावर्तास गंगातीरावर निर्माण झाला.

श्री क्षेत्र ब्रह्मावर्त 

शके १८१४ इस १८९२ उत्तरप्रदेशात. गंगानदीकाठी. कानपूर रेल्वे स्टेशनस्टेशन 20 किमी.मोटारने जाता येते.बाळासाहेब यांची विठुर कोठी. नानासाहेब पेशवे यांचा वाडा. उत्तम घाट, भरपूर मंदिरे. येथे महाराजांचे चार चातुर्मास झाले (२ रा शके १८१४ इस. १८९२, १२ वा शके १८२४ इस. १९०२, १३ वा, शके १८२५ इस. १९०३, १४ वा शके १८२६ इस. १९०४) राममंदिरासमोर पर्णकुटीत महाराज रहात होते. तेथे सध्या श्री दत्तमंदिर आहे.

श्री क्षेत्र ब्रह्मवर्त येथील चतुर्मासातील प्रत्यक्ष दर्शीचे कथन

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना ज्यांनी लहानपणी अगदी जवळून व समक्ष पाहिले होते व मे १९८७ पर्यंत हयात होते असे ब्रम्हावर्त येथील वृद्ध गृहस्थ श्री. टोपे (तात्या टोपे यच्या घराण्यातील वंशज) यांची प्रत्यक्ष भेट झाली असताना ते श्रीस्वामीमहाराजांसंबंधी आठवणी सांगताना असे म्हणाले, "श्रीस्वामीमहाराज रोज दुपारी भिक्षेला येत असत. त्यावेळी ते आमच्या घरातील मंडळींना असे म्हणत असत की, 'भिक्षान्नात तूप वाढू नका'. तीन घरची भिक्षा घेतल्यावर ते सरळ गंगेवर जात असत व तेथे आपली भिक्षान्नाची छाटीची झोळी तीन वेळा पाण्यात बुडवून ती घेऊन अंताजीपंताच्या घाटावरील आपल्या झोपडीत परत येत असत. तेथे ती झोळी थोडावेळ एका खुंटीला टांगून ठेवीत असत. भिक्षान्नाच्या झोळीतून सर्व पाणी गळून गेले की, मग ती खाली काढून त्यातील अन्नाचे चार सारखे भाग करीत असत. त्यातील एक भाग ते श्रीगंगेला अर्पण करीत असत. दुसरा भाग ऐखाद्या भिकार्याला देत असत. तिसरा भाग ते एखाद्या कुत्र्याला खाऊ घालत व चौथ्या भागाचे बरोबर आठ घास करून ते स्वतः भक्षण करीत असत.

श्रीस्वामीमहाराजांची ही भिक्षेची रीत पाहिली की, मला लहानपणी फार आश्चर्य वाटत असे. आजही त्या गोष्टीची आठवण झाली की, श्रीस्वामीमहाराज आपली भिक्षान्नाची झोळी गंगेत बुडवीत असल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर साक्षात् उभे राहते व जिव्हालौल्य जिंकल्याची त्यांची ती अद्भुत व अलौकिक साक्षच आहे, असा विचार मनात येउन माझे मन अगदी भारावून जाते. मला तर ही वैराग्याची पराकाष्ठा आहे असे वाटते. या ब्रम्हावर्त क्षेत्रात माझे उभे आयुष्य गेले. मी अनेक साधुसंताचे दर्शन घेतले; परंतु आजतागायत असा जिव्हा जिंकणारा, आपल्या रसनेवर ताबा मिळवणारा व अखंड वैराग्यसंपन्न असणारा साधू माझ्या पहाण्यात आला नाही. खरे सांगावयाचे म्हणजे श्रीस्वामीमहाराज हे नुसते साधू नव्हते; तर ते महासाधू होते! या महासाधूंचे मला दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो. या भूतलावर पुन्हा असा लोकोत्तर महासाधू होणे नाही हेच खरे आहे!"

संदर्भ ग्रंथ: श्रीथोरलेस्वामीमहाराज खंड तिसरा
लेखक: (कै) द.सा. मांजरेकर

चातुर्मास ३
चातुर्मास 

चातुर्मास ३- श्रीक्षेत्र हरिद्वार उत्तरप्रदेश, नदी-गंगा, इ. स. १८९३, शके १८१५

ब्रह्मावर्ताहून निघून गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादि स्थाने पहात पहात महाराज शके १८१५ वैशाख पौर्णिमेच्या सुमारास हरिद्वारास येऊन पोचले. तेथे गंगेच्या तीरावर अहिल्याबाईंच्या धर्मशाळेजवळ असणाऱ्या दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम झाला. त्यावेळी तेथे शारदापीठाधीश श्रीराजराजेश्र्वरस्वामी शंकराचार्य यांचाही मुक्काम होता. त्यांच्या आग्रहावरून तेथेच चातुर्मासात राहण्याचे महाराजांनी ठरविले. चातुर्मासांत शंकराचार्यांना उपनिषभ्दाष्य ऐकवून भाद्रपद पौर्णिमेनंतर बद्रिनारायणाचे यात्रेकरिता महाराज निघाले.

श्री क्षेत्र हरिद्वारः 

शके १८१६-१७, १८१८ व इस.१८९४-९५ व इस. १८९६ दोन चातुर्मास झाले.उत्तराखंडात. गंगानदीकाठी. रेल्वेस्टेशन. अहल्यादेवी होळकर धर्मशाळेजवळ दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम होता. भगवान दत्तात्रय तपःस्थली. कुशावर्त महातिर्थ. कुशाधार महातीर्थ हरिकीपावडी हरिद्वार.

चातुर्मास
चातुर्मास 

चातुर्मास ४ व ५- हिमालय उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९४-९५ शके १८१६-१७

महाराज बद्रिनारायणाचे दर्शनार्थ निघाले. रस्त्यात ऋषीकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, बद्रिकेदार इत्यादि स्थाने पहात पहात बद्रिनारायणाचे दर्शन केले. प्रत्येक ठिकाणी एक-दोन दिवस, कोठे अधिकही मुक्काम होत असे. बरोबर दक्षिणी ब्राह्मण यात्रेकरू असल्याने भिक्षेची अडचण पडली नाही. हिमालयात बद्रिनारायणाचे दर्शनास जात असता एका ठिकाणी मोठा कडा तुटलेला असून पुढे जाण्यास मार्ग नाही असे पाहून महाराज तेथेच थबकले. इतक्यात कड्यावरून दोघेजण खाली येऊन महाराजांना म्हणाले की, ‘पुढे जाण्यास रस्ता नाही. मागे परत जा. नाहीतर देहपात होईल.’ हे त्या दोघा पुरुषांचे बोलणे ऐकून महाराजांनी त्यांना सांगितले की, ‘देह पडला तरी हरकत नाही. नरनारायणांचे दर्शनार्थ आपण आलो आहो. ते दर्शन झाल्याशिवाय आपण परत फिरणार नाही. पुढे वाट नसेल तर आपण दोघे तिकडून कसे आला?’ हे महाराजांचे निर्धाराचे भाषण ऐकून ते दोघेही पुरुष अदृश्य होऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष नरनारायणप्रभू मुनि दिसू लागले. महाराजांनाही नरनारायणांचे दर्शन घडल्यामुळे आनंद झाला.

बद्रिनारायणाचे मूर्तीचे दर्शन दुरूनच घ्यावे लागते. कारण मूर्ति परिसाची आहे अशी लोकांची समजूत असल्यामुळे तेथे जवळ जाऊन कोणी लोखंडाचे सोने करतील या भीतीने देवळाचे गाभाऱ्यात यात्रेकरूंना जाण्यास बंदी आहे. पण महाराजांना मात्र असा काही प्रतिबंध न होता त्यांनी अगदी जवळ जाऊन दर्शन व पूजन केले.

गंगोत्रीस गेल्यावेळी तेथे स्नान करताच थंडीने महाराजांचे अंग अगदी गारठून गेले. काही हालचाल होईना. इतक्यात कोणी पेटलेली शेगडी आणून ठेवली. बराच वेळ शेकल्यावर अंगांत ऊब आली. अग्निस्पर्श न करण्याबद्दल श्रीदत्तांची आज्ञा होती. पण या ठिकाणी मात्र ती पाळता आली नाही.

श्रीक्षेत्र हिमालयः 

उत्तराखंडात. गंगा नदीकाठी.शके १८१६-१७ व १८१७, इस. १८९४-९५ व १८९६. ४ था व ५ वा दोन चातुर्मास झाले परंतु ते अज्ञातवासात झाल्यामुळे माहिती उपलब्ध झाली नाही.

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

चातुर्मास ६- श्रीक्षेत्र हरिद्वार उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९६, शके १८१८

ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे एकाएकी असा चमत्कार घडला की, एका ब्राम्हणाच्या अंगावर फोड झाले होते व तो फार गांजला होता. त्याला कोणीतरी सांगीतले की तू महाराजांच्या पायांचे तीर्थ घेतले तर तुझा रोग बरा होईल. तो ब्राम्हण संधीची वाट पाहूं लागला. एके दिवशीं महाराज लिहिण्यास मांडी उपडी करून बसले होते. त्या वेळी त्यांचे पाय मागें होते. ब्राम्हणानें ती संधी साधून पाठीमागे जाऊन महाराजांच्या पायांवर पाणी घातलें व त्यांना शिवून ते सर्व तीर्थजल गोळा करून पिऊन टाकले व अंगाला लावले. महाराजांनी एकदम मागे वळून असे करण्याचे कारण त्या ब्राम्हणाला विचारले, तेव्हा त्याने व्याधींच्या परिहार्थ एकाच्या सांगण्यावरून आपण असे केले आहे, असे सांगून अपराधाची क्षमा मागितली. महाराज लगेच उठून गंगेवर जाऊन स्नान करून आले पण त्यांच्या चित्तास समाधान वाटेना. रात्री स्वप्नांत एक चांडाळीण महाराजांना शिवली. त्यांनी लगेच उठून देवाचे ध्यान केले. सकाळी उठून पहातात तों सर्व अंगभर फोड उठले आहेत. त्या रात्री द्रृष्टांत झाला कीं 'अनअधिकारी माणसाला पायाचें तीर्थ दिल्यामुळे हा त्रास भोगावा लागला. तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेलें नाहीं. करितां तीन दिवस नर्मदेचे स्नान केल्यावर शरीर पूर्ववत् चांगले होईल".

त्याप्रमाणे गंगेची अनुज्ञा घेऊन महाराज किनारी येण्याकरितां ब्रम्हावर्ताहून निघाले. महाराज नर्मदातीरीं नेमावर येथें येऊन पोंचले व नर्मदामातेची नमस्कारपूर्वक प्रार्थना केली कीं 'माझ्या थोड्या अपराधाबद्दल केवढी  ही कडक शिक्षा केली? माझ्याशिवाय तुझें महत्व वाढविणारा दुसरा कोणी नाही काय?' अशी प्रार्थना करून तिथे मुक्काम केला. तीन दिवसांत नर्मदामातेच्या स्नानानें तो विस्फोटक रोग बरा झाला. त्यावेळी नर्मदालहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली. नेमावर हे नर्मदेचे नाभी नाभिस्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे.
(संदर्भ ग्रंथ:श्री गुरुदेव चरित्र विद्यावाचस्पती, श्री दत्तात्रय कवीश्वर शास्री, प. पू. वासूदेवानंदसरस्वतीमहाराज व प.पू. श्रीलोकनाथतीर्थस्वामीमहाराज स्मारक ट्रस्ट, पुणे ४११००४)

३ रा व ६ वा चातुर्मास
श्री क्षेत्र हरिद्वारः शके १८१६-१७,१८१८ व इस.१८९४-९५ व इस.१८९६ दोन चातुर्मास झाले. उत्तराखंडात  गंगानदीकाठी,  रेल्वेस्टेशन, अहल्यादेवी होळकर धर्मशाळेजवळ दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम होता. भगवान दत्तात्रय तपःस्थली कुशावर्त महातिर्थ, कुशाधार महातीर्थ हरिकीपावडी हरिद्वार.

हिमालयातील यात्रा आटोपून महाराज शके १८१८ वैशाख पौर्णिमेचे सुमारास हरिद्वार येथे परत आले. या वर्षीचा चातुर्मास तेथेच झाला. तेथे या खेपेस सहा महिने मुक्काम होता. नंतर तेथून ब्रह्मावर्तास येण्याकरिता महाराज निघाले. बरोबरचे ब्राह्मण यात्रेकरू पूर्वीच पुढे निघून गेले होते. त्यामुळे व रस्त्यांत दक्षिणी ब्राह्मणांची सोय न झाल्यामुळे महाराजांना १८ दिवस उपवास घडला. काही ठिकाणी गुजराथी ब्राह्मणांकडून फळे मिळाली, तेवढी खाऊनच राहावे लागले. रस्त्यात एका गुजराथी ब्राह्मणाच्या बाईने शेंगाचे दाणे, चणे, व गहू भाजून त्याचे पीठ करून महाराजांचे बरोबर दिले होते. ते रोज पाण्यात कालवून खावयाचे आणि २०-२५ कोस चालावयाचे असा महाराजांचा त्यावेळी क्रम असे. असा प्रवास करीत महाराज ब्रह्मावर्तास येऊन पोचले.

ब्रह्मवर्तास एका ब्राह्मणाने काही पुस्तके घेण्याकरिता काही पैसे ठेवले होते. तेथे कुलूप किल्ली काही नसल्यामुळे पैसे बाहेरच पडले होते. ते एका चांगल्या घराण्यातील मुलाने चोरले. पुष्कळ शोध केला तरी पत्ता लागेना. शेवटी महाराजांनी चोरीचा तपास करण्याविषयी दत्तमहाराजांच्या गणास आज्ञा केली. लगेच एका गणाने त्या मुलाच्या शरीरात प्रवेश करून मी चोरी केली असे महाराजांचे समक्ष त्याचेच तोंडाने कबूल करण्यास लावले. नंतर त्या मुलाने पैसे परत आणून दिले.

तीन दिवसात नर्मदामातेच्या स्नानाने तो विस्फोटक रोग बरा होऊन महाराजांचे शरीर पूर्वीप्रमाणे उत्तम झाले. त्यावेळी नर्मदालहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली. नंतर तेथून निघून ब्रह्माणी घाटावर महाराज आले. घाटावरून चालण्याचे वेळी पाय घसरून महाराजांचे कमरेत लचक भरली. त्यामुळे हालचाल अगदी बंद झाली व महाराज निजून राहिले. भिक्षेची वेळ झाली तरीसुद्धा उठता न आल्यामुळे तसेच पडून राहिले. हे पाहून नर्मदामाता कुमारिकेच्या रूपाने येऊन महाराजांना म्हणाली की, ‘महाराज! भिक्षेची वेळ झाली, उठा, मी तुमची लचक बरी करते.’ इतके बोलून त्या मुलीने थोडेसे भस्म घेऊन व मंत्र म्हणून ते महाराजांच्या कमरेस चोळले व उभे राहून पाय खाली बडवा असे महाराजांना सांगितले. त्याप्रमाणे महाराजांनी करताच खरोखरीच त्यांना उत्तम चालता येऊ लागले. महाराजांनी नर्मदामातेला ओळखून तिची स्तुती केली. नंतर नर्मदामाता गुप्त झाली.

श्री टेंबे स्वामी
श्री टेंबे स्वामी 

चातुर्मास ७ - श्रीक्षेत्र पेटलाद मध्यप्रदेश, नदी- मही, इ. स. १८९७, शके १८१९

इंदूर संस्थानांतील एक मोठे गाव पेटलाद हे महीनदीचे तीरावर आहे. येथे ब्राह्मणवस्ती चांगली आहे. या गावी महाराजांनी शके १८१९ साली चातुर्मास केला. तेथेच आषाढ शुद्ध पक्षात दत्तलीला-मृतसिंधु हा प्राकृत एक सहस्त्र ओव्यांचा ग्रंथ महाराजांनी रचला. चातुर्मास संपल्यावर पेटलाहून निघून महाराज चिखलदा या गावी आले. येथे व्यंकटराव नावाचा गृहस्थ पत्नी मृत झाल्यावर नोकरी सोडून देऊन नदीतीरावरील एका मंदिरात राहात असे. महाराज चिखलद्यास आल्यानंतर आपणास योग्याभ्यास सांगण्याविषयी त्याने महाराजांना विनंती केली. त्याप्रमाणे त्याला षट्क्रिया व प्राणायाम याचे शिक्षण महाराजांचेपासून मिळाले.

‘सगुण परमेश्र्वराची उपासना करून मनुष्याने कृतार्थ व्हावे. सगुण उपासना केल्यावाचून ब्रह्मसाक्षात्कार होणार नाही. राजाला जसा आपल्या शिक्कामोर्तबाचा आणि कायद्याचा अभिमान असतो, तसाच देवाला आपल्या सगुणरूपाचा व वेदशास्त्राचा अभिमान आहे. शिक्कामोर्तब म्हणजे राजा नाही हे खरे; पण शिक्कामोर्तबाशिवाय राजाचा व्यवहार होऊ शकत नाही. आणि राजाशिवाय नुसत्या शिक्कामोर्तबालाही महत्त्व नाही. प्रजाजनांनी राजाचे कायदे पाळले म्हणजे राजाला जसा संतोष होतो, तसाच संतोष शास्त्रनियम पाळल्याने ईश्र्वराला होतो. करिता शास्त्रज्ञेप्रमाणे वागून ईश्र्वराची सेवा करा व आपले कल्याण करून घ्या.’ याप्रमाणे सर्वांना उपदेश करून महाराज चिखलदा सोडून निघाले. ते शके १८२०मध्ये वैशाख शु. ॥१० या दिवशी नर्मदातीरावरील तिलकवाडा या गावी येऊन पोचले.