स्थान: ग्वारी घाट जबलपूर.
सत्पुरूष: श्री नृसिंह सरस्वती स्वामी, श्री सत्यानंद संन्यासी
विशेष: श्री गुरुंची पद चिन्हे असलेली शिळा.
हे पादुका मंदिर परमपवित्र श्रीक्षेत्र नर्मदा तीरी ग्वारीघाटावर जबलपूर येथे आहे. नर्मदा नदीचे माहात्म्य इतर नद्यांपेक्षा वेगळे आहे. ही एकमेव नदी आहे जिची प्रदक्षिणा केली जाते. “नर्मदे मंगळ देवी रेवे अशुभनाशिनी” असे तिचे वर्णन करतात. हिचे आगळे पावित्र्य माहात्म्य वेदकालापासून असल्याने तिच्या पुण्यतटावर अनेक ॠषिमुनींनी तप केले व आश्रमही स्थापन केले आहेत. गरूडेश्वर ओंकारेश्वर इ. इ. पवित्र स्थाने हिच्या तिरावर आहेत. या नदीत सापडणारे तांबडे खडे “नर्मदा गणपती” म्हणून देवघरात ठेवले जातात व पूजन केले जाते.
श्रीपादश्रीवल्लभ अवतारानंतर दत्तात्रेयांचा नृसिंहसरस्वती हा अवतार जगन्मान्य आहे. कर्मयोगी व सर्व योगविद्यासंपन्न व प्रभुत्व असलेला हा दत्तावतार होय. भारत भ्रमण करताना सर्वत्र धर्मप्रसार अधर्मोच्चाटण करून संसारी भक्तजनांचे आधीव्याधी निवारण करून त्यांना सुखी करून सन्मार्गी लावले.
जबलपूर हे नावच मुळी ‘जाबाल’ या ॠषिवरून पडले. जसे ग्वाल्हेर हे ‘गालव’ मुनीचे नावावरून पडले तसे. या जाबाल ॠषीची तपोभूमी म्हणजेच नर्मदाकाठचे आजचे हे जबलपूर या पवित्र तपोभूमीत श्री नृसिंह सरस्वती जवळपास ५०० वर्षापूर्वी येते झाले असा अंदाज आहे.
श्री क्षेत्राचा इतिहास
श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी तपस्या करून तपोसिध्दता मिळविली. सदगुणी, सदभावी, सध्दर्मी, सालस, सदवर्तनी शिष्यांची श्रृंखला निर्माण करावयाची होती. असे खरे सत्पात्र शिष्य जेथे असतील तेथे सदगुरू स्वत: जातात दत्तावतारी नृसिंह सरस्वती महाराज “जानदिप लावू जगी” या ध्येयाने भारत भ्रमण करते झाले. त्याचे एक शिष्य नाशिकवासी श्री सत्यानंद संन्यासी जे गुरूआदेशानुसार “गोरीघाट” या जबलपूर जवळच्या भागात नर्मदा नदीतीरी तपस्या करीत होते. त्याचे तपाचरणफळ श्री नृसिंहसरस्वती महाराज देणार होते. त्याप्रमाणे सत्यानंदाचे तप:फल देण्यासाठी स्वत: नृसिंह सरस्वती तेथे गेले त्यांनी मनोकामना सत्यानंदाना विचारली असता सत्यानंदानी त्यांना श्रीगुरूचरण सदैव जवळ असावेत हे स्पष्ट सांगितले व ती मनीषा पूर्ण करावी अशी प्रार्थना केली. खरे भक्त सदा सदगुरूसेवाच मागतात व्यावहारिक काहीच मागत नाहीत. ऎहिक न मागणारा शिष्यच खरा भक्तीसायुज्ज असतो त्याप्रमाणे सत्यानंदानी जे अखंड गुरूचरणसान्निध्य मागितले त्यावरून त्यांची प्रखर भक्तीसोज्वळता प्रगट झाली. अखण्ड गुरूसहवास भक्तांना वेगवेगळ्या ठिकाणच्या त्या त्या ठिकाणी देणे ही सदगुरूंच्याच किमयेची गोष्ट असते हे अशक्य आपणास वाटते पण योगसिध्दांना ते मुळीच अशक्य नसते. त्यामुळे त्यांनी सत्वर ‘तथास्तु’ म्हटले पण नरदेह हा तर नश्वर जे जे उत्पन्न होते ते ते विलय पावते. उत्पत्ती, स्थिती व लय हा क्रम या भूतलावरील सर्व सजीवांना सारखाच लागू होतो. म्हणूनच पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेत “वासांसिजिर्णाणी वासासिनिर्णानी यथा विहाय---या श्लोकाव्दारे हे स्पष्ट केले आहे. आत्मा चैतन्य अमर पण देहवस्त्र नश्वर तेव्हा ते जीर्ण झाल्यावर आत्मा त्याचा त्याग करून पुन्हा दुस-या देहवस्त्रात विधीलिखीताप्रमाणे येतो व काहीही दोष । पाप शिल्लक न राहिल्यावर परमपदास जातो व मुक्त होतो. त्याचा “जन्ममृत्यू फेरा” चुकतो.
त्याप्रमाणे श्री नृसिंहसरस्वतींनी त्याला अखण्ड श्रीगुरूचरण लाभावेत या त्याच्या कामनापूर्तीसाठी त्याला नर्मदेत देहविसर्जन करण्यास सांगून त्यानंतर त्याला देवयोनीत अखण्ड सहवास देण्याचे वचन दिले व ते तेथून गुप्त झाले पण ज्या शिळेवर ते उभे होते त्या शिळेवर त्यांनी स्वत:ची पदचिन्हे उमटविली.
या नृसिंहसरस्वतींच्या शिळेवर उमटलेल्या पादुकाचिन्ह प्रतिकाचे श्री सत्यानंदस्वामींनी आत्यांतिक श्रध्दा व आनंदाने पूजन केले. “मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही” याप्रमाणे प्रत्यक्ष सदगुरूंचे चरण ख-या भक्तांना मिळतात नंतर श्री सत्यानंदानी नर्मदेत देहविसर्जन केला व ते देवयोनित नागरूपाने प्रविष्ट झाले.
श्रीक्षेत्राचे प्रकटीकरण
त्यानंतर कालांतराने प्रदिर्घ कालखंडात त्या पादुका त्यावर मातीची पुटे चढून थरावर थर बसून दिसेनाश्या झाल्या. पण श्री नृसिंह सरस्वती महाराजांची योजना वेगळीच असली पाहिजे. कारण किती काळ अज्ञात राहून प्रगट कधी केव्हा व्हावयाचे हे त्यांनी आधीच ठरविलेले असते.
असाच एक प्रसंग घडला व या पादुका पुन: प्रकाशात आल्या ती घटना अशी एक व-हाड कन्या संसारातील ताप । जाच । कष्ट इ. नी इतकी वैतागली की तिला जीवन नकोसे झाले व तीने आत्महत्येचा कृतिनिश्चय केला व आपल्या लहान मुलीसह जीव देण्यासाठी ती नर्मदेवर आली व ते कृत्य करण्यास निघाली असता तिला अकस्मात एक पंडया भेटला. तिची व्यथा त्याने जाणली व त्या आत्महत्येच्या विचारापासून त्याने तिला परावृत्त केले. पराकोटीच्या मानसिक वैफल्यातून आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या जीवास त्या निर्णयापासून प्रवृत्त करणे व मनास पुनश्च उभारी देऊन जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हे साधे सोपे काम नव्हे ते काम ईश्वर या ईश्वरी अवतार रूपातील संत महात्मेच करू शकतात. असाच एक प्रसंग श्री गुरुचरित्रात वर्णिलेला आहे.
साक्षात नृसिंह सरस्वती स्वामीच तिच्या पूर्वभाग्याने, पूर्वपुण्याईने तिला पंडयाचे रूपात भेटले. त्यांनी तिचे विचारपरिवर्तन केले व सीताफळाची बाग होती तेथे पादुकांचा शोध घेण्याची प्रेरणा दिली त्या व-हाडी कन्येचे नाव “झिंगुबाई” होते. जीवावर उदार झालेल्या झिंगुबाईने मरणाची भीती सोडलीच होती. एकतर पादुका तरी मिळतील नाहीतर सर्पदंश तरी होईल. अशा निर्धाराने तीने वारूळात हात घातला व वारूळ उकरू लागली. वारूळ उकरता उकरता तिच्या हाताला अति थंडगार स्पर्श झाला व क्षणभर तिला वाटले सर्व संपले. पण खरे तर हा नवं जीवन देणारा स्पर्श होता. हा स्पर्श त्या शिळेचा होता ज्यावर नृसिंहसरस्वतींची पाऊले उमटली होती. झिंगुबाई सावरली व तिने ती शिळा बाहेर काढली व त्यावरील पादुका पाहून तिला अत्यानंद झाला. मृत्युऎवजी अमृतकलश हाती आला व तिचे जीवन धन्य झाले. तिच्या उव्दीग्न वैतागलेल्या मनाला एकदम उभारी आली. उत्साह व आनंद यांनी मन भरले. विलक्षण उमेद प्राप्त झाली व ती त्या पादुका चिन्हांकित शिळेच्या योग्य त्या तजवीजीला लागली. ते सर्व स्थान साफसफाई करून स्वच्छ केले व त्या ठिकाणी छोटेखानी टुमदार देवळी निर्माण केली. त्यानंतर यथाआर्थिक कुवत त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या प्रमाणात तिने दत्तजयंती उत्सवही सुरू केला. तिची श्रध्दा व भक्ति आणि प्रयत्न यामुळे ईश्वरकृपा होऊन त्या स्थानाची कीर्ती दूरवर पसरू लागली. स्वत: नृसिंहसरस्वती महाराजच अनेकांना दृष्टांत देऊन या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करू लागले. लोकांना प्रचिती येत गेली व हे स्थान सिध्द जागृत असल्याचे जाणवू लागले. आजही अनेक भक्त कामनापूर्तीचे आपेक्षेने तर काही कामनापूर्ण झाल्याने नवस फेडण्यासाठी येथे येताना दिसतात.