कन्यागत महापर्वकाल

कन्यागत महापर्वकाल
कन्यागतातील श्री गुरूंचे स्नान शुक्ल तिर्थ

नवग्रहांपैकी ज्ञानी, सामर्थ्य संपन्न आणि भव भयाच्या व्यथांचे हरण करणारा ग्रह म्हणजे गुरु. हे गृहराज गुरु प्रति बारा वर्षांनी कन्या राशीला येतात आणि वर्षभर राहतात या वर्षभराच्या काळाला  कन्यागत पर्वकाळ असे संबोधिले जाते. महाबळेश्वर येथे उगम पावलेली कृष्णा १२८० कि. मी. प्रवास करीत विशाखापट्टणम येथे पूर्व सागराला मिळते. या दरम्यान ५९ उपनद्या मिळतात. श्रीक्षेत्र माहुली येथे कृष्णेला वेण्णा नदी येऊन मिळते. इथूनपुढे तिला कृष्णावेणी असे म्हणण्याचा प्रघात आहे. पुढे कऱ्हाड येथे कोयनेशी संगम झाल्यानंतर ती श्रीक्षेत्र नरसिंह वाडी येथे दत्तक्षेत्री येते. कृष्णा म्हणजे भगवान विष्णुचे जलरूप तर वेण्णा म्हणजे भगवान शंकराचे जलरूप आणि कोयना म्हणजे ब्राम्हदेवाचे जलरूप असे कृष्णा महात्म्यात वर्णिलेले आहे. याप्रमाणे कृष्णा, वेण्णा व कोयना यांचा एकभाव म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे जलरूप आहे.

कृष्णा नदी माहात्म्य

प.प. वासुदेवानंद सरस्वती कृष्णा लहरी ग्रंथात म्हणतात

भगवती  कृष्णा । सह्याद्री सुकन्या । जगी सर्वमान्या । जाहली गा ।।१।।
वाई ब्राम्हवृंद । जिचे असे मुख । नाभि स्थान देख । कुरुंगड्डी ।।२।।
नृसिंह वाटीका । सगुण पादुका । हृदय ते देखा। श्रीकृष्णेचे ।।३।।  
समुद्र संगमी । दोन ते चरण । करिती पावन । सर्व जगा  ।।४।।               
साजिरी गोजिरी । सगुण ही मूर्ती । सजलिसे किती । मनोहर  ।।५।।          
वासुदेवानंद। सरस्वती यति । स्तुती स्तोत्रे गाती। नित्य नेमे  ।।६।।
               

सह्याद्री पर्वतावर श्री क्षेत्र वाई येथे कृष्णा उगम पावते. वाई क्षेत्री जे ब्रम्ह वृंद वास करून आहेत ते या कृष्णेचे समुख म्हणून ओळखले जाते. श्रीक्षेत्र नृसिहवाडी  येथे असलेल्या मनोहर पादुका हेच कृष्णा नदीचे हृदयस्थान होय. आंध्र प्रदेशातील कुरगड्डी हे नाभिस्थान व बंगालच्या उपसागरास दोन प्रवाहाने मिळणारी कृष्णा हे तिचे दोन चरण होय.

भगवती कृष्णा । विष्णू स्वरूपिणी । गंगा ते चरणी । नित्य वाहे।।७।।
सदा सर्व काळ । गंगा ती पवित्र । जगा माजी श्रेष्ठ असे जरी ।।८।।              
तरी एक  न्यून । असे तिचे ठायी । राहातसे पायी । श्री  विष्णूच्या  ।।९।।      
जगी पापताप । धुवोनी टाकते । आपुलिया घेते। माथा सर्व ।।१०।।            
होतसे मालिन । येतसे धावून । व्हा वया पावन । कृष्णे पासी ।।११।।          
वर्षे बारा पाही । वाट ती बापुडी । कृष्णेमाजी बुडी । द्यावयासी ।।१२।।        
कन्यागताचे ते । करुनि निमित्त । कृष्णे अंगी येत । रहावया ।।१३।।

गंगा भागीरथी सर्व लोकांची पापे धुऊन टाकते मात्र स्वतः मालिन होते. अशी मालिन झालेली भागीरथी स्वतःची मालिनता धुऊन टाकण्यासाठी, अधमल हारक अतीव सुभगा अशा श्री कृष्णेजवळ  येते. पापताप् यातून निर्मल होऊन पुन्हा परत जाते. यासाठी तिला १२ वर्षे वाट पाहावी लागते. शेवटी कन्यागताचे निमित्ताने आपल्या जेष्ठ भगिनीकडे म्हणजे कृष्णेकडे येते. गंगा नदीचं काय पण जंबुद्वीपतील सर्व तीर्थे कृष्णेजवळ  येतात. आणि खऱ्या अर्थाने पावन होऊन पुन्हा आपापल्या ठिकाणी जातात. पण कृष्णा हि अशी एकमेव आहे की जी आपले स्थान सोडून अन्य कोठेही जात नाही. साधु संत, यति, ऋशी, मुनी, देवादीक, आदी सर्व श्रीकृष्णेच्या अश्रयाला येतात व तेथेच आश्रम थाटून वास्तव्य करतात. अतिशय शुद्ध भक्तिभावाने एकवेळ स्नान व जलपान जर एखाद्याने केले तर तो कायिक वाचिक व मानासिकद्रीष्ट्या पवित्र व शुद्ध होऊन जातो. इतकेच काय पण एखाद्याने दूरवर राहून तेवढ्याच शुद्ध भावनेने कृष्णेचे स्मरण केलेतरी जन्मांतरीचे दोष जातात. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही यावे. ती कुणालाच परत करत नाही. गाईंची तृशा भागवते आणि व्याघ्रा दिकांना मारते असे कधीही घडत नाही. कन्यागत पर्वकाळात जे लोक कृष्णेकाठी श्राद्ध, दानादिक कर्मे करतात तेव्हा जे पुण्य जोडले जाते, त्याची  ब्रह्मदेवाला सुद्धा गणना करता येत नाही. मग  इतरांची काय कथा! जे पातकी नरकात पिचत पडलेले असतात त्यांना या कृष्णातीरावर वृषोत्सर्ग विधी किंवा त्रिपिंडी नारायण नागबली यासारखे विधी त्याच्या वंशातील कोणी एखाद्याने केलातर अश्या पातक्याना सुद्धा मोक्षप्राप्ती लाभते. एखाद्या निपुत्रिक स्त्रीने मनोभावे श्री कृष्णेची सेवा केल्यास तिला पुत्रप्राप्ती होऊन वंध्यत्वाचा दोष जातो. श्री कृष्णा हि भगवान दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आवडती व त्यांचा वर प्राप्त झालेली प्रियदर्शिनी आहे असे कृष्णा लहारीत नमूद केलेले आहे.

कन्यागतपर्व  काळामध्ये कृष्णेच्या उभय तटावरील तिर्थक्षेत्रांना मोठे महत्त्व येते. पण श्री क्षेत्र नृसिहवाडी येथे हा पर्वकाळ सामान्य न राहता तो महापर्वकाळ मानण्यात येतो.याचे कारण म्हणजे श्री नृसिंहवाडी म्हणजे कृष्णावेणी मातेचे हृदयस्थान असल्याचे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी नमूद केलेले आहे. या ह्रदय क्षेत्रात साक्षात श्री नृसिहसरस्वती दत्त स्वामी महाराज हे मनोहर पादुकांच्या रूपाने अधिष्ठित आहेत. कन्या राशीस गुरु येण्याच्या समयी श्री दत्तमहाराजांच्या स्वारीचे या क्षेत्रात असलेल्या शुक्ल तीर्थात महास्नान घडते. या महंनमंगल घटिकेची बारा वर्षे प्रतीक्षा करणारी पुण्यसलीला गंगा कृष्णेमध्ये प्रवेश करते. महाबळेश्वर येथील कृष्णेच्या उगमकुंडाजवळील कुंडातून गंगेचा प्रवाह सुरु होतो आणि वर्षभर वाहत राहतो. अशा या महापर्व काळात वाडीक्षेत्र  कृष्णास्थान, तीर्थविधी पितृश्राद्ध अशा धर्मकृत्याचे फळ अनंत पटीने मिळते. या पर्वकाळास महाराष्ट्र व कर्नाटकात कन्यागत महापर्वकाळ तर आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात यास कृष्णा पुष्कर असे म्हणतात.

कृष्णा नदीचे माहात्म्य आणि कन्यागतातील अनुभूती

कृष्णा नदीचे दर्शन अत्यंत नयन मनोहर आणि मंगलदायी आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहरामध्ये तिचे स्वरूप खुलत जाते आणि ते अतीव आनंददायी आहे. साधू, संत, ऋषी, मुनी, योगीजन, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देवतांनाही कृष्णेचे सान्निध्य म्हणजे मुक्तीचे महाद्वार वाटते.  

भगवान वेदव्यासांनी, वाल्मिकी, अगस्ती, पराशर, अत्री, भृगू, मरीची इ. ऋषींनी कृष्णा नदीचे हे स्वरूप ओळखले होते. कृष्णेच्या तीरावरील विविध तीर्थक्षेत्रांची अनुभूती त्यांनी घेतली होती. अगदी अर्वाचीन काळातही शंकराचार्य, एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, गुळवणी महाराज, श्रीधरस्वामी महाराज इ. अधिकारी व्यक्तींनी कृष्णा नदीचे माहात्म्य जाणले होते. कृष्णा नदीच्या माहात्म्यासंबंधीचे वर्णन पद्मपुराण, ब्रह्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये सांगितले आहे. पांडवांच्या वनवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कन्यागत महापर्वकाल सुरू होता. त्यावेळी युधिष्ठिराने कृष्णातीरी सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले होते. विजयवाड्याजवळ अर्जुनाने भगवान शंकराची उपासना करून दिव्य अस्त्र मिळविले होते. भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. त्या पातकापासून त्यांना कृष्णातीरीच मुक्ती मिळाली. कृष्णेची कृपा म्हणजे साक्षात विष्णूची आणि श्रीदत्तप्रभूंचीच कृपा अशी अनुभूती ज्ञानी आणि भाविक भक्तांना आलेली आहे.

श्रीमद् शंकराचार्यांनी कृष्णा नदी म्हणजे साक्षात भगवान विष्णूच असल्याची अनुभूती घेतली होती. शंख, चक्र, गदा आणि पद्म हाती धारण करणारी, पितांबर नेसलेली, कपाळावर कस्तुरी गंध लावलेली, सुहास्य प्रसन्न वदनी अशा कृष्णा नदीमध्ये त्यांना भगवान विष्णूचे दर्शन झाले. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी कृष्णा नदीचे हे विष्णुरूप जाणले होते. रामदास स्वामींनीही कृष्णावेणी म्हणजे विष्णू आणि शंकर, हरि आणि हर या स्वरूपामध्ये एकत्व अनुभविले होते.

कृष्णा नदीमध्ये दत्तात्रेयांची त्रिगुणात्मकता व्यापून राहिली आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी श्रीकृष्णालहरी या कृष्णा नदीच्या काव्याची रचना करताना पहिल्याच चरणामध्ये कृष्णेच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन केले आहे. त्यामध्ये चार बाहू, तेजस्वी कांती, पाण्याने भरलेल्या ढगासारखा सावळा रंग, सुहास्य प्रसन्न असे मुख, नक्षत्रासारखे टपोरे डोळे, कपाळावरील आकर्षक कुंकुमतिलक आणि सर्व प्रकारचा उत्कर्ष साधून देणारी कृष्णा नदी असे तिचे वर्णन केले आहे. तिच्या उगमस्थळी म्हणजे सह्याद्री पर्वतावर महाबळेश्वर क्षेत्री तिचे मुख आहे. नृसिंहवाडी हे तिचे हृदय आहे. कुरवपूर या ठिकाणी तिचे नाभिस्थान आहे आणि जिथे ती सागराला मिळते ते ठिकाण म्हणजे तिचे दोन चरण आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सागराला मिळताना कृष्णा नदीचे दोन प्रवाह तयार होतात. त्यामध्ये कोरोमंडलचा त्रिभुज प्रदेश आहे. तेथून पुढे ती दोन मुखांनी सागराला मिळते. दोन चरणांची अत्यंत समर्पक उपमा अशाप्रकारे सिद्ध होते.

कृष्णा नदीचे माहात्म्य आणि गुणगान कितीही केले तरी ते अपुरेच आहे. सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी, सर्वांचे पालनपोषण करणारी, भुक्ती आणि मुक्ती प्रदान करणारी, सर्व प्रकारच्या पापांचे आणि संकटांचे हरण करणारी, आरोग्य आणि संपत्ती प्रदान करणारी, सर्व दुःखांचे निवारण करणारी, कलियुगातील एकमेव तारणहार महापुण्यदायिनी अशा श्रीकृष्णामातेला वंदन करू

 या आणि तिची कृपा आपल्या प्रत्येकावर व्हावी म्हणून शरणागत होऊन तिच्या चरणी लीन होऊ या कन्यागत महापर्वकालामध्ये कृष्णा नदीची अनुभूती विलक्षण आणि अद्भुत असते. बारा वर्षातून एकदा येणारा कन्यागत महापर्वकाल हा सोहळा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदातरी नक़्कीच अनुभवला पाहिजे !

कृष्णा स्नानाचे फळ

एक महिनाभर रोज नियमितपणे  स्नान केल्यास' 'पराक 'व्रत केल्याचे फळ मिळते. थंडीच्या महिन्यामध्ये कृष्णेत स्नान केल्यास सहा पराक व्रते केल्याचे पुण्य प्राप्त होते. फक्त माघ महिन्यात सुर्योदया पूर्वी कृष्णेत स्नान केल्यास दोन पराक व्रते केल्याचे फळ मिळते. एक वर्षभर इंद्रियांवर संयम ठेऊन रोज कृष्णा नदीत स्नान केल्यास सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होऊन मुक्ती प्राप्त होते. आता कोणत्या विशेष अशा पर्वकाली स्नानाची फलश्रुती पाहू. मंगळवारी जर कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असेल तर, त्या दिवशी श्रवण नक्षत्र असेल त्या दिवशी, द्वादशी, रविवारी कृष्णा स्नान केल्यास इष्ट कामना सिद्धीस जातात. तसेच पौर्णिमा, संक्रांति, अष्टमी, चंद्र सूर्य ग्राहणाचे दिवशी स्नान केल्यास १००यज्ञ केल्याचे फळ मिळते. श्रवण नक्षत्र, अश्विनी नक्षत्र, असताना, व्यतिपात व वैधृती हे योग असताना, अमावास्येला कृष्णेत स्नान करणे. व  कृष्णेच्या तीरावर दान इत्यादी करणे अनंत पुण्य प्रदान करणारे आहे. तसेच अयन दिवस (दक्षिणायन-उत्तरायण सुरु होते ते दिवस) विषवदिन (सूर्याचे मेष व तूळ राशीतले संक्रमण दिवस) मनवादी व युगादी तिथी असताना कृष्णेत स्नान करून कृष्णेच्या पवित्र जलाने तर्पण श्राद्ध इ विधी केल्यास कल्प काळ पर्यंत पितरांची तृप्ती होते. तसेच वाईट स्वप्न पडल्यास, काही अशुभ घटना घडली असल्यास अग्निपीडा, ग्राहपीडा इ. नष्ट होतात. कृष्णातीरावर जन्म हे महतभाग्यच!  

'लब्ध।पी भरते  जन्म कृष्णवेण्य। च ये नरः मज्जनती न च पष्यनंती शोच्यास्तेपी च पापिन्ह।।

कृष्णेचे पाणी  प्राशन  केल्यास मनुष्याची पापबुद्धी नाहीशी होते. व पुण्यप्राप्ती होते. कन्या राशीत गुरू असताना फक्त एकदा कृष्णावेणीत स्नान केल्यास भगिरथीत ६०००० वर्षे स्नान केल्याचे फळ प्राप्त होते, असा उल्लेख  स्कंदपुराणात आढळतो. कन्येस गुरु असताना सोमवारी, द्वादशीस तीन वेळा समंत्रक स्नान केल्यास कोटी पापे नाहीशी होतात. तसेच वैधृती योग श्रवण नक्षत्र सोमवार या दिवशी कृष्णा स्नान केल्यास सात जन्मातील कोट्यवधी पापे नाहीशी होतात. त्याचप्रमाणे आईवडील व गुरु यांच्या ऋण।तून अशी मुक्ती होते. कृष्णेत स्नान करताना पुढील मंत्र म्हणावे,

सह्यपादोद्भवा देवी श्रीशैल्ये तुंगगामीनी । कृष्णवेणीती विख्याता सर्वपाप प्रण।शिनी ।।
सह्य पादोदभवा देवी कृष्ण वेणीती विश्रुता । सर्वपपविषुध्यर्थ स्नास्ये देवि तवा मभसि ।।

kanyagatmhaaparvakaal
कन्यागत महापार्वकाल, नृसिह वाडी

कन्यागत महापार्वकल व नृसिंह वाडी

कृष्णा तीरावरील सर्वत्र क्षेत्रे परम पवित्र आहेत. तथापी कृष्णा पंचगंगेच्या संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज बारा वर्षापर्यंत येऊन राहिले. प्रमुख हेतू दोन -
१) तपाचरण
२) भक्तोद्धार.

महाराजांच्या एक तपाच्या वास्तव्याने मुळातच पवित्र स्थान असलेले हे स्थान महाराजांच्या तपाचरणांने, ही तपोभूमी अधिक तप:पूत झाली. नृसिंह सरस्वतींच्या या निवासामुळे नृसिंहवाडी स्वनामधन्य झाली. अनेकांचे हे कुलदैवत तर असंख्यांचे हे आराध्य दैवताचे स्थान झाले. या ठिकाणी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा इत्यादि दक्षिणात्य भागातून तसेच गुजरात, उत्तर प्रदेश इ. भागातून सुद्धा असंख्य देशभक्त येऊ लागले. दत्तमहाराजांना मनोकामना सांगू लागले आणि ती मनोकामना महाराज पूर्ण करू लागले. श्रीकृष्णामाता व श्री गंगामाता यांच्या भेटीच्या आणि त्या नंतरच्या एक वर्षाच्या कालखंडाला कन्यागत महापर्व असे म्हणतात.

या महापर्वकाळात पापविनाशार्थ आणि पितरांच्या उद्धारार्थ स्नानविधी, तीर्थश्राद्ध, गंगापूजन, श्रींची महापूजा, महानैवेद्य इ. करण्याची पूर्वापार परंपरा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे चालत आली आहे. 

प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी सांगतात –
गते जीव कन्यां जगति बहुमान्यां शिखरिणी ।
ह सह्ये त्वां धन्या जननि भगिनीवामरसरित् ॥
समागत्याप्यद्वं परमनियमा तिष्ठति मुदा ।
नम: श्री कृष्णेते जय शमित तृष्णे गुरुमते ॥

अर्थात्, हे कृष्णावेणी ! जगन्माते ! भगवान दत्तगुरुंना मान्य असलेल्या आणि भक्तगणांच्या तृष्णेचे (तहानेचे) शमन करणाऱ्या तुला नमस्कार असो. (कारण) कन्या राशीस गुरु (जीवे) गेला असला सह्य पर्वतावर उगम तुला (तू ज्येष्ठ भगिनी असल्याने) गंगा नदी एक वर्षापर्यंत तुझ्या भेटीसाठी येऊन आनंदाने राहते. ग्रहराज गुरू प्रत्येक राशीत एक वर्ष म्हणजे अन्य सगळ्या राशींची आवर्तने करून गुरूला कन्या राशीत आगमन करण्यास बारा वर्षाचा कालावधी लागतो. सूज्ञाना हे सांगायला नको. हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य असले तरी भक्ति भावरसामुळे हे आणखी भावपूर्ण बनते.

सह्य पर्वतावर गंगानदीचे एक कुंड आहे. अकरा वर्षे ते पूर्ण कोरडेच असते. आणि कन्याराशीत गुरुराजाचे आगमन होताच ते कुंड ओतप्रोत भरून वाहू लागते. आणि ते पाणी कृष्णेच्या प्रवाहात एकरूप होऊन जाते. भूगोल शास्त्र आणि भक्तिभावना यांचा हा संगम नव्हे काय ? 

कन्यागत – पुराणोक्त माहात्म्य 

काशी क्षेत्रात एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव दिवोदास. त्यावेळी सर्व देवादिकांनी व ऋषिमुनींनी काशी क्षेत्राचा परित्याग केला व ते अन्यत्र गेले. तेव्हा काही ऋषीमुनी आणि स्वत: भगवान दत्तात्रेय इत्यादी योगी तीर्थयात्रा करीत सह्यगिरीवर आले. तेव्हा त्यांना श्री भगवती कृष्णेचे दर्शन झाले. आनंद झाला. कृष्णेप्रमाणेच गंगामातेने सुद्धा पृथ्वीवर असावे या हेतूने सर्वांनी तपाचरण करून भगवान नारायणांना प्रसन्न करून घेतले. नारायणाने ‘वरं ब्रूहि’ म्हटल्याबरोबर सर्वजण म्हणाले. 

गंगामातेला भूमंडळावर चराचरांच्या कामनापूर्तीसाठी आणि जगदोद्धारासाठी पाठवा. तात्काळ भगवंताच्या चरणांगुष्ठापासून गंगेची उत्पत्ती झाली. आणि ती कृष्णेला मिळाली. संयोग आनंदमय झाला आणि पुढील एक वर्षभर राहण्याचा नियम गंगामातेने केला.