प. पू. पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर)

प.पू. पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर)
प.पू. पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर)

जन्म: ८ नोव्हेंबर १९१२, नरक चतुर्दशी, जिंतूर तालुका, पाचलेगाव 
आई/वडील: कृष्णाबाई /राजारामपंत पांडे (कुलकर्णी)   

समर्थ रामदास स्वामींनी प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांकरवी स्वराज्य स्थापनेचं भव्यदिव्य कार्य करवून घेतलं, अगदी तशाच बिकट परिस्थितीत भारतमातेच्या मुक्तीचं कार्य जनता जनार्दनाच्या मदतीनं सिद्धिला नेणारे अगदी रामदास स्वामींचाच पुढचा अवतार म्हणता येईल असे संत म्हणजे प. पू. पाचलेगावकर महाराज. 

समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाशी खूप गोष्टींमध्ये साधर्म्य असणारे पाचलेगावकर महाराज ह्यांच्या कार्यासाठी सतत सगळीकडे संचार असे. त्यावरुन त्यांना दिलेलं ‘संचारेश्वर’ हे नाव सार्थच सिद्ध होई. 

प.पू. पाचलेगावकर महाराजांची गुरुपरंपरा श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) – श्री नारायण दत्तानंद सरस्वती – श्री माधवाश्रम स्वामी अशी होती. त्यामुळे श्री पाचलेगावकर महाराजांच्या चरित्राच्या अमृतपानाचा आनंद लुटताना सुरुवात थेट श्री नारायण दत्तानंद सरस्वती स्वामींपासून करावी लागते. 

श्री. नारायण दत्तानंद सरस्वती हे वऱ्हाडतले, पण त्यांचं जन्मगाव ज्ञात नाही. अजानुबाहू आणि सुंदर देहयष्टी असलेले ते ऋग्वेदी ब्राह्मण. एम्. ए. पर्यंत शिक्षण झालेलं. मोठे अधिकारी. एकदा संस्थानाची तपासणी करण्यासाठी श्रृंगेरी इथल्या मुख्यपीठात गेले असताना त्यांना पीठाधिकारी शिवभिनव भारती यांचं दर्शन झालं. त्या वेळी ‘आता आपल्याला हेच काम करायचे आहे काय? आपला अवतार कशाकरता आहे?’ असं त्यांनी विचारताच स्वामींची पूर्वअवतारांची स्मृति जागृत झाली. मग काय, तिथंच त्यांनी राजीनामा लिहिला आणि अवतारकार्याला सुरुवात केली. नारायण दत्तानंद सरस्वती ठिकठिकाणी लोकांना धर्माचरणाचा उपदेश करत.

व्यंकटगिरीवर एकदा श्री नारायण दत्तानंदांची आणि श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामींची भेट झाली. वासुदेवानंद सरस्वतींकडून त्यांना दंडदीक्षा मिळाली. तेंव्हापासून ते स्वामी नारायण दत्तानंद सरस्वती या नावानं प्रसिद्ध झाले. स्वामी नारायण दत्तानंद सरस्वतींनी ठिकठिकाणी असलेल्या गुप्त मूर्ती, गुप्त देवालयं लोककल्याणाकरता प्रकट केली. ठिकठिकाणी तीर्थांची स्थापना केली. घटनांदूर इथल्या सोमेश्वर मंदिरात त्यांनी तीर्थांची स्थापना केली. तिथं त्यांची खोलीही आहे. लोणार आणि मेहकर याठिकाणी त्यांचा बराच काळ वास होता. औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, नाशिक, पालम, नागपूर अशा खूप ठिकाणी भ्रमंती करुन शेवटी ते वाडीला आले. त्यांनी माधवाश्रमस्वामींना आपण हा अवतार संपवणार असून पाचलेगाव इथं अवतीर्ण होणार असल्याचं सांगितलं आणि त्या वेळी आपल्याला स्मृतिसंदेश देण्याविषयी सांगितलं. स्वत:ची रुद्राक्षाची माळ, भस्माचा बटवा, वही इ. गोष्टी डोंगरावरच्या गुहेत ठेवून समोर दोन समया तेवत ठेवून ते पद्मासन घालून बसले. 

इकडे मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतुर तालुक्यातल्या पाचलेगाव नावाच्या एका छोट्या खेड्यात राजारामपंत आणि कृष्णाबाई पांडे (कुलकर्णी) हे पुण्यवान दांपत्य राहत होतं. सुशील, सात्विक, कर्तव्यदक्ष, सौजन्यशील आणि ईश्वरभक्तीपरायण अशा या जोडप्याच्या संसारात एकच उणीव होती. ती म्हणजे बाळाची, वंशाच्या दिव्याची. या एकाच कारणासाठी ते उभयता चिंतेत असत. 

एकदा आपण संन्यास घ्यावा असं डोक्यात येऊन राजारामपंत त्यासाठी परवानगी घेण्यासाठी लोणीला जाऊन प.पू. सखाराम महाराजांना भेटले. परंतु त्यांनी असा विषय काढताच प.पू. महाराज त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले “अविचार करु नका. देवाला घरी येऊ द्या.” राजारामपंतांना त्याच दिवशी रात्री भगव्या रंगाची वस्त्र परिधान केलेल्या एका महात्म्यानं स्वप्नात येऊन असं सांगितलं की, “आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्ही माघारी जावे.” सकाळी श्री. सखाराम महाराजांनी त्यांना खारीक आणि नारळाचा प्रसाद दिला, आणि घरी परत जायला सांगितलं. राजारामपंतांना त्या दिव्य स्वप्नामुळे आणि सखाराम महाराजांच्या आदेशामुळे परमानंद झाला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी श्री सखाराम महाराजांनी दिलेली ती फळं कृष्णाबाईंनी सेवन केली. राजारामपंतांनी महाराजांचा आशीर्वाद त्यांना सांगितल्यावर त्या लाजल्या आणि सुखावूनही गेल्या. साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी गेला. आणि हल्ली कृष्णाबाईंना असं वाटू लागलं की तासन् तास जप करावा. गावाजवळ असलेल्या श्री मुक्तेश्वराच्या मंदिरात जाऊन पूजा, आरती, भजन इत्यादी करावं. आणि हे सगळं त्यांनी आचरणात आणायला सुरुवात केली. तेंव्हा राजारामपंतांच्या हे पुरतं ध्यानात आलं की, आपल्याला झालेल्या स्वप्न दृष्टांताबर्हुकूमच हे डोहाळे आहेत. कृष्णाबाई त्यांना जेव्हा हे सांगत की, मला काशीला जाऊन विश्वनाथाची पूजा करावी, धर्माची स्थापना करावी, विश्वाचा उद्धार करावा, परदास्यातून मातृभूमीची सुटका करावी, दुर्जनांचा नाश करुन सज्जनांचं रक्षण करावं असं वाटतं, तेंव्हा ते सगळं ऐकून राजारामपंत सुखावून जात. पण दुसरीकडं त्यांना काळजीही वाटत असे. कारण जप, पूजन, भजन यामध्ये भोजन बाजूलाच रहात असे. आणि कृष्णाबाई तासन् तास यामध्ये रमून जात. 

म्हणता म्हणता वर्षातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवाळीचा सण आला. घराघरात चैतन्य पसरलं. दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्दशीचा. या दिवशी भगवंतानं नरकासुराला ठार मारून लोकांना भयमुक्त केलं. आणि आज याच दिवशी अशाच प्रकारचं कार्य करण्यासाठी स्वत: ईश्वरानं कृष्णामाईंच्या पोटी जन्म घेतला. घरोघरी दिवाळीचं मंगल वातावरण होतं. पण साक्षात् ईश्वराच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थच जणू हा उत्सव साजरा होत होता. अगदी संपूर्ण देशभर. ईश्वराच्या ह्या लौकीक जन्माची तारीख होती ८ नोव्हेंबर १९१२.

श्री मुक्तेश्वर खामगाव
श्री मुक्तेश्वर खामगाव 

नरश्रेष्ठ म्हणून जन्माला आलेल्या या बाळाचं ‘नारसिंह’ असं साजेसं नाव ठेवण्यात आलं. नारसिंह नाव धारण केलेल्या या दिव्य बाळाच्या बाळलीलाही इतर सामान्य बालकांपेक्षा फार वेगळ्या होत्या. ते पाळण्यात फारसं न थांबता जमिनीवरच खेळत असे. अंगावर कपडे ठेवत नसे. तरीसुद्धा कपडे घातलेच तर रडायला सुरुवात. कधी बाळाला पाजायला म्हणून आईनं पाळण्यापाशी जावं तर बाळ सापाशी खेळण्यात रंगून गेलेलं दिसायचं. सुरुवातीला तर हे दृश्य पाहून किंचाळत आई बेशुद्धच झाल्या. पाळण्यात बसलेला साप मारावा कसा, हे काठ्या घेऊन धावलेल्या लोकांनाही कळेना. शेवटी पाळण्यातला साप स्वत: होऊनच पाळण्याबाहेर येऊन साऱ्यांसमोर निघून गेला. आणि साऱ्यांनी नि:श्वास सोडला. घडल्या प्रसंगाचा अर्थ कसा लावाला हे कोणालाच कळेना.

हळूहळू बाळ रांगू लागला. एक दिवस श्री माधवाश्रमस्वामी तिथं आले. त्यांनी त्या दिव्य बालकाला नमस्कार केला. आणि राजारामपंतांना सांगितलं, “हे बाळ नसून प्रत्यक्ष ईश्वर आपल्या घरी अवतरलेला आहे. हा मोठा सिद्धयोगी होईल. संसारासारख्या लौकीक गोष्टींपासून तो अलिप्त राहील. हा धर्माची स्थापना करुन लोकांना उपासना आणि भक्तिमार्ग शिकवेल.” श्री माधवाश्रम स्वामींनी या दिव्य बालकाचं नाव ‘संचारेश्वर’ असं ठेवलं. पुढे काही दिवसांनी प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती पाचलेगावला आले. त्यांनी या बाळाचं दर्शन घेतलं आणि राजारामपंतांना सांगितलं की “आपण भाग्यवान आणि पुण्यवान असल्यामुळेच आपल्या घरी या बाळाच्या रुपानं परब्रह्म अवतरलेलं आहे.”

आता बाळ चालू लागला. बसून जेवू लागला. पण पंगतीला मित्रमंडळी मात्र लागायची. ३-४ वर्षाचं वय झाल्यामुळे हळुहळू मित्रांच्या घरी जाणंही सुरु झालं. पण बाळ मित्रांच्या घरी गेला की, कृष्णामाईंना काळजी वाटायची. कारण पाठोपाठ बाळानं केलेल्या खोड्यांच्या तक्रारी यायाल सुरुवात व्हायची. कुणाकडचा पाण्याचा रांजण पाडलेला असायचा, तर कुणाकडं गाईच्या धारा काढायचं काम चालू असताना वासरं सोडलेली असायची. “मी आता शेतावर जातो” असं म्हणत कुणाकडचे गोठ्यातले बैल सोडलेले असायचे, तर कुणाकडच्या नेमक्या मारक्या गाईसमोरच जाऊन स्वारी उभी असायची. घाबरुन जाऊन त्यांच्याकडल्या लोकांनी बघावं तर ती गाय बाळाचे पाय चाटत असायची. 

वेगवेगळ्या लीला दाखवत बाळ दिसामासानं वाढत होता. पाचव्या वर्षी राजारामपंत आणि कृष्णामाईंनी त्याचा मौजीबंधन संस्कार मोठ्या थाटात केला. नातेवाईकच काय पण पाचलेगाव आणि आजूबाजूच्या गावातले लोक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एक अतिशय संस्मरणीय असा तो सोहळा होता.

श्री माधवाश्रम स्वामी आणि संचारेश्वर
श्री माधवाश्रम स्वामी आणि संचारेश्वर

नारसिंहाला कायमच सोबत बालगोपाळांचा मेळा लागत असे. आईला जे मागेल ते मिळावं आणि नारसिंहानं ते साऱ्या बालगोपाळांना वाटून मगच स्वत: खावं हा प्रकार नित्याचाच झाला होता. एकदा कृष्णामाई लटक्या रागानं नारसिंहाला म्हणाल्या, “तू रोज पोरं जमवतोस आणि मला त्यामुळे रोज काही ना काही करावं लागतं.” नारसिंहानं ते शांतपणे ऐकून घेतलं. मात्र दुसऱ्या दिवशीपासून त्यानं सवंगड्यानं जंगलात घेऊन जायला सुरुवात केली. तरी देखील त्या अगोदर सगळ्या बालगोपाळांना दुपारी आईचा डोळा चुकवून घरी बोलावून खारीक, खोबरं, बदाम असा सुकामेवा पोटभर खायला घालणं त्यानं चालूच ठेवलं. त्यामुळे गोकुळातल्या गोपकुमारांसारखीच ही ही पोरं चांगली तयार झाली. 

राम आणि कृष्णाप्रमाणेच साक्षात् परमेश्वर असलेल्या नारसिंहाला लौकिक शिक्षण घेणं क्रमप्राप्त होतं. घरच्यांनी त्याला शाळेत घातलं. पण मुलगा एकपाठी असल्यामुळे त्याचा अभ्यास पटकन होऊन जाई आणि खेळणं सुरु होई. इतर मुलांबरोबर भेंड्या हुतूतू, आट्यापाट्या, दंड, कुस्ती इ. खेळ रंगत. एकदा या मुलानं वर्गात खेळायला म्हणून नाग आणला, आणि खेळून झाल्यावर वर्गातच सोडून दिला. त्याच्या विविध प्रकारच्या खोड्या पाहून शिक्षकांच्या मनात या मुलाला शिक्षा देण्याचे विचार वारंवार येत. “आपण सगळे शंकराचे दास आहोत त्यामुळे आपण त्याचं नामस्मरण करुया” असं सांगून हा साऱ्या मुलांना वर्गात शिवाचं नाम घ्यायला शिकवी. हे पाहून चिडलेले शिक्षक “तू शाळेत येऊन दुसऱ्यांचं नुकसान करु नकोस. त्यापेक्षा तू शिवमंदिरात जा.” असं त्याला बजावत. त्यामुळे बाराखड्या आणि जेमतेम पंधरापर्यंतचे पाढे यावरच नारसिंहाच्या शिक्षणाची इतिश्री झाली. आत्ताशी सात वर्षाचा झालेला हा जगावेगळा मुलगा. सारेजण त्याला “बाबा” म्हणून ओळखत.

बाबा - सात वर्षाचा हा मुलगा इतर मुलांपेक्षा फारच वेगळा आहे हे आख्ख्या पाचलेगावनं कधीच ओळखलं होतं कारण एवढ्या लहान वयातच त्यानं आजवर ज्या लीला दाखवल्या होत्या त्या मानवी विचारशक्तीतल्यादेखील नव्हत्या. आणि त्याच्या परिणाम म्हणूनच बाबाला लोक आता बाबा महाराज म्हणू लागले. दणकट बांधा, बसकं नाक, पाणीदार डोळे, जटा वाढलेल्या, प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा. कमरेला फक्त लंगोटी. संपूर्ण अंगाला विभूतीचं लेपन केलेलं आणि सोबत नाग. अशा वेशामध्ये बसलेल्या बाबाच्या दर्शनाला दूरदूरहून लोक येऊ लागले. भंडारा घालू लागले. 

बाबा घरात थांबत नाही. सारखा इकडं तिकडं हिंडत असतो आणि सारखा जंगलात जातो हे पाहिल्यावर कृष्णामाईंनी एक दिवस एक शक्कल लढवली. बाबाला प्रेमानं मांडीवर घेतलं आणि सांगितलं, “बाबा, तुला माहीतंय का, अरे जंगलात मोठा वाघ आलाय म्हणे. उद्यापासून जंगलात जाऊ नकोस बाबा!” बाबानं शांतपणे हे ऐकून घेतलं. 

आपल्याला चांगली युक्ती सुचली आणि त्यामुळे एक मोठी काळजी मिटली म्हणून कृष्णामाईंही खुश झाल्या. दुसऱ्या दिवशी दिवसभर घरात खेळणारा बाबा संध्याकाळी कुठं दिसेनासा झाला. नेहमीप्रमाणे कृष्णामाई शोधमोहिमेवर निघाल्या. पण तेवढ्यात बाहेर पोरांचा गलका ऐकू आला. “अरे बाबानं वाघ आणलाय!” हे वाक्य ऐकून कृष्णामाईंच्या तोंडचं पाणी पळालं. पायांमध्ये उसनं त्राण आणून त्या बाहेर धावल्या. तेंव्हा बाबा स्वत:चं उपरणं त्या वाघाच्या गळ्यात घालून त्याला शेळीसारखा घेऊन येत होता. आणि वाघ आणल्याचं कळताच गावातल्या साऱ्यांनी मात्र पटापट दारं लावून घेतली होती. बाबा आणि तो वाघ हे दृश्य पाहताच कृष्णामाई बेशुद्ध झाल्या. बाबा वाघाला घेऊन शांतपणे देवघरात गेला. त्यानं वाघाची पूजा केली. तोवर हळूहळू भानावर आलेल्या कृष्णामाई म्हणाल्या, “बाबा त्या वाघाला अगोदर सोडून ये रे.” तसा बाबा म्हणाला, “अग आई वाघ तर कधीच गेला. तू शंकराचं दर्शन घ्यायला ये!” आई देवघरात गेल्या तर त्यांना खरंच प्रत्यक्ष शिवाचं दर्शन झालं. वाघ गेल्याची पूर्ण खात्री झाल्यावर मुलं हळूहळू गोळा झाली. 

प. पू. पाचलेगावकर महाराज
प. पू. पाचलेगावकर महाराज

श्री वासुदेवानंदसरस्वती महाराजांनी अवतार संपवण्यापूर्वी स्वत:कडील श्री मुक्तेश्वराची एक पंचधातूंची मूर्ती हिंगोलीच्या एका व्यापाऱ्याकडे देऊन त्याला असं सांगितलं होतं की, “पुढे पाचलेगावात नारसिंह या नावानं साक्षात भगवान दत्तात्रय अवतार धारण करणार आहेत. तेव्हा त्यांना ही मूर्ती दे. तुझंही भाग्य उदयाला येईल.” बाबाला या गोष्टीचं स्मरण झालं तेंव्हा बाबा त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्याला ती मूर्ती परत द्यायला सांगितलं. परंतु त्यानं ती मूर्ती तर परत दिलीच नाही, पण बाबाचा अपमानही केला. त्या रात्री त्या व्यापाऱ्याला स्वप्नामध्ये घरात सगळीकडे सापच साप दिसू लागले. आणि पाठोपाठ एका गोसाव्यानं त्याला ती मूर्ती बाबाला द्यायला सांगितलं. त्यायोगे तुझा भाग्योदय होईल, असंही सांगितलं. त्यामुळे जागे होताच आज आपण चूक केली हे लक्षात येऊन दुसऱ्या दिवशी त्यानं बाबाला सन्मानानं बोलवून, त्याची पाद्यपूजा करून आणि त्याच्यासह ब्राह्मणभोजन करून ती मूर्ती बाबाकडे सुपूर्द केली (ही मूर्ती आता खामगावच्या आश्रमात आहे.)

भ्रमंतीमध्ये बाबा एकदा लोणारला चालला होता. वाटेत रिसोड – मांगवाडी ह्या भागातून जाताना त्याला तहान लागली. समोर एक विहीर दिसली. म्हणून तो पाणी पिण्यासाठी तिथं गेला. पण पाहतो तर विहीर आटलेली होती. क्षणभर विचार करुन त्यानं गंगेचं स्मरण केलं आणि काय आश्चर्य; पाहता पाहता ती विहीर पाण्यानं तुडुंब भरली. बाबाला त्या विहिरीवर गेलेलं पाहिलेल्या यात्रेकरूंनी तेवढ्यात बाबाला आवाज दिला, “बाबा तिकडं जाऊ नका. ती विहीर कोरडी आहे.” तसं बाबा म्हणाला, “अरे काय सांगताय, इथं येऊन बघा.” सारेजण लगबगीनं आले आणि गच्च भरलेली विहीर बघून त्यांच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारा राहिला नाही. हा बाबानं घडवलेला चमत्कार थोड्याच वेळात वायूवेगानं त्या परिसरातल्या सगळ्या लोकांना कळला. त्या विहिरीचा मालक धावतच तिथं आला आणि आपल्या कोरड्या विहिरीत अवतरलेली गंगा पाहून अक्षरश: धन्य झाला. ही बातमी पुढं लोणारच्या यात्रेमध्ये सगळ्यांना कळली आणि मग ज्याच्या त्याच्या तोंडी पाचलेगावच्या सात वर्षे वयाच्या त्या छोट्या बाबाचं नाव घोळू लागलं. परिणामी पाचलेगाव हे छोटं खेडेगाव चांगलच गाजू आणि गजबजू लागलं. लोकांच्या झुंडीच्या झुंडी वाहतुकीचं साधन नसतानाही पाचलेगावला येऊ लागल्या. छोट्या बाबाचं दर्शन घेऊन भंडारा घालू लागल्या. आणि थोड्याच वेळात छोट्या बाबामुळे पाचलेगावचं रुपांतर एका तीर्थक्षेत्रामध्ये झालं. 

छोटा बाबा आता आठ वर्षाचा झाला. एक दिवस माधवाश्रम स्वामी पाचलेगावला आले. त्यांनी छोट्या बाबाला बरोबर घेतलं आणि तो गावाबाहेरच्या डोंगराकडं निघाले. पण आता छोटा बाबा एकटा असायचाच कुठं. तो निघाला म्हटल्यावर गावातले चार पाचशे लोक त्याच्या मागे गेले. गावाबाहेरच्या डोंगरावर सगळे पोहचल्यावर माधवाश्रम स्वामींनी आपल्या जवळचं भस्म तिथल्या एका शिलाखंडावर टाकलं आणि काय, क्षणार्धात ती शिला दुभंगली आणि…..आणि आत असलेली गुहा दिसू लागली. एवढंच नाही तर आतून सर्पांचे फुत्कार देखील ऐकू येऊ लागले. अचानक समोर आलेल्या त्या दृश्यानं सारेजण अवाक् झाले. तेवढ्यात माधवाश्रम स्वामी म्हणाले, “गुहेत जावं लागणार आहे. कारण आतमध्ये दत्तानंद स्वामींनी स्मरणी (जपाची माळ), भस्म आणि लिखाण वही या तीन वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या आणून नारसिंहाला द्यायच्या आहेत. त्या दिल्यावरच त्याचं अवतारकार्य सुरु होणार आहे. तेंव्हा कोण तयार आहे आत जायला?” माधवाश्रम स्वामींचं हे आवाहन ऐकताच नारसिंहाचा बालमित्र नऱ्ह्या नावाचा एक धनगराचा मुलगा पुढं आला आणि म्हणाला, “मी जातो!” या मित्राची नारसिंहावर अपार श्रद्धा होती. तो जिवावर उदार होऊन गुहेत शिरला. त्याबरोबर आतमध्ये असलेल्या सर्पांनी त्याच्यावर कडाडून हल्ला केला अक्षरश: रक्तबंबाळ होऊनही त्यानं त्या गुहेत शोध घेतला. तेंव्हा ‘संचारेश्वर’ असं लिहिलेल्या एका दगडावर त्या तीनही वस्तू दिसताच अगदी झडप घालून त्यानं त्या ताब्यात घेतल्या आणि तो गुहेच्या बाहेर आला. नऱ्ह्या रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर येताच नारसिंहानं त्याला कडाडून आलिंगन दिलं. त्याची निस्सिम गुरुभक्ती पाहून माधवाश्रम स्वामींनाही परम संतोष होऊन त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यांनी त्या वस्तू नारसिंहाला दिल्या मात्र; आणि जवळच्या शिवपिंडीतून आलेली, “अरे हाच तो वाडेश्वर संचारेश्वर!” ही वाणी ऐकताच साऱ्यांनी संचारेश्वराचा जयजयकार केला. ती ईश्वरी वाणी ऐकताच नारसिंहाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या. त्याला आपल्या अवतारकार्याची पूर्ण जाणीव झाली. 

नारसिंहानं भ्रमंती सुरु केली. औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, लोणार, लोणी, हिंगोली, परभणी, हैद्राबाद असा प्रवास पालखीबरोबर सुरु झाला. वेगवेगळे प्रदेश आणि तिथली माणसं पहायला मिळू लागली. पालखीसाठी आलेली भक्तमंडळी नारसिंहाला आपल्या गावाला घेऊन जात. पण एकंदरच सगळीकडची परिस्थिती पाहून नारसिंह कष्टी झाला. दु:ख, दैन्य आणि अज्ञान यात भरडून निघणारे आपले देशबांधव पाहून त्याच्या देशकार्याला झोकून देण्याच्या निश्चयाची धार आणखी वाढली. 

देश आणि देशबांधव यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढनिश्चय केलेला छोटा बाबा प्रथम पाचलेगावच्या शिवमंदिरात गेला. शांतपणे बसून त्यानं आपलं मनोगत त्या शिवाला सांगितलं. ‘शक्ती, बुद्धी आणि दिशा देणारा तूच आहेस’ हे सांगत तो शिवासमोर नतमस्तक झाला. आणि त्यानं त्या पिंडीला अक्षरश: अश्रूंचा अभिषेक घातला. आता देशहीत हा एकच विचार रात्रंदिवस त्याच्या समोर होता. लोणी क्षेत्र रहिवास करणाऱ्या प. पू. सखाराम महाराजांचं दर्शन घेऊन छोट्या बाबानं देशकार्यासाठी त्यांचा आशिर्वाद घेतला. सखाराम महाराज म्हणाले, “अरे, तुझा अवतारच धर्मकार्यासाठी आहे, त्यामुळे अगदी निर्भयपणे ते कर.” 

मनामध्ये कार्याची रूपरेषा निश्चित केल्यावर छोट्या बाबानं बोरी इथं जनसंघटन यज्ञाचं आयोजन केलं. तिथं सामर्थ्याचं प्रतिक आणि प्रेरणा असणाऱ्या हनुमंताची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर गावोगावी सप्ताह करून जनजागृतीचं कार्य जोरात सुरु केलं. एकदा सुरज अंजनगावाजवळच्या एका खेड्यात तिथल्या लोकांनी साधूंचं संमेलन आयोजित केलं. छोट्या बाबाबद्दलही त्यांना कळल्यामुळे त्यांनी त्यालाही संमेलनात बोलावलं. पण त्या वेळी कुणीतरी त्याला भाषण करायचा आग्रह केला तेंव्हा त्याला काय बोलायचं तेच सुचेना. अहो १२-१३ वर्षाचा मुलगा. अद्याप फारसं वाचन आणि अभ्यास नाही. पण जनकल्याणाच्या संकल्पानं झपाटलेला. आणि बोलण्यासाठी थोडा सरावही व्हायला लागतो ना. शेवटी छोटा बाबा त्या दिवशी कुणी तरी सांगितलं त्याप्रमाणं थोडसं बोलला झालं. 

पण या संमेलनाचा फायदा म्हणजे यातून प्रेरणा घेऊन छोट्या बाबानं पाचलेगावला यज्ञ करायचं ठरवलं. पाचलेगावला रुद्र स्वाहाकार करण्याचं छोट्या बाबानं ठरवताच लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. धान्य, पैसे आणि अन्य साहित्य यथाशक्ती घेऊन लाखो लोक पाचलेगावात दाखल झाले. पाच दिवस हा यज्ञ चालू होता. सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र आले होते. केवळ स्वत:पुरताच विचार करणाऱ्या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना छोट्या बाबानं आपल्या भाषणातून नवीन प्रगल्भ विचार दिला. आपलं समाज आणि राष्ट्राच्या बाबतीत काहीतरी कर्तव्य आहे याची जाणीव त्यातून लोकांना झाली. नीती आणि न्याय हा जीवनाचा गाभा आहे हे त्यानं लोकांच्या मनावर बिंबवलं. हताश आणि मुर्दाड झालेल्या लोकांच्या मनात त्यानं अन्यायाला प्रतिकार करण्याची ठिणगी टाकली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाचलेगावचा पहिला यज्ञ संपन्न झाला त्या वेळी छोट्या बाबाचं वय होतं अवघं १३ वर्ष. 

छोट्या बाबाची धीर गंभीर, तेजस्वी आणि प्रसन्न मुद्रा पाचलेगावच्या यज्ञाला आलेल्या सर्व लोकांच्या मनात पक्की ठसली होती. हा बाबा वेगवेगळे चमत्कार तर करतोच, पण भानामती, पिशाच्च बाधा यासारख्या गोष्टींचंही निवारण करतो. हे पाहिल्यावर साऱ्यांना त्याचा खूप आधार वाटू लागला. आणि त्याची देशभक्तीनं भरलेली भाषणं ऐकल्यावर तर हा देशाला योग्य दिशेनं घेऊन जाणार याची त्यांना खात्रीच वाटू लागली. 

श्री संत पाचलेगावकर महाराज, निर्गुण पादुका खामगाव
श्री संत पाचलेगावकर महाराज, निर्गुण पादुका खामगाव

१९२६ सालच्या डिसेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातल्या कळमनुरी या गावी छोट्या बाबानं संहिता स्वाहाकाराचं आयोजन केलं. या स्वाहाकाराला श्री संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत दासगणू महाराज आणि करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती (डॉ. कुर्तकोटी) या पुण्यात्म्यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, शास्त्री, पुराणिक, पंडित आणि समाजाच्या सर्व थरातील मिळून दीड लाखांचा समुदाय त्या ठिकाणी जमला होता. एवढा विशाल जनसागर एका विशिष्ट ध्येयानं आलेला, छोट्या बाबाची सोपी पण सर्वांना धीर देणारी आणि आपल्याला काय करायचं ते नीट समजावून सांगणारी वाणी आणि त्याची धर्मनिष्ठा या सगळ्या गोष्टींना शंकराचार्य अतिशय भारावून गेले. त्यांनी श्रीफळ देऊन स्वत:च्या अंगावरची शाल छोट्या बाबाच्या अंगावर घातली आणि ‘धर्मभास्कर’ ही पदवी त्याला बहाल करुन त्याचा गौरव केला. 

कळमनुरीचा स्वाहाकार सर्वार्थानं यशस्वी झाला. उपस्थित लाखो लोकांनी प्रसाद घेऊन झाल्यावर उरलेलं धान्य आणि पैसे छोट्या बाबानं गोरगरिबांना आणि सेवाभावी संस्थांना वाटून टाकलं. काहीही राखून ठेवलं नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून बाबा लोकांसमोर नि:स्पृह जीवनाचा आदर्श ठेवत होता. पाचलेगावसारख्या छोट्या खेड्यात जन्माला आलेला आणि जन्मापासून ‘वेगळा’ म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात भरलेला, निरपेक्षपणे समाजासाठी रात्रंदिवस झटणारा, त्यांच्या सगळ्या प्रकारच्या समस्या सोडवणारा हा पाचलेगावचा छोटा बाबा कळमनुरीच्या स्वाहाकारापासून फारच प्रकाशात आला. प्रत्येकाच्या जिभेवर त्याचं नाव मुक्कामी आलं. आणि मग कोवळं वय मागे पडून ‘छोट्या बाबा’चे ‘पाचलेगावकर महाराज’ झाले. साऱ्या समाजाचं आदरस्थान झालेल्या थोर महात्म्याला असा मान मिळणं सहाजिकच होतं. कुणी त्यांना बाबामहाराज, तर कुणी ‘छोटे महाराज’ ही म्हणत. 

कळमनुरीच्या स्वाहाकारानंतर महाराजांनी परभणी, हिंगोली, सवड रिसोड, बाळापुर, असवाडा आणि अन्य ठिकठिकाणी अशा यज्ञांचं आयोजन केलं. त्यांनी ठिकठिकाणी श्रमदान यज्ञही घेतले. या यज्ञांमध्ये रस्ते तयार करणं, विहीरी खणणं, गरीब शेतकऱ्यांची शेतं नांगरून देणं, नदीचा प्रवाह बदलणं, कातळावर (खडकावर) शेती करणं, बांध घालणं अशी अनेक कामं होत असत. यासाठी हजारो माणसं एकत्र येत. तोंडानं भजन म्हणत. हजारो हात विधायक सामुहिक कामात रंगून जात. महाराज सांगत, “श्रमाची कोणालाही लाज वाटता कामा नये. प्रत्येकाने परमेश्वराची पूजा आणि अनुष्ठान म्हणून श्रमदान करावे. राम आणि काम हे दोन्ही एकच आहेत.” त्यामुळे “मानवसेवा हीच माधवसेवा” या भावनेतून त्यांनी सर्वांमध्ये श्रमाची आवड निर्माण केली. ‘बुद्धिजीवी लोकांनी श्रमांची गरज ओळखून श्रमांची प्रतिष्ठा वाढवावी’ असं ते नेहमी सांगत. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे महाराज स्वत: डोक्यावरुन मातीची घमेली या श्रमदानात वाहात असत. 

महाराजांच्या प्रभावी भाषणांमुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याचं चित्र दिसू लागलं. तरुण पेटून उठू लागला. जिकडं तिकडं होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त करणाऱ्या चर्चा होताना दिसू लागल्या. अन्याय विविध प्रकारचा होता. त्यात देशातल्या लोकांचं शोषण तर होतंच, पण गुंडगिरी आणि लालूच यांच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणात चाललेलं धर्मांतर ही देखील फार गंभीर बाब होती. गुंडगिरीच्या माध्यमातून दहशत आणि अराजक माजवण्याचेही प्रयत्न सातत्यानं चालू होते. 

कळमनुरीच्या स्वाहाकार सांगतेच्या दिवशीच राजधानी दिल्लीत दिवसाढवळ्या अब्दुल रशीद नावाच्या यवनानं स्वामी श्रद्धानंदांचा खून केल्याची बातमी महाराजांच्या कानावर आली. महाराज क्षणभर सुन्न झाले, हळहळले. पण पुढ्च्याच क्षणी या अन्यायाच्या प्रतिकाराची आग दुप्पट जोमानं त्यांच्या ह्रदयात धुमसू लागली. 

प.पू. पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर)
प.पू. पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर)

कळमनुरीच्या यज्ञापासून पसरू लागलेला महाराजांच्या कीर्तीचा सुगंध हैद्राबादला निजामापर्यंत पोहचला. महाराजांनी केलेल्या वेगवेगळ्या चमत्कारांचे किस्से आणि त्यांची वाढती लोकप्रियता हे कळल्यावर निजामाच्या मनात विचारांची चक्रं वेगळ्याच दिशेनं फिरू लागली. निजामाच्या राज्यातले एक मोठे जहागिरदार श्री. शिवराज बहादूर यांनी महाराजांनी निजामाची राजधानी असलेल्या हैद्राबादला येण्याचं निमंत्रण दिलं. महाराज्यांच्याही मनात हैद्राबादला जायचं होतं. त्याचं कारण असं की, हैद्राबादला हिंदूंची वस्ती ९०% होती. आणि त्यांना जागृत केलं तर आपल्या कार्यासाठी मोठी शक्ती उभी राहिल हे महाराजांनी ओळखलं होतं. निजामानं महाराजांना खास दरबारात नेऊन त्यांचा जोरदार सत्कार केला. सोन्याच्या तबकामध्ये मौल्यवान रत्नं, भरजरी वस्त्रं आणि मिठाई इ. गोष्टी ठेवून तो नजराणा महाराजांना आदरपूर्वक अर्पण केला. पण सद्गुणांची रत्नं, देशभक्तीची वस्त्रं आणि विरक्तीचे दागिने मिरवणाऱ्या महाराजांना त्या नजराण्याचं काय अप्रुप! त्यांनी तो घेणं नाकारलं. तेव्हाच निजामाला ‘हे साधं काम दिसत नाही’ याची कल्पना आली. पण राज्य टिकवण्यासाठी हिंदुस्थानी समाजाच्या ह्रदयात विराजमान असलेल्या या सत्पुरुषाला खूश ठेवणं हा त्याच्या राजानीतीतला महत्त्वाचा भाग होता. म्हणून निजामानं महाराजांना करोडगिरी (त्या प्रदेशात प्रवेश करताना भरावा लागणारा कर) माफ केली. त्यांना रेल्वेप्रवास विनाशुल्क करण्याचा परवाना दिला. इतकंच नाही, तर त्यांच्या व्यवस्थेसाठी कायमस्वरुपी दोन पोलिसही दिले. पण कोट्यावधी गरीब लोकांचे प्रतिनिधी असणाऱ्या महाराजांना या सगळ्या गोष्टींची ना गरज होती ना कौतुक. हैद्राबादमध्ये गेल्यावर महाराजांनी आपल्या पद्धतीनं आपल्या कार्याला सुरुवात केली. ठिकठिकाणी कीर्तनं, प्रवचनं आणि व्याख्यानं इतकंच काय अगदी लग्न, मुंज यांच्या माध्यमातूनदेखील त्यांनी जनजागृतीचा धडाका लावला. 

महाराजांच्या बोलण्यातून प्रेरणा घेऊन गावोगावी व्यायामशाळा सुरु झाल्या. सूर्यनमस्कार सुरु झाले. हजारो लोक उत्स्फूर्तपणे एकत्र जमून आपल्या धर्माबद्दल चिंतन करु लागले. हिंदू धर्माची महती मनावर बिंबल्यामुळे धर्मांतराच्या कृष्णकृत्याचा वेग मंदावू लागला. इस्लामी बुवाबाजीचा जोर क्षीण होऊ लागला. पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की, निजामाच्या दृष्टीनं वाईट असणाऱ्या बातम्या निजामापर्यंत पोचल्यावर निजाम कमालीच अस्वस्थ झाला. याचा परिणाम म्हणून त्यानं महाराजांचा बंदोबस्त कसा करावा या विषयी युद्धपातळीवर विचार सुरु केला.  

निजामानं उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे त्यानं खास फर्मान काढून महाराजांना दरमहा आठशे रुपये पगार देण्याचं ठरवून त्या बदल्यात महाराजांकडून सरकारवर कोणतीही टीका न करण्याचं आश्वासन मागितलं. एवढचं नाही तर हे मान्य न केल्यास त्यांचा वेगळ्या पद्धतीनं बंदोबस्त करावा लागेल अशी तंबीही दिली. पण ‘निश्चयाचे महामेरु’ असलेल्या महाराजांनी निजामाची ती आठशे रुपयांची भीकही स्वीकारली नाही आणि त्याच्या त्या तंबीला भीक त्याहून घातली नाही. 

१९२८ साली पुण्यातल्या डेक्कन कॉलेजच्या पटांगणावर महाराजांनी लहाडीचा प्रयोग आयोजित केला होता. यामध्ये खोल आणि लांबलचक असा चर जमिनीत खणून त्यामध्ये लाकडं घालून अग्नी प्रदिप्त करण्यात आला. जमलेल्या स्त्रियांनी या अग्नीची पूजा केली आणि नंतर महाराजांच्या पाठोपाठ हजारो लोक त्या पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालत गेले. पण कुणालाही भाजलं नाही. हा प्रयोग पहाण्यासाठी ‘असं कसं शक्य आहे?’ या भावनेतून आलेले सर्व लोक, बातमीदार हे दृश्य पाहून अगोदर अवाक् झाले; पण नंतर त्यांनी महाराजांचा आणि धर्माचा जयजयकार केला.

साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रयोगासाठी उत्सुकतेपोटी तुफान गर्दी झालेली होती. यात आस्तिक, नास्तिक, महाराजांच्या सामर्थ्याचं कौतुक पहायला आलेले असे सर्व प्रकारचे लोक होते. प्रयोगात भाग घेणाऱ्यांमध्ये स्पृश अस्पृश्य असा कोणताही भेदभाव नव्हता. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी एकमुखानं त्या प्रयोगाचं आणि महाराजांचं कौतुक केलं. लोकांना एकत्र आणण्याबरोबरच त्यांच्यातला विश्वास आणि श्रद्धा वाढवण्यासाठी महाराजांनी असे लहाडीचे प्रयोग ठिकठिकाणी केले. 

ठिकठिकाणी अशी भयानक आणि अंगाचा थरकाप उडवणारी परिस्थिती असली तरी महाराज त्यामुळे डगमगणारे नव्हते. त्यांनी बाटलेल्या लोकांना शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेण्याची धडक मोहिम सुरू केली. श्री. दादासाहेब पार्डीकर, श्री. बाबासाहेब खापर्डे यांच्यासारखी मान्यवर मंडळी महाराजांच्या बरोबर या धर्मकार्यात रात्रंदिवस झटत होती. पाहता पाहता महाराजांच्या या मोहिमेमुळे स्वधर्माबाबत जनजागृतीची निर्माण झालेली लाट विशालकाय होऊ लागली. आपण मेहनत घेऊन आणि एवढा पैसा खर्च करून बाटवलेले हजारो लोक परत हिंदू धर्मात जात आहेत हे पाहून त्या धर्मवेड्यांच्या पायाखालची मुजोरपणाची वाळू सरकू लागली. या उलट आपली चूक उमगून परत स्वधर्मात आलेले हिंदू लोक मोठ्या जोमानं महाराजांच्या कार्यात सहभागी झाले. त्यामुळे या कार्याचा जोर अनंतगुणित झाला. 

वक्तृत्व हे महाराजांचं मोठं प्रभावी अस्त्र होतं. ‘जहाल’ या सदरात मोडणारं त्यांचं वक्तृत्व असलं तरी ते विषयाची मांडणी सहज सोप्या आणि विनोदी भाषेत करत. 

या दरम्यान झालेल्या भाषणात महाराज म्हणाले, “भारतीय संस्कृतीचे झाड नष्ट करण्यासाठी मुसलमान आणि इंग्रज दोघेही टपलेले आहेत. पण दोघांच्या पद्धतीत फार मोठे अंतर आहे. मुसलमान दांडगाईने ते उपटून टाकील किंवा त्याच्या बुडाशी विस्तव टाकून ते जाळायचा प्रयत्न करील, तर इंग्रज असा राक्षसी उपाय करणार नाही. तो झाडाला पाणी घालील पण पाण्यात असं काही द्रव्य मिसळील की हळूहळू ते झाड सुकून जाईल.” या व्याख्यानानंतर महाराजांना हैद्राबाद सोडून जाण्याचा सल्ला निकटवर्तियांनी दिला. त्याप्रमाणे ते निघून गेले. पण या व्याख्यानामध्ये महाराजांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे निजाम आणि इंग्रज या दोघांनाही खोलवर जखमा झाल्या. 

एकंदर सगळ्या कारणांनी निजाम आता निर्णायक स्वरुपाचा विचार करु लागला. एवढ्या सगळ्या सुविधा आणि सवलती देऊनही हा देशप्रेमानं आणि धर्मप्रेमानं भारावलेला योगी दिवसेंदिवस आपल्याला आणि आपल्या राजवटीला अधिकाधिक धोकादायक ठरू पाहत आहे. त्यामुळे त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायला हवा हे लक्षात घेऊन निजामानं ब्रिटीश रेजिमेंबरोबर विचार विनिमय करून १९२८ सालच्या अखेरीस महाराजांना तब्बल २० वर्षांकरता हैद्राबाद संस्थानातून हद्दपार केलं. मराठवाडा सोडून जावं लागणं ही गोष्ट महाराजांसाठी अतीव क्लेशकारक होती. लहानपणी राहतं घर जळालं त्याहीवेळी त्यांना एवढ्या यातना झाल्या नव्हत्या. महाराजांच्या हद्दपारीची बातमी कळल्यावर सगळेच दु:खात बुडाले. मोठी माणसंसुद्धा ढसाढसा रडली. पण राजसत्तेपुढे कुणाचं काय चालणार! महाराजांना आपला प्रांत आपला लोक सोडून दूर जायला लागलं याचं तर दु:ख झालंच, पण त्याहीपेक्षा जास्त वाईट वाटलं ते औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, पैठण यांसारखी पुण्यक्षेत्र अंतरल्याचं.  

महाराजांच्या पाठीशी असणारं निजाम सरकार आता त्यांना पाण्यात पहात आहे हे कळताच जवळच्या नातेवाईकांनीही त्यांचा महाराजांशी काहीही संबंध नाही, असं ठासून सांगितलं. अर्थात यामुळे महाराजांना काहीच फरक पडला नाही. कारण ‘आशा करावी परमेश्वराची’ या तत्वाप्रमाणं ते फक्त भगवान शिवाच्याच भरवश्यावर होते. 

जवळ पैसा नाही. कुणी जेवायला बोलावलं तर त्यावेळचा प्रश्न सुटला. सकाळ भागली, पण संध्याकाळचा भरवसा नाही. रहायला थांबायला हक्काचं असं ठिकाण नाही. एखाद्या झाडाखाली विसाव्याला पडावं म्हटलं तर अंथरायला सतरंजीसुद्धा नाही. स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी ‘महाराज महाराज’ करणारेदेखील उघडपणे महाराजांना आपले म्हणायला धजावत नव्हते. कारण सरकारविरोधी चळवळ करणाऱ्या व्यक्तीशी संबंध दाखवणं म्हणजे सरकारी रोषाला निमंत्रणच. महाराज अढळ निष्ठेनं आणि असामान्य ध्यासानं मराठवाड्याच्या हद्दीबाहेरून त्यांच्या अंगीकृत कार्यात आणखीनच जोमानं उतरले. महाराजांचं कार्य म्हणजे फार मोठं अग्निदिव्य होतं. कारण अराष्ट्रीयवृत्तीनं राष्ट्रीय प्रवाहात अडथळे आणणारे मुसलमान एकीकडून, तर दुसरीकडून संकुचित वृत्तीनं धर्मांतराची कृष्णकृत्यं करणारे ख्रिश्चन, धर्मांध निजाम तिसरीकडून, तर चौथ्या बाजूनं सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारे इंग्रज. आणि तरीही जनतेच्या पाठिंब्यानं या साऱ्याला खंबीरपणे तोंड द्यावं म्हटलं तर प्रत्येकाला फक्त स्वत:चं पडलेलं.

लोकांमध्ये हिंदु धर्माबद्दल जागृती निर्माण होऊ लागल्यानंतर पुढची पायरी म्हणजे या जनशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी महाराजांनी ‘मुक्तेश्वर दल’ नावाच्या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून लोकांना एकीचे, धर्मप्रेमाचे आणि देशप्रेमाचे नुसते धडेच मिळाले नाहीत, तर हळूहळू सगळे लोक, त्यातही मुख्यत: तरुण अक्षरश: भारावून गेले. ‘देव देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती’ अशी त्यांची मानसिकता घडू लागली. १९३२ सालापर्यंत महाराजांनी मुंबई ते हैद्राबाद संस्थानाची हद्द आणि नगर ते कुरुंदवाड या संपूर्ण प्रदेशात झंजावती दौरे काढून मुक्तेश्वर दलाच्या तब्बल दीडशेच्या जवळपास शाखा स्थापन केल्या. अराष्ट्रीय वृत्ती घटवण्यासाठी महाराजांनी शुद्धीकरणाच्या मोहिमेवर भर दिला. हिंदू लोक संख्येनं जेवढे जास्त, तेवढा प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांचा जोर कमी होईल आणि पर्यायानं लोकांना शांती आणि समाधान मिळेल हा त्यामागे महाराजांचा विचार होता. समाज संघटीत करण्यातली अजून एक महत्त्वाची पायरी म्हणजे जातीभेद नष्ट करणं. डॉ. मुंजे, डॉ. परांजपे, डॉ. हेडगेवार, वि.घ. देशपांडे, शामराव बुटे, हरिदास मानकर, मामा पालेकर, झरकर, माडखोलकर, द.मा. देशमुख आणि बाळशास्त्री इत्यादी मंडळी महाराजांबरोबर रात्रंदिवस या कार्यासाठी झटत होती. 

१९२९ सालच्या गणेशोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून महाराज रत्नागिरीला गेले. हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र यासाठी सर्वस्व अर्पण केलेले दोन दिग्गज महापुरुष. दोघांनाही एकमेकांना भेटण्याची उत्सुकता होती. गणेशोत्सवात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेला सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देवालय प्रवेशावर व्याख्यान झालं. सभेचं अध्यक्षपद महाराजांनी भूषवलेलं होतं. सावरकरांनंतर महाराजांचं व्याख्यान झालं आणि त्यांनी देवालय प्रवेशाला संमती दिली. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष देवालय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. ४ हजारांचा जनसमुदाय जमला होता. त्यावेळी हिंदू सभेच्यावतीनं महाराजांना श्री. रानडे यांच्या हस्ते मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नेहमीच्याच तडाखेबंद शैलीत महाराजांचा भाषण झालं. या दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांमध्ये काही तात्विक मतभेद असले तरी धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य यासाठी त्यांनी ते अलगद बाजूला सारले होते. 

दरम्यान १९२९ सालापासून महाराजांनी अन्याय्य सायमन कमिशनविरुद्ध जाहीर सभांमधून लोकमत तयार करण्याचा धडाका लावला. त्यामुळे १९३० ते १९३२ या काळात झालेल्या कायदेभंगाच्या चळवळीत दीड हजार लोकांनी भाग घेतला. त्यात मुक्तेश्वर दलाचे स्वयंसेवक आघाडीवर होते. त्यातल्या कितीतरी जणांना दोन-तीन तीन-तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. महाराजांनी पेरलेलं नुसतंच उगवलेलं नाही तर चांगलं फोफावतंय हे पाहून पित्त खवळलेल्या इंग्रज सरकारनं मुक्तेश्वर दलाच्या एकामागून एक शाखांवर बंदी आणले. एवढं करूनही भागणार नाही असं लक्षात आल्यावर १९३० साली जानेवारी महिन्यात त्यांनी महाराजांना येरवडा तुरुंगात टाकलं. त्यावेळी महात्मा गांधी, रावसाहेब पटवर्धन, काकासाहेब चिंचोलकर, काकासाहेब गाडगीळ, चंदनमल मुथा, काका गरुड, एस्. एम्. जोशी, र. के. खाडिलकर, मसूरकर महाराज इत्यादी नेते मंडळी तिथंच होती. शिक्षा पूर्ण झाल्यावर महात्मा गांधीबरोबरच महाराजांचीही तुरुंगातून सुटका झाली. १९३१ साली महाराज पुन्हा रत्नागिरी भागात दौऱ्यावर आले. त्यावेळी तिथल्या पतीत पावन मंदिरात नारायणाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. 

कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान इंग्रज सरकारनं बंदी आणलेल्या मुक्तेश्वर दलाच्या शाखा आता परत सुरु करण्याच्या दृष्टीनं महाराजांनी हालचाली सुरु केल्या. परंतू त्याच सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. हेडगेवार यांनी महाराजांपुढे ‘मुक्तेश्वर दल’ संघामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला. तसाच प्रस्ताव त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापुढेही ‘तरुण भारत’ ही संघटना संघामध्ये विलीन करण्यासंबंधी मांडला. तिघाही दिग्गजांची बैठक झाली. तिन्ही संघटनांचं ध्येय हिंदूंचं संघटन, प्रगती आणि स्वातंत्र्यप्राप्ती हेच असलं तरी त्यंच्या कार्यपद्धतीमध्ये थोडासा फरक होता. राष्ट्रकार्याचं साधन म्हणून महाराजांनी उभारलेल्या मुक्तेश्वर दलानं सामुहिक जनजागृती आणि शुद्धीकरणाचं कार्य यावर मुख्य भर दिलेला होता. संघान तेवढ्या प्रमाणात तो दिलेला नव्हता. त्यावेळी बऱ्याच विचारांती महाराजांनी संघ लोकजागृती आणि शुद्धीकरण या दोन्ही आघाड्यांवर काम करायला तयार असेल तर मी ‘मुक्तेश्वर दला’चे सर्वाधिकार पद सोडून संघाचा स्वयंसेवक व्हायला तयार आहे. अशी आपली भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेचं सरसंघचालकांनी स्वागत आणि कौतुक करताना त्यांची अट अगदी मनापासून मान्य केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही महाराजांच्या त्यागाची प्रशंसा केली. कारण रात्रंदिवस मेहनत करून उभारलेली संघटना आपले सर्व अधिकार सोडून दुसऱ्या एखाद्या संघटनेत विलीन करणं ही काही साधी गोष्ट नाही. आपले अधिकार टिकवून ठेवण्याकरता एरवी राजकारणी लोक कोणत्या थराला जातात ते आपण पाहतोच. पण शेवटी ते ‘महाराज’ होते. संस्थानिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठेपेक्षा अधिक महत्त्व देणारे. स्वार्थ हद्दपार केलेले. राष्ट्रहीत हे एकच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करणारे. त्यामुळेच या राष्ट्रवादी संघटना एका झेंड्याखाली येऊ शकल्या. राष्ट्रकार्यासाठी लागणारी ताकद वाढली.  १९३२ सालच्या जुलै महिन्याच्या ३१ तारखेला महाराजांची वर्ध्यातल्या मगनवाडी इथे महात्मा गांधींशी पहिल्यांदा भेट झाली. खरं तर म. गांधी हे मवाळ मतवादी तर महाराज हे जहाल विचारसरणीचे. पण देशहितासाठी विचारविनिमय करण्याची दोघांनाही गरज वाटत होती. चर्चा सुरू झाली, पण गांधीजींचं आत्यंतिक अहिंसेचं तत्व महाराजांना पटणार नव्हतं. ते म्हणाले, “सत्याग्रह ही स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गातली पहिली पायरी म्हणून ठीक आहे. समाजात जागृती करायला तिचा उपयोग करावा. पण आत्यंतिक अहिंसेचं तत्व जर तरुणांमध्ये बिंबवलं तर दुष्ट सत्ताधाऱ्यांना शासन घडवणं अशक्य होऊन बसेल. आणि राष्ट्राचं मोठंच नुकसान होईल. वेदांना मान्य असणारी कल्याणकारी अहिंसा ही आत्यंतिक अहिंसा नव्हे. पाणी पिण्यापासून ते श्वासोच्छवासापर्यंत सगळ्या कृतींमध्ये जीव हे मारले जातातच; पण हे अपरिहार्यच आहे. त्यामुळे या क्रिया निंद्य नसून सज्जनांचा आणि निरपराध्यांचा दुष्टांनी केलेला छळ हा निंद्य आहे. आणि त्यालाच हिंसा हे नाव आहे. दुर्जनांच्या विनाशासाठी शस्त्र धारण करणाऱ्याला हिंसक म्हणता येत नाही. आणि तसे नसते तर प्रभू रामचंद्र लोकांना वंदनीय आणि चिंतनीय कसे झाले असते?” हिंदू-मुसलमान ऐक्याविषयी चर्चा सुरू झाली तेंव्हाही महाराजांनी कुठल्याही धर्माचा, पंथाचा द्वेष करणं आपल्याला मान्य नाही हे सांगतानाच समाजात विघातक कृत्य करणाऱ्या माणसांना मात्र धडा शिकवण्याचा निर्धार बोलून दाखवला. एकंदरीत दोघा दिग्गजांमध्ये एकमत होऊ शकलं नाही. परंतु देशहिताच्या एकाच उद्दिष्टासाठी दोघांनीही आपापल्या मार्गांनी वाटचाल करायचं ठरवलं. 

१९३६ ते १९४० या चार वर्षांच्या काळात महाराजांनी झंजावाती दौरे काढून पुन्हा एकदा जनजागृतीचा धडाका लावला. यात कोल्हापूर, सांगली, मिरज, रत्नागिरी हा दक्षिणेकडचा भाग, मुंबईपासून ते विदर्भापर्यंतचा भाग आणि दिल्ली, पंजाब इत्यादी प्रदेश यांचा समावेश होता. महाराजांच्या वाणीमध्ये वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांना एकत्र बांधण्याचं सामर्थ्य होतं. त्यामुळेच जैन, बुद्ध, शिख, सनातनी, आर्य समाजी अशा वेगवेगळ्या धर्मपंथांच्या लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न महाराज करू शकले. सनातनी हिंदू पुढाऱ्यांनी जसा महाराजांचा मनापासून सत्कार केला, तसाच तो शिखांनीही महाराजांना गुरुद्वारात नेऊन केला. ठिकठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं महाराजांची व्याख्यानं आयोजित केली जात होती. आणि महाराज आबालवृद्धांना देशभक्तीच्या आणि देशासाठी त्याग करणाऱ्या विचारांनी भारावून टाकत होते. ‘दुबळ्यांचा वाली कुणीच नसतो. भीक मागून स्वातंत्र्य मिळत नसतं; तर ते मनगटाच्या जोरावर मिळवावं लागतं.’ असं महाराजांचं सांगणं होतं. त्या दृष्टीनं त्यांची प्रत्येक कृती असे. म्हणूनच लष्करात हिंदूंच प्रमाण वाढवणं हे महाराजांना अत्यावश्यक वाटत होतं. महाराजांनी त्या दृष्टीने जोरदार जागृती केली. १९४० साली मे महिन्याच्या ३० तारखेला पुण्यात शनिवारवाड्याच्या पटांगणात एक सभा भरवण्यात आली. प्रमुख वक्ते होते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अध्यक्षस्थानी होते महाराज. स्वांत्रत्र्यवीरांनी तरुणांना राष्ट्रीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गावर जोरदार आगेकूच करण्याचं आवाहन केलं. महाराजांनी त्यांच्या आवाहनाचं समर्थन करून, हिंदूंना स्वत:च्या आणि राष्ट्राच्या रक्षणाकरता बलवान व्हायला हवं. दुष्टांच्या निर्दालनासाठी शस्त्र उचलणं हा अत्याचार नसून सत्याचार आहे. त्यामुळे पहिल्या महायुद्धात जर्मनांना आणि तुर्कांना पराभूत करणाऱ्या कार्यात अतुल पराक्रमी ठरलेल्या भारतीय सैन्यात दाखल व्हावं, असा तरुणांना संदेश दिला. 

पुढे ४-५ वर्ष महाराजांनी सैन्य भरतीच्या प्रचाराचा धडाका सुरू ठेवला. सतत जनजागृती, भाषणं, लहाडीचे प्रयोग तसेच महाराज आणि इतर राष्ट्रीय नेत्यांचे दौरे या सगळ्यांचा एकत्र परिणाम म्हणून जनसागर अक्षरश: ढवळून निघत होता. परिणामी देशभक्तीच्या विचारांनी भारावून गेलेले तरुण खूप मोठ्या प्रमाणात सैन्यात दाखल होऊ लागले. आणि थोड्या कालावधीतच सैन्यातलं मुसलमानांचं प्रमाण ६२ टक्क्यांवरून ३२ टक्क्यावर आलं. त्यामुळे हुकुमी सैन्याच्या बळावर जोर करणं मुसलमानांनाही अशक्य झालं. विचारांती महाराजांनी हिंदूंचं संरक्षण आणि स्वातंत्र्यप्राप्ती यांसाठी एक प्रबळ सशस्त्र सेनाच उभारण्याचं ठरवलं. पण ब्रिटीश हिंदुस्थानात सशस्त्र सेना उभारायला कायद्यानं बंदी होती. मग महाराजांनी या कामासाठी ग्वाल्हेर संस्थानाची निवड केली. तेथील नरेश श्री. जिवाजीराव शिंदे यांच्याशी महाराजांनी गुप्त संधान बांधलं. जिवाजीरावांनी महाराजांना सर्वतोपरी सहकार्य केलं. परिणामी १९४१च्या मे महिन्यात ग्वाल्हेरमध्ये ‘हिंदू राष्ट्र सेने’ची पहिली शाखा स्थापन झाली. जूनमध्ये तिचा पहिला वर्गही संपन्न झाला. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संदेश आला, ‘धर्मभास्कर श्री संत पाचलेगावकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या हिंदुराष्ट्र सेनेची स्थापना होत आहे. तिला इतर कोणाच्या आशीर्वादाची अपेक्षा नाही. श्री महाराज योग्य ते मार्गदर्शन करतील असा मला विश्वास आहे.’ या सेनेचा हा वर्ग चालू असताना पंधरा दिवस महाराज रोज व्याख्यानं देत होते. त्यात त्यांनी आजवर हिंदूंनी व्यक्तिगत स्वार्थापायी आपलं सामर्थ्य आणि बुद्धी शत्रूला विकून राष्ट्राचा कसा घात केला याची माहिती तर दिलीच; परंतु समाजाकरिता योग्य वेळी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असणं हे किती गरजेचं आहे हेही सैनिकांच्या मनावर बिंबवलं. ले. फडके आणि प्रा. गर्दे यांनी या सैनिकांना प्रक्षिशण देण्यासाठी अविश्रांत श्रम घेतले. 

दांडग्या उत्साहात सुरु झालेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या प्रचाराचा वेगही महाराजांनी कायम ठेवला. ठिकठिकाणी हिंदू राष्ट्र सेनेच्या शाखा स्थापन केल्या. खेड्यापाड्यातल्या लोकांना या प्रवाहात आणण्यासाठी खेडोपाडी हिंदू संघटन प्रसारक मंडळं स्थापन करण्यात आली. प्रभात फेऱ्या, हिंदू संघटना सप्ताह, सार्वजनिक सूर्यनमस्कार, कीर्तनं, पोवाडे, व्याख्यानं या सगळ्या गोष्टींचा धडाका लावून महाराजांनी माणूस अन् माणूस जागा केला. सार्वजनिक कार्यक्रमांना वीस-वीस पंचवीस-पंचवीस हजार माणसं जमत. हिंदू संघटन देवाची (शिवाजी महाराज) मिरवणूक काढत. स्पृश्य – अस्पृश्य भेद न पाळता सहभोजनं होत. आणि महाराजांच्या भाषणांमधून स्वातंत्र्याचा विचार अगदी घराघरात जात असे. अशा रितीनं १९४० ते ४६ या काळात अमर्याद आणि अविश्रांत श्रम घेऊन महाराजांनी उत्तरेत आग्र्यापासून ते दक्षिणेत कुरुंदवाद पर्यंत स्वातंत्र्याच्या उत्तुंग आकांक्षेनं भारलेली १२ हजाराहून अधिक सैनिकांची हिंदू राष्ट्र सेना उभी केली.

याच दरम्यान १९४४ साली उत्तरेत नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या जबलपूर आणि मंडला या जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चनीकरणाचं मोठ्या प्रमाणावर चालू असलेलं कृष्णकृत्य थांबवण्यासाठी महाराज आश्रमातले प्रचारक आणि काही सैनिक यांच्यासह तिकडं धावले. निबिड अरण्य आणि अशिक्षित, अडाणी, दरिद्री असे वनवासी लोक. ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्यांचं जाळं टाकायला अतिशय अनुकूल अशी परिस्थिती होती. त्यात भरीला भर म्हणजे मलेरियाची साथ आलेली. गरीब बिचाऱ्या वनवासींच्या झुंडीच्या झुंडी बाटून ख्रिश्चन होत होत्या. नेमके अशावेळी महाराज मंडल्यात आपल्या कुमकीसह दाखल झाले. सतत प्रचार आणि जाहीर सभा यांचा महाराजांनी मारा सुरू केला. अल्पावधीतच मिशनऱ्यांच्या किल्ल्याला खिंडार पडलं आणि त्यांचा जोर एकदम कमी झाला. हळूहळू महाराजांनी आपल्या प्रभावी वाणीनं साऱ्यांना जिंकलं आणि परिणामस्वरूप ख्रिश्चन धर्मात गेलेले हजारो लोक त्यांचा स्वत:च्या धर्माचा अभिमान जागा झाल्यामुळे शुद्ध होऊन परत हिंदू धर्मात आले. मिशनऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. शिवाजी महाराजांच्या फोटोच्या मिरवणुका, सापांचे आणि लहाडीचे प्रयोग या साऱ्या गोष्टी त्या वनवासी बांधवांना नवीन होत्या. महाराजांच्या भाषेच्या अमृतामुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली आणि अल्पावधीत तिथलं सारं चित्रच पालटून गेलं. महाराजांच्या प्रभावी वाणीमुळे मिशनऱ्यांचा उजवा हात असलेला फॉनवेलसुद्धा विरघळला आणि त्यानं सहकुटुंब हिंदू धर्मात प्रवेश केला. आता त्याचं विक्रम असं नाव ठेवण्यात आलं. खरं तर हा हिंदू धर्मातलाच पण स्वत: बाटून त्यानं त्याच्या पनका जातीतल्या शेकडो लोकांनाही ख्रिश्चन केलं होतं. या विक्रमवर महाराजांनी तिथं राष्ट्रधर्म प्रसार आणि लोकशिक्षण यासाठी चालू केलेल्या पाठशाळेमध्ये शिक्षकांची जबाबदारी टाकली. १९४६ साली महाराज भंडारा जिल्ह्यातल्या पवनी या ठिकाणी आले. तिथं त्यांनी हिंदू संघटन महायज्ञ आयोजित केला. त्याला २५ हजाराहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली. त्यावेळी दुष्काळग्रस्त आणि आजारी लोकांना सहाय्य करण्याच्या योजना आखून त्या अंमलात आणण्यात आल्या. पवनीबरोबरच अकोडा आणि उज्जैन या ठिकाणी महाराजांनी बलोपासनेचं दैवत असणाऱ्या हनुमंताच्या मूर्तींची स्थापना केली. या भागातल्या दौऱ्यात महाराजांनी अनेक ठिकाणी हिंदू राष्ट्र सेनेच्या शाखा स्थापन केल्या. 

१९४७ साल उजाडलं. अविरत परिश्रमांनी महाराज, स्वा. सावरकर, म. गांधी आणि अन्य सर्व राष्ट्रीय नेत्यांनी स्वातंत्र्य आणि स्वधर्म या विषयी भक्कम जनमत तयार केलं होतं. स्वतंत्र पाकिस्तानाच्या मागणीला महाराजांनी पहिल्यापासूनच कसून विरोध केला होता. म. गांधी आणि राष्ट्रीय सभेच्या अन्य नेत्यांनीही ‘कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची निर्मिती होणार नाही’, असं अभिवचन दिलेलं होतं. त्यांच्या मार्गातल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न एकीकडे महाराज करत होते. त्यामुळे जनजागृती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या जोडीलाच ‘पाकिस्तान न द्याल तर गावोगावी दंगे घडवून आणू’ अशी धमकी देणाऱ्या मुस्लिम लीगच्या दंगलखोरांना महाराजांनी ‘दंगे कराल तर नेस्तनाबूत व्हाल!’ असा जाहीर सज्जड दम दिला. 

१९४७च्या सुरुवातीलाच महाराजांनी ग्वाल्हेरमधल्या पिछोर या ठिकाणी एका मोठ्या क्षात्रयज्ञाचं आयोजन केलं होतं. पूर्वनियोजनानुसार तिथं हिंदू राष्ट्र सेनेचे हजारो सशस्त्र रजपूत, जाट, क्षत्रीय वीर जमा झाले. ज्यांना अद्याप शस्त्र मिळाली नव्हती त्यांना ती देण्यात आली. तलवारी, भाले, बंदुका, रिव्हॉल्व्हर्सच्या आवाजांनी आकाश निनादून गेलं होतं. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि भारतमातेच्या जयजयकारांनी आसमंत भरून गेलं होतं. सारं वातावरण कसं चैतन्यमय झालेलं होतं. देशासाठी पराक्रम गाजवायला ते हजारो बाहू स्फुरण पावत होते. या या यज्ञासाठी आलेले प्रमुख पाहुणे श्री. ल. ब. भोपटकर हे हत्तीवरून या सगळ्या देखाव्याचं निरीक्षण करत होते. आणि दिव्य स्वप्नपूर्तीच्या दिशेनं चाललेली तयारी पाहून मनोमन सुखावून जात होते. या यज्ञदेवतेला साक्ष ठेवून सगळे क्षत्रीय देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला शपथ घेते झाले. 

सैन्यभरतीमध्ये हळूहळू हिंदूंचे प्रमाण वाढून मुसलमानांचं प्रमाण ६२ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर घसरलेलं होतच. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून केलेल्या उठावामध्ये हिंदू राष्ट्रे सेनेचं भरघोस सहकार्य मिळाल्यावर इंग्रज सरकारला पळता भुई थोडी झाली. त्या पाठोपाठ या राष्ट्रसेनेनं दुसऱ्या महायुद्धानंतर मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, अंबाला आणि कराची या ठिकाणी भूदल, वायुदल आणि आरमार या तिन्हींमध्येही सौम्यसा उठाव केला. एकंदर ही पाठोपाठ येणारी संकटं, जनतेमध्ये इंग्रज सरकारविरुद्ध धगधगणारा असंतोष आणि राष्ट्रसेनेपुढं स्वीकारावी लागलेली पीछेहाट या साऱ्या गोष्टींमुळे इंग्रज सरकारचा स्वत:च्या सामर्थ्यांवरचा विश्वास पारच उडाला. आता भारत आपल्या नियंत्रणाखाली ठेवणं शक्य नाही अशी त्यांची खात्री झाली. कारण सेनेमध्ये हिंदूंचं प्रमाण वाढल्यामुळे इंग्रजांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा वापर करता येणार नव्हता. दुसरं म्हणजे हिंदुस्थानवर नियंत्रण ठेवू शकेल एवढी नवीन सेना उभी करणं त्यांना शक्य नव्हतं. १८ जुलै १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य द्यायला मान्यता देणाऱ्या बिलाचं ब्रिटीश सभागृहात वाचन चालू असताना त्या वेळचे ब्रिटीश पंतप्रधान ऍटली यांनी या गोष्टी स्पष्टपणे मान्य केल्या. परिणामस्वरूप १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. महाराजांनी १९२६ साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी अन्याय प्रतिकारक सेना उभी करण्याची केलेली प्रतिज्ञा आणि पुढे त्याला अनुसरुन केलेली हिंदु राष्ट्र सेनेची उभारणी आणि अहोरात्र झटून केलेली जनजागृती या सगळ्याचा सिंहाचा वाटा स्वातंत्र्यप्राप्तीच्या यशामध्ये होता. पण महाराजांना त्या श्रेयामध्ये काहीच रस नव्हता. त्यांना भारतमाता स्वतंत्र होण्याचंच परमसुख होतं. स्वातंत्र्यप्राप्तीचं श्रेय महाराजांनी त्यासाठी झटलेल्या सर्व नेत्यांचं, संस्थांचं, सैन्याचं आणि संपूर्ण भारतीय जनतेचं असल्याचं सांगितलं. आणि त्याचवेळी आता या स्वातंत्र्याचं रक्षण करणं आणि देशाला सर्वांगीण दृष्ट्या उर्जितावस्था प्राप्त करून देणं हे साऱ्यांचं कर्तव्य असल्याची जाणीवही दिली. भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं; पण फाळणीच्या ग्रहणासह. महाराजांनी नेमकं हेच होऊ नये म्हणून खूप अगोदरपासून प्रयत्न केलेले होते. नेत्यांनी त्यांना फाळणी होऊ देणार नाही असा शब्दही दिला होता. पण शेवटच्या क्षणी त्यांनी तो मोडला होता. महाराजांना या फाळणीमुळे प्रचंड क्लेश झाले. पण त्यानंतरही त्यांनी फाळणीमुळे संकटात सापडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी धडपड सुरू केली. 

गेली ३५ वर्षे अहोरात्र केलेले परिश्रम आणि फाळणीच्या घटनेमुळे मनाला बसलेला जबरदस्त धक्का यांमुळे महाराजांच्या तब्येतीवर फारच प्रतिकूल परिणाम झाला. त्यांना मूळव्याधीचा भयंकर त्रास होऊ लागला. त्यांना अतिशय अशक्तपणा आला. त्यामुळे काही काळ उपचार आणि परमेश्वराचं चिंतन यात घालवावा असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी ते गायमुख, भिवापूर या भागातल्या डोंगरी मुलखात गेले. त्या अगोदर त्यांनी हिंदू राष्ट्रसेनेचे सर्वाधिकार सेनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. कारण या सेनेनं स्वातंत्र्यप्राप्तीचं आपलं उद्दिष्ट साध्य केलेलं होतं. त्यामुळे महाराजांना यापुढे तिची सूत्रं आपल्याकडे ठेवण्याची गरज वाटत नव्हती.

प. पू. पाचलेगावकर महाराज
प.पू. पाचलेगावकर महाराज 

पुढे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर कृतीमुळे हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीनं झालं. आणि परिणामी २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराजांनी पुन्हा एकदा मराठवाड्याच्या पावन भूमीत पाय टाकला. महाराज येत असल्याची बातमी कळताच त्या त्या ठिकाणाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होई. महाराज पाचलेगावात येणार, ही बातमी कळताच पाचलेगाव आणि परिसरातल्या लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सगळीकडे गुढ्या तोरणं उभारली गेली. पताकांनी परिसर सुशोभित झाला. भजनांनी वातावरण भारावून गेलं. 

महाराज पाचलेगावात येताच त्यांनी धावत जाऊन आई कृष्णामाईंच्या चरणांना मिठी मारली. त्या वेळी त्या माऊलीनं आपल्या आनंदाश्रुंनी आपल्या बाबाला अभिषेक घातला. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज तो मायेचा प्रेमळ स्पर्श महाराजांच्या पाठीला झाला होता. सगळीकडे ‘बाबामहाराज की जय’ चा घोष चालू होता. 

१९५० साली ब्रह्मपुत्रेला आलेल्या पुरामुळे आसामात हाहा:कार माजला होता. त्यावेळी महाराजांनी घरोघरी फिरून कपडे, धान्य आणि पैसे गोळा केले आणि पूरपीडितांना पाठवले. महाराजांच्या सततच्या भ्रमंतीमध्ये त्या त्या गावातले तंटे, वैर, दुफळ्या, गुंडगिरी, गरीबांचा छळ इत्यादी गोष्टीही मिटत. ‘गावात एकीकरण झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही’ अशी महाराजांची प्रतिज्ञाच असे. त्यामुळे एकमेकांशी भांडण्यात वाया जाणारी शक्ती वाचून तिचा उपयोग विधायक कामांसाठी होऊ लागला. बळी म्हणून देवाच्या नावाखाली होणारी पशुहत्या महाराजांनी थांबवली. हजारो लोकांना दारू सोडायला भाग पाडलं. त्यांच्या अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला सनातनी लोकांनी दगडफेकीच्या रुपात विरोध केला. पण महाराजांनी चांगल्याचा आग्रह सोडला नाही. स्त्रीला मानाचं स्थान मिळायला हवं, या बाबतीतही महाराज आग्रही होते. संसाराची रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाकं आहेत. त्यामुळे त्या दोघांचंही महत्व सारखंच आहे, असं महाराज सांगत. गार्गीसारख्या स्त्रिया वेद-मंत्र द्रष्ट्या हा इतिहास असताना स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही हे शुद्ध पाखंड आहे असं ते जाहिरपणे सांगत.

व्यक्तिगत बाबतीत सांगायचं तर महाराजांनी अक्षरश: अगणित लोकांच्या पीडांचं निवारण केलं. यामध्ये मानसिक रोग, वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा आणि असंख्य प्रकारच्या कौटुंबिक समस्या यांचा समावेश होता. 

महाराजांच्या सर्पाविषयीच्या ज्ञानाची व्याप्ती तर सांगणंच अशक्य आहे. पाळण्यामध्ये असल्यापासून साप, नागांशी खेळणारा, वयाच्या पाचव्या वर्षी नागपंचमीसाठी आईला खरा नाग आणून देणारा, हे रुप पाहणाऱ्या लोकांना पुढे हजारो लोकांना सापाच्या दंशामुळे येऊ घातलेल्या मरणाच्या संकटातून सोडवणारे महाराज पाहतांना त्यांचं बालपण पुन्हा पुन्हा आठवल्याशिवाय राहत नसेल. खामगावातले श्री. विष्णुपंत पत्की यांना नाग चावून ते बेशुद्ध झाले. डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मृत’ घोषित केल्यानंतरही त्यांना हिंगोलीला महाराजांकडे नेण्यात आलं आणि ते ठणठणीत बरेही झाले.

१९५८ साली महाराज काही शिष्यांसोबत हिमालयात यात्रेला गेले असताना तिथं वास्तव्य करणाऱ्या ३०० वर्षांपूर्वीच्या महर्षींच्या दर्शनाहून माघारी येताना दिल्लीला थांबले. नोव्हेंबर महिना पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस ‘त्रिमूर्ती’ या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या धामधुमीत साजरा होत होता. पं. नेहरूंचे मित्र पं. रामनारायण चौधरी यांना त्या प्रसंगी महाराजांची तीव्रतेनं आठवण झाली. आणि त्या वेळी महाराज दिल्लीतच असल्यामुळे ते लगेच जाऊन महाराजांना घेऊन आले. देशी-परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या किमती भेटवस्तूंचे तिथं ढीग पडलेले असताना देखिल महाराजांनी केलेल्या सत्कारानं मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण महाराजांनी पं. नेहरूंच्या गळ्यात एक मोठा तरतरीत नाग घातला. तेंव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या इंदिरा गांधी घाबरुन ओरडल्याच. पंडित नेहरू स्वत:सुद्धा घाबरले. पण महाराज शांतपणे म्हणाले, “घाबरण्याचं कारण नाही. मुली, या जहरी जनावरापेक्षा माणूस अधिक जहरी आहे.”

‘चमत्कार’ हा विषय निघाला की महाराज स्वच्छ सांगत की, सृष्टीमध्ये कोणताही चमत्कार होत नाही. पण भूतबाधा, भानामती यांनी अक्षरश: जीवन नकोसं झालेल्या हजारो लोकांना त्यातून सोडवणं हा चमत्कारच नाही काय? संतती नसलेल्यांच्या जीवनात नुसता नारळ देऊन संततीप्राप्तीचा आनंद फुलवणं हा चमत्कारच नाही काय? एकट्या व्यक्तीनं अफाट पैसा आणि माणसांचं पाठबळ असलेल्या मिशनऱ्यांच्या कारवाया थोपवणं आणि बाटलेल्या लोकांना परत स्वधर्मात आणणं हा चमत्कार नाही तर काय आहे? याला चमत्कार न म्हणावं तर हे सगळं करणारी माणसं गल्लीबोळात भेटली असती. 

महाराजांच्या दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वाचन. साधारणपणे ८-९ तास त्यांचं रोज वाचन असे. वाचन सुरु केल्याची आणि संपवल्याची वेळ याची नोंद असे. त्यांना वाचनासाठी विज्ञान, काव्य, अर्थशास्त्र, इतिहास, व्याकरण आणि अन्य कोणत्याच विषयांचं वावडं नसे. येणाऱ्या भक्तमंडळींपैकी कोणाचीही त्या त्या वेळी वाचनासाठी नियुक्ती होई. कित्येक वेळा वाचनातला विषय इतका क्लिष्ट असे की वाचणाऱ्याच्या डोक्यावरून जाई. पण महाराजांना तो कळत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असे. वेगवेगळ्या रंगांच्या पेन्सिली बरोबर असत. वाचणाऱ्याला मध्येच थांबवून “या आत्ताच्या वाक्याखाली हिरव्या पेन्सिलीनं रेघ मार!” अशी महाराजांची आज्ञा होई. ती रेघ मारून झाली की वाचन पुढे सुरू होई. कित्येक वेळा वाचन चालू असताना महाराज मधेमधे दुसऱ्याशी बोलत. वाचणाऱ्याला वाटे आत्ताचा हा भाग महाराजांच्या ऐकण्यातून सुटला. पण पाठोपाठ महाराज त्यातलंच एखादं वाक्य म्हणून दाखवून त्या खाली रेघ मारायला सांगत, तेंव्हा वाचणाऱ्याला आश्चर्य वाटे. या वेगवेगळ्या लोकांना पेन्सिलींनी रेघा मारण्याचा काय फायदा आहे असं वाटणाऱ्या लोकांना महाराजांची भाषणं ऐकली की याचं उत्तर मिळे. कारण ते अधोरेखित मुद्दे महाराजांच्या भाषणात त्या त्या विषयांवर बोलताना बरोबर येत असत.

महाराजांना लहान मुलांची विशेष आवड होती. ते निष्पाप जीव महाराजांना खूप जवळचे वाटत. महाराजांच्या दर्शनाला आलेल्या कितीतरी भक्तांच्या लहानग्यांना महाराजांच्या मांडीवर बसायचं भाग्य लाभत असे. महाराजांच्या प्रवचनात ‘समष्टी धर्म’ या संकल्पनेचा बऱ्याच वेळा उल्लेख होई. महाराज म्हणत, "माझी आध्यात्मिक उन्नती आणि इतरांची आध्यात्मिक उन्नती असे दोन भाग मी तोपर्यंत पाडत होतो. परंतु नवव्या वर्षी माझे सद्गुरु श्री माधवाश्रमस्वामी यांची भेट झाल्यानंतर माझा हा भ्रम नाहीसा झाला. माझी आणि राष्ट्राची उन्नती एकच आहे हे मला पक्के पटल्यावर त्याच विचारातून मी राष्ट्रकार्याला प्रारंभ केला. मीपणाचे अनंतीकरण म्हणजेच स्वत: ईश्वर होणे. गुरुकृपेने देवळातला ईश्वर मला समाजात दिसू लागला. मी माझ्या राष्ट्राची सेवा करीत असताना खऱ्या अर्थाने माझ्याच व्यापकपणाची सेवा करत असतो. हा अनुभव आल्यानंतर मला माझ्या सेवेत आनंद वाटू लागला. दलितांची सेवा ही माझीच सेवा आहे या भावनेनं प्रेरीत होऊन मी समाजकार्य, राष्ट्रकार्य करण्याचं व्रत घेतलं यालाच मी समष्टी धर्म किंवा राष्ट्रधर्म असं नाव दिलं. 

महाराजांचा आवाज भाषणाच्या सुरुवातीला बारीक असे. पण नंतर तो वाढत जाई. आणि मग महाराजांच्या भावना आणि पोटतिडिक प्रत्येकाच्या काळजात घर करून राही. महाराजांच्या भावना आणि पोटतिडिक प्रत्येकाच्या काळजात घर करून राही. महाराजांच्या वक्तृत्वाचा लोकांवर एवढा प्रभाव होता की, महाराजांचं भाषण म्हणजे साऱ्यांना पर्वणी वाटे. संतकवी श्री. दासगुण महाराज त्यांचा उल्लेख ‘व्याख्यानसिंह’ म्हणून करत. सुरुवातीच्या काळात महाराजांच्या भाषेचा बाज अस्सल मराठवाडी होता. नंतर मात्र ती खूपच परिष्कृत झाली. भाषणाची सुरुवात ते ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय!’ किंवा ‘ॐ नमोजी आद्या’ यांनी करत आणि थोड्याच वेळात प्रचंड जनसमुदायाच्या मनाचा ताबा घेत. खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भाषणात कुठेही क्रियापद नसे. चौफेर अभ्यास, मुद्देसूद मांडणी आणि श्रोत्यांशी सुसंवाद साधण्याची हातोटी त्यामुळे सारे देहभान विसरून जात. १९६१ साल. त्यावेळी संतकवी दासगणू महाराज गोरट्याला रहात होते. महाराज त्यावेळी नांदेडला आल्याचं कळताच त्यांनी त्यांच्या सुरस शैलीमध्ये महाराजांना एक ओवीबद्ध पत्र लिहिलं. महाराजांच्या कार्याचा यथोचित गौरव असलेलं हे पत्र त्यांनी खास सेवकाकरवी महाराजांकडे पोहोचवलं. दासगणु महाराजांचा स्नेह आणि वयोमानानुसार ते थकलेले आहेत ही गोष्ट विचारात घेऊन महाराज स्वत: त्यांना भेटायला गोरट्याला गेले. दोन दिवस दोघांचा सुखसंवाद झाला. दासगणु महाराजांना परमानंद झाला. नंतर महाराज परतले. प्रचंड वाचन, चिंतन आणि मनन यातून तयार झालेली महाराजांची विविध विषयांवरची मतं संपूर्ण मानवजातीला उद्बोधक ठरावीत अशीच आहेत. ते म्हणत, "धर्म हे पोथीनिष्ठेचे नाव नसून ते भौतिकवाद्यांना आणि आत्मवाद्यांना सामान्य असे सत् तत्व आहे." ‘श्रद्धा श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ’ या नेहमी रंगणाऱ्या वादाबद्दल बोलताना महाराज म्हणत, "हा वाद नसून भ्रम आहे. कारण शास्त्रकारांनी दोन्हींच्या मर्यादा ठरवून ठेवलेल्या आहेत. श्रद्धा व बुद्धी या दोघी बहिणी असून त्या आपपल्या जागी श्रेष्ठ आहेत." 

"परमार्थ’ आणि ‘संसार" या विषयी बोलताना ते म्हणत, "लाडवातील साखर किंवा लोणच्यातलं मीठ जसं वेगळं काढणं अशक्य आहे, तसं परमार्थापासून प्रापंचिक कार्य बाजूला काढणं अशक्य आहे. त्यामुळे परमार्थासाठी प्रपंचापासून किंवा समाजापासून दूर जायची मुळीच गरज नाही." "आपापला धर्म पाळा. पण राष्ट्रदोह करु नका" हा महाराजांनी भारताच्या फाळणीच्या अगोदर पाकिस्तानावादयांना दिलेला सल्ला किती मौलिक होता हे काळाच्या ओघात साऱ्यांनी अनुभवलं आहे. 

सततचे परिश्रम आणि वाढतं वय यांच गणित महाराजांच्या बाबतीत दिवसेंदिवस जमणं अवघड होऊ लागलं होतं. वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्या देहाला देशासाठी अविश्रांत परिश्रम आणि यातना सोसणं भाग पडलं होतं. त्यानं तरी किती सहन करावं! त्यात भरीला भर म्हणजे मूळव्याधीच्या विकारानं पुन्हा मान वर काढली होती. त्यामुळे कमालीचा अशक्तपणा आलेला होता. तरीही कष्टांमध्ये कुठेही खंड नव्हता. अशक्तपणामुळे चक्कर आली तरी तेवढ्यापुरती विश्रांती. नंतर लगेच काम परत सुरु. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची जिगर ठेवणाऱ्या सैनिकासारखंच हे व्रत होतं. ‘उरलो उपकारापुरता’ हीच भूमिका घेऊन वावरणाऱ्या महाराजांना डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला कधीच मानवला नाही. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त जनकल्याण….. जनकल्याण…. आणि जनकल्याण. 

महाराज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. फिरत फिरत महाराज पिंपळगाव बसवंत इथं पोहचले. तिथं प्रा. अण्णा कोव्हळ या प्रेमळ भक्तानं महाराजांना विश्रांती मिळावी म्हणून त्यांना आग्रहानं थांबवून घेतलं. महाराज तिथं असतानाच ओझरच्या निंबाळकर कुटुंबियांकडून महाराजांना प्रेमाचं निमंत्रण आलं. महाराजांनीही ‘माघारी जाताना येतो’ असं त्यांना आश्वासन दिलं. 

एक दिवस रात्री निंबाळकरांच्या पत्नी सौ. शांताबाई यांना स्वप्न पडलं. महाराज औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. सौ. शांताबाई यांनी त्यांची पाद्यपूजा केली. नैवेद्य वगैरे अर्पण करून आरती केली. नंतर महाराज जप करत बसले असताना त्यांणी महाराजांना हार घातला. सगळ्यांना प्रसाद वाटला. तेवढ्यात महाराज अंतर्धान पावले. त्या खडबडून जाग्या झाल्या. क्षणभर ते स्वप्न होतं हेच त्यांना खरं वाटेना. पण महाराजांना इथं येण्याअगोदर असं छान दर्शन दिलं या गोष्टीनं त्यांना परमानंद झाला. 

तिकडं प्रा. कोव्हळ यांच्या घरी विश्रांती घेऊन नंतर महाराजांनी पुढचा दौरा सुरू केला. लहान मोठी गावं घेत घेत महाराज कोळपेवाडीला पोहचले. तिथल्या मंडळींनी उत्तम व्यवस्था ठेवलेली होती. परंतू मुक्कामात तिसऱ्या दिवशी सकाळी अचानक महाराजांच्या छातीत कळा येऊ लागल्या. लगेच डॉक्टर येऊन इलाज सुरू झाला. परंतू तब्येतीला उतार पडेना. तेंव्हा संध्याकाळी महाराजांना मुंबईला नेण्याचा निर्णय झाला. दवाखान्यात न्यायचा विषय निघताच महाराज रागवले, पण भक्तांच्या आग्रहामुळे ते तयार झाले. 

मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात महाराजांना दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागात डॉ. तुळपुळे आणि डॉ. वसंतराव देशमुख यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली तातडीनं उपाय सुरू झाले. परंतु तपासणी केल्यावर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण महाराजांचं ह्रदय पूर्णपणे निकामी झालेलं होतं. जोडीला मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध इ. आजार होतेच. या अवस्थेत महाराज एवढा प्रवास करून कसे येऊ शकले, या प्रश्नाला डॉक्टरी शास्त्रात उत्तर नव्हतं. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली पण त्या थकलेल्या देहाकडून नगण्य प्रतिसाद मिळत होता. डॉक्टरांनी शेवटी हात टेकले. महाराज त्याही अवस्थेत चिंतन आणि जप करत होते. पण त्यांचे शब्द कुणालाही कळत नव्हते. सौ. अक्का, नाना जोशी, माधव जोशी, नाना लेले इत्यादी भक्तमंडळी महाराजांच्या सेवेत तत्पर होती. या व्यतिरिक्त महाराजांची विचारपूस करायला येणाऱ्या लोकांची तर रीघ लागली होती. महाराजांच्या भक्तांना मात्र स्वप्नांमध्ये सूर्यास्त, उल्का निखळणं, प्रलय, आरतीचं निरांजन विझणं असली वाईट दृश्य दिसल्यामुळे भक्तमंडळी फार काळजीत पडली. 

१५ ऑगस्टचा दिवस गेला. रात्र उलटू लागली. महाराज सारखे ‘किती वाजले’ म्हणून विचारू लागले. अखेर १६ ऑगस्टचा दिवस उजाडला. महाराजांनी माधव जोशी आणि नाना लेले यांना जवळ बोलवून घेतलं. महाराज सहजासनात बसले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. मनात काहीतरी पुटपुटले आणि….. तोच श्वास शेवटचा ठरवत महाराजांनी देश आणि धर्मासाठी गेली जवळपास ७० वर्षे झिजवलेल्या त्या देहाचा त्याग करून अनंताचा प्रवास सुरु केला. शनिवार सकाळचा साधारणपणे सव्वासातचा सुमार होता. श्रावण शुद्ध एकादशीचा प. पू. रामकृष्ण परमहंस यांच्या १००व्या पुण्यतिथीचा पवित्र दिवस. अशी दिव्य पर्वणी साधून तो दिव्य आत्मा देहाची बंधन तोडून टाकून अमर्यादपणे भक्तांच्या कल्याणासाठी झटायला आता मुक्त झाला. त्यागी, तेजस्वी आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ जगासमोर मांडून कृतार्थपणे अलौकिकात रममाण झाला.

एकच एक व्यक्तीदेखील कर्तृत्वाचा हिमालय उभा करू शकले; फक्त त्यासाठी जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी आणि अमर्याद कष्टांची तयारी असावी लागते, हे दाखवणारा असामान्य कर्मयोगी प्रत्येकानं शिकाव्यात अशा अनेक गोष्टी साऱ्यांसमोर मांडून गेला. वक्तृत्व आणि संघटन कौशल्याचा अमोघ संगम काळाच्या पडद्याआड गेला. हजारो लाखो लोकांना आईबापाची माया देणारा ‘आपल्यावर खास प्रेम आहे’ असं प्रत्येकाला वाटावं अशी वागण्याची कला निसर्गत: प्राप्त झालेला तो प्रेम निर्झर लौकिकातून तरी अदृश्य झाला. सापनागांच्या बाबतीत लोकांना मनात असणारे गैरसमज आणि भीती दूर करून त्यांना एकप्रकारे अभयदान प्राप्त करून देणारा प्राणिमित्र अलौकिकातल्या मैत्रीसाठी रवाना झाला. असंख्य लोकांच्या समस्या सोडवून त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणारा चैतन्यदीप शांत झाला. 

इंग्रज आणि निजामाला विरोधभक्ती करायला लावून त्यांच्या पदरात पुण्यांश टाकणारा महात्मा त्यांना पूर्ण थकवून मगच थांबला. महात्मा गांधींशी एवढे जिव्हाळ्याचे संबंध असूनही त्यांच्या हत्येनंतर सरकारी निर्णयाने वाट्याला आलेला तुरुंगवास विनातक्रार सोसणारा स्मितप्रज्ञ पुढच्यांसाठी तोही धडा ठेवून गेला. देशाच्या फाळणीनंतर होणाऱ्या परिस्थितीसह अनेक गोष्टींवर अचूक भाकित करणारा द्र्ष्टा गेला. देशाच्या आणि लोकांच्या झालेल्या नुकसानीचं वर्णन कोणत्या शब्दांमध्ये करावं! कल्पतरु गमावल्याचा हिशोब कोणत्या गणितात येणार!

शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाराजांचा देह खामगावच्या मुक्तेश्वर आश्रमात आणण्यात आला. भक्तांनी अगोदर पासूनच तिथं गर्दी केलेली होती. रविवारी सकाळपासूनच आजूबाजूच्या परिसरातून भक्तांचे लोंढे यायला सुरुवात झाली. त्यावेळी नेमका खामगावला बंद सुरू होतो. त्यामुळे कुठलंही वाहन आत जात नव्हतं. तरीही गावाला वेढा मारून भक्तमंडळी आश्रमात दाखल झाली होती. रविवारी दिवसभरात लाखोंनी महाराजांचं अंत्यदर्शन घेतलं. पोरकं झाल्याची वेदना त्या साऱ्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होती. रविवारी रात्रभर भजनकीर्तन चालू होतं.

सोमवारी महाराजांची अभिषेक पूजा करून बसलेल्या अवस्थेत त्यांची भव्य रथयात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली. संध्याकाळी ५ वाजता उपासना झाली. आरती झाली. अफाट जनसागर जमलेला होता. पण कुणाकडेही बोलायला शब्द नव्हता. भगव्या रंगाचं मखमली वस्त्र लपेटलेला महाराजांचा देह त्यांनी आयुष्यभर ज्या अग्निदेवतेची आराधना केली तिच्या स्वाधीन करण्यात आला. विनमस्कपणे सारी भक्तमंडळी ते दृश्य पहात होती. आठवणींची पारायणं प्रत्येकाच्या मनात चालू होती. परमेश्वरानं दिलेलं अमोल दान परमेश्वरच माघारी घेऊन जात होता; पण नियतीचा नियम म्हणून. अशा थोर महात्म्यांना खरं तर देहामुळे मर्यादाच येत नसतात. पण हा विचार या क्षणाला कोणाला पटणार होता!

रक्षेचे कलश भक्तमंडळींनी संपूर्ण हिंदुस्थानात सप्त नद्या आणि महा तीर्थांमध्ये विसर्जित केले. लौकिकातलं एक महापर्व संपलं होतं. पण अलौकिकातली त्याची प्रचिती आजही भक्त क्षणाक्षणाला घेत आहेत. आणि अनंत काळापर्यंत पिढ्यान्पिढ्या घेतच राहणार. कारण सद्गुरुंचं आणि भक्ताचं नातं हे कधीही खंडित न होणारं असतं. 

प. पू. पाचलेगावकर महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर सतत भव्यता आणि दिव्यता यांचंच दर्शन घडतं. अगदी जन्माच्या अगोदरपासून या दिव्यत्वाला सुरुवात होते. ते देह ठेवेपर्यंत; नव्हे नव्हे त्यानंतरही महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आपण अनुभवतच राहिलो. 

गुरुपरंपरा 

श्री वासुदेवानंद सरस्वती
    ।
श्री नारायण दत्तानंद
    ।
श्री माधवाश्रम, स्वामी
    ।
श्री पाचलेगावकर महाराज