कुंडलिनी शक्ती जागृती  (शक्तिपात दीक्षा) 

कुंडलिनी
कुंडलिनी  शक्ती 

कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणार्या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे योग्याचे ध्येय.

ही कुंडलिनी जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंध, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इ. प्रकारांनी जागृत होते. हठयोगातील प्राणायाम व बंध यांचा कसा उपयोग केला जातो याचा थोडासा विचार पुढे केला आहे.साधे एक, दोन, तीन शिकावयास गुरू लागतो. तेव्हा इथे गुरूची व कठोर परिश्रमाची नितांत गरज आहे. इथे आपण फक्त प्राथमिक माहिती बघणार असल्याने अत्यंत थोडक्यात काही गोष्टींची नोंद करू.

प्राणायाम

श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवणे. पूरक (बाहेरचा वायू नासापुटाने उदरात भरून घेणे), कुंभक (पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणे) , रेचक (उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणे) व यांमधील विराम म्हणजे प्राणायाम. श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, श्वास सोडा, थोडा वेळ थांबा, परत श्वास घ्या ही प्रक्रीया. यातील निरनिराळे प्रकार म्हणजे उदा. एका नाकपुडीने श्वास घ्रेऊन दुसर्या नाकपुडीने सोडणे. ही शारीरिक प्रक्रीया झाली. याला म्हणावयाचे अगर्भ प्राणायाम. जर आपण प्रणवाच्या मात्रांचे, पूरकाच्या वेळी "उ"चे कुंभकाचे वेळी "म्" चे व रेचकाचे वेळी "अ"चे ध्यान केले तर तो झाला सगर्भ प्राणायाम. प्राणायामाने आरोग्य सुधारते, अनेक रोग बरे होतात, आयुष्य वाढते असे शारीरिक फायदे होतात व वृतीला स्थिरपणा येतो,चांचल्य कमी होते, रज-तम वासना कमी होतात, सत्व गुणाचा प्रकाश पसरतो असे आध्यात्मिक लाभ होतात. हठयोगात नाडीशुद्धी हा एक मोठा फायदा. नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. अशी समाधी म्हणजे नादानुसंधानी समाधी. या मार्गावर पोचण्यास प्राणायामास यम-नियम-ध्यानादिंची जोड आवश्यक असते.

बंध

कुंभकाचे वेळी प्राणनिरोध करीत असतांना नवद्वारांपैकी काही द्वारे बंद करावयाची असतात. त्या वेळी या बंधांचा उपयोग होतो. शरीरातील एखाद्या विशिष्ट भागातून वायू खेचून दुसर्या एखाद्या भागात स्थिर करण्या साठी बंधांचा वापर होतो. हठयोगात "बंधां" ना फार महत्व आहे. प्राणायामाने प्रभुत्व मिळवलेला प्राणवायू आपल्याला पाहिजे तेथे, पाहिजे त्या नाडीत नेणे, तेथे तो थांबविणे हे या बंधांचे काम. निरनिराळ्या आसनांत हे करतात. शरीरातील वायूंवर विजय मिळवूवच त्यांच्या सहाय्याने कुंडलिनीला जागृत करावयाचे असल्याने बंधांचा अभ्यास अनिवार्य आहे.आपण तीन बंध बघणार आहोत

जालंधर बंध

कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधर बंध होतो.कंठस्थानी असलेल्या शिरांचे जाळे बांधले जाते म्हणून याला जालंधर बंध म्हणतात.आणखी एक विचार. मूर्धस्थानी असलेल्या पूर्णचंद्रातून स्त्रवणारे अमृत देहाच्या मध्यभागी आले की जाठराग्नीने शुष्क होऊन जाते. याच कारणाने देह लवकर जीर्ण होतो. जालंधर बंधाने अमृत सरळ पचन मार्गात न उतरता सर्व शरीरभर पारते व योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाही. (योगी काही शतके जगू शकतो याचे कारण?)

उड्डियान बंध

हा बंध उदरस्थानी करावयाचा असतो. नाभिस्थानाचा खालचा भाग व वरचा भाग अशा या दोनही भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठ्वंशाकडे खेचून घ्यावे. पाठीला पोक येऊं न देता सर्व शरीर ताठ ठेवावे. यालाच उड्डियानबंध म्हणतात. या बंधाने पोट नेहमी साफ राहते. ज्याचे पोट साफ़ त्याचे आरोग्य उत्तम. याला "मृत्युमातंगकेसरी" म्हटले आहे व याच्या अभ्यासाने "वृद्धोsपि तरुणायते" वृद्धही तरुण होतो असे म्हटले आहे. उड्डियान बंधाने प्राण, अपान,व्यान,उदान व समान या पाचही वायूंची कार्ये सुव्यवस्थित होत असल्याने शरीराचे सर्वांगिण आरोग्य सुरक्षित रहाते म्हणून "सर्वेषामेव बंधानामुत्तमोह्युड्डियानक:" असा याचा गौरव केला आहे.

मूलबंध

सिद्धासनात सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या (उपस्थ व गुदद्वार यांच्यामध्ये असलेली शीर) मध्यभागी दाबून बसवावी. गुदद्वाराचे अधिकात अधिक आकुंचन करूनपान वायूला वर खेचावे. शरीर ताठ ठेवावे. दृष्टि नासाग्री असावी. मूलबंधाने अपान वायू हा उर्ध्वगामी होत असतो. अनाहत ध्वनी अभिव्यक्त होण्यास मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो. आपण नेहमी श्वासोच्छ्वास करतो तेव्हा डाव्या व उजव्या नाकपुडीतून आत येणारा वायु ईडा व पिंगला नाडीतून प्रवास करत असतो. प्राणायामाच्या अभ्यासाने व बंधांच्या उपयोगाने आपण ही नैसर्गिक क्रिया बदलून टाकतो. आता ईडा व पिंगला यांचा वापर बंद करावयाचा आहे .त्या ऐवजी सुषुम्ना नाडीतून प्राणवायू न्यावयाचा आहे. पण सुषुम्नाचे तोंड तर बंद असते. ते उघडण्यासाठी प्रथम बंधांच्या सहाय्याने उर्ध्वगामी, वर जाणारा प्राणवायू खाली वळवावयाचा व मूलबंधच्या उपयोगाने खाली सरणारा अपान वायु उर्ध्वगामी करावयाचा. प्राणवायू व अपानवायू यांचा संगम नाभीच्या अधोभागी होतो. त्यांच्या समागामाने स्वाधिष्ठानचक्रातील व मणीपूरचक्रातील अग्नी प्रदिप्त होतो. ह्या अग्नीच्या तापाने कुंडलिनी जागृत होते व सुषुम्ना नाडीचे तोंड उघडते. प्राण व अपान सुषुम्ना नाडीतून वर जाऊ लागले की नाद उत्पन्न होतो. तोच अनाहत नाद. वर लिहले आहे की अनाहत नाद ऐकू येऊ लागला की समजावे की तुम्ही ध्येयाच्या जवळ पोचला अहात. तुम्ही त्यापासून मिळणार्या आनंदात बेहोष होता. अनेक संतांनी या अनाहत नादाबद्दल रम्य अभंग लिहले आहेत. आता सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले आहे, कुंडलिनी जागृत झाली आहे व ती आता आपले मूलाधार चक्रातील स्थान सोडून वर सह्स्रारचक्राकडे निघाली आहे. पुढील भाग मी रुक्ष गद्यात सांगणार आहेच पण माझा आग्रह आहे की आपण तिच्या प्रवासाचे वर्णन श्री माउलींच्या शब्दात वाचावेच. गीतेत कुंडलिनीचा उल्लेखच नाही पण या बालयोग्याने अध्याय ६ मध्ये आपल्या नाथपंथातील विचार मोठ्या रसिकपणाने मांडले आहेत.

कुंडलिनी

मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. आता ती प्राण-अपान वायूंच्या संयोगाने निर्माण झालेल्या अग्नीच्या तापाने जागृत होते. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वर सहस्रारचक्रात जाण्यास प्रवृत्त होते. तिच्या बरोबर प्राणवायू व साधकाचे मनही असतात. तिचा मार्ग तेव्हढा सुकर नाही. तिला जातांना वाटेतील षटचक्रांमधून पुढे जावयाचे असते. ही महाकठीण क्रीया सद्गुरूच्या सहाय्यानेच शक्य होते. वर वर जातांना कुंडलिनी जे जे पार्थिव ते ते सर्व सर्व गिळंकृत करते. जेव्हा प्राण-मन यांच्यासह ती सहस्रारचक्रात वास करणार्या शिवाशी एकरूप होते तेव्हा साधकाला समाधीचा अनुभव प्राप्त होतो. साधकाचे मन ब्रह्मात लीन होते व विषयविचारापासून तो पूर्णत: अलिप्त होतो. समाधी बद्दल इथे लिहण्याचे कारण नाही. तो एक निराळाच विषय आहे. पण कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोशक्यात बघू. प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच तो ईडा- पिंगला मधून वाहणे कमी होते. साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी होऊ लागतो. त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो. (याला Hybernation म्हणावयाचे काय?) प्राणवायू मूर्धस्थानी स्थिरावला की त्याला केवलकुंभक म्हणतात. आचार्य म्हणतात "केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीला येण्यासाठी चित्तची शुद्धी, सावधानता आणि अभ्यासाची धृढता यांची गरज आहे."

ही झाली कुंडलिनीची प्राथमिक माहिती. हिच्यावर प्रभुत्व मिळाले तर तुम्ही समाधी सुख मिळवू शकता. पण अपार कष्टाने मिळवलेल्या या सुखात विघ्नेही आहेत. तुम्हाला अनेक सिद्धीं प्राप्त होतात. त्यांची यादी देत नाही परंतु इहलोकातील नानाविध सुखे तुमच्या पायाशी लोलण घेतात व साधक त्यांतच गुरफटण्याचा संभव असतो. तंत्रग्रंथांत या विषयी धोक्याच्या सुचना दिलेल्या दिसतात.

गुरु परंपरा
गुरु परंपरा 

शक्तिपात दीक्षे विषयी प. पु. गुळवणी महाराजांना भक्तांनी विचारलेले प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे.

१. आपली दीक्षा हट योगाची आहे का?

हा हटयोग नाही हा असा योग आहे की ज्या मध्ये हट, राज, मंत्र, लय, अष्टांग या सर्वाचा समावेश असलेला सिद्धयोग आहे यालाच कुंडलिनी योग शक्तीपातयोग सहजयोग म्हणतात.

२. शक्तिपात म्हणजे काय?

शक्तिपात म्हणजे शक्तीचे संक्रमण प्रत्येक  माणसाच्या शरीरात चेतना म्हणजे प्राणशक्ती असते या चेतना शक्तीचे जागरण हा फार महत्वाचा टप्पा असतो महापुरुष अगर  सत्पुरुष यांची प्राणशक्ती शिष्याच्या शरीरातील प्राणशक्ती ला जागृत करून परत सद्गुरूजवळ जाऊन थांबते याला शक्तिपात म्हणतात, मराठी भाषेत जो रूढ अर्थाने शक्तीचा ह्रास याचा इथे सबंध नाही सूत संहितेत शक्तिपात हा शब्द आला आहे जेथे शक्ती जागृत होत नाही तेथे आत्म सिद्धी येऊ शकत नाही. सूत संहिते वरील भाष्यात माधव स्वामींनी पतन्ति, पात या शब्दाचा अर्थ जाणे किंवा देणे, प्रकट केला आहे. शक्ती नेहमी मोठ्यां कडून लहाना कडे, उंचावरून खाली जात असते. शक्ती संक्रमणात मनात हेच घडते म्हणूम शक्तिपात हा शब्द आला आहे.

३. शक्ती जागृत होते म्हणजे काय होते?

जागृत होते याचा अर्थ झोपलेली असते असा नव्हे चेतना ही चित्ताच्या म्हणजे मन बुद्धी इंद्रिय यांच्या माध्यमातून बहिर्मुखी किंवा जगदाभिमुखी असते तेव्हा ती निद्रिस्त असते असे म्हणतात व ती जेव्हा अंतर्मुख होऊन ऊर्ध्व गामी चेतन्य मुखी होते तेव्हा ती जागृत झाली असे म्हणतात.

४. कुंडलिनी जागृत नाही झाली तर काय बिघडते?

परमार्थ वाटचालीत असा एक टप्पा येतो जिथे स्वा नुभवाचे दालन उघडते भक्ती करणाऱ्या साधका ची परा भक्ती जो पर्यन्त निर्माण होत नाही तो पर्यंत खरा लाभ होत नाही मार्ग कोणताही असला तरी शक्ती जागृती ही घटना घडत असते स्वतःच्या प्रयत्नाने शक्ती जागृत झाली तर तिचे नियोजन साधने कठीण जाते पण गुरू कृपेने झाली तर नियोजन ती स्वतः करते.

५. शक्ती जागृत होण्यासाठी फक्त हाच मार्ग आहे कां? 

तसे नाही, मंत्र अनुष्ठान, प्राणायाम अथवा उत्कट सात्विक कर्म, भक्ती आणि पुर्व पुण्याई मुळे ती जागृत होते पण गुरू कृपेने जागृत शक्ती पुढे सुनियंत्रीत कार्य करते.

साधना करताना गुरू करून जर केली तर ती लवकर फलद्रुप होते. शिष्यानेही गुरू हा आपले सर्वस्व समजुन पुजा करावी. गुरूचा हात जर डोक्यावर असेल तर ईश्वराचा कोपसुध्दा शिष्याला लागत नाही. देव जर कोपला तर गुरू वाचवितो पण गुरू जर कोपला तर या समस्त ब्रह्मांडी तुम्हाला कोणी वाचवु शकत नाही.

सदगुरुरूपी भगवंतांकडून प्राप्त झालेले सर्वश्रेष्ठ वरदान म्हणजे साधना होय. शक्तिपात दीक्षेद्वारे आपल्या सदगुरुं कडून साधनेचे कृपादान होते. जेवढे आपले गुरुशक्तिप्रति समर्पण अधिक, तेवढी आपली साधना समृद्ध होत जाते व आपण प्रगतीपथावर पुढे पुढे जाऊ लागतो जस जसे आपणास साधनेत स्थिरत्व प्राप्त होते, तसतसे साधनेतून मिळणारा अत्युक्तट आनंद आपल्या व्यक्तिमत्वातुन जाणवू लागतो.

साधनेची स्थिती ही एक अशी स्थिती असते जिथे मन, बुद्धि, चित्त, अहंकार या सर्वांचा संचार संपतो, त्यांचा लय होतो व आपले संपूर्ण अस्तित्वच त्या शक्तीच्या अधीन होते. साधनेमुळे होणारा लाभ हा शब्दातीत असतो. त्याच्यापुढे इतर सर्व लाभ तुच्छ वाटू लागतात. साधनेमुळे लाभलेल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपले जीवन अधिक सुसंबद्ध होऊ लागते. म्हणूनच श्री गुरुने दिलेल्या साधनेत सर्वजण श्रध्देने सहभागी होतात.

६   महाराज साधनेच्या बाबतीत असा संशय येतो की, कुंडलिनी जागृती तर अतिदुर्लभ आहे, तेव्हा ही गोष्ट सहज साध्य कशी होऊ शकेल?

दुर्लभ वस्तू सहज साध्य झाली म्हणजे योगवासिष्ठात वर्णन केलेल्या ब्राम्हणाप्रमाणे स्थिती होते.

एकदा एका ब्राम्हणाने चिंतामणि प्राप्त करण्यासाठी तपश्चर्येला आरंभ केला. ईश्वरी कृपेने त्याला थोड्याच अवधीत चिंतामणि प्राप्त झाला. ब्राम्हणाने विचार केला, हा खरोखरीच चिंतामणि असेल का? मी अजून अशी किती तपश्चर्या केली आहे, की असा अलभ्य चिंतामणि मला प्राप्त व्हावा? हा नक्कीच चिंतामणि नसून, काचेचा तुकडा आपल्यापुढे टाकून ईश्वर आपली परीक्षा कशावरुन पाहात नसेल? मी तिकडे दुर्लक्षच करणे योग्य. असा तर्क वितर्क करीत त्याने निश्चय केला, की हा चिंतामणि असणेच शक्य नाही. समोर आलेला चिंतामणि न घेता ब्राम्हणाने पुन्हा तपश्चर्येस प्रारंभ केला. ईश्वराने कृपाळू होऊन दिलेला चिंतामणि ब्राम्हणाच्या संशयवृत्तीने अदृश्य केला. काही दिवसांनी काही मुलांनी खेळता खेळता, एक काचेचा तुकडा त्या ध्यानस्थ ब्राम्हणापुढे टाकला. ध्यान पूर्ण होताच डोळे उघडल्यावर समोर त्याला चकाकणारी वस्तू दिसली. यावेळी त्याला असे वाटले की आता आपली इतक्या काळाची तपस्या फलद्रुप झाली. समोर पडलेला तो काचेचा तुकडा चिंतामणि समजून त्याने उचलला आणि घरी निघून गेला.

दुर्लभ वस्तू सहज प्राप्त झाली की असा संशय निर्माण होतो. म्हणून ह्रदयरुपी कसोटीवर कसून पारखून हे बघावयास हवे की आपल्याला चिंतामणि मिळाला आहे की काच? सोने मिळाले आहे की पितळ? तसेच जी दुर्लभ साधना तुम्हाला मिळाली आहे, त्यानुसार साधना करुन साधनेचे अलौकिकत्व अनुभवास येते किंवा नाही हे पाहिले पाहिजे.

 • नुसता संशय घेऊन साधनशून्य रहाणे योग्य नाही. संशय घ्यायचा, साधन करायचे नाही म्हणजे अनुभव काहीच येणार नाही. उलट संशय पिशाच्च अधिक बलवान होत जाणार.
 • गुरुवाक्य, शास्त्रवाक्य आणि स्वानुभव हे तीनही मिळतील तर तत्वासंबंधी, गुरुसंबंधी आणि स्वत:संबंधी शंकाच राहणार नाही. अनुभवाशिवाय नुसत्या कल्पनेने, तर्काने, ज्ञानाने संशय दूर होत नाही. त्यासाठी साधनाच केली पाहिजे.
 • साधनेवर श्रद्धा, निष्ठा ठेवली की गुरुवर श्रद्धा, निष्ठा बसते. गुरुवर नि:संदिग्ध श्रद्धा असली की कल्याणच होते.
 • संशय हे पतनाचे मूळ आहे म्हणून संशयाच्या आहारी जाऊ नये. संशयाने फार मोठे अनर्थ ओढवतात.

कुंडलिनी जागृती बाबत काही शंकांना दिक्षधिकारी सत्पुरुषाने दिलेली उत्तरे

प्रश्न: आम्ही सामान्य माणसे आहोत आम्हाला शक्य आहे का? 
उत्तर:
कुंडलिनी जागृती अथवा गुरुकृपेने शक्तिपात दीक्षा मिळाली तर सहज शक्य आहे. किंबहुना कुंडलिनी जागृती हा माणसाच्या उद्धाराकरिता भागवंतांनीच खुला केलेला राजमार्ग आहे, सर्व सामान्य माणूस सुद्धा कुंडलिनी योग्य मार्गाने जागृत करून नराचा नारायण होऊ शकतो. सर्व मानवजातीच्या उध्दाराचा हा मार्ग असून मानवाने आपला उध्दार करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी अशीच परमेश्वराची आत्म्याला मानवी जन्म देण्यामागे अथवा योनी देण्यासाठीची अपेक्षा असती. प्रत्येक मानवाचे हे अंतिम ध्येय असावे.

प्रश्न: कुंडलिनि आणि कुंडली म्हणजे एकच का? त्यात काय फरक आहे?
उत्तर:
कुंडलि शास्त्र हे भविष्य किंवा ज्योतिष मार्ग याबद्दल असून कुंडलिनी हा एक शाश्वत आणि परमेश्वराने दाखविलेला योगमार्ग आहे.

प्रश्न: मग कुंडलिनी म्हणजे नक्की काय आणि ती मानवी शरीरात कुठे असते? 
उत्तर:
कुंडली किंवा कुंडलिनी ही संज्ञा 'कुंडल' या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झाली आहे. 'कुंडल' म्हणजे वर्तुळ. वर्तुळाकार असलेली ती कुंडलिनी. साडेतीन वेटोळे घालून पाठीच्या कण्याच्या तळाशी ती निद्रिस्त सर्पिणी सारखी वेटोळे घालून सुप्तावस्थेत (निद्रिस्त) वास्तव्य करून असते. जागृत झाली की ती पाठीच्या कण्यातून मेंदूच्या दिशेने जाऊ लागते. मेंदूत जाऊन ती स्थिरावली की, मोक्षप्राप्तीचे द्वार खुले झाले असे म्हणतात.

प्रश्न: माझी पात्रता आहे की नाही, किंवा त्यासाठी काय पात्रता लागते?
उत्तर:
कुंडलिनी दीक्षा घेण्याची बुद्धी होणे हीच पात्राता पुरेशी आहे. अर्थात साधकाने आपले आचार, विचार, शरीर शुद्ध ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. नाहीतर गुरूंचा अनुग्रह मिळणं दुरापास्त असते. श्रेष्ठ दीक्षाधिकारींचे म्हणण्यानुसार तुमचे पूर्वसुकृत बलवत्तर असल्याशिवाय तुम्हाला दीक्षा घेण्याची बुद्धी होणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मग माध्यम कुठलेही असो. म्हणजे प्रवचन ऐकून, अथवा पुस्तके वाचून, अथवा भक्तिमार्गाला अनुसरून अथवा जिज्ञासेपोटी म्हणा, गुरू तुम्हाला भरभरून कृपादान करतो पण त्याचा विश्वास सार्थ ठरविणे हे साधकाचे काम आहे. गुरू आपले बीज हे शक्ती रूपाने साधकाच्या शरीरात पेरण्याचे काम करतो पण जर आपण त्याला गुरूंनी सांगितलेल्या साधनेचे खत पाणी घातले नाही तर ते निरुपयोगी ठरते म्हणजे जागृत झालेली कुंडलिनी ही परत सुप्तावस्थेत जाते.

प्रश्न: शक्तिपात दीक्षा म्हणजे काय.
उत्तर:
शक्तिपात म्हणजे शक्तीचे संक्रमण. गुरू आपल्या शिष्याला त्यांच्या मधील शक्तीचे संतुलित संक्रमण त्याच्या शरीरात करून देतो आणि त्या योगाद्वारे कुंडलिनीवर थेट आघात  होतो. त्यासाठी प्रत्यक्ष स्पर्शाने माध्यम वापरले जाते किंवा अन्य मार्गाचा वापर केला जातो. 
उदा. पत्रदीक्षा. परगावी असलेल्या शिष्याला गुरू पत्र पाठवतो. विशिष्ट वेळी ध्यानाला बसताना शिष्याने ते पत्र वाचले की त्याद्वारा त्याची कुंडलिनी जागृत होते. गुरुकडे गेलो की, त्याने दीक्षा दिलीच आणि आपली कुंडलिनी जागृत झालीच असे होत नाही. दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिष्याची क्षमता किती आहे याचा अंदाज गुरू घेतो. कुंडलिनी शक्ती पेलण्याची त्याच्या मनाची आणि शरीराची क्षमता असायला हवी. एखाद्याची क्षमता नसेल तर गुरू त्याला "ध्यानाला बसत जा" असा सल्ला देईल.

प्रश्न: कुंडलिनी जागृत झाली की काय अनुभव येतात? 
उत्तर: अनुभव हे प्रत्येक व्यक्तीला वेगळे येतात, उदा. काही साधकांना तात्काळ कुंडलिनी क्रिया चालू होतात, म्हणजे आपले आपल्या शरीरावरील संतुलन सुटते. काही विशिष्ट प्राणायाम, योग् आसने, बंध, मुद्रा या आपोआपाच घडू लागतात, काहींना देवतांची दिव्य दर्शने होतात.काहींना खूप प्रकाश दिसतो, काहींना पाठीच्या कण्यातून वीज सळसळत गेल्यासारखे जाणवते, तर काहींना अंगभर मुंग्या येतात. काहींचे दीर्घ श्वसन सुरू होते. तर काहींना काहीच अनुभव येत नाही. म्हणजे कुंडलिनी जागृत झाली नाही असे नाही, येणारे अनुभव हे पूर्णपणे तुमच्या पूर्व जन्मीच्या साधनेवर आणि आध्यात्मिक कमाई वर अवलंबून असतात.

दीक्षा घेतल्यावर सद्गुरूंजवळ कसे वागावे?

 • सद्गुरूंशी खोटे बोलू नये.
 • फार बोलू नये.
 • सद्गुरूंची निंदा करू नये.
 • आपले बोलणे बरोबर नाही, असत्य आहे, या स्वरूपाचे शब्द तोंडात येऊ नये.
 • गुरूंसमोर वेगळी पूजा करू नये.
 • मर्यादा सोडून वागू नये.
 • दीक्षा वगैरे विषयावर आपले प्रभुत्व दाखवणारे भाषण करू नये.
 • सद्गुरूंचे आसन, अंथरुण, वस्त्रादि-कपडे, अलंकार, पादुका, चित्र इ. ना स्पर्श करून वंदन करावे.
 • गुरू आज्ञा मोडू नये.
 • सद्गुरूंना प्रत्युत्तर देऊ नये.
 • दिवसा, रात्री, सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळली पाहिजे.
 • असत्य, अशुभ, वादविवाद इ. टाळावे.
 • सद्गुरूंना न आवडेल असे करू नये.
 • सद्गुरूकार्यातआळस करू नये.
 • सद्गुरू कार्यात लौकिक इच्छा नसाव्यात.
 • सद्गुरू कार्यात राग नसावा.
 • सद्गुरूंच्या डोळ्याला डोळा भिडवून कधीही बोलू नये.
 • सद्गुरूंना नमस्कार केल्याशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये.
 • संपत्ती, जात किंवा आश्रम इ. चा अभिमान नको.
 • सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये.
 • सद्गुरूंसमोर देपूजाही करू नये.
 • सद्गुरूंसमोर पलंगावर निजू नये व तसेच समोर हात पाय पसऱून बसू वये.
 • आळस, अंगविक्षेप समोर करू नये.
 • जाता-येता सद्गुरूंच्या पादुकांना वंदन करावे.
 • त्यांचे काम प्रसन्नतेने करावे.
 • सद्गुरूंची सावली ओलांडू नये.
 • त्यांचे पुढून तसेच जाऊ नये.
 • अनवाणी जाऊन आधी गुरुगृहाला वंदन करावे.
 • सद्गुरूंसमोर आपला शिष्य-संप्रदाय मिरवू नये.
 • अहंकार करू नये.
 • आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंसमोर नमस्कार करू नये.
 • सद्गुरूंशी 'तुम्ही' सर्वनामान न बोलता 'आपण' सर्वनाम वापरून बोलावे.
 • सद्गुरूंना वंदन करून त्यांचेजवळ बसावे.
 • सद्गुरूंच्या आज्ञा घेऊन त्यांच्या जवळून जावे.
 • सद्गुरूंसमोर काम, क्रोध, लोभ, मान घेणे, हसणे, स्तुती करणे, कुटिलता दाखविणे, ओरडणे, रडणे या गोष्टी करू नये.
 • सद्गुरूंना ऋण देणे किंवा त्यांच्याकडून ऋण घेणे, त्यांना वस्तू विकत देणे या गोष्टी करू नये.
 • सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते.
 • सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे.
 • गुरू, गुरू-मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे.

||'उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा'||

पूर्वेकडे तोंड करून ताठ बसावे. शरीर स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. शरीर स्थिर झाले म्हणजे मन आपोआप स्थिर होऊ लागते. आपल्या आवडत्या देवतेचा जप मनातल्या मनात करत राहावा. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. वर्षभर अशी साधना केल्यानंतर आपल्या आवडत्या देवाचे रूप डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करावा. याला 'सगुण ध्यान' म्हणतात. निर्गुण ध्यानामध्ये वरीलप्रमाणे सर्व तयारी करावी व मनःचक्षुने आकाश, ज्योति पाहण्याचा प्रयत्न करावा. याला 'निर्गुण ध्यान' म्हणतात. आत्मध्यानामध्ये स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे व श्वासाने ब्रम्हरंध्राला धक्के द्यावेत. म्हणजे "उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा" याचा अनुभव येतो, प्रकाशमय परब्रम्हाचा अनुभव येतो, आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. आत्मज्ञान होते. ब्रम्हज्ञान होते, प्रकाशब्रम्हाचा साक्षात्कार होतो. पुढील साधना कशा कराव्यात याचे मार्गदर्शन दिव्यलोकांतून प्राप्त होते. ही साधना करतांना ब्रम्हरंध्रावरही लक्ष केंद्रित करावे, म्हणजे फळ लवकर प्राप्त होते.

या  गोष्टी जीवनात आत्मसात केल्यास साधनेत खूप प्रगती करता येऊ शकेल

जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील:

१) ब्राम्हमुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे.

सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्राम्हमुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच काहीही न करता शांत बसा. ‘जो सुखाला, दु:खाला, जीवनाला, मृत्यूला जाणणारा आत्मदेव आहे, मी त्या सत-चित-आनंद्स्वरुपाच्या माधुर्यात शांत होत आहे. हे मायाविशिष्ट शरीर माझे नाही परंतु माय आणि मायेचे खेळ मज चैतन्यामुळे प्रकाशित होतात. ते चैतन्य मी आहे. सोsहम, या ब्रम्हभावात एक-दोन मिनिटे बसून रहा. भगवान श्रीकृष्णसुद्धा झोपेतून उठल्यावर काही वेळ शांत बसत असत. खूप लाभ होतो.

दिवसभर काम केल्याने जे मिळेल ते नश्वर मिळेल, सुटणारे, दु:ख देणारे मिळेल किंवा थोडेसे, मिटणारे, तुच्छ, किरकोळ सुख मिळेल; परंतु झोपेतून उठल्यानंतर काही न केल्याने सुख आणि दु:खाला थिटे करून परमात्म्याची भेट घालून देणारे पद (परमात्म-पद) मिळेल.दिवसा केलेल्या पूजा-आरतीने लाभ होतो पण याचा लाभ अनेक पटीने अधिक होतो. काशी आणि मक्केला जाणे सर्वांच्या हातची गोष्ट नाही. सकाळी झोपेतून उठताच काही वेळ शांत व्हा, मग हजारदा काशी वा मक्केला गेल्यानंतरही जो मिळेल कि नाही सांगता येत नाही त्या परमात्म्याला तुम्ही भेटू शकता.

२) प्रार्थना.

रोज प्रार्थना करा की ‘हे परमेश्वरा ! हे गुरुदेवा ! हे इष्टदेवा ! माझे ह्र्दय पवित्र होवो; पवित्र भाव आणि पवित्र ज्ञानाचा विकास होवो. सर्वामध्ये जी एक सत्ता वसलेली आहे, टी साक्षी, चैतन्य. सतस्वरूप आहे.

आदि सचु जुगादि सचु || है भी सचु नानक होसी भी सचु ||

त्या स्त्स्वरुपात माझी स्थिती व्हावी. असत शरीरात, असत सुख-दु:खात स्थिती झाल्याने माझा कित्येकदा जन्म-मृत्यू झाला. आता मी सतमध्ये स्थित व्हावे.’ ना साबणाने ह्र्दय पवित्र होईल ना पाण्याने.
प्रार्थनेनेच ह्र्दय पवित्र होईल.

३) प्रणवचा दीर्घ जप.

सकाळी गुरुमुर्तीला, इष्टमूर्तीला न्याहाळीत प्रणवचा दीर्घ जप करावा. ॐ कार सिद्धी, जीव आणि ईश्वरामधील एक सुंदर सेतू आहे. प्रणवचा दीर्घ जप एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता शक्तीचा संचय करते. ‘ॐ’ बीजमंत्र भोग, मोक्ष, आरोग्य, आयुष्य आणि साफल्य देणारा आहे. त्याचबरोबर हा शांती, आत्मबळ आणि बुद्धीचाही विकास करतो. आजपासून याचा जप सुरु करा. आजच दिवसभरात तुम्हाला याच्या सुंदरतेचा, याच्या महानतेचा थोडासा अनुभव होईल, उद्या आणखी जास्त होईल. दहा-वीस दिवसांनी तर तुमच्या शरीरातील पेशीमध्ये व मनात बरेच परिवर्तन होईल.

४) ध्यान.

सकाळी ध्यानात वेळ व्यतीत केला पाहिजे. ध्यानासमान कोणतेही तीर्थ नाही, कोणताही यज्ञ नाही, कोणतेही तप नाही, कोणतेही दान नाही, कोणतेही स्नान नाही. कर्म करताना अधूनमधून एक-दोन मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या कर्माची आणखी शोभा वाढेल आणि तुमच्या चित्तातही कर्म करण्याचा आनंद येईल.

५) प्राणायम.

दररोज प्राणायाम केले पाहिजेत. प्राणायाम केल्याने पापनाशिनी शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, अनुमान शक्ती, क्षमाशक्ती व शौर्यशक्ती विकसित होते तसेच स्मरणशक्तीसुद्धा वाढते. जे प्राणायामपरायण आहेत. अशा निष्पाप साधकांच्या ह्रदयात आत्मप्रकाश होतो.श्वास घेवून रोखून ठेवून भगवन्नाम-जप केल्यास त्याचा शतपटीने प्रभाव होतो. भगवान्नामासह केलेले प्राणायाम थोड्याच दिवसांत तुम्हाला प्रसन्नचित्त, मधुमय, मधुर स्वभावी आणि सदभावनेने संपन्न करू शकतात.

६) मौन.

मौन राहण्याचा अभ्यास (सराव) करा. मौनामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो, मनोबल व बुद्धीबळ वाढते. बोलल्याने शरीरातील मज्जा, ओज आणि जीवनशक्ती हे तिन्ही खर्च होतात. म्हणून सारगर्भित बोला, दहा शब्दांऐवजी सहातच काम निपटवा. रोज कमीतकमी तीन तास मौन राहण्याचा अभ्यास करा.

७) आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करा.

साधन केल्याने सदभाव तसेच बऱ्याच सिद्धी येतात. परंतु आपल्यात काही ना काही दोष असतात म्हणून परम सिद्धी- ब्रम्हज्ञान होत नाही. आपले दोष दूर करण्यासाठी सकाळी दृढ संकल्प करा आणि त्यातच संलग्न रहा. यासाठी जीवनात काही व्रत-नियम असले पाहिजे, दृढता असली पाहिजे. आपले जीवन उन्नत करण्यासाठी वरील सा