श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर

श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर

जन्म: श्रावण वद्य ८ शके १७७७, दिनांक ३ सप्टेंबर १८५५, रोहिणी नक्षत्र, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी
जन्म नाव: दत्तोपंत 
आई/वडिल: गोदाक्का उर्फ सिताबाई / रामचंद्रपंत कुलकर्णी 
कार्यकाळ: १८५५ - १९०५
गुरू: श्री बालमुकुंद / बाळाप्पा (मूळ नाव श्री बाळाजी अनंत कुलकर्णी), दिक्षा - अश्वीन वद्य १२, १८७५ 
संप्रदाय: अवधूत संप्रदाय
वाङ्मय: गीतासार, अमृतानुभव, श्रीदत्त प्रेम लहरी
विवाह: मातुल श्रीपादपंत यांची कन्या यमुनाक्का यांच्याशी दिनांक ४-५-१८८२, पत्नीचा मृत्यु  ८-३-१९०४
निर्याण: अश्र्विन वद्य ३ शके १८२७, दिनांक १६-१०-१९०५, (५१ व्या वर्षी)
विशेष: दत्त प्रेमलहरी 

भारतात प्रचलित असलेल्या विविध उपासनामार्गात ‘दत्तसंप्रदाय’ हा अत्यंत प्राचीन आहे; किंबहूना इतर संप्रदायांवर त्याची छाप कमी अधिक प्रमाणात दिसून येते. अवधूतपंथ हा त्यापासून फारसा वेगळा नाही. दत्तसंप्रदायात अनेक महान् लोकोत्तर विभूति निर्माण झाल्या आणि त्यांनी हा संप्रदाय जिवंत व प्रभावी ठेवला असून त्याची परंपरा अखंड राखली आहे. अशा परंपरेत श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर या श्रीदत्तावतारी सत्पुरुषाची गणना असून, त्यांनी या पंथाची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे.

जन्म व बालपण 

श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत, त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातुश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके १७७७ म्हणजे दि. ३-९-१८५५ रोजी रोहिणी नक्षत्रावर, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी, त्यांच्या मातुलगृही झाला. हा गाव घटप्रभा नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मध्यात वसलेला असून दत्तोपंतांच्या आयुष्याचा बराच काळ या गावांशी निगडित आहे. दत्तोपंतांचे वडील हे बेळगावनजीक बाळेकुंद्री या गावच्या कुलकर्णी घराण्यापैकी होत. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी या गावी व माध्यमिक शिक्षण बेळगाव येथे झाले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंअ कष्टात त्यांना आपला शिक्षणक्रम चालवावा लागला.

श्रीपंतमहाराजांच्या पूजेतील श्रीदतांत्रेयांचाफोटो
श्रीपंतमहाराजांच्या पूजेतील श्रीदतांत्रेयांचा फोटो 

श्री पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच अध्यात्म - विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच. त्यांना पंतांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत. श्रीपंतांच्या मातोश्रींचे आजे अंबाजीपंत हे एक महान गृहस्थाश्रमी सत्पुरुष होऊन गेले. श्रीनृसिंहवाडीत अनुष्ठानास बसणाऱ्या मंडळींना ‘दड्डीस जाऊन अंबाजीपंताचे दर्शन घ्या म्हणजे तुमचे काम होईल.’ असा दृष्टांत होई. त्यांचे चिरंजीव नरसिंहपंत हेही सात्त्विक व आचारसंपन्न; पण अत्यंत व्यवहारदक्ष व करारी होते. ते अंबाजीपंतांच्या हयातीतच वारल्यामुळे त्यांच्या तीन मुली व मुलगा श्रीपाद यांचा भार त्यांचेवरच पडला; पण श्रीपादपंत दहा वर्षाचे असतानाच अंबाजीपंतांनी देह ठेवला. त्याचे आतच आपल्या तिन्ही नातींची लग्ने त्यांनी उरकली होती. श्रीपंतांचे पाळण्यातील नाव श्रीकृष्ण असे ठेवले होते. पुढे दृष्टांत होऊन ‘दत्तात्रय’ असे दुसरे नाव ठेवण्यात आले. वडीलमाणसे त्याला प्रेमाने दत्तू म्हणून हाक मारीत. घरात प्रथम जन्मास आलेले अपत्य म्हणून दत्तूवर सर्वांचे विशेष प्रेम जडले. त्यांचे व त्यांच्या बंधूंचे प्राथमिक शिक्षण दड्डीसच झाले.

श्रीपादपंतांचे दत्तूवर अपत्यनिर्विशेष प्रेम होते. याबाबत पंतांनीच सांगितलेली एक गोष्ट येथे घ्यावीशी वाटते. श्रीपादपंतांकडे पाच गावचे कुळकर्णी काम असताना ते त्यासाठी तालुक्याचे ठिकाणी म्हणजे चिक्कोडीस गेले असता त्यांना त्याच दिवशी रात्री स्वप्नात दिसले की, दत्तू हा दड्डी येथील घरच्या सोप्यातील एका तुळईवरून दुसऱ्या तुळईवर उडी मारत असता खाली पडला. इतके पाहताच श्रीपादपंत दचकून उठले व कसलाही विचार न करता सनद्यास घेऊन ते रातोरात चिक्कोडीहून निघून तेथून ३० मैल असलेल्या दड्डी गावी सकाळी १० वाजण्याचे सुमारास येऊन पोहोचले. येताक्षणीच ‘आई, दत्तू कोठे आहे?’ म्हणून घाबऱ्या स्वरात त्याची चौकशी करू लागले. आई व सुंदराक्का त्यांना म्हणाल्या, ‘हे रे काय, असा का घाबरला आहेस? तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला आहे. आत्ता येईल !’ इतक्यावरच न थांबता त्यांनी दत्तूस शाळेतून आणविले व त्याला मिठी मारून अश्रू ढाळल्यानंतरच त्यांचे समाधान झाले.

मातुल घराण्याच्या प्रेमळ वृत्तीचे वर्णन श्रीपंतांनी ‘प्रेमभेट’ या आपल्या निबंधात फार बहारीचे केले आहे. ते वाचकांनी पाहावे. त्यात दोन्ही घराण्यांच्या विशिष्ट गुणांचे वर्णन आहे. त्या शुद्ध प्रेमाचा व वीर वृत्तीचा पुतळाच पंतरूपाने जन्मास आला की काय असे वाटते! असो! बालपणीच, दड्डीचे जंगल, नदी, डोंगर व निसर्गशोभा यांचा दत्तूचे मनावर फार अनुकूल परिणाम झाला असला पाहिजे, दत्तूचा वर्गात पहिला नंबर असे, कधीही कसलीही चूक न करणारा, खेळकर, मनमिळाऊ व आज्ञाधारक असा त्याचा विद्यार्थीदशेत लौकिक होता. इकडे श्रीपादपंतांनी त्यांचेकडून कर्म व उपासनेचे कडक आचरण करून घ्यावयाचे, अक्षर वळविण्यासाठीसुद्धा "विदुरनीती" अशी प्रकरणे लिहवायचे. त्यांच्या फुरसतीच्या वेळी त्याला आपल्या हाताखाली घ्यावयाचे, याप्रमाणेच चोख गृहशिक्षणातून पार पडून तो इंग्रजी शिक्षणासाठी बेळगावास इ. स. १८७२ साली जाऊन राहिला. क्रमाने एकेक बंधू आपले प्राथमिक शिक्षण दड्डीस संपताच बेळगावास दत्तूच्या बिऱ्हाडी जाऊन राहू लागले.

उच्च शिक्षण व गुरु अनुग्रह 

बेळगावास इंग्रजी शिक्षण चालू असताना पंताचा मावसभाऊ गणू मारीहाळास आपल्या गावी राहत होता. हे गाव बाळेकुंद्रीच्या पूर्वेस ४/५ मैलांवर आहे. तेथून एक मैल पूर्वेस कर्डेगुद्दी हे गाव आहे. त्या ठिकाणी श्रीबालमुकुंदाची स्वारी पार्शवाडहून येऊन राहिली होती. त्यांचे मूळचे नाव बाळाजी अनंत कुलकर्णी असे होते. ते परमार्थातील असामान्य योग्यतेचे तपस्वी व महायोगी असून परमहंस पदवीस पोचलेले होते. त्यांचे वर्णन पंतांनी श्रीदत्तप्रेमलहरी पद नं. १८३ यात केले आहे. ते अत्यंत मनोहर आहे. त्यांचा अनुग्रह पंताचे मावसभाऊ गणपतराव यांजवर होऊन त्यांनी दत्तूस त्यांचे दर्शनास येण्याबद्दल पत्र धाडले. त्यास दत्तूने उत्तर पाठविले ते असे की, "ब्राह्मणांना गायत्रीमंत्र व उपदेश याविना अन्य मंत्राची अगर गुरूची आवश्यकता काय? तू आपला उद्योग सोडून कोणा भोंदू, बैराग्याचे नादी लागला आहेस. ताबडतोब शुद्धीवर ये व आपल्या प्रपंचाकडे लक्ष दे" हे दत्तूचे उत्तर बाळाप्पास समजताच त्यांनी "हे पत्र लिहिणाऱ्याला धक्का पोचून तो लवकरच मरतो बघ" असे उद्गार गणू व इतर शिष्यमंडळींपुढे काढले. ते ऐकून गणू रडू लागल्याचे पाहून बाळप्पा हसून म्हणाले की "तो इकडे येईलच. त्यानंतर पुढे काय होते ते पहा."

त्यावेळी दत्तू दड्डीस होता. त्याला एकाएकी विषमज्वर येऊ लागला व त्यातच सान्निपात झाला. त्या भ्रमात "बाळप्पा, बाळप्पा" असे तो बडबडू लागला. घरची सर्व मंडळी घाबरली व त्यांनी देवास नवस मागितला की, दत्तू बरा होताच त्याला बाळप्पांकडे पाठवून देऊ. या दुखण्यातून कृपा करून त्याला बरा कर. दत्तूस लवकरच आराम पडला व त्यानंतर त्याची व बाळप्पांची गाठ पडून त्यांची त्याजवर पूर्ण कृपा झाली. ही सर्व हकीकत या चरित्रात सविस्तर आलेली आहेच.

श्रीबालमुकुंदाचा अनुग्रह होताच दत्तूचा पुनर्जन्म होऊन तो श्रीपंत बनला, त्यांचा सहवास पंतांना फार तर दोन-तीन वर्षे लाभला असेल; पण तेवढ्या अवधीत इंग्रजी शाळेतील अभ्यास चोख करून बेळगाव येथील आपल्या प्रपंच खर्चासाठी मदत म्हणून काही शिकवण्या धरून व बालमुकुंदाच्या कृपाछत्राखाली गुरुगृहीचे खेळ-खेळताच त्यांनी सर्व प्रकारची योगसिद्धी मिळविली ही अत्यंत नवलाची गोष्ट होय. कर्डेगुद्दीपासून ४/५ मैल पूर्वेस देसनूर येथे श्रीबालमुकुंदाचे वास्तव्य काही काल असताना तेथील एका देवालयात ते योगाभ्यासाठी बसत असत. ती जागा अद्याप दाखविली जाते. कर्डेगुद्दीच्या डोंगरावर ‘अय्यन फडी’ या देवस्थानासन्निधही त्यांचेकडून बाळप्पांनी तप करविले. एकदा तीन दिवस अहोरात्र अखंड गुरूध्यान करीत बसण्याची व बिलकूल निद्रावश न होण्याची श्रीबालमुकुंदांनी आपल्या शिष्यमंडळींना आज्ञा केली. त्यात कोणी जेवताना झोपले, तर कोणी स्नान करताना गुंगी येऊन खाली पडले. एकटे पंत तेवढे अखेरपर्यंत टिकून राहिले. याप्रमाणे श्रीपंत सर्व प्रकारे योगारूढ झाले. पंतांना इ. स. १८७५ ते १८७७ अखेर, एवढाच काल काय तो बाळप्पांचा सहवास मिळाला. शके १७९९च्या कार्तिक महिन्यात बाळप्पांचा श्रीशैल्ययात्रेस जाण्याचा निश्चय ठरला. त्याचे अगोदर थोडे दिवस त्यांनी पंतांना गुरूमार्ग चालविण्याची आज्ञा केली होती. पंतांनी त्याबाबत पुष्कळ आढेवेढे घेतले; पण बाळप्पांनी निक्षून सांगितले की, "हे काम तुला केलेच पाहिजे, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. अपात्रता वगैरे तुझी काही सबब चालणार नाही. तुला माझे पूर्ण वरदान आहे !" पंतांना ती आज्ञा स्वीकारणे भाग पडले. व श्रीबालमुकुंद ठरल्याप्रमाणे श्रीशैल्याकडे निघून गेले. ते पुन्हा काही परत आले नाहीत. यावेळी पंत मॅट्रीकची परीक्षा पास झाले नव्हते. परंतु अशा सर्व प्रकारे अडचणीत असताना त्यांचेवर गुरूमार्ग चालविण्याचा भार पडला. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२/२३ वर्षाचे असेल. बाळप्पांच्या आज्ञेप्रमाणे गुरुबंधूंना सन्मार्गदर्शन करणे व गुरूमार्ग चालविणे हेच तेव्हापासून त्यांचे आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसले.

कर्म योगी पंत 

सन १८८०च्या नोव्हेंबरमध्ये पंत मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढील वर्षीच आपला बंधू गोपाळ व मामेबंधू नाना यांना इंग्रजी शिकवण्याकरिता बेळगावास आणून ठेविले व आपण शाळामास्तरची नोकरी पत्करली आणि कसाबसा बेळगाव येथील संसार चालवू लागले. पुढल्याच वर्षी म्हणजे शके १८०४ वैशाख व. १ तिथीस त्यांचे लग्न झाले व ते पूर्ण गृहस्थाश्रमी बनले; पण त्यांचा संसार हा सामान्य माणसासारखा नसून गुरूवचनांचा अनुभव घेण्याचे क्षेत्र बनून राहिला. त्या स्वरूपात त्यांचेकडून अखंड सद्गुरूसेवाच घडली. प्रत्येक बाबतीत इतरांना आदर्शभूत असा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरून दाखविला. क्रमाने एकेक बंधू व आप्तेष्टांची मुले व गरीब विद्यार्थी त्यांचेकडे शिक्षणासाठी येऊन राहू लागले. त्या सर्वांवर कडक नजर ठेवून, त्यांचेकडून उत्तम अभ्यास व नीतिनियमांचे परिपालन कटाक्षाने करविले. अखेरपर्यंत त्यांनी उत्तम शिक्षक असे नाव मिळविले. संसार व परमार्थ या दोन्ही बाबतीत त्यांनी अनेकांना अनेक बाबतीत साहाय्य दिले. इतके असून कधीही ते द्रव्यास शिवले नाहीत. पगार हाती येताच ते आपला बंधूपैकी जो व्यवस्थापक असेल त्याचे हवाली करणे, हा त्यांचा प्रघात असे. शाळेतून येताच ते आपल्या कोचावर बसून, वेदांत ग्रंथाचे वाचन, चर्चा व मुमुक्षूजनांचे समाधान करणे यात निमग्न असत. सकाळ - संध्याकाळ नियमाने भजनपूजन व येणाऱ्याजाणाऱ्यांचे अतिथ्य घडत असे. सन १८९७ ते १९०३ पर्यंत दरसाल बेळगावात प्लेगने कहर करून सोडायचा. प्रेत टाकून लोक पळून जात होते. अशा वेळी पंतबंधूंनी प्रेतवाहकाचे कामी पुढाकार घ्यावयाचा. सुट्टीत परगावी दड्डीकडे वगैरे गेल्यावेळी, पाणी वाहून आणण्याचे काम अनायासे होईल म्हणून लग्नकार्य करणाऱ्या लोकांनी यांच्या येण्याची वाट पाहत बसण्याचे, कारण यांचेबरोबर भक्तमेळा असावयाचाच व तो केव्हाही परोपकारी असणारच, असा अनुभव असे. पंतांचे बंधू, कोणी वकील, कोणी मन्सफ, कोणी चिटणीस, कोणी प्रांतसाहेब वगैरे हुद्द्यापर्यंत चढले तरी त्यांनी आपापल्या परी सदाचार व परोपकाराचा लौकिक वाढविला. हे कर्मयोगाबाबत थोडेसे वर्णन झाले.

श्रीपंत भक्तांचे मार्गदर्शन 

भक्तियोग, राजयोग व ज्ञानयोग हे त्यांच्या नखशिखांत भरले असून तद्नुसार आचरण त्यांनी आपल्या भक्तांकडून घडविण्याचा सतत प्रयत्न केला. योगसाधना व मुद्रा लावणे हे ज्यांना करावेसे वाटे त्यांचेकडून करवीत असत. वेदांतचर्चा व इतरांचे शंकासमाधान ते निरलसपणे करीत. तथापि त्यांचा कटाक्ष भक्तियुक्त कर्ममार्गावरच असे. वर्षातून त्यांच्या, दड्डीस बहुतेक तीन खेपा व्हावयाच्या. त्या त्या वेळी दड्डीच्या जंगलात, नदीकाठी व गावातील दत्तमंदिरात त्यांचे भजन, टिपऱ्या खेळणे वगैरे पारमार्थिक खेळ अव्याहत चालत. त्यातही मंडळी धन्य होतच; पण प्रेक्षकजनही देहभान विसरून भक्तिप्रेमाने अत्यंत सुखावत.

सन १८८३ पासून पंतांची वृत्ती योग्याभ्यासावरून भक्तीकडे वळली. मन भजनात रंगू लागले. सहज काव्य-स्फूर्ति होऊ लागली. त्यांचा काव्यसंग्रह ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ (पुष्प १ले) या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे काव्य नानाविध रसांनी व भावनांनी ओथंबलेले आणि त्याबरोबर तत्त्वज्ञानाने रसरसलेले असे आहे.

सन १८८३पासून १८८५चा काल संचार, प्रबोधन व संप्रदाय-प्रचार यात पंतांनी घालविला व शिष्यशाखा जोडली. भजन-पूजन, अध्यात्म चर्चा व हसत-खेळत उपदेश हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम, यात बालमुकुंदाचे स्मरण व पुनर्भेटीची तळमळ ही सतत अनुस्यूत होती. सन १८८५ अखेर अंतर्मुख अवस्थेत त्यांना बाळप्पांचे निर्याण झाल्याचे कळून आले व जबाबदारीची जाणीव तीव्र झाली. त्यांनी बालमुकुंदांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यांसारखे उत्सव चालू केले. सन १८८९ पर्यंतच्या काळात अशा रीतीने पंथ-प्रचार-कार्याला चालना दिली. त्या वर्षाअखेर एक दत्तमंदिर बांधण्याचे कार्य त्यांनी पूर्ण केले.

सन १८९१ साली त्यांनी आपला ‘गीतासार’ हा निबंध लिहिला. सन १८९४चे सुमारास श्रीज्ञानेश्वरांच्या "अमृतानुभव"चा अनुवाद शुद्ध मराठीत करण्याचा उपक्रम केला, पण तो पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. त्यांचे अनेक लहान मोठे लेख आहेत. ते प्रासंगिक व प्रासादिक आहेत. लिहावे म्हणून लिहिलेला एकही नाही. सर्व स्वानुभवाचे बोल. पंतांच्या सर्व लेखांचा उल्लेख या अल्पशा मर्यादेत करणे अशक्य आहे. उपलब्ध असलेले सर्व वाङ्मय, ‘श्री दत्तप्रेमलहरी’ या पुस्तकमालेत प्रसिद्ध झालेले आहे.

पुष्कळ वेळा तिसऱ्या घालीत भजन करीत असताना त्यांचे देहभान नष्ट होऊन त्यांच्या सवंगड्याची पंचाईत होई. ज्यांनी त्यात भाग घेउन नाचत असत व तीच अवस्था त्यांच्या सवंगड्यांची होई. ज्यांनी त्यात भाग घेतला असेल अगर नुसते पाहिले असेल, ते धन्य होत. सन १९०६पासून श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे दरसाल जे पुण्यतिथीचे उत्सव चालतात त्यामध्ये हा अनुभव घेण्याजोगा आहे. संपूर्ण निरहंकार वृत्ती, निर्लोभता व प्रसिद्धीविन्मुखता ही त्यांचे वृत्तीत पूर्णपणे बाणलेली असत. अहंकारावर त्यांचा प्रहार झाला नाही असे एकही पद आढळावयाचे नाही व तो शिष्यांचे ठायी निर्मूलन करणारा पंतांसारखाच समर्थ सद्गुरू प्राप्त होणे कठीण आहे. हे स्वानुभवाने व कृतकृत्येने मला म्हणावेसे वाटते. सद्गुरू कसा असावा यासंबंधी त्यांचे पदातील एक पद नं. १२५७ असे आहे:-

"सद्गुरू तोचि करावा । वेदोदित अनुभवी असावा ॥धृ.॥
शिष्याची जो न घे सेवा । उपदेशिता मानी देवा ॥१॥
गुरुत्वाचा अभिमान नाही । बोधी धरी नम्रभावा ॥२॥
साधन शीण न लावी दासा । अभयवचने दत्तभावा ॥३॥"

अहंकार हा रेडा असून तो सद्गुरूमातेस बळीच दिला पाहिजे. त्याचाच टिळा गुरुकृपेने धारण करून, निर्भयतेने ही संसारयात्रा संपवून, त्याचे स्वरूपात विलीन होऊन जाणे हीच कृतार्थता, ही शिकवण त्यांचे ग्रंथातून, पदांतून व आचरणातून शिकणेची आहे.

श्रीबालमुकुंदांच्या आज्ञेप्रमाणे, श्रीपंत हे त्यांना जे शरण आले, त्यांचेवर अनुग्रह करीत असत. कोणासही विन्मुख पाठवीत नसत. त्या वेळी जो ठसा शिष्याचे अंत:करणात उमटत असे, तो कलिकालादिकांनाही पुसून टाकता येणे शक्य नाही असे त्यांचे ब्रीदवाक्य असे. त्याची सत्यता अनुभवीच जाणतील ! ह्या अलौकिक सामर्थ्यामुळेच त्यांना अवतारी पुरूष असे भक्त मानतात व ते सर्वथैव योग्य आहे. भक्तांचे संकटी त्यांनी आठवण करताच धावून जाणारा तोच आम्ही पाहिला. वेद. गंगाधर भट्ट या नावाचा दड्डीचा एक भिक्षुक त्यांच्या कृपेस पात्र झाला होता. पुढे तो काही वर्षांनी चंदगड येथील त्याचा वडीलगुरुबंधू अण्णाभट याजबरोबर भांडला. त्याच्या शापाने तो वेडा होऊन नजीकच्या रामघाटात नग्नावस्थेत हिंडू लागला. तशा अवस्थेत तो असताना त्याला श्रीपंतांची बेळगावास ताबडतोब येण्याबद्दलची हाक ऐकू येई. शेवटी त्या हाकेप्रमाणे तो बेळगावास पंतगृही आला. आला तो नग्नावस्थेत व मिशाभिवयांसह सर्व केस काढलेला असा आला. त्या वेळी तेथेच शिक्षणासाठी राहिलेला असल्यामुळे माझ्यासमोर ते दृश्य असून, त्याचे वेड जाऊन, पुढे तो त्यांचे घरचा अत्यंत विश्वासू नोकर म्हणून राहिला. शेवटी श्रीपंतांबद्दलच्या कृतज्ञतेने व गुरूप्रेमाने ओथंबलेल्या स्थितीत "श्रीगुरूदेवदत्त" अशी गर्जना करीत त्याने प्राण सोडला. श्रीपंतांचे समकालीन व त्यांचे जिवलगांपैकी श्रीसिद्धारूढमहाराज, हुबळी हे होत. त्यांनी पंतांना अवतारी पुरूष म्हणून ओळखले होते. श्रीपंत त्यांचे भेटीस गेल्यावेळी एकदा तर त्यांनी श्रीपंतांना खांद्यावर घेऊन कानडीत "नी दत्तन अवतारो" (तू दत्ताचा अवतारच रे) असे म्हणून नाचू लागले. पंताच्या शिष्यांना आरूढस्वामी "नीऊ हुलिमक्कळरू" (तुम्ही वाघाचे बच्चे रे) असे संबोधीत असत.

पंतबंधू कै. गोपाळरावजी हे हुक्केरीस मामलेदार असताना फिरतीवर एका तल्लख घोड्यावर बसून गेले असता, घोड्यावरून खाली पडता पडता साहजिकपणे "दत्ता, दत्ता" असे त्यांचे तोंडून शब्द बाहेर पडले. तोच इकडे पंतांना ती तार पोचली व त्यांचे दर्शन गोपाळरावांस होऊन आलेले संकट निभावले. विद्यार्थी दशेत अनेक चमत्कार घडलेले पाहिले आहेत; पण आपण कोणी अलौकिक पुरूष आहोत अशी भावना शिष्यांच्या ठिकाणी ते वसू देत नसत. आम्हा सुशिक्षित म्हणविणाऱ्या मंडळींना ते सांगत की, "There is nothing supernatural in nature" (निसर्गात अनैसर्गिक काही असणेच शक्य नाही.) त्यांचे समोर कोणीही आला तरी त्याचे विचार त्यांना अवगत होऊन भाषणाचे ओघात, त्याच्या शंकांचे निरसन होऊन जाई; हा तर रोजचाच अनुभव असे.

त्यांचे खेळ मुख्यत्वे शिष्यांच्या अंत:करणातील द्वैतबुद्धी व तज्जनित भीती घालविण्याकरता व त्यांना यथेच्छ प्रेमसुख मिळावे म्हणून खेळले जात. शिष्य होणारा इसम कोणत्याही जातीचा, धर्माचा अगर वंशाचा असो, त्याला त्यांनी कधीही मज्जाव केला नाही. आमचे देखत युरोपियन, पार्शी, मुस्लीम व अंत्यजादि त्यांचे शिष्यत्व पावून धन्य झालेले आहेत. शिष्यांकडून त्यांनी प्रेमाशिवाय अन्य कशाचीही इच्छा केली नाही. त्यांना त्यांची आज्ञा फक्त "सद्गुरूभक्ती, बंधूप्रीती व अखंड शांती" ही ठेवण्याबद्दल असे. कुळधर्म, कुलाचार व सद्वर्तन न पाळणाऱ्यांची त्यांनी कधीही गय केली नाही.

श्रीपंतांच्या सद्गुरूभक्तीचे पूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. असा प्रेमळ गुरुभक्त सहसा पाहावयास मिळत नाही. श्रीदत्त प्रेमलहरी पुष्प १ यांतील कोणतेही पद उघडावे, त्यांत गुरुभक्तीचा गौरव झाला नाही असे व्हावयाचे नाही. उदा. पद १९६५ पाहा.

"हृत्कमलकर्णिकेमाज्र्रं ॥ सद्गुरू बैसविला ॥ प्रेमानंदे तो पुजिला ॥धृ.॥
अहंपणाचे अर्घ्य देतां । अधिष्ठानी शोभला । भावातीत गुरू लाभला ॥१॥
प्रेमामृतस्नान घालिता । आंत बाहेर भिजला ॥ भक्तभजनी प्रेमे सजला ॥२॥
आत्मार्पण नैवेद्याने । दत्त तृप्त जाहला । नित्य भजनी डुलू लागला ॥३॥

श्रीपंत अत्यंत प्रेमळ म्हणून काही त्यांनी गुरूआज्ञा भंग करणाऱ्यांची किंवा नीतिबाह्य वर्तन करणाऱ्यांची कधीही गय केली नाही. स्वकर्तव्यात कोणी चुकले असे पाहताच ते लगेच "हुशार !" म्हणून गंभीर सावधगिरी देत. गुरूआज्ञेविरुद्ध वागणाऱ्यास ते सहसा क्षमा करीत नसत. ते देवासमोर आसनावर बसत तेव्हा किंवा उत्सवासाठी खोलीतून बाहेर पडत तेव्हा ते माझे आप्त  किंवा स्वकीय नव्हेत तर साक्षात् श्रीदत्तमूर्ती आहेत असा सर्वांना बरेच वेळा भास होई. नामांकित शास्त्री किंवा पंडित त्यांच्याशी वेदान्त चर्चा करण्याकरिता, केव्हा केव्हा येत असत. त्यांच्या शंका किंवा भिन्न मते, पंत आसनस्थ असताना त्यांना पाहताक्षणीच नाहीशा होत व ते पंतांची क्षमा मागत. याप्रमाणे ते "मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदू ऐसे ।" या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे अक्षरश: होते.

भक्तमंडळीवर त्यांचे कसे अलोट प्रेम होते, ते पुढील गोष्टीवरून समजण्यासारखे आहे. बेळगावच्या पूर्वेस दोन मैलावर कणबर्गी हा गाव आहे. तेथील कुलकर्ण्यापैकी पुट्टाप्पा हा प्लेगने आजारी पडला व त्यास गाठ उठली आहे असे पंतास समजताच ते तेथे जाऊन त्यास कडकडून भेटले व त्यांनी तीगाठ चोखून नाहीशी केली ! व त्यास आश्वासन देऊन ते परतले. त्याप्रमाणे तो लवकरच त्यातून बरा झाला.

पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच अध्यात्म - विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच. त्यांना पंतांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत.

इ. स. १९०३पासून पंतांची प्रकृति ठीक राहिनाशी झाली. त्यांनी शिक्षकीपेशाचा राजीनामा देऊन, अखंड अवधूत- चरण - सेवेला भरपूर सवड काढली व ते भजन, प्रवचनात रंगून राहू लागले. गुरूबद्दल नितांत प्रेम हे त्यांचे एकमेव सूत्र. गुरू भक्तीने ते बेभान होत असत. पंतांची भक्ती प्रेमस्वरूप व स्वरूपानुसंधान करणारी होती. त्यांनी ज्ञानभक्तीचे महत्त्व गायिले आहे.

ती. सौ. यमनाक्का दि. ८ मार्च १९०४ रोजी निवर्तली ! त्यानंतर दीड वर्षांनी श्रीपंतांनी इहलोकीची आपलीही यात्रा संपविली. आपले अवतारकार्य संपले, आता आपण लवकरच जाणार असे ते आप्त स्वकियांजवळ, यमनाक्काचे निधनानंतर १-२ वेळा म्हणाले होते. मुलगी अंबी, फार लहान होती; म्हणून तिचेकरिताच वर्ष दीड वर्ष राहिले असावेत. आपल्या प्रिय पत्नीसह त्यांनी जो बालमुकुंदाचा सुंदर संसार थाटविला होता त्याची निरवानिरव जणू चालली होती. अनेक ठिकाणचे अनेक भक्त येऊन गेले. आता वेदांतचर्चा ओसरून तिची जागा मधून मधून होणाऱ्या "शिवाय नम: ॐ शिवाय नम:" या घोषाने घेतली जात होती. नित्याप्रमाणे घरी सर्व व्यवहार व नियमित भजनपूजन ही सर्व चालत; पण पंतांची एकांतप्रियता वाढत जाऊन त्यांनी आतील आपली खोलीच धरली. रोज भजनाचे वेळी आपल्या बाहेरील कोचावर येऊन बसत.

बाळप्पांना पंतांच्या रूपाने आपला अवधूत संप्रदाय चालविणारा अधिकारी मिळाला. त्यांनी पंतांच्याकडून योगाभ्यास करवून घेतला व आपल्या योजनेप्रमाणे ज्ञानदान केले. पंतांचा संपूर्ण निवृत्तीकडे कल दिसून येताच बाळप्पांनी त्यांना परोपरीने उपदेश करून प्रवृत्तीचा व निवृत्तीचा समन्वय पटवून देऊन, त्या सांप्रदायिक भूमिकेवर पंतांना स्थिर केले. बाळप्पांना, पंत ‘बालमुकुंद’ किंवा ‘बालावधूत’ असे आपल्या साहित्यात संबोधितात.

पंतांचे निर्याण 

आश्विन वद्य ३ शके १८२७ हा पंतांच्या ऐहिक जीवनातील शेवटचा दिवस. त्या दिवशी आप्त-स्वकीयांच्या सान्निध्यांत, ‘ॐ नम: शिवाय’चा गजर करीत करीत, त्यांनी आपला देह ठेवला. पंतांची समाधी बाळेकुंद्री येथे आहे. या स्थानाला आता क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तो गाव आता ‘पंत-बाळेकुंद्री’ म्हणून ओळखला जातो. पंतांच्या पुण्यतिथीनिमित्त दरसाल तीन दिवस उत्सव होतो व मोठी यात्रा जमते. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्दछायेत अत्यंत रम्य असे आहे. पंतांचे तत्त्वज्ञान संपूर्ण अद्वैतवादी, प्रवृत्ती - निवृत्तीचा समन्वय घालणारे असे आहे. त्यांनी प्रथम योगाभ्यास पुष्कळच केला; पण भक्तीची ओढ अनावर ठरून, अवधूतमार्गातील साधनेत पराभक्तीची भर घातली.

पंतांचे वाङ्मय बरेच आहे. ते पद्यमय व गद्यमयही असून "श्रीदत्तप्रेमलहरी" या पुष्प-मालेतून प्रसिद्ध झाले आहे. त्यात मानवी जीवनाचे ध्येय, तत्प्रीत्यर्थ साधना, भोगाचा व त्यागाचा समन्वय, अशा बोधप्रद विषयांचे सुगम विवरण वाचावयास मिळते.

त्यांचे पद्य- वाङ्मय म्हणजे भक्तिरसाची प्रेमगंगा! त्यातील नादमाधुर्य अवर्णनीय आहे, अशा रीतीने
‘का फेडित पापताप! पोसवीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप ॥
पंतांनी आपली जीवनगंगा सद्गुरूंच्या विशाल प्रेमोदधीत विलीन केली.

पंत महाराज म्हणत, "भक्तांचे दुःखच माझे दुःख; भक्तांचे सुखच माझे सुख. पाहिजे ते कर, पण मला विसरू नको. तुझ्या योगक्षेमचा भार मजवर घालून निश्चित राहा. तुझे सर्वस्वाची काळजी मला आहे. परमर्थसिद्धर्थ विनाकारण कष्ट नको. निष्काम भजनी रम. ज्यास त्याचेप्रमाणे वागत जा. मोक्ष-पंथ ध्वज उभारू नको. बसल्या ठिकाणी सर्वकाही प्रवृत्ती निवृत्ती-वैभव पुरवून देतो."

श्रीपंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम

  1. सामाजिक नीतिविरुद्ध आचार कदापि करू नये.
  2. देशाचार, कुलाचार, वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे.
  3. कोणत्याही प्रकारचे व्यसन कामा नये.
  4. भक्तीची कास सोडू नये.
  5. सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी.
  6. मनोविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावी.
  7. केव्हाहि स्वानुभवसिद्ध गोष्टींवर विशेष लक्ष असावे.
  8. कोणाचीही भक्ती खंडू नये.
  9. निर्गुण-सगुण-ऐक्य-भावाने भजनक्रम चालवावा.
  10. सावधगिरीने समर्थ-वाचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत, शांत चित्ताने समर्थचरणी लक्ष ठेवून, सहजानंदात रमत असावे.

गुरुपरंपरा 

श्री दत्तात्रय 
    ।
श्रीरामावधुत
    ।    
श्री बाळावधूत
    ।  
श्री पंतमहाराज

श्री पंत महाराज ट्रस्ट, 
मु. पो. श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री,
जिल्हा बेळगाव, पिनकोड - ५९११०३. कर्नाटक.  
फोन: ०८३१- २४१८२४७.

पंत महाराज प्रेम लहरी- मोबाईल ऍप
पंत महाराज प्रेम लहरी- मोबाईल ऍप

पंत भजन गाथा - मोबाईल ऍप भक्तांसाठी गुगल प्ले वर उपलब्ध !  

श्री दत्त प्रेमलहरी मधील क्र १ ते क्र १००० पर्यन्त ची पदे Application मध्ये उपलब्ध आहेत तरी सर्व पंत भक्तांनी हे Application download करून घ्यावे. 

डाउनलोड लिंक:

https://play.google.com/store/apps/details?id=com.abhimore.pantbalekundri