जन्म: १८४४ - नगर जवळील धांदरफळ गावचे धांदरफळे
कार्यकाल : १८४४ - १९१७
गुरु: गुरुमंत्र- पांडुरंगबुवा दगडे
सन्यास दीक्षा- नित्यानंद सरस्वती, उमरखेड
संन्यासानंतरचे नाव: परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती उर्फ विष्णुदास महाराज.
निर्वाण: माहूर येथे १९१७.
माहुरगडावरील श्रीरेणुकामातेने व श्रीदत्तात्रेयाने आजपर्यत अनेकांची चित्ते स्वत:कडे आकर्षित करुन घेतली आहेत. अनेकांची ही देवी कुलस्वामिनी आहे. अनेकांना येथील श्रीदत्ताने वेध लावलेला आहे. परंतु या सर्वात अधिक वेध या दोनही देवतांचा लागला तो श्रीविष्णुदासांना. श्रीदत्त व श्रीरेणुका यांचा साक्षात्कार श्रीविष्णुदासांना वारंवार होत असे. विष्णुदासांनी आपल्या रसाळ व प्रत्ययकारी कवितेत हे अलौकिक भेटींचे क्षण शब्दबद्ध करुन ठेविलेले असल्यामुळे त्यांचा स्वाद आजही चाखता येण्यासाररवा आहे. श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीसद्गुरु पुरुषोत्तमानंदसरस्वती ऊर्फ श्रीविष्णुदास महाराज असे त्यांचे नाव असले, तरी सबंध विदर्भ व मराठवाडा त्यांना विष्णुकवी अथवा विष्णुदास याच नावाने ओळखतो. शत्रुंना भयानक वाटणारी देवी किती वत्सल व कनवाळू असू शकते हे विष्णुदासांच्या कवितेवरुन प्रतीत होईल. विष्णुदासांनी या जगन्मातेला आई म्हणून हाक मारावी व ‘आले हं बाळ’ म्हणून आईने साद द्यावी, असे या अलौकिक मायलेकरांचे नाते होते.
या विष्णुदासांनी प्रथम खडतर उपासना केली ती दत्तात्रेयांची. दत्त हे आणखी एक आधारस्थान त्यांना प्रथमपासून वाटे. विष्णुदासांचा जन्म तसा या परिसरातील नाही. इकडे पुण्या-सातार्यास त्यांचे घराणं प्रसिद्ध आहे. नगरजवळील धांदरफळ या गावचे हे धांदरफळे. नशीब काढण्यासाठी धांदरफळे सातारा येथे आले. येथेच शके १७६६ मध्ये विष्णुदासांचा जन्म झाला. लहानपणापासून हरिभक्तीचा, सत्संगाचा, कीर्तनप्रवचनांचा नाद यांना विलक्षण प्रकारचा होता. हा नाद फारसा बळावू नये म्हणून त्यांचे लग्न करुन देण्यात आले. रहिमतपूर येथील सातपुते यांच्या घराण्यातील राधाबाई ही विष्णुदासांची पत्नी त्यांना प्रपंचात मदत करू लागली. परंतु विष्णुदासांचे मन प्रपंचात रमेना. त्यांना नाद संतसंगतीचा, तीर्थक्षेत्रांचा, हरिभजनाचा. सातार्याजवळील त्रिपुटी नावाच्या क्षेत्रामधील पांडुरंगबुवा दगडे नावाच्या सत्पुरुषापासून विष्णुदासांनी गुरुमंत्र घेतला. दत्तात्रेयांची व आपली भेट व्हावी अशी भावना वारंवार मनातून उसळ्या मारी. संसारात मन रमत नसे. शेवटी व्हायचे तेच झाले. घरातील सर्व मंडळीचा लोभ सोडून विष्णुदास घरातून एका रात्री बाहेर पडले.
कुठे जायचे हे माहीत नव्हते. देव भेटावा, दत्तात्रेयांनी पोटाशी धरावे, त्यांच्याशी हितगुज करावे, हीच एक मोठी ओढ मनास होती. विष्णुदासांनी लहानपणीच श्रीगुरुचरित्राची पारायणे केल्यामुळे गुरुकृपेच्या अंकुरासाठी मनोभूमी तयार होती. दत्तभक्तीत तल्लीन होऊन सुरेल आवाजात ते पदे म्हणत असत. घरातून निघून जाण्यापूर्वीचा कोल्हापूर व नरसोबावाडी या क्षेत्रांचे दर्शन विष्णुदासांना झाले होते. याच क्षेत्रांनी पुन्हा त्यांना मौन निमंत्रण दिले. कृष्णेचे स्नान, श्रीदत्तपादुकाचे दर्शन व गणेशशास्त्री कवीश्वर यांचा यज्ञ यांची आठवण त्यांच्या मनास सतत होत असे. दत्ताच्या समोर बसून पदे व अष्टके म्हणण्यातील अवीट सुख त्यांना पुन:पुन: अनुभवायचे होते. याच ओढीने श्रीविष्णुदासांची तीर्थयात्रा सुरु झाली. चिंचणेर, रंगनाथ महाराजांची निगडी, जयरामस्वामींचे वडगाव, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट अशी गावे घेत घेत विष्णुदास दत्तात्रेयांच्या शोधार्थ निघाले. अक्कलकोट येथील श्रीस्वामींचे दर्शनही मनोभावे घेतले. येथेच त्यांना आज्ञा झाली,
‘‘यहाँ रहनेमे क्या मतलब? माहुरमे जाओ, वहाँ दत्ताश्रममे श्रीदत्तात्रेयजीका दर्शन एक साल के बाद हो जाएगा ।’’
स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना हुरुप आला. विजापूर, धारवाड, हुबळी, हंपी विरुपाक्ष, श्रीशैल, भागानगर इत्यादी पवित्र ठिकाणे करुन ते प्रसिद्ध क्षेत्र वासर येथे आले. येथील जागृत सरस्वतीने त्यांच्या मुखात वास्तव्य करण्याचे कबुल केले. येथून श्रीविष्णुदासांची कवित्वशक्ती प्रकट होऊ लागली. सरस्वतीची आरती येथेच त्यांनी तयार केली.
शेवटी विष्णुदास माहुरास येऊन स्थिरावले. तेथील वनश्री, तेथील एकांत आणि मुख्य म्हणजे श्रीदत्तात्रेय व श्रीरेणुका यांचा निवास त्यांना तेथेच गुंतवून घेण्यास पुरेसा होता. महानुभावांच्या देवदेवेश्वराचा आधार घेऊन विष्णुदास दत्तचिंतनात मग्न झाले. रोज दत्तशिखरावर जाऊन दत्ताचे, अनसूयामातेचे, श्रीरेणुकामातेचे दर्शन घेण्याचा त्यांचा क्रम झाला. दत्ताच्या प्रत्यक्ष भेटीची लालसा फार लहानपणापासून त्यांना होती. त्याच एका प्रातीसाठी त्यांच्या मनाची तळमळ होती. तहानभूक, विश्रांती यांच्यापैकी काहीच सुचेनासे झाले. दत्ता, दत्ता, दत्तात्रेया असाच ध्यास त्यांच्या मनाला एकसारखा होता. स्वत:च्या मनाची विव्हळता, तगमग, बेचैनी यांनी विष्णुदासांची कविता आर्द्र बनलेली आहे. दत्त हा न मागता भक्तांना देणारा. मग आपणांसच का असे दूर ठेवतो? आपणांस त्याची भेट का होत नाही? एकदा तर त्यांनी स्पष्टपणेच दत्तात्रेयांना विचारले,
तू तो समर्थदत्त दाता । नाम सोडिलें कां आतां? ।।
जगन्माते, लेकुरवाळे । काय निघाले दिवाळें ।।
कृपासिंधु झाला रिता । कोण्या अगस्तीकरतां ।।
सुकीर्तीची सांठवण । काय नाही आठवण? ।।
भागीरथी का बाटली । कामधेनू कां आटली? ।।
चंद्र थंडीनें पोळला । कल्पवृक्ष कां वाळला ।।
विष्णुदास म्हणे कनका । ढंग लाऊं नका नका ।।
दत्तात्रेय म्हणजे खरे कृपासिंधू. कामधेनूप्रमाणे, कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित वस्तू पुरविणारे. पण आपल्याविषयी काय झाले त्यांना? ही कामधेनू आटली की काय? चंद्र थंडीने पोळून निघाला की काय? कल्पवृक्ष वाळून गेला? लेकुरवाळ्या जगन्मातेचे दिवाळे निघाले की काय? अशा शंका विष्णुदासांनी या अभंगात घेतल्या आहेत. कधी कधी स्वत:चे दोषही विष्णुदासांना दिसतात. ‘गुरु दत्तात्रेय अवधूता । ऐक अनसूयेच्या सुता । ’ या एका अभंगात त्यांनी स्वत:ची उणीव स्पष्टपणे मांडली आहे. मी वाणीने दत्तात्रेय म्हणतो, पण तापत्रयात मात्र गुरफटून जातो. प्रसादाची आज्ञा मनात असली तरी
‘विषयीं होइना निर ।’
‘दत्तात्रेया, तुझा म्हणवितो किंकर । हुला लावितो करकर ।।
तुझा म्हणवितो अंकित । बसतो अफूं, गांजा फुंकित ।।’
अशी स्वत:च्या मनाची, अपराधाची कबुली देऊन त्यांनी शेवटी विनवणी केली आहे,
‘विष्णुदासाच्या हृदयस्था । याची बसवावी व्यवस्था ।।’
आणि ही व्यवस्था लवकर बसावी म्हणून विष्णुदासांचे अंत:करण तळमळत होते, कधी ध्यानधारणा करावी, कधी कडूनिंबाचा पाला भक्षून राहावे, कधी उपासतापास करावेत, कधी एक वेळच्या माधुकरीवर भागवावे; देहधारणेपुरती सोय झाली की, इतर काही नको होते. परंतु या माहुरगडावरील शिखरावर असलेल्या श्रीदत्तात्रेयांनी आपणांस दर्शन द्यावे ही लालसा वारंवार मनातून उफाळून येई. ‘जय नमोस्तुते श्रीदिगंबरा’ या एका अप्रतिम अष्टकात ‘करु विनंती दत्तात्रया किती’ या ओळीच्या आवर्तनाने स्वत:च्या चित्ताची तगमग फार चांगल्या रितीने त्यांनी प्रगट केली आहे. चांगल्या कुळात जन्म लाभूनही दत्त भेटले नाहीत, तर काय फायदा त्याचा? आपली स्वत:ची काही चूक झाली म्हणून दत्ताने भेट न देण्याचे ठरवावे काय? मध्येच अगतिक होऊन ते म्हणतात,
‘परि तुझ्या सुरी, मानहीं हतीं । करुं विनंति दत्तात्रया किती?’
या दत्तासाठी प्रपंच, कनक, कामिनी यांचा लोभ सोडला.
कधी एखाद्या अष्टकात आपल्या हातून झालेल्या न झालेल्या अपराधाची कबुली विष्णुदास देत असतात. कधी प्राचीन काळातील अपराधी लोकांचा तुम्ही कसा उद्धार केला हो? म्हणून प्रश्न करीत. परंतु मी एक गरीब, हीन, अपराधी, म्हणून का इतका दत्ताने त्याग करावा? एका अष्टकात त्यांनी म्हटले आहे,
‘गरिबाचा माथा सतत पदिं घांसूनि झिजला । दयाळा, श्रीदत्ता । जय अवधुता! पाव मजला ।।’
दीनानाथा दत्ता, आम्हांला तुझ्याशिवाय दुसरा कुठला रे आसरा?
‘पिता माता बंधू तुजविण नसे देव दुसरा ।’
अशी माझा मनाची धारणा आहे. देवा, मला मोक्ष नको, तुमची वैकुंठपुरी नको. त्यांनी दत्ताला म्हटले आहे,
‘सुदाम्याला द्या जा, उचित न अम्हां कांचनपुरी । करी इच्छा ते विजयादशमिचे कांचन पुरी ।’
दत्तात्रेया, तुझ्याशिवाय दुसरा कोण दाता मला आहे रे? कधी कधी विष्णुदास दत्तात्रेयांच्या स्वभावातील वर्मही सौम्यपणे हुडकून काढतात. याच अष्टकात त्यांनी म्हटले आहे,
‘तुझ्या अतिथ्याला, सति अनसुया साच निभली । बहु त्वांही केली, कसुनि तिजला जाचणी भली ।।
छळावे दात्याला, विबुधजनधारा समजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता पाव मजला ।।’
आणि पुन: ते दत्तात्रेयांना
‘नुपेक्षीतां देसी म्हणुनि जगतीं ‘दत्त’ म्हणती । कृपेने तारीलें जड मुढ किती नाहिं गणती ।’
अशी आठवणही करुन देतात. याच वृत्तीची, तळमळीची अनेक पदे विष्णुदासांनी केली आहेत.
‘तारि तारि दत्तात्रया गुरुराया । लागलों संसारडोहीं मराया ।।’
या एका पदात त्यांनी दत्तात्रेयांना विनंती केली आहे,
‘तू दीनवत्सल दीन मी म्हणुनि । निर्वाणी उमजलों पाय स्मराया ।।
विष्णुदास म्हणे काय बा! अवघड । येंवढें माझें दु:ख हराया? ।।’
या समर्थ व दात्या दत्ताला खरेच काही अवघड वाटू नये; पण तो काय आपल्या भक्ताची परिक्षा पाहिल्याखेरीज राहील? आणि भक्त विष्णुदासही त्यांची कळवळून प्रार्थना करीत, स्वत:ची कमतरता वर्णन करीत. आपली लाचारी पदर पसरुन त्यांच्यापुढे मांडीत. त्यांच्या ब्रीदाची त्यांनाच आठवण करुन देत. ‘स्वामी दत्त दयाघना अवधूता श्रीअत्रिच्या नंदना’ या ओळीचे आवर्तन असलेल्या एका अष्टकात त्यांच्या मनातील सर्व कोमल भाव अनुतापयुक्ततेने प्रकट झाले आंहेत.
आपण एवढे कासावीस का झालो? मनाची एवढी उतावीळ अवस्था का आहे? याचे स्पष्टीकरण विष्णुदासांनी याच अष्टकात करताना म्हटले आहे,
‘संतापें तुम्हिही म्हणाल इतुका, कां वाद तो आगळा । शत्रूचा क्षणमात्र नेम न कळे, कापील केव्हां गळा ।।
थोरांची मरजी पटे न अरजी, फिर्यादिची दाद ना । स्वामी दत्त दयाघना अवधुता, श्रीअत्रिच्या नंदना ।।’
याच अष्टकात विष्णुदासांनी वेदांच्या, उपनिषदांच्या व पुराणांच्या साक्षी काढल्या आहेत. साधूसंतांचे पुरावे दिले आहेत. भक्तीने वश होणार्या या दत्ताच्या स्वभावाच्या सार्या खाणाखुणा विष्णुदासांना माहीत होत्या. त्यांना दुसरे काहीही नको होते. लौकीकाची आस त्यांनी केव्हाच सोडली होती. ते म्हणतात,
कांता कांचन राज्य वैभव नको । कैवल्यही राहुं द्या ।।
होऊ द्या अपदा, शरीर अथवा । काळासी हीराउं द्या ।।
पाहूं द्या रुप एक वेळ नयनीं । ही माझि आराधना ।।
स्वामी दत्त, दयाघना अवधुता । श्रीअत्रिच्या नंदना ।।
आपण या भवसागरात वाहून जाऊ की काय? याची चिंता त्यांच्या मनात सतत होती. धड ना प्रपंच, ना परमार्थ अशा आयुष्याचा काय उपयोग? आणि दत्तभेटीशिवाय देह जाईल तर साराच डाव वाया गेल्यासाररखा होईल. म्हणून त्यांच्या मनाची विलक्षण तळमळ होई. आता काळवेळ उरलेला नाही, मी फार दीन व लाचार झालो आहे, अशा अर्थाचा निर्वाणीचा भाव होत राहिला.
या निर्वाणीच्या व करुणेच्या प्रार्थनेनंतर विष्णुदासांचा मनोदय सफल झाला. माहुरगडावरील दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. त्यांच्या तप्त चित्ताची सांत्वना केली. आपल्या एका आर्त भक्तास भेटल्याने दत्तात्रेयही संतुष्ट झाले. सार्या भौतिक सुखांची मागणी करणार्या गोतावळ्यात हा एक विष्णुदास फक्त दर्शनाची, भेटीची, निरंतर सहवासाची इच्छा करीत असल्याचे जाणून दत्तात्रेयही संतोष पावले. त्यांनाही एवढा कळवळ्याचा भक्त फार दिवसांनी मिळाला. विष्णुदासांनाही पराकोटीचा आनंद झाला. या आनंदाची घनदाट छाया ‘ तो अनाथनाथ दत्त माहुरांत पाहिला ।’ या एका भक्तिरसपूर्ण अष्टकावर पडलेली आहे. दत्तसंप्रदायाचे सारे रहस्य एका श्लोकात आणताना त्यांनी म्हटले आहे,
‘धर्म अर्थ काम मोक्ष ग्राम गाणगापुर । श्रीगुरुचरित्रनाम, हेंचि गाणं गा पुरं ।।
नारसिंह सरस्वती स्वरुप जाहला । तो अनाथनाथ दत्त माहुरांत पाहिला ।।’
फार दिवसांची इच्छा पूर्ण झाली. मनाची सारी तगमग दूर झाली. वृत्ती शांत बनली. याच दत्ताची कथा गाता गाता विष्णुदास तल्लीन होऊन गेले.
या दत्तांची त्यांना वारंवार दर्शने होत राहिली. कारण
‘राहें सामोरा । अतां नको होऊं पाठमोरा ।।
परम उदारा । येवढी विनंती अवधारा ।।’
अशी त्यांची विनंती प्रत्येक वेळी असे. स्वत:स झालेली दत्तदर्शने विष्णुदासांनी आपल्या कवनांतून अमर करून ठेवली आहेत. दत्तजन्म, दत्तस्तवन, व दत्ताची व अनसूयेची आरती, विविध अष्टके यांतून दत्तात्रेयांची विविध रूपे व भक्तीच्या अनेक छटा यांची दर्शने दत्तभक्तांना घडविली आहेत.
‘उठि उठि गा दत्तात्रया । तूं सुखदायक लोकत्रया ।।’
ही एक भक्तीरसपूर्ण भूपाळी माहुरगडात त्यानंतर घुमू लागली.
‘माझ्या हरिणीच्या पाडसा । ऊठ राजसा अवधूता’
अशी कोवळीक माता अनसूया व्यक्त करु लागली.
‘तूं विश्वेश्वर प्रतिपाळक । तूंचि विश्वाचा मालक ।।
माझा म्हणविसी बालक । तूं चालक प्राणाचा ।।’
हेही रहस्य अनसूयामातेने ओळखले आहे. ही थोर माता आपल्या मुलास कोणत्या प्रेमाने जागवीत आहे?
‘बा, तुझें मंजूळ बोलणें । बा, तुझे चंचल चालणें ।।
बा, तुझें स्वानंदें डोलणें । जग सम पाहणें अवधूता ।।’
ईश्वराविषयी अशी वृत्ती विष्णुदासांच्या कवनांतून प्रकट होत राहिली.
‘श्रीगुरु दत्तात्रय माऊली । विष्णुस्वामी म्हणे पावली ।। स्मरतां अविलंबें धांवली । सामावली मजमाजीं ।।
सबंध आयुष्यभर विष्णुदासांनी दत्तात्रेय व रेणुका यांचेच चिंतन केले. माहुरगडचा परिसर जगन्माता रेणुका व दत्तात्रेय अवधूत यांच्या गजराने दुमदुमून निघाला. अनेक सत्पुरुषांचा सहवास, आत्मचिंतन, मातृदर्शन, दत्तकृपा यांतील सौख्यास तुलना कुठली? त्यावेळचे प्रसिद्ध अवतारी पुरुष श्रीवासुदेवानंदसरस्वती तथा टेंबेस्वामी हेही एकदा माहुरास आले होते. त्यांची व विष्णुदासांची भेट झाली होती. तीन दिवस त्यांचा मुक्काम विष्णुदासांच्या आश्रमातच होता. या दोन थोर उपासकांची चर्चा तेथील दगडाफुलांवरही उमटली असेल. श्रीविष्णुदासांनी या हितगुजाचा सारांश आपल्या एका भाच्याला व शिष्याला कळविला होता. मातृकृपांकित व दत्तोपासक खरशीकरशास्त्री हे विष्णुदासांचे भाचे व शिष्य यांना लिहिलेल्या पत्रात विष्णुदास लिहितात, ‘आपल्या मठात श्रीदत्तावतारी श्रीवासुदेवानंदसरस्वती, टेंबेस्वामी महाराज यांचा तीन दिवस मुक्काम होता. तीन दिवसांत आम्हांस फारच आनंद उपभोगण्यास मिळाला. कर्म-ज्ञान-भक्ती यांचे एकत्व उत्तम दिसत होते.’ अशा या संवादाची विष्णुदासांना वारंवार आठवण होत राही. अनेक साधुसंत आणि दत्तरेणुकेचे ध्यान व चिंतन यांतच विष्णुदासांचे आयुष्य मोठ्या सुखाने व्यतीत झाले. श्री विष्णुदासांनी उमरखेडचे नित्यानंदसरस्वती यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली होती. या श्रेष्ठ दत्तभक्ताने शके १८३९ मध्ये माहुरासच श्रीरेणुका व दत्तात्रेय यांच्या चरणी अखेरची विश्रांती घेतली. श्री विष्णुदासांचे समग्र चरित्र मातृकृपांकित खरशीकरशास्त्री यांनी तीन खंडांत लिहून प्रसिद्ध केले आहे.
श्रीवक्रतुंड चतुरानन बालिका ही । श्रीलक्ष्मी भगवती महा कालिका ही ॥ गीता वसंततिलकामृततुल्यवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१॥
सिंहाद्रि पर्वत महाभुवनप्रकोटीं । इंद्रादि देव वसती तेहतीस कोंटी ॥ गंधर्व यक्षगण किन्नर ब्रह्मभूत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥२॥
श्रीरेणुका, अनसूया, श्रुति वेदधात्री । गाधी, कपील, मुनि, भार्गवराम, अत्री । ध्याती समग्र सरिता नवकोटी तीर्थ । श्रीदत्ता, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥३॥
श्रीव्यास, वाल्मिक, शुकादिक नारदांही । वाटे तरीच भवसागर पारदा ही । भूकोरि मूळपिठिकाही सर्वोपसंत । श्रीदत्त, दत्त, श्रीगुरुदेवदत्त ॥४॥
कल्पद्रुमा हिणवुनी तरु डोलताती । पक्षी विवीध स्वर मंजुळ बोलताती । अखंड नाम पठणीं करिती अवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीग्रुरुदेवदत्त ॥५॥
जंबूक, व्याघ्र, हरणें, फिरती समोर । चंडोल, कोकिल, करंडक, हंस, मोर ॥ त्या रम्य काननिं सदा रव कानिं येत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥६॥
त्राता दिगंबर अगोचर सूर्यचंद्रा । मातापुरीं करि तृणासनि योगनिद्रा ॥ दाता दयार्णव कदापि नव्हे अदत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥७॥
जेव्हा वसंत ऋतु यामिनी शुक्लपक्षीं । नक्षत्रराजमुख लक्षि चकोर पक्षी ॥ तेव्हा कधी म्हणिन त्या बसुनी वनांत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥८॥
आनंदसिंधु शशिबंधु उदारखाणी । कौपीन, कुंडल, कमंडलु, दंडपाणि ॥ माळा जटामुकुटमंडित अवधूत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥९॥
होतील प्राप्त म्हणती मुनि ब्रह्मचारी । धर्मार्थकाममोक्षादिक लाभ चारी ॥ उच्चारितांचि वदनी संसारसक्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१०॥
द्यावी सुभक्ति भजनी म्हणे विष्णुदास । आशा धरून एवढी बसलों उदास । केव्हां कृपा करूनि हा पुरवील हेत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥११॥