श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथाचा इतिहास 

सन १९३९ सालच्या  डिसेंबर महिन्यातील प्रसंग ! श्री संत गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन  सन्माननीय व्यवस्थापक रामचंद्रराव पाटील, शेगांव व इतर प्रतिष्ठित भाविकांनी श्री गजानन महाराजांचे जिवनलिला प्रसंगावरील विशेष सत्य  घटनांची माहीती संकलीत करून त्या कागदपत्रांचे आधारे एखाद्या नांमवंत व्यक्तीकडून श्री संत गजानन महाराजांचा  'प्रासादिक ओवीबध्द ग्रंथ' निर्मिती करण्याचे  उद्देशाने संत वांग्मयाचे गाढे अभ्यासक ह.भ.प. लक्ष्मणराव रामचंद्रजी पांगारकर यांचेकडे नासिक येथे गेले होते. 

दरम्यान श्री पांगारकर यांची भेट घेऊन पाटील मंडळीने त्यांना विनंती केली की , "आपण श्री संत गजानन महाराजांचे जिवन चरित्रावर आधारीत काव्यमय ओवीबध्द ग्रंथ लिहुन घ्यावा" अशी विनंती करण्यासाठी आम्ही शेगांवकर पाटील मंडळी आलो असल्याचे नमुद केले. त्यावर पांगारकर यांनी विनम्रपणे उत्तर दिले होते की , सदर लिखाण  करण्यास मला आनंदच झाला असता, मी लेख लिहु शकतो, मात्र ओवीबध्द ग्रंथ निर्मिती करण्यास मी असमर्थ आहे. परंतु तुम्हा,आम्हास अपेक्षीत असलेले  ओवीबध्द ग्रंथ लिहण्याचे सत्कार्य पंढरपुर निवासी श्रीदासगणु महाराज यांची भेट घेऊन सदर प्रस्ताव द्यावा.  कारण आजघडीला तरी त्यांचे सारखा अंतकरणाचा ठाव घेणाऱ्या शैलीत, प्रासादिक भक्तिरस प्रधान, सर्वसामान्यांना समजणाऱ्या साध्यासोप्या भाषाशैलीत लिखाण  करणारी व्यक्ती दुसरी कुणीही नाही. त्यांना सर्वजण  महीपती चा अवतार मानतात! असे असतांना ते मात्र स्वताला संताचा चरणरज संबोधतात.

श्री गजानन महाराज
श्री गजानन महाराज 

तेंव्हा पाटील मंडळींनी श्री पांगारकर यांचे कडुन श्री दासगणु महाराजांचा नांव, पत्ता घेऊन नासिक वरून थेट पंढरपुर गाठले. व तेथिल नगरपालीके जवळील गोविंदपुऱ्यातील, दामोधर आश्रम नामक वाड्यावर पोहोचली. त्यावेळी योगायोगाने श्री दासगणु महाराज आपल्या दैनंदिन पुजास्थानावर बसुन श्री विष्णुसहस्रनाम पाठ करण्यात मग्न होते. तेंव्हा त्यांचे परमशिष्य श्री छगनराव बारटक्के यांनी पाटील मंडळींचे यथायोग्य आदरातिथ्य करून बैठकित विराजमान केले. यथावकाश श्री दासगणु ऊर्फ दादा यांनी बैठकित जाऊन शेगांव येथील पाटील मंडळीस  त्यांचेकडे येण्याचे प्रयोजन विचारले असता 
पाटील मंडळीने सांगितले की, आम्ही श्री संत गजानन महाराज शेगांव येथुन आलो असुन, आपण श्री संत गजानन महाराज यांचे  जिवन चरीत्रावरं ओवीबध्द काव्यमय, प्रासादिक ग्रंथ निर्मिती करावी अशा हेतुने तथा नासिक येथिल ह.भ.प. पांगारकर महाराज यांनी आपले नांव सुचविल्यामुळे आलो असल्याचे सांगितले. 

तेंव्हा श्री दासगणु महाराज उत्तरले की,

"मी ही सेवा अवश्य स्विकारतो! कारण की र्शिडी निवासी सदगुरू साईनाथ यांचे अमातवाणीतुन  मी अनेकवेळा श्री संत गजानन महाराज यांचे नांव ऐकले आहे. व ते महाराजांना आपले बंधु मानीत असत. एकदा साईनाथांचे आज्ञेवरून मी संत श्रीनरसिंगजी महाराजांचे ओवीबद्ध चरीत्र लिखानाचे कार्यासाठी शेगांव येथुन टांग्याने आकौटला जात असतांना एका खेडेगांवी दुपारी बारा/साडेबारा वाजण्याचे सुमारास बसलेले असतांना तेथे लोकांची खुप गर्दी झालेली दिसत होती. तेंव्हा मी टांगेवाल्याला विचारले होते तेथे एवढी  लोकांची गर्दी का बरे दिसत आहे? त्याने अधिक माहीती घेऊन सांगितले की, तेथे झाडाखाली एका दगडावर श्री गजानन महाराज बसलेले आहेत व लोक त्यांचे दर्शनासाठी जमलेले आहेत. टांग्यावाल्याचे हे उत्तर ऐकताच मी क्षणाचाही अवधी न गमावता त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्या गर्दितुन वाट काढत त्यांचेपर्यंत पोहोचलो असता असे दिसले की, श्री संत गजानन महाराज आपल्या मुखाने  'गण गण गणात बोते' असे स्वरचित भजन म्हणण्यात दंग होते! अशा अवलियांचे दर्शन घेऊन मी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो होतो. असे अवलिया संत श्री गजानन महाराजांचे ओवीबध्द पोथी रूपी ग्रंथ लिहण्याचे कार्य करण्यास मी आनंदाने स्विकारण्यास तयार आहे."

श्री दासगणु महाराजांचे वरील उदगार ऐकुन शेगांवकर पाटील मंडळी नी स्विकृती देऊन म्हटले की,

"ठिक आहे ! मग आपण सदर कार्य करण्यासाठी केंव्हा येता ?" असा प्रश्न केला. 
"माझे डोळ्याचे शस्रकर्म करून घेण्यासाठी मला पुण्यास जावयाचे आहे. सदर ऊपचार आटोपल्यावर साधारण दिड  महिना आराम करून मी माघ वध्द किंवा फाल्गुन शुध्द महिन्यात शेगांव येथे येईल." 

"दादा सदर 'श्री गजानन विजय ग्रंथ' लिखाणाचे आपण मानधन किती घ्याल ?" 
"मी सध्या करार करीत नाही !"

"महाराज आपण असे का बरं म्हणता!!"
"पाटील साहेब, संत चरित्र लिहुन देणारा मी कोण ? मला प्रेरणा देणारा पंढरीचा पांडुरंग विटेवर ऊभा आहे! तोच मला प्रेरणा देतो व माझे मुखाने वदवुन घेतो. मग यात माझी कसली हुशारी! माझी यंतकिंचीतही बुध्दी नाही!! मग मानधन कशाचे ? फक्त मी एक गरीब वारकरी असल्यामुळे माझे शेगांव येथे येण्याजाण्याचा खर्च तेवढा उचलावा!  

"ठिक आहे महाराज ! पंढरपुर वरून आम्ही शेगांव येथे गेल्यावर आपल्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेचा धनादेश आम्ही आपणास पाठविण्याची व्यवस्था करू !"

पुढे चालुन दिलेल्या दिवसी श्री दासगणु महाराज, पंढरपुर वरून रेल्वे गाडीने सकाळी ९ वाजता शेगांव रेल्वे स्टेशनवर ऊतरल्यावर तेथे शेगांव संस्थानचे वतीने स्वागताची भव्य तयारी करण्यात आलेली होती. शेगांव पंचक्रोशीतील किर्तनाचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी दिंड्या केशरी पताका यांचेसह हजारोंच्या संख्येने भाविक मंडळी रेल्वेस्टेशनवर उपस्थित होते.श्री दासगणु महाराज यांचे शेगांव रेल्वे स्टेशनवर सर्वश्री सुखदेवराव नारायणराव पाटील, रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील, रतनसा सोनावणे, दिवानजी, त्रिकाळ गुरूजी, नामदेव शास्री काळे, पांडुरंगराव गुरूजी, ओंकारराव पाटील, शितुनभाऊ, भक्त पितांबर, पुंडलिकराव भोकरे, पतंगे टेलर, डाॅ. लोबो साहेब, कृष्णरावपंत जोशी, यशवंतरावबाप्पु देशमुख, लक्ष्मीबाई जोशी, गोदावरीबाई जोशी, शहाणे बाई, प्रभावतीबाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने हारफुलांनी सजवुन आणलेल्या रथात बसवुन श्री दासगणु महाराजांना मंदिरात वाजतगाजत नेण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार संस्थानचे तत्कालिन विस्वस्थ शेगांवकर पाटील मंडळींनी महाराजानां रथात बसण्याची विनंती केली असता दासगणु महाराजांनी तात्काळ ऊत्तर दिले की,

"मी संतचरणरज आहे. रथात बसण्याची माझी योग्यता नाही! आपण सुंदर सजवुन आणलेल्या या रथात श्री संत गजानन महाराज यांचा फोटो ठेवावा! सदर रथ व आपण भजनी दिंड्यासह पायदळ मंदिरापर्यंत जाऊ!"

ऊपस्थितांनी ते मान्य करून त्या नंतर मिरवणुकिने सर्व मंदिरात पोहोचले. दरम्यान मंदिरातील कार्यालयाचे जवळील घर्मशाळेत श्री दासगणु महाराज व त्यांचे शिष्य श्री छगनरावजी बारटक्के व सहकारी यांचे निवासाची, भोजनाची यथायोग्य व्यवस्था संस्थानचे वतीने चोखरित्या करण्यात आलेली होती.

श्री गजानन विजय ग्रंथ
श्री संत गजानन महाराज-
सतेज दुसरा रवी । हरी समान यांचे बल ।।

।। श्री गजानन विजय ग्रंथ  ।।   लिखाणाचा शुभारंभ !

सुमुहूर्त पाहुन श्री दासगणु महाराजांनी दैनंदिन स्नानसंध्या, श्री गायत्री जप ऊरकल्यानंतर महाराजांनी मंदिरातील श्रीरामसीता, हनुमान व श्री संत गजानन महाराजाचे मनोभावे दर्शन घेवुन तेथे श्री विष्णुसहस्रनामाचे पठन केले. तदनंतर तत्कालीन विवस्त रामचंद्रराव पाटील व अन्य सर्वश्री मान्यवरांचे ऊपस्थितीत सांगितले की, संस्थान चे वतीने माझेकडे सोपविण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांचे मी चितंन, मनन केलेले आहे. सदर कागदपत्रात नमुद केलेल्या घटना सत्य आहेत काय? याची शहानिशा करण्यासाठी मी आपणा सर्वांना येथे पाचारण केलेले आहे ! त्यावर सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री गजानन बाबांना स्मरून सर्व घटना सत्य असल्याची माहिती दिली. तेंव्हा श्री दासगणु महाराजांनी पुर्वाभिमुख होवुन श्री संत गजानन महाराजांचे स्मरण करून श्रध्देने नतमस्तक झाले. याप्रसंगी श्री दासगणु महाराजांचे अष्ठसात्विक भाव दाटुन आल्यामुळे त्यांचे नेत्रांतुन प्रेमाश्रु वाहत होते. अशाप्रकारे सदगदित झालेल्या अंतकरणाने श्री गजानन महाराजांची स्तुतीपर काव्यांत वर्णन करतांना म्हटले  की,

सतेज दुसरा रवी । हरी समान यांचे बल ।।
वशिष्ठ सम सर्वदा । तदिय चित्त ते निर्मळ ।।
असे असुनिया खरे । वरवरी ते अवलिया भासवी ।।
तया गुरू गजाननां प्रती। सदा दासगणु वंदितो ।। 
 

अशाप्रकारे संतस्तवन झाल्यावर दररोज एक अध्याय या प्रमाणे दासगणु महाराज आपल्या मुखाने अमृतमय रचना सादर करीत. व त्यांचे शिष्य सर्वश्री छगनराव बारटक्के, रतनसा सोनवणे, दिवानजी, ऊखर्डाजी गणगणे हे कागदावर लिहण्याचे कार्य नित्यनेमाने क्रमशा: सुरू होते! तेंव्हा अवघ्या २१ दिवसात २१ अध्यायांची निर्मिती झाली. सदर अध्याय महाराजांचे मुखातुन वर्णन होतांना ते ऐकण्यासाठी संस्थान चे आवारात भाविकांची अशी भव्य मांदियाळी भरत असे की त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही ! 

सुमारे सव्वा महिन्यात श्री दासगणु महाराजांनी *श्री* *गजानन* *विजय* *ग्रंथ* लिहुन तयार झाला. या दरम्यान श्री रामचंद्रराव पाटील यांच्या सुकन्या चंद्रभागाबाई लाडेगांवकर यांचेसह सुमारे ११३ भाविकांनी अनुग्रह घेतला. 

चैत्र शुध्द व्दितीयेला श्री दासगणु महाराज पंढरपुर येथे आपल्या स्वगृही जाण्यासाठी सिध्द झाले होते. त्यापुर्वी श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. राममंदिराचे सभागृहात गालिचा, लोड, तक्के, गाद्यांवर पांढऱ्या शुभ्र चादरी शिस्तबध्दरित्या अंथरण्यात आलेल्या होत्या. एका चांदीच्या ताटात सुप्रसिध्द नागपुरी करवतकाठी धोतरजोडी, ऊपरणे, सदऱ्याचे शुभ्र कापड, शाल, रेशमी रूमाल, बुक्याची वाटी, हळदीकुंकवाचे पाळे, श्रीफळ, या व्यतिरीक्त मानधन पोटी मोठ्या रक्कमेंचे बंद पाकिट इत्यादी साहित्याची सिध्दता कार्यक्रमाचे अनुषंघाने करण्यात आलेली होती.

दुपारी नियोजित वेळेवर विश्वस्त मंडळिंनी सत्कारमुर्ती श्री दासगणु महाराज यांना सन्मानाने पाचारण करण्यात आले. दासगणु महाराज सभामंडपात पाटील मंडळी सोबत विराजमान होताच तेथील चांदीचे ताटातील वस्तुकडें पाहत म्हणाले !

"पाटील साहेब ! या बंद पाकिटात काय आहे ?"
त्यावर रावसाहेब रामचंद्रराव पाटील म्हणाले !
"महाराज आम्ही आपणास काय देणार! आपण तमाम गजानन भक्तांना प्रासादिक, रसाळ, भक्तिरसप्रधान *गजानन* *विजय* *ग्रंथ* सादर करून दिलात! आम्ही आपले खरोखरीच आभारी आहोत! आपला सत्कार करावा अशी आमची योग्यता नाही. फुल ना सही फुलाची पाकळी म्हणुन स्विकार करावा!"

श्री. दासगणु विनम्रपणे म्हणाले कि,
"मी संताचे दरबारात आलेलो आहे. तेंव्हा प्रसाद घेतल्याशिवाय कसा जाईल? पण तो माझे ईच्छेने स्विकारणार आहे. तेंव्हा ताटातील पाकिटात जे आहे. ते आपल्या संस्थानात जमा करा! व ताटातील रूमाल तुरटीच्या पाण्यात भिजवुन सुकल्यावर श्री गजानन महाराजांचे पवित्र चरणास  लाऊन तो प्रसाद व श्रीफळ एवढाच प्रसाद मला द्या! बाकिच्या सर्व वस्तु खरोखरीच ज्या गरीबास आवश्कता आहे अशानां देऊन टाका ! माझे प्रवासभाड्याची व्यवस्था तुम्ही केलेलीच आहे. तसेच आज मी रचलेल्या 'श्री  गजानन विजय ग्रंथ' प्रकाशनाचे सर्व अधिकार संस्थानला बहाल करीत आहे ! श्रीगजानन महाराजांचे कृपेने हा पुर्ण ग्रंथ लिहुन त्यांचे चरणी सर्मपीत केला आहे !"

"श्री गजानन महाराजांची सेवा करण्याचा योग मिळवुन दिल्याबद्दल आपले सर्वांचे उपकार झालेत. यापेक्षा अधिक भाग्य कोणते?"

असे उदगार काढुन श्रीराम प्रभुचे दर्शन घेतल्यावर श्री गजानन महाराजांचे लोटांगण घालुन दर्शन घेतले. तेंव्हा भाव दाटुन आल्यामुळे ते मंदिरातच सुमारे दहा मिनिट ध्यानमुद्रेत बसुन होते. नंतर सदगदित स्वराने श्री विष्णुसह्त्रनाम पठण  करून सर्व ऊपस्थितांचा जड अंत:करणाने निरोप घेतला ! 

श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय वाचनाचे महत्व

श्री गजाननविजय ग्रंथ हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्य सोडवण्याचे सामर्थ्य “श्री गजाननविजय ग्रंथ” वाचनामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदातरी पारायण करा श्री गजाननविजय ग्रंथाचे. श्री गजाननविजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रोब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो.

श्री गजाननविजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे येथे देत आहे,

अध्याय १ 

निराशा, मन:शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात

अध्याय २ 

कुटुंबातील व्यथा आणि अडचणी

अध्याय ३ 

दुसर्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावल्या गेले असेल तर, कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर

अध्याय ४ 

जीवनातील दुख आणि समस्या कमी करण्यासाठी

अध्याय ५ 

दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल व पाणि जवळ नसेल तर , गेलेली संपत्ती परत येईल, जीवनात सकारात्मक बदल होईल

अध्याय ६ 

चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट मधील फरक कळेल

अध्याय ७ 

निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल, इच्छुकांना संतान प्राप्ती होईल

अध्याय ८ 

कायदे विषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेस मध्ये विजय मिळेल, अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल.

अध्याय ९ 

हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल शत्रूंचा नाश होईल, चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल, महाराजांचे कुठ्ल्या तरी स्वरुपात किंवा स्वप्नात दर्शन होईल ( जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल )

अध्याय १० 

आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्ती/ प्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी

अध्याय ११ 

ध्येयप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा ह्यासाठी, स्वरक्षण होण्यासाठी, अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी

अध्याय १२ 

आपल्या धंद्यात, उद्योगात, शेतीत चांगले उत्पादन, धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी

अध्याय १३ 

कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी, महापूर, वादळ, अग्नी इत्यादि नैसर्गिक आपत्ती/ संकटापासून रक्षण होण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी

अध्याय १४ 

अचानक सांपत्तिक/आर्थिक हानी झाली असल्यास, अनभिग्न संकटांपासून रक्षणा साठी, नदी/पाण्याच्या धोक्यापासून मुक्ती

अध्याय १५

आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी
काम क्रोध मत्सर लोभ आदि पासून दूर राहण्यासाठी
नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, पगार वाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी

अध्याय १६ 

खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अति तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास

अध्याय १७ 

खोट्या/चुकीच्या आरोपातून मुक्तता दुसर्याकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती

अध्याय १८ 

खोट्या आरोपातून मुक्तता. तीर्थ अंगारा गेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील
इष्ट देवतेचे दर्शन होईल

अध्याय १९ 

विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल
स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणार्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल

अध्याय २० 

विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योग धंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल

अध्याय २१ 
मनःशांती, आरोग्य, सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचीती घ्या

श्रीगजाननविजय ग्रंथ पारायणाचे प्रकार

संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वेगवेगळ्या उपासना नियमित सुरु असतात. परन्तु कधी कधी वेगवेगळ्या संकल्पनातील फरक समजण्यात चुका होतात करिता खालील गोष्टी लक्षात घ्याव्या;

पारायण म्हणजे काय?

आपले गुरु, संत किंवा देव ह्यांच्या अधिकृत चरित्राचे, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनांवर बसून, पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन-पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या / दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण.
खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेऊन केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही

• केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन
• दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन
• दुसर्या पेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही
• केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन
• मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन
• बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन

पारायणाचे विविध प्रकार

१) एकआसनी पारायण- एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.

२) एकदिवसीय पारायण- एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बर्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण. जागतिक पारायणदिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे. वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.

३) सप्ताह पारायण- सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केल्या जाते. महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधीदिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.

४) तिन दिवसिय पारायण- तिन दिवस दररोज ७ अध्याय ( किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केल्या जाते. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तिन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो.

५) गुरुवारचे पारायण- गुरुवार हा महाराजांचा शुभदिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत लाभ मिळतो. एका ग्रुप मध्ये एकविस भक्तच भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.

६) चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण- खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय (पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसर्या दिवशी सर्वांनी दुसरा, एकविसाव्या दिवशी सर्वांनी २१ वा अध्याय वाचणे) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन हि सेवा उपासना करतात. ह्यामधे भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

७) संकीर्तन पारायण- एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप असावे. हि एक श्रवण भक्ति आहे. गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. हि सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेंव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.

८) सामुहिक पारायण- एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. हरकत नाही.

काही आयोजक संकीर्तन पारायणालाच सामुहिक पारायण संबोधतात. परंतु माझे मते त्यात बराच फरक आहे.

संकीर्तन पारायणात प्रत्येक भक्त ग्रंथ वाचूच शकत नाही कारण त्याने व्यासपीठावरील भक्ताचे मुखोद्गत पारायण ऐकायचे आहे. त्यातच खरी मजा आहे. श्रवण आणि वाचन अशा दोन्ही क्रिया एकाच गतीने सोबत करणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे इतर श्रोत्यांकडून अध्याय वाचनाची अपेक्षा करणे म्हणजे व्यासपीठावरील भक्ताचा सन्मान कमी करण्यासारखे आहे. त्यांचे वाचन व निरुपण आपण कसे ऐकणार कारण आपण तर पारायण करीत आहे. म्हणून अशा पारायणामध्ये चांगल्या प्रतीच्या ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करून ते सुश्राव्य करावे. हे पारायण एकाच भक्ताचे ग्राह्य मानावे व इतरांनी जे केले ती श्रवणभक्ति. दुसरे असे की प्रत्येकाची वाचन गती वेगवेगळी असते त्यामुळे सोबत वाचणे शक्य होत नाही. बरेचदा फक्त काही भक्त पारायणाच्या सुरुवातीपासून असतात व बरेचसे भक्त हे उशिरा येतात. ते पारायण कसे पूर्ण करू शकतील? हा मोठा प्रश्न आहे. (यावर आयोजकांनी विचार करायला हवा) म्हणून जेंव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त भक्तांनी पारायण करावे असे अपेक्षित असेल तर सामुहिक पारायण आयोजन करून प्रत्येकाला त्याच्या वाचन गतीनुसार पारायण करण्याची मुभा देणे आवश्यक आहे.

गण गण गणांत बोते