परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी (श्री वसंत गोपाळ जोशी)

जन्म: २३ सप्टेंबर १९२५, बेळगाव जिल्हा
कार्यकाळ: १९२५ ते            
संप्रदाय:  स्वामीसेवक

परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी
परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी 

सर्व जगताचे कल्याण  करण्या करता  संत सज्जन वेळोवेळी अवतार घेतात. असेच एक सत्पुरूष श्री दादामहाराज जोशी होत. अशा थोर विभूती जात-पात, धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन केवळ मानवता हाच खरा धर्म असे. आचार विचार व कृतीने सिद्ध करतात. प्रपंचात राहून परमार्थ कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम , संत एकनाथ. याच मालिकेतील एक सत्पुरूष म्हणजे श्री वसंत गोपाळ तथा दादा जोशी. २३ सप्टेंबर १९२५ रोजी जन्मलेल्या दादांनी दहाव्या वर्षीच घरदार सोडून हिमालया्तील हृषीकेश येथे कांबळी बाबांच्या आश्रमात प्रवेश केला. कठोर तापश्चर्येच्या चवथ्या वर्षी त्यांना साक्षात श्री नृसिंहसरस्वतीचा साक्षात्कार लाभला.

तदनंतर कांबळी बाबांच्या आदेश प्रमाणे पुन्हा जन्मगावी परतून शिक्षण पूर्ण करून नोकरीही धरली. संसार  मांडला पण परमार्थाची कास धरली. लोकांच्या अडी अडचणी सोडवणे, त्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणे हेच त्यांनी जीवनाचे सूत्र ठरविले. अश्यातच त्यांना स्वामींनी दर्शन देऊन लोकांच्या अडी अडचणी सोडविण्याचा आदेश दिला. अनेक साधक, रंजले गांजलेले, त्यांचे निवासस्थानी वळू लागले. घर एक मंदिरचं बनले. पण येथे ना उपकाराची भावना, ना स्वतःचे आवडंबर. दादा हे थोर व्यक्तिमत्व असलेतरी ते सर्वच साधकांचे गुरुस्थानी असलेले परमपूज्य व्यक्तिमत्व. स्वतःच्या संसारपेक्षा इतरांचे संसार स्थिरस्थावर होण्यासाठी त्यांनी कायम मौलिक मार्गदर्शन केले. भक्तांकडून परमेश्वराची सेवा करून घेऊन त्यांना चिंता मुक्त केले. या स्वामी दरबारात कोणी उच्च नाही की नीच नाही, स्त्री पुरुष  भेद नाही, जातिभेदही नाही. फक्त सर्वाना दुःख मुक्त करणे हेच ईश्वर प्रेषित कार्य. 

त्यांनी आयुष्यभर साधना अखंड चालू ठेवली. त्यानी चातुर्मासातली वृत वैकल्ये अत्यंत श्रद्धा भावनेनी केली. दादा  श्री गुरु अनुग्रहाने कायम तेजपुंज व उत्साही दिसत. असे हे दिव्य  विभूतमत्व पुण्यनगरीत वास्तव्यास होते व येथेच ते दत्त चरणी विलीन झाले. भक्तांचा गुरु समाधीस्थ  झाला. पीडितांचा मार्गदर्शक हरपला.

प. पू. दादांनी अनेकांना संसारीक व भक्ती मार्गातही मार्गदर्शन केले. एकदा दादा गुरुदेव रानडेंच्या आश्रमाकडे जात असतांना श्री सायंदेवांच्या कडगंची वरुन जात असताना त्यांचे मन विषण्ण झाले. वेदतुल्य श्री गुरुचरित्र लेखनाचे स्थान असे दुर्लक्षीत का? येथे ते ध्यानस्थ बसल्यानंतर श्री गुरुचरित्राची मूळप्रत व श्री गुरूंचे श्रीशैल्य गमनानंतर प्राप्त झालेले प्रसाद पुष्प त्यांना दिसले. त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन शिवशरणप्पांचे जीर्णोद्धारासाठी मार्गदर्शन केले. या प्रकल्पास तन मन धनाने मदत केली. आज जे नुतनीकृत मंदिर आपणास दिसते त्याचे श्रेय कै. दादा जोशी यांचे  ही आहे.  प. पू. दादांनी  विस्तृत लेखन केले.  काही पोथ्या लिहिल्या व अनेक  मासिकांमध्ये अध्यात्मपर ग्रंथ लिहिले.

।।श्री गुरुदेवदत्त ।।