ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्।
गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥
सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानादिकं फलम्।
गुरोरडिध्रपयोबिन्दुसहस्त्रांशेन दुर्लभम्।।
हरौ रूष्टे गुरस्त्राता गुरौ रूष्टे न कश्चन।
तस्मात् सर्व प्रयन्तेन श्रीगुरूं शरणं व्रजेत्॥
गुरूरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णुशिवात्मकम्।
गुरोः परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरूम्॥
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु - पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.
खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन !
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून स्वीकारला आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. गुरु दोन प्रकारचे असतात एक गुरु ! एक सदगुरु ! अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की -
“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण ।
गुरुसी पडले अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥” असे सांगून अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.
ज्यांनी आत्मनात्मविवेक सांगून मायेच्या संसाररूपी पुरातून मला वाचविले तो सदगुरु अखंड माझ्या ह्र्दयात आहे, म्हणूनच माझे या विवेकावर प्रेम आहे. आदर आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांत अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते. (दडलेले ज्ञान स्पष्ट दिसू लागणे.) ज्याप्रमाणे हाती चिंतामणी लागल्यास मनुष्याचे सदासर्वदा मनोरथ पूर्ण होतात.
‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे. कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लावू?’ हेच खरे आहे.
गुरु म्हणजे गुह्य रूप
गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते!
आपल्या जीवनात गुरुंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सदगुरुंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सदगुरु, त्यांच्या स्मरणासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ (आषाढ पौर्णिमा) हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिध्द गुरु-शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचित आहेत.
‘गुरुबिन कौन बतायें ‘बाँट ।’ हा मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता आहे. सदगुरुच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सदगुरुंना शोधण्यासाठी आपणांस जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की, ते स्वत:हूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्धकर्मानुसार आपल्याला सदगुरु भेटतात. सदगुरुंकडून एकदा का अनुग्रह घेतला की, त्याचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते. जशी प्रतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते; त्याप्रमाणे सदगुरुंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे-पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सदगुरुच सर्व काही करवून घेत असल्यामुळे नामधारकाच्या ‘मी’ ला कुठेही वाव नसतो. सदगुरुंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु, एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते.
सदगुरुंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे १) सदगुरु ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे. २) त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. ३) कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. ४) नामावर, सदगुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सदगुरु नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.
भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.
सदगुरुंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सदगुरुंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सदगुरुंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सदगुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान.
गुरु कोणाला करावे ? जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच -
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥
गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. (उदा. पैशाची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे.)
आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्श देणारी काशी, पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तिर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सदगुरुंचा महिमा अपार आहे. तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सदगुरु म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांतीसुखाचे माहेर, शमदमन केलेले, भक्तिज्ञानाची पेठ, शुध्दभाव इ. गोष्टी त्यांचे ठायी असतात.
जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. त्याच्या साधना काळात सदगुरु साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात. सदगुरु आपल्या जीवनाला, विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्मज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.
साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.
गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्र्ह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.
कैलास पर्वतावर भगवान शंकर व भवानी पार्वतीमाता पारमार्थिक गप्पा करत बसले असता, पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना सर्वजणांच्या उद्धाराविषयी प्रश्न विचारला, ‘कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जणांचा उद्धार होईल?’ त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गुरुगीतेची महती सांगितली.
श्री गुरुंचे सतत स्मरण, गुरुंनी दिलेल्या नामाचा सदासर्वकाळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे. काया-वाचा मने, श्वेने-वित्ते-प्राणे त्यांची सेवा होणे आवश्यक आहे. एखादे वेळेस श्री भगवान शंकर क्रोधीत झाले तर गुरु सांभाळून घेतात. परंतु गुरु क्रोधीत झाले तर शंकर सांभाळून घेत नाही. तेव्हा श्री गुरुंना शरण जाणे महत्त्वाचे. श्रीगुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा ह्या तिन्हीची वस्ती त्यांचे ठायी असते. भुक्ति-मुक्ति देणारे, त्रिकालध्यानी, ध्यानास बसल्यास त्यांचेच स्मरण, पुजेस श्रीगुरु चरण, मंत्र-त्यांनी दिलेले नाम. एवढे झाल्यास श्रीगुरुंची कृपा होऊन साधक मोक्षाप्र्त जातात. तेव्हा श्रीगुरुंचेच भजन, चिंतन, स्मरण, नमन करावे.
गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक !
१. साधकाने श्रीश्री यांच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.
२. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.
३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.
४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणार्या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.
५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल.
६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे.
७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात.
८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय.
९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.
१०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो.
११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते.
१२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
१३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात.
१४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय.
१५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते.
१६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.
१७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल, तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे.
१८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही.
१९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो.
२०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी.
२१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.
२२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.
२३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.
२४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही.
२५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही.
२६. गुरुमंत्राचा जप करणार्याचीच आध्यात्मिक उन्नती होते.
२७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो.
२८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु !
२९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.
३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.
३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.
एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात.
गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे
एकदा एक बाई बाळंतीण झाली, आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई, आणि त्या बाईला हा माझा मुलगा, हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे, आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत; ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जरे खोटे, तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते, तेही अंती खोटेच ठरते! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. जिथे विषयविरक्ति झाली तिथेच भक्तिला सुरुवात होते.
गुरु तरी काय करतो. तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून, तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूने सांगितल्या शिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण, गुरू व्यतिरिक्त जी खटपट, ती फारशी उपयोगी नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता गुरू हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसर्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे. गुरूने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.
श्रीगुरु
- गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
- गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
- गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
- गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
- गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
- गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.
- गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
- गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
- गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
- गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
- गुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही.
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्येत् ॥
प. पू. श्री गुरुमहाराजांची अमृतवाणी
- ईश्वरी कार्य कसे घडते याचे उत्तर शोधू नये. ते देता येत नसले तरी जाणवत असते. फुलांचे रंग कसे होतात हे सांगणे शक्य नसते. रंगाचे गुणधर्म सांगता येतात. पण रंग, रूप, आकाररादिकार्ये कशी होतात हे सांगता येत नाही. हीच ईश्वरी लीला आहे .प्रत्यक्ष देह जात नाही. ईश्वर त्या स्वरूपात जाऊन कार्य करतो.
- शिष्य मुक्त होईपर्यंत आम्हालाच तुमच्या मार्गदर्शनासाठी यावे लागणार आहे. गुरू ही व्यक्ती आणि विशिष्ट नावाचे तुम्ही शिष्य या जन्मात आहोत. पुढच्या जन्मात तुम्ही आणि मी या नावाने रहाणार नाही. तुमचे जन्म कर्मबंथनाने होत आहेत तसे आमचे नसते. ईश्वर योजना म्हणून सोपविलेल्या कामासाठी गुरुतत्वाला ईशेच्छेने यावे लागते. ईश्वराला बंधने नसतात. मोक्षाचे आकर्षण ईश्वराला नसते. ईश्वर बंधन मोक्षाच्या पलीकडचा आहे.
- गुरूतत्व हे ईश्वरतत्वच आहे. ते सतत ईश्वरी कार्यासाठी नामरूप धारण करून येत असते. पुढच्या जन्माची चिंता करीत बसण्यापेक्षा या जन्मातच तीव्र साधना करून हित साधावे. या जन्मात आपली भेट झाली याचा पूर्वजन्माशी सबंध असल्या शिवाय का? साधनेची फिकीर केली म्हणजे कोणतीच फिकीर राहात नाही.
- श्री नृसिंहसरस्वती दीक्षीतस्वामी हे आपल्या गुरूला परब्रह्म मानीत असत. हीच भूमिका आपण गुरूंबाबत ठेवली पाहिजे .
- आपला गुरू इतक्या सहजतेने सापडणारा नाही. तो दाखविण्यासाठी बाहेरच्या गुरूची आवश्यकता आहे.
- देह, इंद्रिये, प्राण, मन, अहंकार, हे सर्व गेल्यावर जो उरतो तो 'मी' तो 'मी' ज्ञानस्वरूप आहे.
- मनुष्य दु:ख मागत नसतो, तरीपण ते त्याला प्राप्त होत असते. न मागता जर दु:ख लाभत असते तर सुखही न मागता प्राप्त होईल ही खात्री ठेवावी.
- ग्रंथ नीट समजले तर शब्दज्ञान होईल. पण नुसत्या शब्दज्ञानाने 'मोक्ष' लाभत नाही. ग्रंथाचे सार समजण्यसाठी अधिकारी व्यक्तीकडून श्रवण अधिक चांगले शास्त्राचे सार समजून त्यानुसार साधनच करावे लागते. त्याशिवाय ज्ञान होत नाही.
- अती वाचू नये. बुध्दीभेद होण्याची शक्यता असते, अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. वाचावयाचे की वागायचे? वाचन करावयाचे असेल तर भागवत, दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी या चार ग्रंथांपैकी आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही एक ग्रंथ नित्य वाचनात ठेवावा.
सद्गुरूंचे जीवनातील स्थान
"ज्याने सद्गुरु नाही केला | त्याचा जन्म वाया गेला ||"
सद्गुरुंची उपमा कशालाच देता येत नाही :-
१. सूर्य प्रकाशाने अंधार पळुन जातो, त्याचप्रमाणे सद्गुरुंचा अभयहस्त ज्याच्या मस्तकावर राहतो त्यांचीकृपा ज्याच्यावर होते, त्याचेवरील मायेचा अंमल नष्ट होतो. ही उपमा इथे लागू पडत नाही. कारण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोप पावतो की, रात्र होते व पुन्हा अंधार ब्रम्हांडात भरतो. मात्र सद्गुरूंचे तसे नाही. ते अज्ञानाला मूळासकटच उपटून टाकतात.
२. सोने खराब झाले तरी त्याचे लोखंड कधीच होत नाही. सद्गुरुंच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही.
३. परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने दुसर्या लोखंडाला लावले तर, त्याचे सोने होत नाही म्हणजे परिस लोखंडाला परिसपण देत नाही, पण सद्गुरुंला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करुन तारतो. म्हणजेच शिष्याला गुरुपद प्राप्त होते. म्हणूनच परिसाची उपमाही सद्गुरुंला लागू पडत नाही.
४. सद्गुरु सागरा सारखा म्हणावे तर योग्य नाही, कारण सागराचे पाणी खारट असते. अगदी महासागर जरी घेतला तरी तो कल्पांती नासतोच म्हणून ही उपमा तोकडी पडते.
५. सद्गुरु मेरुपर्वतासारखा आहे. असे म्हणावे तर ते योयोग्य नव्हे, मेरु पर्वत अचेतन आहे. कठोर दगड आहे पण सद्गुरू तसे नाहीत. ते सचेतन आहेत, त्यांचे अंतःकरण कोमल आहे म्हणून ही उपमा येथे लागू पडत नाही.
६. सद्गुरु गगनासारखा आहे म्हणावे तर तेही बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते पण सद्गुरु शून्यापलीकडील स्वरुप आहे. म्हणून ही उपमा सुद्धा उणी पडते.
७. सद्गुरु पृथ्वीसारखा, निश्चल, निर्भय व गंभीर आहे म्हणावे तर ते अवाजवी आहे, कारण पृथ्वी कल्पांत समयी विरुन जाईल पण सद्गुरुला मात्र मर्यादा नाहीत. ते अभंग आहेत.
८. सद्गुरु सूर्यासारखे आहेत म्हणावे तर ते योग्य नाही, बरोबर नाही सूर्याचा प्रकाश किती ? सद्गुरूंचा प्रकाश अखंड तेवणारा आहे म्हणून ही उपमा अ वास्तव आहे.
९. शेषाची उपमा द्यावी म्हटले तर तो डोक्यावर ओझे वाहतो. म्हणून ही उपमा उणी पडते कारण सद्गुरु कोणतेच ओझे वाहत नाहीत.
१०. सद्गुरु पाण्यासारखे आहे म्हणावे तर पाणी सगळे आटून जाते. परंतु सद्गुरु स्वरुप निश्चल असून ते कधीच नाश पावत नाहीत. म्हणून ही उपमा थीटी पडते.
११. सद्गुरु अमृता सारखे आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही. स्वर्गात राहून नित्य अमृत प्राशन करणारे देव अखेर मृत्युच्याच मार्गाने जातात. ते फक्त नावाचेच अमर असतात पण सद्गुरु ज्यांच्यावर कृपा करतात ते खर्या अर्थाने अमर बनतात म्हणून ही उपमा उणी पडते.
१२. सद्गुरु कल्पतरुसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करु तेवढेच कल्पतरू आपणास देतो. परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरु पुढे कल्पतरुची किंमत राहत नाही. किंबहुना सर्व कल्पना ओलांडूनच सद्गुरुंजवळ जावे लागते म्हणून ही उपमा उणी आहे.
१३. सद्गुरु चिंतामणी सारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. ज्याचे मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरु शिष्यांचे मनात कसलीच चिंता उरु देत नाही. त्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही.
१४. सद्गुरुला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही. कारण जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते पण सद्गुरुंच्या द्वाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते.
१५. स्वर्गलोक, इन्द्रपद आणि त्यांचे ऐश्वर्य ही सगळी कालांतराने नाश पावतात पण सद्गुरुंच्या कृपेची प्राप्ती झाली की, ती कोणत्याही काळी नाश पावत नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही.
@ एका सद्गुरुचे स्थान सदैव अविनाशी असते सगळी सृष्टी नाशवंत असल्यामूळे दृष्य विश्वातील कोणत्याही वस्तुंची उपमा सद्गुरुला त्यांच्या शाश्वत स्वरुपामुळे देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरु स्वरुपात नाही.
@ वरील सर्व उदाहरणांवरुन असे दिसून येते की, वर्णन करता येत नाही हेच सद्गुरुंचे वर्णन !!!
@ सद्गुरुंचे वर्णन करता न येणे हेच त्यांचे वर्णन समजावे. सद्गुरु स्वरुपाचा अनुभव आतील अनुभव आहे जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत, त्यांनाच या अवस्थेच्या खुणा कळतात. फक्त अंतर्निष्ठानाच कळेल.
@ श्री सद्गुरु ब्रम्हज्ञानी पुरुष असतात. ते परमात्म्याशी अभिन्न असतात. ते चालते बोलते ब्रम्हच समजावे. ते स्वरुपभूत असल्याने त्यांचे वर्णन कसे करणार ?
@ परमात्म वस्तू अतिंद्रिय व अचिंत्य आहे. अदृष्य व अलक्षण आहे. अतीगूढ व दुर्लभ आहे. सद्गुरुंच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रूपतेने अनुभवतो. आपला आत्मस्वरुपाचा ठेवा सद्गुरुवाचून मिळत नाही म्हणून सद्गुरु करावा. सद्गुरुंनी कृपा केल्याखेरीज ब्रम्हज्ञान होणे दुरापास्त.
@ आत्मज्ञान करुन न घेता मनुष्य जी कर्मे करतो ती अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण घडते म्हणून ज्ञान घेण्यासाठी सद्गुरुंचे चरण घट्ट धरावे. त्यांना शरण जाऊन ज्ञान देण्याची प्रार्थना करावी.
@ सद्गुरुंच्या कृपेखेरीज गर्भवास चुकत नाही. नरकात जाणे सुटत नाही. सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय करतात ? सद्गुरू जीवाला ईश्वर केंद्रित करतात. जीवाची तळमळ शांत करतात. ईश्वरदर्शन घडवितात.
सद्गुरु केला नाही तर जन्म वाया जातो. सद्गुरु पाठीशी नसेल तर जीवन दुःखमय बनते. अभय देणारा हात सद्गुरुंनी डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रकट होतो. संसाराची दुःखे नाहीशी होतात. असे हे सद्गुरुंचे महात्म्य अपरंपार आहे.
जे जे आपणासी ठावे | ते ते सर्वांसी सांगावे ||
शहाणे करुन सोडावे | सकल जन ||
।। जयजय श्री गुरु देव दत्त ।।
गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी
महर्षि व्यास - लेखक : डाॅ.प.वि.वर्तक - पुणे .
आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.
व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना 'व्यास' ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की तूं स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.
व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.
महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी 'गुणविधी' हे सायण्टिफिक नांव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे २३ असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रहि अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध *रविवार दि.१६ ऑक्टोबर ५५६१ इसवीसनपूर्व* या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.
अभिजित् नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व १२००० वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. 'जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात', असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.
महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.
'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|' व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे', असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जीवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.
परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.
गुरु शिष्य संबंध
शिष्य होणे म्हणजे काय ?
आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्या साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधिक असते; पण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक असते. शिष्यत्वाचे महत्त्व, इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद (फरक) तसेच गुरु कोणाला करावे, याविषयीची तात्त्विक माहिती पुढील लेखातून समजून घेऊया.
१. शिष्य या शब्दाची व्याख्या आणि अर्थ
अ. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरूंनी सांगितलेली साधना करतो, त्याला शिष्य असे म्हणतात. कुलार्णवतंत्रात शिष्याची व्याख्या करतांना म्हटले आहे,
शरीरमर्थप्राणांश्च सद्गुरुभ्यो निवेद्य यः ।
गुरुभ्यः शिक्षते योगं शिष्य इत्यभिधीयते ।।
अर्थ: जो तन, धन आणि प्राण (म्हणजे सर्वस्व) गुरूंना समर्पण करून त्यांच्याकडून योग शिकतो (म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना करतो), त्याला शिष्य म्हटले जाते. (म्हणूनच बायकोमुलांना अगदी वार्यावर सोडून जरी शिष्य गुरूंकडे गेला, तरी त्याला पाप लागत नाही.)
२. शिष्यत्वाचे महत्त्व
अ. देव, ऋषि, पितर आणि समाज ही चार ऋणे शिष्याला फेडावी लागत नाहीत.
आ. गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा ।
शुभकर्माणि सर्वाणि दीक्षाव्रततपांसि च ।। १५१ ।। – श्री गुरुगीता
अर्थ: गुरुपुत्र या पदवीस योग्य असा गुरुसेवक शिष्य, व्यवहारात भोळसट असला, तरी त्याच्या दीक्षा, व्रते, तप, वगैरे साधना सिद्धीस जातात. गुरुसेवक नसणार्यांना तसे फळ मिळत नाही.
३. विद्यार्थी आणि शिष्य यांमध्ये कोणता भेद आहे ?
गुरु आणि शिक्षक यांच्यात भेद आहे, त्याचप्रमाणे शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही भेद आहे. शिक्षकाचे शुल्क दिले की, विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशोब पूर्ण होतो; पण गुरु आत्मज्ञानच देत असल्याने गुरूंसाठी काहीही आणि कितीही केले तरी ते थोडेच असते. लहानपणी आईवडिलांनी आपले सर्व केलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण कितीही केले, तरी ते थोडेच असते, तसेच हेही आहे.
४. माध्यम आणि शिष्य
‘माध्यम म्हणून एखादा कार्य करतो, तेव्हा त्याची प्रगती होत नाही. तो परप्रकाशी रहातो. याउलट गुरु शिष्याकडून कार्य करवून घेतात, तेव्हा ते शिष्याची क्षमता वाढवतात; जसे श्री रामकृष्णांनी विवेकानंदांचे आत्मबल वाढवले आणि मग त्यांच्याकडून कार्य करवून घेतले.’
५. साधक आणि शिष्य
साधकाने स्थूल जगात अडकू नये म्हणून त्याने सगुणाबरोबर निर्गुण-तत्त्वाची उपासना करणे आवश्यक असते. गुरुप्राप्ती झाल्यावर सगुणातील निर्गुणाची, म्हणजे मायेतील ब्रह्माची, अनुभूती येण्यासाठी सगुणातील गुरूंची सेवा करणे आवश्यक असते.
६. गुरु-शिष्य नातेच खरे कसे ?
या जगात गुरु-शिष्य हे नाते पवित्र मानलेले आहे. हे एकच नाते खरे आहे. गुरु-शिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचे असतात. शिष्याला ‘माझा उद्धार व्हायला हवा’ ही एकच जाणीव असली पाहिजे. गुरूंना एकच जाणीव असते की, ‘याचा उद्धार व्हायला हवा.’ गुरु-शिष्याचे नाते हे वयपरत्वे नसते. हे नाते ज्ञानवृद्धि आणि साधनावृद्धि यांच्यावर आधारलेले असते. जीवसृष्टीतील सर्व प्राणी ज्ञान आणि साधना यांच्याच माध्यमातून अभिवृद्धि साधत असतात. बाकी सर्व नाती भीतीच्या किंवा सामाजिक बंधनांच्या पोटी आलेली असतात; म्हणून त्यांच्याशी व्यवहार सीमित असतो. त्या नात्यांत अहंभाव सातत्याने राखला जातो. त्या नात्यांत ज्ञान आणि साधनेला किंमत नसते. अहंभाव राखणे म्हणजेच नाती टिकविणे. अहंभाव राखणारी सर्व नाती खोटीच असतात.
७. गुरुप्राप्तीसाठी काय करावे ?
गुरु शोधू नये.
सामोरे श्री गुरुदेवरूप आले । ज्ञानचक्षुवीण कैसे कळे ।।
ओळख पटेना जरी तुम्हासी । लीन व्हावे श्रीचरणासी ।
देतील ओळख स्वस्वरूपाची । शुद्ध प्रेमे चित्त वेधी ।।
गुरु शोधून सापडत नाहीत; कारण गुरुतत्त्व सूक्ष्मतम आहे आणि साधकाला फक्त स्थूल आणि थोडेफार सूक्ष्म एवढेच कळत असते. अध्यात्मात शिष्याने गुरु करायचे नसतात, तर गुरुच शिष्य करतात, म्हणजे तेच शिष्याची निवड आणि सिद्धता करतात. साधकाचा आध्यात्मिक स्तर ५५ प्रतिशतहून अधिक झाला की, गुरु स्वतःहून त्याच्याकडे येऊन त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. साधकाचा आध्यात्मिक स्तर ४० प्रतिशत इतका न्यून असला; पण त्याचे मुमुक्षुत्व तीव्र असले, तरीही त्याला गुरुप्राप्ति होते. थोडक्यात म्हणजे गुरु शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिष्य म्हणून लायक होण्याचा साधकाने प्रयत्न करावा.
गुरूंची परीक्षा घेऊ नये.
‘विचार करून, म्हणजे डोळसपणे श्रद्धा ठेवायची असे जर ठरले, तर गुरूंची परीक्षा घ्यावी लागेल. परीक्षक हा परीक्षार्थीपेक्षा वरचढ असावा लागतो. शिष्य तसा नाही. यासाठी आपण उत्तम शिष्य कसे होऊ, हा एकच ध्यास साधकाने घ्यावा.
स्वतःच स्वतःला कोणाचाही शिष्य समजू नये.
अमुक एका गुरूंचा मी शिष्य आहे, असे समजू नये. गुरूंनी म्हटले पाहिजे की, हा माझा शिष्य आहे. एखाद्या तरुणाने मनाशी ठरविले की, अमुक एक तरुणी माझी प्रेयसी आहे, तर त्याचा उपयोग नाही. तिनेही तसे म्हटले पाहिजे. तसेच गुरु-शिष्य संबंधातही असते.
८. गुरु कोणाला करावे ?
‘प्रत्येकाने निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य व्हावे. नुसत्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होऊ नये. एकदा तुम्ही निर्गुणाला जाणले की, मगच तुम्हाला सगुणाला ओळखता येईल. एकदा तुम्ही निर्गुणाला जाणले की, तुम्ही कुठे आहात हे कळेल. (निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य म्हणजे निर्गुणाची अनुभूती सतत घेत असलेल्या परात्पर गुरूंचे किंवा नामाचे शिष्य.)
गुरु आणि शिष्य यांचा चार आश्रमांतील आश्रम
ब्रह्मचार्याला ब्रह्मचर्याश्रमी, वानप्रस्थाश्रम्याला वानप्रस्थाश्रमी आणि संन्यासाश्रम्याला संन्यासाश्रमी गुरु अधिक जवळचे वाटतात. गृहस्थाला मात्र ब्रह्मचर्याश्रमी, वानप्रस्थाश्रमी, संन्यासाश्रमी किंवा गृहस्थाश्रमी गुरु केले, तरी ते जवळचे वाटतात.
गुरूमध्ये सर्व देव वास करतात. त्यांच्याजवळ कोणतेही विकार फिरकत नाहीत व ते आपल्या शिष्याजवळही फिरकु देत नाहीत. शिष्याचेही कर्तव्य आहे की, त्याने पुर्ण समर्पण भाव ठेवुन गुरूभक्ती करावी व गुरूआज्ञा हेच जीवन समजुन गुरूप्रती समर्पित राहावे.
गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा महत्वपूर्ण व प्रासादिक माहिती
सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो.
गुरुमंत्र म्हणजे एक अभिवचन असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. 'उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र) टाकणार नाही' मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त 'गुरुर्वाक्यं प्रमाणं' असे व्हावे लागते. म्हणूनच तर 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु...' असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास. पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे, संस्कारबीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां? कुणीही उठावे आणि कधीही मागावा? गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची ! त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच सुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं ।
जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे. ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात. त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे नसतात. त्यांना जे हवे तेच ते करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां? कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे "आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर देह आया" या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय. सारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.
गुरुकृपाहि केवलम्
आयुष्यात केलेल्या सत्सगाने व सत्कर्माने आपणास सद्गुरूंची प्राप्ती व्हावी अशी तीव्र इच्छा प्रथ व्यक्तीस निर्माण होते. त्यप्रमाणे उपरती होते. बुध्दीचा निश्चय होतो. मनाचे त्या दिशेने प्रयत्न सुरू होतात व एकदिवस प्रयत्नाला यश येते. त्यादिशेने आपोआप मार्गदर्शन होते आणि सद्गुरंची प्राप्ती होऊन सद्गुरु कृपेचा लाभ होतो. सद्गुरूकृपा झाल्यानंतर व्यक्ती साधक होतो. त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट बदलून जाते. त्याचे ध्येय ठरून जाते. त्याच्या विचारात, कृतीत, आचरणात, स्वभावात, वागण्यात अमुलाग्र बदल घडू लागतो. विचारात सकारात्मकता येते, स्वभावात साधेपणा व नम्रता येते .पेहेरावातील भडकपणा जाऊन साधेपणा येतो.
प. पू. श्री सद्गरूंच्या मार्गदर्शनानुसार साधन सुरू असते.असामान्य अनुभव यायला लागतात. श्रध्दा निश्चल होते .जीवनातील कर्तव्य कर्म करीत असतांना असे जाणवायला लागते की कुणाचे तरी मार्गदर्शन आपणास लाभत आहे आणि त्यानुसार आपण वागत आहोत .कठीण समस्येवर आपोआप उपाय सुचतो काय करावे याचे खात्रिशीर मार्गदर्शन होत राहते. जीवनाला ध्येय लाभल्याने चित्रच पालटून जाते. स्वभावात उल्लेखनीय बदल होतो प्रत्येकाविषयी आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होते. सद्गुरुकृपेचा लाभ फक्त त्या विशिष्ट व्यक्तीलाच होतो असे नाही तर त्व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब गुरुछत्राखाली येते. कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर त्याचा परिणाम होऊन लाभ व मार्गदर्शन होत असते. इतककेच नव्हे तर साधकाच्या घनिष्ठ सहवासातील कुटुंबेतर व्यक्तींना सुध्दा जाणता अजाणता लाभ व मार्गदर्शन होत असते. सद्गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या जीवन नौकेचा सुकाणु सद्गुरूंच्या हाती आलेला असतो व त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व जीवन व्यापार होत असतात. "सद्गुरूसारिखा असता पाठिराखा । इतरांचा जोखा कोण करी ।। सद्गुरू सर्व प्रसंगी आपले रक्षण करण्यास आपणास मार्गदर्शन करण्यास समर्थ असतांना आपणास कोणत्याच गोष्टींची चिंता करण्याचे कारण उरत नाही. या सर्व गोष्टी केवल सद्गुरू कृपेनेघ शक्य आहेत, याची खात्री असू द्यावी.
श्रीधर स्वामी म्हणतात,
१) तुम्हां सर्वावर गुरूदेवांचे किती प्रेम आहे, किती हितदृष्टी आहे त्यास कोणतीच सीमा नाही. ज्याप्रमाणें मांडीवर असलेले लहान बालक आपल्या मातेच्या प्रेमाचें मूल्यमापन करण्यास असमर्थ आहे. असतें त्याप्रमाणेच गुरूंच्या हृदयात आपल्याबद्दल किती वात्सल्य व हितदृष्टी आहे हे समजण्यास शिष्यही असमर्थ असतात. गुरूदेवानी अत्यंत कठोरपणें केलेली तपस्या पूर्णपणे ते आपल्या शिष्याप्रित्यर्थ समर्पण करतात आणि शिष्यांना इहलोक व आनंदरूपी बनवून ठेवण्यासाठी बलिदान करतात. तुम्ही सर्व बालबुद्धीचे असल्यामुळें गुरूहृदयाचे मर्म तुम्हाला कोठून समजणार? श्री गुरूदेव तुम्हा सर्वांचे मंगलमय स्वरूप आहेत. गुरूदेव आपल्या शिष्यांसाठी आपले सर्व सुख सोडून देतात.
२) आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे. देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गदिलोकांतील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणावाचून कोणतीही व्यक्ति नाही. या सर्वांचे यथार्थस्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तु होय.देह म्हणजेच आत्मा नव्हे. कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो. सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते. पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरू असे ज्ञान होणे आवश्यक आहे. 'तत्त्वं गृण्हाति इति गुरूः' तत्त्व जाणणारा गुरू होय. वस्तुस्थितीचे यथार्थज्ञान देणारी महाशक्ति म्हणजेच गुरू. कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंदघनरूप आहे, तेथे दुःख शोकाला वाव नाही, तेथे अशांततेचा वाराही नाही, देह वगैरे काही नाही, आपल्याच अस्तित्त्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ति म्हणजेच गुरू. गुरू व देव आदींच्या दर्शनास शुचिर्भूतपणे सोवळ्यानेच गेले पाहिजे. ओवळीवस्त्रे सोडून, तीर्थस्नान करून सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ नव्हे तर देहाभिमानीरूपी ओवळे टाकून देऊन, सद्गुरूरूपी ज्ञानगंगेत स्नान करून, आत्मभावनारूपी सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय.
३) श्रीगुरू किती मोठे आहेत? समुद्राएवढे मोठे आहेत काय? असे जर विचारले तर त्याचे उत्तर 'नाही' हेच येईल. ते आकाशाएवढे आहेत काय? त्याचेही उत्तर तेच. श्रीगुरू आकाशाएवढे मोठे आहेत, आकाशासारखे सर्वव्यापी व नित्यही आहेत. पण हे दृष्टांत योग्य नाहीत. गुरू आकाशाप्रमाणे आहेत असे म्हटले तर काय बिघडेल? 'नित्य' या विशेषणामुळे ते आकाशापेक्षा श्रेष्ठ ठरतात. आकाश अनित्य आहे. 'आत्मनः आकाशः सम्भूतः' आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती आहे व उत्पन्न होणारी वस्तु नाशिवंत. म्हणजेच आकाशही नाशवंतच. नाश पावणारी, नासणारी, विकारी अशी वस्तु,क्षुल्लक होय. ज्यात चारही लोक सामावले असेल व जे आपल्या स्वस्वरूपातच रहात असले तरी ते निर्मित असल्याने नाशवंतच होय. नाश होणारी वस्तु श्रेष्ठ असूच शकत नाही. वस्तुनिर्माता श्रेष्ठ असतो, निर्मितवस्तु श्रेष्ठ नव्हे. गुरूस आकाशाची उपमा दिली तर ते अनित्य असल्याने ती उपमा शोभुन दिसत नाही. श्रीमत् दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या चवथ्या समासामध्ये 'सद्गुरू कोणत्याही उपमेपेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणजेच अनुपमेय आहेत' असे सद्गुरूंचे श्रीसमर्थांनी रसभरित वर्णन केले आहे.
४) सद्गुरूच्या जवळ जाणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमगेलच असं नाही. त्यांचं बाह्य़रूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही, तर काय उपयोग? त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टाशी एकरूप झालो नाही, तर काय उपयोग? त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांनी वस्तीस ठाव देऊनही, जवळ करूनही काही.
५) सद्गुरूपदापेक्षा कांहीही श्रेष्ठ असु शकत नाही. तसेच तेथे दुसरे काहीही असु शकत नाही. तो श्रेष्ठ, कनिष्ठ असा कोणताही पदार्थ नसून तो सर्वत्र व्यापून अद्वितीय आहे, असे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण श्रुतींनी सांगितले आहे. अशाप्रकारे एकमेव असलेली ही वस्तु दिसणार कशी ? हे जग दृग्गोचर होण्यास काय कारण असेल बरे ? असे प्रश्न उद्भवतात. अभिन्नतेने अखंड आनंदघन असलेले हे स्वरूप स्वानुभवानेच घेण्याची वस्तु म्हणजेच भोगणारा, भोगण्याची वस्तु व भोगण्याचा क्रम. अनुभव त्रिपुटी नसलेले आनंदस्वरूपच गुरूतत्व स्वरूप होय. असा हे परमानंदस्वरूप ब्रह्मच गुरू शब्दाने ओळखणे शक्य आहे. जेथे जगाची निर्मिती नाही, दुःखकोशाचा स्पर्श नाही, फक्त आनंदाचाच अनुभव परिपूर्ण व नित्य आहे अशा स्वरूपाला गुरू असे म्हणतात. अतिशुध्द, दुःखशोकरहित, परिपूर्ण, सत्यस्वरूप म्हणजेच अद्वितीयस्थिती असे हे परममंगल गुरूपद होय. अशा परममंगल गुरूनाथांची आराधना किंवा नित्य स्मरण करणाऱ्यास कशाचीही उणीव भासणार नाही. इतकेच नव्हे तर त्याचे भजन करणारा भक्त त्या मंगलस्वरूपात एकरूप होतो.
६) आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे. देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गदिलोकांतील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणावाचून कोणतीही व्यक्ति नाही. या सर्वांचे यथार्थस्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तु होय.देह म्हणजेच आत्मा नव्हे. कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो. सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते. पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरू असे ज्ञान होणे आवश्यक आहे.
'तत्त्वं गृण्हाति इति गुरूः' तत्त्व जाणणारा गुरू होय. वस्तुस्थितीचे यथार्थज्ञान देणारी महाशक्ति म्हणजेच गुरू. कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंदघनरूप आहे, तेथे दुःख शोकाला वाव नाही, तेथे अशांततेचा वाराही नाही, देह वगैरे काही नाही, आपल्याच अस्तित्त्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ति म्हणजेच गुरू. गुरू व देव आदींच्या दर्शनास शुचिर्भूतपणे सोवळ्यानेच गेले पाहिजे. ओवळीवस्त्रे सोडून, तीर्थस्नान करून सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ नव्हे तर देहाभिमानीरूपी ओवळे टाकून देऊन, सद्गुरूरूपी ज्ञानगंगेत स्नान करून, आत्मभावनारूपी सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय.
७) गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. नामस्मरणाला बसले की मनांत प्रापंचिक विचारांचें काहूर माजते ही एक सार्वजनिक अडचण आहे. परंतु, प्रापंचिक गोष्टी करतांना नामाचें काहूर माजू लागेल, तेंव्हा समजावें की आपलें भगवंताकडे पोचण्याचें अंतर थोडे राहिले आहे! सद्गुरूच्या जवळ जाणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमगेलच असं नाही. त्यांचं बाह्य़रूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही, तर काय उपयोग? त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टाशी एकरूप झालो नाही, तर काय उपयोग? त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांनी वस्तीस ठाव देऊनही, जवळ करूनही काही साधणार नाही.