श्री क्षेत्र टिंगरी, गाळणे रास्ता (गाळणे शिवार), गाळणे गाव, तालुका मालेगाव. जि. नाशिक

स्थान: श्री क्षेत्र टिंगरी, गाळणे रास्ता (गाळणे शिवार), गाळणे गाव, तालुका मालेगाव. जि. नाशिक.
सत्पुरूष: स्वामी त्रिशक्ती (ठाकूर स्वामी)
विशेष: श्रीपाद श्री वल्लभांचे आदेशानुसार स्थापना, श्रीपाद श्रीवल्लभ जागृत स्थान 

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी

॥ श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मने नमः॥

नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे | वसित्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव ||
कृते जनार्दनो देवः त्रेतायां रघुनंदनाः | द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ||

काषायवस्त्रं करदंड धारिणं | कमंडलुं पद्मकरेण शंखं | 
चक्रंगदां भूषित भूषणाढ्यं | श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||

ज्यांना पिठापुरास जाणे शक्य नसेल पण श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्यांनी गाळणे येथील गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानास अवश्य भेट द्यावी. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दिव्यमंगल स्वरूप आणि समस्त गुरुदत्त परंपरा यांच्या दर्शनाने, श्रीवल्लभांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ह्या स्थानाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य एका निराळ्याच आनंदाची, भक्तिरसाची उमेद देणारा आहे यात संशय नाही.

मालेगाव नवीन एस. टी. स्टेंड येथून कुसुंबा रस्त्याने केवळ २२ कि. मी. अंतरावर टिंगरी गावापासून गाळणे रस्त्यावर असलेल्या ह्या स्थानाबद्दल फारच कमी लोकांना कल्पना असेल. अतिशय नयनमनोहारी स्वरूपात असलेल्या श्रीवल्लभांच्या रुपात आणि सभोवतालच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या ह्या स्थानात पारायण, जप, साधना करण्याचे फळ हे पिठपुरात केलेल्या कर्माइतकेच आहे. तसेच, सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या ह्या स्थानात अध्यात्मिक उर्जा व्यापून आहे. सर्वत्र व्यापलेल्या श्रीगुरुंच्या चैतन्याचा विशेष व्यक्त होत असल्याचा अनुभव इथे आल्यावाचून राहत नाही. सर्व स्थानांच्या तुलनेत या ठिकाणी चैतन्य तर आहेच, पण या रूपाचा आणि स्वामींच्या रूपाचा एक आगळा वेगळाच संबंध आहे. 

श्री क्षेत्र टिंगरी- श्रीपाद पादुका
श्री क्षेत्र टिंगरी- श्रीपाद पादुका 

श्री स्वामी त्रिशक्तींच्या बद्दल

श्री स्वामी त्रिशक्ती महाराज मुळचे आंध्र प्रदेशातले. जनकल्याण, व्याधी निवारणार्थ परोपकार करीत आपले शरीर, मन आणि जीवन चंदनाप्रमाणे लोकोपयोगी आणणारे महान निरपेक्ष कर्मयोगी. यांचे आराध्य श्री जगदंबा असून, साईबाबांची विशेष प्रीती यांस होती. श्री अंबिकेने यांना विशेष वरप्रदान करून साक्षात्कार दिला. असे असून सुद्धा, महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तास कुक्कुटेश्वर स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कुमार रुपात दर्शन देवून पुढील कार्याची सूचना दिली. गुरुस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ असलेल्या “स्वामीजीं” च्या अध्यात्मिक अधिकाराची सीमा तेच जाणो. या प्रमाणे गुरुने भक्तश्रेष्ठास प्रेरणा देवून २००९ साली प्रथम महाराष्ट्रात धाडले. तेव्हापासून स्वामीजींनी असंख्य जनमानासांचे होम-हवन तसेच चित्र-विचित्र उपाय सांगून कल्याण केलेले आहे. या सर्व श्रीपादांच्या लीला आहे, आणि त्यातला आनंद घेत असल्याचा निर्मळ भक्तीभाव हीच श्री स्वामींची अनन्यभक्ती आहे.
 
सेवाकार्यात रमलेल्या या काळात श्री स्वामीजींना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी मूर्ती-पादुका देवून मंदिर स्थापनेचा आदेश केला. वेळीच दोन व्यक्तींनी २४ गुंठा मापाची जागा दान करून स्वामिजिंना दिली. मूर्तीचा शोध घेण्यास स्वामीजी जयपूर साठी अग्रेसर झाले. श्रीचरणांच्या संचाराच्या तसबिरीची एक प्रत बनवून ती मुर्तीकारास द्यावी असा मानस घेवून स्वामीजी जयपूरला पोहोचले. कितीतरी शोध करून सुद्धा हवी तशी शिळा सापडत नव्हती. गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. आज श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आहे, आणि आज काही चमत्कार होणार अशी प्रेरणा घेवून स्वामीजी शोधार्थ निघाले, ते एका शिळेच्या समोर येवून उभे झाले. विचारल्यास, ५ वर्षांपासून सदर शिळा इथेच आहे, कुणीही विकत घेत नाही असा निरोप व्यक्तीने दिला. शिळा मूर्तीस योग्य अशीच होती. श्रीगुरुंच्या महिमेचे वर्णन कोण करू शकेल? वेद सुद्धा नेति नेति म्हणून मौन झालेत. या तसबिरीतून मूर्ती घडवली असली तरीही या तसबिरीत आणि मूर्तीच्या चेहऱ्यात कमालीचा फरक आहे.

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी- श्री श्रीपाद 

प्रतिष्ठापना - तिथी महत्व

गुरुपौर्णिमेच्या पावन मुहुर्तास मंदिराचे बांधकाम सुरु झाले. चरित्रमृतात सांगितल्या प्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आजोबांसमवेत तसेच आपल्या वडिलांबरोबर अग्निहोत्र करीत. मंदिराचे कामासाठी सुद्धा वापरलेली सर्व राशी हि श्री स्वामीजींनी केलेल्या हवनांच्या मार्फत श्रद्धाभावाने भक्तांनी दिलेले दान होते. अहाहा! काय हा विलाक्षण सोहळा! मंदिराची प्रतिष्ठापना दि. २४-सप्टेंबर-२०१५ रोजी ठरली. या तारखेस श्रवण नक्षत्र असून, परिवर्तन एकादशी आहे. या प्रमाणेच, हि तारीख श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामींची विशेष संख्या २४९८ (२४ तारीख, ९ महिना, २०१५ -> २+०+१+५=८) चे निदर्शक आहे. श्रवण नक्षत्र आणि परिवर्तन एकादशीचे महत्व म्हणून, या स्थानाचे महात्म्य असे, कि आलेला भक्त अथवा साधक, आपल्या अडचणी, शंका श्रीस्वामींना सांगून परिवर्तन अनुभवेल. अश्रद्ध मनुष्याला मात्र हि जागा मृगजळ वाटेल.
प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी श्रीवल्लभांची पालखी निघाली, वेळी श्रीपादांच्या अस्तित्वाची अनुभूती प्रत्येकांनी घेतली. मंदिराच्या प्रतिष्ठापनेस क्रमश: पंचनद्यांचे, ३ समुद्रांचे पाणी आले होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असता, प्रतिष्ठापनेपूर्वी स्मितहास्य करणारी मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधत होती.  जणू काही पुढे होणा-या लीला आणि त्यावेळी प्रगटणारी स्वामींची ज्योती, याला सूचक अशी हि छबी छायाचित्रात सुद्धा कैद झाली आहे हे विशेष. अनंताचे दान देणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या या स्वरूपाचे नित्य मंगल होवो.  

प्रतिष्ठापनेस आकाश तत्वाचा आशीर्वाद म्हणून कि काय, संथ पावसात इंद्रधनुष्य येवून सृष्टी चकाकत होती. मंदिर प्रतिष्ठापनेस स्वामिजिंबरोबर पिठापुरातले मुख्य पुजारी उपस्थित होते. प्रतिष्ठापना श्री रामचंद्र सरस्वती स्वामींच्या हस्ते होण्याचा श्रीपादांचा मानस होता. त्यानुसार, प्रतीष्ठापनेच्या वेळी मंत्रोच्चाराच्या गजरात गाभार्यात रामचंद्र सरस्वती स्वामी आणि पिठापुरातील पुजारी असता, कळसामधून ज्योती प्रगटून श्रीपादांच्या मूर्तीच्या भृकुटात विलीन झाली. याच वेळी मंदिरात चार बाल श्वानांचा, वेद्स्वरुपांचा जन्म झाला, हे मंगल सूचक होते. तेव्हापासून, मूर्तीच्या भृकुटामध्ये विशेष तेज, आणि ज्योत दिसते. हे श्रीवल्लभ प्रत्यक्ष तिथे असल्याचं प्रतिक म्हणायला हरकत ती नाही.

प्रतिष्ठापनेनंतर बोधपर, अनुभूतीपर मार्गदर्शन करताना श्री रामचंद्र सरस्वती स्वामी, श्री स्वामी त्रिशक्ती यांनी आपल्या अनुभवांच्या वाणीचा लाभ उपस्थितांना करवून कृतकृत्य केले. सर्व मंडळी भजनाच्या, नामस्मरणाच्या निराळ्याच आनंदात रमली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी (१७-०९-२०१५) वरुणेश्वराच्या रुपात शिवलिंग सुद्धा मंदिराच्या आवारात तयार झाले होते. याची कहाणी सुद्धा रोमांचक आहे. कुरवपुरी श्रीपाद स्वामी प्रतिदिन रुद्राभिषेक करीत याची आठवण श्री स्वामीजींना झाली. हीच साधना श्रीपादांनी आणि भक्तांनी करावी असा मानस श्री स्वामीजींनी श्रीपादांना तशी याचना करताच,मध्यरात्रीस मुसळधार पाउस सुरु झाला. सकाळी यात वाळू मध्ये शिवलिंग बनले होते. याची जागा श्रीपादानीच निवडली हे विशेष. हे शिवलिंग वाळूचे असून जमिनीत थोड्याच खोलीवर अलगद बनलेले सकाळी दिसले. हे तयार झाले तेथे मंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे. तसेच, प्रभूंच्या सानिध्यात नवग्रह आणि नक्षत्र मंदिर सर्व दोष निवारणार्थ असावे अशी श्री स्वामी त्रीशाक्तींना आज्ञाच आहे. तद्वत याचे काम सुरु आहे. भविष्यात येथे भक्त निवास व अन्नछत्र निर्माण कार्य होणार आहे.

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी

मंदिराचे बांधकाम व मुर्तीचा शुभयोग मंदिराच्या मूर्तीच काम गुरुपौर्णिमेला सुरू झालं. मूर्ती ज्या चित्रापासून बनली ते चित्र आणि मूर्तीचा चेहरा यात कमालीचा फरक आहे. सदर मूर्तीची निर्मिती  जयपूर येथे करण्यात आली . सादर मूर्तीस लागणारा दगड मिळता मिळेना अखेर श्रीपाद जन्मदिवस गणेश चतुर्थीला दगड मिळाला जो केवळ श्रीपादांचे  मूर्तीसाठी ५वर्षांपासून पडून  होता. आणि सध्याची अत्यंत नयनमनोहर श्रीपादांची मूर्ती तयार झाली .मंदिराला 3 मजले आहेत, चरणस्थळी संत / दत्तावतार परंपरा यांच्या कमालीच्या जिवंत मूर्ती आहेत. वर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि राजराजेश्र्वरी देवीची मूर्ती आहे. सगळ्यात वर दत्त मूर्ती असून मंदिरास कळस शिवलिंग आहे.

गुरुपौर्णिमेच्या पावन मुहुर्तास मंदिराचे काम सुरु झाले. पृथ्वीतलावर एकही नसेल अश्या दिव्य स्वरूपाच्या ह्या स्थानाची महिमा वर्णू तितकी कमी आहे. मंदिराचा साचा ३ मजल्यांचा आहे. पैकी जमिनीस दत्त अवतार, गुरु परंपरा, गुरुदत्त परंपरेच्या ९ अतिशय जिवंत मूर्ती आहेत, त्या अश्या,

१. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज.             
२. श्री स्वामी समर्थ महाराज.
३. श्री माणिक प्रभू महाराज.         
४. श्री बाळू मामा महाराज.           
५. श्री साईबाबा 
६. श्री गजानन महाराज.     
७. श्री राघवेंद्र स्वामी      
८. श्री रामकृष्ण परमहंस महाराज
९. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी.

पहिल्या मजल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची कुमार रूपातील दिव्यमंगल परंज्योती तेजपूर्ण मूर्ती आहे. हि मूर्ती इतकी जिवंत आहे, जणू स्वामीच स्वतः उभे आहेत. येथेच पंचधातूची श्रीपादांची मूर्ती आणि पादुका आहेत. पार्श्वभागी देवी राजराजेश्वरी ची मूर्ती आहे. प्रदक्षिणा करताना श्री बापनार्युलू आणि श्री अप्पळराजू नृसिंहराज शर्मा यांच्या मनमोहक मूर्ती आहेत.

दुसर्या माळ्यावर श्री गुरुदत्तात्रेय विराजमान आहेत. हे श्वान, धेनु संगे स्मितहास्य करीत त्रिमूर्ती आहेत. ओंकारात नटलेले शिवलिंग मंदिराच्या कळसस्थानी आहे. श्रीपादांच्या या स्थानात अग्निहोत्र सुद्धा आहे. इथे विविध प्रकारचे दोष, उदा. कालसर्पदोष, व्याधी, बाधा इ. चे निवारण केले जाते. श्री स्वामीजी आणि त्यांचे मंत्रोच्चार ऐकत हवनात आहुती देणे हि एक आगळीच अनुभूती असून अग्नीत अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभ, तसेच संपूर्ण गुरुदत्त परंपरा प्रगट होउन आशीर्वाद देतात. आज या स्थानात गोधन आहे.

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी

२४ हि संख्या गायत्री मंत्राचे निर्गुण (अग्नी) स्वरूप आहे. संतांच्या हृदयी परब्रम्ह वास्तव्य करतात, ९ हि संख्या परब्रम्ह सूचित करते. ८ हि संख्या मायेचे स्वरूप आहे. या संख्या ह्या स्थानी अश्याप्रकारे व्यक्त होतात. तसेच हे शिल्प मानवाच्या अध्यात्मिक प्रगतीचा महामेरू होय. पायाशी सर्व संतविभूती. हृदयात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असले कि पार्श्वभागातली कुंडलिनी जागृत होईल. हि राजराजेश्वरीच्या रुपात आहे. हि जागृत झाली कि त्रिगुणात्मक सृष्टीतून मनुष्य सच्चिदानंद शिवतत्वात प्रवेश करतो. हि मोक्ष अवस्था असून, या स्थानाचे आणखी एक महात्म्य आहे.

या संपूर्ण स्थानाची बांधणी दक्षिणी पद्धतीची असून, श्री स्वामीजींच्या कटाक्षाने पुरातन शास्त्रशुद्ध पद्धतीनी झालेली आहे. मंदिराच्या आवारात अंतर्वाहिनी नदी, (सरस्वती) श्रीपाद अंतर्वाहिनी प्रगटली असून, येथे व्याघ्रेश्वर शर्माने सुद्धा हजेरी लावलेली आहे. पंचमहाभूतांच्या आशीर्वादाने आणि श्रीपादांच्या अनंत कारुण्याने संपूर्ण भूमी अग्नीप्रमाणे जागृत झालेली आहे. अध्यात्मिक स्पंदनांनी युक्त अश्या स्थानात श्रीपादांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल. या स्थानी लीला घडत राहतील अशी श्रीचरणांची आज्ञाच जणू आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दत्तमिठाईचा भरपूर प्रसाद मिळत राहणार आहे.

उत्सव

या अतिमंगल स्थानात आनंद वाटप, अन्नदानयुक्त उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्री चा दिवस अति शुभमंगलप्रद आहे. या दिवशी श्रीपादाना समंत्रक, नामस्मरणयुक्त भक्तिभावाने अभिषेक, केला जातो. शिवनामाच्या आहुती सोडून विश्वकल्याणाचा संकल्प करून यज्ञ केला जातो. आनंदाच्या ह्या वातावरणात आरती आणि भजनात दंग भक्त नक्कीच देहभान विसरतो. पालखीची सेवा असताना, श्रीवल्लभांचे अलौकिक नृत्य भक्तांना अनुभवता येते.

राखीपोर्णीमेस या स्थानी अनंत आनंदाचा वर्षाव श्रीस्वामी करतात. शब्दात याचे वर्णन कठीण आहे. नेत्र दिपतील असे हे सुख आहे. श्रीपादांचे मुखकमल बघून शेकडो भक्तांचे हृदय कधी न संपणार्या आनंदाचे धनी होतात. याचा अनुभव मानव घेऊच शकणार नाही. यासाठी एकदा तरी या स्थानी राखीपोर्णिमेस यावेच यावे.

अक्षय तृतीयेस मंदिराच्या आवारात एक चमत्कार पहावयास मिळतो. उगवण्याच्या वेळी सुर्यभगवान आपल्या कोमल किरणांनी श्रीपादांच्या पूर्ण शरीरास अभिषेक करतात. हे दृश्य नयन मनोहारी आहे, तसेच शास्त्र सूक्ष्म आहे.

मार्गशीष पौर्णिमेस श्रीदत्त जन्माच्या संध्याकाळी संपूर्ण चंद्र श्रीपादांच्या भृकुटाच्या रेषेत असून, श्रींचे दर्शन जणू घेत आहे असे पहावयास मिळते. या काळात श्री गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यांचे पारायण अति आल्हाद दायक ठरते. भक्त अश्याप्रकारे आराधना करून श्रीपादांची कृपा अनुग्रह प्राप्त करू शकतात.

याशिवाय अतिआनंदात गुरुपोर्णिमा, दत्तजयंती, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, बाळू मामा जयंती इ. उत्सव येथे साजरे केले जातात.
जनमानसाची अथक सेवा करून श्री स्वामीजींनी शून्यातून हे स्थान निर्माण केले आहे. इतके विलक्षण कार्य करून, तन मन आणि धनानी सर्व शक्ती समर्पण करून स्वतःला फक्त एक सेवक म्हणविणारे स्वामीजी शुद्ध, धन्य, वंदनीय विभूती आहेत यात शंका नाही. महाराष्ट्रातील भक्तासाठी असे कार्य करून आज प्रचलित होत असलेल्या या स्थानात अजून काही काम शेष आहे. प्रकृती आणि काही इतर कारणास्तव श्री स्वामीजींना आज निधी गोळा करण्यास कष्ट पडत आहेत. श्रीपादांचे कार्य श्रीपाद करतीलच यात शंका नाही. स्वतःला सेवक म्हणवून गुरुस्वरूप या स्थानाची / श्री स्वामीजींची आर्थिक सहायता करण्यास तत्पर असणा-या भाविकांनी जरूर स्वामीजींना संपर्क करून तसे कळवावे. अनायासे, दर्शनास आवर्जून यावे आणि श्रीदत्तांचा प्रसाद घेवून धन्य व्हावे.

पोहचण्याचे मार्ग, संपर्क व पत्ता

येण्यापूर्वी अवश्य श्री स्वामीजींना संपर्क करून जावे. येथे जाताना सोवळे, धोतर सोबत न्यावे. पुरुषमंडळी अभिषेक, इ. गाभा-यातून करू शकतात. तसेच वस्त्र श्रीपादांसाठी नेल्यास आकर्षक पद्धतीने नेसविले जाते. 

पत्ता: गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड (गाळणे शिवार), गाळणेगाव, ता. मालेगाव जी. नाशिक, महाराष्ट्र.
जवळचे बस स्थानक: मालेगाव /धुळे
जवळचे रेल्वेस्टेशन: मनमाड जं.

पुणे/नासिक येथून बसने येणाऱ्या भक्तांनी मालेगाव मधील मोसमपूल सर्कलला उतरावे, येथून जवळच असलेल्या शिवाजी पुतळ्यापासून टिंगरी गावाचे रिक्षा, ऑटो मिळतात.
सकाळी ६;३०, ७:३० वाजता मालेगाव नवीन स्टेड पासून फलाट ९ वरून कुसुंबा रोड च्या बसेस आहेत. सकाळी ८:३० वाजता मालेगाव ते गाळणे बस असून हि मंदिरासमोरच थांबते. सकाळी ९:३० , संध्याकाळी ६ ला मालेगाव टे लुल्ल बस गाळणे फाटा येथे सोडेल,  येथून मंदिर अगदी जवळ आहे.

सादर तिर्थ क्षेत्री अनेक चमत्कार घडत आहेत. मंदिर परिसर पूर्णतया जागृत आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना येथील दर्शनाने पूर्ण झाल्याचे भक्त सांगतात. मंदिरात एक गोशाळा हि आहे. सादर मंदिराची बांधणी हि दक्षणी पद्धतीची आहे. परिसर अत्यंत अध्यात्मिक स्पंदनांनी भरलेला आहे. येथे संपर्क साधण्याचा फोन नो दिलेला आहे. ज्या कोणा भक्तांना सेवा रुजू करायची असेल त्यांनी स्वामीजी कडून बँक डिटेल्स घ्यावेत. दत्तभक्तानी श्रीपाद चरणी सेवा करून क्षेमकल्याणाची प्रार्थना करावी. स्वामीजी हेच सांगतात श्रीपाद श्रीवल्लभ हे कार्य फक्त माझ्या माध्यमातून करवून घेतात. हे सर्व श्रींचेच आहे.

जाण्या आधी सोबत धोतर/सोवळे न्यावे, गाभाऱ्यात सगळ्यांना अभिषेक/ पालखी सेवा करता येते. येथील श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती पाहून भक्तगण देहभान विसरतात. श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती पाहून भक्तगणांच्या डोळ्यातून प्रेम व श्रद्धेच्या अश्रुधारा वाहात राहतात व भक्त सर्व दुःख विसरून जातो हे मात्र नक्कीच. आपणही याचा अनुभव घ्यावा हि विनंती.

श्री स्वामी त्रिशक्ती
(०७७९८७३९१०९,८००७९७३७९९)