श्री निरंजन रघुनाथ, मूळ नाव अवधूत

मूळ नाव: अवधूत
जन्म: कार्तिक शु.॥ ८, इ.स.१७८२, धारूर गाव कळंब दक्षिण हैद्राबाद
आई/वडिल: श्रीधरपंत श्रोत्री
कार्यकाळ: १७८२-१८५५
गुरु: रघुनाथ भटजी नाशिककर (अद्वैतेश्वर)
निर्वाण: १८५५

देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगाच्या तुटी ।
सर्व अर्पावे शेवटीं । प्राण तोही वेचावा ॥

या श्रीसमर्थ रामदासांच्या वचनाप्रमाणे श्रीदत्त दर्शना प्रीत्यर्थ घरादाराचा प्रत्यक्ष त्याग करून, दत्तदर्शनार्थ आपला प्राणही अर्पण करण्यास जे तयार झाले, ते हे सत्पुरुष म्हणजेच ‘नाशिकचे श्रीरघुनाथभटजी ऊर्फ अद्वैतेश्वर’ यांचे शिष्य निरंजनस्वामी होत. यांचे चरित्र अत्यंत मननीय आहे. परमेश्वरदर्शन म्हणजे सहज प्राप्त होणारी गोष्ट नाही. एक वेळ आत्मानात्मविवेक प्राप्त होऊन ब्रह्मज्ञानही होईल; परंतु सगुणदर्शन दुर्लभ आहे; ते सुलभ नाही. ते नुसत्या ज्ञानाने, दानाने, श्रुतीच्या अभ्यासाने वा यज्ञाने प्राप्त होणार नाही.

ज्याच्या अंतरात पराकोटीची भक्ती असेल, तीव्रतम तळमळ असेल, त्यासच सगुणदर्शनाचा लाभ होतो. सगुणदर्शन होण्यासाठी रात्रंदिवस सावधानता, अखंड साक्षेप, एवढेच नव्हे तर स्वत:चा प्राणही अर्पण करण्याची तयारी पाहिजे. ज्याप्रमाणे खरा वीर हातावर शीर घेऊनच लढण्यास जातो, त्याप्रमाणे खरा भक्त देहाची पर्वा न करता प्राणार्पण करण्यास सिद्ध होत असतो. तो मरण्यास भीत नाही. तो खरा मृत्युंजय असतो. 

घरादाराचा त्याग करून केवळ ईश्वरा प्रीत्यर्थ वनवास पत्करून जिवावर उदार होणारे समर्थ श्रीरामदासांसारखे किंवा श्रीतुकाराममहाराजांसारखे भगवद्भक्त क्वचित् असतात. ‘ऐसे भक्त बहुवस नाहीं.’ अशा भगवद्भक्तांपैकीच प्रस्तुतचे सत्पुरुष श्रीनिरंजनस्वामी होत. त्यांनी श्रीदत्तदर्शन होण्यासाठी कशी खडतर साधना केली हे पहा – 

निरंजनस्वामींचा जन्म कार्तिक शु ॥ ८ स. शके १७०४ साली दक्षिण हैद्राबादकडे ता. धारूर गाव कळंब येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधरपंत असून आडनाव श्रोत्री होते. निरंजनस्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव ‘अवधूत’ होते. नाशिकचे सुप्रसिद्ध सिद्धपुरुष श्रीरघुनाथभटजी (ऊर्फ अद्वैतेश्वर) हे त्यांचे सद्गुरू होत व त्यांनीच त्यांचे नाव ‘निरंजन’ असे ठेविले. 

नाशिक येथे ‘व्हिक्टोरिया’ पुलाजवळ गोदातटाच्या दक्षिणतीरावर श्रीरघुनाथभटजी यांची जिवंत समाधी आहे. याच समाधीवर ‘अद्वैतेश्वर’ नावाच्या सुंदर शिवलिंगाची स्थापना केलेली असून मंदिर छोटेसेच पण फार सुंदर बांधले आहे. श्रीअद्वैतेश्वर हे जागृत दैवत असून येथील काही सद्भक्तांस त्यांचा साक्षात्कार झालेला आहे. 

निरंजनांची लहानपणापासून वृत्ती भावनामय अशी होती. त्यांचे शिक्षण बेताचेच झाले होते. घरची गरीबी होती. त्यांनी काही दिवस खाजगी नोकरी केली व नंतर त्यांचे मन संसाराची नश्वरता पटून घरादाराविषयी विटले व साक्षात् श्रीदत्तंप्रभूंचे सगुणदर्शन केव्हा व कसे होईल हा एकच ध्यास त्यांना लागला. नंतर त्यांनी कळंब गावाहून कोणास न कळत प्रयाण केले; ते देहू गावी आले. तेथे आल्यावर त्यांच्या डोळ्यांपुढे श्रीतुकारामचरित्र उभे राहिले. श्रीतुकाराममहाराजांस सगुणदर्शन कसे झाले? तसेच आपणासही झाले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. 

श्रीदत्तदर्शनोत्सुकता अधिकच वाढली व एके दिवशी म्हणजे भाद्रपद व॥ ४ शके १७३३ रोजी इंद्रायणीचे पाणी हातात घेऊन प्रतिज्ञा केली की, ‘आजपासून एक वर्ष सात दिवसांत श्रीदत्तांचे सगुणदर्शन न झाल्यास मी प्राणत्याग करीन.’ अशी घोर प्रतिज्ञा करून श्रीदत्तप्रभूंचे नामस्मरण करीत करीत त्यांनी देहू गाव सोडले. पुढे दरकूच दरमजल करीत ते नाशकास आले.

नाशिक येथे आल्यावर त्यांची व रघुनाथभटजींची गाठ झाली. ‘दर्शनें प्रशस्तीसी ठावो’ या श्रीज्ञानेश्वरांच्या वचनाप्रमाणे, श्रीरघुनाथभटजींस पाहताच निरंजनांच्या मनात प्रसन्नता उत्पन्न झाली. त्यांस अशी खात्री वाटली की, माझे आध्यात्मिक समाधान येथेच होईल. निरंजनांचे तीव्र मुमुक्षुत्व व विरक्ती पाहून श्रीरघुनाथ भटजींस परम संतोष वाटला व त्यांनी शके १७३३ कार्तिक व॥ ३० रात्री निरंजनास निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार करून दिला. तेव्हापासून निरंजनास कवित्वाची स्फूर्ती झाली व पाचसहा अभंग त्यांनी त्या वेळी करून सद्गुरुचरणी अर्पण केले.

श्रीरघुनाथभटजींच्या कृपादृष्टीने व संगतीने आत्मस्वरूपज्ञानविषयीचा यत्किंचितही संशय निरंजनांच्या चित्तात उरला नव्हता. परंतु श्रीदत्ताच्या सगुणदर्शनाची जी तीव्र इच्छा ती मात्र पुरी झाली नव्हती; म्हणून त्यांनी श्रीरघुनाथभटजींस विचारले की, ‘महाराज ! मला श्रीदत्तांचे सगुणदर्शन कधी व कसे होईल ? मी तर अशी प्रतिज्ञा केली आहे की, अमुक मुदतीत दर्शन न झाल्यास प्राणत्याग करीन. माझी प्रतिज्ञापूर्ती होणार ना?’ तेव्हा महाराजांनी निरंजनास गिरनार पर्वतावर जाण्यास आज्ञा केली व तेथे दर्शन होईल असे सांगितले. तसेच श्रीदत्तात्रेयांच्या षट्भुज सुंदर मूर्तीचे ध्यान रात्रंदिवस करण्यास सांगितले.

अंतरीं चिंतोनिया ध्यान । मुखीं कीजें नामस्मरण ।
विषयभोगावेगळें मन । व्रतस्थपणें ठेवावें ॥

गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून व त्यांचा उपदेश चित्तात ठेवून, निरंजनस्वामी प्रथम त्र्यंबकेश्वरी आले. तेथे देवाचे दर्शन घेऊन काही दिवस तेथे राहून ते कोकणात उतरले. रानावनातून काट्याकुट्यातून मार्ग काढीत श्रीदत्तांवर पूर्ण श्रद्धा ठेवून सर्व प्रकारचे कष्ट सोशीत गुजराथेतील धर्मपुर नावाच्या गावी येऊन पोहोचले. तेथून मग ते सुरतेस गेले. तेथून ते भीमनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन गिरनारपर्वताजवळ येऊन पोहोचले.

केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास बराच अवकाश आहे असे जाणून त्यांनी त्या गिरनारपर्वतास प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रतिज्ञापूर्तीस तीन दिवसांचा अवधी ठेवून ते गिरनारपर्वत चढावयास लागले. ‘दिगंबरा ! ये रे दयाळा ! मला भेट दे रे दत्ता ॥’ हे भजन म्हणत पर्वत चढू लागले. श्रीदत्तदर्शन अजून झाले नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटावे; काही वेळ स्तब्ध उभे राहून ‘श्रीदत्त ! श्रीदत्त !’ या नामाने मोठ्याने धावा करून रडावे ! हे तीन दिवस म्हणजे तीन युगांप्रमाणे त्यांस वाटले.

शके १७३४ च्या भाद्रपद व॥ ८ स निरंजनस्वामी श्रीदत्त देवाच्या पादुकांप्रत जाऊन पोहोचले. पादुकांस सप्रेम साष्टांग नमस्कार करून निरंजनाने प्रेमाश्रूंचे त्यास स्नान घातले व ते म्हणाले, ‘दत्ता ! प्रतिज्ञापूर्तीस आता फक्त तीनच रात्री राहिल्या ! महाराज, ठरलेल्या मुदतीत जर आपले दर्शन झाले नाही तर हा दास या पादुकांच्या पुढे मस्तक आपटून प्राण देणार ! तरी दयाळा ! कृपा करून दर्शन द्यावे !’ अशी श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकून त्या पादुकांसमोर धरणे धरून ते बसले.

भगवद्दर्शनार्थ धरणे धरून बसणे ही सामान्य गोष्ट नाही. ज्ञानेश्वर महाराज लिहितात की, ‘धरणें धरूनि बैसे, ऐसा कैं जोडे?’ श्रीतुकाराममहाराजांनी धरणे धरले म्हणून त्यांस पांडुरंगाचे दर्शन झाले व बुडविलेल्या सर्व वह्या त्यांस परत मिळाल्या. धरणे धरून बसण्यास मनाची फार तयारी लागते. पराकाष्ठेची उत्कंठा व तीव्र तळमळ असेल तरच या गोष्टी घडून येतात. दर्शनाची तीव्रतम तळमळ हीच खरी महत्त्वाची साधना आहे.

निरंजनस्वामींनी याप्रमाणे धरणे घेतल्यावर पहिल्या रात्री सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळे स्वामींची दातखीळ बसली व त्यांस मूर्च्छा आली. मूर्च्छेत एक सुवासिनी आली व तिने त्यांना एक मूठभर खिचडी दिली. जागे होऊन पाहतात तो तेथे कोणी नाही. पुन्हा त्यांनी दत्तनामस्मरण सुरू केले. दुसऱ्या रात्री त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात एक पिवळे वस्त्र व एक रूमाल मिळाला. जागे होऊन पाहतात तो स्वप्नात मिळालेली वस्त्रे आपणांपाशी खरोखरीच असल्याचे दिसले. दोन दिवस झाले, अजून दर्शन नाही; म्हणून स्वामी फारच खिन्न झाले. पुन्हा सप्रेम दत्तभजन सुरू केले. नंतर तिसऱ्या रात्री स्वप्नात एक ब्राह्मण आला. त्याने स्वामींस एक खडावांचा जोड दिला व येथून जा असे सांगितले. जागे होऊन पाहतात तो खडावांचा जोड दिसला. पण दर्शन नाही. तिन्ही रात्री निघून गेल्या; प्रतिज्ञेची मुदत संपली असे पाहताच निरंजन स्वामी हताश झाले.

जवळच एक मोठा दगड पडला होता, तो जवळ घेतला व त्या दगडावर, श्रीदत्तपादुकांसमोर नारळासारखे ताडकन् आपले कपाळ आपटले. पहिला प्रयत्न चांगला साधला नाही. म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा जोराने मस्तक आपटले. त्याबरोबर मस्तक छिन्नविछिन्न झाले व स्वामी तेथेच बेशुद्ध होऊन पडले. ते बेशुद्ध अवस्थेत असतानाच, आपल्या तोंडात कोणीतरी कमंडलूने पाणी घालीत आहे, असा त्यांस भास झाला आणि ते सावध होऊन पाहतात तो आपणापुढे साक्षात् श्रीदत्तमहाराज सगुणरूपाने उभे आहेत असे दिसून आले. श्रीदत्तगुरूंनी स्वामींच्या मस्तकावरून आपल्या अमृतकराचा स्पर्श करता फुटलेले मस्तक जोडले गेले. निरंजनाकडे श्रीदत्तांनी कृपादृष्टीने अवलोकन केले व सांगितले की, ‘नाशिकचे रघुनाथभटजी व मी दोन नाही; त्यांनी जो बोध केला त्याचे मनन कर.’ याप्रमाणे बोलून श्रीदत्त अंतर्धान पावले.

झाले ! श्रीनिरंजनस्वामींच्या खडतर साधनेचे सार्थक झाले ! त्यांच्या चित्तास अवर्णनीय असे परम समाधान झाले. प्रतिज्ञेप्रमाणे श्रीदत्तगुरूंचा सगुणसाक्षात्कार झाला. ‘याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा !’ या श्रीतुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे, निरंजनस्वामींस हा जो सगुणसाक्षात्कार झाला, त्याची प्रत्यक्ष खूण म्हणून स्वामींच्या कपाळावर भुवयांपासून केसापर्यंत एक व्रण अखेरपर्यंत राहिला होता. 

निरंजनस्वामींनी स्वत:च ‘आत्म-प्रचीति’ व ‘साक्षात्कार’ अशी दोन प्रकरणे ओवीबद्ध, रसाळ व उद्बोधक अशी लिहिली आहेत. त्यावरूनच वरील चरित्रकथा लिहिली आहे. त्यांची काही पदे येथे दिली आहेत. 

(१)   दिगंबरा स्वामि अगा दयाघना ।
        येऊ दे करुणा अनाथाची ॥१॥
        मायामोहजाल टाकावे छेदून ।
        करावें धावणें दीनबंधू ॥२॥ 
        अनाथासि आम्हां तुजवीण आतां ।
        कोण आहे त्राता सर्वांपरी ॥३॥
        निरंजन म्हणे देई आतां भेटी ।
        नको करूं कष्टी देवराया ॥४॥

(२)  येई येई दत्तात्रया ।
        माझ्या कीर्तनाच्या ठाया ॥१॥
        रंगदेवता आमुची ।
        तूंची सर्वांपरी साची ॥२॥
        गावे तुझे कीर्तिगुण ।
        ऐसें इच्छी माझें मन ॥३॥
        निरंजन म्हणे देवा ।
        घेई आतां माझी सेवा ॥४॥

(३)  दत्तात्रया चतुराक्षरि मंत्र वाचें उच्चारा ।
        निशिदिनिं ह्र्दयी ध्यातां चुकवी जन्ममरणफेरा ॥धृ.॥
        दशादिशांप्रति अगमन ज्याचे एकट निर्द्वंद्व ।
        दश-अवतारा वरुते विष्णुस्वरूपाचा कंद ।
        दत्तचित्त ज्या ह्र्दयीं ध्याता करि ब्रह्मानंद ॥१॥
        तापसियांचा तापशमन जो सर्वांचा त्राता ।
        तरितसे भवसागरिं जडमूढ नाम वदनिं गातां ।
        तांतडिनें उडि घालित ज्यापरि बाळकासि माता ॥२॥
        त्रै देवांचें स्वरूप तें हे जाणें एकत्र ।
        त्रैलोक्याचा चालक म्हणवी अत्रीचा पुत्र ।
        त्रैअवस्था स्वरूप प्रगटवी जेवि का भिन्न ॥३॥
        एकचि स्वरूप सर्वान्तरिं तो आहे अद्वय । 
        यशकीर्ति तुम्ही गा रे त्याची होउनि तन्मय ।
        यमाचे भय नाहीं निरंजन जाला निर्भय ॥४॥