श्री नानामहाराज तराणेकर (सन १८९६-१९९३)

दत्तावतारी नाना महाराज तराणेकर
दत्तावतारी नाना महाराज तराणेकर 

जन्म: मध्यप्रदेशात तराणे गावी वासुदेव भटजी जोशी यांचे कुळात
कार्यकाळ: १८९३-१९९३
विवाह: १९१४ 
गुरु: प.पू.गुळवणी महाराजांचा प्रभाव. गुरुमंत्र वासुदेवानंद सरस्वती
निर्वाण: १९९३

इंदूर, उज्जैन येथे दत्तावतारी नाना महाराज तराणेकर यांचे वास्तव्य असल्यामुळे यांचा शिष्यपरिवार तिकडे मोठा आहे. मध्यप्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदरा या गावी होते. वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात तराणेकरांचा जन्म झाला. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. गुरुचरित्राचे सप्ताह लहानपणीच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले. या मार्तंडाची दत्तप्रभूंवर मोठी निष्ठा होती.

‘हा मार्तंडनामे पुन्हा । श्रीएकनाथांचा अवतार म्हणा । हृदयी रमता दत्तराणा । आवडीने जयाचिया ।’ असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.

सन १९१४ मध्ये इंदूरचे शंकरराव डाकवाले यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु संसार नीटपणे झाला नाही. पत्नीचे निधन झाल्यावर तराणेकर यांनी काशीची यात्रा केली. मथुरा, शेगाव इत्यादी तीर्थयात्रा केल्या. हे बद्रिकेदारला गेले होते. अनेक योगी लोकांची, सत्पुरुषांची यांनी दर्शने घेतली. त्यांच्यावर गुळवणीमहाराजांचा प्रभाव मोठा होता. तराणेकर यांनी अनेक ठिकाणी यज्ञ केले. यांचे वास्तव्य उत्तरार्धात इंदूर येथे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परिवाराची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ आणि जप यांचे विकसित रूप आहे. त्यांच्या परिवाराने या मार्गांची जोपासना केली आहे. प्रासादिकमंत्र, स्तोत्र व प्रार्थना यांना महत्त्व आहे.

श्री नानामहाराज तराणेकर
"भक्ति और भजन मिश्री का कंद है, चक्खे सो याद रक्खे, आता आनंद है" श्री नानामहाराज तराणेकर

प. पू. नाना महाराज तराणेकर यांचे गुरूप्रेम व त्यांची अलौकिक दत्त भक्ती

परम पूज्य नाना महाराजा यांच्या घराण्यात दत्तभक्तीची उत्कटधारा तशी पिढ्यानपिढ्यापासून. असे म्हणतात की सद्गुरू भूमीवर  अवतरण्यासाठी ८० पिढयांचे दत्त भक्तीचे पुण्य हवे. हे पुण्य परम  सद्गुरुंच्या पुनर्जन्माच्या माध्यमातून प्रगत होत असते. 
बालवयातच प. पू. नानांना दत्तसाधनेची इच्छा व ओढ वाटू लागली. घराजवळच श्रीदत्तप्रभूंचे मंदिर असल्यामुळे श्रीदत्तप्रभूंचं श्रीगुरु म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये ठेवून जप जाप व श्रीदत्तप्रभूंचे स्मरण नित्य अविरत होऊ लागले. एवढ्या बालवयातच श्रीदत्तप्रभुंच्या भेटी साठी काहीही करण्याची प.पू नानांच्या साधना परिश्रम पाहून घरामधील वडीलधारी मंडळी आश्चर्यचकित होत असत व प. पू. नानाचे अतीव श्रीदत्तप्रभूंप्रेम सगळ्यांना भारावून टाकत असे.
 
आता प. पू. नानांना गुरुमंत्र घ्यावासा वाटू लागला. पिताश्रीकडे त्याबाबत विचारणा केली असता "मी तुमचा गुरु नाही. तुमचे गुरु वेगळे असून ते योग्य वेळी दर्शन देतील" असे म्हणून पिताश्रींकडून भक्तीभावाने आशीर्वाद संपादन केला. गुरुमंत्रासाठी दत्तभक्तांसाठी परमपावन असे श्रीगुरुचरित्राचे पारायण करूया असे प. पू. नानांचे मन ओढ घेऊ लागले. नेहमीप्रमाणे सकाळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करून संध्याकाळी मोजकाच आहार सुरु केला. पारायण संपताक्षणी आता तरी श्रीगुरु गुरुमंत्रासाठी दर्शन देतील असे मनीच वाटत राहिले. परंतु श्रीगुरूंचे दर्शन अजून झाले कसे नाही, म्हणून पुनच; दुसऱ्या दिवसापासून श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्यास प्रारंभ केली. यावेळी पण श्रीगुरूंचे दर्शन झाले नाही. प. पू. नानांची भक्ती अलौकिक त्यामुळे हिरमोड न होऊ देता परत तिसरे पारायण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपला आहार फक्त दुग्धपानावर मर्यादित ठेवला. अजून श्रीगुरुभेटीची वेळ येत नव्हती. पुढे त्यांनी पाचवे व सहावे पारायण केवळ एकवेळ दुग्ध पान करून केले. तरी पण गुरुमंत्राची वेळ आली नाही. प.पू नानांनी आता मनाचा हिय्या केला कि काहीही अन्न व पेय भक्षण न करता पारायण करायचे. सलग सात दिवस पोटात अन्नग्रहण नसल्याने थोडेसे क्षीणत्व आले पण श्रीगुरुभक्तीपुढे ते सारे गौण ठरले.  आज श्रीगुरुचरित्राच्या सातव्या परायणाचा शेवटचा दिवस. शेवटचा अध्याय वाचून झाला. प. पू. नाना "आता तरी श्रीगुरु या" अशी आर्त गुरुविनवणी करू लागले. आणि श्रीगुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वायूवेगाने प. पू. नानांच्या उत्कट भक्तीपुढे दर्शनांकित झाले. प.पू नानांची अवस्था त्याक्षणी काय सांगावी? प. पू. नानांच्या डोळ्यात आनंदाश्रू बरसत होते व त्याही भेटीत प.पू नानां श्रीगुरूंना म्हणाले "क्षमस्व गुरुदेव!! आपणास माझ्यामुळे इथंपर्यंत यायचा त्रास झाला". त्यावर श्रीगुरूं उदगारिलें "बाळा किती कष्ट घेतोस". श्रीगुरुंची चरणभेट झाल्यावर प. पू. नानांनी दत्तभक्तीचा प्रसार करावा असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला. श्रीगुरुनी पुढे होऊन प. पू. नानांच्या कानात गुरुमंत्र अनुग्रहित केला. त्या क्षणाला  प.पू नानांना समाधीचा अनुभव लाभला. श्रीगुरु साक्षात श्रीदत्तप्रभूंचं. श्रीगुरूंना पण आनंद झाला असेल, अशी श्रीदत्तप्रभूंची भक्ती निग्रहपूर्वक करणारा भक्त प. पू. नानांच्या स्वरूपात शिष्य म्हणून लाभला. परमपूज्य नाना महाराजाचे स्मरण करताना प. पू. नाना महाराजांची भक्ती श्रीगुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या भेटीसाठी किती ओतप्रेत हृदयामध्ये भरलेली होती हे दिसते.

दत्तावतारी नाना महाराज तराणेकर
दत्तावतारी नाना महाराज तराणेकर

प. पू. नानां महाराजानी दत्तभक्तीचा प्रसार करताना धार्मिक स्थळांना भेटी देऊन दिव्य अनुभव घेतले. सिद्धीही प्राप्त झाल्या त्या त्यांनी दीनदुबळ्या भक्तासाठी आचरणात आणल्या. प. पू. नानांमहाराजाच्या दिव्य अनुभवाचे अवलोकन करताना रोमांच उभे राहतात. प. पू. नानांमहाराजानी हिमालयात सूक्ष्म रूपाने भ्रमण करून महाभारत काळामधील श्रीहरीच्या साक्षीने श्रीगीतेचे अनुग्रहण संपादित करणारे दिव्य योगीमहात्मा, यांच्याकडून श्रीगीतेचे ज्ञान संस्कारित केले. नर्मदापरिक्रमा करताना कष्टमय प्रवासाने व अन्ननिग्रह असल्याने प. पू. नानांमहाराजाना थोडेसे थकल्यासारखे वाटले व वृक्षाखाली विश्रांती करत असताना नर्मदामैयाने सुवर्णअलंकारीत स्त्रीचे रूप घेउंन प. पू. नानांना दुग्धघटिका अर्पण केली. एके ठिकाणी राम मंदिरात दर्शन केल्यावर तेथील अर्चकाने  प. पू. नानांना आग्रहाची विनंती केली केली की रात्री येथेच मुक्काम करावा. त्या रात्री प. पू. नानांमहाराजानी जे अनुभवले ते अद्भुत होते. राम लक्ष्मण यांच्या मूर्तीतून दोन तेजस्वी दिव्यमूर्ती बाहेर आल्या व दोघे ब्रज भाषेत संवाद करत खेळ खेळू लागले. प. पू. नानांमहाराजाना गिरनारी श्रीअवधूत दर्शन, नाथ दर्शन, मथुरेत श्रीकृष्ण दर्शन व अनेक देवतांचे दिव्य दर्शन होउंन श्रीगुरुंची प्रीती अनुभवली. शेवटी श्रीगुरुभक्तीसाठी मननिग्रह हेच प्रमुख साधन आहे व अध्यात्मिक वाटचालीत श्रीगुरुंची करुणात्रिपदी व श्रीगुरूंचा जप हेच नित्य आचरणात असले पाहिजे, तीच  मुख्य साधना पद्धती आहेत हा प.  पू. नानांमहाराजाचा आग्रह आहे! स्थूलदेह जरी नसला तरी सूक्ष्म देहामध्ये आज प. पू. नानांमहाराज भक्तासाठीं कार्यरत आहेत, दत्तभक्तांना साधनेसाठी आपले मार्गदर्शन देण्यासाठी अधीर आहेत, या कलियुगात श्रीगुरूंमुळेच दत्तभक्तच तारून जाणार आहेत. 

शेवटी एवढेच श्रीदत्तमहाराजांची आवडीची ओळ गुणगुणावीशी वाटते, "भजा भजा हो श्रीगुरूंसी".

मध्यप्रदेशातील 'इंदौर'चे महान योगी सद्गुरू श्री नानामहाराज तराणेकर यांच्या साधकावस्थेतील ही कथा;

 नाना महाराज तराणेकर
.

श्री नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायणसाधना करून 'परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामीं'कडून गुरूमंत्राची दिक्षा मिळवली. त्यानंतर अखंड गुरूमंत्राच्या जपाने  ते तेजःपुंज बनले. श्री टेंब्ये स्वामींकडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा घेऊन त्यांनी परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत त्यांना देवदेवतांची अनेक दिव्य दर्शने घडली. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण आरंभले. बद्रीनाथ, केदारनाथ येथे श्री शिवदर्शन घेतल्यावर त्यांनी नगराज हिमालयात जाण्याचे ठरवले. हिमालयाची यात्रा करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले. त्यातीलच हा एक अनुभव;

नानामहाराज हिमालयात भ्रमंती करत असताना एके दिवशी एका ठिकाणी त्यांना एक गुहा दिसली. गुहेत थोडा विश्राम करावा या हेतुने ते गुहेजवळ गेले. परंतू जवळ जाताच गुहेच्या मुखाशी त्यांना दोन वाघ दिसले. वाघ नानामहाराजांना पहाताच गुरगुरू लागले. परंतू त्याच गुहेत आत मध्ये एक सात - आठ फुट उंच, गोरेपान, तेजस्वी योगी समाधी लावून बसले होते. या योग्याने त्या दोन्ही वाघांना, नानामहाराजांना आतमध्ये येऊ देण्याची आज्ञा केली. तसे ते वाघ एकदम शांत झाले. योग्याने  नानामहाराजांना जवळ बोलावले. महाराज आत गेले. योगी व महाराज यांच्यात बरेच बोलणे झाले. योग्याने महाराजांना योगसाधनेतील अनेक गोष्टी सांगितल्या. योगाचे अनेक प्रकारही शिकवले. त्याचबरोबर, आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचे व साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिक्षा देऊन योगसाधनेचा आदेश दिल्याचे सांगितले. नंतर योग्याने महाराजांना पुढील प्रवासाबद्दल विचारले. महाराजांनी आपल्याला गंगातटी गंगा नदीचे दर्शन घ्यायला जायचे असल्याबद्दल सांगितले. तेव्हा योग्याने त्यांना आपले (म्हणजे त्या योग्याचे) पाय पकडून डोळे घट्ट मिटून घेण्यास सांगितले. "मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नको अन्यथा कोठेतरी मधेच पर्वतांमध्ये पडशील" असे सांगितले. त्याप्रमाणे श्री नाना महाराजांनी त्या योग्याचे पाय पकडले व डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षणांनी योग्याने डोळे उघडण्यास सांगितले, त्याप्रमाणे महाराजांनी डोळे उघडताच ते गंगा नदीच्या घाटावर उभे होते. योगी त्यांना तिथे सोडून केव्हाच अदृष्य झाले होते. 

श्री समर्थ नाना महाराज
श्री समर्थ नाना महाराज

आजही नगराज हिमालयात असे अनेक योगी महात्मे हजारो वर्षांपासून समाधी अवस्थेत आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही म्हणून ते नाहीतच असे म्हणणे कितपत योग्य? राग, प्रेम, अहंकार या भावनादेखील प्रयोगशाळेत सिद्ध केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व आपण नाकारतो का? या गोष्टीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. 

प. पू. नाना महाराज सांगतात, भक्ती कशी करावी?

तुमची भक्ती ही ज्ञान यक्त असावी. ज्ञानाने अनुभव व माहिती यातील फरक समजतो.भक्ती आपण कोणाची व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करतांना त्यात असणारे शब्द व वाक्य याचा अर्थ समजून, जाणून भक्ती करावी. फक्त ज्ञानयुक्त भक्तीने शिष्य गुरूंची योग्यता समजू शकतो.

मनुष्य देवाची भक्ति करतो पण देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. भक्ति मनापासून करतो पण देवा माझी सर्व इच्छा पूर्ण कर ही मागणी देवाजवळ करतो. काही वेळेला देवाने त्यांची इच्छा पूर्ण केलि नाही तर देवाचे करुणे सोडून देतो. त्याच्याकडे ढुंकूनहि पाहतहि नाही. अशी मनुष्याची मानसिकता आहे. देवाची भक्ति म्हणजे आपल्यातील वाइट गुणांचा त्याग होवून मनुष्याने चांगले कर्म करून जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी देवाची भक्ति करायची असते. म्हणजे देवाची भक्ति करीत असतांना मनुष्याच्या वासना निघुन गेल्या पाहिजेत. कारण मनुष्याचे दुःखाचे मूळ कारण म्हणजे वासना आहेत. मनाचे सतत लाड पूरविणे व् त्यासाठी कोणाचाहि घात करायला मागे पुढे न पाहणे. त्या वासनांचा त्याग होण्यासाठी भक्ति करायची असते. पण भक्ति करून मनुष्य काही वेळेला देवांवर विश्वास ठेवत नाही. त्याचा त्याच्यावरच विश्ववास नसतो. मग देवांवर विश्वास का ठेवेल. प्रथम देवाजवळ काहीही मागु नये. कारण तुम्ही जे काही मागाल ते देव पूर्ण करतो. त्यामुळे तुमच्या भक्तिचि पुण्याई कमी होते. तर भक्ति ही निष्काम भावनेचि पाहिजे. आपन जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजी घेतो व् पैसे देतो. त्यातच आपला व्यवहार पूर्ण होतो मग आपल्याजवळ त्या माणसाचे काहीही घेणे उरत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने भक्ति करीत असतांना देवा जवळ काही मागितले की देव त्याला सर्व देतो पण स्वता देव त्याच्या जवळ राहत नाही. तर देवाला मिळविण्यासाठी त्याच्या कडून काहीही मागु नका. प्रथम त्याच्यावर विश्वास ठेवा की तू मला संकटात मदत करणार. म्हणजेच प्रत्येक संकटात मला ध्यैर्य देणार. मला संकट जिंकायला मदत करणार. म्हणजे मला जिद्द आत्मविश्ववास देणार. ह्यावर विश्वास ठेवावा. देव स्वता तुम्हाला कधीही भेटनार नाही पण तुम्हाला जगण्यासाठी बल, कौशल्य, आत्मविश्वास, जिंकन्याची जिद्द मात्र देइल. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचे कर्म त्याला अर्पण करा. त्याच्या जवळ काहीही न मागता देवा तुझे नाम सतत माझ्या मुखात राहु दे हे मागा. कारण जेव्हा आपण देवा तुझे नाम मुखात राहु दे अस मागतो तेव्हा आपण देवाच्या ह्रदयाला मागतो त्याचे अस्तित्व मागतो. मग का नाही आपल्या भक्तिला भूलून तो आपल्याला मदत करणार. त्यासाठी निष्काम भावनेचि भक्ति करा. त्याला प्रेम द्या मग पहा तुम्ही त्याला सोडले तरी तो तुम्हाला सोडणार नाही व् मनात एकच भावना ठेवा की तुझे अस्तित्व आहे व् मला तू प्रत्येक संकटांना मदत करणारच अशी भावना ठेवा. मनुष्याने नुसती भक्ति केलि व् काहीही काम केले नाही व् मनात एकच आशा ठेवली की देव सर्व करेल माझे व् प्रयत्न केले नाही तर त्या वेळेस देव मदतीला येणार नाही. तर देवाचे नामाचि भक्ति करा व् कष्ट करा. स्वतावर विश्वास व् देवांवर विश्वास ठेवा. देव नक्कीच तुम्हाला कोणत्याही रुपात भेटेल व् आपल्या प्रारब्धयाचे भोग तो कमी करेल. जीवनात आनंद आंनद देइल पण त्यासाठी फक्त विश्वास हां तिहेरि शब्द मनात पाहिजे. कारण विश्वास ह्या शब्दात त्याच्या विषयि प्रेम व त्याचे अस्तित्व आहे.

nana maharaj taraanekar
परम पुज्य सदगुरु श्री नाना महाराज तराणेकर यांचे जन्म स्थान गुरू मंदीर श्री क्षेत्र तराणा जिल्हा उज्जैन म.प्र. 

नाना महाराजांच्या तीर्थयात्रा

साधनेच्या काळातील प्रत्येक यात्रा श्रीनानांनी(प.पू.श्री नानामहाराज तरानेकर) सद्गुरू-आज्ञेनुसारच केल्या. नाना एकटेच तीर्थयात्रांना निघत. प्रत्येक यात्रेत गुरूमंत्राचा अखंड जप हीच खरी नानांची सोबत असायची. प. पू. नानांनी सद्गुरूला आळवित प्रत्येक तीर्थस्थानात तेथील तीर्थराजाचे दर्शनसुख प्राप्त करून घेतले. तीर्थयात्रेत सद्गुरूंनी नानांना रम्य, अद्भुत असे अनुभव देऊन सुखविले. नाना सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन गिरनार येथील श्रीदत्तस्थानाचे दर्शन घ्यायला गेले.

गिरनार हे गुजरात प्रांतातील, जुनागढ संस्थानातील, उंच पर्वतावरील दत्ताचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. पर्वताच्या माथ्यावर श्रीदत्तांचे स्थान आहे. नानांनी उंच पर्वत चढून श्रीगुरुदत्तांचे दर्शन घेतले. परंतु गिरनार पर्वताशेजारीच एक दुर्गम असे स्थळ होते. त्या दुर्गम स्थळाचे रहस्य असे होते की प्रत्यक्ष नवनाथांची सगळी साधना त्या स्थळी झाली होती. असे ते अद्भुत ठिकाण होते. नानांना ते बघायची इच्छा होती.  

नवनाथांचे साधनास्थान हे स्थळही गिरनार पर्वताप्रमाणे, उंच पर्वताचे असेच ठिकाण होते. नानांनी पायथ्याजवळ वस्तीला राहत असलेल्या व्यक्तींना ‘तेथे जाण्याचा मार्ग कोणता आहे व कसे जावयाचे’ याबद्दल विचारणा केली. परंतु सगळयांनी नानांना सांगितले की, ‘आम्ही ऐकले आहे की नवनाथांची साधना याच स्थळी घडली आहे. कोणाला मात्र जाताना आम्ही पाहिले नाही. पर्वताच्या माथ्यावर जायला विशिष्ट असा मार्ग नाही. जाण्याची वाट अतिशय बिकट आहे. निर्मनुष्य भाग आहे. शिवाय आत जातांना जंगली प्राण्यांची भीती आहे. कोणी उच्च साधकच आजपर्यंत गेले आहेत असे ऐकीवात आहे. नानांनी एकच ध्यास घेतला. ‘जिथे नवनाथांची साधना घडली’, असे हे पवित्र ठिकाण बघायचे. मनोमन सद्गुरूंना नमस्कार करून, नाना सद्गुरू मंत्राचा जप करीत, ते नवनाथांचे ठिकाण बघण्यासाठी, त्या उंच पर्वताचा कडा चढायला लागले. नाना कितीतरी वेळ तो पर्वताचा उंच कडा चढत होते. ऊन कडक तापले होते, दुपारची वेळ होती. अर्धा पर्वत नाना चढून आले होते. परंतु त्या पुढील मार्ग नानांना सापडत नव्हता. अजून माथ्यापर्यंत जाण्यास बराच अवकाश होता. बरेच अंतर चालून झाल्यामुळे श्रीनाना थकून गेले होते. योग्य मार्ग सापडत नसल्यामुळे नाना निराश झाले. अशा अवस्थेत नाना एका दरडीवर बसले. दर्शनाविना माघारी परतण्याची नानांची इच्छा नव्हती. कोणी मनुष्यमात्र दिसेल म्हणून नाना चौफेर बघू लागले. नानांना त्या भयाण एकांत ठिकाणी कोणीही चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हते. नानांनी एकच निश्चय केला - ‘संपूर्ण दिवस उलटला तरी चालेल, परंतु दर्शन घेतल्याविना येथून माघारी परतायचे नाही’. नानांनी सद्गुरूंचे स्मरण केले व विनविले, ‘हे सद्गुरुराया, पर्वत चढण्यासाठी बळ दयावे’. प. पू. नाना अशी सद्गुरूंजवळ विनवणी करत असताना, एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक व्यक्ती नानांजवळ आली. त्या व्यक्तीने अंगात पांढरी बंडी घातली होती व कमरेला पांढरी लुंगी होती. हातात एक छडी होती. ती घेऊन, नानांकडे रागाने शिव्या देत आली आणि नानांना म्हणू लागली, ‘पायात कडा चढण्याचे बळ नसतांना कशाला येथवर आला ?’ असे म्हणून नानांना छडीने मारू लागली. नानांना ते नवनाथांचे साधनास्थान पहायचेच होते. त्यामुळे नाना शांतपणे मार व शिव्या सहन करीत होते व विनवित होते, ‘मला नवनाथांचे साधनास्थान बघण्यासाठी मार्ग दाखवावा. दर्शनाशिवाय मी माघारी परतणार नाही.’ काही वेळाने त्या व्यक्तीचा रागाचा भर ओसरला. त्या व्यक्तीने नानांना त्यांचे पायांना धरायला सांगितले. नानांनी तत्परतेने त्या व्यक्तीच्या पावलांना धरले. नानांनी मनोमन ओळखले, ‘सद्गुरूकृपेने प्रत्यक्ष अवधूतच साहाय्याला आले आहेत’. नानांना क्षणात अवधूतांनी त्या पर्वताच्या माथ्यावरती मच्छिंद्रनाथांच्या धुनीजवळ आणून सोडले व अवधूतमूर्ती गुप्त झाली. प. पू. नाना अतीव आनंदाने ती मच्छिंद्रनाथांची धुनी डोळ्यांत साठवत होते. ती मच्छिंद्रनाथांची धुनी प्रज्वलित होती. नानांनी धुनीजवळ जावून त्यातील विभूती आपल्या मस्तकाला लावली. प. पू. नानांना त्या ठिकाणी, जवळच नवनाथांची पवित्र अशी आसने मांडलेली दिसली . ती जणूकाही हे नवनाथांचे साधनास्थान असल्याची साक्ष देत होते. सद्गुरूकृपेची ज्याच्या जीवनात पहाट होते, त्याला सदगुरू कसे अंतर्बाह्य सांभाळतात हेच या प्रसंगात दिसून येते. परिपक्व साधना असेल तर शिष्याला सद्गुरूंच्या साहाय्यासाठी याचना करावी लागत नाही. सद्गुरूच शिष्यासाठी धावून येतात. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नानामहाराज. प. पू. नाना उच्च साधक होते. त्यामुळेच अवधूतांच्या कृपेने ते नवनाथांचे साधनास्थान पाहू शकले. प. पू. नाना तृप्त मनाने ती मच्छिंद्रनाथांची धुनी नयनांत साठवून, त्या पर्वताचा कडा उतरत होते.

याच यात्रेत नानांना अश्वत्थाम्याने दर्शन दिले. नाना पर्वताचा कडा उतरून येत होते. त्यावेळी नानांना उंच व धिप्पाड अशा शरीरयष्टीची एक व्यक्ती दिसली. ती नानांजवळ आली व नानांना विनंती करू लागली, ‘तेल अथवा लोणी असेल तर द्यावे पांथस्थाला’. नानांजवळ लोणी व साखर होती. ती त्यांनी त्या व्यक्तीला दिली. तीच व्यक्ती नानांना ’अश्वत्थामा’ असे नांव सांगून क्षणात गुप्त झाली. नाना आश्चर्याने पाहतच राहिले. कलियुगात अश्वत्थामा अजूनही शापित जीवन जगत असतो. निर्जन क्षेत्रांमध्ये त्याचा संचार असतो. अधिकारी व्यक्तींना दर्शन देतो. म्हणूनच अश्वत्थाम्याने नानांसारख्या अधिकारी व्यक्तीला दर्शन दिले. नानाही त्या अद्भुत अशा अनुभवाने धन्य पावले.

नाना याच यात्रेत डोंगर उतरून येत होते, तेव्हा पुन्हा एकदा अवधूतांनी नानांना दर्शन दिले व पायथ्याशी आणून सोडले. याच यात्रेच्या मार्गावर अनसूयामातेचा आश्रम लागतो. पूर्वी नानांनी नर्मदा परिक्रमा करतांना सिन्नोर येथे अनसूयेच्या मंदिरात तीन दिवस गुरूचरित्राचे पारायण करून तिच्या आवडीचे अन्न खिचडीचा नैवेद्य दाखवून प्रसन्न केले. नानांनी अनसूयेच्या आश्रमात जायचे ठरविले. प. पू. नाना अनसूयेच्या आश्रमात जात असतांना वाटेत नानांना एक सौभाग्यशालिनी स्त्री दिसली व म्हणाली, ‘आश्रमात मुक्कामासाठी न यावे, परंतु दर्शनासाठी यावे. मी मार्ग दाखविते’. नानाही त्या स्त्रीच्या मागोमाग जाऊ लागले. आश्रमात गेल्यावर तीच स्त्री नानांसमोर प्रत्यक्ष अनसूयेच्या रूपात प्रगट झाली . नानांची दत्तभक्ती तर अतुलनीय आहे, त्याच दत्तांची माऊली, अत्रिमुनींची ती दिव्य सती, जिने आपल्या तपाने संपूर्ण चराचराला वाचवले. त्याच अनसूयामातेने नानांना जागृत स्वरूपात दर्शन दिले. नानांनीही मोठ्या उचंबळलेल्या अंतःकरणाने त्या अनसूयेच्या दिव्य पावलांना नमस्कार केला. नानांना अनसूयेने आशीर्वाद दिला, ‘तुझी उपासना पूर्ण होवो. तुझा जयजयकार होवो बाळा. जावे आता पुढील कार्या.’ असा अनसूयेचा आशीर्वाद साठवित नाना मुक्कामाच्या मार्गाला निघाले.

नानांच्या गिरनार यात्रेतील वैशिष्ट्य असे, नानांना सद्गुरू-कृपेने नवनाथांचे साधनास्थान बघण्यासाठी प्रत्यक्ष अवधूतांनी सहाय्य केले. तसेच पुढील परतीच्या मार्गावर जणू काही अश्वत्थामा पण नानांसारख्या अवतारी पुरूषाकडून लोणी आणि खडीसाखर घ्यायच्या शोधात होता व नानांकडे आला असे वाटते. दत्तगुरू नानांचे परम व लाडके दैवत, त्याच दत्तांची माऊली प्रत्यक्ष अनसूयामाता नानांसमोर प्रकट झाली आणि नानांना तिने आर्शिर्वाद दिला. नानांच्या या गिरनार यात्रेत तीन दिव्य अनुभवांचा संगम झालेला दिसतो.

प. पु. नाना महाराज एक भक्ताचे  लेखणीतून

भक्तवत्सल चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज तराणेकर हे मूळचे मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र तराणा येथील व नंतरच्या काळात ते इन्दौर येथे रहायला गेले. दत्तात्रय परंपरेतील (तृतीय अवतार) प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचा अनुग्रह वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त झालेले शिष्योत्तम स्वरूपातील परम सद्गुरू नाना महाराज हेदेखील दत्तस्वरूप समजून अवतार परंपरेतील दत्तावतार मानले जातात. पाच सर्वोत्तम शिष्यांपैकी एक असलेले व ९७ वर्षांचे आयुष्य लाभलेले प. पू. नाना महाराज यांचे संपूर्ण जीवन चैतन्याने भारलेले, आपल्या भक्ताला यथार्थ मार्गदर्शन करणारे, अंतिमत: जीवन साफल्याचे फळ देणारे असून ते भक्तवत्सल परमहंस आहेत.

पूर्वजांना इन्दौरच्या होळकर संस्थानाकडून घर, शेतजमीन व धर्माधिकारी पद मिळाले. पूर्वजांपासून त्यांचे येथे असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. श्रीदत्त भक्तीचा सात्विक वेळ लावून श्रीक्षेत्र उज्जैनला ते गेले. तेथे त्यांनी चार्तुमास केला. प. पू. नानांचे वडील शंकरशास्त्री यांनी स्वामींचा अनुग्रह उज्जैन येथे घेतला. बालवयातील नाव मार्तंड पण कौतुकाने ‘नाना’ म्हणत. तेच नाव सार्थ झाले. प.पू. नाना ५-६ वर्षांचे असताना स्वामींचा चार्तुमास तराणा येथे झाला. हक्काने स्वामींच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या बाळ मार्तंडला स्वामी स्वहस्ताने बेदाणा, मनुकांचा प्रसाद भरवीत. पुढे शालेय शिक्षण सुरू असताना मुख्य गुरुजींनीच खोटे बोलण्यास केलेल्या आग्रहाची चीड येऊन त्यांनी शाळा कायमची सोडली. घरच्या वेदशाळेत वेदाभ्यास वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, मौजीबंधनानंतर व गायत्री उपासनेनंतर पुढील वेदाभ्यास इन्दौर येथे नरहरशास्त्री यांच्या येथे झाला. प्रखर बुद्धीच्या जोरावर प्रारंभापासून वेदविद्येत ते पारंगत झाले.

तपोबलाने आर्तभक्तीमुळे प. पू. वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज ब्रह्मावर्ताहून चार्तुमासात व्यग्र असतानाही वायुवेगाने येऊन बाळ मार्तंडला अनुग्रह दिला. ‘तू दत्ताचे लाडके लेकरू, समाधीत न रमता, दत्तभक्तांना सुलभ सोपा मार्ग दाखवून जनजागृतीचे मोठे काम तुला करावयाचे आहे, असे सांगून अंतर्धान पावले. त्यापूर्वी आपली छाटी पांघरून व चैतन्यमयी मंत्राक्षरे नानांच्या कानात सांगितली. तो गुरुमंत्राचा दिवस होता मंगळवार त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक शु. पौर्णिमा), दि. २२-११-१९०४

परमपूज्य नानामहाराजांनी त्यांच्या तरुणपणात अनेक तीर्थयात्रा केल्या. तसेच नर्मदा परिक्रमा, चारधाम, गिरनार यात्रा, हिमालयातील अनेक ठिकाणी जिथे ऋषीमुनी वास्तव्य करतात त्या ठिकाणी त्यांनी अवघड यात्रा केल्या. जेथे त्यांना महाभारतातील ऋषीमुनींचे दर्शन झाले. त्यांचे आवडते स्थान  श्री क्षेत्र गाणगापूर. येथील संगमाच्या समोरच १९८३-८४ साली स्वत:च्या देखरेखीखाली मोठी धर्मशाळा बांधली. त्या काळात भक्तांना संगमावर पारायण व इतर साधना करण्यासाठी शांत असे ठिकाण नव्हते. हे पाहून परमपूज्य नाना महाराजांनी भक्तांसाठी ‘साधना भवन’ ही वास्तू निर्माण केली. सन १९८४ साली प. पू. नारायण महाराज यांचे यतीपूजन झाले. प. पू. नारायण महाराजांनी त्यांच्या जीवनात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील विविध ठिकाणी ३२ मोठे यज्ञ केले. त्यादृष्टीने ते महान योगीच होते. यज्ञ यागातील त्यांचे मार्गदर्शन  व सिद्धता पाहून विद्वान पंडितही नतमस्तक होत होते. यज्ञांमध्ये काही ठिकाणी पशूंना बळी दिला जात असे. ही प्रथा महाराजांनी बंद केली.

ज्योतिषशास्तत्रात ते पारंगत होतेच. तसेच संगीत शास्त्रातही त्यांचे मार्गदर्शन मोठे कलाकार घेत असत. पं. कुमार गंधर्व, प. प्रभाकर कारेकर, पं. सी. आर. व्यास तसेच पं. अजित कडकडे, सौ. आशाताई खाडिलकर अशी दिग्गज मंडळी नानांपुढे आपली कला सादर करीत असत. त्यांना नेहमी वाटे की बालमनावर बालवयातच चांगले संस्कार झाले पाहिजेत व आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या अनेक मुलांच्या मुंजी त्यांनी स्वत: लावल्या. नाना महाराजांचे खास वैशिष्टय़ म्हणजे सात्विक, राजस व तामस याचा संबंध त्यांनी अन्न, यज्ञ व दान याच्याशी जोडला. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित करुणात्रिपदी या भक्तीप्रद प्रार्थनेचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. सामूहिक त्रिपदी प्रार्थनेचे ते जनक समजले जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नानांची कीर्ती ऐकून त्यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले होते.

मुंबई नगरीवर त्यांचे अपार प्रेम होते. त्यामुळे त्यांचा मुक्काम मुंबईत नेहमीच जास्त दिवस विविध भक्तांकडे असे. प. पू. नाना महाराजांनी मुंबईत दत्त महाराज कविश्वर यांजकडून भगवत सप्ताह करवून घेतला. त्यांचे इतरही लहानमोठे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम त्यांनी घडवून आणले. नाना महाराजांच्या पुढच्या पिढीतील कुटुंबीयांनी आपले सर्व आयुष्य ज्याप्रमाणे नानांनी खर्च केले त्याचप्रमाणे त्यांच्या सूनबाई वहिनीसाहेब त्यांचे चिरंजीव डॉ. प. पू. बाबासाहेब तराणेकर हे त्यांचे कार्य करीत आहेत. सर्व हिंदुस्थानात परदेशी त्रिपदी परिवाराच्या १५० शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये निरनिराळे समाजोपयोगी ३५ प्रकल्पही चालू आहेत. मुंबई त्रिपदी परिवारात एका भक्ताने विलेपारले येथे प. पू. नाना महाराजांच्याच मार्गदर्शन व आशीर्वादामुळे नाना महाराज स्मृती सभागृह उभे राहिले आहे. त्याचा पत्ता लक्ष्मी गोविंद सदन, ब्राह्मण वाडा, बँक ऑफ बडोदा सोसायटीच्या मागे, विलेपारले (पूर्व), मुंबई – ९९ असा आहे. वर्षाचे चारही उत्सव या ठिकाणी संपन्न होतात.

प. पु नानांची निस्पृहता

पुज्य तराणेकर महाराज नर्मदा मैय्याची परीक्रमा करतांना जंगलात सुर्यास्त झाला.  ते तिथेच मुक्कामी थांबले. त्या काळी रात्रीचा निवारा,आश्रय, विश्रांती घेण्यासाठी आश्रमांची संख्याही अगदी बोटावर मोजण्या इतकीच होती. आजच्या सारखी भरमसाठ आश्रम संख्या नव्हती. जंगल सुध्दा वनस्पती व जंगली श्वापदांच्या आधीवासाने संमृध्द होत. नाना महाराज नर्मदा मैय्याच्या नामस्मरणात तल्लीन होते. 

त्या रात्री चंद्रोदय झाल्यावर मैय्या पात्रातून प्रत्यक्ष नर्मदा मैय्या हातात अमृतासमान दुधाचा सुवर्ण कलश हाती घेऊन अवतरली. त्यांनी नानांना आग्रहपूर्वक तो कलश हाती सुपूर्द केला व हे ग्रहण करा असे म्हणून शांतपणे उभी ठाकली. 

नर्मदे हर, नर्मदे हर म्हणतच नानांनी तो कलश तोंडाला लावला क्षुधाशांती होवून, प्रसन्न पणे त्यांनी तो हाती घेतलेला रीता गडवा देण्याआधी धुवायच्या हेतूने उठले तो ईतक्या वेळ शांत उभी ठाकलेली नर्मदा मैय्या क्षणार्धात अदृष्य झाली. 

पुज्य नाना काही क्षण भावविभोर झाले आणि भानावर येता क्षणी आता हा सुवर्ण कलश (गडवा) परत द्यावा कुणाला? ह्या विचाराने थोडे अस्वस्थ झाले पण दुसऱ्याच क्षणी नर्मदा मैय्याने त्यांच्या हाती सुपूर्त केलेला तो सुवर्ण कलश परत नर्मदा मैय्याच्या पात्रात तिचा तिला म्हणून साष्टांग नमन करुन परतही केला. 

नाना महाराज तराणेकरांच्या चरीत्रात नानांची निस्पृहता किती उच्च कोटीची होती हे वाचतांना आपणही भावविभोर होतो.

नर्मदे हर

संपर्क:

श्री समर्थ नाना महाराज प्रासादिक संस्थान पारमार्थिक ट्रस्ट, इंदोर.
त्रिपदी परिवार, नानासाहेब तराणेकर, मार्ग ८१/१, स्नेहलता गंज, इंदोर ४५२००३.

दूरध्वनी: ०७३१ - २५४५०२४.