जन्म - भाद्रपद शुद्ध १, शके १८२९, दि. ८-०९-१९०७
आई/वडिल - सरस्वती माता व श्री. गणेश शास्त्री पाठक
निजानंदगमन - आषाढ व.६, शके १८७९, दि. १९-०७-१९५७
चरित्रग्रंथ - श्रीमन्मधुगीत बालमुकुंद बालावधुत लीलाचरित्र व श्री बालमुकुंद बालावधुत लीलाचरित्र
जन्मपूर्व इतिहास
परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे करवीर नगरीमध्ये सगुण साकार लीला कार्य सुरु होते त्यावेळी अनेकानेक परम भाग्यवान सद्भक्त अगदी सहजच त्यांचे चरणी आकृष्ट होत होते. करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिरा समोरील बाजूस कपिलतीर्थ परिसरामध्ये ग्रामदैवत श्री भगवान कपिलेश्वराचे फार पुरातन मंदिर आहे. त्याच्या जवळील वस्तीमध्ये श्री. वामनशास्त्री पाठक हे पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे एक परमभक्त रहात होते. ते अत्यंत विद्वान असूनही फारच विनम्र सद्भक्त होते. ‘बोले तैसा चाले’ या संतोक्ती नुसारच त्यांचे वागणे व बोलणे एक सारखेच शुद्ध, प्रेमळ व परोपकारी वृत्तीचे दिसून येई. त्यांचा हा वारसा त्यांचे पूज्य पिताश्री श्री.नरहर शास्त्रीजी यांच्याकडूनच लाभला होता. श्री. नरहर शास्त्रीजी ही पूर्ण प्रकांड-विद्वान, सुप्रसिद्ध ज्योतिषी असून परम दत्तभक्त म्हणून सर्वत्र सुपरिचित होते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या नित्य पूजाअर्चे सोबतच ते नेहमी श्रीक्षेत्र गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी येथे जाऊन विधीवत् पूजा अर्चा करुन अन्नदानादी सेवा करीत असत. त्यांच्या धर्मपत्नीही त्यांना अनुकूलअशाच सेवाभावी वृत्तीच्या होत्या. श्री. शास्त्रीजींनी ‘श्रीगुरुचरित्र’ या सद्ग्रंथाची १५१ पारायणे विशेष अनुष्ठानरुपाने करण्याचा संकल्प केला होता. अत्यंत शुचिर्भूतपणे राहून केवळ दूध, फलाहार सेवन करुन त्यांनी अशी १०८ पारायणे पूर्ण करताच त्यांना भगवान श्री दत्तात्रेयप्रभूंनी दृष्टांत दिला. त्यामध्ये दर्शन देवून आशीर्वाद देताना श्रीदत्तप्रभू म्हणाले, ‘‘तुझी सेवा मला पोहोचली. तुझ्या इच्छेनुसारच या कुळात आमची सेवा नित्य घडेल. इतकेच नव्हे तर मीच तुझ्या कुळात अवतारही घेईन. आता तुम्ही कष्ट करण्याचे कारण नाही. तुमचा उरलेली श्रीगुरुचरित्राची पारायणे पूर्ण करुन अनुष्ठान सांगता करेल. तुम्ही स्वस्थचित्ताने नामस्मरण करीत रहावे.’’
पूज्यश्री नरहर शास्त्रीजी श्री दत्त दर्शनानंतर अत्यंत आनंदात श्रीसेवा व स्मरण पूर्वक उर्वरीत आयुष्य साधेपणाने जगत होते. त्यांचे सुपुत्र श्री. वामनशास्त्री यांची जीवनपद्धतीही अगदी तशीच सुरु होती.विशेषतः श्री. वामनशास्त्रींची भागवत पुराणावरील अत्यंत सुमधुर, रसाळ व सहजसोपी प्रवचने त्याकाळी भाविकांना फार प्रिय झाली होती. अवधूत अवस्थेत विचरण करणारे पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामी पण कधी कधी त्यांच्या या भागवत पुराण प्रसंगी उपस्थित राहून प्रेमाने मान डोलवित असत. पूज्यश्री स्वामींची नित्य बारा वर्षे सेवा घडल्यावर एकदा मोठ्या प्रसन्न चित्ताने शुभाशिर्वाद देत पूज्यश्री स्वामी म्हणाले, ‘‘तू तर थोराचे लेकरु. तुझ्यापोटी पण असाच भाग्यवंत सुपुत्र जन्मास येईल, जा.’’ पूज्यश्री स्वामींचे हे आशिर्वचन लवकरच फलद्रुप होवून त्यांना भाग्यवान सुपुत्र लाभला. त्या सुपुत्राच्या बारशाच्या वेळी स्वतः पूज्यश्री स्वामी हजर झाले आणि त्या बाळाचे कौतुक करुन म्हणू लागले, ‘‘अरे, हा तर मोरया गणेशच आहे. चला माझे येथील काम झाले.’’ सर्वांना पेढे वाटत आनंदात अचानक हजर झालेले पूज्यश्री स्वामींच्या शब्दानुसार या सुपुत्राचे नांव ‘गणेश’ असेच ठेवले गेले. बाळ गणेश अवघा पाच महिन्यांचा असतानाच त्याची माता सौ. सावित्री व वर्षभरातच पिता श्री. वामनशास्त्री यांचे देहावसान झाले. पूज्यश्री नरहरशास्त्रीजी यांनी वार्धक्यामध्ये हे दुःख पचवून आपला नातू गणेश याचा फारच प्रेमपूर्वक सांभाळ केला. त्याला यथायोग्य सुसंस्कार व ज्ञान देवून वाढविले. योग्यवेळी त्याचा विवाह करुन दिला. पण थोड्याच कालावधीत त्यांची पत्नी निवर्तली. प्रथम पासूनच लाभलेले सुसंस्कार, ज्ञान व ईश्वरभक्ती यामुळे युवक गणेशशास्त्री पुन्हा विवाह बंधनामध्ये न अडकता आता संन्यासी व्हावे या विचाराने घराबाहेर पडले. कोल्हापूरवरून थेट बेळगांव जवळील थोर दत्तावतारी सत्पुरुष परमपूज्य श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या चरणी जावून त्यांनी त्याबाबत विनम्रतेने प्रार्थना केली. परंतु त्यावेळी श्रीपंत महाराजांचे सद्गुरु पूज्यश्री बालमुकुंद बालावधुत उर्फ श्रीबाळाप्पा महाराज अचानक तेथे प्रगटून त्यांनी श्रीपंत महाराजांना स्पष्टपणे सांगितले की, ‘‘अरे, हा तुझ्याकडे आलेला पाठक कुळातील सुपुत्र श्रीगणेश शास्त्री याला तू बिलकुल संन्यास दीक्षा देवू नकोस. त्यांचे कुळावर श्रीदत्तप्रभूंची पूर्ण कृपा असून लवकरच त्यांचे पोटी देवच श्रीदत्तावतार रुपाने जन्म घेणार आहे. तरी त्याला संन्यास न देता लवकर पुनःश्च घरी पाठवून दे. त्याचे आजोबात्याची फार आतुरतेने वाट पहात आहेत. आता, त्याला जास्त दिवस येथे ठेवून घेवू नकोस.’’पूज्य सद्गुरु श्रीबाळाप्पा महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीपंत महाराजांनी मोठ्या प्रेमळ शब्दांतश्रीगणेशशास्त्रींना सर्व काही समजावून सांगून परत कोल्हापुरी पाठविले. पूज्यश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे प्रेम व सन्मान मिळवून घरी येताच श्रीगणेशशास्त्रींनी आपले आजोबा पूज्यश्री नरहरशास्त्रीजी यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना हे सर्व ऐकून फार आनंद झाला. लवकरच श्रीगणेशशास्त्री यांचा दुसरा विवाह सौ. सरस्वती या भाग्यवान मुलीशी लावला गेला. श्रीगणेशशास्त्री आपले नित्याचे धर्मकार्य व प्रपंचभार सांभाळीत पूज्यश्री पंत महाराज यांच्या मार्गदर्शना नुसारच त्यांचे सद्गुरु श्रीबालमुकुंद बालावधुत तथा बाळाप्पा महाराज यांचे स्मरणपूर्वक जीवन चालवित होते. परंतु सद्भक्तांची पुरेपुर कसोटी पाहूनच भगवत्कृपेची बरसात होत असल्यामुळे श्रीगणेशशास्त्रींच्या पोटी जन्मलेली एकंदर दहा बालके अल्प वयातच मृत्युमुखी पडली. पूज्यश्री नरहरीशास्त्रीजी यांचे पण कालांतराने देहावसान झाले. श्रीगणेशशास्त्री यावेळी फारच उदासीन बनून गेले. श्रीक्षेत्र काशीस निघून जाण्याची त्यांना वारंवार इच्छा होवू लागली.त्यांची पत्नीही निराशेने दुःखी होवून आपणालाही श्रीकाशीक्षेत्री सोबत नेण्याविषयी सांगू लागली त्या दरम्यानच श्रीगणेशशास्त्रींना श्रीपंत महाराज व बाळाप्पा महाराज यांचा स्वप्नदृष्टांत होवून सांगितले गेले की, ‘‘अरे, तू दुःखी होवू नकोस. पूर्वी वचन दिल्याप्रमाणे तुझ्या आजोबांची राहिलेली श्रीगुरुचरित्राची 42 पारायणे तू अनुष्ठानपूर्वक पूर्ण कर. साक्षात् श्रीदत्तावधुतच तुझ्या पोटी लवकर जन्म घेणार आहेत. तु बिलकुल काळजी करु नकोस.’’ श्रीगणेशशास्त्रींनी आपला हा स्वप्नदृष्टांत पत्नीस सांगितला. तसेच त्यानुसार अत्यंत कठोरपणे नियम पालन करीत, मोठ्या श्रद्धा भक्तीने श्रींची सेवा उपासना करीत उर्वरीत श्रीगुरुचरित्र पारायण अनुष्ठान संपूर्ण केले. रुद्राभिषेक, सहस्त्रावर्तन, शतचंडी महायज्ञ, महापूजा वगैरे अनेक धार्मिक सत्कर्म करुन अन्नदान केले. पूज्यश्रीकृष्ण सरस्वती स्वामी त्यांचे हे सत्कर्म-सदाचरण व सद्भक्ती पाहून फारच संतुष्ट झाले. श्रीगणेशशास्त्रींना प्रेमाने जवळ घेवून पूज्यश्री स्वामी आशिर्वाद देत म्हणाले, ‘‘अरे, दत्तगुरु प्रसन्न झाले. आता तुला काहीच करण्याची जरुरी नाही. तुझे सर्व मनोरथ आता सफल होतील. तुझ्यावर श्रीदत्तगुरुंची पूर्ण कृपा आहे.’’ पूज्यश्री स्वामींनी असे म्हणून त्यांच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून ‘कल्याणमस्तु, कल्याणमस्तु’ असे संतोषदायी उद्गार काढले. यानंतर थोड्याच अवधीत पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांनी आपली सुगण साकार अवतार लीला संपन्न केली.
श्रीगणेशशास्त्री व सौ. सरस्वतीमाता यांच्या पोटी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शके अठराशे एकोणतीसरविवारी सकाळी दि. 8/9/1907 रोजी भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंनी बालक रुपात जन्म घेतला. पूज्यश्री कृष्ण सरस्वती स्वामींची वाणी खरी ठरली. पूज्यश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा आशीर्वाद प्रत्ययास आला. पूज्यश्री पंत महाराजांचे सद्गुरु श्री. बाळाप्पा महाराज यांचा पूर्वसंकेत सत्य झाला. या नूतन बालकाचे नांव ठेवले गेले ‘बालमुकुंद.’
अगदी जन्मताच या बालमुकुंदाने आपल्या मातेस भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्त व श्रीविठ्ठल रुपामध्ये दर्शन देवून आपल्या भावी अवतार कार्याची जणू ओळखच पटवून दिली. श्रीगणेशशास्त्रीजी व सौ. सरस्वतीमाता आपल्या या सुपुत्रा विषयी कुलस्वामी व दत्तगुरुंना प्रार्थना करु लागताच त्यांना दोघांनाही श्रीदत्तगुरुंचा स्वप्नदृष्टांत लाभून, ‘‘श्रीबालमुकुंद नांवाने बाल अवधुत रुपाने स्वतः श्रीदत्त प्रभूच अवतरले आहेत. तरीही यापुढे कोणतीही चिंता वा काळजी न करता, संशय-शंका न धरता निश्चिंत चित्ताने आनंदाने रहावे.’’ असा संकेत लाभला. खरोखरीच श्रीबालमुकुंद बालावधुतांचे रम्य बालपण, अद्भूत अतर्क्य लीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींप्रमाणेच त्यांच्या जन्मसिद्ध अवलिया-अवधुत स्थितीची ओळख करुन देते.
कोल्हापूरातील पन्हाळ्यावर राहणार्या सौ. अक्कुबाई गुरव पतीच्या व्यसनामुळे कोल्हापुरी येवून राहिल्या. त्यांना दोन मुली होत्या. त्यामुळे त्यांनी खंबीर मनाने कोल्हापूरात भाजीपाला विकून संसार चालविला. तिच्या कष्टाने व प्रामाणिकपणामुळे मोठ्या सरदार घराण्यातील लोकांचा तिला आश्रय लाभला. तिची वृत्तीही भाविक असल्यामुळे ती दररोत कुंभार गल्लीतल्या पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या दर्शनास जात असे. तिची श्रद्धा पाहून पूज्य श्रीस्वामींचे पण तिला आशीर्वाद लाभले. त्यामुळे फारच लवकर तिचा उत्कर्ष होवून तिने म्हशी घेतल्या. दुधाची विक्री करुन पैसा मिळवून घर बांधले. एकंदर प्रगतीमुळे तिने शेती विकत घेवून पीकाचे उत्पन्न काढण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यासमयी पाऊस पाणीच होईना, त्यामुळे तिचे प्रयत्न व पैसा फुकट गेला. त्या दरम्यान ती पलूस येथील थोर परमहंस श्रीधोंडीबुवा यांच्या दर्शनास गेली. तेव्हा त्यांनी तिलाआशीर्वाद देवून सांगितले, ‘‘अगं, तुझ्या हातून साक्षात् दत्तावधूत जेवतील. त्यांचा निवास तुझ्या घरी होईल. तू उगाचच फार पैशाच्या मागे लागू नकोस.’’ महान सत्पुरुष श्रीधोंडीबुवा यांच्या या शब्दांची भूल पडून अक्कुबाई शेतीचे उत्पन्न बुडले म्हणून दुःखी कष्टी झाल्या. कुंभारगल्लीमध्ये पूज्यश्री स्वामींच्या पायी याविषयी प्रार्थना करताच ते अगदी मनःपूर्वक हसत म्हणू लागले, ‘‘बरे झाले.’’ त्यांनी पण अक्कुबाईला पैशाचा मोह करु नको, असेच सुचविले.एकदा पूज्यश्री स्वामी समक्षच तिच्या घरी गेले. तेथे जाताच त्यांनी रागाचा अविर्भाव आणून तिच्या घरातील वस्तू उचलून फेकाफेकी केली. काही चीजवस्तू रस्त्यावर फेकून दिल्या. आपल्या जवळील दोन छाट्या व कांबळे तिच्या हाती देवून ते म्हणाले, ‘‘अक्कू, आता मी हे घर स्वच्छ केले आहे. लवकरच मी येथे राहण्यासाठी येणार आहे. तेव्हा तू परत येथे संसाराचा पसारा मांडू नकोस. श्रीदत्त अवधुतांचे स्मरण करीत रहा.’’ पूज्यश्री स्वामींचे हे बोल अक्कुबाईने ऐकले.पूज्यश्री स्वामींच्या आज्ञेने तिने सतत श्रीदत्त अवधुतांचे स्मरण करीत त्यांच्या त्या पवित्र वस्तूंचा साभाळ केला. लवकरच पूज्यश्रीस्वामी आपल्या घरी रहायला येणार या अपेक्षेने ती वाट पहात राहीली. पुढे यथासमयी पूज्यश्री स्वामींनी आपली सगुण साकार लीला संपविली. सद्भक्त अक्कुबाईचे हृदय त्यामुळे अत्यंत व्याकुळ झाले. पूज्यश्री स्वामींच्या शब्दावर निष्ठा ठेवून ती सतत त्यांचे स्मरण करीत आपल्या मनाला सावरीत राहिली. तिची ती तळमळ पराकाष्ठेला पोहोचताच एके दिवशी कपिलतिर्थातून श्रीबालमुकुंद बालावधुत अगदी अचानकपणे तिच्या दारी येवून उभे राहिले. त्यांना पाहता क्षणीच तिला पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींची आठवण झाली. त्यांनी पण त्याप्रमाणेच ‘आई’ म्हणून हाक मारीत तिच्या हातून दहीभात भरवून घेतला. श्रीबालमुकुंदांची ही कृती सोबत आलेल्या पिता श्रीगणेशशास्त्रींना पसंत पडेना. त्यांनी बराच आग्रह करुनही परत त्यांच्यासोबत घरी न जाता श्रीबालमुकुंद बालावधुत अक्कूबाईच्या घरीच राहू लागले. अशारितीने पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे पूज्यश्री कृष्ण सरस्वती स्वामीच आता श्रीबालमुकुंद बालावधुत रुपाने तिच्या घरी रहायला आले होते. पलूसच्या पूज्यश्री धोंडीबुवांची वाणीही याप्रमाणे खरी झाली होती.
बालपण
बालमुकुंदाला तीन वर्षे होता देवीची भयंकर साथ आली. गावाबाहेर राहावे हे प्रशस्त म्हणून सर्वजण बाहेरच्या डोंगरवनी झोपड्या बांधून राहीली. एक दिवस सरस्वतीला जेवताना फूत्कार कानी आला. पाळण्यात बाळ झोपी की जागे या शंकेने ती पुढे आली. पाळण्यामध्ये जावून एक महाभुजंग बालकावर फणीवर धरुन डोलत होता. त्या भयंकर दृश्याने ती भोवळली आणि दत्तगुरुचा धावा करु लागली. तो हृदयात बोल उमटले, ‘‘पाहा, लीला जननी गे, क्षीरसमुद्र सोडूनी आला, हा फणीवर तेथे एकला, विरहे तळमळू लागला, म्हणून मीच पाचारले.’’ दूध प्रसाद सेवन करीता जसा आला तसा तो महाभुजंग प्रस्थान करता झाला. बालक चार वर्षांचे झाले पण बसेना, उठेना की चालेना. अनेक वैद्य झाले. एक दिवस एक प्रसिद्ध धन्वंतरी कोल्हापूरात आला त्याने बालकास पाहता चिंतायुक्त स्वरात बोलला, ‘‘ह्यास पृष्टमणी नाहीत हो, हे कसे चालेल, बोलेल. हे जन्मभर लुळे, पांगळेच राहील.’’ तो चमत्कार झाला. बालक त्यांचे समोर उठून मांडी घालून बसले. ‘अशक्य अशक्य’ म्हणत धन्वंतरीने पुन्हा तपासले. तो पृष्ठमणी नव्हतेच. ‘‘ज्याला पाठीचा कणा नाही तो उठेल का कधी?’’ म्हणत तेथच तो धन्वंतरी नमस्कार करीता झाला.
बालमुकुंद क्रीडी करी, सवंगड्यांसह कपिलेश्वरी जाई. फूले माला मुले आणती. ह्याला श्रीकृष्ण करुन खेळती. कधी आपण डाव घेई तर कधी स्वतः लपून बसे. असे खेळता कपिलेश्वरी, एक दिवस गुप्त झाला. कुणा सवंगड्याला सापडेना. कोठे चाहूल लागेना. मुले लागली भ्यावयाला, शरण आली कपिलेश्वराला. तो साक्षात् कपिलेश्वर प्रगट झाला. त्याचे जागीबालमुकुंदाची मूर्ती उभी. अंगी जटाजुट भस्म मस्तकी गंगाप्रवाह, व्याघ्रांबरे अंग वेष्टीत, त्रिशूल-डमरु शोभत, बालमुकुंद हसत होता.यापरी बालमुकुंद वाढत होता. हसत होता. खेळत होता, रडत होता. कधी मधी कंबरदुखीने आजारी पडत होता. वैद्यास बोलावता लेपऔषध देवून लोहकांब्या पाठीस बांधून हालू देवू नका म्हणूनी सांगून बांधून ठेवीले, सवंगडी रुष्ठ झाले. बालमुकुंद मनी विचार करी, ‘आई वडील आता थकले त्यांनी अपार कष्ट केले. उतराई झाले पाहिजे. येथील कार्यभाग आटोपला. आता लागावे स्वकर्माला. वडीलांशी बोलावूनी लोहकांब्या सोडूनी ह्या घ्या ठेवोनी म्हणून उठता झाला. तो काय आश्चर्य लोहकांब्या सुवर्णमय होत बालमुकुंद बाहेर धावला.
अवधूत दीक्षा आणि लोकोद्धार
अक्कू-गृहीही बालमुकुंदाने सर्वांना लळा लावत मित्र जमवले. कधी मधी गाई येत. बालमुकुंदाने हात फिरवता गाई गोठ्यात स्वानंद स्थितीत बसत. काही खात पित नसत, पण मालकाला दुप्पट दूध देत असत. बालमुकुंद मित्र जमवून मृत्तिकेची पिंड करुन तीवर पूजा बांधी. कलशपूजा, गोपूजा, सत्यनारायण पूजा भक्तांकडून करवून घेई. कितीतरी लहानमोठी श्वान असायची, त्यांच्याशी बालमुकुंद खेळत बसे. असेच एक श्वान बालमुकुंदाला फार प्रिय होते. कसलीतरी व्याधी झाली आणि ते भूमीवर तडफडून मरुन पडले. बालमुकुंद कासावीस झाला.काही बोलेना, जेवेना, की श्वानापासून हालेना. तेवढ्यात ईशाण्णा नावाचा भक्त तेथे आला.अक्कूने गोड बोलून मुकुंदाला आत आणले व ईशाण्णाला खूण केली, ‘कुत्र्याला झाडीत नेवून टाक.’ त्याप्रमाणे करुन ईशाण्णा परत आला. तसा बालमुकुंद थयथया नाचत ‘कुकु द्या हो’ म्हणूत पाठी लागला. अक्कूने समजावून सांगितले ‘देवाघरी गेलेलं कुत्रें कधी परत यईल का?’ पण बालमुकुंद काही हट्ट सोडेना. तसे ईशाण्णा भक्त म्हणाला की, ‘‘आमच्या मागे का लागता तुम्हीच आणा की बोलावून’’ आणि काय आश्चर्य ! की बालमुकुंदाने आज्ञा केली, ‘येरे ये आता परत’ आणि खरंच मेलेला श्वान पळत आला. आणि अंगावर उड्या मारत पाय चाटू लागला.
गणेशशास्त्रींच्या मनात एकदा भ्रम निर्माण झाला की हा ब्राह्मणाला मुलगा असून गुरविणीच्या घरी कसा जेवतो? ह्याने धर्म भ्रष्ट होईल. त्याला आता घरी नेले पाहिजे म्हणून ते अक्कूगृही आले. त्या वेळेस बालमुकुंद गोड दहीभात खात होता. त्यांनी वडिलांना आत बोलावलं आणि एक हात गणेशशास्त्रींच्या तर दुसरा हात अक्कूच्या डोक्यावर ठेवला. तशी तेजोवलये उठू लागली. आनंदाच्या धारा सुटल्या. तिघे वेगळाले होते ते एकच भासू लागले. सर्व ठिकाणी
बालमुकुंद दिसू लागला. गणेशशास्त्रींचे अज्ञान दूर झाले. कोण कुठला, श्रेष्ठ-कनिष्ठ, कसली जातपात असे म्हणत सर्व एकत्र जेवले. गणेशशास्त्रींना एक दिवस वाटले की मुलगा आठ वर्षांचा झाला. त्याची मुंज केली पाहिजे. असे म्हणून ते अक्कूगृही गेले. मुंजीसाठी बालमुकुंदाला ‘‘औदुंबरला जाऊया’’ असे म्हणता तो मोठ्या हसायला लागला. पण औदुंबरला जायच्या इच्छेने ‘हो’ म्हणाला. पुरोहिताने गायत्री मंत्र जपायला सांगता ह्याने अवधूत हाच माझा मंत्र असा हट्ट धरला. पुरोहिताने गायत्रीमंत्राचे महत्व सांगता बालमुकुंद सर्वांना म्हणाला की माझ्या कंठाकडे लक्ष द्या आणि काय आश्चर्य ! प्रत्यक्ष गायत्री मंत्रमाला, ओंकारयुक्त हिरण्याक्षरी माला कंठापाशी दिसू लागली. साक्षात गायत्रीदेवी बालमस्तकावर हात ठेवून शेजारी उभी राहिली. त्याचवेळी कुर्तकोटी शंकराचार्य अकस्मात तेथे आले. मुकुंदकंठी गायत्रीमाला पाहून आचार्य म्हणाले, ‘‘हा तर प्रत्यक्ष दत्तावतार, ह्यासी कसला करता संस्कार, हा थोर अवधुत, आला आहे भक्तोद्धार करावया.’’
एक दिवस बालमुकुंदाने अक्कूला सांगितले की मी अवधूतदीक्षा घेईन, अंगी कफनी लेईन, पायी खडावा घालीन, त्रिशूल डमरु घेईन. अक्कू म्हणाली मी सुंदर मठी बांधीन. सर्व चीजवस्तू विकून, भक्त देतील ते घेईन. शिवाय राजेरजवाडे साहाय्य करतील. बालमुकुंद म्हणाले की, ‘‘हे करु नको, पैशासाठी हात पसरु नको. मी या चंद्रमौळी झोपडीत आनंदात आहे. धन कीर्ति मानसन्मान आम्हाला मृत्तीकेसमान तरीही अक्कूने स्वकष्टार्जीत सर्व धन मुकुंदचरणी अर्पण करुन, रात्रंदिवस कष्ट करुन अवधूतसदन उभे केले. मुकुंद म्हणे अक्कूला गडबड करु नको. मग एकेका भक्ताला प्रेरणा देवून कोणी पताका आणल्या, कुणी खांब, कुणी खडावा अशी उत्तम तयारी झाली. सात दिवस सोहळा झाला. असंख्य भक्त जमले. मुक्तद्वार भोजन झाले. टाळमृदुंगाच्या गजरात रात्रंदिवस भजन झाले. देवगडचे दत्तदास श्रीधरस्वामी, बाळेकुंद्री गोविंदपंत, श्री शाहूराजे छत्रपती असे राजमान्य, लोकमान्य, संतमान्य, देवमान्य असंख्य भक्त आले. पण मुकुंद असे अवधूतकृती ‘अ’ म्हणजे अधिष्ठाता आनंदरुपी तत्वता ‘व’ म्हणजे वासनात्यागी ‘धू’ म्हणजे धूतचित्त जीवन्मुक्त व ‘त’ म्हणजे तमसंहारक, सुखहारक, भक्तोद्धारक असा हा त्रैलोक्यस्वामी नानारुपी, नानानामी नटला.
असा हा बालमुकुंद बालावधूत असंख्य भक्तांना मार्ग दाखवू लागला. ‘ज्याची असेल दृढभक्ती त्याला संकटमुक्त करी.’ एकदा दारुण दुष्काळ पडला. खायला अन्न नाही. प्यायला पाणी नाही, प्राणी तडफडू लागले. सगळीकडे हाहाःकार उडाला. तेव्हा काही भक्तमंडळी बालमुकुंदाला शरण येत म्हणाली की, ‘तारा हो अवधुता!’ तेव्हा बालमुकुंद सांगे सकला ‘ही पण ईश्वरलीला. जन जेव्हा देवा विसरती, भलत्या मार्गे वर्तु लागती तेव्हा आपत्ती येती सावध करण्या’ असे म्हणून बालावधूत क्षणभर स्तब्ध झाले आणि आकाशाकडे पाहात आज्ञा केली ‘पर्जन्य सोड’ म्हणून तसे निळ्या निरभ्र आकाशात ढग जमू लागले. आणि वार्या विजेच्या तांडवासह पाऊस कोसळू लागला. अशी अवधूतलीला पाहून जो तो भक्त जो मिळेल तो प्रसाद घेवून अवधूताची आरती करु लागला. पावसाचे पाणी आले व गेले पण कायमची सोय मात्र झाली नाही, म्हणून शाहुपूरीतील बालकांनी बालावधूताकडे साकडे घातले. त्यांच्या मनीचा हेतू ओळखून बालमुकुंद त्यांना शाहुपूरीतील पाचव्या गल्लीतील एका जुन्या बोरींगवर घेवून गेले. ‘येथे पाणी आहे’ असे सांगून एका कमंडलूतील पाणी थोडे बोरींगमध्ये ओतले. उपसा करायला सुरुवात करता, पाणी अखंड धारा बरसू लागले. अशी ही अगाध अवधूतसत्ता ज्याचे ठायी, पृथ्वी, आप, तेज, वायु ही पाचही भूते नम्र होती. सद्गुरु सदा भक्तरक्षक, जो जो असे निस्सीम सेवक, त्यासी सदा संभाळीती.
सावित्रीबाई दड्डीकर, कुरुंदवाड ग्रामातील एक थोर भक्त. बारा वर्षे अति उग्र तप करुन नवनाथ सप्ते केले. त्यांचे स्वप्नात एक नाथपंथी बालकाने येवून सांगितले की, ‘मी आलोय गिरीनारावरुनी आणि मज आज्ञा केली श्रीगुरुंनी की लवकरच तुला गुरु भेटेल.’ त्याप्रमाणे एकदा एक बालयोगी स्वप्नात आले आणि सांगितले की योग्यवेळी मी तुला भेटेन. सावित्रीने अनेकांना विचारले की असा डोईवर जटाजुट बांधून फुलवेणी घालणारा कोणी गुरु आहे का ? दर्शनासाठी जेव्हा तळमळ फारच वाढली, गडबडा लोळू लागली तसे तिचे मुलीचे स्वप्नात येवून सांगितले की, ‘ती भेटीस फारच अधीर झाली आहे, मी तिचा गुरु शाहुपूरीत असतो तिला त्वरीत घेवून ये.’ सावित्री फुलमाला घेवून मठीत आली. आणि बालावधुताला पाहताच गुरुचरणावर कोसळली. जसा गुरु स्वप्नात पाहिता होता तसा सगुणरुपात पाहून कृतकृत्य झाली. तिचे पती अण्णा दड्डीकर एकदा टांग्यामधुनी परगावी जात होते. तो अचानक घोडे चौखुर चालले. घळ काट्याकुट्यांनी भरली होती. अण्णांनी ‘तारी तारी’ म्हणताच एक बालयोगी पुढे आले आणि अलगद उचलून रस्त्यावर आणून उभे केले व अंतर्धान पावले. अण्णांनी सावित्रीला सांगितले की ‘‘तुझ्या गुरुने मला वाचवले. चल प्रथम कोल्हापूरला दर्शनाला जाऊया.’’ मठीत येतात व पाहतात तर बालावधुताच्या पायात काटेच काटे गेले होते. अंग खरचटले होते, पण महाराज तर मठीतच होते. तेव्हा सर्वांना उलगडा झाला. भक्तरक्षणासाठी प्रत्यक्ष गुरुच धावून आले.
प्रभूदास शेठजी पतीपत्नी अतिभाविक-निजसेवक. मठीत आरतीस आल्यावर महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय माघारी कापडी दुकानात जात नसत. व्यापारात खंड पडू लागला, कर्जाचे डोंगर वाढू लागले, पण दोघांचे गुरुसेवेत अंतर पडेना अशी दृढभक्ती. भागीदार म्हणे, ‘भागी तोडू आता.’ तसे दोघे भांबावले. सद्गुरु परीक्षा पाहती म्हणून शांत राहिले. देणी सर्वत्र वाढू लागली. प्रपंच खर्चाची भ्रांत पडली मग भागीदार आपणहून भागी सोडून निघून गेला. तेव्हा महाराजम्हणती, ‘आता तुम्ही पाहावे दुकानासी, सचोटीने करा व्यवहारासी, उत्कर्ष होईल तुमचा.’गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून दोघांनी दुकान चालवले आणि उत्तम जम बसला. ‘जो गुरुसेवेला लागला, कठीण परीक्षा असे त्याला, जो उत्तीर्ण झाला त्यावर गुरुकृपा होत असे.’
गणेशपंत देवगावकर करवीर नगरीतील एक मोठे सोन्याचांदीचे व्यापारी. एकदा ते नारायणस्वामींना भेटण्यास कोटीतिर्थावर गेले. अवधूतलक्षण ऐकून त्यांनी विचारले, ‘असा कोणीअवधुत आहे का?’ तर स्वामींनी सांगितले ‘होय, असा अवधूत शाहुपूरीत आहे आणि तो तुझी वाट पाहातो आहे तेव्हा त्वरीत जा.’ पण गणेशपंतांना विकल्प आड आला. आधी प्रचीति पाहिजे, त्याशिवाय कसे जायचे ? त्यादिवशी वामन द्वादशी होती. त्याच रात्री बालावधूत वामनरुपात स्वप्नात आले आणि ‘तू मजकडे ये’ असा आदेश दिला. दुसर्या दिवशी गणेशपंतांना तीच मूर्ती मठीत दिसली. पुढे त्यांनी बालमुकुंदावर अनेक रसाळ अभंग लिहिले. श्री. गणेशपंतांचे सुपुत्र श्री. श्रीकृष्ण गणेशपंत देवगावकर हे देखील महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपले सर्व आयुष्य महाराजांचे चरणी समर्पित केले. यांनीच महाराजांचे अवतार कार्याचे वर्णन करणार्या ‘‘श्रीमन्मधुगीत बालमुकुंद बालावधुत लीलाचरित्र’’ या दिव्य ग्रंथाची निर्मिती केली.
पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या अनेक साधक भक्तांमध्ये कोल्हापुरी श्री. मोरजकर नांवाचेही एक सद्गृहस्थ होते. त्यांनी बरेच वर्षांपासून अगदी मनोभावे पूज्य श्रीस्वामीचरणी निष्ठा ठेवून सेवा सुरु केली होती. त्यांना पुत्रसंतान नव्हते. पूज्यश्री स्वामींच्या समाधीनंतर त्यांना दृष्टांत झाला की, ‘‘ अरे, आता तू श्रीबालमुकुंद बालावधुतांकडे जा. तो माझाच अवतार आहे. तिथे तुझी मनोकामना पूर्ण होईल.’’ त्या आज्ञेनुसार श्री. मोरजकर शाहुपूरीमध्ये अक्कूबाईच्या घरी पूज्यश्री बालमुकुंद बालावधुतांचे दर्शनासाठी आले. बालमुकुंदाकडे केळी ठेवता त्यांनी एक केळ भक्षण केले व तोंडाचा घास काढून मोरजकर पत्नीला प्रसाद म्हणून दिला व ‘पुत्र होईल तुला’ असा आशिर्वाद दिला. पुढे त्यांना पुत्ररत्न झाले.
मारुती पुरेकर हा महाराजांचा भक्त. त्यांना विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करत नसे. एकदा त्यांचे भगिनीसाठी उत्तम स्थळ आले. याद्या करण्यापर्यंत येता मारुतीने घरी सांगितले. ‘प्रथम महाराजांना विचारु.’ त्यांचा विचारताच ते ‘नको नको म्हणाले’ हातचे स्थळ सोडवेना पण मारुतीची दृढभक्ती होती. पुढे हा वर जो एस टी मध्ये ड्रायव्हर होता तो एक महिन्याने अपघातात मरण पावला.
कुशेअण्णा सावंतवाडी लॉजचे मालक प्रसिद्ध होते. नित्य सद्गुरुकडे मठीत जात. व्यवसायाकडे दुर्लक्ष होते म्हणून त्यांचे पत्नीला शंका आली. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला. आकाशीचे चंद्रबिंब खाली आले, त्याचे श्वानपिल्लू झाले. त्याला उचलता बालकमूर्ती प्रगटली. त्या बालकाला कवटाळता एक अवधूत प्रगट झाला, तोच दारातून एक देवता आली आणि आशीर्वाद देती झाली ‘हा बालावधूत तुज रक्षील.’ दुसरे दिवशी पतीसमवेत मठीत जाता महाराज हसू लागले.
सदानंद नेवाळकर शास्त्रीय संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. एकदा महाराजांनी त्याला बोलावले व पंत महाराजांचे ‘दत्तप्रेमलहरी’ हे पुस्तक हातात दिले व ‘गा’ म्हणून सांगितले. नेवाळकर कधीच भक्तीसंगीत गात नसत. त्यांनी हाताला येईल ते एक पान उघडले व गाऊ लागले. गाणे उत्तम रंगले. देवांनी डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. ‘इथून पुढे भक्तीगीते गात जा, माझी कृपा तुजवर आहे.’ पुढे थोर भक्तीगीत गायक म्हणून त्यांची कीर्ति
झाली.
शांतारामपंत वालावलकर व्यापार उदीमासाठी कोल्हापूरात आले आणि अल्पावधीत प्रसिद्ध झाले. देवधर्म, उपासना, नानाव्रत उत्सव व अनुष्ठानासाठी सढळ खर्च करीत. गोरगरीबांना सहाय्य करावे, साधुसंतांना पुजावे, गुणी जनांचा आदर करावा असे त्यांचे वर्तन होते. त्यामुळे अनेक संत-महंत त्यांचा आदर करीत. पण ते बालावधूताकडे कधीच गेले नव्हते. एकदा सदानंद नेवाळकर त्यांना घेऊन आले. पण त्यांना महाराजांचे कसलेही आकर्षण वाटले नाही. साधा नमस्कारही न करता ते घरी गेले. पुढे पुन्हा काही काळानंतर दिवाळीचे दिवशी सदानंदानी बापूंना आग्रह करुन मठीत नेले. बालमुकुंदाचे दर्शन होता त्यांनी अवधूताला स्पष्ट सांगितले, ‘जरी लोक तुम्हाला अवतार म्हणत असतील तरी मला तुम्ही खुळेच वाटता. जर तुम्ही दत्तावतार असाल तर मला प्रचिती द्या. मग मी तुमचा अनन्य भक्त होईन.’ त्यावेळेस बालमुकुंद निद्रा घेत होते. संकल्प ऐकताच उठून बसले व चुटकी वाजवली. बापू सर्व कामधंदा आटोपून नित्याप्रमाणे झोपी गेले. त्याच दिवशी पहाटे बापूंना दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये महाराज जवळ येवून उभे राहिले. हृदयामध्ये दत्तदयाधन आसनस्थ बसलेले दाखवले. दुसरे दिवशी बापू मठीत आले आणि बोलते झाले. ‘आता कोठेही न जाईन तनमनधन अर्पून अनन्य भक्त होईन.’ मग महाराजांनी जवळ घेवून त्यांचेवर संपूर्ण कृपा केली.
भीमराव नंदगांवकर, हे घराणे अतिसात्विक धर्माचरणयुक्त आणि भाविक. ‘ऐकोन बालमुकुंदाची किर्ती दत्तावतार हा निश्यिती,’ ही मनी खूण बांधून, ‘ह्या घरी आणू या’ असा विचार केला. मग शाहुपूरीत येवून बालमुकुंदा ते हात जोडून ‘यावे आमुचे घरी’ म्हणून आदराने विनंती केली. त्यांची सात्विकता पाहून अवधूताचे मनी हर्ष दाटला व म्हणाले, ‘अरे तुझे घरी मी येईन. तुझा नी माझा ऋणानुबंध, युगीयुगीचा संबंध, तुझ्या भेटीचा छंद, केव्हापासून मज लागला.मग भीमराव अवधूतांना घेवून आले. मंचकावरी बसविले. अत्यादरे पाद्यपूजा केली. हाती छाटी देवून भक्तीभावे आरती केली. अवधूत मनी संतोषले व आश्वासिले ‘मी येथेच राहीन, हे ही असे माझेच घर. जैसे माझी असेल लहर, तैसा राहीन येथे मी.’ भीमरावांचा पूत्र आनंदराव प्रचीति येता थोर, तोही महाराजांचा निजभक्त होई. प्रतिवर्षी उत्तम गाई, ब्राह्मणाते दान देई म्हणून बालमुकुंदत्यासी ‘गायअण्णा’ म्हणत. एकदा आनंदरावाने महाराजांना नंदगांवला नेले जिथे त्यांचे वाड्यात एक समंध राहात होता. समंधाचा वाडा म्हणून कोणी तिकडे जात नसे. दुपारी महाराजांच्या निद्रासमयी समंध महाराजांकडे आला व धमकी दिली. तुझ्यासकट सर्वांसी मी त्रास देईन. महाराज म्हणाले, ‘मुर्खा, माजलास फार, भक्तरक्षणासाठी माझा प्रताप पाहशील. तसा तो समंध ज्वालेच्या लोळातून आतबाहेर धावू लागला. त्या दृश्याने सकल लोक घाबरले. महाराजांनी कमंडलातून पाणी घेवून मंत्रोच्चार प्रोक्षून लोळ शांत केला. तसा सर्व घरातून भांडणार्या हिंस्त्र श्वापदासारखा चित्रविचित्र आवाज येवू लागला. हळूहळू आवाज शांत होत गेला. तसे महाराज त्यास म्हणाले, ‘संपली का विद्या तुजजवळची’ आणि गावाबाहेरच्या झाडावर चारी दिशा बंधन करुन अडकवून टाकला. असा देव भक्तासाठी झिजला. ते समयी आनंदरावास दुःख झाले. स्वार्थबुद्धीने आणले, ब्रह्मसंमंधासवे लढवले. तुमचे सामर्थ्य पणाला लावले म्हणून दुःखीकष्टी झाला. बालमुकुंद तया म्हणती ‘‘मजसी प्रिय तुझी भक्ती, म्हणोनी तुजसाठी केले तु दुःखी होवू नकोस.’’
महानिर्वाण
एकदा श्रींचे प्रिय भक्त पंत वालावलकरांना अत्यंत ताप आला. रोजच्या चढउताराला खंड पडेना. डॉक्टरांना दाखवा, काही औषध घ्या म्हणून त्यांच्या पत्नी नलिनीबाई आणि बाकी सर्वजण सांगू लागले. परंतु त्यांचा निर्धार होता की सद्गुरु हातीच्या तीर्थाविना दुसरं काहीही घेणार नाही. ते सद्गुरुनाथांचे ‘अवधूत अवधूत’ असे स्मरण करु लागले. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला. आपल्या गुरुंनी देह ठेवला असे त्यांना स्वप्न पडले. एका सजवलेल्या रथावरती गुरुचे कलेवर होते. रथाच्या मागेपुढे अमित भक्तजनांची दाटी झाली होती. दिंडी, टाळ, मृदुंगाचे गजरात नंदगावकरांचे घरातून त्यांचे सदनी रथ आला व दारातच गुप्त झाला. बापू भयभीत होवून उठले. बिछाना घामाने चिंब झाला होता आणि ताप उतरला. प्रभुदास शेठजींच्या स्वप्नीही देवाने दृष्टांत दिला. देवांनी प्रचंड देह धारण केला व ते अनंतात विलीन झाले. या अरिष्टसूचक स्वप्नाने दोघे पतीपत्नी दुःखीकष्टी झाले. पुढे काही भक्तांना देवाने जाऊन दृष्टांत दिला व देह ठेवीन असे सुचविले. पुण्यातील देशपांडे अध्यापिका यांनी महाराजांना छाटी वस्त्र देवून त्यांचे गळ्यामध्ये हार घालून स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. त्या वर्षी गुरुपौर्णिमेस फार मोठा उत्सव झाला. देव सिंहासनावर बसले होते. बापूंना आरती घेण्यास सांगून मंगलाआरती चालू असतांनाच देवांनी डोक्यावरच्या दोन वेण्या हातात काढून घेतल्या आणि प्रसाद म्हणून पंत वालावलकरांच्या हाती दिल्या. तिसरे दिवसापासून महाराजांना अवचित ज्वर चढू लागला. पण देव ध्यानस्थ होवून, अन्नपाणी वर्ज्य करुन एकाग्रचित्त शय्येवर बसून राहिले. ‘‘कोणाशी न बोलती, न हासती, सोऽहं कृतीत अखंड रमती’’ अशा स्थितीत महाराज राहिले. पुढे तीन दिवसांनी बापू व ताईंकडून शेवटची आरती घेवून, आषाढ वद्य षष्ठीस १८ जुलै १९५७ रोजी सकाळी नऊ वाजता श्रीबालमुकुंद महाराज निजधामास गेले. बापूंनी स्वप्नात पाहिली होती तशीच अंत्ययात्रा निघाली. मिरवणूक बापूंच्या घरी येताच महाराजांचे आवडते श्वान पंप्याने मोटारीभोवती प्रदक्षिणा घालून बापूंच्या घरी प्रवेश केला. महाराजांचा देह अक्कूगृही शाहुपूरीत समाधिस्थ करण्यात आला. त्याच रात्री बापूंच्या स्वप्नी बालमुकुंद मूर्ति आली. ‘‘मी कोठेही न जाई. सुक्ष्मरुपे तुझेजवळच राहीन.’’ असे त्यांना आश्वासिले. महाराजांनी देह ठेवल्यावर आनंदराव नंदगावकरांनाही प्रचिती आली. देह तिथे ठेवला म्हणून प्रसाद केला नव्हता. रात्री अचानक थाळी वाजवण्याचा आवाज आला म्हणून आनंदराव खाली आले तर महाराज प्रत्यक्ष थाळी वाजवत होते. त्यानंतर आजपर्यंत पुन्हा कधीही प्रसाद चुकला नाही. अशी ही अवधुत प्रचीति आजही अनेकांना आली आहे व येत आहे.
समाधी मंदीर - नंदगांवकर वाडा (राधा निवास), ८९७, बी वार्ड, रविवार पेठ, कोल्हापूर.
फोन - ०२३१ - २६४ ०१५६
समाधीस्थ मंदीर (मठी) - शाहुपूुरी, ५ वी गल्ली, ई वार्ड, घर नं. ८५३, कोल्हापूर.
मो. ९९२२३८६८२० (पुजारी- श्री. गुरव)
उपासना मंदीर - लक्ष्मीनारायण बालावधुत गणेश मंदीर, कोटितीर्थ, उद्यमनगर, कोल्हापूर (महाराष्ट्र)