जन्म: १५ मे १८७० - सटाणा, महाराष्ट्र
समाधी/निर्वाण: २४ डिसेंबर १९४१ साकोरी, जिल्हा - अहमदनगर, महाराष्ट्र
संप्रदाय: अद्वैतवेदान्त
गुरु: शिर्डीचे साई-बाबा
शिष्य: मेहेर बाबा
विशेष: कन्याकुमारी स्थान निर्मिती, दत्तमंदिर
श्रीक्षेत्र साकोरीचे श्रीउपासनी बाबा हे विदेही महात्मा, सिद्धावस्था गाठलेले योगिराज होते. त्यांचे संपूर्ण नाव श्री काशिनाथ गोविंद उपासनी. वेदशास्त्रसंपन्न व ज्योतिषविद्यापारंगत घराण्यात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला आणि ईश्वरप्राप्तीसाठी त्यांनी गौळवाडी येथील डॊंगरातील कपारीत उग्र तपश्र्चर्या केली.
पुढे संतचूडामणी साईबाबांनी बाबांवर पूर्ण कृपा केली. त्यांना खंडोबाच्या मंदिरात बसवून, त्यांच्याकडून कठोर साधना करवून घेतली. श्रीक्षेत्र शिर्डीतल्या खडतर साधनेने त्यांना पूर्णत्व आले. त्यांना सच्चिदानंद अवस्था प्राप्त झाली. त्यांच्या स्वात्मानुभवाचा वृक्ष पाना- फुलांनी डवरला. त्यांना क्षुधेतृषेची, थंडीवाऱ्याची तमा राहिली नाही. या तपश्चर्येनंतर विदेही उपासनी बाबा जगदुद्धारार्थ बाहेर पडले. गुरुपदाचे धनी होऊन ते संचार करू लागले तर लोक त्यांना वेडा समजून दूर हाकलू लागले. डॉ. पिल्ली यांचे बंधू चित्रास्वामी त्यांना खरगपूरला घेऊन गेले आणि तेथे त्यांचे योगिक सामर्थ्य चमत्काराच्या रूपाने लोकांच्या नजरेला पडले. ओंकारेश्र्वर, उज्जैनी अशी तीर्थक्षेत्र करीत ते श्रीक्षेत्र साकोरीला आले.
श्रीउपासनी बाबा साकोरीला कायमचे स्थिरावले. तेथे झोपडी बांधून त्यात राहू लागले. लवकरच त्यांनी ‘कन्याकुमारी स्थाना’ ची निर्मिती केली. झोपडीच्या जागी श्रीदत्त मंदिर उभे राहिले. लाकडी पिंजऱ्यात बंदिस्त होऊन त्यांची आराधना सुरू झाली. पिंजऱ्यात बसून ते प्रवचने करू लागले. त्यांची वाक्गंगा दुथडी भरून वाहू लागली. ‘साई वाक्सुधा’ या नावाने ही अनमोल प्रवचने नंतर प्रकाशित झाली.
श्रीउपासनी बाबांच्या ‘कन्याकुमारी स्थाना’ मुळे त्यांच्यावर टीकेची बरीच झोड उठली. श्रीबाबांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पण कालांतराने श्रीबाबा निर्दोष असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. लवकरच साकोरीची स्मशानभूमी बाबांच्या वास्तव्याने भूवैकुंठ बनली. श्रीउपासनी वाक्सुधा’ हा त्यांचा बृहत् ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. त्यातील त्यांचे नामस्मरणविषयक बोल अत्यंत मधुर असून जीवाचे कल्याण करणारे आहेत. ते असे -
‘भवरोग जाण्यासाठी नामस्मरणाची फार जरूरी आहे. भवरोगच गेला तर सर्वच शारीरिक, मानसिक रोग लयाला जातील. जसे वैद्याचे औषध घेऊन पथ्य सांभाळले नाही तर गुण येत नाही. तसे नुसते नामस्मरण केले व पथ्य सांभाळले नाही तर उपयोग होणार नाही.
नामस्मरण म्हणजे तोंडाने केवळ बडबड नव्हे. स्मरण म्हणजे आठवण. स्मरण करणे ही मनाची क्रिया आहे. म्हणून खरे नामस्मरण केले जात नाही. तुमच्या घरच्या आईवडिलांचे स्मरण करण्यासाठी माळ घ्यावी लागते की काय ? त्यांचे नाव घेताच त्यांचे रूप गुणधर्म सर्व एकदम ध्यानात येतात. तसेच राम, कृष्ण वगैरे नावे घेताच त्यांचे सर्व गुणधर्म ध्यानात आले पाहिजेत.’ असे ते नेहमी म्हणत असत.
‘जसे पाण्याची गार घनीभवनाने जडरूप दिसते. पण त्या गारेच्या आत- बाहेर सर्वच पाणी आहे. पाण्याचीच ती बनलेली आहे. तसेच राम, कृष्ण वगैरे कोणत्याही देवतेची अक्षरे किंवा वेदमंत्राची अक्षरे ही आतबाहेर ब्रह्मरूपच आहेत. ‘गायत्रीसारख्या कोणत्याही वेदमंत्राक्षरांचे व रामकृष्णादिक कोणत्याही परमेश्वरी देवता नामाक्षरांचे जपजाप्यादिकांच्यायोगे मनाशी तादात्म्य करणे, हाच खरा नामजप किंवा मंत्रजप.
‘जप करताना काहीवेळा झोप येते. ती येऊ नये म्हणून कोणी तपकीर ओढतात, कोणी बिडी पितात. कोणी डोळ्यांत कापूर घालतात. मात्र जपात खरे प्रेम नसल्यामुळे हे सर्व करावे लागते. निद्राप्रिय अवस्थेत माळ हातात फिरत रहाते, मन मात्र दुसरीकडे असते. अशा जपाचा काहीच उपयोग नाही. जप करताना झोप येऊ लागली तर कष्टाची सेवा करावी. नंतर काही वेळाने पुन: जप करीत बसावे. म्हणजे मन स्थिर होईल.’ असे बाबा सांगत.
‘कोणत्याही इष्टदेवतेच्या नावाचा केवळ जप करण्यापेक्षा त्याची नावे लिहीत जावी. नाम घेत असताना हे हाताने लिहिणे सारखे चालू ठेवावे. मनाने राम, राम म्हणावे व हाताने ते लिहून काढावे. लिहिण्याच्या जागी एकसारखी दृष्टी ठेवल्याशिवाय लिहिले जात नाही. त्यामुळे इकडे तिकडे लक्ष जाणे बंद होते. इतर विषयांवर लक्ष जाणे बंद झाल्याने मन रामनाम घेण्यातच गुंतते. अशा रीतीने एकतानता झाल्यावर देहाविषयीसुद्धा विसर पडतो. अंत:करण एकाग्र होण्याचा हा एक उपाय आहे,’ असे बाबा आपल्या भक्तांना सांगत असत.
जगातील सर्वसुखप्राप्तीसाठी परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाणे आणि त्याचे अनन्य भावाने नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे. नामस्मरणाने जन्मोजन्मीचे सर्व दोष नाहिसे होतात. शरीर व मन पवित्र होतात. इहलोकीचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शेवटी नामधारकाला परमेश्वरप्राप्ती होते. म्हणूनच कायम जप-नाम स्मरण करणे योग्य, ही बाबांची शिकवण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.
ब-याच गुरुभक्तांनी, "साधना किंवा नाम जप करताना मन एकाग्र न होता इकडे-तिकडे भटकत असते, तरी यावर उपाय काय?" अशी विचारणा ह्या ठिकाणी केल्याची आढळते. या संबंधाने श्री उपासनी महाराज, साकुरी [शिर्डी] ह्यांनी त्यांच्या प्रवचनात केलेले विवेचन-
"कोणतेही परमेश्वरी कृत्य करीत असता, मन इकडे तिकडे भटकत असते, त्यामुळे करत असलेल्या जप जाप्य इ. कडे लक्ष लागत नाही, अशी काही भक्त तक्रार करतात. त्यांना मी जे उत्तर देतो, ते तुम्हाला सांगतो. देवाचे सत्कर्म करीत असता मन भटकते तर भटकू द्या. ते स्थिर होण्याची गरजच नाही, कारण चित्त स्थिर होणे हे सत्कृत्त्याचे अंतिम फळ आहे. अगोदर सत्क्रिया पूर्ण होत नाही आणि त्याच्या अंतिम फळाची कशी इच्छा धरता? मन भटकले तर त्याच्यात नुकसान काही नाहीं. कारण मन कोठेही भटकत असले तरी आपला फायदा होतो. तो कसा ते पहा.
सत्कर्माचे वेळी ते कृत्य करीत असता आपले मन एका ठिकाणीच असल्याचाही अनुभव येतो, व चागल्या- वाईट ठिकाणी भटकत असते हाही अनुभव येतो, पण ह्या दोन्ही प्रकारच्या अनुभवापासून सत्कर्मात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. मनाचा स्वभावच असा आहे की एक काम शरीराच्या द्वारे करीत असता, दुसरीही मानसिक कामे त्याच वेळी ते करते. म्हणजे, एकीकडे पठण करणे, हाताने माळ ओढणे, किंवा अभिषेक करणे इ. शारीरिक रितीने ते सत्कर्म सुरु झाले की मन काही घरगुती, परिवारापैकी, उद्योग धंद्याविषयी किंवा शत्रु-मित्रांविषयी विचार करू लागते.
पण अशा वेळी मन इकडे तिकडे जात असले तरी आपले सत्कर्म चालूच असते, ते बंद पडत नाही. उलट ते कोठेही भटकत असले तरी पटदिशी मधून मधून आपले सुरु असलेले सत्कर्म बरोबर चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी येतच असते, हाही अनुभव आपल्याला येतच असतो. मनाच्या अशा भटकण्याचा आपल्याला फायदा असा होतो की, मन सत्कर्माच्या वेळी इकडे तिकडे जात असताना ते सत्कर्मामधील पुण्यांश बरोबर घेऊन जात असते. त्यामुळे ते जितक्या ठिकाणी जाते, ती ठिकाणे त्या पुण्यांशाने पवित्र होत जातात. म्हणजेच जर मन सत्कर्माचे वेळी आपल्या शत्रूकडे गेले तर त्या शत्रूचे आपल्या ठिकाणी असलेले शत्रुत्व कमी होत जाते. तसेच जर ते मन भटकत असताना एखाद्या वाईट ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणाचा दोष कमी होऊन त्या ठिकाणाची पवित्रता वाढते. ह्याप्रमाणे सत्कर्माच्या पुण्यांशाने मनाची बहुतेक ठिकाणे पावन होत आली, म्हणजे त्याचे भटकण्याचे काम आपोआप बंद पडून आपल्या ठिकाणी आपोआप परत येते. आणि ब-याच दिवसांनी अशी सर्व ठिकाणे पवित्र झाल्याचाही अनुभव आपल्याला येतो."
याप्रमाणे आपले सत्कर्म करीत असताना जर मन एकाग्र होत नसेल तर त्याविषयी जास्त विचार न करता, आपले सत्कर्म नियमितपणे सुरूच ठेवावे हे सर्वात चांगले.
साधना व नामजप करताना एकाग्र होत नाही? उपासनी बाबा मार्गदर्शन.
ब-याच गुरुभक्तांनी, "साधना किंवा नाम जप करताना मन एकाग्र न होता इकडे-तिकडे भटकत असते, तरी यावर उपाय काय?" अशी विचारणा ह्या ठिकाणी केल्याची आढळते. या संबंधाने श्री उपासनी महाराज, साकुरी ह्यांनी त्यांच्या प्रवचनात केलेले विवेचन, संकलित करून, खाली देत आहे.
"कोणतेही परमेश्वरी कृत्य करीत असता, मन इकडे तिकडे भटकत असते, त्यामुळे करत असलेल्या जप जाप्य इ. कडे लक्ष लागत नाही, अशी काही भक्त तक्रार करतात. त्यांना मी जे उत्तर देतो, ते तुम्हाला सांगतो. देवाचे सत्कर्म करीत असता मन भटकते तर भटकू द्या. ते स्थिर होण्याची गरजच नाही, कारण चित्त स्थिर होणे हे सत्कृत्त्याचे अंतिम फळ आहे. अगोदर सत्क्रिया पूर्ण होत नाही आणि त्याच्या अंतिम फळाची कशी इच्छा धरता? मन भटकले तर त्याच्यात नुकसान काही नाहीं. कारण मन कोठेही भटकत असले तरी आपला फायदा होतो. तो कसा ते पहा.
सत्कर्माचे वेळी ते कृत्य करीत असता आपले मन एका ठिकाणीच असल्याचाही अनुभव येतो, व चागल्या-वाईट ठिकाणी भटकत असते हाही अनुभव येतो, पण ह्या दोन्ही प्रकारच्या अनुभवापासून सत्कर्मात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. मनाचा स्वभावच असा आहे की एक काम शरीराच्या द्वारे करीत असता, दुसरीही मानसिक कामे त्याच वेळी ते करते. म्हणजे, एकीकडे पठण करणे, हाताने माळ ओढणे, किंवा अभिषेक करणे इ. शारीरिक रितीने ते सत्कर्म सुरु झाले की मन काही घरगुती, परिवारापैकी, उद्योग धंद्याविषयी किंवा शत्रु-मित्रांविषयी विचार करू लागते. पण अशा वेळी मन इकडे तिकडे जात असले तरी आपले सत्कर्म चालूच असते, ते बंद पडत नाही. उलट ते कोठेही भटकत असले तरी पटदिशी मधून मधून आपले सुरु असलेले सत्कर्म बरोबर चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी येतच असते, हाही अनुभव आपल्याला येतच असतो. मनाच्या अशा भटकण्याचा आपल्याला फायदा असा होतो की, मन सत्कर्माच्या वेळी इकडे तिकडे जात असताना ते सत्कर्मामधील पुण्यांश बरोबर घेऊन जात असते. त्यामुळे ते जितक्या ठिकाणी जाते, ती ठिकाणे त्या पुण्यांशाने पवित्र होत जातात. म्हणजेच जर मन सत्कर्माचे वेळी आपल्या शत्रूकडे गेले तर त्या शत्रूचे आपल्या ठिकाणी असलेले शत्रुत्व कमी होत जाते. तसेच जर ते मन भटकत असताना एखाद्या वाईट ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणाचा दोष कमी होऊन त्या ठिकाणाची पवित्रता वाढते. ह्याप्रमाणे सत्कर्माच्या पुण्यांशाने मनाची बहुतेक ठिकाणे पावन होत आली, म्हणजे त्याचे भटकण्याचे काम आपोआप बंद पडून आपल्या ठिकाणी आपोआप परत येते. आणि ब-याच दिवसांनी अशी सर्व ठिकाणे पवित्र झाल्याचाही अनुभव आपल्याला येतो."
याप्रमाणे आपले सत्कर्म करीत असताना जर मन एकाग्र होत नसेल तर त्याविषयी जास्त विचार न करता, आपले सत्कर्म नियमितपणे सुरूच ठेवावे, हे सर्वात चांगले.