स्थान: ता. पाथरी, जिल्हा परभणी (महाराष्ट्र राज्य), श्रीगंगेच्या उत्तर तीरावर
सत्पुरूष: श्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)
विशेष: दत्तमंदिर, सिद्धेश्वर महादेव, पवित्र व निसर्गरम्य अध्यात्मिक केंद्र
नमो गुरुभ्यो गुरूपादुकाभ्यो । नम: परेभ्य: परपादुकाभ्य: ।
आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो । नमोस्त्व लक्षीपती पादुकाभ्य: ।
नमो ब्रम्हादिभ्यो ब्रम्हविद्यासंप्रदायकर्तृर्भ्यो नमोवंशऋषिभ्यो नमोसद्गुरूवासुदेवानंदेभ्य: ।।
श्रीमत् जगच्चालक भगवान त्रिमूर्ती द्त्तात्रयाचे अंशावतार अशी ख्याती पावलेले श्रीमत् प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज यांचे पट्ट्शिष्य श्रीमत् प. प. स. योगानंद सरस्वती स्वामीमहाराज हे गुजरात प्रांती सुरत जिल्ह्यातील तलंगपूर नावाच्या गावी जन्मले. लहानपणापासून शिवभक्तीचा जिव्हाळा अंत:करणात असल्यामुळे पुढे प्रौढपणीही प्रपंचात वैराग्य जाणवू लागले. लवकरच विरक्तपणे घरदार सोडून सद्गुरूच्या शोधार्थ फ़िरत असताना पूर्व पुण्याईने श्रीमत् प. प. स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांची भेट झाली. भेटीअंती जे घड्ले ते खालील उक्तीप्रंमाणे,
तुका म्ह्णजे गंगासागर संगमी । अवघ्या झाल्या उर्मी एकमय ।
पुढे काही दिवस श्रीगुरूच्या संगतीत राहून एकनिष्ठपणे सेवा केली. कालगतीप्रमाणे श्रीमत् प. प. स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी श्रीक्षेत्र गरूडेश्वर येथे समाधिस्त होण्यापूर्वी श्री महाराजांनी संन्यास घेवून मराठवाड्यात दक्षिणप्रांती जाण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे यति दीक्षा घेऊन सात वर्षे मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात श्रीगंगेच्या उत्तर तीरावर पाथरी तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकास गुंज या गावी श्रीसिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले. येथे असताना कित्येक लोकांना अनुग्रह देवून सद्गुरू सेवा व दत्तभक्तीस लावून त्यांचे कल्याण केले. पुढे शके १८५० च्या फ़ाल्गुन वद्य १२ रोजी पार्थिव देहास विसर्जित करून शिवस्वरूपी विलीन झाले. त्यावेळेस श्रीसिद्धेश्वर महादेवाचे मंदिर व त्याखालील दोन्ही बाजूकडील दोन लादण्याच उपलब्ध होत्या. त्यानंतर संस्थानच्या कारभाराची सूत्रे श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे पट्ट्शिष्य परमपूज्य श्री समर्थ चिंतामणी महाराज यांच्या हाती आली. त्यांनी संस्थानची अत्यंत भरभराट करून सर्व बांधकाम अती दीर्घ प्रयत्नांनी व कसोटीने केले. जे आज भव्य स्वरूपात उभारलेले दिसत आहे ते सर्व काम म्हणजे परमपूज्य चिंतामणी महाराजांच्या दीर्घ प्रयत्नांचे व पूज्य श्री. छ्न्नुभाई महाराजास परमपूज्य चिंतामणी महाराजांकडून मिळालेल्या आशीर्वादाचे फळ आहे. मंदिरात मध्यभागी श्री दत्तात्रयांची मूर्ती श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे आहे.
माला कमंडलू रध:करपद्मयुग्मे । मध्यस्थ पाणि युगुले डमरू त्रिशुले ।
यस्यस्त ऊर्ध्व करयो: शुभ शंख चक्रे । वंदे तम त्रिवरदं भुजषट्क युक्तम् ॥
मूर्तीच्या उजव्या बाजूस श्रीमत् प. प. स. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचा मुखवटा आहे. श्रीदत्त मूर्तीचे दक्षिणेकडे श्रीमत् प. प. स. योगानंद सरस्वती स्वामीमहाराज यांची तसबीर आहे. तसेच श्रीदत्त मूर्तीचे समोर परमपूज्य चिंतामणी महाराजांची मूर्ती आहे. पुढे भव्य सभा मंडप असून सभामंडपाचे उत्तरेकडील लादणीत श्री योगानंद महाराजांचे विश्रांती स्थान असून तेथे श्री महाराजांची समाधी करून चरणमुद्रा व मुखवटा असून त्या पाठीमागे पूर्ण स्वरुपाची मूर्ती स्थापन केलेली आहे. त्याचप्रमाणे सभामंडपाच्या दक्षिणेकडील भागात परमपूज्य सद्गुरू चिंतामणी महाराजांची स्फ़टीकाची भव्य मूर्ती स्थापन केलेली आहे. उत्तरेस उंचवटयावर श्री सिध्देश्वर महादेवाचे मंदिर असून सभामंडपाच्या पुढच्या भागात राहण्यासाठी खोल्या काढल्या आहेत. या सभामंडपाचा नुकताच जिर्णोद्धार झाल्याने व श्री गुरूचरित्र कथा चित्रमय स्वरूपात सभामंडपात लावल्याने त्याची भव्यता अजून वाढलेली दिसते. पुढे महाव्दार असून खाली दक्षिणेकडे भव्य स्वरूपात भक्तांना राहण्यासाठी अद्ययावत् पध्दतीने भक्त निवास ही वास्तू परमपूज्य छ्न्नुभाई महाराजांच्या प्रेरणेने तयार झालेली असून विस्तार पावत आहे. त्यापुढे गंगेच्या काठावर घाट बांधलेला असून घाटालगतच दक्षिण वाहीनी गंगेचे विस्तीर्ण पात्र आहे. याच पात्रात प्रतिवर्षी मोठया उत्सवाच्या वेळी यात्रा भरते.
श्रीक्षेत्र गुंज येथे येण्यास मार्ग
मुंबई ते काचीगुडा रेल्वे मार्गावर मानवत रोड, सेलू किंवा परभणी येथे उतरून मोटार मार्ग गुंजे पर्यंत येता येते. तसेच माजलगाव गुंजथडी मोटार मार्ग आहे.
याशिवाय कोणत्याही मार्गे आल्यास पाथरीहून श्रीक्षेत्र गुंजेस येण्यास मोटार गाडया उपलब्ध आहेत.
जवळचे रेल्वे स्टेशन मानवत आहे. तेथून गुंज १७ किलोमीटर वर आहे. बसेस व खाजगी गाड्या आहेत.
परभणी पासून गुंज ४० किलोमीटर वर आहे.
श्रीक्षेत्र गुंज येथे होणारे वार्षिक उत्सव
प्रतिवर्षी फ़ाल्गुन वद्य १२ व १३ हे श्री योगानंद महाराजांचे पुण्यतिथी उत्सवाचे मुख्य दिवस आहेत. त्या अगोदर सात दिवस नाम सप्ताह व पालखीतून देवाची मिरवणूक काढतात. उत्सवात पालखी देवळाच्या भोवती मिरवितात. शेवटच्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगेच्या काठावर श्री महाराजांच्या पादुका व निशाण येथे पालखी नेऊन पंचपदी करतात. पाडव्याच्या दिवशी प्रक्षाळ पूजा करून देवळाच्या आवारात पालखी मिरवितात. याचप्रमाणे प्रतिवर्षि माघ वद्य ४ रोजी परमपूज्य समर्थ चिंतामणी महाराजांचा पुण्यस्मृती दिन भक्तगण मोठया संख्येने जमून गुंजेस साजरा करतात. याशिवाय दत्तजयंतीनिमित्त सात दिवस नामसप्ताह करून जयंतीचे दिवशी श्रीदत्तमूर्तीवर व श्री योगानंद महाराजांच्या मूर्तीवर गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करतात. श्री योगानंद महाराजांचा जन्मदिवसही श्रीदत्त जयंती हा आहे. दुसरे दिवशी पारणे करून पालखी देवळाच्या आवारात मिरवितात. याशिवाय दर गुरूवारी पालखी देवळातून प्रदक्षिणा करून भजन, पंचपदी केली जाते. याशिवाय महाशिवरात्रीचे दिवशी रात्रौ महादेवास व श्री दतात्रेयास यामपूजा अभिषेक करून दुसरे दिवशी पारणा केली जाते.
आषाढ शुद्ध प्रतिपदेस श्रीमत् प. प. स. वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांची पुण्यतिथि साजरी होते व दुसऱ्या दिवसापासून चातुर्मासानिमित्त श्रीदत्त मूर्तीस अतिरूद्र अभिषेक सव्वा दोन महिने करतात. त्याचप्रमाणे श्रावण वद्य पंचमीस श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा जन्मोत्सव करतात व श्रावण वद्य अष्टमीस (गोकूळ अष्टमी) परमपूज्य समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांचा जन्मोत्सव भक्तगण श्रीक्षेत्र गुंजेस जमून मोठया थाटात साजरा करतात. अतिरूद्र अभिषेकाची समाप्ती झाल्यावर श्रीसिद्धेश्वर महादेवास महारूद्र अभिषेक करतात.
श्रीक्षेत्र गुंज येथे होणारे दैनंदिन कार्यक्रम
सकाळी प्रात:समयी गंगा स्नान करून भूपाळ्या व काकड आरती व त्रिपदी भजन होते. लगेच सूर्योदया नंतर रूद्राभिषेक व देवास उपहार अपूप नैवैद्य दाखवून आरती होते. नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत सर्व ठिकाणी अभिषेक व पूजा करून ठीक बारा वाजता महानैवैद्य दाखवून मंगल वाद्यांच्या गजरात आरती करतात. या नंतर चार वाजेपर्यंत मंदिर बंद राहील. चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत एक तास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नाममंत्राचा सर्व भाविक जप करून त्याची सांगता परमपूज्य श्री चिंतामणी महाराजांच्या पुण्यस्मृतिदिनी करतात. सायंकाळी प्रदोष पूजा, अभिषेक व शांतीपाठ होतो. यानंतर सभामंडपात परमपूज्य रंगावधूत महाराजकृत दत्तबावनीचा पाठ होतो व त्यानंतर पंचपदी करून शेजारती झाल्यावर पडदे सोडतात.
सादर तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र व जागृत आहे. खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रेयांचे वैभव येथे पहाण्यास मिळते. येथे अर्चक म्हणून लाभलेला ब्रह्मवृंद अत्यंत ज्ञानी व वेदशास्त्र पारंगत आहे. दत्तभक्तांनी एखाद्या उत्सव प्रसंगी येथे जरूर उपस्थित राहून श्री गुरुंचे कृपाशिर्वाद प्राप्त करून घ्यावेत.
श्री योगानंदसरस्वती संस्थान
गुंज खुर्द, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र राज्य.
मोबाईल: ९६८९४१४०४७, ९४०३२२२२७१
ई-मेल: shriyoganandMaharajSansthan@gmail.com
Bankers: State Bank Of India
Title of Account: Yoganand Saraswati Sansthan.
A/C no: 11612674601.
IFSC: SBIN0003801