श्री क्षेत्र अक्कलकोट (प्रज्ञापुर/विद्यानगर)

स्थान: सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर.
सत्पुरूष: श्री स्वामी समर्थ.
विशेष: अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर, वटवृक्ष मंदिर, शिवपुरी, राजेरायन मठ

श्री क्षेत्र अक्कलकोट मंदिर
श्री वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट

अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर  क्षेत्र हे महाराष्ट्र आणि  कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना  पूर्ण करणारे स्वामी आज हि  येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे.

श्री वटवृक्ष मंदिर

अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने  झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच  मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात  वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कांन लावल्यावर अनेक वादयांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही  या ठिकाणी  येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण  चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थानचे ऑफिस आहे. भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगत भक्त निवासाची व्य वस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्तनिवास ५-६ इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. तेथे छोटेखानी उपहार गृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातील काही फोटो अचम्बीत करतात. येथेही स्वामींची एक मूर्ती आहे. येथे पार्किंग व राहण्याची उत्तम सोय आहे.

वटवृक्ष मंदिर अक्कलकोट

अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदीरात पोचल्यावर श्रीस्वामी महाराजांची शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत. माणसाचे अहंभाव आपसुक गळूनपडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्यअसते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रु तरळतात. ही कोणती शरणागती असते जी देताना राग लोभ मत्सर मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते, कळतनाही. असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुख दुःख, पाप-पुण्य, सारे मनोगत, मनोरथ सांगून टाकावे.बालहट्ट हट्ट धरावा. रुसावे-फुगावे, लाड करवून घ्यावे! स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन् तास पारायणाला बसतात. रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनीही गाभार्यात पोचल्यावर शांत होतात! खरच, स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होवून आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे!

"जे अनन्य भावाने मला शरण येतात, त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो."
स्वामी नाम सदा मुखी वसो. स्वामी कमलचरणी मम नित्य प्राणविसावा मिळतो.
स्वामी कमलचरणी विसावुन तरी पाहा तुम्ही सर्व प्रचिती येतसे स्वामी अभय वचनाची
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

वटवृक्ष मंदिर अक्कलकोट
श्री वटवृक्ष मंदिर

समाधी मठ 

चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे समाधी स्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुने खानी वाडा सध्या नूतनीकरण चालू आहे. जवळच  स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका या प्रासादिक वस्तू येथे दर्शनास उपलब्ध आहेत. दररोज सकाळी येथे पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा इ. धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करतांना दिसतात.

अभिषेकानंतर समाधी वस्त्रांनी पुसून त्यास सोवळे व करवतकाठी उपरणे पांघरतात. समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेऊन त्यावर फुलांची आरास करतात. हे दृश्य अतिशय नयन मनोहर असते. प्रदक्षणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो  हे मात्र नक्की. स्वामींच्या काळा पासूनच या वास्तूला महत्व आहे.

गुरूमंदिर

स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ चरणपादुका वदंड देऊन त्यास स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरूमंदिर होय. या मंदिर परिसरात  प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते. येथेही मोफत भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. प्रासादिक वस्तूंची स्पंदने सदभक्तांना जाणवतात. वटवृक्ष मंदिराचे जवळच अन्न छत्र आहे. येथे भक्तांसाठी दोनिही वेळी भोजन प्रसादाची सोय आहे. भक्त येथे ऐछिक द्रव्य दान करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करू शकतात, किंवा  देणगी देऊन वर्षातील एक दिवस अन्नदानाचे घेऊ शकतात.

अक्कलकोट जवळच श्री गजानन महाराजांची शिवपुरी आहे. तेथील पुरोहित सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतात. व त्याचा प्रसारही करतात. या स्थानास आंतरराष्ट्रीय  महत्वही प्राप्त झालेले आहे.

भक्त निवास अक्कलकोट
भक्त निवास अक्कलकोट 

अक्कलकोटचे आणखीन एक वैशिष्ठ म्हणजे  भोसले राजघराण्याचे एक मोठे शास्त्रागार येथे प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवले आहे. स्वामींचे एक भक्त राजेरायन यांचा एक मठही अक्कलकोट मध्ये आहे. येथील पादुकाही स्वामींनीच दिल्यात असे सांगितले जाते.

धन्य ती ब्रम्हांडनायकाची  नागरी !

श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी

परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज इ. स. १८५६ मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळीइ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्यवीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला (फाशी,जन्मठेप, हत्याकिंवा तोफेच्या तोंडी) बळीपडावे लागे. लोकआर्थिकदृष्ट्या दुर्बल, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशाखडतर प्रसंगी श्रीस्वामी समर्थांनी बावीस वर्षांच्या वास्तव्यात (इ.स. १८५६ ते १८७८) लोकांचा गेलेला आत्मविश्र्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्र्वास पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनीविश्र्वसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले.

मठांचा उद्देश

दत्तसंप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयातसंचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. त्यावेळीत्यांनी उपदेश केला की, "मठाचा उद्देश - मठातवेदशास्त्र चर्चा व्हावी, संसारीलोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धीवाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन,कीर्तन, प्रवचन चालू असावे, धर्मजागृतीव्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावेत हे मठाचे कार्य होय.

शिष्यांनी केलेली मठस्थापना

प्राकट्य काळात श्रीस्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून "किल्ला बांधुनि राहावे समुद्रतीरी,'  "एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही', "जेथून आलास तेथे जा" असे सांगितले. तरकाहींना काही विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनीतयार केलेल्या या ईश्र्वरनिष्ठांच्या मांदियाळीची, याज्ञात-अज्ञात शिष्यांची, प्रशिष्यांचीसंख्या सहज दोनशेच्या घरात जाईल. अष्टदिशीपसरलेल्या मराठी मुलखातील एका विशिष्ट कालखंडातील धर्म, परमार्थइतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की, इ.स. 1878 ते 1925 (स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर) पर्यंतच्याकाळात या प्रदेशात अनेक साक्षत्कारी सत्पुरुष प्रकट झाले. श्रींच्यासर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ, मराठवाडा,खानदेश, कोकण, गोवा,मध्यप्रदेश, सुरत,बेळगाव, कर्नाटक, बडोदा,मुंबई व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेकानेक मठ स्थापन केले. त्यांनीस्थापन केलेल्या मठांची, मंदिरांचीसंख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यांपैकीश्रींच्या कार्यप्रचाराने प्रेरीत काही मठांचे दर्शन करवीत आहोत.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील मठ

बाळप्पा मठ
बाळप्पा मठ 
बाळाप्पा मठ
बाळाप्पा मठ

१) श्रीगुरुमंदिर - बाळप्पा महाराज मठ, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

धारवाड जिल्ह्यातील (कर्नाटकराज्य) श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या ३० व्यावर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले. श्रींनीअनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले, "माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर. तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा. म्हणजे चांगले फळ मिळेल." त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला. प्रस्तुतमठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळप्पांनीश्रीसमाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तीध्वज फडकविण्याचा मान मिळविला. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनी ती धुरा वाहून नेली. यामठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.

स्वामीसम।धी मंदीर
स्वामीसमाधी मंदीर

२) वटवृक्ष संस्थान मठ, अक्कलकोट

श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार, जमीनविकून मंदिर बांधले. श्रीसमाधिस्थहोण्यापूर्वी जोतिबाने श्रींना विचारले, "माझे कसे होईल?' श्रीम्हणाले, "तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निध आहे." श्रींच्या हयातीत जोतिबाने 15 वर्षेव समाधीनंतर 41 वर्षेअनन्यभावे सेवा केली. आजमंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून, त्यांचेशिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे. अशीही गुरुशिष्यांची जोडी आहे. आताया मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्याभाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाचीव्यवस्था, खोल्यादेऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, "आमचे नाव नृसिंहभान - दत्तनगरमूळ' त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात.

३) श्रीस्वामी समाधी मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट

पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे. चोळप्पाच्याघराजवळ समाधीमंदिर असून, त्यातश्रींनी दिलेल्या पादुका आहेत. अक्कलकोटसंस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. तीविकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला.

४) जोशीबुवांचा स्वामी मठ, अक्कलकोट

अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत. यानियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली. त्यांनीत्या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली. तोचश्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाट या जोशी मठात होता. सध्यातो "गुरु मंदिरात' असल्याचेकळते.

५) शंकरराव राजेरायन यांचा मठ, अक्कलकोट

हैद्राबाद संस्थानातील गजांतलक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजे रायन यांचा क्षय व ब्रह्मसमंध बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन केला. जुन्याराजवाड्याजवळ हा मठ आहे. 

स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील आणखीन काही प्रासादिक स्थळे:

६. महाराजांच्या चर्मपादुका

समाधी मठच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत. सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.

७. हाक्याचा मारुती

स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर.तळघरत आजही जाता येते.

८. जंगमांचे शिव मंदिर

स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले. ३ दिवस अग्नी पेटत होता. ३ दिवसा नंतर शिवलींगाला काहीही हानी न होता, ते अधिच तेजस्वी झाले.

९. मुरलीधर मंदिर

मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले 'स्वामीसुत' ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले होते. स्वामींच्या दर्शनास गेलेल्या एका श्रीमंत भक्तास स्वामी म्हणाले ''माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे रोषणई कर.'' गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसुत!

१०. शेखनूर दर्गा

 स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकांना स्वामी सांगत की दर्ग्यावर चदर चढवा. तिथल्या फकीराना भोजन द्या.

११. मालोजीराजांचा किल्ला

महा दरवाजावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्. आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक लहानसे  शस्त्रास्त्रांचे संग्रहालयही आहे.

१२. शिवपुरी

सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय? इ. महत्वाची माहिती यएथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे. 

श्रीमहारुद्ररावांची समाधी
श्रीमहारुद्ररावांची समाधी

१३. श्रीमहारुद्ररावांची समाधी (श्रीचोळाप्पा महाराजांचे वाड्यातील श्रीमहाराजांच्या समाधी मठासमोर)

मोगलाई प्रांतात जोगाई आंब्यानजीक केज गावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले उत्पन्न श्रींचे कृपेने परत मिळाल्यानंतर तसेच घराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर ते अक्कलकोटला गेले. श्रींपुढे दहा हजार रुपये ठेवल्यानंतर श्री हसले व म्हणाले, "आम्हांस रुपये नको! जा नीघ घरी! घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव." पुढे देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर उकिरड्यावर पादुका मठ स्थापन केल्या. श्रीस्वामींच्या लौकिक समाधीलीलेनंतरही श्रीस्वामींनी महारुद्ररावांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या केज येथील घरी जाऊन सगुण दर्शन दिले, ही बाब श्रीस्वामीरायांच्या 'हम गया नहीं, जिंदा है|'' ह्या वचनाची साक्षच देतात! आजही त्यांच्या वंशजांमार्फत मठाची सेवा अखंडित चालू आहे.

या क्षेत्री असे जावे

अक्कलकोट (सोलापूर, महाराष्ट्र)-

अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेलीया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीने लगेचस्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. ३००वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले. एका लाकूड तोड्याने झाडतोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले. फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले. तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे. त्यांचे वास्तव्यनेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. त्यावेळचे इंग्रजपत्रकार व इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की, आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे. स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजतासमाधी घेतली. 

अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे. 

वटवृक्षस्वामी महाराज ट्रस्ट,
अक्कलकोट, जि. सोलापूर
फोन- (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.

स्वामी पादुका अक्कलकोट
स्वामी पादुका अक्कलकोट

परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य भक्तशिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज विरचित “भजनानंद लहरी अभंग” मध्ये आपल्या स्वामी भक्तांना सांगतात;

जारे जारे जारे अक्कलकोटीं जारे ।। साधोनियां घ्यारे आपुल्या हीता ।। १ ।। 
यारे यारे यारे मनोभावें यारे ।।  शांतिसुख घ्यारे पायांपाशीं ।। २ ।। 
घ्यारे घ्यारे घ्यारे स्वामीनाम घ्यारे ।। दूर होती फेरे चौऱ्यांशीचे ।। ३ ।। 
न्यारे न्यारे न्यारे शुद्ध भाव न्यारे ।। मेळउनी घ्यारे मोक्षपदा ।। ४ ।। 
आनंद म्हणे तरी सोय दवडू नका ।। सांगतसे सुखालागीं तुमच्या ।। ५ ।। 

अक्कलकोट मोक्षधाम !

अमरकोट भलें अक्कलकोटा नांव । जेथे स्वामीराव वसतसे ॥१॥
अद्भूत चमत्कार दाखविले दृष्टीं । तोचि जगजेठी-विश्वपाळ ॥२॥
जाऊनियां तेथे रूप तेचि पाहावें । सेवेसी लागावें, मनोभावें ॥३॥
नरनारी तुम्हीं हेचि काम करा। मनोरथ पुरा होय येणें ॥४॥
स्वामीसुत म्हणे अमरकोट गांव । शोभतसे नांव स्वामीसत्तें ॥५॥

श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 

आजच्या आपल्या अभंगाद्वारे श्री स्वामीसुत महाराज अक्कलकोट भूमीचे महत्व प्रतिपादन करत आहेत. अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे ! हे समजावून सांगतानाच मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत. स्वामीसुत सांगतात, या भूतलावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एकमेव मोक्षधाम बनले आहे. त्यामुळे या अक्कलकोटाला अमरकोट हे नाव शोभून दिसते. जो अक्कलकोटी येऊन, स्वामी चरणी विसावतो तो अमर होतो, तो मोक्षाचा धनी होतो. जगात इतरत्र मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या लागतात. अनेक खडतर असे अनुष्ठान करावे लागतात. पण अक्कलकोट हे भूतलावरील एकमेव असे ठिकाण आहे, येथे केवळ स्वामी दर्शनाने मोक्ष प्राप्ती होते. येथे येणारा प्रत्येक जीव हा अमर होतो. म्हणून अक्कलकोट हे अमरकोट आहे. असे स्वामीसुतांना वाटते.

या अक्कलकोटात श्री स्वामी देवांनी अनंत अद्भुत चमत्कार लोकांना दाखवले आहेत. हे चमत्कार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहणारे लोक धन्य धन्य आहेत. ज्यांना प्रत्यक्ष विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या परब्रह्माच्या लीला पाहण्याचे सद्भाग्य लाभले. जो सर्वं जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयास कारणीभूत आहे. त्या जगजेठी स्वामींच्या समवेत राहण्याचे आणि त्यांचा सहवास लाभण्याचे भाग्य मिळणारे प्राणी देवांनाही वंदनीय आहेत. एवढे अक्कलकोटीच्या लोकांचे परमभाग्य आहे. हे भाग्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण ही अक्कलकोटी जाऊन स्वामींचे पवित्र पावन आणि सर्वांगसुंदर रुप पाहून स्वत:ला धन्य करून घ्यावे. तेथे जाऊन स्वामींची मनोभावे सेवा करावी. आपल्यातील षडविकारांचा त्याग करून, स्वामी महाराजांना पुर्णपणे शरण जावे. स्वामींची चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी. स्वामी नामाचा जयघोष करावा. सर्व स्त्री-पुरुषांनी हेच एक व्रत अंगिकारावे, स्वामींच्या सेवेत आपले चित्त एकाग्र करावे. स्वामी उपासनेलाच आपली स्नान संध्या मानावे. याने आपले सर्व मनोरथ पुर्ण होतील. आपल्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होतील. *स्वामी महाराज हे कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला हवे ते अगदी सहज देतात. ज्या स्वामींनी ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे, त्यांना अशक्य असे काहीच नाही. जे ईतर कोणालाही शक्य नाही, ते सुध्दा स्वामींना शक्य आहे. म्हणून ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ असे म्हटंले जाते. तेव्हा आपण मनातील सर्व शंका दुर करून स्वामींना शरण जावे, स्वामी आपली नौका नक्कीच पैलतीरी नेतील. असा विश्वास स्वामीसुत व्यक्त करतात.

श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 

ब्रह्मांडनायक स्वामी महाराज दीनांचे कैवारी आहेत, भक्तकाजकल्पद्रुम आहेत. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वंयपुर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच ‘।।श्री स्वामी समर्थ।।’ हे नाव शोभून दिसते. अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत आणि पवित्र पावन झालेले अक्कलकोट हे भूवैकुंठ म्हणून नावारुपास आलेले आहे. *जसे भगवान विष्णुचे वैकुंठधाम हे मुक्तीचे माहेर घर आहे, तसेच अक्कलकोट हे सुध्दा स्वामींच्या पदस्पर्शाने मुक्तीचे माहेरघर बनले आहे. पुर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले. तेच अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याने आता अक्कलकोट ऐवजी अमरकोट म्हणून शोभून दिसत आहे. स्वामी कृपेने जो अक्कलकोटी येईल तो मुक्तीचा वाटेकरी होत आहे. तेव्हा अगदी सहजतेने मुक्ती देणारे हे गांव समर्थ कृपेने अमरपूर किंवा अमरकोटच बनले आहे.

अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष ८४ योनींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात.

सज्जनहो, पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या २३ वर्षांच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे. तेथील चराचरात आणि मातीच्या कणांकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे. तेथिल प्रत्येक घर आणि प्रत्येक मंदिर हे स्वामींच्या लीलेचे साक्षीदार आहेत. तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुध्दा स्वामींच्या अस्तिवाची साक्ष देत उभा आहे. याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असे, या वृक्षाचे भाग्य ते केवढे थोर म्हणावे, जेथे परब्रह्म विसावा घेत असे. आज हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तिवांचे आणि अगाध शक्तींचे गुणगात गात दिमाखाने डौलत उभा आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करुन घेण्यासाठी अथवा मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अक्कलकोटी जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. स्वामींच्या दारातील चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी. या वटवृक्षाखाली ध्यान करावे, याने आपला हा नरदेह सत्कार्या लागेल. आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल. स्वामी कृपेने आपण ही अमरधामाचे वाटेकरी होऊ आणि जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात स्वामी लोकांत स्थान प्राप्त करून घेऊ.

स्वामी समर्थ पादुका
स्वामींच्या मूळ पादुका अक्कलकोट
अन्न छत्र मंडळ
अन्न छत्र मंडळ

 

anachatra akkalkot
अन्न छत्र, अक्कलकोट
गाणगापुर रस्त्यावरील सुसज्य भक्तनिवास अक्कलकोट
गाणगापुर रस्त्यावरील सुसज्य भक्तनिवास अक्कलकोट
श्री स्वामी समाधी, अक्कलकोट
श्री स्वामी समाधी, अक्कलकोट