प. प. श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज

जन्म: कोजागिरी पौर्णिमा १८७०. गंगोपाध्याय.
आई/वडील: नवदुर्गादेवी/तारिणीचरण.
गुरु: प. प. गंगाधरतीर्थ स्वामी महाराज, अनुग्रह- अक्षयत्रीतीया १८८६.    
कार्यकाळ: १८७०-१९३५.
समाधी: १९३५.

नारायण तीर्थ स्वामी महाराज
प. प. श्रीनारायणतीर्थदेवस्वामी महाराज

प. प. श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज म्हणजे शक्तिपात योगाचे प्रवर्तक. त्यांच्या द्वारा हा मार्ग समाजाला सहज उपलब्ध झाला. याचे श्रेय श्री नारायणतीर्थ देवांना आहे.

जन्म व बालपण 

श्री नारायणतीर्थ देव यांचे पूर्वाश्रमीचे घराणे गंगोपाध्याय आडनावाचे होते. तारिणीचरण हे त्यांचे वडील, अत्यंत धर्मनिष्ठ परंतु शांत वृत्तीचे होते. त्यांची आई नवदुर्गादेवी यासुद्धा धार्मिक वृत्तीच्या आणि सात्त्विक गुणांच्या होत्या. हे गंगोपाध्याय कुटुंब पूर्व बंगालमध्ये फरीदपूर जिल्ह्यात मांड्रसार गावी राहत होते. या कुटुंबाचा ‘शील’ हा एकमेव अलंकार होता. बाकी फुटका मणीसुद्धा घरात नव्हता. अतिथ्य व्रताचे कटाक्षाने पालन करणारे मातापिता रोजच्या अन्नाला महाग असत. पण साधू संन्याशी या घरासमोरून कधी विन्मुख जात नसत. अशा या नित्याच्या अग्निदिव्याने तीर्थरूप तारिणीचरण आणि मातृदेवता दुर्गादेवी यांच्या तपश्र्चर्येला तेज चढत होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इ. स. १८७०मध्ये तारिणीचरणपिताजी झाले. नवदुर्गादेवी माता झाली. तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. बारशाला बालकाचे नाव विप्रदेवशर्मा ठेवले. पण कालीकिशोर हे लाडके नाव पुढे रूढ झाले. घरची गरिबी असल्याने कोडकौतुक बेतानेच होई. सर्व उणीवा भावनेच्या श्रीमंतीने भरून निघे. चांगल्या गुणांचा कस गरिबीमध्ये लागतो. श्रीमंत भावनेच्या ओलाव्याने गुणांना बाळसे चढते. कशाची अपेक्षा नसते. आहे त्यात संतोष असतो. वासनांचा पाय मोडून मोडून त्या पांगुळल्या होतात. येईल ती स्थिती सहन करण्याच्या सवयीने सहनशीलता येते. भोवताली सतत अडीअडचणी असल्यामुळे आधाराला देवच घ्यावा लागतो. हे सगळं गरिबीमुळे घडते. गरिबीचे देणे फार मोठे असते पण घेईल त्याला! सर्वांना ती नकोशी असते!

प. प. श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज
प. प. श्री नारायणतीर्थ स्वामी महाराज

उपासना व अनुग्रह 

कालीकिशोरची विरक्त प्रवृत्ती होती. अक्षर ओळख होऊन वाचता येऊ लागल्यापासून धार्मिक ग्रंथांचे वाचन तो मनापासून करी. याहीपेक्षा भगवद्भजनात तो लवकर तल्लीन होत असे. त्याला साधे राहणे आवडत असे. कपड्यांची हौस नव्हती. आहार लहानपणापासून छोटा होता. वयाच्या ८व्या वर्षी मुंज झाली आणि गायत्रीच्या उपासनेचा अधिकार प्राप्त झाला. या अधिकाराच्या कालीकिशोरने पुरेपूर वापर केला. अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने गायत्रीची खूप उपासना केली. मूळचे तेज या उपासनेने अधिक तेजाळले.

कालीकिशोरच्या लग्नाचा विषय सुरू झाला. तारिणीचरणांनी चंग बांधला. नवदुर्गादेवीने तर लग्न केलेच पाहिजे म्हणून हट्ट धरला. परिस्थितीने कालीकिशोरवर मात केली. इच्छा नसताना वयाच्या अठराव्या वर्षी कालीकिशोर विवाहबद्ध झाला. सरोजिनीदेवींचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पारमार्थिक मार्गामध्ये संसाराच्या जबाबदारीची भर पडली.

अशाच एका प्रसंगी कालीकिशोर योगसाधनेबद्दल चर्चा करीत होते. उत्तर देणारी व्यक्ती योगाभ्यासी होती. त्या व्यक्तीने सांगितले, "योगसाधना वाटते तेवढी सरळ, सोपी नाही, त्यालासुद्धा त्यागाची आवश्यकता आहे. विषयांचा त्याग केल्याखेरीज का कोणाला योगी होता येईल ? आणि योग सिद्धीशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य आहे." या उत्तराने कालीकिशोरच्या मनाला पुन्हा उपरती झाली. आपल्याला पुढे जायचे असेल तर त्याग केला पाहिजे. हे पाश तोडले पाहिजेत. विचारचक्राला गती मिळाली आणि निश्र्चयाला बळ आले. एकेदिवशी कालीकिशोरने नोकरी सोडली. पुन्हा तो घराबाहेर पडला. जगन्नाथपुरीमध्ये अनेकांच्या भेटीगाठीत कराली ब्रह्मचारी या तरुणाची गाठ पडली होती. त्याने कालीकिशोरची तळमळ पाहिली आणि एका झोपडीचा पत्ता दिला. कालीकिशोरने आग्रह धरला आणि कराली ब्रह्मचारी बरोबर त्या झोपडीकडे तो निघाला.

चंदन तलावाच्या काठाकाठाने ते चालले होते. गर्दी मागे पडत होती. पायवाट फुटली तेथून तर निवांत वातावरण सुरू झाले. शांत निसर्गरम्य वातावरणाने भगभगलेले डोके शांत होत होते. अस्वस्थ चित्ताला हुरूप येत होता. होता होता एका साध्या पर्णकुटीजवळ दोघे येऊन पोहोचले. सारे वातावरण साधे, निर्मल व पवित्र होते. कुणाची ये-जा नाही, गडबड नाही. अवडंबर नाही की झगमगाट नाही. त्या प्रगाढ शांत वातावरणानेच कालीकिशोर शांत झाला. मनाला ओढ लागली. दारात प्रवेश करताच समोर आसनस्थ मूर्ती दिसली. कालीकिशोर तेथेच थबकला. भगवी वस्त्रे परिधान केलेली शांत, गंभीर, प्रसन्न मूर्ती पाहून तो मंत्रमुग्ध झाला. चित्ताची अस्वस्थता घड्याळाचे काटे थांबावेत तशी, एकदम नाहीशी झाली. त्याला खऱ्या सद्गुरूची आज प्रचीती आली. एकाएकी अष्टसात्विक भाव जागृत झाले. कालीकिशोरने चार-दोन पावले झपाझप आत टाकली. साष्टांग नमस्कार श्रीगुरूदेवांच्या समोर घातला. श्रीगुरूदेवांनी बसण्यास हातानी खूण करून सांगितले. त्याप्रमाणे कालीकिशोर जवळच एका बाजूला बसला.

हे श्री गुरुमहाराज म्हणजे प. प. श्री गंगाधरतीर्थ स्वामी महाराज होत. त्यांच्या केवळ दर्शनाने त्याच्या चित्ताला शांतता दिली. सत्पुरुषांचे दर्शन शीतलता देते. सत्पुरूषांचा सहवास सुखाचा अनुभव देतो. त्यांचा परिसर तीर्थक्षेत्राचे स्थान होते. त्यांच्या वास्तव्याने ती भूमी सिद्धभूमी होते. तिथले पाणी चैतन्य देते. तिथला वारा शक्तीला ऊर्ध्वगामिनी करतो. संतांचा सहवास दिव्य असतो. संतांचे दर्शन भव्य असते. संतांच्या वाणीत अमृताचा वर्षाव असतो. अनंत जन्माचे कष्ट आणि क्लेश संतांच्या निमिषमात्र नेत्रकटाक्षाने शांत होतात. कालीकिशोरचे मन या वातावरणाने भारावले गेले. मनात कुठलाही प्रश्न निर्माणच होत नव्हता. सारे कसे शांत शांत वाटत होते. एके दिवशी अचानक सारे काही जमून आले. कालीकिशोरने दीक्षेची प्रार्थना करण्यास आणि श्रीगुरुदेवांना ती पूर्ण करण्याची इच्छा होण्यास एकच गाठ पडली.

श्रीगुरुदेव म्हणाले, "थांब तुला मी असे देतो की माझ्यासारखा होऊन जाशील."

इ. स. १८८६- अक्षयतृतीयेचा पर्वकाल दीक्षेसाठी ठरविला. त्या दिवशी क्षौर स्नानादि करण्यास कालीकिशोरला सांगितले. काही फुले घेऊन ये म्हणून सांगितले. ती फुले हीच गुरुदक्षिणा. दीक्षेच्या वेळी स्वामीमहाराजांनी कालीकिशोरच्या हातून फुलांचा स्वीकार केला. समोरच्या आसनावर बसण्यास सांगितले. कालीकिशोरने गुरुदेव स्वामीमहाराजांना साष्टांग नमस्कार केला. त्यांचे पाय घट्ट धरले. गदगदित हृदयाचे भाव अनावर झाले. मस्तक स्वामींच्या पायावर ठेवले आणि भावोत्कट आनंदाश्रूंनी पाद्यपूजा केली. स्वामींनी कालीकिशोरची पाठ थोपटून शांत केले. आसनावर बसताना स्वामी म्हणाले, "मी आज तुला मंत्रसहित योगदीक्षा देत आहे. आपण साक्षी आहोत. जे होते ते पहाणे एवढेच आपले काम. हे भाव आज जागृत झाले आहेत. ते जेव्हा परिपक्व होतील तेव्हा ज्ञानाची पराकाष्ठा झाली असे समज. ते ज्ञानाचे लक्षण आहे."

दुसऱ्या दिवशी गुरुदेवांनी कालीकिशोरला बोलावले आणि त्याला उपदेश करू लागले.

"हे पहा कालीकिशोर, तू माझ्याशी खोटे बोललास ! तू म्हणालास तुला कोणी नाही. पण - ते खोटे सांगितलेस ! तुला आई-वडील आहेत. बहीण भाऊ आहेत. फार काय तुला पत्नीपण आहे. तुझ्या दृढ आग्रहास्तव मी तुला ब्रह्मज्ञान प्राप्तीची दीक्षा दिली. परंतु आता तू येथे राहू नकोस. आपल्या घरी जा. ज्ञानसंचय कर. स्वाध्याय आणि साधना कर. प्रथम तुला तुझे प्रारब्ध भोगले पाहिजे. तुझ्या कुटुंबियांची जबाबदारी तुला पार पाडली पाहिजे. तुला मी जे साधन दिले आहे ते साधनच तुला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. जेव्हा तुझ्यात अधिकार निर्माण होईल तेव्हा आपोआप तुला संन्यास प्राप्त होईल."

"घरी जा" या आज्ञेने कालीकिशोर अवाक् झाला. वास्तविक ज्या दिव्य जीवनाचा संकल्प कालीकिशोर रचित होता त्याच्या प्रखरतेची जाणीव आणि स्वत:ची प्रतिकूलता याचा अंदाज नीट बांधता आला नसावा. त्याला नेमके काय करावे ते सुचेना. कालीकिशोरने श्रीगुरुदेवांच्या चरणावर लोटांगण घातले. क्षमा मागितली आणि आपल्या चरणाजवळ ठेवून सेवा घ्यावी व साधन पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना केली.

यावर गुरुदेव स्वामीमहाराजांनी केलेला उपदेश मननीय आहे.

"हे पहा कालीकिशोर, तुला माहीत नाहीत असे अनेक भोग भोगले पाहिजेत. तुझे ते भोग मला माहीत आहेत. मला ते दिसतात. जोपर्यंत भोग, वासना संपत नाहीत तोपर्यंत संन्यास होऊ शकत नाही. संन्यासी जीवनाची काषाय वस्त्रे मनात अभिमान निर्माण करतील तर त्या उदात्त जीवनापासून पतित होण्याचीच भीती जास्त. ती वस्त्रे, रुद्राक्षाच्या माळा हे बाह्य अवडंबर आहे. त्याचे आकर्षण, अभिमान, अहंकार, दंभादि दोष निर्माण करतात. जोपर्यंत मनातील वासना नष्ट होत नाहीत तोपर्यंत मनुष्य संसारीच असतो. वासना नाहीत तो संन्यासी. तू संन्याशाच्या अवडंबरावर भुलला आहेस. हा खरा संन्यास नव्हे. परमेश्र्वराची कृपा आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर साधन भजन करीत ज्ञानाची परिपक्व स्थिती येते. ती वेळ संन्यास ग्रहणाची आहे. याशिवाय सारे संन्याशी उदरपूर्तीचे दासानुदासच म्हटले पाहिजेत. मी तुला ढोंगी संन्याशी बनण्यासाठी दीक्षित शिष्य केले नाही. समर्पण बुद्धीने, प्रारब्धकर्म भोगत भोगत, श्रद्धेने आणि विश्वासाने साधनेचा अभ्यास केला पाहिजे. मी तुला जे दिले आहे तेच तुला संन्यास धर्माच्या मानसिक स्थितीला घेऊन जाईल आणि खरा संन्याशी बनवील. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.

तू माझ्याजवळ राहिलास तर मोठ्या निष्ठेने आणि श्रद्धेने सेवा करशील याची मला जाणीव आहे. तुझ्यासारख्या श्रद्धाळू, सेवातत्पर आणि परमार्थी शिष्याला कोणता गुरू सोडू इच्छील? तुला जवळ ठेवावे असे मलाही खूप वाटते. तुझ्यापासून मलाही खूप समाधान मिळेल. पण! पण ते अशक्य आहे. त्याबाबतीत माझा इलाज चालत नाही. तुझे प्रारब्ध, भोगवासनांची आंतरिक स्थिती पाहता तुला जवळ ठेवणे हे गुरु म्हणून उचित होणार नाही. आमची जबाबदारी आहे की शिष्याचे कल्याणच व्हावे. आज ज्या गोष्टीचा तुला अंदाज नाही त्या मी प्रत्यक्ष पाहू शकतो आणि म्हणूनच कर्तव्य कठोर व्हावे लागत आहे. पण तू चिंता करू नकोस. यात तुझे कल्याणच आहे.

जगन्नाथपुरीहून कटकच्या दिशेने कालीकिशोर निघाला. मध्यंतरी ‘कण्ठेलू’ नावाचे एक सुंदर गाव लागले. त्या गावाजवळून महानदी जात होती. नदीच्या किनाऱ्यावरचे छोटे, शांत, निसर्गरम्य गाव पाहून कालीकिशोरची चित्तवृत्ती पुन्हा अंतर्मुख झाली. शक्तीसंचाराची तीव्र अनुभूति होऊ लागली. त्या गावातून बाहेर पाय निघेना. नदीकाठी एका शिवालयाजवळ सुंदर गुहा होती. तेथे मुक्काम केला. ती गुहा मोठी होती. तेथे एकांत होता. ती साफसूफ केली आणि तिन्ही त्रिकाळ साधना सुरू केली. त्या ठिकाणी कल्पनातीत अद्भूत अनुभव कालीकिशोरला येऊ लागले. त्या अनुभवामुळे त्याची गुरुदेवांवरची श्रद्धा अढळ झाली. आपल्याला श्रीगुरुमहाराजांनी अलौकिक दिव्य शक्ती दिली आहे, आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे असा पूर्ण विश्वास बसला. साधनेमुळे त्याच्यामध्ये तेज निर्माण झाले. त्यांच्याकडे पहाताच लोकांच्या मनात आदर निर्माण होऊ लागला. अपेक्षा नसताना लोक त्यांचेकडे येऊ लागले. होता होता ‘कण्ठेलू’ गावात कीर्तीचा सुगंध दरवळू लागला.

श्री नारायणदेव घरी आले. आईचे दर्शन घेतले. पायावर डोके ठेवले. आईने डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला. तिला धन्य धन्य वाटले. तिने सारी पुण्याई त्याला देऊन टाकली. कल्याण होईल म्हणून आशीर्वाद दिला. कुठे होतास इतके दिवस ! मी किती वाट पहात होते ! तुला देवानेच घरी पाठविले म्हणून तू आलास हे खरे ना ? श्री नारायणदेव म्हणाले, ‘होय आई ! तू म्हणतेस ते खरे आहे. मला देवानेच घरी पाठविले. संसार कर, आईवडिलांची सेवा कर, तुझे कल्याण होईल म्हणून आशीर्वाद दिला.’ हे ऐकून आईचे डोळे आनंदाने पाणावले.

श्री नारायणदेवांचे बाह्यत: सांसारिक जीवन सुरू झाले. नोकरी मिळण्यास फार कालावधी लागला नाही. गुरुकृपेमुळे सर्वत्र सुलभता येऊ लागली. एका जमीनदाराकडे नोकरी मिळाली. रुपये आठ दरमहाचा पगार ठरला. दिवस स्वस्ताईचे होते हे खरे, पण फक्त आठ रुपयांत अन्नवस्त्राची जेमतेम सोय भागणार होती. यापेक्षा अधिक स्वास्थ्य मात्र त्यातून मिळणे शक्य नव्हते. या मिळकतीमध्ये बसेल असा संसार सुरू झाला. परमार्थ मात्र फारच सुरळीत सुरू झाला. प्रतिदिन साधनेतून अध्यात्माचे धडे घेतले जात होते आणि नित्याच्या संसारात ते उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. सात्त्विक गुणसंपदा कणाकणाने समृद्ध होत चालली होती. सर्व कसे ठाम निश्चयाने चालले होते. गुरूकृपेने त्याला सहजता आली होती. साधनेत जे कळत होते ते संसारात वळत होते. खरे अध्यात्म घडत होते. प्रवृत्ती दिसत होती. पण अंतर्यामी पूर्ण निवृत्ती बाणत होती. अनेक दिव्य दर्शने साधनेतून होत होती.

सिद्ध साधनेची परिणती 

कालीकिशोर यांना इ. स. १८८६च्या वैशाख मासातील अक्षयतृतीयेला शुक्रवारी श्रीगुरुकृपेचा अनुग्रह झाला. श्रीगुरुदेव प. पू. श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराज यांनी शक्तिपात दीक्षा दिली. त्या क्षणापासून जागृत झालेल्या भगवती कुंडलिनी शक्तिमातेचे कार्य सुरू झाले. तिचे कार्य केवळ ‘स्वसंवेद्य’ आहे. ज्याचा अनुभव त्याला इतरांना त्या अनुभवांचा तसा उपयोग नाही. शक्तिमातेचे कार्य स्वत:ला जाणवत असल्याने जीवाला त्याची गोडी लागू लागते. शक्तीच्या क्रिया मनाला व शरीरालाही सुख व आनंद देत असतात. मग जीवाची प्रवृत्ती तिकडे अधिकाधिक वळू लागते. साधन वाढते. अनुसंधानही वाढते. मनावर या अंतर्गत क्रियांचा प्रभाव पडतो. मनाला गोडी लागली म्हणजे मनाचा तिथे लय होऊ लागतो.

यानंतर एक शुभ दिवस त्यांनी पाहून ठेवला. आपल्या पत्नीला, बहिणीला आणि छोट्या भावाला सर्वकाही समजावून सांगितले. त्यांना स्नानादि करण्यास सांगितले. कालीमातेची पूजा करून पुष्पमाला अर्पण करण्यास सांगितले. श्रीफल दक्षिणा म्हणून समर्पण करून प्रत्येकाला आपापल्या आसनावर बसण्यास सांगितले. प्रत्येकाने श्रद्धेने कालीकिशोरांना साष्टांग नमस्कार केला. आजपासून सर्वांचे सद्गुरू ते होणार होते. पहिल्या नात्यापेक्षा फार मोठे जन्मांचे नाते आज निर्माण होणार होते. "प्रपंचाच्या चक्रामधून पार करणारे आपले पती / भाऊ आता आपल्याला भवसागरातून पण पार करणारे गुरुमहाराज होणार आहेत," या सश्रद्ध विचारात ते आपापल्या आसनावर बसले.

‘डोळे बंद करा’ हे वाक्य कालीकिशोरांच्या तोंडातून बाहेर पडले. तिघांचे डोळे मिटले गेले. कालीकिशोरांच्या श्र्वासोच्छवासाच्या क्रियांचा वेग वाढला. प्रत्येकाच्या मस्तकावर उच्छवासाच्या मंगल धारा कोसळत होत्या. त्याबरोबर दिव्य आनंदाचे कल्लोळ उसळत होते. सारे घर शक्तीसंचारीत झाले. याप्रमाणे गुरुदेवांच्या कार्याचा श्रीगणेशा इ. स. १९१० मध्ये झाला.

पुढे येथेच प. प. श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराजांचे समोर परंतु श्रीमद आत्मानंदांकडून योगेशचंद्रांना शक्तीपात दीक्षा झाली. आपल्या गुरुसह थोरल्या गुरुदेवांची सेवा करण्यासाठी ते येथे राहिले. ६-७ वर्षे या आश्रमात ही गुरुशिष्याची जोडी श्रीगुरुदेवांची सेवा करण्यासाठी राहिली.

इ. स. १९१३ ते १९२० पर्यंतच्या काळात श्री नारायणतीर्थ देव स्वामींचा शिष्यवर्ग बराच वाढला. लांबलांबचे भक्त येऊ लागले. पुन्हा आश्रमाची जागा अपुरी पडू लागली. सोयीच्या स्थानाची गरज वाटू लागली. स्वामींनीसुद्धा शिष्यांना संमती दिली. शिष्यमंडळींनी सर्व विचार केला. एक उत्तरम गाव पाहिले. वाहनांच्या सोयीचा विचार केला. नदीतीर पाहिले. भरपूर जागा पाहिली आणि मदारीपूर येथे ‘ज्ञान साधन मठा’चे स्थानांतर केले. १९२० नंतर श्रीमदात्मानंदब्रह्मचारी यांनी काशी क्षेत्री आपल्या गुरुदेवांना मुद्दाम आणले होते. काही काळ काशी क्षेत्रात श्रीगुरुदेवांचा सहवास अनेक शिष्यांनी घेतला. त्यामध्ये श्री चिन्मयानंद सरस्वती आणि श्री योगानंद हे शिष्य होते. त्या काळात सद्गुरुसमवेत सर्व गंगास्नान करीत व मोठ्या आनंदात दिवस घालवीत.

समर्पक शब्दात स्वामींनी सर्वांचे सांत्वन केले. नंतर काही वेळ शांत, स्थिर आसन लावून बसले. थोड्यावेळाने "सर्व खल्विदं ब्रह्म" "सर्वं खल्विंद ब्रह्म" या महावाक्याचा चार वेळा उच्चार केला. नंतर शेवटचा उच्छवास ‘ॐ’ असा प्रणवाच्या उच्चाराने सोडला आणि परमपद गाठले. सर्व शिष्यांच्या समोर बसून, याप्रमाणे स्वामींनी सर्वांचा कायमचा निरोप घेतला. इ. स. १९३५ मध्ये ही घटना घडली. ज्ञान साधन मठाच्या पवित्र भूमीवर पार्थिव शरीराचा त्याग करून श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज ब्रह्मलीन झाले. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने श्रीमती सरोजिनीदेवींनी आपलाही नश्वर देह पराशक्तीमध्ये विलीन केला. त्यांनीही देवीच्या नामस्मरणामध्ये आपला अंतिम श्र्वास सोडला.