प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर

श्री  गोविंद काका उपळेकर महाराज समाधी फलटण
श्री  गोविंद काका उपळेकर महाराज समाधी, फलटण

नाव: प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर              
जन्म: माघ शुद्ध २ शके १८०९ इ. स. १५ जानेवारी १८८८                                                                         
आई/ वडील: सौ अंबाई / श्री रामचंद्र उपलेकर या सत्वाशील दाम्पत्यापोटी                                                           
पत्नी: सौ दुर्गाताई (लग्नानंतर सौ रुख्मिणी)                                                                                                  
गुरु: श्री कृष्णदेव महाराज, पुसे सावळी                                                                                                       

जन्म व बालपण

प. पू. गोविंद महाराज यांचा जन्म माघ शुद्ध २ शके १८०९ दि १५ जानेवारी १८८८ ला श्री रामचंद्र व सौ अंबाई उपळेकर या सुशील दाम्पत्याचा पोटी झाला त्यांचे शालेय शिक्षण मुधोजी हायस्कुल फलटण व नु म वि विद्यालय पुणे येथे झाले नंतर पुढील उच्च शिक्षण बी जे मेडिकल स्कुल पुणे येथे होऊन १९१० साली ते एल पी सी एस परीक्षा उत्तीर्ण झाले सन १९१३  साली त्यांचा विवाह शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे घराण्यातील दुर्गा यांच्याशी झाला लग्नानंतर दुर्गा यांचे नामकरण सौ रुक्मिणी असे झाले त्यानंतर इंडियन मेडिकल सर्व्हिस मध्ये कमिशन मिळवून लग्नानंतर वर्षभरात ते सैन्यात शुश्रूषा विभागात दाखल झाले सन १९१४ मधील पहिल्या जागतिक महायुद्धात ते इंग्लड मध्ये गेले इंग्लड युरोपातील उत्कृष्ट कामगिरीनंतर आफ्रिकेतील नैरोबी येथे त्यांची नेमणूक झाली ब्रिटिश सर्जनचा तोडीची घायाळ सैनिकांची मनोभावे, अविश्रांत, तत्पर सेवा गौरवास्पद ठरली इंग्रज सरकारने या अलौकिक कामगिरीबद्दल रौपय व सुवर्ण पदक महाराजांना प्रदान करून सन्मानपूर्वक गौरव केला महायुद्ध समाप्तीनंतर उत्तर हिंदुस्थानात रावळपिंडी येथे त्यांची नेमणूक झाली.                                                              

प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर
प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर

गुरुचा शोध

ये हृदयीचे ते हृदयी

युद्ध भूमीवरून मरणोन्मुख व भीषण अवस्थेत आलेल्या शेकडो जवानांच्या देहावर दररोज शस्त्र क्रिया करण्याने देहाच्या क्षण भांगुरतेची तीव्र जागृत जाणीव महाराजांना बोचत राहिली व या आकस्मिक आलेल्या विरक्तीने त्यांची वृत्ती अतीव अंतर्मुख झाली मानवी जीवनाच्या शासवत ध्येयाचा चिंतनशील शोध घेऊ लागली चिंतन मननाच्या असीम एकाग्रतेमध्ये नैरोबी ते रावळपिंडी पर्यंतच्या कालावधी मध्ये महाराजांना स्वप्नामध्ये दिगम्बर अवस्थेतील दिव्य महापुरुषांचे रोमांचकारी दर्शन घडत असे स्वप्न दर्शनाचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडविणाऱ्या मौलिक क्षणाची त्यांना आतुरता लागली 'भेटी लागि जीवा लागलीसे आस' अशा व्याकुळ मन: स्थितित स्वप्नातील लोकोत्तर विभूतीच्या ठावठिकाणाचा शोध घेण्यात मन मनोमय दंग झाले १९२० मध्ये रावळपिंडीहून फलटणला रजेवर आल्यावर फलटण निवासी रावसाहेब गोविंदराव रानडे यांचे हार्दिक सहकार्याने व मार्गदर्शनाने महाराज पुसेसावळी जि सातारा येथे गेले  स्वप्नात दिसलेला महापुरुष प्रत्यक्ष दिसताच अंतरीची खूण पटली व 'दिसो परतत्व डोळा रीघो महाबोध सुकाला' या पिपासेने झपाटलेल्या उतकण्ठतेने महाराज व सद्गुरूंची प्रथम भेट झाली व पूज्य गोविंद महाराजांचे भानच हरपले व श्री सद्गुरू चरणारविंदशी समर्पित धागे जुळले गुंतले ते कायमचे हा दिव्य महापुरुष म्हणजेच पुसेसावळी चे श्री कृष्णदेव महाराज होत. श्री कृष्णदेवांनची सतेज सावळी दिगम्बर मूर्ती प्रत्यक्ष पाहून गोविंद महाराजांचे भानच हरपले त्यावेळी गोविंदकाका मिलिट्रीच्या वेशात सुटाबुटात होते या पहिल्या भेटीत श्रीकृष्णदेव म्हणाले "हे नाटकी ध्यान इकडे कशाला आले" नि काका विघळून गेले त्याच क्षणी सोन्यासारखा संसार नोकरी सोडून ते गुरुसेवेत मग्न झाले घरी हाहाकार उडाला वडील बंधू आले नि जबरदस्तीने काकांना घेऊन गेले त्यावेळी श्री देव म्हणाले "गोयिंदा लवकर येरे" वडीलबंधुनी समजावून सांगितले पण गुरुचरण ध्यास लागलेले काका ऎकत नाहीत हे पाहून याला वेड लागलंय म्हणून त्यांना बांधून घेऊन बंधू वेड्याच्या इस्पितळात घेऊन गेले तिथे डॉकटर म्हणाले मी रुग्णाशी बोलूनच मग दाखल करेन त्यावेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची काकांनी समर्पक उत्तरे दिली आणि डॉकटरा णी निर्वाळा दिला हा माणूस वेडा नाही मग सर्वजण फलटणला परतले काका लगेच पळून ७० ते ८० किमी अंतर चालून पुसेसावळीस गुरू सेवेत दाखल झाले नि खडतर सेवा चालू झाली सद्गुरु करतील तसे आपण करायचं हे काकांनी मनोमन ठरवुन टाकले मग दिवस दिवस डोहात बसणे, अन्न पाण्याविना डोंगर तुडविणे, काट्याकुट्यात निवडुंगात पळणे गरम वाळूवर भर उन्हात उताणे झोपणे गुरुचरणास हात लावताच लाथा बुक्क्यांचा वर्षाव पण या हाल अपेष्टना काकांनी भीक घातली नाही सद्गुरूंनी लावलेल्या सर्व कसोटीतून काका पार झाले श्रीकृष्णदेव आनंदित झाले नि आपल्या कृपा कटाक्ष टाकून आपल्या शिष्यास निरखून पाहीले नि देव म्हणाले "गोईदा लई सोसलेऱे तू" आणि देवांनी आपल्या चित्त शक्तीच समदं डबुल गोयीनदाला संकर्मीत केले नि शिष्य कृतार्थ झालेला पाहून देवांना अपार धन्यता वाटली नि देवांनी काकांना पुन्हा जाऊन संसार करण्याची आज्ञा केली व काका फलटणला परतले श्री कृष्णदेव व काका यांचा सहवास फक्त तीन वर्षांचा होता सन १९२० ते २३  काका फलटणला गेले कीं मग देवांनी आता आपले कार्य सम्पले हे जाणून भाद्रपद वदय १३ सन १९२३ ला डोहात बुडी मारून देहत्याग केला हि वार्ता कळताच काका पुसेसावळीस परतले समाधी भोवती ३दिवस सतत आक्रोश करत राहिले शेवटी श्रीकृष्ण देवांनी  दर्शन देऊन शिष्यास शांत केले तिथून गुरूंनी दिलेले ज्ञान चित्ती मुरवण्यासाठी सन १९२३ ते १९३३ या दहा वर्षे काका अज्ञातवासात होते. अज्ञात वासात असताना प पू गोविंद काकांनी पायी तीर्थयात्रा केल्या व १९३३ साली ते नगर जिल्ह्यातील वृध्देश्वर येथे प्रकट झाले व गुरू आज्ञा होती म्हणून ते परत फलटणला परतले नि पुन्हा संसार सुरु झाला श्री सद्गुरु कृपेने लौकिक व अलौकिक दृष्टीने दृष्ट लागेल असा प्रपंच घडला आता प पू काकांनी लिखाणावर लक्ष केंद्रित केले प्रथम सदगुरु वर श्री कृष्णदेव हे गुरूंचे चरित्र लिहले त्यांनंतर फलटण येथे होऊन गेलेले संत श्री हरीबाबा यांचे चरित्र 'विभूती' हे लिहले व त्यांनंतर त्यांनी ज्ञानेश्वरी व गीता यांच्यावर लक्ष केंद्रित केले व सुबोधिनी, ज्योती ज्योती, हरि पाठ सांगाती, प्रशस्ती,भावार्थी, असे अनेक ग्रन्थाचे लिखाण केले ज्ञानेश्वरी व गीतेच्या १ते१८ अध्याय वर लिखाण केले आहे  प पू गोविंद काकांचे माऊलीच्या हरिपाठवर विलक्षण श्रद्धा होती येणाऱ्या प्रत्येकाला ते हरिपाठ करावयास सांगत आजही गेली ७०वर्ष इथे रोज हरिपाठ चालू आहे श्री रामप्रभूंच्या फलटण या पावन नगरीत  प पू काकांचे अखेर पर्यंत वास्तव्य होते  त्यांना ७ मुले व १ मुलगी अशी अपत्ये होती सध्या १ चिरंजीव ,सुना नातवन्डे, परतवनडे असा परिवार आहे अनेक भाविक भक्तांवर त्यांची कृपा झाली आहे व अजूनही होते आहे फलटण मध्ये ४० वर्ष त्यांचे वास्तव होते लांब लांबून अनेक संत भक्त त्यांना भेटण्यास येत असत व शेवटी 'आयुष्य चिये मुठी केवळ देह' विदेह अवस्थेत वागवीत असलेले हे ब्राह्मनिष्ठ महाराज  भाद्रपद वद्य ८ दिनांक ८ आक्टोंबर १९७४ मंगळवार या दिवशी फलटणला समाधिस्त झाले.                                              

श्री गोविंद काकांची समाधी

दि ८ ऑक्टोबर १९७४ दिवशी प पू काकांनी देह ठेवला तो ज्ञानमय देह होता म्हणून सर्वानुमते त्या देहास अग्निसंस्कार न करता प पू काकांना सदेह समाधी दिली त्यांनतर प पू गोविंद महाराज उपळेकर समाधी मन्दिर संस्था स्थापन केली व विश्वस्त मंडळा वतीने रोज सकाळी रुद्राभिषेक आरती दुपारी नैवेद्य सायंकाळी ७ वाजता आरती रोज १०० ते १५० भक्त आरतीला हजर असतात श्रींची जयंती माघ शु. २, समाधी सोहळा भाद्रपद व. ८ व गुरुपौर्णिमा हे मुख्य तीन उत्सव आषाढात श्रींची पालखी पंढरपूरला जात असते दर पौर्णिमेला अन्नदान सुरु असते आणि खरतरं संतांचे कार्य त्यांनी देह ठेवल्यावरच सुरु होत असते. 

समाधी मन्दिर सभा मंडप दीपमाळ प पू काकांचे राहते घर व ३ मजली भव्य भक्त निवास

श्री गोविंद काकांची आरती

आरती गोविंदा । सम- पदारविंदा ॥ 
कृष्णदेव _ गुरू -सेवा । जी पावली देवा ।
तयी निजात्म ठेवा । दिला भक्त वरदा । आरती गोविंदा । सम_ पदारविंदा ॥ आरती गोविंदा ॥ 
नेति नेति वेद वदती । ती स्वरुप स्थिती । भकता लागी प्रेम दिप्ती I नित्य तुमची यशदा 
आरती गोविंदा ॥ सम _ पदारविंदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
कितीक जड़ मूढ । तया दाविले गूढ I ज्ञान आहे मूळ रूढ । स्थिरचरी सर्वदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
जग तुम्ही ईशरुप । पाहुनिया अपरूप ।
ब्रम्ह सार अनूप । सकलानंद कंदा ।
आरती गोविंदा । सम- पदारविंदा ॥
आरती ओवाळीता I हरलीसे भव चिंता |
अंहभाव नाशविता I हा सोहाळा शुभदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
माया मोह दूर सरले । मन चरणी रतले I 
ब्रम्हाची प्रगटले । नित्य आनंद छंदा ।
आरती गोविंदा I सम - पदारविंदा ॥
दर्शन वा स्मरण । होता नुरे ,,मी तू,, पण ।
दिव्य ज्योती उजळण । माऊली जड - जणू मंदा I
आरती गोविंदा । सम -पदारविंदा ॥
वर्णावया महती । होई कुंठीत मती ।
वाढलीसे भक्तीरती । प्रेमानंदा विशारदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥ 
सुबोधिनी भावार्थी  । श्री कॄष्णदेव विभूती ।
हरिपाठ सांगाती । स्फुरविती निजानंदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
कैवल्याची सोड़ी बांधी I दूर करी जीव व्याधी ।
कळीकाळ न बाधी । मुर्त सच्चितानंदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
आनंदी आनंद । नच उरे मोक्ष बंध । 
बहरला ब्रह्म गंध I राम शरणा सुखदा ।
आरती गेाविंदा । सम - पदारविंदा ॥
आरती गोविंदा 1 सम - पदारविंदा ॥

प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर समाधी
प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर

श्री गोविंद काकांच्या आठवणी

१) गोविंद लीला

हरी भागवत काका श्री काकांच्या दर्शनासाठी लहानपणी येत. एकदा असेच दर्शनासाठी ते उभे होते. गर्दी खुप होती. बालवय तसेच आपण संत दर्शनासाठी जात आहोत का, कशासाठी याच निश्चित कारण त्यांना माहित नव्हते. ते श्रीं कडे बघत होते लोक मिठाई ठेवत आहेत, कोणी हार घालत आहेत. यांच्या मनात विचार आला आयला लय मजा असते महाराज लोकांनची पेढे काय हार काय, मज्जाच मज्जा. असे विचार यांच्या मनात सुरू होते. यांचा नंबर आला तसे फक्त श्री महाराजांनी भागवतांकडे पाहिले व आपल्या पुढ्यात ओढून घेतले. आपल्या गळ्यातील हार काढून श्रींनी यांच्या गळयात घातले व पेढे भरवले व बोलले लोक आम्हाला हार घालतात त्या आमच्या गळ्यात बेड्या पडतात बेड्या. वरील प्रसंग त्यांनी आपल्या वडिलांना सांगितल्यावर त्यांचे वडिल बोलले सिध्द पुरूष लोकांनची कर्म आपल्यावर ओढवून त्यांनच रक्षण करतात महाराज होण सोप नव्हे.

२. चाले चराचरावरी सत्ता

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीभगवंतांच्या मुखाने ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात म्हणतात की, "मी या जगाचा समर्थ नाथ आहे, मीच वेदांचा बोलविता असून काळाचाही मीच नियंता आहे, माझीच आज्ञा हे चर-अचर विश्व सतत पाळीत असते."*  तेच भगवंत चौदाव्या अध्यायात एका मार्मिक ओवीत सांगतात की, "जे ज्ञानाने देहाची उपाधी निरसून माझ्याशी एकरूप होतात त्या गुणातीत महात्म्यांमध्ये व माझ्यात कसलाही भेद उरत नाही. ते माझ्यासारखेच सर्वसामर्थ्यसंपन्न होतात. तेही सत्यसंध होतात अर्थात् त्यांचे सर्व संकल्प नेहमी सत्यच होतात. ते महात्मे देखील माझ्याप्रमाणे अनंत व अखंड आनंदमय होऊन ठाकतात." म्हणूनच या विदेही महात्म्यांची चराचरावर सत्ता चालत असते. ते स्वत:हून कधीच कोणते चमत्कार करीत नाहीत, चमत्कारच सहजतेने त्यांच्याठायी घडत असतात. प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हेही असेच पूर्ण हरिरंगी रंगलेले महान विभूतिमत्व होते. ते अखंड उन्मनी स्थितीतच राहात असल्याने त्यांची चराचरावर सत्ता चालत असे. अशा प्रकारचे असंख्य चमत्कार त्यांच्याठायी घडलेले पाहायला मिळत. तरी त्यांचे कसलेही सोयर-सुतक पू. काकांना नसे, ते सदैव आपल्याच अवधूती मस्तीमध्ये रममाण असत. प. पू. काका पुण्याला शनिवार पेठेतील सुप्रसिद्ध फणसळकर वैद्यांच्या घरी नेहमी जात असत. त्यांच्या सूनबाईंनी स्वत: मला सांगितलेली ही हकिकत खरोखरीच अद्भुत आहे. एके दिवशी पू. काका त्यांच्या घरी अचानक आले. त्यावेळी वैद्य फणसळकर घरी नव्हते. पू.काकांनी आल्या आल्या चहाचे फर्मान सोडले. एरवी देखील पू.काकांना चहा खूप आवडत असे. म्हणजे ते तसे दाखवीत तरी असत. वारंवार चहा लागत असे त्यांना. पू.काकांच्या आज्ञेनुसार सौ. काकूंनी चहा करून आणला. 

पू. काकांच्या काही विशिष्ट लकबी होत्या. ते कपातला पूर्ण चहा बशीत काठोकाठ ओतून घेत व एक थेंबही न सांडवता पीत असत. त्याही दिवशी पू. काकांनी बशीत सगळा चहा ओतला. बशी पूर्ण भरली. आता तो चहा प्यावा की नाही? पण सरळपणे वागतील तर ते काका कसले? त्यांनी अचानक बशी धरलेला तो हात झटका देऊन सरळ केला. पण गंमत म्हणजे ती बशी पडली नाही की त्यातला चहा सांडला नाही. हात जमिनीला काटकोनात असूनही सगळे जिथल्या तिथे होते. मग तोंडावर आश्चर्याचे भाव आणून मिश्कीलपणे पू. काका म्हणाले, "अरेच्चा, चहा सांडला नाही की! जाऊदे, पिऊनच टाकतो त्याला." असे म्हणून स्वारीने खुशीने हसत हसत तो चहा पिऊन टाकला व घराबाहेर पडले. अनाकलनीय लीला दाखवणे हा या तूर्यातीत अवधूतांचा आवडता खेळच तर आहे! अवाक झालेल्या सौ. फणसळकर काकूंच्या चेह-यावरचे आश्चर्य लपतच नव्हते. जिवंत चमत्कार त्यांनी उघड्या डोळ्यांनी समोर घडताना पाहिलेला होता ! आजही हा प्रसंग सांगताना त्यांना पू.काकांच्या प्रेमाने भरून येते. काय अद्भुत सामर्थ्य आहे पाहा ! गुरुत्वाकर्षणाचा सर्वमान्य नियमही या अलौकिक त्रिभुवन- गुरुत्वासमोर सपशेल लोटांगण घालता झाला. माउली म्हणतात तेच त्रिकालाबाधित सत्य आहे, "पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावी। हे आज्ञा माझी ॥ज्ञाने.९.१८.२८२॥" या महात्म्यांची सत्ता चराचर जगतावर चालते, त्यांची आज्ञा यच्चयावत् जग शिरोधार्य मानीत असते. म्हणूनच आपल्याला आपले खरे, शाश्वत कल्याण व्हावे असे जर वाटत असेल, तर आपण या महात्म्यांचे चरण घट्ट धरून, ते सांगतील तसे साधन आपले डोके न चालवता श्रद्धेने व प्रेमाने करीत राहिले पाहिजे. मग तेच सर्व बाजूंनी आपला सांभाळ करीत आपल्याही जीवनात त्या ब्रह्मबोधाचा अपूर्व सूर्योदय करवून आपले कोटकल्याण करतात 

३. संकटी भक्तां रक्षी नानापरी

प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे फलटण मधील काही कुटुंबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या घरांमध्ये पू. काका नि:संकोच वावरत असत व त्या लोकांचेही पू.काकांवर आत्यंतिक श्रद्धा व प्रेम होते. यांपैकी वेलणकर कुटुंब फारच भाग्यवान म्हणायला हवे. या घराण्यातील श्री. पंत महाराज वेलणकरांवर भगवान श्रीदत्तप्रभूंची कृपा होती. देव त्यांच्याशी बोलत असत. त्यांना लाभलेल्या श्रीदत्त पादुकांचे मंदिर फलटणला बाणगंगा नदीकाठी आजही मोठ्या दिमाखाने उभे आहे. या वेलणकर घराण्याला आजवर अनेक सत्पुरुषांच्या सेवेचे भाग्य लाभलेले आहे. श्रीसंत हरिबाबा, लाटे गावाच्या श्रीसंत आईसाहेब, आष्ट्याचे श्रीदत्तमहाराज, प. प. श्री. टेंब्येस्वामींचे शिष्योत्तम प. प. श्री. नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराज, पू. गोविंदकाका, पू. श्री. गुळवणी महाराज, पू. श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अशा थोर थोर महात्म्यांची या घराण्याकडून निरलस सेवा घडलेली आहे. त्या पुण्याईमुळेच वेलणकरांकडून श्रीदत्तप्रभूंची सेवा अविरतपणे चार-पाच पिढ्या होत आहे आणि हे परमभाग्यच म्हणायला हवे. पू. काकांचे पंत महाराज वेलणकरांवर प्रेम होते. पंतांनी पू. काकांचा अधिकार बालपणीच ओळखलेला होता. पंतांच्या रानातील विहिरीत पू.काका पाण्याखाली तास न् तास आपल्याच आनंदात बसून राहात असत. पंतांचे चिरंजीव कै.श्री.महादेवराव वेलणकर हे पू.काकांचे शाळासोबती होते. त्यांचीही श्रीदत्तोपासना उत्तमरित्या होत होती. त्यांच्यावर पू. काकांचीही प्रेमकृपा होती. श्री. पंतांचे चौथे चिरंजीव कै. श्री. जनार्दन वेलणकर हेही प.काकांना फार मानत असत. पू. काका त्यांना शंभू नावाने हाक मारीत. त्यांचे चिरंजीव श्री. पुरुषोत्तम वेलणकर यांनी सांगितलेल्या प. पू. काकांच्या काही अविस्मरणीय लीला आपण आज त्यांच्याच शब्दात पाहणार आहोत. 

प. पू. सद्गुरु श्री. डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्याविषयी माझ्या मनात खूप गोड आठवणी आहेत. त्यांची आठवण जरी झाली तरी ते गोड रूप डोळ्यासमोर उभे राहते. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात शर्ट व त्यावर कोट, कोटाच्या खिशाला अडकवलेली काठी, पायात बूट, गुडघ्यापर्यंत स्ट्रॅपिंग्स्, डोळे अर्धोन्मीलित आणि चेहऱ्यावर अतिशय गोड मोहक हास्य, कपाळाला बुक्का, डोक्यावर टोपी; खरोखरीच प्रत्यक्ष पांडुरंगच वाटत ते. त्यांचे नुसते दर्शनच इतके आश्वासक होते की बस. आमच्या घरावर त्यांची वडिलांसारखी माया होती. आम्हां सर्वांची ते सतत पाठराखण करायचे. त्यांनी आम्हांला अनेक प्रसंगांमधून सुखरूप सांभाळलेले आहे व आजही सांभाळत आहेत. दररोज सकाळी पू.काकांची आमच्याकडे एक चक्कर तरी होत असे. ते श्री भैरवनाथाच्या दर्शनाला येत. तेथून परत जाताना आमच्या घरी येत. आमच्या वाड्याच्या आतल्या बाजूला एक मारुतीरायांची मूर्ती आहे. या दक्षिणमुखी मारुतीशी पू.काका आले की नेहमी गप्पा मारीत असत. ते म्हणायचे की हा मारुती बोलतो बरं का आमच्याशी. जागृत आहे हा. आमच्या घरावर लक्ष ठेवायला सांगायचे ते त्या मारुतीरायांना.

त्यावेळी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी बघणे चालू होते. वडलांचे  एका स्थळाकरता प्रयत्न चालू होते. सकाळी सकाळी पू.काकांची स्वारी घरी आली. वडलांना हाक मारून त्यांच्या हातावर त्यांनी तुरी (तुरीचे दाणे) ठेवल्या आणि काही न बोलताच ते निघून गेले. दुपारच्या डाकेला त्या स्थळाकडून नकार आला. हातावर तुरी देऊन पू. काकांनी ही गोष्ट सकाळीच सुचवलेली होती. असेच काही दिवस गेल्यावर महाबळ म्हणून एका स्थळाकरिता वडील प्रयत्न करत होते. एकेदिवशी पू.श्री.काकांची स्वारी आमच्या वाड्यासमोर उभी राहिली. बाहेरूनच वडलांना हाक मारून देवडीवरच्या गणपतीच्या चित्राकडे हात करून  म्हणाले, "शंभू, गणपतीने सही केली रे." आणि त्याच दिवशीच्या पहिल्या डाकेला श्री.महाबळांकडून होकाराचे पत्र आले. पुढे रितसर लग्न झाल्यानंतर नूतन दांपत्य फलटणला आले होते. सकाळी ते दोघे फिरून येत असताना शंकर मार्केटमध्ये पू. श्री. काकांची गाठ पडली. तेव्हा माझी बहीण कै. सौ. माधुरी महाबळ हिने मंडईतच श्री.काकांना नमस्कार केला. त्याबरोबर काकांनी तेथील फुलवाल्याकडून २ गुलाबाची फुले घेऊन तिला दिली. पुढे तिला दोन सुपुत्रांची प्राप्ती झाली. आठवणी खूप आहेत पण महत्त्वाची, माझ्याशी संबंधित एक सांगतो. लहानपणी मी खूप आजारी असायचो. त्यामुळे सतत अंथरुणालाच खिळलेलो असायचो. मी अगदी लहान असताना एकदा पू. काका घरी आले. त्यांना माझ्या वडलांनी सांगितले की मुलाचे नाव पुरुषोत्तम ठेवलेले आहे. त्यावर पू.काका म्हणाले, "अरे, याला पाणी आणि आगीपासून भय आहे, त्यामुळे याचे नाव 'अनिल' ठेवा." तेव्हापासून मला घरातले सगळे लोक अनिल नावानेच हाक मारतात. 

माझे वडील माझ्या सततच्या आजारपणाला कंटाळले होते. एके दिवशी आमच्या घरी एक ज्योतिषी आला. त्याने सगळ्यांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. वडील नुकतेच कारखान्यातून आलेले होते. हात पाय धुवून चहा घेत होते. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी माझी पत्रिका त्या ज्योतिषासमोर ठेवली. एकवार नजर टाकून ज्योतिषी म्हणाला, "ही मृत व्यक्तीची पत्रिका का दाखवत आहात?" हे ऐकल्यावर वडील संतापले. त्यांनी त्याला माझ्याजवळ आणले व म्हणाले, "हा माझा मुलगा. याची पत्रिका आहे ही." त्यावर तो ज्योतिषी म्हणाला की, ग्रहमान तर स्पष्ट मृत्युयोग दाखवते. रागारागाने त्याला त्यांनी हाकलून दिले. वैतागून ते उठले व सरळ श्री.काकांच्या दर्शनाला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी सर्व प्रसंग पू.काकांना सांगितला. तेव्हा पू. काकांनी माझ्या वडलांना पंढरपूरला जाऊन श्रीपांडुरंगाच्या देवळातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीला सर्व हकीकत सांगण्यास सांगितले. वडलांची श्री. काकांवर अतूट श्रद्धा होती. त्यामुळे काही दिवसांनी आम्ही तिघे (मी आई-वडील) पंढरपूरला गेलो. पांडुरंगांचे दर्शन घेऊन नंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या नवग्रहमंदिराच्या जवळच्या श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीपाशी आलो. तेथे माझी परिस्थिती मी स्वतःच श्रीदत्तात्रेयांना कथन केली. दर्शन घेऊन परत फलटणला आल्यावर आम्ही थेट पू. श्री. काकांच्या दर्शनाला गेलो. वडलांनी श्री. काकांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा मी श्री. काकांच्या समोरच बसलो होतो. माझ्याकडे बघत ते गोड हसले. त्यांनी आपले पाय पुढे केले. वडलांनी मला त्यांचे पाय चेपण्यास सांगितले. मी तसे करायला सुरुवात केली. 

थोड्यावेळाने पू. काकांनी खिशातून एक रुपयाचे नाणे काढून माझ्या हातात दिले व म्हणाले, "जा, तुझे काम झाले." आणि त्यानंतरच माझ्या प्रकृतीमध्ये खूप आश्चर्यकारक फरक पडू लागला. पुढे एक चांगला बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आम्हांला मिळाला. त्याची ट्रिटमेंटही सुरू झाली. तेव्हापासून माझे आजारपण कायमचे संपले. माझा जो मृत्युयोग आलेला होता, तो प. पू. सद्गुरु श्री. काकांच्या कृपेने टळला. मला पू. काकांनी अक्षरश: जीवनदान दिले. त्यांचे हे उपकार माझ्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी कमी होणार नाहीत. किंबहुना माझी तर इच्छा आहे की सतत त्यांच्या उपकाराखालीच राहावे. प. पू. श्री. काका म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंगच. माझ्या मातु:श्रींना पू.काकांनी एका आषाढी एकादशीला खरोखरीच भगवान पंढरीनाथांच्या रूपात दर्शन करविले होते. या जन्मात अशा अवतारी सत्पुरुषांचे दर्शन होणे, त्यांचे कृपाछत्र लाभणे, असे अलौकिक अनुभव येणे हे पूर्वीच्या अनेक जन्मांमधील पुण्याईचे फलच म्हणायला हवे. प. पू. श्री. काकांचे आपल्या भक्तांवर असे निरतिशय प्रेम होते. ते परोपरीने, न सांगता स्वत:हूनच भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करीत असत व आजही करीत आहेत. श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणी अनन्यभावाने शरण जाऊन, त्यांच्यावरच सर्व भार टाकून जो आपल्याला दिलेली साधना शांतपणे व मनापासून करतो, त्या भक्ताचे सर्वबाजूंनी ते कल्याण करतातच. तेच या महात्म्यांचे ब्रीद आहे व आवडते कार्य देखील!

गोविंदकाका उपळेकर
प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर व प. पू. श्री गुळवणी महाराज 

४. एक अद्वितीय सिद्ध पुरुष

सिद्ध पुरुषांची परंपरा महाराष्ट्रात अखंड चालू आहे. त्या परंपरेत आपल्या जगावेगळ्या अनोख्या व्यक्तिमत्वाने शेकडो साधकांना, प्रपंचाने गांजलेल्या आर्त सांसारिकांना व जिज्ञासूंना ज्यांनी मार्गदर्शन केले, त्यांची प्रेमाने दखल घेऊन साधनेला लावले त्या सिद्ध पुरुषांमध्ये पू.काका आपल्या वैशिष्ट्याने उठून दिसतात. तसे म्हटले तर फलटण स्थानावर श्रीरामरायाची व प्रसिद्ध योगी श्री हरिबाबांची मूळची कृपा आहेच. त्याच फलटणमध्ये पू. काकांनी साधक व सिद्ध या दोन्ही अवस्थातील आपली हयात घालवली व फलटणला त्यांनी पवित्र क्षेत्राचे स्वरूप आणून दिले.

सुमारे ३५ वर्षांपूर्वी पू. काकांचे मला प्रथम दर्शन झाले. भोर संस्थानच्या राजेसाहेबांच्याबरोबर मी फलटणला पू.काकांच्या दर्शनासाठी गेलो होतो. काका त्यावेळी गावाबाहेर हरिबुवांच्या समाधी मंदिराच्या समोर असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीपुढे देवाकडे पाठ करून मोठमोठ्याने टाळ घेऊन भजन करीत होते. आम्ही त्यांना वंदन केल्यावर मला उद्देशून ते म्हणाले, "काय रे मंगेश, तू इकडे कोणीकडे आलास ?" त्यांनी मला 'मंगेश' या नावाने का हाक मारली याचा उलगडा मला अजूनही झालेला नाही.
पण त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने मी भारावून गेलो. अर्धोन्मीलित दृष्टी, मधुर हास्य व एक विशिष्ट भावावस्थेत चाललेले त्यांचे भजन पाहून हा एक प्राप्तपुरुष आहे असे वाटले व त्या दिवसापासून मी सवड सापडेल तेव्हा फलटणला त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागलो. १९५२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास पू.काकांनी स्वप्नात येऊन मला नारळ व पेढे दिले. मी त्यांचा तो अनुग्रह मानला व त्याप्रमाणे त्यांना पत्राने ती हकीकत कळवली.

त्यानंतर पू. काकांची ज्यांच्यावर विशेष कृपा झालेली होती ते श्री. बागोबा महाराज कुकडे माझ्याकडे आले व ज्ञानेश्वरीवर काकांनी केलेल्या 'सुबोधिनी' या तिसऱ्या अध्यायावरील भाष्याची मुद्रणप्रत मी करावी अशी काकांची इच्छा आहे असे सांगितले. त्यानिमित्ताने काकांच्या सन्निध जाण्याची मला संधी प्राप्त झाली व मी त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांपैकीच एक झालो व पू. काकांच्या व्यक्तिमत्वाचे मला जवळून अवलोकन करता आले. पू. काकांच्याकडे केव्हाही गेले तरी ते मांडीवर ज्ञानेश्वरी घेऊन वाचन करीत, हातातील पेन्सिलने त्यावर खुणा करीत बसलेले दिसायचे. आल्या गेल्याचे स्वागत चहा देऊन व्हायचे, त्यांची प्रेमळ चौकशी करून लहर असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत. संध्याकाळी नियमाने अगोदर फलटणकरांच्या रामाचे दर्शन घेऊन हरिबाबांच्या समाधीच्या दर्शनाला जात. तेथे समाधीसमोर सारखी 'लोटांगणे' घेत. ती लोटांगणे पाहून, पुसेसावळीला कृष्णदेवांच्या भोवती काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून अंग रक्तबंबाळ होईपर्यंत काका लोटांगणे घेत असत, असे तेथील लोक सांगत असत त्याची आठवण येई.

समाधी दर्शनानंतर परत येताना पू. काका निवृत्ती मेळवणे नावाच्या त्यांच्या भक्ताच्या घरी हरिपाठ करीत असत. बरीच वर्षे हा प्रघात चालला होता. त्यावेळी काका कधी कधी आपल्या 'सुबोधिनी' मधील काही भाग वाचावयला सांगत व त्याचा आशय समजावून देत. अशा बैठकीत कधी कधी पुण्याचे एक सद्भक्त बॅ. रावसाहेब मेहेंदळे असत. ते कृष्णमूर्तींचे मोठे प्रेमी व चिकित्सक अभ्यासू होते. ते काकांना कृष्णमूर्तींची प्रवचने वाचून दाखवीत व काकाही मोठ्या आस्थेने ती ऐकत. हा परिपाठ पुढे पू. काकांच्या घरी, श्रीगुरुकृपा वास्तूत होऊ लागला.

पू. काकांचे हरिपाठावर विलक्षण प्रेम होते. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना त्यांनी शेकडोनी हरिपाठ दिले. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांत प्रापंचिक आधीव्याधींनी त्रस्त झालेले लोक जास्त येत व लहर असेल त्याप्रमाणे पू. काका त्यांना उपाय सांगत. पुष्कळ वेळा काकांचे बोलणे परोक्ष असे. प्रथम दर्शनी त्याचा उलगडा होत नसे. याचे रहस्य पू. काकांनी आपल्या 'श्रीकृष्णदेव' चरित्रात दिले आहे. "केव्हाही एखादी काळाच्या जबड्यात सापडलेली व्यक्ती किंवा दुःखाने पोळलेली व्यक्ती देवांच्याकडे (श्रीकृष्णदेव महाराजांकडे) आली तर ते तिचे दुःख हरत-हेने कमी करत. कारण त्या व्यक्तीच्या पुढील जन्मामधील कोणती तरी भर घालून सध्याच्या काळात त्याची दुरुस्ती होऊ देणे हे त्यांच्या हाती असे. मात्र ते कधीही व केव्हाही स्पष्ट बोलत नसत कारण 'प्रकृतिगत' या न्यायाने त्यांच्या बोलण्याचा अर्थ उलट सुलट मध्ये फिरत राहतो." काकांचेही बोलणे बहुधा असेच असे. 'प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: ।' या न्यायाने प्रारब्ध भोग कोणालाही, संतांना सुद्धा चुकत नाहीत. संत फक्त त्याची adjustment करू शकतात, असे प. पू. काका नेहमी म्हणत असत. 

गोविंदकाका उपळेकर
प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर   आणि प. पू . श्री श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी 

पू. काकांनी आपल्या 'श्रीकृष्णदेव' या ग्रंथात लिहिले आहे, "युगायुगाच्या ठिकाणी महान साधू व्यक्ती उत्पन्न होऊन त्यांनी जगाच्या कल्याणाशिवाय दुसरी कोणतीच उज्ज्वलता व्यक्त केलेली नाही. असे सत्पुरुष म्हणजे त्यांच्या नुसत्या कृपादृष्टी बरोबरच त्या त्या व्यक्तीमधील बंध नाहीसे होऊन 'अनंत समतानंद' त्यास आपल्या कामामध्ये निर्वेध श्रेय प्राप्त झाले पाहिजे , मग त्यांचे काम ऐहिक असो वा आत्मिक असो." काकांचे बोलणे परोक्ष असे कारण काकांनी मानापमानाचे गोवे गुंडाळून ठेवलेले होते. कोणत्याही गोष्टीचे श्रेय ते आपल्याकडे घेत नसत. 'अलौकिका नोहावे लोकांप्रति' हा माउलीचा दंडक त्यांनी अक्षरश: पाळला. याची एक दोन उदाहरणे देतो, मुंबईचे एक न्यायाधिकारी श्री. मंजेश्वर हे पू. काकांचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी पुसेसावळीला जाऊन काकांच्या साधक दशेबद्दल बरीचशी माहिती गोळा करून 'The Maharshi of Phaltan' म्हणून एक पुस्तिका छापली व तिच्या काही प्रती फलटणला वाटण्यासाठी पू.काकांच्याकडे  पाठविल्या. काकांनी त्या सगळ्या प्रती घेऊन पाण्याच्या बंबात जाळून टाकल्या.

मुंबईचे एक भक्त काकांच्याकडे नेहमी येत असत. एका विश्वस्त निधीबद्दल त्यांना एक अडचण आली होती. पू.काकांना त्यांनी ती सांगितली. पू. काका त्यांना म्हणाले, "पुण्याला कुलकर्णी मास्तरांकडे जा व त्यांना घेऊन हरिकृष्ण आश्रमात इंदिरादेवीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्या." मी इंदिरादेवींना संस्कृत शिकवत असे. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. पू.काकांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना इंदिरादेवींकडे घेऊन गेले व त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. अशी त्यांची लीला करण्याची पद्धत होती. ते स्वत:कडे कसलेच श्रेय घेत नसत. कारण अलौकिक असे अमानित्व त्यांच्याठायी पूर्ण बहरलेले होते. तसे पाहिले तर, पू. काकांचे सांसारिक जीवन इतरांसारखेच नव्हे तर जास्त हलाखीचे होते. श्रीकृष्णदेवांच्या कृपेने प्राप्तपुरुष झाल्यावर व पुढील काही वर्षे परिभ्रमणावस्थेत घालविल्यावर ते फलटणला आले. तो काळ व नंतरची काही वर्षे त्यांच्या घरी मूर्तिमंत अठराविश्वे दारिद्र्य होते. पण पू. काका स्थितप्रज्ञ असत. "देह तरी वरिचिलीकडे । आपुलियापरी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसीची ॥" अशा अवस्थेत ते आत्मलीन असत. आपल्या गतायुष्यातील कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करण्याचे ते टाळीत. न जाणो त्यात आत्मश्लाघेचा दोष लागेल असे त्यांना वाटे. एकदा प्रसिद्ध साधू मेहेरबाबा त्यांच्या दर्शनास फलटणला आले होते. त्या दोघांमध्ये दारे बंद करून चर्चा झाली होती. मला त्या भेटीबद्दल औत्सुक्य होते, म्हणून पू. काकांना त्याबद्दल मी विचारले. पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

समकालीन संत व पू. काका यांच्यामध्ये देवाण घेवाण होत होती. इस्लामपूर नाक्यावर असलेले अवधूत धोंडिबाबा यांच्याकडे काका काही लोकांना पाठवीत. पावसाचे सिद्ध पुरुष स्वरूपानंद यांचे काही शिष्य पू. काकांच्या दर्शनाला येत. स्वामींचा 'नित्यपाठ' त्यांची अनुमती घेऊन काही साधकांना काका देत असत. पुण्याचे सत्पुरुष श्री.गुळवणी महाराज व काका यांचे परस्परांवरील प्रेम दोघांच्याही शिष्यात सर्वज्ञात आहे. प.पू.श्री.काकांची ग्रंथरचना अपूर्व आहे. 'श्रीकृष्णदेव', श्रीहरिबाबा व आईसाहेब यांचे 'विभूती' चरित्र व विशेषत: श्रीज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांवरील त्यांचे 'सुबोधिनी'चे अठरा भाग हे साधकांना मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी केलेले लेखन आहे. त्यात त्यांचे विविध ग्रंथाध्ययन, बहुश्रुतता व श्रेष्ठ दर्जाचा पारमार्थिक अनुभव दिसून येईल. शांकरभाष्य, योगवासिष्ठ, विवेकसिंधू, दासबोध, संस्कृत नाटके इतर संत वाङ्मय यांचा सखोल व्यासंग त्यात दिसून येतो. पुसेसावळी येथे होऊन गेलेल्या, त्रिपुटीच्या गोपाळनाथ परंपरेतील शाहीर हैबतीबाबा यांच्या काव्य संपदेबद्दल काकांना फार प्रेम व आदर वाटत असे व त्यांचे समग्र काव्य प्रसिद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण पू. काकांच्या जिव्हाळ्याचे खरे स्थान, प्रेमाचा विषय म्हणजे ज्ञानेश्वर माउली व त्यांचे वाङ्मय. पू. काकांच्या जवळ एक जुने ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित होते. त्यातील पाठच त्यांनी 'सुबोधिनी'मध्ये घेतले आहेत. 'अमृतानुभव' हा सिद्धरहाटीचा ग्रंथ म्हणून पू.काकांचा ज्ञानेश्वरीवर फार भर. विशेषत: ज्ञानदेवांच्या विरहिण्या काकांना फार प्रिय. भगवान श्री ज्ञानदेवांच्या काही विरहिण्यांचा गूढार्थ काकांनी 'सुबोधिनी'मध्ये प्रकट केला आहे. 'सुबोधिनी'चे सूक्ष्म वाचन ज्यांनी केले आहे त्यांना ज्ञानेश्वरीमधील सहाव्या अध्यायातील काही गूढ अनुभवात्मक योगपर ओव्यांचे काकांनी केलेले रहस्योद्घाटन विचारांना चालना देणारे वाटेल. श्री. बागोबा महाराजांना एकदा पू.काका म्हणाले होते, "बागबा, ह्या गोविंदाने माउलींची प्रत्येक ओवी अनुभवलेली आहे." किती मोठा अनुभव ते सहज सांगून जातात पाहा. सद्गुरु माउलींची एक ओवी अनुभवली तरी जीवन धन्य होते, इथे पू. काका प्रत्येक ओवी अनुभवली आहे म्हणून सांगत आहेत. बापरे!

श्री ज्ञानेश्वर महाराजांना संगीत प्रिय होते व त्या शास्त्रात ते तज्ज्ञ होते, असे पू. काकांचे मत होते म्हणून काही अध्यायातील ओव्या कोणत्या रागदारीत गाव्यात याची माहिती ते देत असत. उदाहरणार्थ दहावा अध्याय 'जयजयवंती' व तेराव्या अध्यायातील ओव्या 'मालकंस' रागात आहेत असे त्यांनी आपल्या 'हरिपाठात' छापले आहे. 'विरहीव प्रभो प्रयामयं परिपश्यामि जगत्' असे म्हणणाऱ्या उपमन्यूप्रमाणे पू. काकांना 'अवघे जग कोंदाटले ज्ञानदेवे' असे वाटत असे. त्यांना सर्वत्र, सर्वकाळी श्री माउलींचीच प्रचिती येत असे. आळंदीचा प्रसाद-बुक्का, पंढरीचा बुक्का कोणी आणला की पू.काकांना प्रेमाचे भरते येई. कपाळभर तो बुक्का लेऊन ते आनंदविभोर होत. घरात चहाची वर्दी जाई व जमलेल्या भक्तजनांत त्याचे प्रेमाने वाटप होई. वर्तमानपत्र घरी येत असत. शेजारच्या खोलीत मुले रेडिओ लावीत असत. पण " जगाच्या जीवी आहे । परी कवणाचा काही नोहे । जगचि होय जाये। तो शुद्धीही नेणे ॥" या न्यायाने तशा परिस्थितीतही पू. काकांचा ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय अविरत, अखंड सुरू असे. सद्गुरुकृपेने असा लोकांतातला एकांत त्यांना पुरेपूर साधलेला होता. इतकी अद्भुत विद्वत्ता व बहुश्रुतता असतानाही पू. काका त्याचे प्रदर्शन करीत नसत. 'व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।' या श्री ज्ञानेश वचनाप्रमाणे 'पांडित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत्' अशा अवस्थेत काका असत. 'जाणीव शहाणिव ओझे सांडूनियां दूरी । आपणी वस्तीकर वर्ततसे संसारी ॥' असे पू. काका वागत.

त्यांचे हे बहुमोल ग्रंथ ते साधकांना विनामूल्य देत असत. त्याने ते वाचावेत एवढीच त्यांची अपेक्षा. हरिपाठ व ज्ञानेश्वरी यांचे नित्यपठण, नामस्मरण व संत सहवास यावर त्यांचा फार भर असे. मला एकदा ते म्हणाले होते, "मास्तर संत सहवासा सारखे दुसरे श्रेष्ठ साधन नाही!" कारण 'सज्जन संगतिरेका भवति भवार्णव तरणे नौका ॥' सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकीच आहे. ' परम पद प्रतिमो हि साधुसङग: ।'

प. पू. काकांना भजन फार प्रिय होते. "म्हणून ' भजन साधन अभ्यास । येणेचि पाविजे परलोकास ॥' असे ते म्हणत. "अनन्य भावाने कोणतेही कार्य करीत रहाणे, एकदा धरलेली वारी किंवा व्रत सहजगत्या जर सारखे चालविले तर तेवढे तप देवाला कळवळा येण्यास पुरेसे होते ", असे पू. काकांनी आपल्या श्रीकृष्णदेव चरित्रात लिहिले आहे. "तुका म्हणे काही नेमावीण । जो जो केला तो तो शीण ॥" अशा रीतीने ज्यांनी काळासही वळसा घालून आपले सत्त्व कायम ठेवले, ज्यांनी सद्गुणाचे मूर्तिमंत स्वरूप स्वतःस म्हणजे जगतास दिले. ज्यांनी चराचराचे ऐक्य स्वतः अनुभवले, ज्यांचे चरण म्हणजे मूर्तिमंत 'श्री'!" असे पू. काका सद्गुरूंचे वर्णन करतात. 

आमच्या पू. गोविंद महाराजांनी घटातला दीप जसा सहज मावळावा त्याप्रमाणे आपला देह फलटण मुक्कामी ठेवला. पू. काकांनी ज्या दिवशी देह ठेवला तो दिवस मंगळवार होता. सोमवारी रात्री पुण्यातील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री शंकर महाराजांचे एक सद्भक्त श्री. अभ्यंकर यांच्या स्वप्नात काका आले व त्यांना म्हणाले, "अरे मी कुठे गेलो नाही व जाणार नाही. मी फलटणलाच राहणार आहे." श्री. अभ्यंकर सकाळी उठल्यावर स्वप्नाबद्दल विचार करू लागले तोच त्यांच्या पत्नीने त्यांना 'तरुण भारत'चा अंक आणून दिला. त्यात पू. काकांनी देह ठेवल्याची बातमी होती. श्री. अभ्यंकर नेहमी पू. काकांच्याकडे येत असत व त्यांनी काकांची सुंदर छायाचित्रे घेतलेली आहेत. उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे की, ब्रह्मनिष्ठ पुरुषांचे चैतन्य त्यांचे शरीर सोडून मृत्यूनंतर जात नाही. 'न तस्य प्राणा: उत्क्रामन्ति ॥' तिरुमुलर या तमीळ सिद्धपुरुषांच्या 'तिरु मंत्रम्' या तमीळ ग्रंथात असे म्हटले आहे की, 'ब्रह्मनिष्ठ पुरुषाचे चैतन्य समाधी स्थितीतही कार्य करीत राहते. आगम ग्रंथात असे लिहिले आहे की, 'ब्रह्मनिष्ठ पुरुष देहपातानंतर आपल्या १६ चैतन्य कलांपैकी एक कला आपल्या समाधीत ठेवून देतो. ती कला सर्व शक्तिमान असते व भक्तांना  आशीर्वाद प्रदान करीत राहते. पण त्या समाधीचे शुचिर्भूतत्व  काळजीपूर्वक जोपासले पाहिजे.' म्हणूनच आजही प. पू. काका फलटणला आहेत व तळमळीच्या साधकांना मार्गदर्शन करीत आहेत असा कित्येकांचा अनुभव आहे.

५. सहज बोलणे हित उपदेश 

फलटणच्या प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची काही वाक्ये फारच अप्रतिम आहेत. अगदी मनाचा ठाव घेतात. प. पू. काकांच्या वाङ्मयसागरातील महत्त्वाची अशी काही उपदेशपर वाक्ये एकत्र करून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. श्री काकास्वरूप सद्गुरुमाउलींची दया हेच माझे भांडवल आणि प्रेरणास्रोत आहे. सर्वच महात्म्यांनी आपल्यासारख्या साधकांना साधनेच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी काही सुंदर उपदेश करून ठेवलेलाच आहे. तसाच उपदेश उपनिषदांमधूनही दिसतो. उपनिषदे म्हणतात, 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।' उठा, जागे व्हा आणि ध्येयाची (मोक्षाची किंवा भगवत्स्वरूपाची) प्राप्ती झाल्याशिवाय ( प्रयत्न करणे ) थांबवू नका !' उपनिषदकारांनी येथे ध्येयप्राप्तीसाठी काय करा? हे सांगितलेले नाही. परंतु प. पू. श्री. काका हाच धागा धरून पुढे सांगतात, " वाचा, शिका, अभ्यास करा, उन्नती करून घ्या ! अभ्यासाची हेळसांड करू नका ! प्रयत्न करीत राहा !" प. पू. श्री. काका येथे आपल्याला उपायही सांगतात. ते म्हणतात, प्रथम 'वाचा'. आपल्याला उपलब्ध असलेल्या संतांची, महापुरुषांची चरित्रे वाचा, त्यांचे ग्रंथ वाचा. वाचन हे ज्ञानप्राप्तीचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनाने काही अंशी ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु शेवटी वाचन संपूर्ण ज्ञानप्राप्तीसाठी तोकडेच पडते. म्हणून प. पू. श्री. काका पुढे लगेच 'शिका' असे म्हणतात. काय वाचा? तर, 'संतचरित्रे' वाचा ! कारण, " आजपर्यंत झालेल्या महात्म्यांची चरित्रे बोधप्रद असून प्रगती देणारी आहेत". असे त्यांनीच सांगून ठेवलेले आहे. संतचरित्रांमधून बोधाबरोबरच आपल्याला प्रेरणाही मिळते, शिवाय त्याच्या अनुसंधानातून आपल्याला त्या महात्म्यांची कृपाही प्राप्त होते.

प. पू. श्री. काका म्हणतात, "आजपर्यंत झालेल्या थोर पुरुषांची चरित्रे पहा. त्यांची इच्छाशक्ती अभ्यासाने इतकी प्रचंड झालेली होती की तिने आपल्या स्वतःचीच नव्हे, तर आपल्या सर्वस्वाची सुधारणा करून जग हालवून सोडले." अशा संतचरित्रांच्या अभ्यासाने आपल्या सत्कार्याची फार मोठी प्रेरणा मिळते. शिवाय कसे वागावे ? कोणत्या परिस्थितीत कोणता व कसा निर्णय घेतला की आपल्याला लाभप्रद ठरतो ? इत्यादी विषयांबद्दल उत्तम बोधही मिळतो. मनात जेव्हा विचारांचे, मतांचे काहूर माजते, तेव्हा फक्त ह्याच प्रकारचा बोध ते वादळ शांत करू शकतो. म्हणून वाचन जरी तोकडे साधन असले तरी ते महत्त्वाचे आहेच. म्हणूनच प. पू. श्री.काका 'वाचा'च्या पुढे 'शिका' असे म्हणतात. वाचन हे एकतर्फी साधन आहे. वाचलेल्या भागाचा अर्थ कसा लावावा, हे प्रत्येकवेळी वेगवेगळे असते, प्रत्येकाचा अर्थही वेगळा असतो. तसेच लावलेला अर्थ प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही. पण शिक्षणाचे तसे नाही. शिक्षणात जिला सर्व सिद्धांत ज्ञात आहेत अशी व्यक्ती शिकवते आणि विद्यार्थी शिकतो. विद्यार्थ्याला येणाऱ्या सर्व शंकांची लगेच उत्तरेही मिळू शकतात. म्हणून वाचनापेक्षा शिक्षण श्रेष्ठ. येथे 'शिका' म्हणण्यामागे प. पू. श्री. काकांचे दोन संदर्भ आहेत.एक म्हणजे जे काही वाचले आहे ते आचरणात आणायला शिका. जसे महात्म्यांच्या चरित्रातील सद्गुण, त्यांची प्रबल इच्छाशक्ती, ध्येयासक्ती इत्यादी आपल्याही आचरणात आणायला शिका. दुसरा संदर्भ असा की, अशाच थोर महात्म्यांच्या, सद्गुरूंच्या सहवासात जे काही वाचलेले आहे त्याचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळवा. हाच पर्याय सर्वोत्तम ! अशा थोर सद्गुरूंच्या सहवासात, त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली आपली उत्तम तयारी होते. आपल्यातील सारे दोष निघून जाऊन आपली जडणघडण सुयोग्य रितीने होते. म्हणून नुसत्या वाचनापेक्षा शिक्षण कधीही वरचढच ठरते !

अरे असले तरी फक्त शिक्षण पुरे पडत नाही. नुसते शिकल्याने सारे भागत नाही, तर जे शिकलो ते पदोपदी जीवनात वापरायला हवे. म्हणूनच प. पू. श्री. काका पुढे म्हणतात की, 'अभ्यास करा.' अभ्यास करणे म्हणजे शिकलेली गोष्ट आपल्या अनुभवाशी पडताळून पाहणे. कोणतीही गोष्ट कौशल्याने, आपलेपणाने करणे म्हणजे अभ्यास. प. पू. श्री. काका म्हणतात, "जे काही तुम्ही कराल ते 'आपले' असे समजून, त्यात काया-वाचा-मन अर्पण करून केले असता ते आनंदयुक्त यशाचा मोबदला देते." पू. काकांच्या या सांगण्याचा अर्थ असा की, जितक्या प्रेमाने आपण आपली अत्यंत आवडती गोष्ट करतो त्याच आवडीने व सातत्याने आपल्या पुढ्यात आलेले प्रत्येक कर्म, आपले सारे कौशल्य वापरून, मनापासून भगवंतांचीच सेवा म्हणून करणे म्हणजे अभ्यास करणे होय !

प्रत्येक कर्म असे प्रेमाने घडले की ते आनंदाचा मोबदला देते. अशा सेवा म्हणून झालेल्या कर्माने प्रगती होते, उन्नती साधते. अशी उन्नती झाली म्हणून चालू असलेला अभ्यास सोडून देऊन मात्र चालत नाही. साधकांचे सर्वतोपरि कल्याण करणारे बोधामृत प्रकट करताना प. पू. श्री. काका म्हणतात, "करिता उठा, आपल्या उद्योगास लागा, व्यर्थ पांगुळपणाचे  पांघरूण घेऊन निजून राहू नका, काम करीत राहा. वेळ टाळू नका. सर्व कामे जेथल्या तेथे व्यवस्थित रीतीने होऊ द्यात. स्वतःचे जीवनसर्वस्व असे व्यर्थ दवडण्यासाठी नाही. त्याचा सदुपयोग करा." पांगुळपणाचे पांघरून म्हणजे आळस. हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. म्हणून तो आळस झटकून काम करा, असे पू.काका म्हणतात. सारे काही व्यवस्थित होऊ लागले की, अभ्यास पक्का झाला असे म्हणता येईल. म्हणून प. पू. श्री. काका मूळ वाक्यात पुढे मुद्दामच, "अभ्यासाची हेळसांड करू नका ! "असे म्हणतात. अभ्यासाचे माहात्म्य सांगताना ते पुढे म्हणतात, "अशा तऱ्हेने वरचेवर अभ्यास व वरचेवर त्याची परीक्षा हीही घेऊन स्वतः धैर्याची कसोटी लावून पहावी. जे जरूर असते ते सर्व आपल्याजवळ तयार असते; व नसले तरी, 'तुम्ही पुढे व्हा' की सर्व काही एखाद्या जादूप्रमाणे तुम्हास साहाय्य करावयास लागेल. "आपल्या मनाला अभ्यासाची गोडी वाटेल आणि उभारीही येईल, आपले मनोधैर्य वाढेल अशा सुंदर शब्दांत प.पू.श्री.काका आपल्याला उपदेश करीत आहेत. 
संतांच्या वचनांमध्ये श्रीभगवंतांची कृपाशक्ती असते. त्यामुळे एखादा साधक जेव्हा त्या बोधावर मन एकाग्र करून त्यासारखे वागायचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा ती शक्ती त्या साधकावर कृपा करून त्याला आतूनच साहाय्य करते, त्याचा परमार्थ प्रशस्त करीत असते. म्हणूनच संतवचनांवर आपण मनापासून विसंबून सतत साधनारत राहिले पाहिजे. त्यातच आपले खरे कल्याण आहे.

६. इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं!

माघ शुद्ध द्वितीया, प. पू. सद्गुरु श्री गोविंदकाका महाराजांचा जन्मदिन. या दिवसाचे वैशिष्ट्य असे की, प. पू. काकांच्या पत्नी ती. पू. रुक्मिणीदेवी तथा ती. मामींची तारखेने पुण्यतिथी आहे. पू. काकांनी ८ ऑक्टोबर १९७४ रोजी देह ठेवला. त्यानंतर बरोबर १०३ दिवसांनी, आजच्या तारखेला १९७५ साली ती. पू. मामींनी देहत्याग केला.

पू. काकांनी देह ठेवल्यावरही पू.मामींनी आपले सौभाग्यालंकार काढले नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, पू. काका कुठेही गेलेले नाहीत, ते आहेतच. आश्चर्य म्हणजे, पू. मामींच्या अंत्यक्रियेनंतर त्यांच्या हातातला हिरवा चुडा व मणिमंगळसूत्र जसेच्या तसे सापडले होते. चितेच्या प्रखर अग्नीतही ते जळले नाही. हीच पू. मामींच्या' पू. काका सदैव आपल्यासोबत आहेतच ', या मनोधारणेला देवांनीच दिलेली पावती समजायला हरकत नाही. पू. काका व पू. मामींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ती. मामी पू. काकांना सर्वभावे शरण जाऊन त्यांच्याशी एकरूपच झालेल्या होत्या. माहेरची एवढी प्रचंड श्रीमंती आणि सासरी अशी आबाळ, पण त्यांनी आयुष्यात कधीही एका शब्दाने त्याची तक्रार केली नाही. अतिशय मनापासून त्यांनी आपल्या अवलिया पतिदेवांचा जगावेगळा संसार सांभाळला. पतीच्या इच्छेतच आपले सर्वस्व मानल्याशिवाय असे वागणे शक्यच नाही. आजच्या काळात तर ह्याचा विचारही करू शकणार नाहीत सध्याचे नवरा-बायको. पण पू. काका व पू. मामींची जोडी प्रत्यक्ष भगवंतांनीच घातलेली होती. पू. मामींचे जन्मजन्मांतरीचे महत्पुण्य होते व त्यांचा पू. काकांशी पूर्वीचाच दृढ ऋणानुबंध होता, म्हणूनच त्यांचा हा संसार असा संपन्नतेने बहरला. या अलौकिक दांपत्याच्या, रुक्मिणी-गोविंदांच्या श्रीचरणी सादर दंडवत!

प. पू. काका हे त्यांच्या काळातील विलक्षण विभूतिमत्व होते; कोणत्याच कसोट्यांमध्ये न बसणारे, अद्वितीय आणि अलौकिक! अखंड अवधूती मस्तीत जगणारे, आपल्याच आनंदात सदैव रममाण होऊन विचरणारे ते अद्भुत अवलिया होते. बोलाबुद्धीच्या पलीकडे असणारे त्यांचे वागणे-बोलणे हा त्यामुळेच अनेकांसाठी मोठ्या कोड्याचा विषय ठरला. आजही ते कोडे सुटलेले नाही. "तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥" हेच त्यामागचे खरे कारण आहे. प. पू. श्री. काका अगदीच मितभाषी होते, पण जी काही दोन-चार वाक्ये ते बोलत ती मात्र मोठमोठ्या ग्रंथांनाही पुरून उरणारी असत. आता त्यांचे हेच एक वाक्य पाहा. ते म्हणतात, "इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं !"

ब्रह्मनिष्ठ श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराजांचे हे नितांत सुंदर आणि अर्थगर्भित वाक्य आहे. संतांचे बोल हे अर्थगर्भ असतात. संतांचे बोल म्हणजे 'काळ्या दगडावरील रेघ', अर्थात् 'चिरंतन सत्यच'! संतांना श्रीभगवंताच्या स्वरूपाचा पूर्ण साक्षात्कार झालेला असल्याने तेही भगवत्स्वरूप होऊ ठाकलेले असतात. म्हणूनच त्यांची वाणी देखील भगवंतांसारखी अमृतमयी, प्रेमरूपा आणि गंभीर होते. संतांच्या वाणीमध्ये 'सत्य' प्रतिष्ठित असते. या सर्वांमुळे त्यांची वाणी साधकांसाठी सदैव 'संजीवक' ठरते. त्यामुळेच प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे वरील वाक्य 'गूढ अमृतबोल' ठरावे असेच आहे!

प. पू. श्री. काका फलटणला आलेल्या काही अंतरंग-भक्तांना उद्देशून हे वाक्य म्हणालेले आहेत. प. पू. श्री. काका सतत आपल्या स्वानंद स्थितीत, अवधूती मस्तीमध्ये रंगून गेलेले असत. त्या आत्मानंदाच्या अमृताचे पान करीत अथवा ज्ञानेश्वरीचे चिंतन करीत ते आपल्या खोलीत पहुडलेले असत. प. पू. श्री. काका क्वचित भानावर असले तर एखाद दुसरा शब्द बोलत, नाहीतर आत्ममग्नच राहात. काहीवेळा त्यांच्या त्या अवस्थेतही अधे मधे ते एखादे सुंदर वाक्य बोलून जात. त्यांपैकीच हे एक जबरदस्त वाक्य आहे. संतांच्या, सद्गुरूंच्या रूपाने भगवंतांची शक्ती मूर्तिमान झालेली असते. त्यामुळे त्यांचा देहही शक्तिस्वरूपच असतो. त्यांच्या सभोवती, त्यांच्या तपस्थानामध्ये आणि त्यांच्या वास्तव्यस्थानामध्ये तीच शक्ती सर्वत्र आणि सदैव भरून राहिलेली असते. तेथे ती शक्ती अनंतकालपर्यंत कार्यरत असते. ही शक्ती अत्यंत शुद्ध असून, तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक वस्तूला शुद्ध करीत असते. म्हणून जेव्हा आपण अशा स्थानांमध्ये किंवा सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सान्निध्यात जातो, तेव्हा आपले शरीर-मन-वृत्ती देखील त्या शक्तीच्या प्रभावाने काही प्रमाणात शुद्ध होतात. याचाच संदर्भ घेऊन प.पू.श्री.काकांनी वरील वाक्य उच्चारले आहे. 

'धुतलं जाणे' म्हणजे स्वच्छ होणे, शुद्ध होणे. संतांच्या सान्निध्यात आपल्या मनाची, मनाच्या वृत्तींची, वासनांची शुद्धी होते. अर्थात् आपले अंतःकरण धुतले जाते. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज म्हणतात, "संतचरणाची रज ते पार्थिव । परी हा स्वभाव पालटविती ॥ ८८.२॥" संतचरणांचे रजःकण, अर्थात् संतांच्या चरणांमधून प्रसृत होणारी त्यांची कृपाशक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. ती आपला स्वभावच पालटवते. स्वभाव म्हणजेच आपल्या मनाच्या वृत्ती, वासना, इच्छा, कामना. त्या कमी झाल्या की मन स्थिर होऊ लागते, बुद्धी योग्य दिशेने कार्य करू लागते, अहंकारही कमी होतो आणि परमार्थाची खरी गोडी लागून आपल्या स्वभावात जमीन-आस्मानाचा फरक होतो. इतका या संतचरणांच्या कृपेचा प्रभाव असतो. "म्हणोनियां तेथें रज तें पवित्र । सर्व नारीनर गंगारूप ॥८८.७॥" असे श्री गुलाबराव महाराज त्यासाठीच म्हणतात. संतचरणांची कृपा, त्यांची शक्ती ही संपर्कात आलेल्या सर्वांना इतकी शुद्ध करते, पवित्र करते की त्यांची तुलना प्रत्यक्ष भगवती श्रीगंगेशी करता येईल. प. पू. श्री. काकांच्या या वाक्यामागे हा देखील संदर्भ आहेच. पू.काकांच्या या अमृतवचनाचा आणखी एक अर्थ असा की, संतांच्या सान्निध्याने, संगतीने व सेवेने आपले 'कर्म' धुतले जाते. आपले संचित व क्रियमाण धुतले जाऊन प्रारब्धाचीही शुद्धी होते. कर्मांनुसारच जगाची सारी व्यवस्था आहे. या कर्मांमुळेच चांगला अथवा वाईट भोग घडतो. संतांच्या शक्तीमुळे आपली कर्मे शुद्ध होतात, सात्त्विक होतात. अशी सात्त्विक कर्मे श्रीभागवंतांपर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ करीत असतात. श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की, 

संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोनि जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागें ॥२॥

संतांच्या चरणांचे रजःकण प्राप्त झाले तर आपल्या वासनेचे बीजच जळून जाते. वासनेचे बीज म्हणजे कर्म. हे कर्मच वांझ होते. म्हणजे वासनेला जन्मालाच घालत नाही. त्यानंतरच आपल्याला रामनामामध्ये खरी आवड निर्माण होते. आपल्याकडून जास्तीतजास्त प्रमाणात नामस्मरण होऊ लागते आणि त्यापासून मिळणारे सुख हळू हळू वाढत जाते. सद्गुरु श्री माउलींनी देखील हरिपाठात, "संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथें ॥८.१॥" असे म्हटले आहे. संतांच्या संगतीतच मनाला योग्य मार्ग व गती मिळते. हा एकच मार्ग फक्त श्रीभगवंतांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण हा त्यांच्या कृपेचा, त्यांच्याशी अभिन्न असणा-या त्यांच्या कृपाशक्तीचा मार्ग आहे. याच मार्गाने गेल्यास श्रीभगवंतांची प्राप्ती होते. प. पू. श्री. काकांच्या या अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ असा की, "संतांच्या संगतीमध्ये बसल्याने, त्यांनी तपश्चर्येने पवित्र केलेल्या स्थानांमध्ये बसल्याने (अर्थात् तेथे बसून उपासना केल्याने) आपली कर्मे धुतली जाऊन, शुद्ध होऊन श्रीभगवंतांविषयी आवड निर्माण होते, त्यांचे भक्तिप्रेम लाभते आणि त्याद्वारेच अखंड सुखाची प्राप्ती होते!"

प्रणमत गोविन्दं परमानंदम् ।

श्री गोविंद काकांची गुरुपरंपरा

प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची श्रीगुरुपरंपरा, श्रीकृष्ण सरस्वती स्वामींपासूनच सुरू होते. 

राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज
   |
प. पू. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर
   |
प. पू. धोंडीबुवा महाराज, पलूस
   |
प. पू. श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी
   |
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण
   |
प. पू. बागोबा कुकडे महाराज, दौंड

अशी ही थोर सद्गुरुपरंपरा आहे. 

प. पु. गोविंद काकांचे शिवाजी महाराजांवरील आत्यंतिक प्रेम

प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांविषयी अतीव आदराची भावना होती. त्यांच्या फलटण येथील  "श्रीगुरुकृपा" वास्तूतील माजघरात लाकडावर बसवलेली शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली पितळेची प्रतिमा होती. ते त्या प्रतिमेला नेहमी वंदन करीत असत. शिवप्रभूंशी असलेला प. पू. काकांचा आणखी एक हृद्य संबंध म्हणजे पू. काकांच्या पत्नी सौ. रुक्मिणीदेवी या छत्रपतींचे लौकिक गुरु दादोजी कौंडदेव यांच्या शेवटच्या वंशज होत्या. प. पू. काका फलटणकर असल्याने त्यांना शिवबांविषयी आपसूकच आदर होता, कारण फलटण हे शिवरायांचे आजोळ व सासर देखील. महाराणी सईबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. छत्रपतींचे नेहमी फलटणला येणे होत असे. शिवरायांची बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी, युद्धनीती, कुशल राजनीती, पारमार्थिक अधिकार, उत्तम संघटन कौशल्य, गुरुचरणीं असलेली शरणागती, मातृप्रेम, सारे सारे विलक्षणच होते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणत की, "श्रीज्ञानेश्वर महाराज हे संतांचे राजे तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजांमधले संत!" आज आपला मराठीपणा आपण अभिमानाने सांगतो आहोत, ती सर्वस्वी ज्ञानोबा-तुकोबादी संतांची व छत्रपती शिवरायांचीच आपल्यावरील फार मोठी कृपा आहे! समर्थ रामदास स्वामींच्या कृपानुग्रहाने शिवराय संतत्वाला पोचले होते. समर्थांनी शिवबांचे आपल्या वाङ्मयातून खूप कौतुक केलेले पाहायला मिळते. धन्य ते गुरु-शिष्य!