यवमध्यचांद्रायण, पिपीलिकामध्यचांद्रायण, ॠषिचांद्रायण, शिशुचांद्रायण व यतिचांद्रायण यांचीं लक्षणें
‘‘यम’’ शुक्लपक्षांत एक एक घास वाढवावा व कृष्णपक्षांत एक एक कमी करावा याला ‘यवमध्यचांद्रायण’ म्हटलें आहे. कृष्णपक्षांत एकेक घास कमी करावा, व शुक्लपक्षांत वाढवावा हें ‘‘ पिपीलिकामध्यचांद्रायण’’ सांगितलें. दृढ ज्याचे नियम आहेत व ज्यानें आपलें चित्त स्वाधीन ठेवले आहे अशा पुरुषानें हविष्यान्नाचे एक मास पावेतों तीन तीन घास खावे हें ‘‘ॠषींचांद्रायण’’ सांगितले. सकाळी चार घास व संध्याकाळी चार घास घ्यावे. हे मुलांच्या उद्देशानें ‘‘शिशुचांद्रायण’’ सांगितले. सूर्य मध्यावर आला (मध्यान्ह झाला) असतां एक मास पावेंतों रोज आठ आठ घास खावे. हें ‘‘यतिचांद्रायण’’ सर्व पातकांचा नाश करणारें आहे. ‘‘यतिचांद्रायण’’ ही केवळ संज्ञा आहे, त्यावरून केवळ संन्याशासच याविषयी अधिकार आहे असें नाही तर हें करण्यास सर्वांस अधिकार आहे. याप्रमाणें शिशुचांद्रायणा विषयीही समजावे. यवमध्य व पिलीलिकामध्य या दोहांत तिथीचा र्हास किंवा वृद्धि असतां घासांचीही र्हास व वृद्धि करावी. तसेंच ‘‘विष्णु’’---‘सुखानें तोंडांत घेतां येतील असे घास खावे. ते घास तिथीची वृद्धि असतां क्रमानें वाढवावे व र्हास असतां कमी करावे. अमावास्येच्या दिवशी भोजन करूं नये.’ यावरून जें ‘‘कल्पतरुकार व शूलपाणि’’ कृष्णपक्षाच्या प्रतिपदेस पंधरा घास नंतर एकेक कमी करतां अमावस्येच्या दिवशी एक घास होतो. *शुक्लपक्षाच्या प्रतिपदा वगैरे तिथींत दोन वगैरेंची वृद्धि समजावी असें म्हणतात ते रद्द होते. कारण, ‘‘अमावस्येच्या दिवशी जेऊं नये हा ‘‘चांद्रायणविधि’’ हाये’’ असें ‘‘पराशराचें’’ म्हणणें आहे* त्यावरून आणि ‘‘साधारण चांद्रायणाविषयी विधि’’ असें ‘‘पराशराचें’’ वचन आहे त्यावरून. ‘‘सामान्य चांद्रायण’’ ‘‘तोच’’ सांगतो---दररोज अमुकच घास खावे असें नसल्याने एक महिन्यांत कसेंही करून दोनशे चाळीस घास खावे हा ‘‘सामान्य चांद्रायण’’ होय. ‘‘पिपीलिकामध्य’’ व ‘‘यवमध्य’’ यां वाचून इतर चांद्रायणांत इतर दिवशीही आरंभ करावा, प्रतिपदेसच करावा असें नाही.
घास केवढा घ्यावा त्याचें प्रमाण. चांद्रायणांत एकादशी वगैरेंचा उपास आला असतां निर्णय.
घासांचें प्रमाण ‘‘याज्ञवल्क्य’’ सांगतो---शुक्लपक्षांत तिथींच्या वृद्धीप्रमाणें मोराच्या अंड्या एवढे घास करावे. ‘‘चांद्रायणप्रकरणांत’’ ‘‘पराशर तर’’---कोंबड्याच्या अंड्या एवढा घास करावा. ‘‘शंख’’ तर---चांद्रायणांत ओल्या आवळ्या एवढे घास सांगितले’’ याप्रमाणें सांगतो. या सांगितलेल्या घासांच्या प्रमाणांचा शक्तीप्रमाणें विकल्प समजावा. एकादशी वगैरे दिवशी नित्य प्राप्त होणार्या उपासाला चांद्रायणविधीनें बाध येतो. कारण, याला (चांद्रायणाला) ‘‘जो धर्मासाठी हें चांद्रायण करील तो चंद्राच्या लोकास जाईल’’ असें काम्यत्व आहे आणि लसुण वगैरे पदार्थांच्या भक्षणाचे निमित्त घडलें असतां त्याविषयी याचा विधि असल्यानें याला नैमित्तिकत्व आहे. काम्य असा एकादशी वगैरेंचा उपास दुसऱ्याकडून करवावा. कारण, ‘‘कात्यायनादिकांनी’’ ‘‘(एखादें कर्म) प्रतिनिधीकडून केलें असतां फळाची प्राप्ति होते’’ असें सांगितलें. (याबद्दलची) वचनें म्यां केलेल्या ‘‘समयमयूखांत’’ पहावी. हा एकादशी वगैरेच्या उपासाचा प्रतिबिंध सामान्य चांद्रायणावाचून इतर चांद्रायणांतच होतो. कारण, त्यांत (सामान्य चांद्रायणांत) दररोज अमुकच घास घ्यावे असा नियम नाही.
चांद्रायणाचा विधि
गौतम’’ आतां यानंतर चांद्रायण सांगतो. त्याचा विधि कृच्छ्रांत सांगितला आहे. पौर्णिमेच्या आदले दिवशीं व्रताचा संकल्प करून क्षौर करावें त्या दिवशी उपास करावा. दुसरे दिवशी ‘‘आप्यायस्व’’ ‘‘संते पयांसि’’ व ‘‘नवो नवो’’ या तीन मंत्रांनी तर्पण, तुपाचा होम, हविष्यान्नाचें अभिमंत्रण व चंद्राचें उपस्थान (प्रार्थना) करून ‘‘यद्देवा देव हेडनं’’ या चार ॠचांनीं तुपाचा होम करून शेवटी ‘‘देवकृतस्य’’ या तीन मंत्रांनीं तीन समिधांचा होम करून *‘‘ॐ भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यं, यशः, श्रीः, इट्, ओजः, तेजः, पुरुषः, धर्मः, शिवः’’ या मंत्रांनीं घासांचें अभिमंत्रण करून ‘‘मनसानमः स्वाहा’’ असें म्हणून सर्व घासांचें भक्षण करावे.* याप्रमाणें दुसर्या पंधरवड्यात समजावे. सुखानें तोंडात घेतां येईल असें घासाचे प्रमाण असावे. चरु, भैक्ष, सक्तुकण, यांवक, शाके, दुध, दहि, तूप, फळ व पाणी हीं उत्तरोत्तर प्रशस्त होत. पौर्णिमेच्या दिवशी पंधरा घास खाऊन कृष्णपक्षांत एक एक कमी करून खावे. अमावस्येच्या दिवशी उपास करून शुक्लपक्षांत प्रतिपदेपासून क्रमानें एक एक घास वाढवून खावे. कित्येकांचे मत याच्या उलट आहे. हा चांद्रायणमास होय.
चांद्रायणाचा विधि.
बौधायन’’ आतां या नंतर (आम्ही) चांद्रायणाचा कल्प सांगू---शुक्लपक्षांतील किंवा कृष्णपक्षांतील चतुर्दशीस उपास करून केश, दाढी मिशांचे केस, शरीरावरील केस व नखें काढवून किंवा दाढी मिशांचे केस इ० ‘‘यम’’---लोखंडाचें पितळ वगैरेंचे व चाकावर केलेलें (घडा, पणती वगैरे मातीचें) भांडें वर्ज्य करावे. तें राक्षसांचें पात्र होय. जें चाकावर उत्पन्न झालें नसेल तें देवाचें पात्र होत. ‘‘तोच’८---बोटांच्या अग्रांवर घास घेऊन गायत्री मंत्रानें अभिमंत्रण करावे. यांत घासांच्या योगानें प्राणाहुति ‘‘बौधायन’’ सांगतो---पहिला घास ‘‘प्राणाय’’ असें म्हणून घ्यावा. दुसरा ‘‘अपनाय’’ म्हणून घ्यावा. तिसरा ‘‘व्यानाय’ म्हणून चवथा ‘‘उदानाय’’ म्हणून व पांचवा ‘‘समानाय’’ म्हणून घ्यावा. जेव्हां चारच घास घ्यावयाचे असतील तेव्हां ‘‘प्राण’’ व ‘‘अपान’’ यांच्या योगानें पहिला घास घेऊन बाकीचे तीन व्यानादि तिघांनी घ्यावें. जेव्हां तीन घास घ्यावयाचे असतील तेव्हां दोन ‘‘प्राण व अपान’’ व ‘‘व्यान’’ व ‘‘उदान’’ या दोघा दोघांनी व तिसरा ‘‘समान’’ यानें घ्यावा. दोन घास घ्यावयाचे असतां पहिला घास पहिल्या तिघांनी (प्राण, अपान व व्यान यांनी) व दुसरा पुढल्या दोहोंनी घ्यावा. एक घास घ्यावयाचा असतां सर्वांनी एक घ्यावा.
चांद्रायण व्रताचा प्रयोग
चतुर्दशीस स्नानसंध्यादि नित्यकर्म आटोपून पूर्वाण्हांत प्राणायाम करून मासपक्षादिकाचा उल्लेख करून ‘अमुक पापक्षयकामः’ किंवा ‘श्रीकामः’ किंवा ‘देवताप्रीतिकामः’ किंवा रसायणादिसिद्धिकामः’ ‘अमुकचंद्रायणं करिष्ये’ याप्रमाणें संकल्प करून ‘अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि’ इत्यादि मंत्रांनी सूर्यास व्रत निवेनद करून केस (डोकीवरले), दाढी, मिशा, लोम (शरीरावले केस) व नखेंही काढवून किंवा दाढी मिशाच काढवून त्या दिवशी उपास करून जर दुसर्या दिवशी अमावास्या असेल तर त्याही दिवशी उपास करावा. दुसर्या दिवशी जर पौर्णिमा आली तर त्या दिवशी पंधरा ग्रास खावे. नंतर अमावास्येच्या पुढें (शुक्लपक्षांत) घासांची वृद्धि व पौर्णिमेच्या पुढील पक्षांत (कृष्णपक्षांत) ग्रासांचा र्हास करावा. दररोज चंद्राचा उदय झाल्यानंतर ‘‘आप्यायस्व०’’ हा मंत्र म्हणून ‘‘सोमं तर्पयामि’’ असें म्म्हंणून तर्पण करावे. ‘‘संतेपयांसि’’ यानें ‘‘चंद्र तपर्पयामि’’ असें तर्पण करावे. ‘‘नवो नवो’’ या मंत्रानें ‘‘चंद्रमसं तर्पयामि’’ म्हणून पर्तण करावे. याप्रमाणें तर्पण करून याच मंत्रांनी लौकिकाग्नीत तुपाचा होम करून याच मंत्रांनी भांड्यांत असलेल्या हवीचें अभिमंत्रण करून याच मंत्रांनी चंद्राचें उपस्थान करून ‘‘य द्देवा देवहेडनं०’’ या चार ॠचांनी प्रत्येक ॠचेला तुपाचा होम करावा. सर्व ठिकाणी ‘‘अग्नये न मम’’ असा त्याग करावा. नंतर ‘देवकृतस्य’ या तीन मंत्रांनी तीन समिधांचा होम देऊन ‘‘ॐ भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यं यशः श्रीःऊक् ईट ओजः तेजः पुरुषः धर्मः शिवः’’ या पंधरा मंत्रांनीं क्रमानें भांड्यांत असलेल्या प्रत्येक घासाचे अभिमंत्रण करून ‘‘मनसा नमः स्वाहा’’ असें म्हणून सगळ्या घासांचे अभिमंत्रण करून एकेक घास बोटांच्या अग्रांनी धरून गायत्री मंत्रानें अभिमंत्रण करून खावा. त्यांत पहिल्या दिवशी एक घास खावयाचा असल्यास ‘‘प्राणाय स्वाहा’’ इत्यादि पांचही मंत्र म्हणावे. दोन घास खावयाचे असल्यास पहिला पहिल्या तीन मंत्रांनी (प्राण, अपान व व्यान यांनी) व दुसरा पुढल्या दोन मंत्रांनी खावा. तीन घास असतां दोन दोन मंत्रांनी दोन व एकानें तिसरा. चार घास असतां पहिला दोन मंत्रांनी व दुसरे पुढील एकेक मंत्रानें खावे. पांचा पेक्षां अधिक घास असतां ते मुकाट्यानेंच (प्राणाय स्वाहा इ. न म्हणतां) खावे. व्रताची समाप्ति झाल्या नंतर कमीत कमी तीन ब्राह्मणांस भोजन घालून गाय द्यावी. व्रताची समाप्ति होई तो पावेतों रोज तीनदां स्नान व सौरमंत्रांनी हात जोडून सूर्याचे उपस्थान करावे. आणि गायत्रीमंत्रानें, व्याहृतींनीं किंवा कृष्मांड मंत्रांनी (यद्देवा देव हेडनं० या मंत्रांनी) तुपाचा होम करावा. दिवसा उभें रहावें, व रात्रीं बसावें अशक्त असतां निजावें जशी शक्ति असेल त्याप्रमाणें ‘‘आपोहिष्ठा’’ हें सूक्त, ‘‘एतोन्विंद्र०’’ ‘‘ॠतंच०’’ ‘‘विरजं०’’ हे मंत्र ‘‘रौरव योधाजये’’ हे दोन सामवेदाचे मंत्र म्हणावे. यांचा संभव नसतां गायत्रीमंत्र, व्याहृति किंवा प्रणव यांचा जप करावा. हें ब्राह्मण भोजन, दक्षिणा व दान या पासून जप पर्यंत कर्म सर्व प्राजापत्यादि व्रतांत सारखें आहे.