श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६

श्रीक्षेत्र तीलकवाडा गुजराथ
श्रीक्षेत्र तीलकवाडा गुजराथ
चातुर्मास ८
गुजरात मधे नर्मदानदी काठी बडोद्याहून ५० कि. मी. अंतरावर, श्री. विष्णुगीरी महाराजांच्या वासुदेव कुटी आश्रमाजवळ, मारुती मंदिरात श्रीक्षेत्र तिलकवाडा येथे महाराज उतरले होते. तेथेच आठवा चातुर्मास झाला.

चातुर्मास ८ - श्रीक्षेत्र तीलकवाडा गुजराथ, नदी- नर्मदा, इ. स. १८९८, शके १८२०

तिलकवाडा येथे मारुतीच्या मंदिरात महाराजांचा चातुर्मास झाला. हे गाव बडोदा संस्थानांतील एक महाल आहे. नोकरीनिमित्ताने आलेले ७-८ दक्षिणी ब्राह्मण व इतर गुजराथी ब्राह्मण वगैरे मंडळींची वस्ती येथे बरी आहे. येथील मंडळी भाविक असल्याने सर्व लोक नित्य महाराजांचे दर्शनास येत असत. पिशाच्च, संततिप्रतिबंध इत्यादिकांवर महाराजांनी उपाय सांगावेत आणि श्रद्धा ठेवून लोकांनी ते उपाय करून सुखी व्हावे असा क्रम सुरू होता.

‘स्वधर्माप्रमाणे वागावे म्हणजे परमेश्र्वर कल्याण करील’ असे त्यांना महाराजांचे नित्य सांगणे असे.

प्रभासक्षेत्राहून निघून महाराज प्राचीसरस्वतीस जाऊन पोचले. या ठिकाणीच येऊन श्रीकृष्ण परमात्मा निजधामास गेले होते. तेथे वंदन करून महाराज पोरबंदर म्हणजे सुदामपुरी या ठिकाणी आले. तेथे काही दिवस वास्तव्य करून नंतर ज्येष्ठ मासांत श्रीक्षेत्र द्वारका या सातव्या मुक्तिपुरीत महाराज येऊन पोचले.

श्री स्वामी महाराजंनी तिलकवाड चातुर्मासात कुर्मपुराण देवनागरीत व अनुसया स्तोत्र लिहले .

तीलकवाड चातुर्मासात स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात नर्मदाखंडावर पुराण सांगितले शिवाय आन्ध्र लिपीत असलेला कूर्म पूराण हा ग्रंथ देवनागरी लिपीत लिहून काढला. पुढे आश्वीन महिन्यात स्वामी महाराज तिलकवाड वरून वरकाळ जवळ असलेल्या अत्रीमूनींच्या आश्रमात आले तिथे 

त्यांनी सांगितले अनुसया मातेवर एक स्तुतीपर पद रचले

अनसूया स्तोत्र

पतिव्रताशिरोरत्नभूता सुंदरविग्रहा । सुचरित्रा दिव्यतेजा सर्वलोकनमस्कृता ॥ १ ॥
विष्णुप्रपौत्री कपौत्री सती कर्दमपुत्रिका । देवहूतिसमुत्पन्ना सुमुखी कपिलस्वसा ॥ २ ॥
अत्रिपत्नी महाभागा दयाक्षान्त्यादिभूषिता । अनसूया वेदगेया निजधर्मजिताऽखिला ॥ ३ ॥ 
श्रीदत्तात्रेयजननी चंद्रमाता मनस्विनी । दर्वासोजनयित्रिशा जगत्संकटवारिणी ॥ ४ ॥
चतुर्विंशतिनामानि मंगलानि पराणि च । पावन्यान्यसूयाया दत्तमातुः पठेन्नरः ॥ ५ ॥
त्रिकालमेककालं वा श्रद्धाभक्तिसमन्वितः । तस्य धर्मे रुचिर्दत्ते भक्तिर्मुक्ति क्रमाद्भवेत् ॥ ६ ॥

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं अनसूयास्तोत्रं संपूर्णम् ॥

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

चातुर्मास ९ - श्रीक्षेत्र द्वारका गुजराथ, पश्चिम सागर, इ. स. १८९९, शके १८२१

द्वारकेत आल्यावर श्रीशंकराचार्यांच्या शारदा मठात महाराजांचा मुक्काम होता. यावर्षी पाऊस नसल्याने या भागात भयंकर दुष्काळ पडलेला होता. चारा नसल्याने पाच रुपयासुद्धा म्हैस घेण्यास कोणी कबूल होईना. आपापल्या बायका मुलांनासुद्धा सोडून देण्यापर्यंत पाळी आलेली होती. गायकवाड सरकारने त्यावर्षी अडीच लाख रुपये लोकांना अन्नासाठी वाटले होते. महाराजांच्या येण्याने तेथील सर्व लोकांना आनंद वाटून चार्तुमासात मुक्काम येथेच करण्याबद्दल सर्व लोकांनी महाराजांना विनंती केली. त्याप्रमाणे येथेच शके १८२१ सालचा चातुर्मास झाला.

द्वारकेत असताना द्विसाहस्त्री गुरुचरित्राची टीका दहाव्या अध्यायापासून सुरू करून ती पूर्ण केली. मूळ ग्रंथ जवळ नसतानाच ही टीका झाली. मूळ गुरुचरित्र १५ वर्षांपूर्वी माणगावी तयार झाले होते. त्या मूळ श्लोकांचे यावेळी नुसते स्मरण करूनच टीका झाली. याचे स्वत: महाराजांनाही आश्र्चर्य वाटले. त्यासंबंधी महाराजांचे एका पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘आश्विन वद्य ७ शके १८२१ द्वारका, सौराष्ट्र देश, श्रीक्षेत्र द्वारका येथे १४ अध्याय पूर्ण झाले. ही टीका होणे येवढा ह्या व्यक्तीचा अधिकार नाही. रामो हरी करणाऱ्या मुखाचे हे महात्म्य नव्हे. तर श्रीस्वामींचा अनुग्रह व स्वहृदयस्थ स्वमहिमख्यापक श्रीगुरुप्रसाद जाणावा.’ द्वारकेत असतानाच एका गुजराथी गृहस्थांच्या सांगण्यावरून गुरुचरित्रावर महाराजांनी चूर्णिकाही लिहून तयार केली.

यावर्षी या भागात सर्वत्र दुष्काळ असून शिवाय कॉलराही होता. त्यामुळे अनेक माणसे मृत्यूमुखी पडत असत. महाराजांचेबरोबर यावेळी गांडाबुवा होते. त्यांच्याकडून येणाऱ्या पुष्कळ श्रद्धाळू माणसांना महाराजांनी औषध देऊन बरे केले.

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

चातुर्मास १० - श्रीक्षेत्र चिखलंदा मध्यप्रदेश, नर्मदा इ. स. १९००, शके १८२२

शिनोरहून निघून वैशाख वद्य अमावस्येला चिखलदा मुक्कामी महाराज येऊन पोचले. तेथील मंडळी पूर्वी परिचित झालेलीच होती. तेथे नर्मदातीरावरील राम मंदिरात महाराजांचा मुक्काम झाला. नर्मदेच्या पलिकडे बडवाणी म्हणून एक संस्थान आहे, तेथील राजे ठाकोरसाहेब महाराजांचे भक्त होते. सर्व मंडळींनी चिखलद्यास चातुर्मास व्हावा अशी आग्रहाची विनंती केल्यामुळे तेथेच शके १८२२ म्ध्ये महाराजांनी चातुर्मास केला. याचवेळी महाराजांची अनुज्ञा मिळवून, महाराजांनी केलेले गुरुचरित्र सावंतवाडीचे नारोपंत उकिडवे छापीत होते.

‘गुरुस्वामी नारायणानंद सरस्वती हे आजारी आहेत, त्यांची सेवा करण्यास जावे’ असे देवांचे सांगण्यावरून महाराज मंडलेश्र्वराहून निघाले व फाल्गुन अखेर इंदूर येथे पोचले. महाराज गावाबाहेर आले हे समजताच सर्व प्रमुख ब्राह्मण मंडळी स्वागतासाठी बाहेर आली व सर्वांनी साष्टांग नमस्कार करून गावात येण्याविषयी महाराजांना आग्रहाची विनंती केली. ‘आपण शहरात राहत नाही. अडचणी असतात’ असे महाराजांनी सांगितले. तेव्हा त्या सर्व अडचणी दूर करतो. आपण यावे असा मंडळींचा आग्रह पाहून चार दिवसच मुक्काम राहील असे महाराज म्हणाले.

एका गृहस्थाने विचारले की, ‘आपण देवस्वरूप झाला. आता आपणास ही मूर्तिपूजा कशाला पाहिजे?’ हे ऐकून महाराज म्हणाले की, ‘ज्या मूर्तीच्या पूजेने ही स्थिती मिळाली त्या मूर्तिला विसरणे योग्य कसे होईल? तथापि तसा श्रद्धावान कोणी पूजा करणारा भेटला तर ही मूर्ति त्याला देता येईल.’

उज्जनीस गेल्यावर महाराजांनी गुरुस्वामींची सेवा उत्तमप्रकारे केली. त्यांना औषधोपचार करून बरे केले. तेथेही मंडळींची उपाधी मागे होतीच. तेथे श्रीमद्भागवत सांगणे सुरू झाले. पुराण श्रवणास पुष्कळ मंडळी जमू लागली. गुरुस्वामींना किंचित् याबद्दल हेवा वाटू लागलेला पाहून शेवटी त्यांना मनस्ताप देणे नको असा महाराजांनी विचार केला व आता त्यांची प्रकृतीही बरी झाली होती. त्यामुळे तेथे राहण्याचे काही कारण उरले नाही. तेव्हा महाराज उज्जनीहून गुरुस्वामींची आज्ञा घेऊन निघाले आणि वैशाख मासात महत्पूर येथे येऊन पोचले.

चिखलदा मुक्कामी माघ माहात्म ग्रंथ लिहला. भक्ताचा पोटशूळ बरा केला.

वैशाख अमावस्या शके १८२२ रोजी स्वामी महाराज शिनोर वरून चिखलदा ईथे आले या ठिकाणी स्वामी महाराज या पुर्वी आले होते त्यामुळे पुर्वपरिचित मंडळी होतीच. सकाळी नेहमीप्रमाणे ब्रम्हकर्म शास्त्राभ्यास आणि सायंकाळी पुराण असा नित्य क्रम असे.

चिखलदा मुक्कामी स्वामी महाराजांनी माघमाहात्म हा प्राकृत भाषेतील ओवीबध्द ग्रंथ लिहला ह्यात तिनशे त्रेचाळीस ओव्या असून प्रत्येक ओवीचे आद्याक्षर हे श्रीदत्त असे आहे असा हा वैशिष्ठपुर्ण ग्रंथ चिखलदा मुक्कामी लिहला. चिखलदा ला मुक्काम नर्मदा तिरावरील राम मंदीरात होता. चिखलदा मुक्कामी स्वामी महाराजांच्या भेटीला सावंतवाडीचे विनायकराव चिटणीस ह्यांना खाल्लेले अन्न पचत नसल्याने ते स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांना नमस्कार करून सर्व वृतात कथन केला तेव्हा महाराज म्हणाले कुलदेवतेची आराधना तुमच्या कुळातील माणसांकडून योग्य प्रकारे घडत नाही त्यामुळे आपणास त्याचा त्रास होतो तरी मी आपणास दत्तमंत्र व देवी मंत्र देतो. त्याचे नित्य पठण करावे व कुलदेवतेला नित्य स्मरावे शिवाय गोरखचिंचेतून काही औषधे दिली त्यामूळे चिटणिसांची तब्बेत हळूहळू पूर्ववत झाली त्यांनतर ते स्वामी महाराजांच्या दर्शनास नित्य येऊ लागले. चिखलदा चा चातुर्मास संपताच स्वामी महाराजांनी चिखलदा सोडायचे ठरविले त्यावेळी त्यांना तेथिल एकाने सोबत पंचाग देऊ केले कि जेणे करून एकादशी वगैरे तिथी पाहता येईल त्यावर स्वामी महाराज म्हणाले प्रवासात कशाचेच ओझे नको काडी घेऊन जमीनीवर हिशोब केला की एकादशी कळून येते. तिथून स्वामी महाराज मंडलेश्वरला आले.

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

चातुर्मास ११ - श्रीक्षेत्र महत्पूर मध्यप्रदेश, नदी- क्षिप्रा, इ. स. १९०१, शके १८२३

महत्पूर येथे मंडळींच्या आग्रहावरून महाराजांनी चातुर्मास करण्याचे ठरविले. सुमारे सहा महिने त्यांचा तेथे मुक्काम होता. तेथील मंडळींच्या सांगण्यावरून महाराजांनी दत्त पुराणांतील सर्व कथांचा संग्रह करून दत्तमहात्म्य या नावाचा एक प्राकृत ओवीबद्ध, रसाळ असा ग्रंथ केला व तेथेच त्रिशती गुरुचरित्र म्हणून तीनशे श्लोकांचे एक संस्कृत काव्यही तयार केले. या ग्रंथाबद्दल महाराजांचे पत्र असे आहे, ‘श्रा. शु. ११ - काही लोकांचा येथे आग्रह असा होता की, सविस्तर दत्तमहात्म्य असावे. त्यावरून ओवीबद्ध तृतीयाष्टकापासून सहाव्या अध्यायापर्यंत ओव्या लिहिल्या. प्राय: प्रत्यही १०८ होत गेल्यामुळे तेवढाच अध्याय ठेवला. उद्या ५०वा अध्याय पुरा होईल. सुमारे साडेपाच हजार ग्रंथ झाला. आता पुढे लिहिण्याची इच्छा होत नाही. नारायण.’

सटीक गुरुचरित्र छापून झाल्यावर सावंतवाडीहून सप्रे यांनी महाराजांचेकडे पाठविले ते अशुद्ध बरेच राहिले, काय करावे असे विचारले. त्यावर महाराजांचे पत्र असे आहे, ‘श्रा. व. ११ महत्पूर, छापलेल्या पुस्तकात अशुद्धे राहिली तरी राहोत. ‘गच्छत:स्खलनं क्वापि’ हा न्याय सर्वत्र आहेच. शुद्धिपत्र मात्र द्यावे म्हणजे झाले. नारायण.’

चातुर्मास १२ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा. इ. स. १९०३, शके १८२४

ब्रह्मावर्त क्षेत्रात चैत्र शु॥ १३ दुपारच्या वेळी महाराज येऊन पोचले. ही येथे येण्याची तिसरी खेप. यावेळी याठिकाणी अडीच वर्षे मुक्काम झाला. म्हणजे लागोपाठ तीन चातुर्मास येथे झाले. अंताजीपंत यांच्या घाटावरील राम मंदिरातच महाराज राहत होते. दोन खोल्या व मध्ये सोपा असे घरासारखेच हे राम मंदिरात आहे. महाराज आले असे समजल्याबरोबर पूर्वीची सर्व मंडळी दर्शनास धावून आली. कुशल प्रश्न वगैरे झाल्यावर सर्वांना आजपासून अध्ययनाकरिता या असे त्यांनी सांगितले. नंतर गंगेवरून महाराज स्नान करून आले व नित्यकर्म आटोपून भिक्षेस गेले. तीन घरची भिक्षा आणून ती सेवन केली. इतक्यात अध्ययनाकरिता मंडळी आलीच. त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे उपनिषदे, भाष्य, पंचदशी, जीवन्मुक्तीविवेक, मनुस्मृति इत्यादि विविध ग्रंथांचे अध्यापन महाराज करीत असत. लहान मुलांना संध्यादि ब्रह्मकर्म व काही काव्यही सांगत असत. वैदिक मंडळीही तेथे येऊन पदे सर्वानुक्रम वगैरे शिकत.

चातुर्मास १२ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश
चातुर्मास १२ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश

ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हगवण सुरू होऊन तो फार अशक्त झाला. त्यावेळी त्याच्या आईला कोणी तरी असा उपाय सांगितला की ‘तुम्ही पंचपक्वान्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खावयास घाला म्हणजे तुमचा मुलगा बरा होईल.’ हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटरावला भिक्षेला बोलावून खाऊ घातले. याने आप्पाला बरे वाटले.

महाराजांनी सांगितलेले नाममंत्र -
१ सप्ताह - शिवहरशंकर गौरीशंकर
२ सप्ताह - हरेराम हरेराम राम राम हरे हरे । हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 
३. सप्ताह - श्रीपादश्रीनृसिंहस्वामी । श्रीमद्दत्तात्रेयमौनी 
४ सप्ताह - गणेश गौरीहरनंदन । विघ्नविनाशन गजानन 
५ सप्ताह - हरिहर गणपती भास्करशक्ति स्वरूप ईशो वरदो जयति ।
६ सप्ताह - जय पुरुषोत्तम । शरद सत्तम 
७ सप्ताह - शिवहरशंकर । गौरीशंकर 
याप्रमाणे सात सप्ताह झाल्यावर ‘दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ या नाममंत्राचा सप्ताह केला.
पुढे दशाहारार्थ भागीरथीप्रीत्यर्थ एक सप्ताह केला. ‘भागीरथीशी जय पावन गंगे । जान्हवि तारय पातक भंगे’ या मंत्राने तो नववा सप्ताह झाला.

प्रत्येक सप्ताहसप्तमीचे वेळी मुक्तद्वार ब्राह्मणभोजन होऊन सांगता उत्तम होत असे. इतरही सर्वांना अन्नसंतर्पण होत असे. आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा करून हा शके १८२५ चाही चातुर्मास महाराजांनी ब्रह्मावर्तासच केला.

प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दुसरा चातुर्मास ब्रह्मावर्त ह्या ठिकाणी (शके १८१४- इ. स. १८९२) संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. आपटेबुवा ब्रह्मावर्तच्या श्रीराममंदिरामध्ये चातुर्मासात सतत अकरा रात्री कीर्तन करीत असत. बुवा विद्वान होते. वेदान्त त्यांच्या जिव्हाग्री बसलेला होता. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी खच्चून गर्दी होत असे. ह्या वर्षी समोर खांबाला टेकून एक कृश शरीराचे संन्यासी बसलेले होते. त्यांची मुद्रा निर्विकार व शांत होती. जणू आजूबाजूच्या जनसागराची त्यंना जाणीवही नव्हती.

आपटेबुवानी हाती टाळ घेऊन ठेका धरला. हळूहळू कीर्तनांत रंग चढू लागला. बुवानी आपली सर्व  विद्वत्ता आपल्या रसाळ वाणीमध्ये ओतली होती. लोकांच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होते. 'हेची दान देगा देवा' म्हणता म्हणता त्यांनी कीर्तन संपवले व ते म्हणाले "उद्या येथे दुसऱ्या कोणीतरी कीर्तन करावे असे मला वाटते. बोला कोण कीर्तन करणार?"
श्रोत्यांमधून कोणीच उत्तर दिले नाही. बुवानी परत विचारल्यावर कुठून तरी शब्द आले "उद्या मी कीर्तन करणार"
सर्व लोक अवाक् झाले. जो तो मान उंचावून पाहू लागला. एक आठ दहा वर्षांचा मुलगा उभा राहून दिमाखाने सांगत होता की,"उद्या मी कीर्तन करणार". त्याची आई त्याला मागे खेचीत होती. सर्वांना गंमत वाटत होती. बुवांनाही असेच वाटले. हसत हसत त्यांनी विचारले,"काय? तुम्ही उद्या कीर्तन करणार? शाबास " मुलानेही निर्भयपणे "हो" म्हणून सांगितले. मुलाची आई त्याचा हात धरून घरी निघाली. क्षणभर तिची नजर खांबाला टेकून बसलेल्या संन्याशाकडे गेली. त्यांनी हातानी खूण करून मायलेकरांना आपल्याकडे बोलाविले व मुलाला विचारले, "मुला, उद्या तू खरेच कीर्तन करणार?तुला काय काय पाठ येते?" मला"मना सज्जना भक्तिपंथेची जावे —हा श्लोक पाठ येतो"
ते संन्यासी म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते. त्यांनी मुलाच्या आईला असे सांगितले की ,"मुलगा हुशार आहे. उद्या सकाळी ह्याला गंगेवर नेऊन स्नान घाला आणि संध्याकाळी कीर्तनकाराच्या वेषात मंदिरात घेउन या". 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंदिरात भाविक लोक जमू लागले. आज जरा गर्दी जास्तच होती. स्वामी महाराज नेहेमीच्या खांबाला टेकून बसले. आपटे बुवा नेहेमीच्या वेळी आले व त्याच वेळी बाल हरदासाची स्वारीही आली. त्याच्या आईने त्याला कीर्तनकारासारखे सजविले होते. त्याला धोतर नेसविले होते व त्याच्या अंगावर उपरणे पांघरले होते. त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा आणि मुखावर निरागस भाव होता. आईचा हात धरूना तो सभामंडपामध्ये आला. सर्व जनसमुदायाचे डोळे जसे आपटे बुवांवर खिळले होते ते आता या बाल कीर्तनकारावर खिळले. मुलगा आला तो थेट श्री स्वामी महाराज जेथे बसले होते तेथे गेला. श्री स्वामी महाराज कोणाचा स्पर्श करून घेत नसत; पण हा बालब्रह्मचारी थेट त्यांच्या मांडीवर जाउन बसला. महाराजांना मोठे कौतुक वाटले. त्यानी आपल्या डाव्या हातानी त्याला आपल्याकडे ओढले व कौतुकाने विचारले, 
"आज खरोखरच तुम्ही कीर्तन करणार काय?"
"होय मी आज खरेच कीर्तन करणार"
"कोणता श्लोक कीर्तनासाठी घेणार?"                        
"मना सज्जना भक्ती पंथेची जावे ह्या श्लोकावर कीर्तन करण्याची माझी इच्छा आहे"
"पुन्हा म्हणा" बालकानी तोंड उघडताच महाराजानी हळूच एक चिमूटभर भस्म उजव्या हाताने त्याच्या जिभेवर टाकले. ही गोष्ट एवढ्या झटकन् घडली की अगदी जवळ बसलेल्या श्रोत्यांच्या नजरेला आली, पण ही कुजबुज पसरत पसरत सर्व लोकांपर्यन्त गेली.

"आज कोण कीर्तन करणार?" आपटे बुवानी पृच्छा केली. सर्वांच्या नजरा त्या बालकीर्तनकारावर खिळून राहिल्या होत्या. तो एका तंद्रीमध्ये चालत तो पुढे आला आणि त्याने सुरुवात केली."मना सज्जना भक्तिपंथेची जावे........" तबलजीने आणि टाळकऱ्यानी ठेका धरला आणि साडेतीन तास त्याने न अडखळता कीर्तन केले.

तो सांगत होता "माणसाने आपल्या अंगी असलेल्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा गर्व करु नये. कर्ता करवीता एक परमेश्वरच आहे. गवताचे पानही त्याच्याच इच्छेने डोलते. सर्वांचा बोलविता धनी तोच आहे." कीर्तन ऐकता ऐकता आपटे बुवांच्या नेत्रातून अश्रु धारा वाहु लागल्या. ते जातीवंत विद्वान होते.ते काय समजावयाचे ते समजले. कीर्तन आटोपताच त्यानी धावत जाऊन महाराजांचे पाय धरले आणी म्हणाले," आपण मला सावरले, आपणच माझा उद्धार करा". स्वामी महाराजांनी त्यांना कृतार्थ केले.

​  श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ​
श्री वासुदेवानंद सरस्वती

चातुर्मास १३ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ.स. १९०३, शके १८२५

ब्रह्मावर्तास येऊन महाराजांना एक वर्ष होऊन गेले होते. ‘नित्य श्रीर्नित्यमंगलम्’ सर्व काळ आनंदाचा सर्व मंडळींना जात होता. शके १८२४ प्रमाणे १८२५चा चातुर्मासही येथेच झाला.

दूरदूरचे विद्यार्थी अध्ययनाकरिता महाराजांचेजवळ येऊन राहिले होते. तेथे कार्तिक महिन्यात महाराजांनी सप्तशती गुरुचरित्र या नावाचा सातशे ओव्यांचा प्राकृत ग्रंथ तयार केला. गुरुचरित्रातील कथा यात साररूपाने दिलेल्या आहेत. प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर असे वाचले असता भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय तयार होतो.

त्यावेळेचा नाममंत्र ‘अंजनिसुता रुद्रावतारा । जय रामदूता भवभयवारा’ असा होता. याप्रमाणे तेथे नित्य उत्सवाचा आनंद सर्व लोकांना मिळू लागला. पण महाराजांना फारच उपाधी होऊ लागल्यामुळे तिसऱ्या चातुर्मासात मौन धरण्याचे महाराजांनी ठरविले.

आपल्या जवळच्या दत्तमूर्तीची काही तरी व्यवस्था करावी असा विचार महाराजांनी केला. त्यामुळे ती मूर्ति रुसून गंगेत जाऊन बसली. मूर्ती दिसेनाशी झाल्यावर महाराजांना बरे वाटले, बरे झाले, आपली उपाधि कमी झाली. पण इतक्यात गंगेकडून रडण्याचा आवाज कानी आला. त्या अनुरोधाने गंगातीरावर महाराज आले. तेथे शोध करताच ती मूर्ती सापडली. हे चरित्र पाहून महाराजांनी मूर्तिची व्यवस्था करण्याचा विचार सोडून दिला. पण उपाधीचा त्रास पाहून महाराज म्हणाले की, ‘ही मूर्ति कोणी चोरून का नेत नाही?’ हे बोलणे वेंकट्याने ऐकून त्याने ती मूर्ति नेली. ते महाराजांना समजल्यावर महाराज त्याला म्हणाले की ‘नुसती मूर्ति मिळाली म्हणजे काम झाले नाही. ती नीट जपली पाहिजे. फुकटचा हत्ती मिळाला तरी तो पोसण्याची शक्ति नसेल तर काय उपयोग?’ हे महाराजांचे बोलणे लक्षात ठेवून वेंकटय्या त्या मूर्तिची पूजा करीत मंडलेश्र्वरी राहिला होता. पुढे तो मेल्यावर त्या मूर्तिचे काय झाले ते कळत नाही. मूर्ति नेली त्या वेळीच महाराज म्हणाले, ‘ही मूर्ति जेथे जाईल त्याच्या सर्वस्वाचा नाश होईल. कारण आपणाइतकी पाळणूक कोणाकडूनही होणार नाही.’

श्री वासुदेवानंद सरस्वतीं
श्री वासुदेवानंद सरस्वती

चातुर्मास १४ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १९०४, शके १८२६

पूर्वी ठरविल्याप्रमाणे या चातुर्मासात आषाढ पौर्णिमेपासून महाराजांनी मौन धारण केले. पुराणसुद्धा बंद होते. विशेष काही सांगणे असल्यास पाटीवर लिहून दाखवीत. बहुतेक सर्व काळ समाधीतच जात असे. दोन-तीन दिवसांनी केव्हा तरी भिक्षा होत असे. गोपाळराव राजाध्यक्ष यांनी गुरुचरित्रातील कथानकांवर किर्तनोपयोगी अशी व्याख्याने तयार केली व ती महाराजांना वाचून दाखविली. महाराजांनी ‘नारायण’ एवढेच शब्द उच्चारून समाधान दर्शविले.

हुशंगाबादेहून हळूहळू प्रवास करीत एके दिवशी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास महाराजांची स्वारी नरसोबावाडीस येऊन दाखल झाली. बरोबर फक्त दोन छाट्या, दंड, भोपळ्याचा कमंडलू व उपनिषदांची एक लहान पोथी इतके सामान होते. महाराज इतक्या लवकर येतील अशी कल्पना वाडीच्या मंडळींना नसल्यामुळे ती मंडळी स्वस्थ होती. महाराज एकदम श्रीदत्तपादुकांसमोर येऊन उभे राहिले. ‘नमो ब्रह्मदेवा’ हे पद म्हणून प्रार्थना केली व वंदन करून वरती श्रीनारायणस्वामींचे समाधीचे दर्शन घेऊन स्वामी ब्रह्मानंदाचे माडीवर जाऊन बसले.

दुसरे दिवसापासून महाराजांचा उपदेश करण्याचा नित्यक्रम सुरू झाला. पहाटे चार वाजता उठून काही योगप्रक्रिया सांगत. नंतर सूर्योदयाचे पूर्वी शौचमुखमर्जनादि उरकून स्नान होत असे. नित्यकर्मे आटोपल्यावर खाली देवदर्शन करून वर मठात परत येत. नंतर कित्येकांना संध्यादि ब्रह्मकर्माचे शिक्षण देऊन कित्येकांना उपनिषदे सांगत. मध्यान्हकाळचे आन्हिक आटोपल्यावर तीनपासून सात घरातून भिक्षा घ्यावयाची. सर्वच प्रेमीमंडळी त्यामुळे क्रमाक्रमाने भिक्षेस जात असत, भिक्षा झाल्यावर ज्योतिष, वैद्यक, मंत्र, तंत्र इत्यादि विषयांचे प्रश्न पुढे येत. त्यांना सर्वांना व्यवस्थित सांगणे होत असे.

महाराजांनी दीक्षितस्वामीजींना दंड दिला व त्यांचे नाव ‘नृसिंहसरस्वती’ असे ठेवले. हे महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. मितभाषी, शांत, दांत, एकांतप्रिय असे होते. स्वभाव अत्यंत प्रेमळ होता. महाराजांचे आज्ञेप्रमाणे वाडीतच श्रीदत्तपूजा, उत्सवादि कार्य करीत दीक्षितस्वामीजी पुष्कळ वर्षे राहिले होते.

सखारामबापू गेंडे म्हणून एक पुजारी वाडीत आहेत. त्यांना पूर्वी सर्वत्र विटाळ आहे असा भास होत असे. त्यांचे उत्पन्नही तंट्यामुळे त्यांना मिळत नसे. महाराजांनी त्यांना ‘दत्तमाला मंत्राचा जप’ करण्याबद्दल पत्राने कळविले होते. त्याप्रमाणे त्यांनी श्रद्धेने अनुष्ठान करताच तो सर्व भार दूर होऊन उत्पन्नही कुळांकडून वेळोवेळी मिळू लागले.

पहाटे उठून महाराज पंचगंगेवर जाऊन स्नान करून आले. नित्यकर्म झाल्यावर जिज्ञासू मंडळींना उपनिषदे सांगितली. भिक्षा झाल्यावर आलेल्या आर्त लोकांना पीडानिवारणार्थ योग्य ते उपाय सांगण्यातच संध्याकाळ होत असे. वाडीतील दादो नारायण पुजारी यांची पत्नीचे अंगांतील पिशाच्च शिरोळास गेले. मिरजेकडून येणेविषयी मिरज मळेकरीणबाईंनी अनुग्रह केला. पण त्यांना आज काही सांगता येत नाही असे उत्तर मिळाले. वाडीला येणारी मंडळी येथेही येत. त्यामुळे येथेही बरीच यात्रा जमत असे. वाडीतील बऱ्याच मंडळींनी येथे आग्रह घेतला.

कयाधू संगम नरसी- नरसी चातुर्मास
कयाधू संगम नरसी- नरसी चातुर्मास

चातुर्मास १५- नरसी महाराष्ट्र, नदी- कायधू, इ. स. १९०५, शके १८२७

महाराजांची शके १८२७ चा चातुर्मास आषाढ पौर्णिमेपासून नरसी येथें सुरू झाला. त्यादिवशीं व्यासपूजा झाली. एक महिनाभर प्रथम महाराजांची योग्यता येथील मंडळींच्या लक्षात आली नाही. त्याप्रमाणे एक महिना महाराजांना विशेष उपाधी झाली नाही. पुढे मात्र मंडळी फार जमू लागली. तेथे महाराजांची बसण्याची जागा अगदी लहान असल्यामुळे मंडळींना आत प्रसादास जाता येईना. तेव्हा फार गर्दी झालेली पाहून दुसरे रूप घेऊन महाराज बाहेर येऊन अश्वत्थाच्या पारावर बसले. आतील लोक बाहेर आल्याबरोबर त्यांना महाराज दिसले व बाहेरच्या मंडळींनाही आत दिसले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नरसी हे गाव लहान असले तरी महाराजांच्या वास्तव्याने त्याला मोठ्या क्षेत्राची शोभा आली. महाराज सकाळी गंगेस जात, त्यावेळी लोक दर्शनास येत. त्यांची हकीकत तेथेच ऐकून त्यांना लगेच उपाय सांगितला जात असे. पुढे पुढे तेथील मंडळीही महाराजांच्याबरोबर कयाधू नदीवर स्नानास जाऊ लागली. दोन तीनशेपर्यंत स्नानास जाण्याच्या मंडळींची संख्या झाली. महाराजांनी वर स्नान केल्यावर खाली सर्वांनी स्नान करावे. महाराज स्नान करून परत येतानाही कित्येक मंडळी आपल्या घरासमोर दर्शन करीत. 

नरसीस असताना महाराज एके दिवशी माध्यन्हसमयी नदीवर स्नानास एकटेच गेले होते. त्याचवेळी एक बाई पाणी आणण्याकरितां नदीवर गेली. तो तिला असा चमत्कार दिसला की, "तिरावर महाराज एका झाडाखाली मांडी घालून बसले आहेत. मांडीवर सुंदर सहा महिन्यांचे बाळ आपल्या डाव्या हाताचा अंगठा तोंडात धरून महाराजांकडे पहात आहे आणि महाराजही त्याच्याकडे सारखे पहात आहेत.” हा चमत्कार पाहून तिला पाणी नेण्याची शुद्ध न राहून तीही त्या दृष्याकडे एकाग्र चित्ताने पाहात राहिली. काही वेळाने महाराजांची नजर सहज त्या बाईकडे गेली त्याबरोबर ते बाळ दिसेनासे झाले व ती बाई एकदम मूर्च्छित होऊन खाली पडली. महाराजांनी त्या बाईजवळ येऊन तिच्या तोंडात पाणी घालून तिला सावध केले आणि "तू पुण्यवान आहेस. ही हकीगत कोणाला सांगू नकोस, जा.” असे सांगितल्यावर ती बाई पाणी घेऊन घरी गेली. पुढे तिच्या तोंडून सर्व लोकांना ही हकीगत कळल्यामुळे फार विस्मय वाटला.

पुढे महाराजांचा मुक्काम नरसीला असल्याचे समजल्यावरून नृसिंहवाडीची पुजारी मंडळी नरसी मुक्कामी येऊन त्यांनी वाडीत घडलेली हकीकत महाराजांचे कानावर घातली. तेव्हा पालखीतून खाली येण्याचे कारण महाराजांनी देवांना विचारले असता देवांनी क्रोधयुक्त मुद्रा करून सांगितले की, पुजारी लोक तू घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागत नसून उलट तुझी निंदा करतात. माझ्या पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात. तरी पंच नेमून परभारे व्यवस्था ठेवली पाहिजे.

तेव्हापासून करूणात्रिपदी वाडीस रोज पालखीपुढे म्हणतात. महाराजांचे आज्ञेप्रमाणे इष्ट ते वर्तन न सुधारल्यामुळे वारंवार संकटाचे प्रसंग येतात. 

प्रयागहून निघून महाराज वैशाखारंभी ब्रह्मावर्तास येऊन पोचले. तेथे यावेळी महाराजांचा मुक्काम १० दिवस झाला. रात्री रोज भजन होत असे.

ओंकारेश्वराहून निघून महाराज बढवाईस आले. गावात फक्त तीनच मुक्काम केले. तेथून नर्मदा तटाकी, खेडेघाटी धर्मशाळेत येऊन राहिले व त्या वर्षीचा चातुर्मास महाराजांनी तेथेच केला.

datta mandir badwai
प. पू. वासूदेवानंद सरस्वती यांनी १९०६ मध्ये आपल्या १६ व्या चातूर्मासादरम्यान बडवानी येथे एक मूखी दत्तची स्थापना केली.

चातुर्मास १६- बढवाई मध्यप्रदेश, नदी- नर्मदा, इ. स. १९०६, शके १८२८

बढवाई हे गाव इंदूर संस्थानात नर्मदातीरावर आहे. तेथे खेडेघाटी धर्मशाळेनजीक एका झोपडीत राहण्याचे महाराजांचे ठरले. ती झोपडी दुरूस्त केली. गावापासून दोन मैल अंतरावर हे स्थान नर्मदातटाकी एकांतात आहे. लोकांची उपाधी नको म्हणून महाराज तेथे येऊन राहिले, पण तेथेही गर्दी झालीच. एकदा महाराज गर्दीस कंटाळून अरण्यांत जाऊन बसले. तेथेही लोक आलेले पाहून महाराज म्हणाले, "जंगलात गेलो तरी हे लोक सोडीत नाहीत तरी आता जावे तरी कोठे?” तेव्हा देव म्हणाले की, "तू कुठेही गेलास तरी लोक असेच मागे लागणार; तरी जंगलात न जाता गावाजवळच राहा.” महाराजांचा चातुर्मास यंदा बढवाईस आहे हे समजताच ठिकठिकाणची मंडळी दर्शनास येऊ लागली.

धर्मशाळेत नेहमी दोनशेपर्यंत मंडळी असत. सर्वांची जेवणाची व्यवस्था तेथेच केली जात असे. भिक्षेपूर्वी थोडा वेळ असल्यास महाराज ध्यानस्थ बसत. कोणाला औषधे, कोणाला बाधानिवारणार्थ उपाय, संतती, संपत्ती वगैरेवर उपाय, मंत्र, यंत्र, व्रते, प्रदक्षिणा इत्यादी उपाय सांगण्यातच संध्याकाळ होऊन जाई. नंतर सायंसंध्या वगैरे झाल्यावर भगवद्भभजन मध्यरात्रीपर्यंत चालत असे. विष्णुबुवा, गोपाळबुवा, रामभाऊ व इतरही हरिदास वगैरे मंडळी भजनात इतकी रंगून जात असत की, त्यावेळी ती प्रेमाने नाचत असत. महाराजांनाही ते प्रेमळ भजन ऐकून आनंद वाटत असे.

Vasudevanand saraswati
श्री वासुदेवानंद सरस्वती

चातुर्मास १६- नरसोबावाडी महाराष्ट्र, नदी- कृष्णा, इ. स. १९०६, शके १८२८

शके १८२८ आश्विन व॥ ६ दिवशी दुपारी ११-१२ वाजता महाराज नरसोबाचे वाडीस येऊन पोचले. मंडळी सारखी महाराजांची वाटच पहात होती. महाराज गावाबाहेर आल्याबरोबर त्यांना गावच्या सीमेवरून मोठ्या समारंभाने वाजत गाजत आणावे असा वाडीच्या मंडळींचा विचार होता. पण महाराज एकदम श्रीदत्तपादुकांसमोर येऊन राहिल्यावर मग सर्व गावात महाराज आल्याची वर्दी गेली. तशा दुपारच्या जेवणाच्या वेळी देखील ही बातमी समजताच गावातील लहान थोर सर्व मंडळी घाटावर महाराजांच्या दर्शनार्थ जमा झाली. महाराज खाली श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेऊन वर येताच सर्व मंडळींनी साष्टांग वंदन करून डोळे भरून ती दिव्य मूर्ति पाहून घेतली व नंतर सर्व आपापल्या घरी परतले. महाराज ब्रह्मानंदस्वामींच्या मठात येऊन उतरले. नंतर आलेल्या मंडळींबरोबर थोडे बोलणे झाल्यावर माध्यान्हिक आटोपून भिक्षा झाली. 

यावेळी महाराजांचा मुक्काम वाडीत सुमारे दोन महिनेपर्यंत होता. तोपर्यंत हजारो रूपये मिळाले. हे सर्व द्रव्य तेथील पुजारी मंडळीच घेत असत. समोर नारळ, केळी वगैरे कोणी ठेवल्यास महाराज त्यांना स्वत: प्रसाद देत. पण त्यात काही पैसे कोणी ठेवले असल्यास तो प्रसाद दुस-याकडून देववीत. वरती द्रव्य ठेवलेले पाहून "हा केर तुम्ही केव्हा काढणार” असे पुजा-यांना महाराज विचारीत असत. बारा वाजल्यावर महाराज भिक्षा घेण्याकरिता निघत. पाच घरी भिक्षा घेतली जाई. लोक आपल्या दारापुढे सडा घालून रांगोळ्या काढून महाराजांची वाट पहात असत. बरोबर श्रीनृसिंहसरस्वतीही असत. भिक्षा घेऊन ती श्रीनारायणस्वामींचे मठात किंवा ब्रह्मानंदांचे मठात संपवीत असत. ‘अष्टौ ग्रासा मुनेर्भक्ष्या:’ या वचनास साजेल असाच महाराजांचा नित्य आहार असे. तिखट, गोड वगैरे तर वर्ज्यच. भिक्षा झाल्यावर ती पत्रावळ काढून जागा सारविण्याकरितां नित्य अनेक स्त्रियांची अहमहमिका सुरू होत असे.

महाराज सायंकाळपर्यंत समाधीतच होते. पण असा एक चमत्कार झाला की, बेळगावचे बालकुंद्रीकर वाडीस आले होते. त्यांच्या पत्नींनी त्यादिवशी सकाळी येऊन महाराजांना भिक्षेचे निमंत्रण दिले होते व त्या दुपारी स्वयंपाक तयार करून महाराजांची वाट पहात बसल्या. त्याचवेळी महाराज दुसरे रूप धारण करून भिक्षेस निघाले. काही मंडळीही त्यांच्या पाठीमागून निघाली. पण रामचंद्रयोगींच्या मंदिरासानिध्य येण्याबरोबर ते रूप अदृश्य झालें. त्याचवेळी गावाबाहेर वेशीतून येणा-या मंडळींना महाराजांचे दर्शन झाले व महाराजांनी प्रसादही दिला. 

एकदा सातवळेकरांनी महाराजांना विचारले की, ‘आपणास पुनर्जन्म आहे काय?’ तेव्हा महाराज म्हणाले की,‘होय, हा तर अरूणोदय आहे.’

वाडीहून दोन मैलावर मोठा म्हणून अरण्य कृष्णातीरावर आहे. त्याठिकाणी एका साधू पुरुषाच्या सांगण्यावरून वाडींतील मंडळी कार्तिक पौर्णिमेनंतर वनभोजनास जात असत. यावर्षी सर्वांच्या आग्रहावरून महाराजही तेथे गेले होते. बरोबर नृसिंहसरस्वती वगैरे शिष्यमंडळी होती. वाडींतील प्रसिद्ध प्रासादिक पुराणिक वक्रतुंडबुवा कवीश्वर हेही बरोबर होते. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ हे भजन महाराज बाहेर निघाले म्हणजे होत असे. त्याप्रमाणे भजन करीत मंडळी महाराजांचेसह मळ्यात पोचली. नंतर महाराजांची भिक्षा व सर्वांची भोजने झाल्यावर वक्रतुंडबुवा कवीश्वर यांनी पुराणसेवा केली. महाराजांचा अधिकार पूर्णपणे जाणणारे ते होते. त्यांनी त्यादिवशी भविष्यपुराण व इतरही पुराणांतील वचनांवरून श्री दत्तात्रयांचे कलियुगांत श्रीपादश्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती व योगिराज असे जे तीन अवतार होणार त्यापैकी पहिले दोन अवतार होऊन गेले, तिसरा योगिराज म्हणजेच महाराज आहेत असे अत्यंत श्रद्धापूर्वक प्रतिपादन केले. पण महाराज ते कशाला अंगाशी लावून घेतील? त्यांनी त्यावेळी सांगितले की, ‘योगिराज अवतार अद्यापि व्हावयाचा आहे. आपल्यावर उगीच हा आरोप नको’ हे महाराजांचे वाक्य ऐकूनही भाविक मंडळींची श्रद्धा तशीच कायम राहिली.

नंतर रामेश्वराहून आषाढ शुद्ध द्वितीयेस निघाले ते दोन अडीचशे मैलांचा प्रवास १०-१२ दिवसात करून आषाढ शुद्ध चतुर्दशीचे दिवशी तंजावरास येऊन पोचले. तंजावरास विमलांबा देवीचे रम्य स्थान पाहून महाराजांचे मन रमले. तेथे कावेरी नदी असून जवळच संध्या मठ आहे. तेथे महाराज राहिले. कावेरी नदीचे नाव येथे वेणू नदी असे आहे.