श्री रामकृष्ण क्षीरसागर (सन १९३४-१९९९)

रामकृष्ण क्षीरसागर
श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज

जन्म: नगर जिल्हा, पारनेर येथे, १९३४
संप्रदाय: दत्त संप्रदाय  
कृपानुग्रह: श्री नृसिंहसरस्वती   
कार्यकाळ: १९३४ - १९९९
निर्वाण: दत्तचरणी विलीन ८ सप्टेंबर १९९९

श्री दत्त संप्रदायात हे क्षीरसागरमहाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा शिष्यपरिवार खूप मोठा आहे. क्षीरसागर महाराजांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. यांना लहानपणापासून वैराग्य, आत्मज्ञान व ईश्र्वरप्राप्ती यांचा नाद होता. वयाच्या सातव्या वर्षी यांना ईश्र्वराचे दर्शन झाले. सालंकृत अशा पांडुरंगाने यांना दर्शन दिले. नंतर एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास यांना आणखी एक साक्षात्कार झाला. आकाशातून एक दिव्य व्यक्ती त्यांच्याकडे पाहात होती. त्या व्यक्तीच्या विशाल नेत्रांनी क्षीरसागर यांचे जीवन पालटले.

नंतरच्या काळात क्षीरसागरांनी तपश्र्चर्या केली. यावेळी यांना श्रीनरसिंहसरस्वती यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनीच यांना गाणगापूर येथे बोलावून यांच्यावर कृपा केली. क्षीरसागर यांनी नगर येथे एकास्थानी बसून पंचवीस वर्षे खडतर तपश्र्चर्या केली. या काळात यांनी निंदा, कुचेष्टा, अपमान, छळ शांतपणे सोसला. या काळात यांना श्रीगुरुंचे प्रसन्न दर्शन झाले आणि वेदकार्यासाठी पुढील आयुष्य खर्च करण्यासाठी श्रीगुरूंनी प्रेरणा दिली.

दत्त मंदिर, सावेदी, अहमदनगर
दत्त मंदिर, सावेदी, अहमदनगर

क्षीरसागर महाराजांनी नगर येथे सावेडी कट्ट्यावर श्रीदत्तनिवास स्थापन करून वेदकार्य सुरू केले. वेदांत नगर स्थापन करून वेदांचे रक्षण, संवर्धन आणि प्रसारण त्यांनी केले. त्यांच्या दर्शनासाठी अनेक भक्त यांच्या आश्रमात जमा होतात. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी क्षीरसागर हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत असे म्हटले आहे. नगर येथील यांच्या दत्तस्थानात यांचा षष्ठ्याब्दीपूर्तीचा समारंभ मोठ्या थाटाने केला. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, ठाणे, पनवेल, सांगली, राहुरी, अहमदाबाद इत्यादी ठिकाणांहून अनेक भक्तजन नगरला येऊन सत्संगमंडळातून दत्तप्रभूंची सेवा नियमित करीत असतात.

असे हे क्षीरसागर महाराज दि. ८ सप्टेंबर ९९ रोजी नगर येथे अनंतात विलिन झाले.

दत्त मंदिराची वेद विद्या शिक्षण केंद्र निर्मिती

प. पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत ११ मार्च १९७४ यादिवशी श्री दत्तमंदिराची स्थापना झाली. या मंदीर परिसरात अत्यंत नयनमनोहर व पवित्र वास्तु श्री लक्ष्मी मंडप व वेदांत या वास्तु उभ्या केल्या. स्वामीजींचे ध्येय वेदविद्येचे संगोपन व संवर्धन होते. त्यामुळेच स्वामीजीने वेदांत विद्यापीठाची स्थापना केली. वेद यज्ञ आणि धर्मशास्त्र येथे गुरूकुल पद्धतीने शिकविले जाते. पूर्वी वेद, मंत्र हे ऋषींना आपल्या समाधी काळात स्फुरत ते शिष्यांना शिकवीत असत. ते मंत्र गुरूकडून शिष्यांकडे जात असत. याठिकाणीही तरुण शिष्य येतात. १२-१४ वर्षे राहून वैदीक मंत्र, यज्ञ पद्धती, मंत्रशास्त्र, वैदिक सुक्त शिकतात व जातात. चारीही वेद शिक्षणाची सोय येथे आहे. श्रीक्षीरसागर महाराजांना वयाच्या ७व्या वर्षी साक्षात्कार झाला. त्यांनी वेदविद्या संगोपनांचे विशेष उद्दीष्ट धरले. आज १०० पेक्षा जास्त विद्यार्थी येथे विविध वेदांचे अध्ययन करीत आहेत.

सध्याच्या अशांत व धकाधकीच्या जीवनात तरुणांना मन:शांती प्राप्त व्हावी या उद्देशाने या मंदिराचे निर्माण केले आहे. येथील दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रृगेरी मठाचे शंकराचार्य यांनी केली. सदर दत्तमंदीर वेद विद्यापीठाच्या मागच्या बाजूस असून ते बन्सी पहाडपूर दगडात हलक्या गुलाबी रंगात बनवले आहे. हे सर्व कारागीर राजस्थानातून आणलेले होते. सदर मंदीराचे बांधकाम पूर्णतया शास्त्रोक्त पद्धतीने केलेले आहे व शास्त्रार्थानुसारच बांधकाम आहे. मंदिराचा शिलान्यास आश्र्विन शुद्ध ९ (२००२) मध्ये झाला. त्यावेळी श्रृंगेरीच्या शंकराचार्याचे विशेष प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्राचे विविध भागातून घनपाठी ब्राह्मण उपस्थित होते. या मंदिरास लागणारा सर्व निधी भक्तांकडून भिक्षा मागून जमा करण्यात आला.

या संस्थानामार्फत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भक्तांची सत्संग मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. ही मंडळे भारतातच नाहीत तर परदेशातही आहेत. मंदीराचे कार्यक्रम स्वामीजींचे विचारधन प्रसृत करण्यासही सत्संग मंडळे कार्यरत आहेत. याच संस्थानामार्फत गुरुवाणी, अमृतकलश सद्गुरू संवाद यासारखी मासिक प्रकाशने व इतर धार्मिक पुस्तके प्रकाशित केली जातात.

"वैदिक धर्म व संस्कृती छात्रांना अध्यापनाच्या मार्गाने स्पष्ट होते. क्षीरसागर महाराजांचा उपदेश गुरुवाणीतून सर्वत्र प्रसारीत केला जातो. धर्मशास्र व भक्तीमार्ग यातील तत्त्वबोध अमृतकलश या पुस्तकाचे रूपाने प्रकट झालेला आहे." क्षीरसागर महाराजांचा उपदेश उपदेशामृत नावाचे खंडातून समाविष्ट झालेला आहे. त्यांच्या काही लेखांचे हिंदी, गुजराथी, कन्नड भाषांत अनुवाद झालेले आहेत. वेदकार्य हे सामान्य जनांपर्यंत पोहोचवावे हिच आश्रमाची इच्छा आहे. हे मंदीर देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगात हे सर्वात मोठे दत्तमंदिर आहे.

चिंता व चिंतामुक्त जीवन (प. पू. श्री क्षीरसागर महाराजांचे विचार) 

पुष्कळ माणसांना एक अनामिक भीती वाटत असते. ही भीती ते कोणापुढेही बोलून दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या हृदयावर सारखा ताण पडतो, हृदय हलके होत जाते व पुढे हृदयविकाराने मनुष्य जातो. बऱ्याच लोकांना ह्याचे ज्ञान नसते. अनामिक भीती बोलायची कोणापुढे? बायको, मुलांजवळ बोलता येत नाही. यांचेपुढे जर असे भीतीदायक काही बोलले तर ते उगाच घाबरतील. संसार विस्कळीत होईल. म्हणून हे लोक मनातल्या मनात भीती दाबून ठेवतात, बाहेर बोलून दाखवीत नाहीत, मनातल्या मनात कुढत जातात.

अशा वेळी योग्य सत्पुरूषापुढे स्वत:च्या मनाची खरी खरी स्थिती उघड करून दाखवावी, वाटणारी भीती बोलून दाखवावी, वाटणारी भीती बोलून दाखवावी व मार्गदर्शन घ्यावे. ह्यासाठी सत्पुरूषही उच्च दर्जाचे असावेत. त्याच्या कानावर घालून उपयोग झाला पाहिजे. तेवढा त्यांचा अधिकार असावा. जर तसे नसेल तर हे तथाकथित गुरु ह्या गृहस्थांच्या दुर्बलतेचा सारखा गैरफायदा घेत राहतील. कित्येक लोक काळजीने, चिंतेने व अनामिक भीतीने इतके व्याकूळ झालेले असतात की, आमचे पुढे ते स्वत:चे मन मोकळे करतात व योग्य मार्गदर्शन घेतात.

एका व्यक्तीला रात्री झोपल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कोणीतरी आहे. असा एकसारखा भास होतो व ही अदृश्य व्यक्ती अंधारातून एक टक लावून ह्याचेकडे एकसारखी पाहते असे त्याला वाटते. म्हणून रात्रभर झोप येत नाही. रात्रीतून ३ ते ४ वेळा उठून दिवा लावून पहातो. ओरडून चौकशी करतो. कोण आहे म्हणून विचारतो. परंतू उत्तर येत नाही. रात्रभर अशा बसलेल्या स्थितीत पेंगत व पडून राहतो. झोपण्यासाठी गादीवर आडवा झाला की त्याला कोणीतरी आहे असा भास व्हावयाला सुरुवात होते. रात्रभर झोप येत नाही इतकेच डॉक्टरांना सांगतो. औषधे घेतली परंतू उपयोग होत नाही.

श्री क्षीरसागर महाराज वचने
श्री क्षीरसागर महाराज वचने

हात दुखत असेल, पाय दुखत असेल तर डॉक्टरांच्या औषधांचा उपयोग होईल. परंतू डॉक्टर ही अनामिक भीती घालवू शकत नाहीत. रोग्याच्या मनातील भीती घालवून त्याचे मनात जो आत्मविश्र्वास जागृत व्हायला पाहिजे. तो डॉक्टर करू शकत नाहीत. लहानपणी घडावयाला नको त्या गोष्टींबद्दल प्रत्येकाला एक चिंता कोरून खात असते. ती कोणाजवळ बोलून दाखविता येत नाही. जर बोलून दाखविली तर त्याच्या दुर्बल मन:स्थितीला लोक हसतील व समाजातील स्थानाला धक्का बसेल म्हणून तो बोलून दाखवू शकत नाही. प्रत्येक मनुष्य काही ना काही आर्थिक विवंचनेत असतो. कोणी बँकेकडून कर्ज घेतलेले असते, कोणा मित्राकडून हात उसने म्हणून पैसे आणलेले असतात, कोणी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतलेले असतात. प्रत्येक जण त्रासलेला असतो. अनपेक्षितरित्या जर कोणी सावकार तगादा करीत आला तर त्याचे पैसे कसे द्यावे ह्या अनामिक भीतीमुळे त्याचे मन पोखरत जात असते. सावकाराचा निरोप आलेला असतो की, उद्या परवा येतो म्हणून ह्याची पैशाची जमवाजमव चालू राहते. ती लवकर पूर्ण होत नाही. ह्याला रात्रभर झोप येत नाही. उद्या सावकार आला तर त्याला काय देऊ? कोठून देऊ? ही काळजी त्याला सारखी सतावत असते. काही कारणास्तव हा सावकार महिनाभर येत नाही. तोपर्यंत हा महिनाभर रात्रभर निवांत झोपू शकत नाही. अशा रितीने माणूस चिंतेने खंगतो.

काही भीती वैयक्तिक असतात. जर कोणा अयोग्य व्यक्तीजवळ बोलले तर फार बोभाटा होईल व जीवनातून उठण्याची वेळ येईल म्हणून बाहेर कोणाजवळही बोलता येत नाहीत, फक्त मनात दाबून ठेवल्या जातात.

आणखी एका व्यक्तिला रात्री झोपले की कोणीतरी स्पर्श करतो व उठवितो असा भास होतो. हे गृहस्थ ह्या चिंतेने रात्रभर झोपूच शकत नाहीत. वास्तविक पाहता, ह्यांना कोणीही स्पर्श करीत नसते व उठवीत नसते. परंतू ह्यांच्या मनात जो संशय आहे तो काही केल्या जात नाही. हा मनाचा दोष आहे. हा दोष ते गृहस्थ स्वत: होऊन घालवू शकत नाहीत व रात्रभर झोपूही शकत नाहीत.

गुरुमुखातून मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर ईश्वर-चिंतन केले, नामस्मरण केले तर हे दोष जातात व हे दोष केल्याशिवाय मनुष्य निवांत झोपू शकत नाही.

आजकाल ४०/४२ वयाची तरुण माणसे एकदम हृदयविकाराने जातात कशी? ७०/७५ वय होऊन किंवा त्याही पुढे गेले तर वृद्धावस्थेमुळे गेले असे म्हणता येईल. हे लोक इतके शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत की लोक टीका करतील. ह्या भीतीने सत्पुरूषांचे दर्शनासाठी जाण्याचे टाळतात. ह्या वेडेपणाच्या भावना आहेत. त्यांना कसे वाटत असते की सत्पुरूषाच्या पाया पडून काय फायदा होणार आहे? परंतू माझे असे सांगणे आहे की प्रत्यक्षात सत्पुरूषांच्या पाया पडल्याने काय होते हे एकदा बघा. स्वत:चे दोष कमी होतात, स्वत:चा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होतो हे त्यांना समजत नाही.

एक ४२ वयाचे डॉक्टर हृदयविकाराने का गेले? याविषयी एका नामवंत हृदयतज्ञाला विचारले व त्याच्याशी चर्चा केली. ह्याचा खुलासा ते देऊ शकले नाहीत. कारण त्यांचे शास्त्रात ह्याचे उत्तर नाही. मी त्यांना खुलासा केला की, माणसाचे हृदय कमकुवत का होते? तर त्याला एक प्रकारची अनामिक भीती वाटत असते. त्याशिवाय, स्वत:बद्दलच्या अवास्तव कल्पनामुळे कोणत्याही सत्पुरूषांचे मार्गदर्शन ते घेत नाहीत. डॉक्टरांचे शास्त्र केव्हा उपयोगी पडते? जेव्हा घटना/कृती घडतात तेव्हाच. मनुष्य आजारी पडला किंवा सौम्य हृदयविकारासामध्ये तो जर वाचला तर त्याला वाचवण्याचे प्रयत्न डॉक्टर करतात. परंतू हृदयविकार होऊ नये म्हणून शास्त्रात तसे कोणतच औषध नाही.

माणसाचे मागे जी एक प्रकारची अनामिक भीती असते ती योग्य पुरुषाचे पुढे बोलून दाखविली जात नाही, स्वत:चे मन मोकळे केले जात नाही. तोपर्यंत त्याच्या मनावरचा भार कमी होत नाही. मन:शांती कशी मिळवावी हे पुस्तकातून वाचून परस्पर जपजाप्य कितीही केले तरी मन शांत होत नाही, भीती कमी होत नाही. ह्यासाठी प्रचंड शक्तीच पाहिजे. ही शक्ती गुरुजवळ असते. जर गुरुमुखातून उपदेश घेऊन जपजाप्य केले तरच ती शक्ती मन:शांती मिळवून देऊ शकेल.

सुखप्राप्तीसाठी जीवनात कितीही भौतिक साधने विकत घेतली तरी ते तात्पुरते सुख देते व बरेही वाटते. परंतू ही साधन कायम सुख देऊ शकत नाहीत. ही साधने दुसऱ्याला सुख मिळावे म्हणून घेत राहतो. घरातील कर्ता पुरुष पैसा कोणत्या मार्गाने उपलब्ध करता येईल म्हणून पैशाच्या मागे लागलेला असतो व सतत काहीतरी करण्यात गुंतलेला असतो. हा ह्यातून मोकळा होणार केव्हा व ह्या साधनांचा उपयोग घेणार केव्हा? मानवी शरीरही शेवटी थकते. हृदयावर किती ताण देणार? त्याचेकडून किती काम करवून घेणार? प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. आपण सुखी तर जग सुखी. हे सूत्र लक्षात ठेवावे. काबाडकष्ट किती दिवस करणार? जर ठराविक मर्यादेबाहेर कष्ट केले, आततायीपणा केला तर उपयोग होत नाही.

काही लोक विनाकारण काळजी करीत बसतात. एक ६०-६५ वयाचे गृहस्थ तक्रार घेऊन आले की त्याच्या पाच वर्षे वयाच्या नातवाचे अभ्यासात लक्ष नाही. फक्त खेळाकडेच लक्ष आहे. मी त्यांना सांगितले, तुम्ही आता नातवाची काळजी करू नका. विनाकारण काळजी करून तुमचे हृदयावर ताण वाढवू नका. आपले हृदय चांगले कसे राहिल हे बघा. लग्न झाल्यावर मुलाने त्याची व त्याच्या संसाराची चिंता करावी.

काही लोक अंत:करणात विनाकारण द्वेष करतात. ईर्ष्या व द्वेष या दोन गोष्टी अंत:करणातून द्वेष करणे ह्यामुळे आपले हृदय कमकुवत होते. मनुष्याला फार अल्प आयुष्य दिले आहे. ह्या वेळेत त्याला पुष्कळ चांगली व विधायक कामे विचारपूर्वक करता आली पाहिजेत. ह्या देहाला केव्हा कीड लागेल, रोग होईल, कॅन्सर होईल किंवा हृदयविकार होईल हे सांगता येत नाही. विज्ञान जरी पुढे गेलेले असले तरी ह्या कोणत्याही रोगावर ते मात करू शकलेले नाही. ही सत्ता ईश्वराच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. आपल्या हातात सत्ता आहे ती ही की, रोज काय काय व कसे घडते हे डोळ्यांनी पाहणे, जेवणे व निवांत झोपणे. झोपण्याअगोदर देवाला प्रार्थना करावी की, देवा आपल्या कृपेमुळे आजचा दिवस चांगला गेला, उद्याचा दिवसही असाच चांगला जाऊ दे. तुम्ही सत्पुरूषांची संगत ठेवा, त्यांचे उपदेश ऐका. त्यावर विश्वास ठेवा. तुमचे कल्याण होईल. काही लोक मला काहीही प्रश्न विचारतात. हे प्रश्न इतके असंबद्ध असतात की त्याला काही अर्थ नसतो. विचारणाऱ्याला झालेला मानसिक गोंधळ त्यातून बाहेर आलेला असतो. आमचे म्हणणे असे की, सर्व भार ईश्वरावर ठेवा. सर्व चिंता सोडून द्या. जितके आनंदात राहता येईल तेवढे रहा. ईश्वर ही एकच अशी प्रभावी शक्ती आहे. तिचेशी सतत अनुसंधान ठेवा. असे वागल्याने तुम्हाला जीवनात सुख व शांती मिळेल. कारण ती महान प्रबावी शक्ती आहे आणि त्या दिव्य शक्तीचा मी अनुभव घेतलेला आहे. तुम्ही रोज पहाटे बाह्य मुहूर्तावर हा उपदेश आठवा व चिंतन-मनन करा.

आमचे एक तत्त्व आहे की, शेवट सुखकारक पाहिजे, मग सुरुवातीला दु:ख असले तरी चालेल, कारण जीवनाचे सुरुवातीला मनुष्याच्या शरीरात सहन करण्याची शक्ती असते. तेव्हा तो कितीही संकटे किंवा दु:ख असेल तर सहन करू शकेल. परंतू लोक नेमका उलटा विचार करतात. तरुणपणी जीवनाचे सुरुवातीला जे जे तात्पुरते सुख मिळते ते घेतात, उपभोगतात. म्हातारपणी जर संकटे आली तर काय करावे? ह्याचा जरादेखील विचार करीत नाहीत. म्हातारपणीचे त्यावेळी पाहता येईल म्हणून तरुणपणी बिलकूल काळजी करीत नाहीत. तुम्ही आनंद मिळविण्यासाठी जी जी भौतिक साधने गोळा करता ती शेवटी दु:खच निर्माण करतात असे समजावे. खरे सुख कोणे आहे? मनाचे समाधान व सुख कोठे आहे? ह्याचे महत्त्व आज तरुण व मध्यम वयातील लोकांच्या लक्षात येणार नाही. परंतू जेव्हा तुमचे वय होईल तेव्हा तुम्हाला त्यांचे महत्त्व लक्षात येईल.

तुम्ही कोणीही प्रपंच सोडू नका, कामधंदा सोडू नका. तुमच्या आयुष्यात मिळालेला वेळ व संधी वाया घालवू नका. कित्येक धनवान कायम चिंता करीत असतात. जर जवळ पैसा नसेल तर चरितार्थ कसा चालवावा ह्याची चिंता असेल तर आपण समजू शकतो. परंतू ह्या धनवानांजवळ सर्व काही असते. परंतू अन्न जात नाही. ह्यांना अनेक रोगांनी घेरलेले असते. डॉक्टरांनी काही जास्त कॅलरी असलेले अन्न घेण्यास मनाई केलेली असते. काय ह्या धनाचा ह्यांना उपयोग? काही श्रीमंताची मुले चांगली निघत नाहीत, ह्यामुळे आईबापांचे मनाला आनंद मिळण्याऐवजी मानसिक क्लेश वाढतात त्याच्यातूनच जीवनाचा बेरंग होतो.

साक्षात्कारी गुरूंचा लाभ होऊन व सहवास मिळून जर तुम्हाला कोणतीच गोष्ट समजली नाही तर तुम्ही जगातील सर्वात मोठे दुर्दैवी व दोषी आहात हे समजावे. मनाला आधार निर्माण होण्यासाठी व शांतता मिळविण्यासाठी ईश्वराची उपासना करा. ईश्वर-उपासनेचे स्तोम माजवू नका. आपण हे आपल्यासाठीच करतो. प्रत्येकाने स्वत:च्या उन्नतीसाठभ ध्यान-धारणा करावी. जास्तीत जास्त आनंदी राहवे म्हणजे तुमचे कल्याण होईल.

श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज

श्रीगुरुनिष्ठा माझी परंसद्गुरु प. प. क्षीरसागर महाराज (संत साहित्य अभ्यासक)

दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार, तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार।।

या जगात सर्वात दुर्लभ काय तर मनुष्य देह! त्याहून दुर्लभ काय? तर भारतात जन्म! त्याहून अवघड काय? तर योग्य गुरुंची प्राप्ती! हजारो योनी भटकंती करुन प्राप्त झालेल्या नरदेहाचं सार्थक कशात आहे? तर परमेश्वरप्राप्तीमध्ये! आणि परमेश्वरप्राप्ती कशी होईल तर ती केवळ सद्गुरुंच्या कृपेनेच! ही कृपा कशी प्राप्त होईल तर केवळ "श्रीगुरुंवरील निष्ठेमुळे"!

गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण । वेंचीन आतां माझा प्राण । गुरुनिरोप करीन मी ।।

श्रीगुरुचरित्रातील या ओवीची परमपूज्य गुरुदेवांनी अनेकदा पुनरावृत्ती केली आहे. याचं कारण एकच! अध्यात्मिक प्रगतीसाठी हवी असते ती गुरुनिष्ठा!

कलीयुगी अधर्म वृद्धी पावले म्हणोनि श्रीगुरु गुप्त झाले । भक्तजनांला जैसे पाहिले तैसेचि भेटती अद्यापि ।।
कलीयुगाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन परमपूज्य गुरुदेवही गुप्त झाले आहेत! परंतु 
लौकिक मते आम्ही जातो । ऐसे दृष्टांती दिसतो । भक्त जनांघरी वसतो । निर्धार धरा मानसी ।।

या वचनाला जागून जो श्रद्धेने व निष्ठेने भक्ती करेल त्यास योग्य त्या ठिकाणी योग्य त्या रुपात दर्शन देतच आहेत! मुळात श्रद्धा म्हणजे काय? तर गुरु आणि वेदांत वाक्यांवर दृढ विश्वास होय! असं श्रीमद्आद्य शंकराचार्य सांगतात. याचाच अर्थ "जे जे म्हणून परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन केलेले आहे त्या सर्वांवर अतिशय विश्वास ठेवणे! मग ती गुरुवाणी असो, अमृतकण असो, अमृतकलश असो वा धर्मदर्शन आणि सद्गुरुसंवाद असो! यांमधील वाक्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा!:" हे माझ्या उद्धाराच्या दिशेने ठेवलेलं पहिलं पाऊल! त्या प्रमाणे आचरण हा स्वतंत्र विषय आहे. सध्याचा वाढत जाणारा कलीचा प्रभाव पाहता विरुद्धाचरणाचं वातावरण सर्वत्र दिसून येतं आहे, त्यामुळे धर्माविरुद्ध आचरण, धर्माला विरोध म्हणजेच आधुनिकपणा असा मायावी प्रगतीचा बागलबुवा निर्माण झालेला दिसतो! पण हा मार्ग मोक्षाकडे किंवा अध्यात्मिकप्रगतीकडे नेणारा नाही याची जाणीव परमपूज्य गुरुदेवांनी अनेकदा आशीर्वादातून करुन दिलेली आहे! यात कली नानाप्रकारची रुपे धारण करुन बुद्धी भेद करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. यावर अधिक व्यापक विचार केला तर परमपूज्य गुरुदेव हे कुणी सामान्य व्यक्ती नव्हेत! मानवी देहात ईश्वरी शक्ती प्रकट झाल्यानंतरची "नीलवर्ण कांती" आपण प्रत्यक्ष अनुभवली असताना त्यांच्या महात्म्याचे वर्णन करण्यासाठी शब्दांना निमंत्रण देणं हे त्यांच्या तेजालाच मर्यादित केल्यासारखं होईल! 

गुरु ही केवळ व्यक्ती नसून ते तत्त्व आहे! या सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजतागायत वेदांनाही न कळलेले हे तत्त्व आपल्या सहवासात व्यक्त रुपात मार्गदर्शन करीत होते व आज तेच कार्य ते अव्यक्तांत राहून अखंडित करत आहे व "श्रीगुरुंचे चरित्र आजमितीपर्यंत चालू असल्याची साक्ष ते पावलोपावली देत आहे! सत्पुरुषांच्या जन्मभूमीला महत्त्वं नसतं तर कर्मभूमीला असतं हे परमपूज्य गुरुदेवांनी जरी सांगितलं असलं तरी आमची भौतिक गोष्टीत भव्यता मोजणारी तोकडी दृष्टी अधिक व्यापक करण्यासाठी हे मुद्दाम सांगावं लागतं की "पारनेर तालूक्यातील रायतळे गावातील छोट्याश्या खोली पासून त्रिभूवनसुंदर अशा वेदांत आणि श्रीदत्तात्रेय निवास व महालक्ष्मी मंडपापर्यंतचा प्रवास हा त्या शक्तीच्या अस्तित्वाचीच साक्ष आहे!" याकाळात देवस्थानवर संकटे आली नाहीत असं मुळीच नाही! पण ती या शक्तीनेच वेळोवेळी परतवून लावली आहेत!  

हे सर्व सांगायचा उद्देश हाच की परमपूज्य गुरुदेव हेच आपले श्रद्धा स्थान असायला हवं आणि आपल्या निष्ठा देखील त्यांच्याच चरणी! आजची माझी भौतिक सुबत्ता ही गुरुदेवांचीच कृपा आहे यात कोणाचेही दुमत असता कामा नये. हे सर्व ज्यांच्या कृपेने प्राप्त झाले त्या गुरुदेवांची शिस्त आणि पावित्र्यात कोणत्याही प्रकारे तडजोड करणे म्हणजे त्यांच्या शिस्तीला आणि ईश्वरी शक्तीला आव्हान देणेच आहे हे लक्षात यायला हवे! मग ते वेदकार्य असो वा व्यवस्थापन असो किंवा प्रसार सेवा असो! श्रीदत्तदेवस्थान म्हटलं की फक्त "परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज" हेच नाव आठवायला हवं तरच त्याला गुरुनिष्ठा म्हणता येईल! याचं कारण संस्थापक विश्वस्त म्हणून आजही परमपूज्य गुरुदेव हेच या ठिकाणी विराजमान आहेत!
 
सूर्य मावळला की चोरांना उधाण येतं! पण याहून दुसरं अज्ञान ते कोणतं म्हणावं! 
सूर्य मावळतो म्हणजे तो केवळ आपल्या दृष्टीच्या पलिकडे जातो नष्ट होत नाही. म्हणजेच सूर्य मावळल्यावर चोरी करणं हे मांजरानं डोळे मिटून दूध पिण्यासारखं आहे. 
पण लक्षात असू द्या श्रीमद्भगवद्गीता ही आधी सूर्याला सांगितली गेली आहे, मनुष्यांचे अनेक जन्म हे सूर्यानेच पाहिलेले आहेत.
केवळ याच नव्हे तर गेल्या कित्येक जन्मातील कर्मांचा तो साक्षीदार आहे. त्यामुळे मानवी न्यायालयात निकाल विकत घेणारी माणसं हे सोयीस्करपणे विसरतात की त्यांच्या कर्मांची नोंद भगवंतांच्या न्यायालयातही सुरु आहे आणि योग्य वेळी निकाल नव्हे तर तो न्याय हा देतच असतो! या आधी ही त्याने अनेक उदाहरणे दिलीच आहेत! काहींचे दिवस भरले तर काहींचे १०० अपराध भरण्याची तो वाट पाहत असेल! 
("आमच्या कोर्टात केसेस भरपूर असतात पण ज्या दिवशी केस बोर्डावर येते त्याच दिवशी निकाल असतो"- परमपूज्य श्रीगुरुदेव)

परमपूज्य गुरुदेवांनी आपल्या तपश्चर्येने श्रीदत्तात्रेय निवासात ईश्वराचे अधिष्ठान निर्माण केले आहे तसेच पावित्र्य आणि चैतन्य अबाधित राखण्यासाठी व भक्तांना आधार मिळावा म्हणून काही कडक नियम घालून दिलेले आहेत.आपल्या अनंत पीढ्या उद्धरल्या जाव्यात या करिता निर्माण झालेले हे अधिष्ठान व त्याचे पावित्र्य टिकवणं हे आपलं कर्तव्य नव्हे का?

गुरुवाणी, अमृतकलश, धर्मदर्शन आणि सद्गुरुसंवाद यातील सद्गुरुंच्या वाणीला वेदवाणीचा अधिकार आहे तर श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी असताना परमपूज्य गुरुदेवांनी श्रीदत्तदेवस्थानावर येणा-या भावी संकटाची स्पष्ट शब्दात दिली त्या शब्दांना वेदवाणीचा किंवा त्या ही पुढे जाऊन श्रीगुरु आज्ञेचा अधिकार नाही का? की पापी अश्वत्थात्म्याच्या मण्याला आपल्या मुकूटात कोंदून मण्याच्या रुपाने त्याचे पाप डोक्यावर मिरवणा-या युधिष्ठिराप्रमाणे कुणाचे पाप तर आपण मिरवत नाही ना? प्रत्यक्ष पाप न करता वर्णाश्रमधर्माची पायमल्ली करुन देवस्थानाच्या वेदकार्यास व श्री दत्तदेवस्थानाच्या वैभवास कलंक लावणा-या कोण्या "मायाव्याला" माझी अजाणतेपणाने साथ तर नाही ना? एखादे कार्य मला कितीही महत्वाचे वाटत असले तरी गुरुंचा त्याला विरोध असल्यास माझ्यादृष्टीने ते निषिद्ध कर्म आहे का? तसेच माझ्या कळत नकळत घडणा-या कृतीने परमपूज्य गुरुदेवांचे त्यागमय जीवन आणि त्या त्यागांच्या समिधांवर सुरु असलेल्या धर्मयज्ञात अडथळा तर निर्माण होत नाही ना? यावर आत्मचिंतन जरुर व्हावे!

गुरुमूर्ति स्मरेन्नित्यं, गुरुनाम सदा जपेत् । गुरोराज्ञां प्रकुर्वीत, गुरोरन्यन्न भावयेत् ॥१८॥-श्रीगुरुगीता
(श्रीगुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्रीगुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये.) तेज प्रकट झालं की त्यावर उड्या मारणारे पतंगसुद्धा जन्माला येतात आपण मात्र तेजाचीच कास धरली पाहिजे. कारण तेज शाश्वत आहे पतंग नव्हे! मनुष्य देह हा तेजात विलीन होण्यासाठी असतो पतंगांसोबत मैत्री करण्यासाठी नव्हे.
 
आज्ञा गुरुणां ह्यविचारणीया ।।
श्रीगुरुंनी दिलेली आज्ञा ही शिरोधार्य मानावी तिच्यावर शंका उपस्थित करु नये! कारण

शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता, गुरौ क्रुद्धे शिवो न ही । तस्मात्सर्वप्रयत्नेन, श्रीगुरुं शरणं व्रजेत् ॥४४॥-श्रीगुरुगीता
(भगवान शंकरांना क्रोध आला, ते साधकावर रागावले तर गुरुभक्ताचा पाठीराखा गुरू असतात, पण गुरुच रुष्ट झाले तर मात्र आपला त्राता त्रिभुवनात कॊणी नाही. म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरुशरणागति पूर्णपणे पत्करण्याचा प्रयत्न करायला हवा.)

आता राहता राहिला प्रश्न कोण काय म्हणेल? याचा तर "निर्लज्जम् गुरुसन्निधौ" ।
"ज्याला आपलं दैवत गुरु आहे असं वाटतं त्याने अन्य कशाचाही विचार करायचा नाही" असं परमपूज्य गुरुदेवांनीच मार्गदर्शन केलेलं असताना हा प्रश्न निरर्थकच!
गोचिडं ही गायीच्या कासेपाशीच असतात त्यांना रक्ताचीच चव कळते दुधाची नाही! उद्या इतकं सगळं मार्गदर्शन करुनही जर आपल्या वागण्यात बदल झाला नाही तर तो दोष आपला आहे गुरुदेवांचा नव्हे. परीसाने लोखंडावर रागावलं तर चालतं पण लोखंडाने परीसावर रागावणं ह्या त्याच्या उद्धाराच्या वाटेतला अडथळा बनतं! म्हणून 

सर्वपापविशुद्धात्मा, श्रीगुरोः पादसेवनात् । देही ब्रह्म भवेद्यस्मात्, तत्कृपार्थं वदामि ते ॥११॥
(श्रीगुरुचरणाच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते. त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप बनतो. त्या गुरुकृपेचे तत्त्व, तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो.)

।श्रीरामकृष्णार्पणमस्तु।