महीपती संत दासगणु महाराज

संत दासगणु महाराज
संत दासगणु महाराज

नाव: गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे. 
जन्म: पौष शु. एकादशी ६ जानेवारी १८६८
जन्म गाव: अकोळनेर, ता. जि अहमदनगर 
शिक्षण: इंग्रजी ४थी
विवाह: जामखेड तालुक्यात बोरले आष्टिचे जहागिरदार नारायण रानडे यांची कन्या सरस्वती यांच्याशी १८९२  
महानिर्वाण: कार्तिक व. १३ रविवार २५ नोव्हेंबर १९६२ सकाळी ८ वाजुन ३६ मिनिटांनी महाराजांचे महानिर्वाण झाले 
व्यवसाय: १८९३ मध्ये पोलीस खात्यात भरती १९०४ पर्यत नोकरी 
सदगुरु अनुग्रहकृपा: १८९६ मध्ये श्री वामनशास्री इस्लामपुरकर 
साईबाबांचे प्रथम दर्शन: १८९४ मध्ये नानासाहेब चांदोरकर यांचे समवेत.
पहिले किर्तन: १८९७ जामखेडच्या विठ्ठल मंदिरात.
आरती रचना: "शिर्डी माझे पंढरपूर", शिर्डी येथील रत्नपारखी यांचे विठ्ठल मंदिरात, तसेच 'साई रहम नजर करना' व 'रहम नजर करो अब मोरे साई'.
नारदीय पहीले किर्तन: १९०६ मध्ये श्री साईबाबांचे सांगण्यावरून.
श्री साईनाथ स्तवनमंजिरी या स्तोत्राची निर्मिती: ९ सप्टेंबर १९१८ मध्ये मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर क्षेत्री, श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर ३७ दिवस.
साईबाबा संस्थानची स्थापना: सन १९२२, पहिले अध्यक्ष म्हणून दासगणु महारांजाची निवड व तेथुन पुढे १९४५ पर्यत अध्यक्षपद सांभाळले.
समाधी स्थळ: मु.पो. गोरटे ता. उमरी जि. नांदेड 

दासगणू महाराज एक संतश्रेष्ठ जाज्वल्य व्यक्तिमत्व

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज (१८६८ - १९६२) हे मराठी संत, कवी, कीर्तनकार होते. दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात. महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले. १९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला.

दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यंनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू- महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते. दासगणू महाराजांच्या प्रमुख रचना अशा आहेत :

१) श्री आऊबाई चरित्र २) ईशावास्य भावार्थ बोधिनी
३) श्री गजानन विजय: या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
४) भक्त लीलामृत ५) भक्तिसारामृत, ६) भाव दीपिका
७) शंकराचार्य चरित्र ८) संत कथामृत ९) साई स्तवनमंजिरी
१०) शिर्डी माझे पंढरपुर. (साईबाबांची आरती)

श्री दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदाचं भाषांतराचं कार्य सुरु केलं होतं. आणि पहिल्याचं श्लोकापाशी ते अडले.

ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत ।
तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम ।।

अर्थात- या चराचरात जे म्हणून काही आहेपणानं दिसतं, भासतं, जाणवतं ते सारं ईश्वरानं व्यापलेलं आहे. त्या सर्वाचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
श्री महाराज, 'त्यागपूर्वक भोग घ्यावा' या शब्दांपाशी अडले. त्यागानं भोग तरी कसा शक्य आहे असं त्यांना वाटलं. भल्या भल्या विद्वानांशी चर्चा करूनही अर्थ उकलेना. शेवटी त्यांनी शिर्डी गाठली आणि बाबांनाच प्रार्थना करून त्या श्लोकाचा अर्थ विचारला. त्यावर बाबा हसून म्हणाले, "अरे हा अर्थ तर तुला काका दीक्षितच्या घरची मोलकरीण सांगेल!" श्री दासगणूनाच नव्हे तर हे उत्तर ऐकणाऱ्या सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्या बिचारीचं शिक्षण ते काय असणार, बुद्धी ती काय असणार, ती उपनिषदाची अर्थ् व्युत्पत्ती कशी काय करणार?

मग दासगणू महाराज काकासाहेबांच्या घरी गेले. रात्री साईबाबां विषयी गप्पा झाल्या. त्या स्मरणरंजणातच दासगणू झोपी गेले. दिवाळीचे दिवस होते ते. पहाटेच दासगणूना जाग आली ती कुणाच्या तरी मधुर गुणगुणण्यानं. आधीच दिवाळीची प्रसन्न पहाट त्यात हा स्वर! दासगणू जाऊन पाहतात तो भांडी घासण्यात दंग असलेली काकांची मोलकरीण गाणं गुणगुणत होती. ती पोरं अंगावर फाटकं लुगडे नेसली होती आणि गात होती ते नारिंगी (रंगाच्या) साडीचं महती सांगणारं गाणं! त्या साडीची भरजरी नक्षी, तिचे काठ, तीचा पदर यांचं भरभरून वर्णन त्यात होतं. दिवाळीच्या आनंदात माखलेल्या काकांच्या घरातल्या पोरीबाळी नव्या कपड्यात नटल्या होत्या. त्यांना पाहून फाटक्या कपड्यातली ती पोरं उदासपणे नारिंगी साडीचे गोडवे गाणारं ते गाणं गुणगुणत होती. दासगणू महाराजांचं मन या दृष्याने हेलावलं. ते काकांना म्हणाले," अहो काका, या पोरी ला सुद्धा एखादी नवी साडी घेऊन द्या. काका सुद्धा मुळात उदार हृदयाचे! त्यात दासगणू महाराजांची विनंती! तेव्हा आनंदाने ते घरांत गेले. दिवाळीच्या खरेदी निमित्तं कपाटात आणखीही काही नव्या साड्या होत्या. त्यातली एक सुंदरशी साडी त्यांनी या पोरीला भेट म्हणून दिली. नवी साडी नेसून संध्याकाळी मैत्रिणींसोबत ती पोर फिरली आणि बागडली देखील. दुसऱ्या दिवशी ती आली मात्रं जुनी साडी नेसूनचं. नवी साडी घरी ठेवून. पण चेहऱ्यावर कालची उदासीनता नावाला ही नव्हती. उलट आनंद विलसत होता. काल अंगावर जुनी साडी आणि चेहरयावर उदासीनता. आजही अंगावर जुनीच साडी पण चेहऱ्यावर आनंद! तिचं हे रूप पाहताच दासगणू महाराजांच्या अंतरात श्लोक निनादला,

ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत ।
तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम ।।

या मोलकरणीच्या निमित्तानं महाराजांना 'त्यागपूर्वक भोग' चा अर्थ उमगला. आज ती नवी साडी नेसली नव्हती तरी कालचे दैन्य ओसरले होते ते केवळ भावना बदलल्याने! आज मनानं ती खिन्न नव्हती कारण साडीची उणीव नव्हती. प्रथम नवं लुगडं घ्यायला असमर्थ होती म्हणून नाईलाजानं जुनंच लुगडं नेसून उदास होती. मग नवं लुगडं मिळालं. ते नेसण्यास समर्थ होती तरीही जुनंच नेसायचं तिने मनाशी ठरवले त्यामुळे ती मनाने उदास नव्हती. समर्थ असूनही दैन्य मिरवीत होती. केवळ 'आहे' आणि 'नाही' आणि 'असूनही नाही' या भावनांच्या गुणांनंच माणूस सुख आणि दु:ख भोगतो. प्रत्यक्षात सुख आणि दु:खाच मोजमाप बाह्यावरून करता येत नाही. सर्व जर काही एकाच ईश्वराने व्यापलं आहे तर त्यात सुख आणि दु:ख आलं कुठून? नवी साडी नसल्याची अपूर्णता दु:खाचं कारण होती. साडी लाभल्याची पूर्णता ही सुखाचं कारण बनली. फरक बाह्यात पडला नाही. आंतरिक होता. थोडक्यात सुख आणि दु:ख हे आंतरिक आहे. प्रत्यक्षात सारं काही पूर्णच आहे. फाटकी साडी नेसलेली ती पोरं ईश्वराचांच अंश. दाता म्हणजे काका आणि त्यांनी दिलेले दानही ईश्वरी अंशच. सारं काही अशेषच.

ईश्वरावाचून वेगळं काहीच नाही. केवळ मी पणान आंतरिक सुख दु:ख आहे. 'मी'पणामुळे मी देणारा, मी घेणारा, मी अभावग्रस्त असा भाव आहे. प्रत्यक्षात दाता, देय, दान सारं काही ईश्वरी सत्तेतच सामावलं आहे.

श्री दासगणू महाराज समाधी गोरटे
श्री दासगणू महाराज समाधी, गोरटे

दासगणु महाराजांची ग्रंथ संपदा

१९०३- गुरुपाठाचे अभंग (२५)
१९०३- संतकथामृत अध्याय ६१ ओवीसंख्या ६३४३ असुन ५० संताच्या चरित्राची ओवीबद्ध रचना
१९२५- भक्तिसारामृत हा ग्रंथ १९०५ मध्येच रचला गेला पण.१९२५ मध्ये प्रकाशित झाला यात ६३ अध्याय असुन ओवीसंख्या १२५३७ आहे यात ५४ संताची चरीत्र वर्णन आहेत.
गुरुचरित्रसारामृत- यात ५२ अध्याय असुन ओवीसंख्या २७३४ आहे.
सुमध्वविजयसारामृत- हा ग्रंथ वैष्णवमताचे संस्थापक पूर्णप्रद्ज्ञ स्वामी मध्वाचार्य यांचे जीवनचरित्रावर आधारीत असुन यात ११ अध्याय व ओवीसंख्या १९२४ आहे १९३८ मध्ये पूर्ण झाला.
श्री गजाननविजय- शेगावं चे गजानन महाराज यांचे जीवन चरित्र असुन यात २१ अध्यायात ओवीसंख्या ३६६८ आहे हा ग्रंथ १९३९ मध्ये प्रकाशित झाला.
श्रीमद आद्यशंकराचार्यचरित्र- हा ग्रंथ संतचरित्र मालिकेचा मेरुमणी असुन यात ३९ अध्यायात ५९०१ ओवीसंख्या आहे.

इतर- १०० स्फुटपदे, उपदेश प्रकरणात शिष्यबोध व छात्रबोध हे दोन ग्रंथ आहेत याव्यतिरीक्त अमृतानुभव, शांडिल्यसुत्र, नारदभक्तीसुत्र, भक्तीरसायन, चांगदेव पासष्टी, ईशावास्य, विष्णुसहस्रनामबोधिनि, गौडपादकारिकाविवरण, विचारसागरप्रदिप यासारखे टिकाग्रंथ व १२५ बोधकथाही लिहील्या आहेत.

अशा महत कल्याण कारी व जगाला वरदायी झालेलं दासगणु महाराजांचे जीवन आपल्या सामान्य लोकांसाठी अमृत आहे. श्री साईबाबांचे कथामृत एकही कथा दासगणु महाराजांचे चरित्र सांगितल्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. साईबाबांचे जीवनचरीत्र देशविदेशात पोहचविण्यासाठी दासगणु महाराज यांचे अतुलनीय योगदान आहे.दासगणू महाराजांचे कार्य पाहता साई चरित्र, श्री गज।ननविजय व इतर विस्तृत वाङग्मय पहता दासगणु महाराज यांची पुण्यतिथी साजरी करणं हे प्रत्येक साईभक्ताचं कर्तव्यच आहे. म्हणुन प्रत्येक साईभक्तांने आपआपल्या घरी किंवा आपल्या आसपास असलेल्या साईबाबांचे मंदिरात दासगणु महाराज यांचा फोटो समोर ठेवुन हारपुष्पाने पुजन करून दासगणु महाराजांची व श्री साईबाबांचे अशिर्वाद लाभलेली साईनाथ स्तवनमंजिरीचे पठन (वाचन) करावे ही आपणा सर्वांना नम्रपणे विनंती करतो. 

महाराष्ट्राचे महिपती, दासगणू महाराज

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज (१८६८-१९६२) हे मराठी संत, कवी, कीर्तनकार होते. दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना' आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म पौष शु. एकादशी ६ जानेवारी १८६८ रोजी अकोळनेर, ता. जि अहमदनगर या गावी झाला. १८९३ मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि १९०४ पर्यत नोकरी केली. महाराज पोलीसखात्यात नोकरीला असले तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. या दरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले त्यांचे पहिले कीर्तन १८९७ साली जामखेडच्या विठ्ठल मंदिरात झाले. श्री साईनाथ स्तवनमंजिरी या स्तोत्राची निर्मिती महाराजांनी ९ सप्टेंबर १९१८ रोजी मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर या क्षेत्री श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर ३७ दिवसांपूर्वी केली. साईबाबा संस्थानची स्थापना: सन १९२२ झाली आणि पहिले अध्यक्ष म्हणून दासगणु महारांजाची निवड केली तेथुन पुढे १९४५ पर्यत त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांचे महानिर्वाण, श्रीज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीला (कार्तिक वद्य १३, १८८३) २६ नोव्हेंबर १९६२ मध्ये पंढरपुरात झाले. त्यांचे समाधी स्थळ: मु. पो. गोरटे ता. उमरी जि. नांदेड येथे आहे.

संतकवी दासगणू महाराज यांची ग्रंथसंपदा

अमृतानुभव भावार्थमंजिरी, उपदेशपर पद्ये, उद्धवागमन, छात्रबोध, हितबोध, पासष्टीभावार्थदीपिका, पोवाडे, भक्तिरसायन, भजनावली, श्री गुरूचरित्र साराम्रूत, श्रीगोदामहात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थ बोधिनी व मंत्रार्थ, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीभक्तिलीलामृत (अर्वाचीन), श्रीभक्तिसारामृत, श्रीसंतकथामृत, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीशंकराचार्य चरित्र, श्रीशंडिल्य भक्तिसूत्र भावदीपिका, श्रीशनिप्रताप, सुबोध लघुकथा, श्रीगजाननविजय– शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ग्रंथ.

आजतागायत या ग्रंथाच्या मराठीत ४९ आवृत्त्यातून २३,८२,००० इतक्या प्रती प्रकाशित झाल्या आहेत. तसेच श्रीदासगणू महाराजांनी जवळपास ८५ कीर्तनोपयोगी आख्याने रचली आहेत.