श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज

जन्म: ज्ञात नाही 
आई/वडील: ज्ञात नाही
गुरु: दत्तात्रय 
समाधी: वैशाख वाद्य द्वादशी इ. स. १७५२ (नृसिंहवाडी येथे)   

श्री रामचंद्र योगींच्यानंतर त्याच मार्गावरून मार्गक्रमण करून ‘संजीवन समाधी’ घेणाऱ्या श्री गोपाळ स्वामींचा ह्या क्षेत्राच्या उत्कर्षात बहुमोल वाटा आहे. त्यांनी संन्यासाश्रम घेऊन भरत खंडातील सर्व तीर्थक्षेत्रांना पावन केले. त्यानंतर नरसोबावाडी येथे येऊन, श्री दत्त पादुकांची त्रिकाळ सेवा करून अष्टांग योग सिद्ध करून ब्रह्मानंदामध्ये ते निमग्न होऊन राहिले. 

गोपाळ स्वामी महाराज सर्वश्रेष्ठ अर्चक व भजक होते. तत्परता व दक्षता हे अलौकीक गुण त्यांच्या ठायी होते. सकलगुणचक्र्वर्ती महामहिम तपोनिधी होते. दत्तमहाराजांच्या कृपाशिर्वादाने प्राप्त झालेल्या काही जमिनीचे मालक श्रीपाद स्वामी असून त्यांचा विनियोग गुरुद्वादशीच्यासाठी केला जातो. याबाबत तक्रार होऊन पुजारी मंडळींवर संकट आले, त्यावेळी हा प्रश्न दत्तगुरुंच्या कृपेने सुटेल व त्यासाठी गोपाळ स्वामींच्या मिळालेल्या प्रेमाशीर्वादावरून त्यांचे असणारे प्रेम दिसून येते. त्यावेळी पुजाऱ्यांची बाजू पुण्याला मांडण्यासाठी गेलेल्या गोपाळ स्वामींच्यावर आलेल्या मारेकऱ्यांच्या संकटातून श्रीपाद श्रीवल्लभांनी भस्म लावून जागृत केले व ‘तुला अभय आहे’ असा आशिर्वाद दिला. हे नेहमी समाधी लावून बसत असत. ब्रह्मविद्वरिष्ठ स्वामी दत्तात्रेयांच्या आज्ञेने ‘संजीवन समाधी’ घेण्याचे ठरवून त्यांनी आपले समाधी स्थान नक्की केले. गुहेच्या रूपात ते दगडांनी बांधून घेतले व आपले स्थान तयार केले.  

दत्तात्रेयांच्या आज्ञेने वैशाख वद्य॥ द्वादशी शके १६७४ मध्ये त्या पवित्र दिनी नित्याप्रमाणे आन्हिक करून आपल्या शिष्यांना दयार्द्र अंत:करणाने भरपूर आशीर्वाद देऊन तृप्त केले. महापुरुषांचे अंत:करण कसे विशाल असते त्याचा प्रत्यय आला. स्वामी योगबळाच्या आधारे संजीवन समाधिस्थ झाले. त्याठिकाणी एक शिवलिंग स्थापन केले. त्याची त्रिकाळ नित्य पूजा केली जाते.

श्रीमद् गोपाळ स्वामींनी नरसोबावाडीच्या दत्त देवांच्या नित्य नंदादीप, तूप उत्सवांदि कार्यक्रमांसाठी १६ एकरांची जमीन संपादित करून ठेवली होती. या जमिनीला ‘समाधी जमीन’ असे म्हणतात. ही जमीन शुक्लतीर्थाच्या काठांवर आहे याच ठिकाणी दर बारा वर्षांनी येणाऱ्या कन्यागत महापर्व काळासाठी श्रींची उत्सवमूर्ती स्नानासाठी जाते तेथेच हा सोहळा संपन्न होतो.

श्रीमद् गोपाळस्वामींच्या संजीवन समाधी दिन अभिषेक महापूजा इत्यादी कार्यक्रमांनी साजरा केला जातो. अशा या तपोभूमीत अनेक महामाहिम सत्पुरुषांनी वास्तव्य करून चिरंतन समाधी स्वरूपात राहून ह्या तपोभूमीचे पावित्र्य वृध्दींगत केलेले आहे. आमच्या पूर्वजांच्या प्रमाणे दत्तात्रेयांची अष्टौप्रहर सेवा करणे हे आमचे आदिम कर्तव्य आहे.

परमपूज्य गोपालस्वामीयांची समाधी श्री कृष्णानंद सरस्वती स्वामींच्या समाधीला लागुनच आहे. हे अवतारी तर होतेच पण परंयोगीही  होते. एकदा बद्ध पद्मासन घालून समाधी लावून हे बसले असता देहभान विसारल्याने सर्व व्यवहार बंद पडले. भक्तजन चिंतेत पडले, संभाषण संपले. शेवटी सर्वांनी महाराजांची प्रार्थना केली व त्यांचे समधीतून  उत्थान झाले. त्यावेळी सर्व भक्तांना आनंद झाला. अशाप्रकारे वारंवार समाधी लागत असे. पुढे त्यानी आपले समाधिस्थान निश्चित करून ते ठिकाण दगडांनी बांधून घेतले व गुहेच्या स्वरूपात आपले स्थान तयार करून ठेवले. आता आपण कायम या ठिकाणी समाधी लावून बसणार असे सांगून एके दिवशी पुजासामग्री गोळा करून इष्ट देवतेची पूजा करून समाधिस्थ झाले. पूर्व सूचनेनुसार भक्तांनी त्याच्यावर दगडाची समाधी  बांधली त्यावर पिंपळाचे झाड लावण्यात आले. पुढे झाड मोठे झाल्यावर त्याचे मूळ स्वामींचे   गळ्याशी टोचू लागले. त्यावेळी पुजारी मंडळींना दृष्टांत झाला ती मुळी काढून टाकली. सर्व मंडळींनी महाराजांची प्रार्थना करून दगड काढले असता मूर्ती जशीच्या तशी बसलेली आढळली. मुळीं खरोखरच स्वामींचे गळ्यास विळखा घालून उपद्रव करीत होती. नंतर समाधी स्थान पूर्ववत बंद करण्यात आले. त्यानंतर मात्र पुन्हा  त्यासंबंधी कोणतेही प्रत्यंतर आले नाही. आत जाण्यास पूर्वेकडून द्वार होते तेही नंतर बंद केले. अशी हकीकत परंपरागत प्राचीन लोकांकडून ऐकली आहे. 

श्रीनृसिंहवाडीतील दत्तावतारी सत्पूरूष श्रीगोपाळ स्वामी जिवंत समाधी स्थान

नृसिंहवाडीत महाद्वाराच्या सभामंडपामध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी मंदीर, मौनी स्वामी श्री नारायण स्वामी श्री गोपाळ स्वामी या दत्तावतारी संत सत्पुरूषांची स्मारके आहे. त्यांच्या तपाने व समाधी स्थानाने कृष्णाकाठ पुनित झाला. श्री गोपाळ स्वामींनी जिवंत, समाधी घेतली, स्वामींनी आपल्या समाधी साठी दगडी गुहा बांधून घेतली व त्या ठिकाणी समाधीस्थ झाले. काही काळानंतर त्यांनी भक्तांना दृष्टांत देऊन सांगितले की माझ्या गळ्याला अश्वस्थाच्या मुळीचा विळखा बसला आहे तो काढा त्या प्रमाणे त्या मंडळीने समाधीद्वार ऊघडून त्यांच्या गळ्याला वेढलेल्या मूळी काढून समाधी द्वार बंद केले या वरून महाराजांचा अधिकार लक्षात येतो. या समाधीमंदीराचा जिर्णोद्वार सदगुरू श्री गुळवणी महाराज यांनी केला.

श्रीगोपाळस्वामीच्या पारामागे महादेव आहे त्याला श्रीशांतानंद स्वामी रोज पाणी घालीत असत. त्या महादेवाला शांतानंद स्वामीचा महादेव असेही म्हणतात. नारायणस्वामींना ब्रम्हलोकात नेण्याकरता पुष्पक विमान आलेले श्री गोपाल स्वामींनी पाहीले त्याबरोबर त्यांनी श्रीनारायणस्वामीच्या चरणकमळी मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. नंतर श्रीनारायणस्वामी महाराज पुष्करारूढ झाले. 

श्रीनृसिंहवाडीला पालखीच्या शेवटी जे "सांगावे कवण्या ठाया जावे" हे पद म्हणतात, ते श्री गोपाळस्वामी महाराजांनीच केले आहे. श्री गोपाळ स्वामी महाराजांनी या पदाने श्री दत्त प्रभूंचा धावा केल्यावर, आदिलशाही पासून चालत आलेल्या इनाम जमिनी पेशव्यांनी गोपाळस्वामी महाराजांच्या सांगण्याने देवस्थानाकरिता कायम केल्या. तसेच शुक्लतीर्थापाशी असलेली सोळा एकर स्वतःची जमीन गोपाळस्वामी महाराजांनी दत्त महाराजांच्या स्थानासाठी देऊ केली. आजही ही जमीन समाधीची जमीन म्हणून ओळखली जाते.

ही सर्व दत्तावतारी मंडळी श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात राहून आजही भक्तांना आत्मोद्वारासाठी प्रेरणा देत आहेत. अशा या पवित्रस्थळी आपणही केलेली छोटीसी सेवा सूध्दा कल्याणप्रद होते.