श्रीदत्त गिरनारी मठ, भुसावळ

गिरनारची प्रासादिक दत्तमूर्ती
गिरनारची प्रासादिक दत्तमूर्ती

स्थान: भुसावळ, जि.जळगाव, महाराष्ट्र
स्थान विशेष: गिरनारची प्रासादिक दत्तमूर्ती, अत्यंत सुंदर तेजोमय एकमुखी दत्तमूर्ती, प्रासादिक निर्गुण पादुका.

भुसावळमध्ये समर्थ कॉलनी, शिवपूर कन्हाळा रोड येथे श्रीदत्त गिरनारी मठामध्ये शुभ्र संगमरवरी पाषाणाची अतिशय सुरेख आणि नयनमनोहर तेजोमय अशी एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे. षड्भूज व विग्रहावर विविध दैवी चिन्हे स्वयंभु प्रगट आहे. या मूर्तीच्या स्थापनेपूर्वी नरसिंह जयंतीला स्वामी ब्रह्मानंद यांना गिरनार पर्वतावरून दत्तमूर्ती दिली गेली. प्रासादिक दत्त मूर्तीचे दर्शन, अक्षय तृतीया, गुरुपौर्णिमा, नरसिंह जयंती आणि दत्त जयंती असे वर्षातून केवळ ४ वेळाच खुले केले जाते आणि रोज गुप्त रूपाने पूजा होते. यानंतर गजानन महाराजांच्या साक्षात्काराने आणि गुरूंच्या आज्ञेने स्वामी ब्रह्मानंद यांनी संगमरवरी पाषाणापासून एकमुखी दत्तमूर्ती राजस्थानातील जयपूर येथील कारागिराकडून करवून घेतली आणि  १३/०९/२०१८ रोजी म्हणजेच भाद्रपद महिन्यामध्ये गणेशचतुर्थी, श्रीपादवल्लभ जयंती शुक्ल पक्षामध्ये, ब्राह्ममुहूर्तावर पहाटे ३ वाजता ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात एका विशिष्ट पध्दतीने स्थापन करण्यात आली. या दत्तमूर्तीवरील जे जानवे आहे ते कोरलेले नसून ते पाषाणामध्येच आढळले होते. या दत्तमूर्तीची रोज विविध रुपात मनमोहक अत्यंत शुचिर्भूततेने महापूजा केली जाते. दत्तजयंतीला पालखीसोहळा देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या स्थानाचे अनेक भक्तांना दैवी अनुभव आले आहेत आणि येत आहेत. असे काही दैवी अनुभव व अनुभुती आहे त्या प्रसिद्ध केल्या जात नाहीत.

या मठामध्ये दत्तमूर्तीसोबतच शाळीग्राम शिळेची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मातेची विग्रह, सद्गुरू गजानन महाराजांची विग्रह, स्फटिकाची शिवपिंडी, शाळीग्राम देखील आहे. तसेच स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुका देखील आहेत. यासोबतच आणखी काही अशा प्रासादिक गोष्टी आहेत.

दैनिक कार्यक्रम

मठामध्ये सुरुवात पहाटे काकड आरती पासून होते. नंतर सोवळ्यामध्ये महापूजा व नैवेद्यारती असते. अन्नदान, नामस्मरण, गुरूचरित्र पारायणं ही होतात. आजपर्यंत कैकप्रकारचे यज्ञ-याग ही झाले आहेत. महाराजांचे दर्शन दुपारी १ ते ४ यावेळेस बंद असते. रोज संध्याकाळी महाराजांची विविध पदे म्हंटली जातात, धुप व महाआरती केली जाते. नवरात्रीमध्ये मोठा उत्सव व जागरण असते. त्यावेळी दत्त महाराजांना देवीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये सजवले जाते. हा मठ स्वामी ब्रह्मानंद यांच्या खाजगी मालकीचा असून येथे नेहमी अन्नदान होते. जे लोक पिशाच्च बाधेने पीडित आहेत ते दत्तमहाराजांच्या दर्शनाने मुक्त केले तसेच भक्तांच्या नाना प्रकारच्या समस्यांचे निवारण दत्तप्रभूंच्या कृपेने येथे होत असते. असे अनेक दैवी अनुभव भक्तांना येत असतात व मठामध्ये एकाप्रकारचा दैवी सुगंध हा नेहमी येत असतो.

स्वामी ब्रह्मानंद

स्वामी ब्रह्मानंद म्हणजे  प्रसिद्ध रामायण कथाकार व अध्यात्मिक सद्गुरू श्रीस्वामी राजेश्वरानंदजी महाराज यांचे लाडके शिष्य. यांचा जन्म १२/०९/१९९१ रोजी झाला. या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, ऋषीपंचमी, गणेश जयंती असे योग जुळून आले होते. लहान वयापासूनच अध्यात्माची प्रचंड आवड. यांच्या मातेने वेळीच आपल्या मुलाची अध्यात्माकडे असलेली ओढ पाहून त्यांच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल असे वातावरण दिले. व गुरूंनी मार्गदर्शनाखाली अनेक साधना करवून घेतली आतादेखील वयाच्या केवळ २९ व्या वर्षी त्यांचा कामाचा आवाका वयाच्या मानाने मोठाच आहे. उपासना, साधनेसोबतच त्यांनी आपले डिग्री पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. अध्यात्मिक क्षेत्रासोबतच समाजसेवेसाठीही हे झटत असतात. अनेक रंजल्या गांजलेल्या लोकांना तसेच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना यांनी सुधारून उपासना मार्गात आणले आहे आणि अंधश्रद्धा दूर करून शुध्द सात्विक दत्तभक्तीचा आनंद ते सर्वाना देत आहेत.

प्रासादिक दत्तमूर्ती
नयनमनोहर तेजोमय अशी एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती. षड्भूज व विग्रहावर विविध दैवी चिन्हे स्वयंभु प्रगट आहेत.