श्री क्षेत्र विजापूरचे नृसिंह मंदिर

स्थान: विजापूरपासून जवळ कर्नाटक प्रांतातले 
सत्पुरूष: श्री नृसिंह सरस्वती
विशेष: पूरातन शिवमंदिर व नृसिंह मंदिर. श्री गुरुंचे नृसिंहवाडी - गाणगापूर प्रवासी विश्रांती व मंदिरात दर्शन. स्वयंभु रामेश्वर पिंड, जवळच तोरवी येथे नृसिंहाचे स्थान, जवळच एक दंडगी  मठात अनेकांच्या बंधांचे निरसन.

नृसिह मंदिर विजापूर
विजापूरचे नृसिंह मंदिर

श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नृसिंहवाडीला १२ वर्षे वास्तव्य केले. तेथून इ. स. १४३४-३५च्या सुमारास ते श्रीक्षेत्र गाणगापूरला आले. श्रीक्षेत्र वाडी ते गाणगापूर त्यांनी विजापूरमार्गे प्रवास केला. वाटेतच ककमरी रामतीर्थ लागते. येथील शिवपिंडीची स्थापना रामाने केल्याची आख्यायिका आहे. या शंकराच्या मंदीरात श्रीनृसिंहाची मूर्ती हे विशेषच होय. वाटेत तोखी लागते. तेथेही नृसिंहाचे पूरातन मंदीर आहे. श्रीनृसिंह सरस्वती गाणगापूरी जाताना विजापूरास या शिवस्थानी व नृसिंह स्थानी थोडाकाळ विसावल्याचे सांगतात.

विजापूरातील सध्याच्या नरसोबाच्या मंदिराच्या जागी एक अश्र्वत्थ वृक्ष आहे. त्या वृक्षाखालीच नरसिंहसरस्वती उतरले असावेत. या वृक्षापासून एक फर्लांगाच्या अंतरावर चालुक्यकालीन देवालयाचे अवशेष दिसतात. त्या ठिकाणीच नरसिंहाचे मंदिर होते. या मंदिरास चालुक्य व यादव राजांच्या सरदारांनी देणग्या दिल्याचे शिलालेख, जुन्या कानडी भाषेत आजही पहावयास सापडतात. शके १२२७च्या सुमारास मलिक कापूरने दक्षिणेत जी झंझावाती स्वारी केली व अनेक देवालये नष्ट केली, त्यांत हे देवालय नष्ट केले असावे. असे सांगण्यात येते की, मुसलमानांच्या मूर्तिभंजनाच्या अत्याचारापासून ही मूर्ती वाचविण्याकरिता चिम्मलगी गावी नेण्यात येऊन तेथे एका शेतात पुरून ठेवण्यात आली. पुढे काही कालाने कोणास दृष्टांत झाल्याने ती तेथून काढून तोरवी येथील सध्याच्या देवळात स्थापन करण्यात आली. शके १४४०च्या सुमारास या नरसिंहमंदिरात (तोरवीत) कुमार वाल्मिकीने सुप्रसिद्ध तोरवी रामायण लिहिले. त्या अर्थी त्याचे अगोदर २१० वर्षे ती मूर्ती, इतका महिमा वाढण्यास, तेथे प्रतिष्ठापली गेली असली पाहिजे.

श्रीनरसिंहसरस्वतींचा गाणगापूरक्षेत्री अजमासे २३-२४ वर्षे वास होता. या कालात त्यांना बरेच शिष्य मिळाले. त्यांनी केलेल्या चमत्कारांमुळे, अथवा सहज घडलेल्या चमत्कारांमुळे त्यांची फार प्रसिद्धी झाली. याच कालात बेदरचा बहामनी राजा अल्लाउद्दीन दुसरा राज्य करीत होता. त्यास हिंदू साधुसंतांचे महत्त्व जाणवू लागले होते. नरसिंहसरस्वतींची कीर्ती त्याचे कानावर गेली होती. याच वेळी तो व्याधिग्रस्त झाला. हकीमांच्या औषधांचा काही उपयोग होईना, तेव्हा तो नरसिंहसरस्वतींच्याकडे, त्यांची कृपादृष्टी होऊन आपण व्याधिमुक्त व्हावे या इच्छेने आला. गुरुचरित्राच्या वाचकांना हे माहीतच आहे की, पहिले दत्तावतार श्रीपादश्रीवल्लभ यांनी आपल्या रजकास पुढील जन्मी तू राजा होशील व सर्व राजवैभव भोगशील, असा आशीर्वाद दिला होता.

नरसिह मंदिर विजापूर
विजापूरचे नृसिंह मंदिर

नरसिंहसरस्वती हेच पूर्वजन्मीचे श्रीपादश्रीवल्लभ. अल्लाउद्दीन स्वामींच्याकडे येताना दिसताच स्वामींनी त्यास उद्देशून म्हटले,

‘का रे रजका कोठे अससी । बहुत दिवसां भेटलासी।’

स्वामींची भेट झाल्यावर अल्लाउद्दीन रोगमुक्त झाला व त्याने स्वामींना बेदरास नेऊन सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. नरसिंहसरस्वती शके १३८०मध्ये कर्दळीवनास गेले व अदृश्य झाले.

रायचूरजवळ यादगिरी हे एक प्रसिद्ध शहर आहे. तेथे विश्रवब्राह्मणसमाजाचा एक मठ आहे. या मठाचे मुख्याधिपतींचा सर्व विश्रवब्राह्मणसमाजावर गुरू म्हणून अधिकार चाले. दुसऱ्या अलिआदिलशहाच्या वेळी एक चमत्कार घडला. तो सर्व येथे देण्याचे कारण नाही; पण त्या वेळी त्या मठात असलेल्या बारा वर्षांच्या गुरुनाथांना विजापूरच्या विश्र्वब्राह्मणसमाजाच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून येणे भाग पडले होते. ते स्वामी या नरसोबाच्या देवळातच अनुष्ठानाला बसले होते. या देवळाजवळ अश्र्वत्थावर एक ब्रह्मराक्षस होता; त्यास त्यांनी वठणीवर आणिले. तो ब्रह्मराक्षस गुरुस्वामींना शरण गेला व त्यांच्या आज्ञेत त्याने राहण्याचे कबूल केले. तेव्हा त्यांनी त्या ब्रह्मराक्षस अदृश्यरूपाने त्यांची पालखी पुढील बाजूने वहावयाची आज्ञा केली. ती त्याने मान्य केली. विजापूराहून गुरुनाथस्वामी जेव्हा पालखीतून परत यादगिरीस निघाले, तेव्हा पालखीच्या पुढच्या दांड्यास हार घालण्यात आला व मागील दांड्यास तीन भोई उचलण्यास लागले; पालखी व्यवस्थित चालू लागली. पालखीच्या एका दांड्याकडेच भोई लागू लागले व एका दांड्याला मनुष्यविरहित - अदृश्य शक्ती लागू लागली; म्हणून तेव्हापासून या मठासच ‘एक दंडगी मठ’ हे नाव पडले. या नरसोबाच्या देवळातील अश्र्वत्थवृक्षाची एक मोठी फांदी - जिच्यावर तो ब्रह्मराक्षस बसे - पडली व तीच पुढे यादगिरीस नेण्यात आली व तिचा खांब करून मठात (देवळात) उभा करण्यात आला. तो खांब त्या मठात आजही तसाच आहे. या दिवसाचे निमित्ताने प्रतिवर्षी या मठात उत्सव साजरा होत असतो.

इकडील भागात नरसोबाची वाडी व गाणगापूर यांचे खालोखाल या स्थानाचे दत्तसांप्रदायिकांत महत्त्व आहे. हे एक जागृत स्थान असल्याने भूतबाधा वगैरे असलेले लोक येथे सेवेस येतात. येथेच सेवा करण्याबद्दल अनेकांना दृष्टांत होतात. सेवा केल्यानंतर सर्व काही ठीक होत असल्याचा अनेकांना अनुभव आहे.

या देवळाची व्यवस्था नीट चालावी या उद्देशाने विजापूर इ. स. १८४४मध्ये जिल्ह्याचे ठिकाण झाल्यानंतर एका व्यवस्थापक मंडळामार्फत सर्व कारभार चालविला जात आहे. असे मंडळ १८८७-८८साली सुरू करण्यात आले असे दिसते. या मंडळाचे पहिले अध्यक्ष कै. बाळाजी मोरेश्र्वर जोशी हे होते. त्यांच्या मृत्यूनंतर इ. स. १९०१ अखेर श्री. शेषगीर नरहर केंभावी हे अध्यक्ष झाले. अध्यक्षाशिवाय त्यांच्या मदतीस एक कार्यकारी मंडळही असे, आजही ती पद्धत चालू आहे. या देवाच्या दर्शनार्थ अनेक थोर थोर मंडळी येऊन गेली व प्रत्ययही येत आहेत.

इनामकमिशनच्या सनदेप्रमाणे नक्त नेमणूक रु. २७ मिळू लागल्याचा कागद आहे. त्याच्या अगोदरचा कागदोपत्री पुरावा आता मिळू शकत नाही, अशा परिस्थितीत इ. स. १८७४च्या अगोदर ८-१० वर्षे पालखीसोहळा नियमितपणे चालला असणार हे गृहीत धरून १९६५चे साल शंभरावे मानून शतसांवत्सरिक पालखी सोहळा उत्सव करण्यात आला.

विजापूर येथील नृसिह तथा आदिलशाहीतले दत्त मंदिर

विजापूरला दत्ताचे एक पुरातन मंदिर असून ते तिथल्या नृसिंह मंदिर परिसरातच वसलेले आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त त्या वेळच्या विजापूरचा बादशहा इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे. तर काही संदर्भानुसार इब्राहिम अली या मंदिरात दर्शनासाठी येत असे. गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायात एका रजकाची कथा येते, त्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक रजक भक्त त्यांच्याकडे राजा होण्याची इच्छा व्यक्त करतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्याला तू पुढील जन्मात राजा होशील असा वर देतात. तोच हा इब्राहिम अली होय, असे मानले जाते. त्याच्या पायाला झालेली जखम श्री नृसिंहसरस्वती यांनी केवळ दृष्टीमात्रे बरी केली आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. नंतर हा बादशाह स्वामींचा अनन्यभक्त झाला अशी ही कथा. आपल्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्याचा सद्भाव पाहून स्वामींनी ती मान्य केली. विजापुराभोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात माझ्या पादुका तुला मिळतील त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे स्वामींनी त्याला सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळवृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्याने मंदिर बांधले व श्रींची सेवा केली. पुढे त्या पिंपळवृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय उभारण्यात आले. आणि मंदिरात दत्तमूर्ती बसविण्यात आली. देवालयाला लागून पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकाला देवळाच्या अंगाने एक घाटही बांधण्यात आलाय. या मंदिरात गुरुवारी आणि धार्मिक सणांच्या दिवशी श्री दत्ताचा छबिना काढतात. दत्तजयंती आणि गणेश चतुर्थी हे दोन उत्सव इथे मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. या मंदिराची माहिती असलेले पुरातन शिलालेख विजापूरच्या पूर्व आणि उत्तर दरवाजाजवळ बसवलेले आहेत.

या देवळास नरसोबाचे देऊळ, दत्ताचे देऊळ व हिरोड्या अशी तीन नावे आढळतात. पैकी पहिले नाव श्रीनरसिंहसरस्वतींच्या या स्थानाच्या संबंधामुळे पडले आहे. नरसिंहसरस्वती दत्ताचे दुसरे अवतार मानले गेले असल्याने या स्थानास दत्तमंदिरही म्हणण्यात येते.