तीन गोटे प्रसाद मंदिर, श्री क्षेत्र सदलगा

तीन गोटे प्रसाद मंदिर, श्री क्षेत्र सदलगा
तीन गोटे प्रसाद मंदिर, श्री दीक्षित स्वामी महाराजांच्या पूर्वजाना वाडीच्या संगमावर श्री हस्ते मिळालेला प्रसाद, श्री क्षेत्र सदलगा

श्री दीक्षित स्वामी महाराज हे थोरल्या स्वामी महाराजांचे पट्टशिष्य. दीक्षित स्वामी महाराजांची अनेक चरित्रे आज त्यांची महती आणि योग्यता वर्णत असली तरी त्यातील एक फार सुरेख आणि वेगळेपण जपणारे आहे. नृसिंहवाडीचे वेदशास्त्र संपन्न बापूशास्त्री कोडणीकर यांनी हे लिहिले असून सभाषान्तरम असे ह्या चरित्राचे शीर्षक आहे. बापूशास्त्री कोडणीकर हे दीक्षित स्वामी महाराजांचे शिष्यच होते. स्वामी महाराजांचा सहवास आणि आशीर्वाद त्यांना लाभला होता. कृष्णा लहरीचे भाषांतर, दत्त चंपूच्या तिसऱ्या स्तबकाचे भाषांतर, दीक्षित स्वामी महाराजांचे चरित्र आदी त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत.

दीक्षित स्वामी महाराजांचे मूळ घराणे शंकरापुर अर्थात सध्याच्या सदलगा येथील. दीक्षित हि त्यांच्या घराण्याला मिळालेली उपाधी होती. यज्ञ कर्मात ऋत्विज या नात्याने केलेल्या सेवेचे ते फळ होते. दीक्षित स्वामी महाराजांच्या पूर्वजांना नृसिंहवाडीला झालेले दत्त महाराजांचे दर्शन आणि त्यांच्याकडून मिळालेला प्रसाद ह्याचे कथन ह्या लेखात करीत आहे. ह्या पूर्वजांचे नाव मात्र वे. शा. सं. बापूशास्त्री कोडणीकर ह्यांनी चरित्रात दिलेले नाही.

सदलगा येथील दीक्षित हे फार मोठे दत्त भक्त होते. नृसिंहवाडीला नित्य दत्त महाराजांच्या दर्शनाला जाणे आणि जमेल तितकी सेवा करणे हे व्रत त्यांनी कायम जपले. नृसिंहवाडीस जावे, देवाच्या मनोहर पादुकांसमोर स्नान करावे, श्रींच्या पादुकांवर भक्तिभावाने पाणी घालावे, त्रिकाल दत्त महाराजांच्या पूजेचे वेळी उपस्थित राहावे आदी सेवा ते करीत असत. काळ न थांबता मार्गक्रमण करीत असल्याने वृद्धावस्था आली. त्याकाळी पायी प्रवास असल्याने नृसिंहवाडी प्रवासात अत्यंत कष्ट होऊ लागले. मात्र दत्त महाराजांनी आपल्याला निजरुपात दर्शन द्यावे हि मनात आस कायम होती. आणखी काही काळ गेल्यावर मात्र नृसिंहवाडीला येणे कठीण होऊ लागले. एकदा संगमावर अत्यंत काकुळतीने दीक्षितांनी दत्त महाराजांची आळवणी केली अहो महाराज एकदा तरी दर्शन द्या !

दयाघन दत्त महाराज ह्या हाकेला धावून येत तिथे अवतीर्ण झाले. षडभुज, एकमुखी. खालील हातात माला, कमंडलू, मधल्या हातात डमरू, त्रिशूल आणि वरील हातात शंख आणि चक्र, अंगावर छाटी, आणि कमरेला लंगोटी नेसली होती. इंद्रनील मण्याप्रमाणे काया, आणि डोक्यावर जटाजूट असे ते उभे होते. सुहास्य मुद्रेने ते दीक्षितांकडे पाहत होते. महाराजांचे रूप पाहून दीक्षितांनी पायावर लोळण घेतली. तोंडातून शब्द फुटेना. तेव्हा हि अवस्था पाहून महाराज म्हणाले काय अभिष्ट आहे ? पण दीक्षितांच्या तोंडून शब्द काही फुटला नाही तेव्हा दत्त महाराजांनी जवळ येऊन कुरवाळले आणि म्हणाले, मी तुझ्या कुळात  मनुष्य रूपाने अवतार धारण करेन. यापुढे नृसिंहवाडीस येण्याचे कष्ट घेऊ नयेत. असे म्हणून दत्त महाराजांनी श्रीकृष्णामाईतील तीन गोटे घेतले आणि हे माझे रूप आहे हे समजून ह्याची स्थापना करावी आणि पूजन करावे, ते गोटे दीक्षितांच्या हातात ठेऊन दत्त महाराज अंतर्धान पावले. आणि थोड्या वेळाने दीक्षित भानावर आले. अत्यंत आनंदाने ते सदलग्याला जाऊन त्यांनी ह्या त्रिमूर्तीची स्थापना केली. पुढे दीक्षित स्वामी महाराज हे अवतारी पुरुष त्यांच्या वंशात जन्माला आले.

दत्त भक्तीचे एक वैशिष्ठ्य म्हणजे हि परंपरेने खालील वंशात पाझरते. प्रत्येक अवतारी पुरुषामागे त्याच्या पूर्वजांची फार मोठी सेवा हि अवताराला कारण ठरते.

श्री गुरुदेव दत्त !

--- अभय आचार्य