श्री क्षेत्र बाळेकुंद्री

बाळेकुंद्री
श्री क्षेत्र बाळेकुंद्री

स्थान: बेळगावच्या पूर्वेस १२ कि. मी., बेळगाव कलाउगी मार्गावर, कर्नाटक राज्य 
सत्पुरूष: पंत महाराज बाळेकुंद्रीकर
विशेष: 
१) पंतांची समाधी
२) दत्तमंदीर
३) अवधूत परंपरा

श्रीक्षेत्र बाळेकुंद्री

बेळगावच्या पूर्वेस बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर सुमारे १२ कि. मी. अंतरावर पूर्वीच्या सांगली संस्थानापैकी बाळेकुंद्री बुद्रुक या नावाचे खेडे आहे. हा गाव त्यावेळीच्या सदर्न मराठा रेल्वेस्टेशन सुळे भावीपासून ३ कि. मी. अंतरावर आहे. यागावी पूरातन श्रीरामेश्र्वराचे जागृत देवस्थान आहे. येथे दोन-चार तलाव असून अंदाजे ५’ - ७’ खोलीवर मुबलक अमृततुल्य पाणी लागते. त्यामुळे येथे गुप्तगंगा आहे अशी अख्यायिका आहे.

येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील (इ. स. १८५५ ते १९०५) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत-पाश्र्ववाड, जिल्हा बेळगांव, यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला. श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात-पात, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म, पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वाना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे, तर त्यांनी अनुभव घडविला.

श्रीपंत म्हणतात, ‘अनुभव प्रथम, नंतर वेदांत शास्त्रे वगैरेंचे अवलोकन’. अवधूतमार्ग सर्व समावेशक कसा याबाबत श्रीपंत म्हणतात, अवधूतमार्गात पहिल्याने आलेल्यास आपला करून घेणे, तो पापी, दुराचारी, चांडाळ, दुष्ट, शिष्ट कसाही असो. शरण आला तर तो तसाच मुक्त होऊन पार पाडण्यासाठी आला आहे. अन्य आश्रमी गुरू असमर्थ असल्यामुळेच तो निराश्रमी-अतिआश्रमी अशा अवधूतास जो शरण आला तो तात्काळ मुक्त झालाच. अवधूतमार्ग म्हणजे अद्वैतानुभव. अवधूतांना मुक्तीची फिकीर नाही. भक्ती ही गुरुप्रेमासाठी. म्हणून श्रीपंत आपल्या शिष्यांना ‘गुरुपुत्र’ म्हणत. असा ‘जिव्हाळा-प्रेम’ हा या पंथाचा आत्मा आहे.  हा पंथ शुद्ध प्रेमावर व अंत:करण शुद्धीवर भर देणारा असल्याने ‘ओम नम: शिवाय’चा जप, एकतारीवर भजन एवढीच साधना अवधूत पंथामध्ये आहे. किंबहुना श्रीपंतांनी अध्यात्मातील ‘साधना’ या शब्दाचे भयच काढून टाकले.

‘जसा मन आहेस तसा मीळ’ (जसा आहेस तसाच मला येऊन मिळून जा, माझ्यात मिसळून जा असा अर्थ) हाच त्याचा बोध. म्हणून श्रीक्षेत्री असलेल्या पादुकांची पूजा कोणालाही करण्याची पूर्ण मुभा आहे. ‘नीतीने उद्योग कर, धंदा कर, खुशाल राहा. भिक्षा मागू नये. लोकांना त्रास देऊ नये. संन्यासी बनू नका. संसारात राहूनही परमार्थ करा. असा कर्म – मार्गाला प्राधान्य देणारा उपदेश केला असून अवडंबरापेक्षा सहजतेला महत्त्व देणारा हा पंथ आहे.

श्रीपंतमहाराजांनी निर्माण केलेले विपुल वाङ्मय आज उपलब्ध आहे.
१. श्रीदत्तप्रेमलहरी  
२. श्रींची पत्रे  
३. भक्तालाप  
४. स्फुटलेख  
५. बोधवाणी 
६. बाळबोधामृतसार  
७. भक्तोद्गार अथवा प्रेमभेट  
८. आत्मज्योती-अनुभववल्ली-ब्रह्मोपदेश  
९. प्रेमतरंग  
याव्यतिरिक्त ‘परमानुभवप्रकाश‘, ‘श्रीपंत महाराजांचे चरित्र’, ‘श्रीपंत गुरुचरित्र पोथी’, श्रीपंत बंधू गोविंददादा यांनी श्रीपंथांच्या सन्निध आलेले उत्कट अनुभव लिहिलेले ‘गोविंदाची कहाणी’ इ. बोधपर वाङ्मय उपलब्ध आहे. 

श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे.

श्रीपंतमहाराज समाधिस्थ झाल्यावर असंख्य भक्तगणांचे सुचनेवरून बाळेकुंद्री येथे पौष शु. १ शके १८२८ म्हणजे दि. २७-१२-१९०५ या दिवशी सर्व ठिकाणच्या भक्तमंडळींनी जमून ‘श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री बु॥’ या संस्थेची स्थापना केली व पुढे २५-२६ वर्षांच्या कालात श्रीपंतबंधुंच्या हयातीतच श्रीदत्तसंस्थानचा पसारा वाढत गेला आणि त्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी भक्तमंडळींशी विचारविनिमय करून व अत्यंत नि:स्वार्थीपणे पण दूरदृष्टी ठेवून एक कायदेशीर ट्रस्ट करून मिती ज्येष्ठ शु. ८ शके १८५५ दि. १-६-१९३३ रोजी तो रजिस्टर केला आणि योजनाबद्ध ‘घटना व नियम’ तयार करून श्रीदत्तसंस्थानाच्या कार्यास एक प्रकारची सूत्रबद्ध गती दिली व सन १९५२ मध्ये ‘बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट’ प्रमाणे श्रीदत्तसंस्थानची सरकारात रीतसर नोंद होऊन त्याप्रमाणे सध्या संस्थेचे कामकाज चालू आहे. संस्थेचा कारभार लोकशाही तत्वावर चालतो.

श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री क्षेत्र बाळेकुंद्री

श्रीपंतमहाराजांच्या पार्थिव देहास श्रीक्षेत्री जेथे अग्निसंस्कार झाला, त्या ठिकाणी लावलेल्या औदुंबराच्या रोपाभोवती एक चिरेबंदी षट्कोनी पार इ. स. १९०६मध्ये बांधण्यात आला. पुढे २४ वर्षांनी म्हणजे दि. ६ जानेवारी सन १९३० रोजी, त्या पारास लागूनच पूर्वेस, श्रीपंतबंधू गोविंदरावदादा यांचे हस्ते श्रीपंतमंदिराचा पाया घातला गेला. या चौथऱ्याचे बांधकाम पूर्ण होताच त्यावर मिती आश्र्विन वद्य २ शके १८५२ (ता. ९-१०-१९३०) गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता, शुभ मुहुर्तावर श्रीपंतबंधू - श्री. गोविंदराव, श्री. गोपाळराव व श्री. शंकरराव यांचे अमृतहस्ते श्रींच्या पादुका व फोटो यांची मोठ्या समारंभाने शास्त्रोक्त विधियुक्त स्थापना करण्यात आली आणि त्यावर एक तात्पुरती पत्र्याची शेड उभारली जाऊन त्या स्थितीतच मंदिराचे बांधकाम स्थगित राहिले. या कालावधीत ‘श्रीदत्ततीर्थ’ धर्मशाळा (यातच हल्ली श्रीसंस्थानची कचेरी आहे), श्रीनरसिंहमंदिर, श्रीसीताराममंदिर, श्रीपंतमातोश्री तुळशीवृंदावन, श्रींच्या कट्ट्यासमोरील प्रशस्त भजनमंडप, तसेच इतर भक्तमंडळींनी बांधलेल्या धर्मशाळा इत्यादी इमारती झाल्या. पुढे ‘श्रीपंतमंदिरनिधी’ श्रीभक्तांकडून उत्स्फूर्त जमा होऊन संस्थानने सन १९५३मध्ये सध्याचे टुमदार व शोभिवंत असे मंदिर बांधले.

श्रीक्षेत्री श्रीपंतमंदिराखेरीज आणखी जी पवित्र व वंदनीय स्थाने आहेत त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे,

श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री क्षेत्र बाळेकुंद्री दत्त मंदिर

श्रीपंतमातोश्री - तुळशीवृंदावन

श्रीपंतांच्या मातोश्री प. पू. गं. भा. सीताबाई या श्रावण शु. १५ शके १८५० (३१-८-१९२८) रोजी देवाधीन झाल्या. त्यांचा देह मोठ्या समारंभाने बाळेकुंद्रीस नेऊन श्रीपंतांच्या औदुंबरकट्ट्यासमोर थोड्या अंतरावर त्याला अग्निसंस्कार करण्यात आला आणि मातोश्रींचे स्मारक म्हणून त्या दहनभूमीवर एक सुंदर संगमरवरी तुळशीवृंदावन बांधण्यात आले. अशा रीतीने ज्या माउलीने श्रीपंतांना जन्म दिला त्या प. पू. मातोश्रींच्या पुण्यस्थानाचेही दर्शन घेण्याची भक्तमंडळींची सोय झाली आहे. हे संगमरवरी वृंदावन बिकानेरहून करवून आणले आहे.

श्रीपंतबंधू गोविंदरावदादा-प्रेमध्वज-कट्टा

श्रीपंतबंधू गोविंदरावदादा हे श्रावण शु. ३ शके १८५७ (२-८-१९३६) रोजी श्रीपंतस्वरूपी विलीन झाले. त्यांचा देह बाळेकुंद्रीस नेऊन श्रीकट्ट्यासमोरील मातोश्रींचे तुळशी-वृंदावनाच्या पूर्वेस अगदी जवळच त्यास अग्निसंस्कार करण्यात आला. त्या ठिकाणी त्यांचे स्मारक म्हणून एक सुंदर संगमरवरी दगडाचा चबुतरा बांधून त्यावर पादुका व त्यामागे श्रींचा प्रेमध्वज उभा करण्यात आला आहे. हा संगमरवरी चबुतराही राजस्थानमधून करवून आणला असून थोड्याच अंतरावर ‘श्रीगोविंदभुवन’ नावाची एक लोखंडी, भव्य व प्रशस्त अशी एक धर्मशाळा बांधलेली आहे.

श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री क्षेत्र बाळेकुंद्री

श्रीदत्ततीर्थ

श्रीपंतमंदिरानजीक श्रीदत्ततीर्थ ही विहीर असून त्यात श्रीपंत-मातोश्रींनी श्रीपंतांचे मामा श्रीपादपंत यांनी काशीक्षेत्राहून पाठविलेले पवित्र गंगाजल घातले आहे. श्रीक्षेत्रातील सर्व मंडळी याच विहिरीचे पाणी वापरतात व येणारे भाविक यात्रेकरू तीर्थ म्हणून ते ग्रहण करतात.

श्रीऔदुंबरकट्टा

श्रीपंतमंदिराच्या मागचे बाजूस लागूनच श्रीऔदुंबरकट्टा हे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी श्रीपंतमहाराजांचा पार्थिव देह अग्निनारायणाचे स्वाधीन केला होता व त्या ठिकाणी श्रीपंतबंधू गोविंदरावदादा यांनी लावलेला औदुंबराचा वृक्ष आता पुष्कळच मोठा झाला असून त्यासभोवती चिरेबंदी षट्कोनी कट्टा बांधलेला आहे व त्यावर काँक्रीटची छत्री बांधलेली आहे. औदुंबरवृक्षाजवळ श्रींच्या पादुका ठेविल्या आहेत. त्या ठिकाणी भक्तमंडळी अनुष्ठान वगैरे करतात.

सीताराम मंदिर

श्रीपंतांच्या मातोश्री ‘श्रीसीताबाई’ व वडील ‘श्रीरामचंद्रपंत’ यांचे स्मरणार्थ हे ‘सीताराम मंदिर’ इ. स. १९३७मध्ये मुंबईचे एका धनिक श्रीपंतभक्त कै. मुकुंदराव दादाजी राणे यांनी बांधविले. या मंदिरात श्रीपंतांच्या पूजेतील श्रीदत्तात्रेयांचा फोटो, श्रीपंतबंधू गोविंदरावदादा यांच्या पादुका, श्रींचा पालखीसेवेसाठी पूजेतील फोटो वगैरे पूज्य वस्तू ठेवल्या असून प्रत्येक पालखीसेवेस या मंदिरापासून आरंभ होण्याचा प्रघात आहे.

नरसिंह मंदीर

याठिकाणी श्री पंत मंदिराचे पिछाडीस नरसिंह मंदीर आहे; त्या ठिकाणी श्री पंतांसह सर्व बंधूंच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावर एक शिलालेख असून त्यावरील मजकूर खालीलप्रमाणे;

"ज्या महात्म्यांनी आपले वडील बंधू श्रीदत्तावतारी श्रीपंत महाराज यांची मनोभावे सेवा केली, त्यांच्या अवधूत वृत्तीला आळा घालून भक्तप्रेमपाशात त्यांना बद्ध करून ठेवले व हजारो भक्तांना भक्तीप्रेमाने खेळवले. त्या श्रीगोविंद, श्रीगोपाळ, श्रीवामन, श्री नरसिंह व श्री शंकर या बंधूंनी आपल्या वर्तनाने जगाला उज्वल बंधुप्रीतीचा जो धडा घालून दिला, त्याचे अखंड स्मरण व्हावे म्हणून त्यांचे अस्थिरूपी अवशेषही समरस होऊन या पूज्यस्थानी एकत्र वसत आहेत."

श्रीपंतांचा बसण्याचा कोच, एकतारी श्रीपंत व सौ. यमुनाक्का, श्रीपंत बंधू व मातोश्री यांचे फोटोही दर्शनासाठी ठेवलेले आहेत. श्री पंतांचे वडिलोपार्जित वाड्याचे परसात श्री पंतांचे आजोबा, श्री बाळकृष्ण महाराज व श्रीपंतमहाराजांची समाधी आहेत. पंत महाराजांच्या पूण्यतिथी उत्सवाची श्री प्रेमध्वजाची मिरवणूक येथूनच निघते. श्रीपंत महाराजांचा पार्थिव देह ज्या पवित्र अग्नीनारायणाला समर्पित केला त्याचे प्रज्वलीत शेष अवधूत मठीत कायम प्रदिप्त असून भक्तमंडळी येथीलच पवित्र विभूती घेऊन जातात.

या क्षेत्री सभागृह, भक्त निवास, भोजन कक्ष इ. स्थाने अत्यंत पवित्र आणि रमणीय आहे. श्री गुरूपादुका व श्री महाराजांच्या पादुकांवर अभिषेक लघूरुद्र पूजा इ. सेवा भक्त करू शकतात.

१९०५ सालापासून श्री दत्तसंस्थान बाळेकुंद्री स्थापन होऊन रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. श्री पंत महाराजांचे बंधू परिवाराने या संस्थानला मोठे योगदान दिले. भारतभर पसरलेले भक्त संस्थानला सर्वार्थाने सहकार्य करीत आहेत.

संपर्क

श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री, श्रीक्षेत्र बाळेकुंद्री बेळगाव.

दूरध्वनी : (०८३१) २४१८२४७ / २४१८४८०/ ३२९५७४४

www.panthmaharaj.com