श्री क्षेत्र बाचणीच्या श्री दत्तपादुका, जागृत स्थान

बाचणी दत्त मंदिर
बाचणी दत्त मंदिर

कोल्हापूरपासून दक्षिणेला साधारण २३-२५ किमी अंतरावर विस्पूर्लीपासून डाव्या हाताला, गारगोटी रस्त्यावर ’कागल’ तालुक्यात ’बाचणी’ नावाचे गाव आहे. लोकसंख्या जेमतेम ५००० हजारांवर असेल. येथूनच कोकणातही जाता येते.

‘कागल’ हे प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचे गाव. पुढे ते ‘कुडुत्रीस’ आले. कागल पासून पश्चिमेस - १४ कि. मी. व कुडुत्रीपासून पूर्वेला - १६ कि. मी. या अंतरावर हे ‘बाचणी’ गाव आहे. कागल तालुक्यातील कपिलेश्वर येथील कुलकर्ण्यांच्या कुटुंबात मुक्ताबाई नावाच्या साध्वी जन्माला आल्या. त्या वेळी त्यांच्या जन्माच्या खोलीत महावस्त्र, छाटी व पादुका आढळल्या. ह्या लहानपणांपासून विरक्त होत्या. त्या पादुकांशीच त्या खेळत असत. पुढे त्या सात वर्षांच्या झाल्यावर त्या काळच्या प्रथेनुसार ‘बाचणी’च्या एकनाथराव कुलकर्ण्यांशी विवाह झाला. परंतु त्या संसारात कधी रमल्याच नाहीत. सदैव भगवान दत्तात्रेयांच्या अनुसंधानात असत. त्यांची अशी अवस्था, व वागणे पाहून धनंजय’ गोत्री बाचणीकरांनी त्यांना त्याच अवस्थेत सोडले. सदैव दत्त भक्ती, साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या हातचा नैवैद्य ग्रहण करत असत. कागलकर संस्थानिक (धाकटे) काकासाहेब व त्यांचे वडील एकदा ‘बाचणीस’ आले असता त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले, एक प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लोळ त्यांना दिसला व फक्त मुक्ताबाईचा हात अन्न भरवण्यासाठी वर जात होता. तेही भारावले व त्यांनी ह्या कुलकर्ण्यांना संस्थान तर्फे २१ एकर जमीन देवांच्या व्यवस्थेसाठी दान दिली. त्यातून नंदादीप नैवेद्य इत्यादीचा खर्च भागवला जावा हा हेतू असावा. पुढे वयाच्या २०-२१ व्यावर्षी ‘गुरुव्दादशी’ दिवशीच “श्रीपाद श्रीवल्लभ” स्वामी महाराजांच्या अंतर्धानाच्या दिवशी मुक्ताबाईंनी समाधी घेतली. त्यांच्या पादुका, भगवान दत्तात्रेयांच्याच पादुकांच्या मागे स्थापन केल्या. छाटी, महावस्त्रही तेथेच विसर्जित केले, तिसऱ्या दिवशी तेथे औदुंबराचे रोप आले, आजही तो औदुंबर दिमाखात डोलत आहे. नृसिंहवाडीप्रमाणेच, अगदी तसेच छोटेसे दिमाखदार श्रीदत्तपादुकांचे मंदिर आहे, त्यावर औदुंबर वृक्ष छाया करून आहे. रोज रुद्र, पवमान पौर्णिमेस, नित्य नंदादीप, पदे असा नित्याचा भाग मंदिरात असतो. 

श्री नृसिंहवाडीचे श्री. प. प. रामचंद्र योगी, प. प. श्री गोपाळस्वामी, प. प. श्री नारायणस्वामी, प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी, प. पू. श्री योगिराज गुळवणी महाराज इत्यादी महात्म्यांनी या बाचणीतील ’श्री दत्तपादुकांचे’ दर्शन घेतले आहे.

’बाचणी’ येथील ’श्री दत्तपादुका’ ह्या नृसिंहवाडीसारख्याच अत्यंत जाज्वल्य व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत. नृसिंहवाडीला जशी कृष्णानदी दक्षिणेकडे वाहते, तशी बाचणीला दूधगंगा नदी पूर्वेकडे वाहते. नयनरम्य अशा परिसरात बाचणीच्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांची सेवा सर्व दत्तभक्तांनी करावी. नृसिंहवाडीला जसे कृष्णानदीच्या तीरावर श्री दत्तपादुकांचे मंदिर तसेच बाचणीला दूधगंगेच्या तीरावर श्रीदत्तपादुकांचे मंदिर आहे. गुरुव्दादशीस मोठा उत्सव असतो. आपल्या महायोगाच्या साधनेसाठी उत्तम क्षेत्र आहे. साधना छान होते.