श्री क्षेत्र दत्तधामसाठी नृसिंह सरस्वतींची प्रेरणा
१९८६ साली कलियुगातील द्वितीय दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामींनी पूजनीय मामासाहेब देशपांडे यांना आज्ञा केली की, आम्हाला राहण्यासाठी एक शांत स्थान निर्माण करा जिथे वाडी-गाणगापूर सारखी गर्दी होणार नाही. मामा अशा जागेच्या शोधार्थ असताना मामांचे उत्तराधिकारी शिरीषदादा कवडे कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना कोयना धरणावर अभ्यास दौऱ्यासाठी ते आले होते. तेव्हा तेथील रम्य परिसर पाहून पूजनीय मामांना येथील एक जागा घेऊन अर्पण करूया असा मनोदय त्यांनी मित्रांजवळ व्यक्त केला. आणि हा विषय तेवढ्यावरच थांबला. कालांतराने शिरीष दादांचे मित्र या ठिकाणी आले असता “हीच ती जागा, हीच ती जागा” असे दोनदा कुणीतरी आपल्या कानात स्पष्ट म्हटल्याचे त्यांना जाणवले त्यांनी तत्काळ शिरीष दादांकडे संपर्क केला. यानंतर पूजनीय मामांसोबत ही जागा पाहिल्यावर मामांनी साक्षात्कारानुसार या जागेचे महत्व कथन करून ही जागा विकत घेतली.
हे स्थान म्हणजे आजचे दत्तधाम होय. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे अतिशय नयनरम्य परंतु पूर्णपणे अप्रसिद्ध असे क्षेत्र. चिपळूण मधून कुंभार्ली घाटमार्गे सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थान म्हणजे नाथ आणि दत्त संप्रदायाची प्राचीन तपोभूमी. नाथ संप्रदायातील दुसरे नाथ आणि विलक्षण विभूतिमत्व गोरक्षनाथ यांचे या भूमीवर काही काळ वास्तव्य होते. त्यांना भगवान परशुरामांकडून याच पवित्र भूमीवर श्री विद्येचा उपदेश झाला होता. त्यामुळे या क्षेत्राचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे.
कुंभार्ली घाट संपल्यानंतर सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस असणारे हे क्षेत्र बाहेरून अगदीच नजरेस जाणवून येत नाही. रस्त्याच्या बाजूने लावलेला फलक ज्या पवित्र क्षेत्राकडे निर्देश करतो तिकडे मान वळवून पहिले तर प्रथमदर्शनी अतिशय गर्द वनराई मध्ये उंचच-उंच, डौलाने फडकत असणारी भगवी पताका दिसते. रस्त्यापासून थोडे खाली उतरले की रस्त्याला समांतर वाहणारी कोयना नदीची उपनदी “कापणा” नदी दिसते. या नदीवरून पर्वताच्या पायथ्यापर्यंत नेणारा पक्का बांधलेला पूल दिसून येतो हा पूल पार केल्यानंतर एक चित्तवेधक असे प्रवेशद्वार पाहिल्यावर आता आणखी आत काय असेल याबाबत आपली उत्कंठा वाढते. मग इथून वळणावळणाच्या पायऱ्या सुरु होतात, इतक्या गर्द जंगलामध्ये पक्क्या बांधणीच्या सुबक पायऱ्या बघून आपल्याला पावलोपावली आश्चर्य वाटत राहते. जंगलामध्ये सतत चाललेले पक्ष्यांचे सुमधुर कूजन, सुगंधी वारा सगळा शीण घालवून टाकतात. साधारण तीनशे पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दिसते ते दक्षिणेकडील गिरनार म्हणजेच श्री क्षेत्र दत्तधाम.
श्री क्षेत्र दत्तधाम येथील मुख्य मंदिरात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची भव्य पंचधातूची मूर्ती आहे. ही मूर्ती ज्या जागी गोरक्षनाथ महाराजांना अनुग्रह झाला त्याच जागी प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती सांगलीतील एका कारखानदाराने आपल्यासाठी बनवून घेतली होती मात्र ही मूर्ती पुण्यातील मामासाहेबांना देण्याविषयक त्यांना दृष्टांत झाला त्याप्रमाणे ही मूर्ती मामासाहेबांनी या मूर्तीची किंमत चुकती करून ती आपल्याकडे ठेवली. याशिवाय श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज यांची दोन फुट उंचीची पंचधातूची मूर्तीसुद्धा त्यावेळी मामासाहेबांच्या हस्ते प्रतिष्ठापित करण्यात आली. इथे असलेल्या शिवलिंगाविषयक सुद्धा अद्भुत कथा ऐकावयास मिळते. हिमालयामध्ये १९८२ साली एका साधूला स्वत: भगवान शिवांनी हे शिवलिंग प्रसाद स्वरूपात देऊन ते पुण्यामध्ये मामासाहेबांना देण्याविषयक आज्ञा केली. हे काम साईरामबाबांनी यांनी केले आणि भगवान शिवाच्या आज्ञेप्रमाणे शिवलिंग मामासाहेबंकडे पोचते केले.हे शिवलिंग अतिशय दिव्य असून त्यावर नैसर्गिक रित्या भगवान शिवांचा तोंडावळा स्पष्ट दिसतो. दत्तधाम मधील देवदरबार असा अलौकिक आणि विलक्षण आहे. मुख्य मंदिराव्यतिरिक्त अजून सहा पुण्यस्थाने तेथे आहेत. मुख्य मंदिरासमोर श्री वरदविनायकांचे मंदिर आहे. शंभर मीटर अंतरावर दाट झाडीने वेढलेले गुरुपादुका मंदिर आहे. गडाच्या पायथ्याशी श्री रामदूत मारुतीरायांची सुबक आणि देखणी अशी मूर्ती प्रतिष्ठापित आहे.मामांच्या कृपेने एका खड्ड्यात झरा फुटून नंतर बांधून काढलेली चविष्ट व नितळ पाणी देणारी विहीर आहे. मुख्य मंदिर परिसराच्या वरील भागात श्रीदत्त आश्रम आहे. या आश्रमात पुजारी व सेवेकरी राहतात. येथेच मामांचे नामसमाधी मंदिर आहे. पूजनीय मामांना देवांनीच दिलेल्या आज्ञेनुसार दत्तधाम येथील सर्व व्यवस्था ठेवली जाते. पुजारी व सेवेकऱ्यांव्यतिरिक्त कुणाचीही मुक्कामाची सोय येथे होऊ शकत नाही. सकाळी आठ ते साडेबारा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेतच मंदिर दर्शनाकरिता खुले असते. श्री दत्तजयंतीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक भाविकांना आजवर येथे अलौकिक अशा अनुभूती आल्या आहेत.
हा परिसर तितकासा प्रसिद्ध नाही. अध्यात्मिक क्षेत्रात याला अतिशय अजोड असे महत्व असले तरी स्वत: नृसिंह सरस्वती स्वामींनीच आम्हाला राहण्यासाठी एक शांत स्थळ निर्माण करा अशी आज्ञा केली होती किंबहुना याचमुळे की काय या अद्भुतरम्य अशा ठिकाणी फारशी वर्दळ दिसून येत नाही आणि श्रीपाद सेवा मंडळाकडून सुद्धा याबबत फारशी प्रसिद्धी केली जात नाही मात्र यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने वृत्तपत्रांत याबाबत प्रथमच माहिती प्रसारित केली गेली.
अतिशय सुंदर, निसर्गरम्य, पवित्र आणि मांगल्याने भरलेल्या या प्राचीन तपोभूमीचे दर्शन आपण एकदा तरी घ्यायलाच हवे. या पवित्र वातावरणातील अपूर्व शांती अनुभवणे हा स्वर्गीय सुखाचा प्रत्ययचं आहे. तेथील रम्य वातावरण हे शब्दांकित करणे कठीण आहे तेव्हा आपण त्या स्थानावर जाऊन समक्ष अनुभूती घेणेच अधिक श्रेयस्कर.