श्री दत्तमंदिर रास्तेवाडा (पुणे)

स्थळ: रास्तापेठ, पुणे शहर, महाराष्ट्र.
विशेष: दत्त मंदिर पवित्र आणि जागृत स्थान, गाणगापूरचे ठाणे.

Datta Mandir Pune
श्रीदत्त मंदिर - रास्तेवाडा (पुणे)

पुणे शहरात रास्तापेठेत पेशवेकालीन, सरदार रास्ते घराण्याच्या भव्य वाड्याची वास्तू आजही उभी आहे. ह्या वाड्याच्या मागच्या भागात त्यांचे एक खाजगी देवस्थान आहे. ह्या देवस्थानात श्रीरामाचे जुने मंदिर असून त्याला लागूनच, श्री दत्तात्रेयाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे स्थान श्री नृसिंहसरस्वती रूपातील तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. श्री गाणगापूर येथील स्थानाएवढेच हे स्थान पवित्र असून तेथे श्री दत्तात्रेयवास आहे व त्याची प्रचीतीही अनेक दत्तभक्तांना येते असे सांगतात. या मंदिरात एक प्राचीन असा औदुंबर वृक्ष आहे. ह्या वृक्षाच्या तळाशी थोडेसे उत्खनन केल्यावर श्रीदत्त पादुका निघाल्या. त्या पादुकांची रीतसर स्थापना करून तेथे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. सरदार रास्ते यांचे अत्यंत देवभाविक कारभारी श्री. परांजपे यांनी रास्ते सरकारांची परवानगी घेऊन हे मंदिर मूळ स्वरूपात उभारले. सरदार रास्त्यांचा रास्तेवाडा इ.स. १७७८ मध्ये बांधण्यात आला व त्यानंतर म्हणजे सुमारे दीडशे, पावणेदोनशे वर्षांपूर्वी ह्या श्री दत्तमंदिराची स्थापना झाली असावी. ह्या मंदिरात श्री दत्तात्रेयाची एकमुखी पाषाणमूर्ती असून त्यावर त्रीमुखी दत्ताचा मुखवटा चढवून, भोवती रंगीत फुलांची अतिशय सुंदर आरास करण्यात येते. दत्तजयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. दर पौर्णिमेला दत्ताची पालखी मिरवतात. श्री दत्तात्रेयाचे हे पुण्यातील पुरातन शक्तीपीठ मानण्यात येत असून त्यावर दत्तभक्तांची गाढ श्रद्धा आहे. हे मंदिर छोटेखानी असून अगदी साधेसुधे आहे. तरीपण येथील श्री दत्तपादुकांमुळे ह्या तीर्थस्थानाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

ह्या मंदिरातील दत्त पादुका व प्रसन्नवदन श्री दत्ताची मूर्ती यांचे दर्शन घेतल्याने अनेक प्रकारच्या बाधा, व्याधी व आजारापासून ग्रस्त लोकांची मुक्ती होते अशी दत्तभक्तांची भावना आहे. त्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येऊन नवस बोलतात आणि ते फेडण्यासाठी व दर्शनलाभ घेण्यासाठी वारंवार येतात.

श्री गाणगापूर येथील तीर्थस्थानाएवढा प्रभाव येथील श्री दत्त पादुका व श्री दत्तात्रेय मंदिरात येथे जाणवतो. पेशवेकालीन वास्तुतील प्रसन्नता आणि श्रीगुरुंच्या जागृत वास्तव्याने हे स्थान पवित्र आहे.

सरदार रास्ते यांच्या वाड्यात असलेले हे प्राचीन दत्तपीठ आहे. श्री बळवंतराव रास्ते व्याधी दूर होण्यासाठी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे राहून श्री दत्तात्रेयांची उपासना करीत होते. रास्तापेठेत चिंतामण भिमाजी ऊर्फ नानासाहेब कुलकर्णी घेरडीकर यांच्या अनुभुतीतून हे जागृत दत्त स्थान निर्माण झाल्याचे सांगतात.

सध्या या मंदिराची मालकी अशोकराव रास्ते यांची असून ते अत्यंत भक्तीभावाने सदर मंदिराची माहिती देतात. श्रीमंत बळवंतराव रास्ते (श्री अशोकराव यांचे पणजोबा) हे एकनिष्ठ दत्तभक्त होते. त्यांनी श्री क्षेत्र गाणगापुरी राहून श्रीचरणी खूप सेवा केली. एका जर्मन महिलेने जर्मन भाषेत “श्री दत्त परंपरा” या विषयावर एक अभ्यासपूर्ण प्रबंध विश्व विद्यापीठात सादर केला त्यात तिने या श्री दत्तस्थानाचा श्री दत्त पादुका व श्री दत्तमूर्तीचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे.

श्री दत्तांच्या कृपाप्रसादासाठी प्रभावी दत्तमंत्र 

अनसुयासुत  श्रीश  जंपाटक नाशनम्   ।
दिगंबरं नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव ।।

दत्त मंदीर रास्ता पेठ पुणे
दत्त मंदीर रास्ता पेठ पुणे

औदुंबर वृक्षाखाली पादुकांची प्राप्ती

पेशवे कालीन दत्त मंदीर रास्ता पेठ पुणे मंदीरा मागे प्राचिन औदुंबर वृक्ष आहे. तेथेच पादुकांची प्राप्ती सरदार रस्ते यांना झाली. पुणे शहरात रास्तापेठेत पेशवेकालीन, सरदार रास्ते घराण्याच्या भव्य वाड्याची वास्तू आजही उभी आहे. ह्या वाड्यात श्री दत्तात्रेयाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे स्थान श्री नृसिंहसरस्वती रूपातील तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. श्री गाणगापूर येथील स्थानाएवढेच हे स्थान पवित्र असून तेथे श्री दत्तात्रेयवास आहे व त्याची प्रचीतीही अनेक दत्तभक्तांना येते  या मंदिरात एक प्राचीन असा औदुंबर वृक्ष आहे. ह्या वृक्षाच्या तळाशी थोडेसे उत्खनन केल्यावर श्रीदत्त पादुका निघाल्या. त्या पादुकांची रीतसर स्थापना केली आहे.

तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । "सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ॥१७॥
जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी" । म्हणोनि वर देती हर्षी । नृसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु । 

।।श्री गुरूदेव दत्त ।।