श्री दत्तमंदिर खरोळा

श्री दत्तमंदिर खरोळा
श्री दत्तमंदिर खरोळा

श्री दत्तमंदिर मौजे खरोळा, ता. रेणापूर जिल्हा लातूर

।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
।। श्री सदानंद स्वामी महाराज कि जय ।।
।। श्री नृसिंहानंद स्वामी महाराज कि जय ।।
।। श्री साधू महाराज कि जय ।।
।। श्री परमानंद स्वामी महाराज कि जय ।।
।। श्री सहजानंद स्वामी महाराज कि जय ।।
।। श्री पुर्णानंद स्वामी महाराज कि जय ।।
।। आनंदे दत्तात्रय देव देव ।।

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

मौजे खरोळा, ता. रेणापूर जिल्हा लातूर येथील श्री दत्तमंदिर येथे श्री सदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेले व त्यांच्या हयातीत स्थापन झालेले व त्यांच्या योग सामर्थ्याने उदयास आलेले अशी ही पवित्रतम वास्तु, ऐतीहासीक काळापासून महाराजांनी चालु केलेल्या अनेक परंपरा याठिकाणी आजपर्यंत अत्यंत श्रध्देने दत्त मंदिर ट्रस्ट व श्रध्दावंत भक्त मंडळी यांच्यामार्फत अत्यंत श्रध्देने चालु ठेवण्यात आल्या आहेत. त्या बद्दल थोडेसे. श्री सदानंद स्वामी महाराज यांच्या पूर्वाश्रमाबद्दलची माहिती श्रीमती नम्रता भट यांच्या “श्री स्वामी समर्थ गाथा“ या खंडांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ग्रामस्थानी कर्णोपकर्णी आलेल्या कथेनुसार आहे. श्री सदनंद स्वामी महाराज यांची तत्काळातील एकंदरीत परिस्थिति पाहता त्यांना स्वतःची पूर्वाश्रमाची ओळख पुसणेच क्रमप्राप्त असल्याने त्या बद्दलचे पुरावे अतिशय धूसर आहेत. 

श्री सदानंद स्वामी महाराज हे रैतीहासीक शुर शेनानी, सेनापती म्हणून शेवटचे पेशवे रावबाजी यांच्या सेनेमध्ये कार्यरत होते. त्यांचा जन्म कोकणच्या शुरविरांच्या मातृभूमी मध्ये झाला. त्यांचे नाव श्री नरहर (बापु) गोखले. वडीलांचे नाव श्री गणेश अप्पा गोखले. त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी सरदारकीची वस्त्रे व संरजाम प्राप्त झालेला, मराठेशाहीचा शेवटचा शुर सेनापती. टिपु सुलतानच्या एका स्वारीत तलवार गाजवल्यामुळे १७९० मध्ये पेशव्यांनी त्यांना सरदारकीची वस्त्रे दिली होती. १८०६ मध्ये ताई तेलीनीचे बंड, १८०७ मध्ये औध प्रतिनीधीचे बंड आणि वसईच्या तहामुळे पेशव्यावर व इंग्रजांवर नाराज झालेल्या चतुरसिंग भोसले बंड १८१२ ला झाले. ते नरहर (बापु) गोखले यांनी मोडले त्यामुळे इंग्रज बेहद खुश झाले.

परंतु त्यानंतर पंढरपुरच्या तहामुळे इंग्रज आणि पेशवे यांचे बिनसले तेव्हा इंग्रजांनी अनेक प्रकारांनी सरदार गोखलेंना अनेक विलोभने दाखवुन पेशव्यापासून फोडण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. तेव्हा पुणे परीसरात सरदार गोखलेंनी पेशव्यांना संरक्षण दिले. परंतु पंढरपूर जवळच्या गोपाल अष्टीजवळ इंग्रज व पेशवे यांची घनघोर लढाई झाली. पूर्व आणि दक्षिण दिशेकडून कोंडी झालेली असतानाही १९ फेब्रुवारी १८१८ ला बापु जिद्दीने तोंड देत राहीले.

श्री सदानंद स्वामी महाराज
श्री सदानंद स्वामी महाराज

त्यानंतर या लढाईमध्ये सरदार बापु गोखले रणकंदनात कामी आले अशी इतिहासात नोंद आहे. पण युध्दाच्या प्रसंगी त्यांचे सोबत असलेल्या त्यांच्या द्वितीय पत्नी यमुनाबाई यांना बापुंचे अंत्यदर्शन न घडवताच ते शव जाळण्यात आले. त्यामुळे त्यांनी बापुंचा मृत्यु झाला आहे असे कधीही मान्य केले नाही. उलट सवाष्ण म्हणून जिवणभर वावरत होत्या.

सेनापती म्हणून कार्यरत असताना बापु गोखले यांनी शिवअवतार श्री चिदंबर दिक्षीत स्वामी मुरगोड, (बेळगांव कर्नाटक) यांचे पुत्र श्री पांडुरंग स्वामी यांच्या मदतीने व श्री चिदंबर दिक्षीत स्वामी यांच्या उपस्थितीत सोमयाग यज्ञ संपन्न केला. त्यावेळी बापु गोखले यांच्यावर श्री दिक्षीत स्वामी व स्वामीसमर्थ महाराज अक्कलकोट यांचे कृपापूर्ण छत्र प्राप्त झाले व तेव्हा पासून श्री स्वामीसमर्थ महाराज यांच्या कृपेनेच शेवटच्या लढाईतून मरणप्राय अवस्थेमधून म्हणजेच अंगावर बंदुकीच्या तिन गोळ्या व तलवारीचे अनेक वार झालेले असतानाही परकियांच्या स्वाधधीन होण्यापेक्षा त्यांना एक दिव्य शक्ती प्राप्त झाली.

त्यानंतर ते अष्टीवरून श्री स्वामी समर्थ आज्ञेने प्रथम देवगीरीस आले व तेथून उत्तर हिंदुस्थानची यात्रा करून, मंगळवेढा, धारूर व नंतर अंबाजोगाई येथे आले. तेथे नृसिंह तिर्थावर योग साधनेमध्ये असताना त्यांना श्री नृसिंहानंद स्वामी महाराज म्हणून ओळखु लागले. या आधी श्री बापु गोखले जेव्हा अष्टीच्या लढाईत कामी आले असल्याची नोंद करताना त्यांचे वय ४० च्या आसपास होते अशीही नोंद आहे.

त्यांच्या जन्माच्या वेळी हे भविष्य वर्षवले होते की हा मुलगा पेशव्यांच्या सैन्यामध्ये मोठा अधिकारी होईल परंतु आयुष्याचा उत्तरार्थ हा सर्वसंग परित्याग करून मोठी योगसाधना करून सिध्द गुरूच्या आज्ञेने आचरण करील. त्याप्रमाणे १८२१ ला महाराज सर्व काशीयात्रा करून २ ते ३ वर्षे योगसाधना करून आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर धारूर या गावी आले व तेथील मारूतीच्या मंदिरामध्ये एकांत वासामध्ये राहून आपले तप-अनुष्ठान योगसाधना हे दैनंदिन उपासना त्यांनी चालु ठेवली होती. त्याकाळात त्यांचे योगमार्गाने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याशी दैनदिन अनुसंधान साधले जात होते. याच दरम्यान ब्रिटीशांचे गुप्तहेर बापुच्या शोधासाठी म्हणून फिरत असातना अचानक त्या धारूरच्या मारुती मंदिरासमोरून जात असताना एक घटना घडली, त्या घोडदलामधील एक घोडा काही केल्या पुढे सरकेना तेव्हा त्यावर स्वार झालेल्या शिपायाने अनेक प्रयत्न केले परंतु सर्व व्यर्थ गेले ही सर्व घटना बापु मंदिराच्या गाभाऱ्यातून पहात असताना बाहेर आले व ते शिपायाला म्हणाले की, तुझा घोडा काही क्षणाकरता माझ्याकडे दे ! असे म्हणून त्यांनी तो घोडा घेतला, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी अंतरज्ञानाने जाणले कि आपण जेव्हा सेनापती म्हणून कार्यरत होतो तेव्हा सर्व लढायामध्ये याच मुक्या प्राण्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्याला साथ दिली आहे म्हणून हा आज आपल्या मालकाच्या दर्शनासाठी म्हणून या ठिकाणी आडला त्या मुक्या प्राण्याला दर्शन देल्यानंतर तो घोडा शिपायाकडे सुपूर्त केला.

काशी क्षेत्रामध्ये असताना केलेले तपाचरण व त्यामुळे सिध्द झालेली शरिर यष्टी - जटाभार दाढी व दिनचर्या यामुळे सर्व लोक त्यांना साधु महाराज म्हणून ओळखु लागले. त्या धारूरच्या मंदिरात भक्तांची गर्दी वाढल्याने महाराजांनी तेथुन निघून अंबाजोगाईला आले तेथे आल्यानंतर जोगाईचे दर्शन घेऊन तेथे काही काळ अनुष्टान साधने केले. ब्रिटीश गुप्त हेरांच्या डोळ्यात धुळ फेकीत अखेर लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या रेणापूर पासून साधारणतः ६ ते ८ कि.मी. अंतरावर वसलेल्या पूर्वपावन खरोळा गावामध्ये स्थाईक झाले.

श्री सदानंद स्वामी महाराज संजीवन समाधी
श्री सदानंद स्वामी महाराज संजीवन समाधी

महाराज योगी वेशात, डोळ्यावर जटा, दाढी अशा स्वरुपात आल्यानंतर प्रथमतः खरोळा येथील (पूर्वीचे खलविर), चौकात पूर्वापार स्थापिक असलेल्या गणपती मंदिराच्या ओट्यावर बसले व स्थानीक लोकांना- हे कोणी तरी साधु पुरूष व योगी असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी आपल्या घरी वास्तव्याची विनंती केल्यानंतर त्यांनी त्या गणपती मंदिराच्याच उजव्या बाजुला स्थापीत असेल्या वास्तुकडे अंगुलीनिर्देश केला व माझी राहण्याची जागा हि आहे ! असे महाराजांनी त्यांना सांगितले. तेव्हा ग्रामस्थानी ही जागा एका भयंकर पिश्याच्याने शापीत करून व त्या ठिकाणी ते वास्तव्याला असल्याची माहिती दिली. ते म्हणाले कि ते पिश्याच्च इतके भयानक आहे कि जर गाभण जनावर चारा खात-खात जरी त्या वास्तुजवळून गेले तरी त्याचा गर्भनाश होतो आहे ! असे सांगुनही महाराज काहीच ऐकत नाहीत असे पाहिल्यानंतर त्या ग्रामस्थांनी महाराजांना सोबत घेऊन ती वास्तु राहण्या योग्य केली. तेव्हा त्यांना महाराजांनी सांगितले कि या पिश्याच्याचा उद्धार होण्याचा काळ अगदी जवळ आला आहे. असे म्हणून त्या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर काही दिवसातच महाराजांनी काही शिष्यमंडळी समोरच त्यांचा उध्दार केला व त्यावेळी त्या शापीत हवेलीतून एक दिव्य ज्योत बाहेर जाताना तेथे उपस्थित शिष्य मंडळींनी पाहिली. अशा प्रकारे ती शापीत वास्तु आपल्या योग सामर्थ्यावर व तपाच्या जोरावर महाराजांनी पुनित पावन करून त्याठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांची स्थापना करून श्री दत्त मंदिराची स्थापना केली. या ठिकाणी ते सदानंद महाराज या नावाने ओळखु लागले. श्री सदानंद महाराजांनी स्थापन केलेली श्री दत्त महाराजांची मूर्ती बालविग्रह आहे श्री मंदिर मध्ये मार्गशीष शुक्ल चतुर्दशी रोजी संध्याकाळी श्री दत्त अवधूत जन्मोत्सव साजरा केला जातो व मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी कुलाचार सव्वा मन पुरणपोळीचा महानैवद्य अर्पण केला जातो आजही वेशीला टिळा या न्यायाने पंचक्रोशीतील भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो.

श्रावण कृष्ण सप्तमी दिवशी श्री सदानंद स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समाराधना  व जन्माष्टमी दिवशी कुलाचार गव्हाच्या खिरीचा महानैवद्य/ आरती रात्री बारा वाजता जन्मोत्सव/ कृष्ण नवमी गोपाळकाला साजरा केला जातो. श्री महाराजांनी आपल्या सिद्धीनेच प्राप्त केलेली नर्मदेश्वराची स्वयंभू पिंड, शाळीग्राम श्री केदारनाथाचे लिंग, श्री दत्त महाराजांची निर्गुण पादुका इत्यादी देवांची स्थापना मंदिरामध्ये केली आहे. श्री महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर श्री सदानंद स्वामी महाराज चरित्र ग्रंथ या मध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्यांची श्री नर्मदेश्वर  लिंगामध्ये प्राणज्योत  विलीन झाली. 

याठिकाणी दररोज पुजा अर्चा, दुपारचा नैव्यद्य, तसेच संध्याकाळी सेज आरती हा उपक्रम महाराजांनी चालु केला. त्याचबरोबर गुडीपाढवा, रामनवमी, हनुमान जयंती, चैत्र गौरीचा उत्सव, गुरू पौर्णिमा हे मासीक उत्सवाची सुरवात केली, त्यानंतर श्रावणामध्ये लिंगार्चण, गोकुळ अष्टमी, श्रीकृष्ण जन्मोत्सव, भाद्रपद शु. ४ गणपती स्थापना, गौरी गणपती पुजन, कोजागीरी पोर्णिमा, दिवाळीचा सन तसेच मार्गशिर्ष पोर्णिमा दत्त जयंती, होळी असे सर्व सन उस्तव यांची सुरुवात केली.

या दत्त मंदिरामध्ये वास्तव्याला असताना हैद्राबादचे राजा गणेशराय व राजा चंदुलाल हे त्यांना गुरु समान मानत असत. व ते महाराजांचे यथोचित आदरातिथ्य करत असत. खरोळा दत्त मंदिरा करता हैद्राबाद संस्थानाकडून दत्त मंदिरातील उत्सव संपन्न होण्याकरीता व दैनंदिन दिवाबत्ती व नैव्यद्याची सोय होण्याकरीता काही जमीन दान स्वरूपात देण्यात आली आहे. याच काळात श्री सदानंद महाराज पुर्वाश्रमीचे बापु गोखले हे राजा गणेशराय यांना भेटायला गेले असता त्यांनी हैद्राबादवरून येत असताना आपल्या सामर्थ्यावर एक शिवलींग प्राप्त करून घेतले, त्याचीही स्थापना या दत्त मंदिरात केलेली आहे. तसेच या मंदिरामध्ये महाराजांनी विष्णू प्रतिक म्हणून शाळेग्राम तसेच टाकांची स्थापना केलेली आहे.

श्री दत्तमूर्ती खरोळा
श्री दत्तमूर्ती, खरोळा

या मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्री दत्त जयंती हे उत्सव खुप मोठ्या उत्साहात साजरा करण्याची सुरूवात श्री सदानंद महाराजांनी केली. त्या काळामध्ये जन्माष्टमीच्या कार्यक्रमाकरता परिसरातील अनेक गावातून दिंड्या येत असत. आलेल्या सर्व लोकांना महाराजांचा कृपाआशिर्वादासोबत गव्हाच्या खिरीचा प्रसाद दिला जात असे व श्री दत्तात्रय महाराजांचा जन्मदिवस म्हणून श्री अवधूत जयंती साजरी केली जात असे. अवधूत जयंती म्हणजे मार्गशिर्ष शु. १४ या दत्त जंयतीच्या वेळेस दोन संगीत नाटकाची सुरवात करण्यात आली. त्या कारणाने खरोळ्यामध्ये अनेक गायक, वादक व नाटक कलाकार अगदी उच्च कोटीचे कलाकार सदानंद महाराजांच्या आशिर्वादाने निर्माण झाले. तसेच श्री दत्त जयंतीच्या उत्सवात सव्वामन हरभरा डाळीचे पुरण करून त्यांच्या पुरणाच्या पोळीचा महाप्रसाद व त्याबरोबर तुप, अशा प्रकारचा महाप्रसादाचे अन्नदानाची परंपरा महाराजांनी चालु केली.

अशा प्रकारची दत्त मंदिराची स्थापना करुन दत्त सांप्रदायाची धुरा आपल्या सामर्थ्याने व श्री दिक्षीत स्वामी, श्री स्वामी समर्थ यांच्या आशिर्वादाने महाराजांनी श्रावण कृष्ण सप्तमी दि २० आगस्ट १८७८ रोजी संजीवन समाधी घेतली.  

तत्पूर्वी श्री दत्त सांप्रदायाची गादीचा उत्तराधिकारी निवडण्याचा काळ जवळ आलेला जाणून महाराजांनी आपले दोन शिष्य जवळ बोलावले त्यांना पत्र देऊन अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचेकडे पाठवले व स्वामी समर्थ महाराजांनी अंतरदृष्टीने त्यातील एकाचा अनन्य भाव ओळखून त्याला गादीवर उत्तराधिकारी म्हणून नेमण्याकरता त्या पत्राचे उत्तर पाठवले. श्री समर्थ आदेशावरून श्री सदानंद महाराजांनी त्यातील एकाचे परमानंद नामकरण करून त्याला पुढील कार्यकाल व ईश्वरीय कार्य करण्याकरता गादीवर बसवले. स्वतः श्रावण कृष्ण सप्तमी दि २० आगस्ट १८७८ रोजी संजीवन समाधी घेतली. त्यानुसार श्रावण कृष्ण सप्तमी वार सोमवार या दिवशी श्री सदानंद महाराजांनी प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांच्याप्रमाणे स्वतःचे देह विसर्जन केले.

तेव्हापासून श्री परमानंद महाराज यांनी श्री सदानंद महाराजांच्या आदेशानुसार श्री दत्त मंदिराचा कारभार सांभाळत राहिले. त्यांना वेळोवेळी समधीस्त अवस्थेतून श्री सादनंद महाराजांनी मार्गदर्शन केले. श्री परमानंद महाराज यांनी सदानंद महाराज देहावस्थेमध्ये असतात केलेल्या सेवेमुळे त्यांना त्याची फलश्रुती म्हणून समाधी घेतल्यानंतर ही महाराजांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. श्री परमानंद महाराजांनीही गादीवर स्थित असताना महाराजांनी चालु केलेले सर्व उत्सव अतिशय चांगल्या पध्दतीने संपन्न होऊ लागले. तसेच श्री सदानंद महाराजांनी श्रावण कृष्ण सप्तमीला सामाधी घेतल्याने श्रावण कृष्ण प्रतीपदा पासून हरिनाम सप्ताहाची सुरूवात करून श्रावण कृष्ण ७ ला श्री सदानंद महाराजांचा समाधी सोहळा व कृष्ण ८ ला श्री कृष्ण जन्माष्टमी व कृष्ण ९ ला गोपाळ काल्याचा कार्यक्रमाला सुरूवात झाली. या दरम्यान आठ दिवस श्रीमद् भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ, हरिकिर्तन यांचे आयोजन सुरु झाले. श्रावण कृष्ण ७ मीला समाधी सोहळ्या निमित्त समाराधना संपन्न होत आहे. तसेच श्रावण महिन्यामध्ये सव्वा लाख लिंगार्चणाचा विधी सुरू झाला.

श्री परमानंद महाराजांनी गादीवर कार्य करत असताना अनेक तिर्थयात्रा केल्या. त्यांनी तिर्थ यात्रा करत असतानाच पुणतांबा येथे आपली इहलोक यात्रा संपवीली. त्यावेळी पुणतांब्यामधून पत्र आल्यानंतर खरोळ्याहुन शिष्य सुवाशिमंडळी गेल्यावर त्यांचे देहाचे अग्नी विसर्जन झाले तेथील अस्ती आणुन त्यांची अस्थीची समाधी श्री सदानंद महाराजांच्या बाजुलाच स्थापन केली श्री परमानंद महाराजांनी माघ शुध्द ९ दि १७ फेब्रुवारी १८९१ ला आपले देह विसर्जन केले. काही काल गेल्यानंतर त्या ठिकाणी साळुमाय नावाची एक शिष्य ही भिक्षा मागणे, सोवळ्यामध्ये नैव्यद्य करणे आदी नित्यनेम एका पुजारी शिष्याला सोबत घेऊन पार पाडत होत्या तसेच सर्व कार्यक्रम पूर्वी प्रमाणेच चालत होते. माघ शु. ७ (रथसप्तमी) पासून माघ शु. ९ मी ला श्री परमानंद महाराज पुण्यतीथीचा दीड दिवसाच्या उत्सवाला सुरुवात झाली.

काही काळे गेल्यानंतर दरम्यान एक श्री परशुराम जोशी आपल्या कुटूंबासोबत खरोळ्याला श्री दत्त महाराजांच्या सेवेमध्ये उपलब्ध झाले. ते पती पत्नी सेवा करत असताना त्यांना झालेला पहिला मुलगा त्यांनी श्री दत्त महाराजांची सेवा करण्याकरीता म्हणून मुंज झाल्याबरोबर मंदिरामध्ये अर्पण केला व त्या बटूने श्री दत्त महाराजांची सेवा करायला सुरूवात केली. अशा पध्दतीने गादीला तिसरा वारस मिळाला. त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्वकाळ सन्यासी राहुन आपल्या अवतारी गुरूची व श्री दत्त महाराजांची सेवा करण्यात व्यतीत केला. सहज रुपाने हे महापुरूष प्राप्त झाले म्हणून त्यांचे सहजानंद हे नाव नावरुपास आले.

त्यांनी दत्त महाराजांची सेवा व श्री सदानंद महाराजांची सेवा अनन्य भावाने केल्यामुळे अनेक सिध्दी प्राप्त होऊन त्यांनी सर्व संग परित्याग वृत्तीने अनेक चमत्कार करून दैवी शक्तीचा प्रत्यय देत अनेक शिष्यगण-शिष्यवर्ग निर्माण केला व मंदिरातील उत्सवांना एक भव्य दिव्य स्वरूप आणले. अशा प्रकारचे दैवी कार्य करून उतार वयात असताना श्री पुर्णानंद महाराजांना गुरूमंत्र देऊन माघ शु. ४ दि ०७ सप्टेबर १९२९ ला आपले कार्य ईश्वराचरणी समर्पण करून मनुष्य देह विसर्जीत केला.

पूर्णानंद महाराज म्हणजे लातूर येथील प्रयाग (नाईक) घराण्यातले गोविंद प्रयाग यांच्या घरी जन्माला आले. त्यांच्या अगोदर त्या घरी जन्माला आलेले मुल जिवंत राहत नव्हते. तेव्हा त्यांनी पती-पत्नीनी श्री सहजानंद महाराज यांचेकडे येऊन आम्हाला मुलगा व्हावा तर त्यापैकी एक मुलगा आपल्या सेवेला अर्पण करू असा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी आपला एकमुलगा येथे सेवेला आणून ठेवला. त्या मुलाचे मुंज संस्कार झाल्यानंतर पुर्णानंद या नावाने नामकरण झाले. त्यांनीही अनन्य भावाने सेवा केली. सेवेची फलश्रुती म्हणून त्यांना अनेक विद्या प्राप्त झाल्या त्यामध्ये संगीत विद्या, नाडी परीक्षण तसेच आयुर्वेदिक औषधे देऊन अनेक भक्तांच्या विविध प्रकारच्या व्याधी त्यांनी नष्ट केल्या पोलीओच्या आजाराने ते एका पायाने लंगडे पणाने
त्यांनी आयुष्य जगले. पण त्यांच्या व्यंगाचा सद्‌गुरू सेवेमध्ये कधीही अडसर निर्माण झाला नाही.

त्यांनी आपला देहावस्थेत असताना पुर्वापार पासून चालत आलेले उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरे केले. सदानंद महाराजांचा समाधी सोहळा, परमानंद स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त आडीच (२।।) दिवसांचा नाम सप्ताह व सहजानंद महाराजांचा १।। दिवसाचा नाम सप्ताह हे सर्व विधी आनंदाने संपन्न केले. आणि भाद्रपद शु. १४ (अनंत चतुर्दशी) दि ०७ सप्टेबर १९९४ ला आपला देह विसर्जीत केला. 

अशा प्रमाणे सदानंद महाराजांच्या सन्यास व्रताने सुरू झालेला आनंद सांप्रदाय पुर्णानंद महाराजांच्या जिवन यात्रेवरती पूर्ण झाला. त्यानंतर या गादी परंपरेमध्ये योग्य असा पुरूष प्राप्त न झाल्याने ही परंपरा पुर्णानंद महाराजांच्या अवतारावरच स्थगीत झाली.

परंतु या समाधी शिष्यपरंपरेच्या आधारावर स्थापन झालेली व शासकिय अधिकाऱ्यांच्या तहसिलदार साहेब यांच्या नियंत्रणाखाली कामकरणारी श्रध्दाळू भक्तांच्या दृष्ट मार्फत या मंदिराचे सर्व कामकाज पाहिले जाते. आजही सदानंद स्वामी महाराजांनी सुरू केलेले. उत्सव तसेच पुन्हा वाढत गेलेले सर्व उत्सव समाधी सोहळा, पुण्यतिथी, श्री पुर्णानंद महाराज यांची पुण्यतिथी निमित्त होणारा १।। दिवसाचा हरिनाम सप्ताह कुलधर्म, कुलाचार, सन वगैरे सर्व या मंदिरामध्ये भव्य दिव्य स्वरुपामध्ये संपन्न होत आहेत.

सामाजीक पौराणिक ऐतिहासिक नाटक
सामाजीक पौराणिक ऐतिहासिक नाटक

श्री मंदिरातील वार्षीक उत्सव

१) चैत्र शु. ९ श्री राम नवमी (१२ वा गुलालप्रसाद)
२) चैत्र शु. १५ श्री हनुमान जयंती (सकाळी गुलाल)
३) आषाढ शु. १५ श्री गुरु पोर्णिमा (दु. १२ भजन प्रसाद)
४) श्रावण कृ. ७ श्री सदानंद महाराज यांची पुण्यतिथी
५) श्रावण कृ. ८ श्रीकृष्ण जन्म (रात्री १२ गुलाल)
६) श्रावण कृ. ९ श्री गोपाळकाला पालखी सोहळा
७) भाद्रपद शु. १४ श्री सहजानंद महाराज पुण्यतिथी दिवसाचा नाम संकीर्तन सप्ताह गणेश चतुर्थी
८) भाद्रपद शु. १४ श्री पूर्णानंद स्वामी यांची पुण्यतिथी (अनंत चतुदर्शी)
९) अश्विन शु. १४ श्री कोजागिरी पोर्णिमा (रात्री १२ आरती प्रसाद)
१०) मार्गशिष शु. १४ श्री अवधुत जयंती / दोन नाटकाचे प्रयोग सादर केले जातात (सामाजीक पौराणिक ऐतिहासिक संगी नाटक) पुरणपोळी महाप्रसाद / काला
११) माघ शु. ९ श्री परमानंद महाराज पुण्यतिथी रथसप्तमी दिवशी काडीच दिवस नामसंकीर्तन सप्ताह.
१२) माघ कृ. १३ श्री महाशिवरात्र निमीत्त रात्री ९ वा. लघुरुद्र अभिषेक रात्री १२ आरती प्रसाद
१३) फाल्गुन कृ. २ श्री तुकाराम महाराज बीज दुपारी १२ वा. गुलाल, भजन व आरीत प्रसाद
१४) फाल्गुन कृ. ६ श्री एकनाथ महाराज जयंती (नाथ षष्टी) दु. १२ गुलाल, भजन व आरती प्रसाद.
१५) श्रावणमास २००४ पासून दर गुरुवारी दु. १२ चित्रान्न अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा नाम जप व माघूकरी प्रसाद चालु झालेला आहे.

नाटकाचे नमन

सदानंद हे परम पुरुषा नत मस्तक तव ठाई। आशिर्वाद हो द्यावा आम्हा ।। या मंगल समयी ।।१।।
परम पुरुष तु या ग्रामीचा । शिरोमणी तु खलविरांचा। वेळो वेळी नाट्य कलेतून । तेज प्रकट तव होई ।। सदानंद हे परम पुरुष ।।२।।
रसिक उधळतील स्तृतीची समुने । आम्हा होईल गगण ठेंगणे। तव कृपने रंगदेवता प्रसन्न आम्हा होई।।
सदानंद हो परम पुरुषा नत मस्तक तवठाई, आशिर्वाद हो द्यावा आम्हा या मंगल समयी ।।

आनंद संप्रदयाची परंपरा श्लोक

आदिनारायण विष्णु ब्रह्माणंचात्म संभवम् ।। अत्रिसंज्ञ ऋषिवर दत्तात्रेयं जगद्गुरु ।।
सदानंद ब्रह्मभुतं लीलाविग्रह धारिणम्।। परमानंदं संज्ञंतु तीव्र वैराग्य धारिणम् ।।
गुरुसेवा परंधिरं तीव्रानुष्ठनकारिनम् ।। ज्ञान वैराग्य प्राप्त्यर्थ गुरुनेता न्नमाम्हम् ।।
सहजानंद नामाय पूजा स्तोत्र कलाप भाक्।। शिवार्चन रतोनित्यं तस्मै श्री गुरुवेनमः ।।
पूर्णानंद गुरु श्रेष्ठ सर्वविद्या विशारदः ।। अत्यंतं यत्नशिलस्य ज्ञानवान कवयो विदुः ।।
एतत् श्रेष्ठ गुरुस्थाने दीर्घकाल मुपेयिवान ।। एतस्मिन् गुरुराजस्य नित्यमेवं नमाम्यहम् ।।
उपास्यो अत्रि ज्योयस्य शिवस्यास्तित्युपासना ।। आनंद संप्रदायस्य तस्मै श्री गुरुवे नमः ।।

सद भक्तांनी श्री दत्त उपासक या हेतूनेच श्री महाराजांच्या दर्शना निमित्ताने यावी ही विनंती. 

मार्ग

  • लातूर - रेनापुर - खरोळा  
  • अंबाजोगाई - रेनापुर - खरोळा
  • नांदेड - आष्टामोड – खरोळा

श्री. दत्त मंदिर देवस्थान खरोळा

मुंबई सार्वजनिक ट्रस्ट ऍक्ट अन्वये श्री दत्त मंदिर देवस्थान खरोळा ट्रस्ट आहे  A1625
देणगीदार 80G (5) 12A (IV) आयकर कपातीत दावा करू शकतात. 

श्री. दत्त मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ 

  1.  अध्यक्ष तथा तहसीलदार साहेब रेणापुर- पदसिद्ध अध्यक्ष      
  2.  श्री. धनंजय सुधाकरराव देशमुख- उपाध्यक्ष, 7972492577    
  3.  कै. दिलीपराव देविदासराव कुलकर्णी- माजी सचिव      
  4.  श्री. संजय नारायणराव राऊतराव- सचिव, 9730701060
  5.  श्री. शिवदासआप्पा शंकरआप्पा मोतमफळे- सह सचिव     
  6.  श्री. माधव ग्यानोबा बांडे- सदस्य, 7588238123
  7.  श्री. शिवराज ज्ञानोबा सप्ताळ- सदस्य, 9423348269
  8.  श्री. बापूराव परसराम राऊतराव- सदस्य, 9579047784
  9.  श्री. सोमनाथ तुकाराम दवणे- सदस्य,  9022541007
  10.  श्री. गजानन किसनदेव जोशी- सदस्य, 9730183019