जन्म: त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.
माता: सौ. अरुंधती जोशी.
पिता: डाँ. धैर्यधर जोशी.
संगोपन: आजी- सौ. शकुंतला नरेंद्र पंडित. (माहेरचे नाव- मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये)
विशेष प्रभाव: माई- सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये (बापूंच्या पणजी)
शालेय शिक्षण: डाँ. शिरोडकर हायस्कूल, परळ, मुंबई. माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंतएस. एस. सी.- इ. स. १९७२;
वैद्यकीय शिक्षण: नायर हॉस्पिटल- मुंबई (टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय) एम. बी. बी. एस.- इ. स. १९७८ एम. डी. (मेडिसीन)- इ. स. १९८२
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंविषयी काही ठळक माहिती
॥ हरि ॐ ॥
१९१७ होळी पोर्णिमा ह्या दिवशी श्रीसाईबाबांच्या दृष्टांतानुसार श्री साईबाबांची तसबीर हेमाडपंताना प्राप्त झाली. श्री साईसत्चरितामधील ४०व्या अध्यायात ही कथा सांगितली गेली आहे. ती तसबीर आजही हेमाडपंताच्या निवासस्थानी म्हणजेच वांद्रे येथील साईनिवासमध्ये आहे. हेमाडपंतांना श्रीसाईनाथांनी आपला देह सोडण्यापूर्वी बोलावून घेऊन एक रुद्राक्ष माळ, शाळीग्राम व छोटा त्रिशूल दिला व तुझा वंशात ही माहिती गुप्त ठेवण्याबद्दल बजावून सांगितले व मी स्वतः साई निवासमध्ये येऊन ह्याच गोष्टी परत मागेन असे सांगितले होते. १९९६ साली श्रीअनिरूद्धांनी, हेमाडपंतांचे नातू श्री अप्पासाहेब दाभोलकर आणि नातसून सौ. मीनाताई दाभोलकर ह्यांच्यासमोर खूणेचे शब्द उच्चारले व अप्पासाहेबांनी ह्या तीनही गोष्टी बापूंच्या स्वाधिन केल्या व उभयतांना बापूंनी नमस्कार केला. नमस्कार करून वर बघितले तेव्हा त्यांना साईरूपाचे दर्शन झाले. वरील सर्व वस्तू तसेच हेमाडपंतांची पगडी व ज्या डेस्कवर श्रीसाईसत्चरित हा अपौरुषेय ग्रंथ लिहीला गेला ह्या आजही तेथेच आहेत.
श्रीसाईसत्चरित, कोट्यावधी साई भक्तांचा अत्यंत जिव्हाळ्याचा ग्रंथ. श्रीसाईसत्चरित साईनिवास ह्या हेमाडपंतांच्या निवासस्थानी लिहून पूर्ण झाले. मुंबईमधील वांद्रे येथील हेच साईनिवास आजही तसेच्या तसेच आणि तीच पवित्र स्पंदने कायम राखून लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.
गुरुवारचे प्रवचन
परमपूज्य बापूंच्या सहवासात व सान्निध्यात येणाऱ्या अनेक व्यक्ती बापूंच्या विलक्षण तेज :पुंज व भारदस्त व्यक्तिमत्वाने भारावून जात असतात. दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या गोष्टींबद्दल हसत-खेळत, सहजतेने संवाद साधताना, त्या काळी एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या परमपूज्य बापूंच्या विचारांनी अनेक मंडळी त्यांच्याकडे आकर्षित झाली आणि त्यांच्याभोवती एकत्र येऊ लागली. सद्गुरु श्रीअनिरुद्ध हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत श्रेष्ठ आणि मंगल आधार झाला. बापूंबरोबर होणार्या नित्य नैमित्तिक जीवनाच्या संवादामुळे हळूहळू त्यांना आध्यात्मिक विकासाची दिशा मिळू लागली आणि त्याचबरोबर बापूंच्या निरनिराळ्या सामाजिक सेवांमध्येही ह्या मंडळीनी स्वत:ला वाहून घेतले.
हा लहानसा समूह भक्ति व सेवा ह्या आध्यात्मिक मार्गाने प्रवास करता-करता अनेक सत्प्रवृत्त लोकांना आकर्षित करू लागला आणि हळूहळू त्याचेच रुपांतर आजच्या बापूंच्या गुरुवारच्या प्रवचनाला येणार्या लाखो श्रद्धावान भक्तांच्या विशाल समुदायात झाले. गुरुवारी संध्याकाळी ७:३० वाजता ह्या लाखो श्रद्धावानांसमोर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू मराठीतून प्रवचन करत असत तसेच रात्रौ त्याच ठिकाणी परमपूज्य बापू हिंदीमधूनही श्रद्धावानांशी संवाद साधत.
त्यांचे पहिले प्रवचन ‘श्रीसाईनांथांची ११ वचने’ या विषयावर झाले. त्यानंतर बापूंनी विष्णुसहस्रनाम, ललिता सहस्रनाम, राधा सहस्रनाम, श्रीरामरक्षा, नारद भक्तिसूत्रे, श्री साईसच्चरित्र, श्रीसूक्तम्, श्री त्रिविक्रम अनंत नामावली आणि इतर अनेक आध्यात्मिक विषयांवर प्रवचने केली आहेत. आता मराठी प्रवचन/पितृवचन झाल्यावर रात्री बापू तरूण पिढीबरोबर इंग्रजीमधून संवाद साधतात.
परमपूज्य बापूंची प्रवचनं म्हणजे, आपला हा जन्म अधिकाधिक आनंदी कसा करायचा ह्याचे मार्गदर्शन. संकटावर व अडचणींवर उचित मानवी प्रयास व भक्तिमार्गाने मात कशी करायची ह्याचे परिणामकारक उपाय. मी शरीराने, मनाने व व्यवहाराने समर्थ कसा होऊ शकतो ह्याचे प्रशिक्षण. भोंगळ कर्मकांड व चुकीच्या चालीरीती ह्या आमचा नाश कसा करतात हे समजून घेऊन, निखळ भक्तिमार्गाने त्या क्षमाशील कल्याणकारी परमात्म्याची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची ह्याचा प्रत्यक्ष अनुभव.
परमपूज्य अनिरुद्ध बापू कोणतीही योजना शास्त्रशुद्धरित्या अभ्यासून राबविण्यावरच विश्वास ठेवतात. अनिरुद्ध समर्पण पथकाने समाजातील वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांशी संपर्क साधून जे संशोधन केले व त्या प्रक्रियेतून जे निष्कर्ष काढले गेले त्यांची मदत बापूंच्या तेरा कलमी कार्यक्रमांची आखणी करताना झाली.
भारतीय प्राच्यविद्या (बलविद्या) प्रशिक्षण
मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा ६५ विद्या व ६४ कला विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिकवणारी विद्यापीठे व गुरुकुल प्राचीन काळी भारतात ठिकठिकाणी कार्यरत होती. ह्या शिक्षणाने तयार झालेले तरुण बौद्धिक, मानसिक, व शारीरिक पातळ्यांवर कणखर व्यक्तिमत्वाचे होते. भारताला पुन्हा सामर्थ्यवान, बलशाली बनविण्यासाठी आवश्यकता आहे ती बुद्धी, मन व शरीराने समर्थ असलेल्या नागरिकांची. देशावर लादल्या गेलेल्या दहशदवादी व युद्धजन्य परिस्थितीत विजयासाठी प्रत्येक नागरिकामध्ये फक्त शारीरिकच नव्हे तर बौद्धिक व मानसिक सामर्थ्य असणे देखील आवश्यक आहे. असे सामर्थ्य प्राप्त करून देणाऱ्या भारतीय प्राचीन बलविद्यांची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. या बलविद्यांपैकी काही महत्त्वाच्या विद्या म्हणजे मुद्गलविद्या, वज्रमुष्टीविद्या, सूर्यभेदनविद्या आणि यशवंती मल्लविद्या.
भारतीय परंपरेतील लोप पावत चाललेल्या बलविद्येचा सखोल अभ्यास करून बापूंनी तिला आधुनिक काळासाठी उपयुक्त अशा प्रशिक्षण पद्धतीच्या स्वरूपात विकसित केले आहे.आजच्या तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक वातावरणात ही बलविद्या अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या प्रशिक्षणामध्ये डॉ. अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या प्रशिक्षित श्रद्धावानांकडून शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते व सरावही करून घेतला जातो. तसेच महिलांना स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन यांचे प्रशिक्षण देण्यासाठी अहिल्या संघाची स्थापना केली आहे.
अनेक श्रद्धावानांना बापूंच्या दिव्यत्वाची अनूभूती येतच आहे. परंतू सद्गुरु बापू म्हणून परिचित होण्याअगोदर बापूंच्या असामान्य मानवत्वाचे अनेक दाखले देणारे अनेक प्रसंग बापूंच्या शिक्षकांनी, सहाध्यायांनी तसेच परिचितांनी ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात समर्थ व्यायाम मंदीरशी जोडले गेलेले जेष्ठ मल्लखांब प्रशिक्षक श्री. उदय देशपांडे लिहितात. "मल्लखांब, जिम्नॅस्टिक करताना एखाद्या व्यक्तीच्या परफॉर्मन्स लेव्हलचा बारकाईने अभ्यास करून डॉक्टर (बापू) त्या व्यक्तीची क्षमता वाढविण्यासाठी कोणते व्यायाम, किती प्रकारे, किती वेळ, किती वेळा केले पाहिजेत याचं गणित मांडायचे. हे सगळं पाहून तेव्हा मला प्रश्न पडायचा की एवढा अभ्यास, एवढं ज्ञान एकाच व्यक्तीकडे कसं असू शकतं? कारण इतकी वर्ष मी या क्षेत्रात असूनसुद्धा डॉक्टरांनी (बापूंनी) सांगितलेल्या बर्याच गोष्टी माझ्यासाठी नव्या असायच्या."
परमपूज्य सद्गुरू श्री बापूंनी स्वतः प्रशिक्षण देऊन प्रथम बल आचार्य श्री रवींद्र मांजरेकर यांना बल विद्येत प्रवीण केले. आता ह्या प्रथम आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध समर्पण पथकाच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण सुरु केलेले आहे. पुढील काही वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेले हे तरुण इतरांना त्या विद्येचे ज्ञान प्राप्त करून देऊ लागतील व त्यातूनच मोठ्या संखेने भारतातील तरुण हा विद्याभ्यास पूर्ण करून स्वतःच्या प्रगतीतून भारत समर्थ करतील हे निश्चित.
डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)
उदी
कोठिंबे, कर्जत येथील गोविद्यापीठम् येथे सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंच्या संकल्पानुसार अखंड धुनी जळत असते. येथील विभूती ही बापूंची उदी मानली जाते. तसेच गुरुकुल (जुईनगर) येथील याग, हवन ह्यापासून तयार होणारी उदी व श्रीहरिगुरुग्राम येथील उत्सवांत होणार्या यज्ञांमधील उदी तसेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंच्या निवासस्थानी होणार्या दोन वार्षिक दत्तयागांमध्ये तयार होणारी उदी अशाप्रकारे ह्या सर्व स्थानांतील उदी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे आणून इथल्या उदीकुंभामध्ये एकत्र केली जाते, या उदीकुंडातील ही उदी श्रद्धावानांसाठी विनामुल्य सदैव उपलब्ध असते.
ह्या बापूंच्या उदीची प्रचीती लक्षावधी भक्तांना अनेकदा येत येत असते. वेळोवेळी एकमेव आधार उदी जवळ असली की भक्त निर्भय होतो. कुठल्याही प्रसंगातून तरून जाण्यासाठी कोणी मुठभर उदी घेऊन जातात तर कोणी डबा भरून. श्रद्धावान भक्त प्रेमाने ही उदी दररोज आपल्या कपाळी लावतात व आपल्या सहकार्यांना तसेच सग्यासोयर्यांना व मित्रांना, विनामुल्य उदी वाटतात. ही उदी म्हणजे साक्षात बापूंची चरणधूळ आहे, त्यांचे सुरक्षा कवच आहे असा श्रद्धावानांचा विश्वास आहे. ही उदी कपाळावर म्हणजेच मस्तक सदैव बापूंच्या चरणांवर. न्यूनगंड, नैराश्य आणि अपयशाला ही उदी दूर करते. ह्या उदीचे कार्य घडते ते फक्त एकाच मार्गाने, श्रद्धावानाचा सद्गुरु बापुंवरील असलेला पूर्ण विश्वास.
गुरुपोर्णिमा
प्रत्येक बापू भक्ताला ह्या गुरुपोर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या लाडक्या श्री अनिरूद्धांचे दर्शन घ्यायचे असते. या दिवशी श्रद्धावानाला बापूंच्या चरणावर आपला भाव अर्पण करावासा वाटतो. गुरुदक्षिणा म्हणून श्री अनिरुद्ध गुरुपोर्णिमेच्या दिवशीसुद्धा एक पैसाच काय परंतु साधे फुल किंवा ग्रीटिंग कार्डही स्वीकारत नाहीत. परमपूज्य बापू सांगतात, "मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर रामनाम द्या, घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणा आणि भक्तिमार्गाचा स्वीकार करून दुर्बलाच्या सेवेत कार्यरत व्हा."
मी माझ्या मार्गाने चालत राहणार. माझ्या बरोबर आलात तर तुमचे स्वागत आहे अतिशय प्रेमाने, परंतु कोणीही बरोबर आले नाही, अगदी सगळ जग माझ्या विरोधात उभं राहील तरी मी पुढे पुढे चालतच राहणार हे स्पष्टपणे बजावणारा - तो हा अनिरुद्ध.
कुठल्याही राजकीय पक्षाशी/विचारांशी बांधिलकी नको ह्या बद्दल आग्रही असणारा व म्हणून ’दैनिक प्रत्यक्ष’ हे बिगर राजकीय वृत्तपत्र २००५ साली सुरु करून आजही यशस्वीपणे चालवणारा - तो हा अनिरुद्ध. या वृत्तपत्रात अनेक सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा आढावा घेतला जातो, ज्याचे परिणाम आपल्या देशावर तसेच देशातील सामान्य नागरिकांवर होऊ शकतात.
चित्रकला व शिल्पकला ह्या कलांमध्ये आपल्या कलाकृतींनी रसिकांचे मन मोहविणारा - तो हा अनिरुद्ध.
मुदगल, वज्रमुष्टी, यशवंती कुस्ती, लाठी आणि दांडपट्टा ह्या विद्यांचे स्वतः शिक्षण देऊन प्रशिक्षित बल आचार्य तयार करणारा आणि दांडपट्टा, लाठी, मुदगल फिरवतांना दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा - तो हा अनिरुद्ध.
कार्यकर्त्याबरोबर क्रिकेट, बैडमिंटन तसेच अंताक्षरीत उत्साहाने व आनंदाने भाग घेणारा - तो हा अनिरुद्ध.
मनुस्मृती जर सगळ्यांचे समानपणे कल्याण करू शकत नसेल तर ती बाजूला सारून नवीन सत्यस्मृती निर्माण करण्याची जिद्द बाळगणारा - तो हा अनिरुद्ध.
बालगुन्हेगारांचे पुनर्वसन त्यांना गुन्हेगार न म्हणता करणारा आणि तुरुंगातील कैद्यांना परत माणसात सामावून घेणे हे प्रत्यक्षात आणणारा - तो हा अनिरुद्ध.
अहिल्या म्हणजे भारतीय स्त्री वरील अन्यायाचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून महिलांचा लढाऊ अहिल्या संघ निर्माण करणारा - तो हा अनिरुद्ध.
गुरुपौर्णिमेला लक्षावधी भाविक येऊनही गुरूदक्षिणा म्हणून एक पैसाच काय पण साधी मिठाई, फुले व ग्रीटिंग कार्ड सुद्धा नाकारणारा - तो हा अनिरुद्ध.
इंग्रजीवरील बापूंचे प्रभुत्व, कॉम्पुटर व इंटरनेटचे विविधांगी ज्ञान आणि कॉम्पुटरचा उपयोग प्रत्येक कार्यासाठी करून घेण्याचा बापूंच्या प्रत्यक्षात आणल्या गेलेल्या कल्पना, प्रत्येक क्षेत्रातील विज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी तळमळ ह्यामुळे बापू श्रद्धावानांची नाळ प्रगतीशील विज्ञानाशी सुरेखपणे जोडतात. पत्नी, एक पुत्र व सून आणि एक कन्या व जावई ह्यांच्यासह सहजतेने सुखी संसार करणारा एक यशस्वी गृहस्थाश्रमी बापू भक्तांच्या मनातील अध्यात्म आणि गृहस्थाश्रम ह्यांमधील विसंवाद दूर करतो.
मी सामान्य मनुष्यच आहे; मी तुमच्यातलाच एक आहे, मी स्वतःला कुणीही अवतार मनात नाही, मी फक्त अनिरुद्ध आहे हे वारंवार प्रवचनातून, वृत्तपत्रातून (लोकप्रभा, तरुण भारत) निसंधिग्धपणे सांगूनसुद्धा त्यांच्या प्रत्येक भक्ताला मात्र हाच माझा खरा देव हा ठाम विश्वास सहजपणे उत्पन्न करणारा. भक्तांमध्ये मिसळून वागणारा, त्यांना मित्र म्हणवणारा, त्यांच्या बरोबर नामगजरात रमणारा, त्यांच्या मेळ्यात पूर्ण मोकळेपणाने बेभान होऊन नाचणारा, प्रत्येकाला म्हणुनच अगदी जवळचा वाटणारा त्यांचा सखा, त्यांचा मित्र - तो हा अनिरुद्ध.
कार ड्रायव्हिंग करणारा, बुलेटवर ऐटीत आरूढ होऊन जोरदार किक मारणारा, मी ही चित्रपट पाहतो हे आवर्जून सांगणारा , पाश्चत्य संगीतही सुंदर आहे ह्याची नोंद घेणारा - तो हा अनिरुद्ध. बापू- कुटुंबवत्सल, पत्नी, व मुलांबरोबर समाधानी वैयक्तिक कौटुंबिक जीवन, आणि संपूर्ण विश्व हेच कुटुंब मानून सर्व विश्वाची काळजी वाहणारा. बापू डॉ. अनिरुद्ध M.D. Medicine आणि यशस्वी डॉक्टर, आणि भक्तीमार्गाने विघातक गोष्टींना दूर करणारा – तो हा अनिरुद्ध
एम.डी. (मेडिसिन) पूर्ण केल्यावर वैद्य अंतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाचे धडे गिरवणारा - तो हा अनिरुद्ध
२०११ मध्ये सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी केलेल्या तपश्चर्येचा एक भाग म्हणून होमिओपॅथीचा अभ्यास केला, ज्यामध्ये होमिओपॅथीचा मूलभूत ग्रंथ मानला जाणारा 'ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन' (Organon of Medicine) याचाही समावेश होता. २०१२ आणि २०१३ मध्ये त्यांनी Hahnemannian Homoeo Forum (HHF) आयोजित National Homoeopathic सेमीनार्समध्ये सहभाग घेतला. या फोरमच्या निमंत्रणावरून त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांना ‘Relation between Quantum Physics and Homoeopathy’ आणि ‘Homeopathy and its Relation with Ramayana’ या अनोख्या विषयांवर मार्गदर्शनही केले.
अध्यात्मिक कार्यात सक्रिय असूनही बापूंच्या अंगावर ना भगवी वस्त्र आहेत, ना त्यांच्या कपाळावर टिळा आहे, ना त्यांच्या गळ्यात माळा आहेत. बापूंचा वेशही आजच्या युगाला साजेसाच, म्हणजेच शर्ट आणि पॅन्ट असा आहे. परंतु तरीही बापूंच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोच्च अध्यात्मिक अधिकार ह्या कुठल्याही बाह्य देखाव्याशिवाय सहजपणे प्रतीत होतो आणि काळजावर ठसा उमटवते ते ग्रंथराजमधील सहीनिशी प्रस्तुत केले बापूंचे एक वाक्य – “परमेश्वरी तत्वांवर नितांत प्रेम व अविचल श्रद्धा असणार्या प्रत्येकाचा मी दास आहे.”
त्रिविक्रमाची १८ वचने
दत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर ।
श्रद्धावानास देईन सदैव आधार ॥१॥
मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्चित ।
मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात ॥२॥
धरू नका जराही संशय याबाबत ।
न होऊ देईन तुमचा मी घात ॥३॥
प्रेमळ भक्ताचिया जीवनात ।
नाही मी पापे शोधीत बसत ॥४॥
माझिया एका दृष्टिपातात ।
भक्त होईल पापरहित ॥५॥
माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्वास ।
त्याच्या चुका दुरुस्त करीन खास ॥६॥
तैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास ।
सजा मी नक्कीच देईन त्यास ॥७॥
माझिया भक्तांचे कुठलेही प्रारब्ध ।
बदलीन, तोडीन वा घालीन बांध ॥८॥
न येऊ देता जगदंबेच्या नियमास बाध ।
दु:खातून काढूनी बाहेर, मार्ग दावीन अगाध ॥९॥
सदैव मी तुमचा उगवता देव ।
नाही मावळणार, सौम्य करीन दैव ॥१०॥
पूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम ।
पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम ॥११॥
सर्व मार्गांमध्ये, मज असे भक्ती प्रिय ।
जन्म-जीवन-मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय ॥१२॥
शरणागत होऊनी करी जो गजर ।
त्याचिया जीवनी सुख अपरंपार ॥१३॥
माझिया भक्तीपासून, कोण तुम्हांस रोखेल?
कामक्रोध जरी असले भरून, माझे नाम माझिया भक्तास तारेल ॥१४॥
प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरवीन ।
संपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान ॥१५॥
माझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने ।
सहस्रकोटी संकटे पळती भयाने ॥१६॥
खरा भक्त राही, दोन चरणांत माझ्या ।
तिसरे पाऊल माझे तुडवील संकटास तुमच्या ॥१७॥
जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम ।
तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम ॥ १८ ॥
अभंगलेखक – डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी
|| हरि: ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ ||
मी अनिरुद्ध आहे!
बापूंचा ५ नोव्हेंबर २००५ रोजी प्रकाशित झालेला दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख.
माझी माई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, "हा नं काय करील त्याचा कधी पत्ता लागत नाही!" तर माझी आई मला 'चक्रमादित्य चमत्कार' म्हणायची. बहुतेककरून माझ्या बालपणीच्या ह्या चक्रमपणाचाच विकास कायम होत राहिला आहे. प्रत्येकाला शालेय शिक्षणानंतर अगदी कुठलाही पाढा आठवला नाही तरी 'मी एके मी ते मी दाहे मी' हा पाढा सहजतेने येत असतो. कारण हा 'मी' दाही दिशांना मनाच्या घोड्यावर बसून पाहिजे तेव्हा पाहिजे तसा उधळू शकतो. मी असा आहे आणि मी तसा आहे, मी काही असा नाही आही मी काही तसा नाही, मला हे हवे आणि मला ते नको, मी हे केले आणि मी ते केले, अशा अनेक रुपांनी हा प्रत्येकाचा 'मी' जीवनभर धिंगाणा घालत राहतो आणि हा अनिरुद्ध तर लहान मुलांच्या 'धांगडधिंगा' शिबिराचा खंदा समर्थक। मग ह्या अनिरुद्धाचा 'मी' स्वस्थ थोडाच बसणार?
मी असा आहे आणि मी तसा आहे - मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे? ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती.
मी चांगला आहे की वाईट आहे - हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरु आणि माझी गायत्रीमाता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे.
मी काही असा नाही आणि मी काही तसा नाही - मी कसा नाही, कुठे नाही आणि कधी नाही हे मात्र मला खरच माहीत नाही पण मी कशात नाही हे मात्र मला नीट माहीत आहे व हाच माझ्या प्रत्येक वाटचालीतील प्रकाश आहे.
मला हे हवे आणि मला ते नको - मला भक्तकारण हवे आणि राजकारण नको, मला सेवा करावयास हवी पण कुठलेही पद नको, मला मित्रांच्या प्रेमाचे सिंहासन हवे पण सत्ता नको, मला अहिंसा हवी पण दुबळेपणा नको, मला सर्वसमर्थता हवी पण शोषण नको, बल हवे पण हिंसा नको, मला परमेश्वराच्या प्रत्येक भक्ताचे दास्यत्व मी स्वीकारणे हवेहवेसे तर दांभिक ढोंगबाजी व खुळचट श्रद्धांचे (?) नायकत्व नको.
अनेकांना मी कुणालाही भेटायला जात नाही म्हणुन माझा राग येतो. परंतु मला कुणाकडूनही काही द्यायचेही नाही तसेच कुणालाही काही द्यायचेही नाही. मग कुणालाही भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी भेटतो फक्त माझ्या मित्रांना कारण 'आप्तसबंध' म्हणजेच देण्याघेण्याशिवायची आपुलकी हे एकमेव मला भेटीसाठी कारण असते, म्हणून मला निर्व्याज आपुलकीची भेटगाठ हवी, पण देण्याघेण्याची किंवा विचारमंथनांची भेटगाठ नको असते.
मला ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचे पोकळ शब्द व देखावे नकोत पण मला परिश्रमपूर्वक ज्ञानाचा रचनात्मक कार्यासाठी होणारा निःस्वार्थ विनियोग हवा असतो.
मी हे केले आणि मी ते केले - 'मी काहीच करत नाही, ना-मी सर्वकाही करत असतो' ही माझी अंतिम श्रद्धा आहे. मग हा माझा 'मी' स्वस्थ बसून निष्क्रिय आहे काय? ते तर मुळीच नाही. या अनिरुद्धाचा 'मी' त्या 'ना-मी' च्या प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनप्रवाहाला पहात राहतो आणि त्या प्रवाहाची गती थांबणार नाही व पात्र कोरडे होणार नाही, ह्याची काळजी घेण्यासाठी त्या 'ना-मी' चा स्त्रोत त्याच्याच प्रेमाने श्रद्धावानाच्या जीवननदीच्या कुठल्याही डोहाला फोडून सतत प्रवाहित राहण्यासाठी ओतत राहतो. मला सांगा, ह्यात माझे काय?
सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणि दुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे; ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही.
प्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्ठित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे.
मला काय करायचे आहे? मी काय करणार आहे? मी अग्रलेख का लिहितो आहे? तिसर्या महायुद्धाविषयी एवढे मी का लिहितो आहे? मी प्रवचन का करतो आहे? ह्याचे उत्तर माझी ह्रदयक्रिया कशी चालते व मी श्वास कसा घेतो ह्यांइतकेच सोपे आहे, खरे म्हणजे तेच उत्तर आहे.
माझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो, बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मी' फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणि कधीही नसेल.
मित्रांचा मित्र,
अनिरुद्ध
# Dr Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha Bapu