संपूर्ण नाव: देवीदास गंगाधर जोशी आई/वडील: सौ कमल व श्री गंगाधर जोशी दीक्षा गुरू: प पू ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर कार्यकाळ: नोव्हेंबर १९६६ ते आजपर्यंत कार्यरत सत्पुरुष सहवास व मार्गदर्शन
१) प पू गुळवणी महाराज
२) प पू मामासाहेब देशपांडे
३) दत्तमहाराज कवीश्वर
४) प पू ढेकणे काका
५) शरद जोशी मूळ गाव: लातूर असले तरी गेल्या पस्तीस वर्षांपासून पुणे येथे वास्तव्य आहे.
त्यांचे घराण्यात मागच्या पाच पिढ्यांपासून श्री दत्त उपासना. तसेच माहूर च्या रेणुका देवीची दैवी कृपा व आशीर्वाद आहेत.
त्यांना त्यांचे कार्यकाळात श्री दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय,शक्ती संप्रदाय मधील अनेक श्रेष्ठ अधिकारी सत्पुरुषांच मार्गदर्शन व कृपा आशीर्वाद लाभले.
देवीदास जोशी यांच्या मातोश्री सौ. कमल गंगाधर जोशी या पूज्य श्री गुळवणी महाराजांच्या अनुग्रहीत होत्या व अनुसरूनच त्यांना शक्तिपात व दत्तकृपेचा वारसा लाभला.
प पू जोशी यांना प्रथम 1971 जानेवारीत प. पू. श्री गुळवणी महाराजांचे दर्शन, कृपा आशीर्वाद लाभले. पुढे 1987 सप्टेंबर मध्ये प. पू. श्री दत्त महाराज कवीश्वर यांचेकडून शक्तिपात व मंत्र दीक्षा झाली. ब्रम्हर्षी दत्तमहाराज यांचे दीर्घकाळ म्हणजे सुमारे बारा वर्षे त्यांचा सहवास तसेच मार्गदर्शन लाभले.
1989 ऑक्टोबर महिन्यात प. पू. मामासाहेब देशपांडे महाराजांनी त्यांच्या माऊली आश्रमात स्वतः श्री वासुदेव निवासातून नेले व त्यांना भगवान श्रीपादश्रीवल्लभ यांनी कुरवपूर येथे दिलेल्या पादुका दाखवून दर्शन घ्यावे अशी आज्ञा केली. साधारण त्याच सुमारास परमपूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांनी माऊली येथे देवीदास जोशींना बोलाऊन परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराजांनी देविदास जोशींच्या डोक्यावर हात ठेवला दिव्य अनुभूती दिली, आणि साधना नित्य करत जा, आमचे लक्ष आहे अशी आज्ञा दिली, आणि आशीर्वाद दिले.
परमपूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांकडून ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची आज्ञा केली आणि याबरोबरच शक्तीपात संप्रदाय याची साधना सुद्धा उत्तम प्रकारे होवो असे आशीर्वाद दिले. पुढे सन 1990 नंतर परंपरेच्या आज्ञाने माऊली येथील देवांच्या पूजेचे भाग्य तब्बल दीड/दोन वर्षे लाभले. या सर्वांचा परिपाक म्हणून पुढे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराजांनी 2009 मध्ये शक्तिपात दीक्षा देण्याचे अधिकार दिले.
श्री वासुदेव निवास पुणे हे भारतातील शक्तिपात संप्रदायाचे आद्यपीठ आहे प.पू. श्री गुळवणी महाराज पूज्य श्री दत्त कवीश्वर महाराज, पूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचा कृपालोभ अनेक वर्षे लाभला.
परंपरेचे कार्य चालु आहे.
सध्या श्री वासुदेव निवास पुणे या प. पू. योगीराज गुळवणी महाराज यांनी स्थापन केलेल्या आश्रमाचे विश्वस्त म्हणून काम सुरू आहे.
महाराष्ट्र ,गुजरात, आंध्र, कर्नाटक सगळीकडे विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचने, शक्तिपात या विषयावर प्रवचने श्री दत्त संप्रदायातील अनेक भक्त,साधक,मुमुक्षना मार्गदर्शन करीत आहेत. हे सगळे कार्य या आपल्या दिव्य परंपरेचे शक्ती करून घेते अशी देविदास जोशीं ची भावना आहे आणि अशीच दत्त संप्रदायाची सेवा होवो हीच त्यांची धारणा आहे.
श्रीलोकनाथतीर्थस्वामी महाराज आणि प. प. योगिराज गुळवणी महाराज यांच्या परंपरेतील एक व्यासंगी वक्ते आणि साधक आहेत. त्यांनी 'शक्तीपात योग' आणि 'चरित्र चिंतन' या विषयांवर आपले प्रबोधन केले असून, आध्यात्मिक क्षेत्रात भक्ती आणि साधनेचा संदेश दिला आहे. भक्तीच्या मार्गाने साधनेचे महत्त्व समजावून सांगणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. ते प्रामुख्याने शक्तिपात परंपरेतील (नारायणी परंपरेतील) साधक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात.
श्री दत्तमहाराज यांचे आशीर्वादाने त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच श्रीचरणी प्रार्थना !
शुभम भवतु
निवासपत्ता: फ्लॅट नंबर 09, मोहिते टाऊनशिप A बिल्डिंग, माणिकबाग, सिंहगड रोड पुणे मोबाईल नंबर: 9850716216
सत्पुरुष: प. पु.परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज गुरू: प पु शंकर स्वामी, नृसिंहवाडी वाडी येथे सन्यास दीक्षा १९६४ - ६५ समाधी: १५ सप्टेंबर २०१०
गेल्या यांच सहा हजार वर्षांत अनेक संस्कृति प्रत्यक्षात आल्या पण त्यांच्या पैकी "भारतीय संस्कृति" एक अतिप्राचीन, महान संस्कृति असून, अनेक चढउतार तिच्या आयुष्यात आले तरी अजून पर्यंत तिचा प्रभाव भारतीयांच्या हृदयात टिकलेला आहे त्याचे खरे कारण म्हणजे तिच्या अंतरंगात "अध्यात्म विद्येला" सर्वश्रेष्ठ स्थान आहे. वास्तविक पाहता मानवी जीवनाला योग्य वळण देऊन माणसाला खऱ्या अथनि माणूस बनवण्याचे काम संस्कृतिच करित असते.
सध्याच्या काळात “विज्ञान संस्कृति” ने आपला संसार थाटून समाजाचे व्यवहारिक जीवन जरी बदलून टाकले आहे तरी एक प्रकारची अशांती, अपूर्णता, अतृप्ती सतत् माणसाला घेरून टाकते आहे. बरेचसे सनातन प्रश्न- मी कोण, माझा खरा संबंधी(आप्त) कोण, मानवी जीवनाचे अंतीम ध्येय कोणते, हे विज्ञानाच्या शिखरावर आरूढ झालेल्या आजच्या मानवाला सुटलेले नाहीत. ह्या कारणाने देहाच्या सुखसोयी असून सुद्धा माणसाच्या मनाला खरे समाधान लाभलेले नाही. जेथे समाधान नाही, तेथे शांती कशी असणार, ती असूच शकत नाहीं.
देहाच्या गरजा भागल्यानंतर फक्त अध्यात्म चिंतनानेच मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजू शकतो. अर्थ समजला की त्याचे प्रश्न सुटतात आणि मग ब्रह्मविद्येच्या उपासनेने त्याला पूर्ण शांतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो, हा आत्मतत्वाचा बोध किंवा आत्म साक्षात्कार सत्याचा शोध घेणाऱ्या भारतीय ऋषी मुनींना उपनिषदकाली झाला. ब्रह्मविद्येची ही परंपरा भारतामधे आजपर्यंत सतत् चालली आहे. ही "ब्रह्मविद्या" ज्याच्या ठिकाणी साकार त्याला "सदगुरु" किंवा "संत" म्हणतात म्हणून संत हेच भारताचे आदर्श पुरुष होय. ही विद्या गुरु-शिष्य पराम्परेनेच आजपर्यंत अव्याहत चालू आहे व पुढे ही चालू राहील व "सदगुरु वाचोनी सापडेना सोय ! धरावे ते पाय आधी!!" हृयाची पूर्ण प्रचिती येईल.
बाह्यांगाने पाहिले तर संत व सामान्य माणसाच्या जीवनात विशेष फरक दिसेलच असे नाही पण दोघांच्या अंतरंगात मात्र जमीन आसमानाचा फरक असतो. सामान्य माणसाचे मन कर्म करताना फळाच्या आशेत गुंतून पडते तर संतांचे मन "सच्चिदानंद ब्रह्म" ची साक्षात अनुभूति असल्यामुळे कर्तव्या पुरतेच कर्मांत राहून कर्माचे फळ भगवंताला अर्पण करुन (हरि अर्पणम्), स्वतः वेगळे राहतात अर्थात सामान्य माणसाला देहबुद्धीमुळे अशांति, असमाधान राहते तर संतांचे जीवन आत्मबुद्धीमुळे शांति, समाधान व परमानंदाने भरून जाते.
पुण्य भूमि व परम पवित्र अश्या भारतवर्षांत भगवंताचे अनेक अवतार होऊन गेले पण भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव ह्या भूतलावर वास्तव्य करत असतात. भगवान दत्तात्रेय हे सृष्टिचे सृजन, पालन व संहार करतात. भगवान दत्तात्रेय कृत युगात अत्रि आणि अनुसूया ह्यांच्या तपश्चर्या व भक्तिने प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपात अवतरले. हे सर्वांचे आदी व परम-गुरु आहेत. जन्म मरणास कारण असलेले "अज्ञान" त्याचा नाश करून भक्तांना कैवल्यपद देण्यासाठीच हा अवतार झाला. त्यांचे अनन्य भक्तिने स्मरण करताच ते प्रत्यक्ष येऊन भक्तांना सर्व संकटातून मुक्त करून त्यांचे अभीष्ट पूर्ण करतात व शाश्वत सुख पण प्रदान करतात. भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी आंध्रप्रदेशात पीठापुर क्षेत्री "श्रीपाद श्रीवल्लभ" ह्या नावाने प्रगट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कांरजा क्षेत्रात "श्री नृसिंह सरस्वती" ह्या नावाने दूसरा अवतार घेऊन अदभुत चरित्र दाखविले ज्याचे वर्णन सरस्वती गंगाधर रचित "श्रीगुरुचरित्र" ह्या ग्रंथात ओवीबद्ध आहे. हा ग्रंथ म्हणजे पांचवा वेदच. ह्या प्रासादिक ग्रंथाच्या पारायणाने अनेक दत्त भक्तांना संसाररूपी भवसागरातून मुक्ति मिळाल्याची साक्ष आहे. श्रीदत्तगुरुंचा तिसरा अवतार "श्री माणिक प्रभु". हे फार ऐश्वर्यसम्पन्न राजयोगी होते. श्री दत्तगुरुंचा चौथा अवतार, अक्कलकोटचे "श्री स्वामी समर्थ महाराज". ह्यांची अवधूत वृत्ति असे व हे तरुतलवास करत असल्या मुळे "वटवृक्षस्वामी" म्हणून ह्यांची ख्याति होती.
ह्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज म्हणजे स्वयं दर अवतारच. त्याचे संपूर्ण चरित्र म्हणजे श्रीदत्तप्रभूच्या आदेशाचे केवळ प्रतिपालन होते. स्वामी एक महान तपस्वी असून धगधगीत वैराग्य त्यांच्या नसानसात भिनले होते. स्वामी महाराजानी भक्तजनोद्धारणार्थ स्तोत्रादी संग्रह, दत्तपुराण, दत्तमहात्म्य, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, समश्लोकी गुरुचरित्र इत्यादि संस्कृत व प्राकृत ग्रंथ भांडारच उपासकांच्या हाती दिले. त्यांचे संन्यासी शिष्य श्री दीक्षित स्वामी व श्री दिक्षीत स्वामीचे संन्यासी शिष्य श्री शंकर स्वामी व श्री शंकर स्वामींचे संन्यासी शिष्य म्हणजे आमचे सद्गुरु "प. पू. परमहंस श्री दत्तानंद स्वामी महाराज".
प. पू. परमहंस श्री दत्तानंद स्वामी महाराज यांच्या कार्याचा अल्प परिचय
परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज हे मूलतः महाराष्ट्राचे असून त्यांच्या पूर्वाश्रमासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु काही ज्येष्ठ साधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे जन्मगाव बार्शी होते व त्यांच्या वडिलांचे नाव भगवान किंवा भगवंत असावे असे समजते. युवावस्थेत प.पू. श्री दत्तानंद स्वामी महाराज रॉयल इंडियन एअरफोर्स मध्ये नोकरी करत होते. एअर फोर्स मध्ये त्याकाळी भारतीय लोकांना मिळणारी भेदभावाच्या वागणूकीविरुद्ध झालेल्या संपामध्ये त्यांनी भारतीय लोकांचे नेतृत्व केले होते, व त्यात यश मिळून भारतीय लोकांना सन्मानाची आणि भेदभावरहीत वागणूक मिळू लागली.
नोकरी करत असता, एकदा गुरुचरित्राच्या सप्ताहासाठी सुट्टी न मिळाल्यामुळे त्यांनी नोकरीचा त्याग केला व साधनेसाठी शिर्डीत आले. शिर्डीत श्वेत वस्त्र व जटाधारी ब्रह्मचारी अशा रूपात त्यांचे वास्तव्य असे. १९६४ मध्ये शिर्डीच्या साईमंदिरात असताना त्यांना दृष्टांत झाला कि तुम्ही श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे प.पू श्री शंकर स्वामींची भेट घ्यावी. त्याप्रमाणे प.पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराज, श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे, प. पू. श्री शंकरस्वामीं महाराजाना भेटले व दृष्टांताप्रमाणे येथे त्यांना सद्गुरू भेट झाली. प. पू. श्री शंकर स्वामींकडून त्यांनी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथेच श्रीकृष्णानदीच्या तीरी १९६४-६५ च्या सुमारास विधिवत होमहवन व इतर संस्कारपूर्वक संन्यासाची परमहंस दीक्षा ग्रहण केली.
त्यानंतर प. पू. श्री दत्तानंद स्वामीमहाराज अनेक ठिकाणी भ्रमंती करत असत. विनाकारण येणारी उपाधी टाळण्यासाठी, वरकरणी उग्र व संतापी, असे रूप त्यांनी स्वीकारले होते. परंतु भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ आणि कल्याण करणारी, त्यांचे पाप व संसारातील ताप दूर करून, त्यांची वृत्ती भगवद्भक्ती कडे लागण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करणारी अशी "कलौ भक्तान समुद्धर्तु" अशी ही यतीमूर्ती असे.
१९६५ सालच्या सुमाराला महाराज कल्याण येथे आले. तेथे त्यांचा मोठा शिष्य सम्प्रदाय होता. कल्याणला त्यांनी मठाची स्थापना केलेली होती व तेथे नित्य पूजा आरती वगैरे चालत असे. १९६६ च्या सुमाराला त्यांचे बडोदा येथे आगमन झाले व त्यांनी श्री पुरोहित यांचे घरी चातुर्मास केला व तसेच त्यांच्या घरी वासुदेव मठाची स्थापना केली. तथापि त्यांची भ्रमंती सतत चालू असे आणि नागपूर, चांदोंद, गरुडेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांचे वारंवार येणे जाणे असे.
त्यानंतर १९६७ साली प. पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराज यांचे ग्वाल्हेर येथे आगमन झाले व तेथे त्यांनी श्री गुर्जर यांच्या घरी वास्तव्य व मठाची स्थापना केली व अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांचे पट्टशिष्य प. पू .श्री. तेलंग स्वामी महाराज यांची ग्वाल्हेर मुक्कामीच स्वामींची भेट झाली व १५ फ़ेब्रुवारी १९६९ रोजी त्यांना प. पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराजांकडून अनुग्रह प्राप्त झाला. तदनंतर १९७२ साली प. पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराज भोपाळ येथे आले आणि ३/१९३ अरोरा कॉलनी येथे श्री शिंगवेकर यांच्या घरी मठांची स्थापना केली. तसेच १९९९ च्या सुमारास इंदोर येथे वासुदेव नगर येथे मठ स्थापना केली. दोन्ही ठिकाणी त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे.
इंदौर येथे वासुदेव नगर येथील मठात सन १९८५ पासून दत्तजयंती, गुरुपौर्णिमा व इतर उत्सव प. पू. श्रीदत्तानंद स्वामीमहाराजांचे आज्ञेने साजरे होऊ लागले व भक्तांची मांदियाळी होऊ लागली.
प.पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराजानी १९६५ ते २०१० पर्यंत सतत भ्रमण करून लोकांना आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर केले. त्यांनी कल्याण, पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, बडोदा, ग्वाल्हेर, इंदौर, भोपाळ, बडोदा व इतर अनेक ठिकाणी संचार केला. या स्थानी त्यांचा शिष्य परिवार होता व अजूनही आहे.
भाद्रपद शुक्ल अष्टमी (दिनांक १५/०९/२०१०) रोजी प. पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराज ब्रह्मलीन झाले. संन्यासी असल्यामुळे त्यांचे पार्थिव शरीराला यथाविधी, श्री क्षेत्र मंडलेश्वर येथे श्री नर्मदा पात्रात विधिवत जलसमाधी देण्यात आली.
त्यानंतरच्या काळात २००-२५० सदस्यांची नोंदणीकृत संस्था "श्री दत्तानंद सेवा मंडळ ट्रस्टची दिनांक ३१/०५/२०१२ स्थापना झाली असून प. पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराजांचे कृपाप्राप्त व प्रपन्न शिष्य श्रीमद सद्गुरु श्री तेलंग महाराज ह्यांच्या मार्गदर्शन व सानिध्यामध्ये गुरुपौर्णिमा, दत्तजयंती तसेच रामनवमी आणि जन्माष्टमी आदी उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.
संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक -
श्री. अवधूत दत्त मंदिर, स्वामी दत्तानंद सेवा मंडळ ट्रस्ट G357/358, कालिंदी गोल्ड कॉलनी ,अरविंद मेडिकल कॉलेजसमोर, उज्जैन रोड, इंदोर (मध्य प्रदेश) संपर्क क्रमांक : 9685186441, 9329889046, 7987262801
प. पू. दत्तानंद स्वामी महाराजांची आरती
ओवाळू आरती श्री सद्गुरूराया ब्रम्हस्वरूपी सद्गुरूनाथा श्री दत्तानंदा ।।ध्रु.।।
व्रत घेवोनीया जन सेवेचे गृह त्याग करिती । गाणगाभुवनी दत्ता सन्निध्य जाऊनियां बसती योगिंद्राचे स्वरूप होऊनी भ्रमणाला निघती अंतर्यामी तळमळ मोठी बांधव या साठी ||1||ओवाळू.. जागो ज़ागी भक्तजनांचा मेळावा करिती अज्ञानाचे तिमिर सारण्या उपदेशा देती ईशत्वाचे स्वरूप होऊनी मानवांस देती भ्रमांत पडल्या मानवतेला प्रकाशांत घेती ।।2।।ओवाळू.. साक्षात्कार करवूनी भक्तां ईश दर्शनाचा भक्तवरचे संकट टाळी आनंद कंदाचा नारायण दत्तात्रेय स्वामी वासुदेवाचे सतत चालते नाम मुखिया दत्तानंदाचे ।। 3।।ओवाळू.. भजनांवरती बहुत प्रिती भान न समयाचे भक्तवृंद ही सवे गातसे गजर श्रीहरीचे भक्तासंगे आचार धर्मा वरी कटाक्ष फार जरी क्रोधला तरी ते हृदयी आत्मीयता ही फार ।।4।। ओवाळू.. लक्षुनी भिक्षा भक्त आमंत्रिती स्वामीरायाला परी धन्यतो स्वामी मांगे षड्रिपु भिक्षेला ऐश्यापरि ते उद्धरताती आपुल्या भक्तांना त्यांचे चरणी भक्त ठेवीती पदोपदी माथा ।।5।।
ओवाळू आरती श्री सद्गुरूराया ब्रम्हस्वरूपी सद्गुरूनाथा श्री दत्तानंदा ।।ध्रु.।।
P. P. Paramhans Shri Dattanand Saraswati Swami Maharaj
दिगम्बर का शाश्वत अवतार ! सः जगतः स्वर्णमन्दिरं सृजति ! यदि श्रद्धा अस्ति तर्हि शिवे सत्यं मिलिष्यसि, तदा दत्तः दयालुः भविष्यति.
जरा याबद्दल माहिती ती अशी,
19 व्या शतकाच्या प्रारंभिस निगवे गावामध्ये कुंभारगल्ली मध्ये कुलकर्णी घराण्यात एक मोठे दत्त भक्त होऊन गेले. त्यांचे दर दिवशी नित्य पठण व दत्त महाराजांची पूजा करत असत. दत्त प्रभुवर नितांत श्रद्धा होती. ते दर पौर्णिमेला नरसोबावाडीला एकटे पायी दिंडी करत होते. कालांतराने त्याचे वय होत गेले येवढ्या लांबचा प्रवास त्यांना झेपेनासा झाला. नरसोबावाडीला जाण्यास त्यांना वयोमानानुसार जाणे शक्य होत नव्हते. यथा आवकशने त्यांची आयुष्यातील पहिली पोर्णिमा चुकली. अस्वस्थ मनाने सतत दत्त महाराजांच्या चुकलेल्या दिंडीचा विचार दिवसभर करत होते. मनाला खंत वाटू लागले.
दत्त महाराजांच्या विचारात खेद भावनेने घरामध्ये दिवसभर अस्वस्थ बसून राहिले. व रात्री झोपी जाताना सुद्धा त्यांच्या मनात सतत चुकलेल्या दिंडीचाच विचार... चुकलेल्या दिंडीची सल मनात ठेवून ते झोपी गेले. त्यानंतर त्या रात्री स्वतः दत्त महाराजांनी त्याच्या स्वप्नात मध्ये दृष्टांत देवून हे सांगीतले की, "तुला आता नरसोबावाडीलां येण्याची गरज भासणार नाही तुझ्या घरातच माझे अस्तित्व आहे. तू तुझ्या परसदारी असणाऱ्या मातीच्या ढीगा मध्ये तुला माझ्या स्वयंभु पादुका सापडतील."
यानंतर महाराजांनी दिलेल्या दृष्टंतानुसार घराच्या परसदारी खोदकाम केले असता. तेथे स्वयंभु पादुका सापडल्या अत्यंत हर्षित मनाने सर्व भक्तांनी त्याची प्राण प्रतिष्ठापना करून छोटेसे मंदिर ऊभा केले. आता सद्द् स्थितीला सर्व भक्तांनी दत्त महाराजांची पंचधातूची मूर्तीची स्थापना केली आहे त्यानंतर ते आज पर्यंत दत्त महाराज सर्व दत्त भक्तांच्या पाठीशी संकटकाळी ऊभा राहण्याची प्रचिती आजही अनेक भक्तांना येते.
दर पौर्णिमेला दत्त महाराजांचा अभिषेक व पूजा केली जाते. पौर्णिमा प्रसाद ही भक्तांना दिला जातो.त्याचप्रमाणे दत्त जयंती दिवशी 8 ते 10 हजार भक्तांच्या साक्षीने दत्त जयंती पार पडते.
चिरंजीव अवतार दिगंबर !करील जगाचे सुवर्ण मंदिर !श्रद्धा असता सत्य शिवावर भेटतील मग दत्त दयाघन...
सर्व दत्तभक्तांनी या परमपवित्र मंदिरास अवश्य भेट देऊन प्रासादिक अनुभूती घ्यावी. ।। श्री गुरू शरणं ।।
श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा
कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर पासून 25 किमी • निगवे खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर • निगवे खालसा, श्री दत्त मंदिर कुंभारगल्ली Mobile: 9764352337 Google Location https://maps.app.goo.gl/grAaRShf6CM8sytb6?g_st=aw
श्री दत्त पादुका, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसाश्री दत्त पादुका, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसाश्री दत्त पञ्चधातुमूर्तिं, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा